-संजय देवधर
चित्रकलेचे शास्त्रशुद्ध उच्चशिक्षण सगळ्यांनाच घेता येत नाही.असे असले तरीही अनेकजण आपल्यातील अंगभूत सुप्त कलागुणांचा विकास एकलव्याच्या वृत्तीने करतात. रूढार्थाने गुरु लाभलेले नसतानाही, सातत्याने केवळ निरीक्षण, सराव करुन पारंगत होतात व यशाचे शिखर गाठतात. विदर्भातील अकोल्याच्या गंधाली गजानन घोंगडे यांनी अशीच वाटचाल करीत जिद्दीने कलाक्षेत्रात ठसा उमटवला आहे. व्यवसायाने त्या कॉश्च्युम डिझाईनर आहेत. लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातील आदिवासी वारली चित्रशैलीचा अभ्यास करुन त्यात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. पद्मश्री जिव्या सोमा मशे यांना त्या गुरुस्थानी मानतात. त्यांची चित्रे बघून प्रेरणा मिळाल्याचे त्या अभिमानाने सांगतात.
कोरोनाच्या आकस्मिक संकटाने सारे जग स्तब्ध झाले. गेल्या वर्षी मार्च महिन्यात सर्वांना अचानक लॉकडाऊनला सामोरे जावे लागले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण घरात अडकून पडले. गंधाली यांनी या परिस्थितीत न डगमगता, ती इष्टापत्तीच समजून कधी न मिळणाऱ्या वेळेचा सदुपयोग केला. वारली चित्रशैलीचे पितामह पद्मश्री जिव्या सोमा मशे यांची ‘गुगल’ वरील चित्रे बघून त्यांना प्रेरणा मिळाली. त्यांनाच गुरुस्थानी मानून एकलव्याप्रमाणे त्या शिकत गेल्या. चित्रे रेखाटण्याचा सराव करत प्राविण्य मिळविले. लॉकडाऊन संपल्यावर त्या शेगाव येथे संत श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गेल्या. तेथेच झालेल्या स्फूर्तीने त्यांनी ‘विजयग्रंथा’ तील महाराजांनी घोड्याला शांत केल्याच्या प्रसंगाचे वारली चित्रशैलीत कागदावर रेखाटन केले. घरी परतल्यावर २१ अध्यायांवरील प्रसंगचित्रे त्यांनी रेखाटली. संतकवी श्री दासगणू महाराज ( श्री.गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे ) हे शिर्डीच्या साईबाबांचे परमभक्त. त्यांनीच १९४६ साली विदर्भातील शेगावच्या श्री गजानन महाराजांचे ओवीबद्ध चरित्र लिहिले आहे. या कथारूपी २१ अध्यायांना आर. के. देशमुख यांनी चित्रबद्ध केले आहे. गंधाली यांनी हे २१ कथाप्रसंग वारली चित्रशैलीत रेखाटले आहेत. त्यात त्यांनी वारली कलेला अलंकारिक साज चढवलेला दिसतो. आदिवासी वारली चित्रकला अतिशय लवचिक असून सर्वसमावेशक आहे हेच यातून स्पष्ट होते.
गंधाली यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांचा कलाजीवनपट उलगडला. मूळच्या नागपूर येथील कल्पना किसनराव इंगोले यांच्या घरी कलेची कोणतीच पार्श्वभूमी नव्हती. मात्र आईवडिलांनी शिक्षणाबरोबरच कलानिर्मितीचे, रसिकतेने जीवन जगण्याचे संस्कार केले. छोटी कल्पना आजूबाजूला बघून बघून रांगोळी, मेहेंदी, बांबू आर्ट शिकत गेली. लहान भाऊ गोविंद याचे हस्ताक्षर अतिशय सुरेख होते. त्याच्याकडून ती कलाही अंगी बाणवली. बी.कॉम.पर्यंत शिक्षण झाल्यावर १९९८ साली गजानन घोंगडे यांच्याशी विवाह झाला. गंधाली अकोल्याला रहायला आल्या. पती गजानन यांचे बॅचलर ऑफ फाईन आर्ट्सचे शिक्षण नागपुरात झाले आहे. ते ग्राफिक डिझाईनर, व्यंगचित्रकार, सुलेखनकार म्हणून कार्यरत व सुपरिचित आहेत. कलाप्रेमी गंधाली यांना कलावंत जीवनसाथी मिळाल्यावर त्यांची कला अधिकच बहरली. मराठी – इंग्रजी हस्ताक्षर विकास वर्ग व सुलेखन कार्यशाळा घेण्यास त्यांनी दोघांनी सुरुवात केली. सुट्ट्यांमध्ये त्यांना विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळू लागला. नंतर अनेक शिक्षकांनी मागणी केल्यामुळे त्यांच्यासाठी ५ ते १५ दिवसांचे हस्ताक्षर व सुलेखन वर्ग त्या घेतात. कलेच्या प्रांतात हे दाम्पत्य रममाण झाले आहे. त्यांच्या पुढील कलावाटचालीस शुभेच्छा!
परंपरा आणि नवतेचे ‘फ्युजन’
आदिवासी वारली चित्रशैली केंद्रस्थानी ठेवून गंधाली यांनी विविध लोककलांंचा अभ्यास केला. कागद, कापड, मातीची भांडी अशा विविध माध्यमांवर वारली चित्रे रेखाटण्यात त्या रंगून गेल्या.कलेची शुद्धता जपत परंपरा आणि नाविन्याचे फ्युजन करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाईचे चित्र त्यांनी वारली चित्रशैलीत रंगवले. नंतर त्यांनी येणाऱ्या सगळ्याच सण – उत्सवांची तसेच विविध देवदेवतांची चित्रे रेखाटली. ती त्या समाजमाध्यमांवर पाठवू लागल्या. रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने त्यांचाही हुरूप वाढला.त्यांच्या वारली चित्ररचना आकर्षक दिसतात. त्यात विविधता आढळते.दरम्यान चित्रांना मागणीही वाढली. सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी त्यांच्या नागपुरातील हॉटेलसाठी गंधाली यांच्याकडून मोठ्या आकारात वारली चित्र रंगवून घेतले. घोंगडे दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा राम शाळेत जात असताना एके वर्षी त्याने फॅन्सी ड्रेस स्पर्धेत भाग घेतला. त्याच्यासाठी गंधाली यांनी संत तुकाराम महाराजांची वेशभूषा स्वतः शिवली तसेच सादरीकरणासाठी संवादही लिहिले. रामला प्रथम पारितोषिक मिळाले. हा क्षण त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला.
त्यानंतर त्यांनी ‘राम क्रिएशन’ नावाने कॉश्च्युम डिझाईनिंगचा व्यवसाय सुरु केला. गेल्या १६ वर्षांत त्याचा मोठा विस्तार झाला आहे. आता त्यांच्याकडे चार हजार ड्रेसेस तयार असून त्या वेषभूषेला साजेसे संवादही लिहून देतात. त्यांना ‘निळू फुले आर्ट फाउंडेशन’ तर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. कोरोनामुळे मागील वर्षापासून शिक्षणक्षेत्र ठप्प झाले आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम साहजिकच सर्वांप्रमाणे गंधाली यांच्या व्यवसाय-उपक्रमांवरही झाला. मात्र मिळालेल्या वेळेचा योग्य उपयोग करून वारली कला त्यांनी आत्मसात केली आहे. त्यांच्या चित्रांचे मला जाणवलेले वैशिष्ट्य म्हणजे, त्यांच्या वारली चित्रांमधील वर्तुळाकार भरीव असतात. त्यांच्या चित्रातील त्रिकोण पांढऱ्या रंगाने न भरता त्यात रेषांचे अलंकरण आढळून येते. त्यांच्यातील ‘फॅशन डिझाईनर’ चा तो प्रभाव असावा.
संपर्क -9823087650/9359300901