गीला मन शायद बिस्तर के पास पडा हो..!

(साभार : दैनिक ‘महाराष्ट्र दिनमान’)

-मिथिला सुभाष

*****

सिनेमा सुरु झालेला आहे. तुम्ही पहिल्यांदा पाहताय तर मग अशोक मेहतांच्या कॅमेऱ्याने दाखवलेले महाबळेश्वर-पांचगणीचे डोंगर, निसर्ग पाहून खुश होताय. आशा गातेय.. प्रसन्न.. उडत्या ला..ला..ला.. ने सुरु झालेलं गाणं.. छोटीसी कहानी से, बारिशों के पानी से, सारी वादी भर गई.. आणि… नकळत तिचा गोडवा आपल्या काळजाचा ठाव घेतो.. आपण गाफिल असतांना ती गाते, ना जाने क्यूं दिल भर गया, ना जाने क्यूं आंख भर गई..! हे असंच होणारे आता दोन तास.. ना जाने क्यूं दिल भर गया, ना जाने क्यूं आंख भर गई..! आणि कदाचित पुढचे काही तास?? काही दिवस?? कारण तुम्ही ‘इजाज़त’ पाहायला बसलाय! जर तुम्ही आधीच पाहिलेला आहे ‘इजाज़त’.. आणि दुसऱ्यांदा, तिसऱ्या वेळी पाहताय, तर मग तुमचं मन आधीच काठोकाठ भरलेलं आहे.. श्वासाच्या धक्क्यानेही ते हलतं आणि डोळ्यावाटे पाणी सांडतं..

गुलज़ारचा सिनेमा आहे. त्याची अदा, त्याच्या मनातली जज़बाती कश्मकश, आणि त्या सगळ्याला त्याने दिलेला शायराना अंदाज़ ‘इजाज़त’मधे आहे. रेल्वेच्या वेटिंग रूममधे गोष्ट सुरु होते. दोघांची गोष्ट! पण जेव्हा दोघांच्या दरम्यान कुणीतरी तिसरं असतं तेव्हा त्या दोघांचं घर पण तर वेटिंग रूमच असते. असं वेटिंग रूम झालेलं घर पाच वर्षापूर्वी मोडून वेगळे झालेले महेंदर आणि सुधा. अचानक इथे भेटलेत. या भेटीत दोघांना एकमेकांच्या बाबतीत अशा गोष्टी कळतात, ज्या त्यांना दूर होण्याआधी माहितच नव्हत्या.. त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नव्हता.. किंवा त्यांना उशिरा कळल्या.. त्याआधीच झालेली भावनिक मोडतोड.. त्या गोष्टी कळल्यावर दोघं विकल होतात.. पाऊस बरसत असतो.. अंतर्बाह्य पाऊस.. आपल्या मनातही तोच पाऊस वस्तीला आलेला!

तीन चांगली माणसं. त्यांची ही गोष्ट. एक तरुण फोटोग्राफर महेंदर, त्याची निष्ठावान, सालस, अतिशय गुणी आणि नवऱ्यावर जीवापाड प्रेम करणारी बायको सुधा आणि त्याची मनस्वी, निरागस प्रेमिका माया! या तिघातलं एक माणूस जरी वाईट असतं तरी त्याने इतर दोघांना चुटकीसरशी उडवून लावून गोष्ट सोपी केली असती. पण ‘इजाज़त’मधे तसं होत नाही! खरं तर महेंदरने लग्नाआधी सुधाला सगळं खरं-खरं सांगितलेलं असतं. स्वत:च्या आजोबाला सांगण्याची हिंमत त्याला नसते. तिनं लग्न मोडावं असं तो सुचवतो. त्याच्याच आजोबाच्या आश्रयाने वाढलेली सुधा त्याला सांगते, “जो सच है और जो सही है, वो आप किजीये!” तो म्हणतो, “मैं माया से प्यार करता था ये सच है, पर मैं उसे भुलानेकी कोशिश करुंगा ये सही है!” आणि लग्न होतं. महेंदर खरोखर मायाला विसरण्याचा प्रयत्न करत असतो. कारण तसंही मायाला लग्न करायचं नसतं. पण तिचं महेंदरवर अतिशय प्रेम असतं.

ती वेगळ्या जगातलीच मुलगी आहे. Vulnerable वाटावी एवढी मनस्वी.. कवितेत जगणारी.. ती सतत या दोघांच्यात येत राहते.. मुद्दामहून नाही.. फार सहज.. आपण मायाला दूर लोटतोय याचं दु:ख महेंदरला खात असतं. “हम दोनों एकदुसरे को छोडकर जीनेकी कोशिश कर रहे हैं, मेरे साथ तो तुम हो, वो अकेली है” हे तो बोलूनही दाखवतो. सुधा संपूर्ण समर्पण आणि पराकोटीचं प्रेम असूनही पारंपरिक बायको आहे. समजूतदार आहे. ती महेंदरला आलेली मायाची पत्रं, तिच्या कविता देखील सांभाळून ठेवते. आपल्या दागिन्यांच्या डब्यात! “इसमें पहले मेरे गहने थे, अब आपके रखे हैं” असं म्हणणाऱ्या सुधेचा मोह महेंदरलाही आहेच. त्याला वाटतं तिने मायाला समजून घ्यावं. पण सुधा म्हणते, “तुला जे करायचं ते तू बाहेर करतोसच आहेस, मला ती मुलगी घरात नकोय!” आणि ती मुलगी वाऱ्यावर भरकटत फिरणाऱ्या शेवरीच्या पिसासारखी या दोघांच्या मधे भरकटत राहते. कधी तिच्या कवितेतून, कधी घरात राहिलेल्या तिच्या वस्तूतून, कधी त्याच्या कोटावर अडकलेल्या तिच्या कानातल्यातून आणि कधी त्याच्या पर्समधे असलेल्या तिच्या फोटोतून..

बायको नेटका संसार करतेय, चांगली आहे.. तिला काय बोलायचं?? आणि प्रेयसी मुद्दाम काहीच करत नाहीये, बेपर्वा आहे, बालिश आहे पण चांगली आहेच.. तिला ‘का’ बोलायचं?? या जद्दोजहदमधे सापडलेला ‘तो!’ ‘पुरुष भावनिक नसतो’ या समजाला पूर्णपणे छेद देणारा महेंदर. तिच्याबद्दल हिला सांगितलं तर हिला वाईट वाटेल आणि हिच्याबद्दल तिला सांगितलं तर तिला वाईट वाटेल म्हणून अनेक गोष्टी लपवून ठेवणारा.. नेमका बायकोसमोर नेहमी उघडा पडणारा आणि तिच्या नजरेत कोसळत जाणारा नवरा! आणि एक दिवस महेंदर घरी येतो तेव्हा सुधा दोन ओळींची चिठी ठेऊन निघून गेलेली असते. “मी उगाचच तुम्हा दोघांच्या मधे आलेय, म्हणून जाते!” रिकामं झालेलं देवघर.. साड्या नसलेलं कपाट महेंदरला बघवत नाही आणि त्याला हार्ट अटॅक येतो. माया त्याच्या घरी येऊन राहते, त्याची सेवा करते. पण सुधा येईल तेव्हा हिला कशी घालवायची आणि मुख्य म्हणजे ‘का घालवायची’ हे त्याला कळत नसतं. एकामागून एक घटना घडत असतात. मायाची कुठेतरी सोय लावायची असं ठरवून हा सुधाला आणायला निघतो आणि त्याचवेळी सुधा त्याला कायमची सोडचिठ्ठी देऊन अज्ञात गावी नोकरीसाठी निघून गेल्याचं पत्र त्याच्या हातात पडतं. मायाला गिल्ट येतो. ती तिच्या मनस्वी स्वभावाप्रमाणे मोटारबाईक भन्नाट हाकत निघते, अपघात होतो आणि तिचा जीव जातो. तिकडे सुधा दुसरं लग्न करते. एकमेकांना एकमेकांच्या बाबतीत काहीच माहित नसतं.. सगळा गैरसमजांचा गोंधळ आणि त्यात बळी गेलेली ही तीन सच्ची माणसं! ती सच्ची नसती तर, ‘इजाज़त’ मन कुरतडत राहिला नसता.

या सिच्युएशनमधे सुधा आणि महेंदर रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूममधे भेटतात. त्याच्या बॅगेची किल्ली हरवलेली असते. तिच्या किल्लीने ती उघडते आणि…. तिथून सगळ्या आठवणींचा छुपा खजिना बाहेर पडतो. त्या दोघांना विद्ध करणारा.. आपल्याला व्याकूळ करणारा.. अनेक प्रश्न निर्माण करणारा.. एकेका प्रश्नाला पुन्हा कुलुपबंद करणारा! कसे-कसे गैरसमज होत गेले, त्या-त्या वेळी नेमकं काय झालं होतं.. महेंदर डोलारा सावरण्याच्या प्रयत्नात कसा खोल रुतत गेला.. आणि ते काहीच माहित नसल्यामुळे सुधा घर सोडून निघून गेली.. तिला त्या एका रात्रीत सगळ्या गोष्टी कळतात.. आपण निघून आलो त्याच दिवशी त्याला हार्ट अटॅक येऊन गेल्याचं कळतं, त्याच्या रुमालावर सापडलेल्या कविता कुठल्या अवस्थेत मायाने लिहिल्या होत्या ते कळतं. कोटावर अडकलेल्या कानातल्याची स्टोरी कळते.. या एका रात्रीच्या सोबतीत महेंदरला कुठेतरी वाटत राहतं की ही अजून आपल्यावर प्रेम करतेय.. आपल्यालाही ते दिसत असतंच.. दोघंजण एका रात्रीत एक आयुष्य जगत असतात.. ती त्याची काळजी घेत असते.. तो तिच्याशी मोकळा झालेला असतो.. तिच्या पर्समधे आजही माचीस असते.

“आपकी भूलने की आदत नहीं गई, मेरी रखने की नहीं गई..!”

“आदतें चली जाती हैं, अधिकार नहीं जाते..!”

आणि आपण घुसमटत राहतो..!!

‘चष्मा कधी लागला’ ‘मधुमेह कधी झाला’ अशा प्रश्नांनी सुरु झालेला प्रवास, तिच्या दुखऱ्या गुडघ्याला औषध लावण्यापर्यंत येऊन ठेपतो. एका नाजूक क्षणी तो तिला विचारतो, तू एकटी आहेस का अजून? …. आणि त्याच क्षणी दार उघडून एक झंझावात आत येतो.. तिचा नवरा.. देखणा, रुबाबदार, हसतमुख.. ना जाने क्यूं दिल भर गया, ना जाने क्यूं आंख भर गई..!!

‘इजाज़त’मधली सगळी गाणी अशीच धक्का देतात. येतांना तरी.. किंवा संपल्यावर तरी..! ‘क़तरा क़तरा मिलती है, क़तरा क़तरा जीने दो’ हे खरं तर मधुचंद्राचं गाणं. पण गाणं संपतं.. त्याच खुमारीत दोघं परत येण्यासाठी विमानात बसतात आणि रात्री बारा वाजता एअरहोस्टेस त्याला वाढदिवसाचा केक देते. तो विसरलेला असतो पण मायाला आठवत असतो त्याचा वाढदिवस. तिने त्याला विमानात केक मिळण्याची सोय केलेली असते. सुधा वरवर हसत आत खोल दुखावली जाते. विमान उतरल्यावर त्याला कळतं मायाने झोपेच्या गोळ्या घेतल्या आहेत. तो बायकोला काही न सांगता धावतपळत हॉस्पिटलमधे पोचतो. “मला मरून वर हवेत तुझ्या विमानात येऊन तुला बर्थडे विश करायचं होतं,” असं कारण सांगते माया! तो परेशान, आपण सर्द! मग काही दिवस त्याचं तिच्याकडे येणं-जाणं सुरु राहतं. बायकोला अंदाज येत असतात. ती वाट पाहत राहते. तिकडे तो मायाचे केस विंचरतोय, तिला जेवण भरवतोय, तिचे लाड करतोय आणि इकडे सुधा गातेय, खाली हाथ शाम आई है, खाली हाथ जायेगी..! आपण पुन्हा ना जाने क्यूं दिल भर गया, ना जाने क्यूं आंख भर गई.. अवस्थेत! काय होतंय ते आपल्याला कळतच नाही, किंवा… काय होतंय ते आपल्याला नेमकं कळत असतं आणि आपण बेतहाशा रडायला लागतो. मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है’ हे गाणं तर ‘इजाज़त’चा कळस आहे.. क़हर आहे.. Magic Moment आहे..

मायाचं सामान उगाचच आपल्या घरात पडून आहे म्हणून सुधा ते पाठवून देते. त्याचं उत्तर म्हणून माया टेलिग्राम पाठवते. त्यात ही कविता आहे.. ती महेंदर वाचतो.. सुधा त्यातल्या अलवार, मोरपंखी दु:खाने व्यथित होते.. सभोवताल बेचैनीने जड होतो.. आणि आपल्याला तिच्या घरात हेच गाणं गाणारी माया दिसते.. एका साध्या, निरागस मनस्विनी प्रेमिकेचं दु:ख.. नाही, दु:ख नाहीये ते.. सहज स्वरात केलेला विलाप आहे.. एक सौ सोलह चांद की रातें.. जवळजवळ दहा वर्षांचा अंतरंग संबंध.. काय-काय नाही घडलं त्यात?? माझे मफलर आणि कपडे कसले परत पाठवतोस?? ते क्षण पण माझे मला दे ना..

 

 मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है

इक अकेली छतरी में जब आधे-आधे भीग रहे थे

आधे सूखे, आधे गीले, सुखा तो मैं ले आयी थी

गीला मन शायद बिस्तर के पास पड़ा हो

वो भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो

एक सौ सोलह चांद की रातें, एक तुम्हारे कांधे का तिल

गीली मेंहदी की खुशबू, झुठमूठ के शिकवे कुछ

झूठमूठ के वादे भी सब याद करा दूँ

सब भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो

खूप मोठं आणि चटका लावणारं गाणं आहे. गाणं संपल्यावर सुधा हताश होऊन म्हणते, का पाठवून दिलं मी तिचं सामान?? तशीही ती आपल्यात राहतेच आहे, तिचं सामानही राहिलं असतं तर काय बिघडलं असतं!

‘इजाज़त’ फक्त एक सिनेमा नाहीये. तो खूप प्रश्न निर्माण करतो.

दोन चांगली माणसं लग्न करून एकत्र आली तर त्यांच्या चांगुलपणामुळे त्यांचं लग्न यशस्वी होऊ शकतं का?

नवऱ्यावर जीवापाड प्रेम करणारी बायको त्याच्या प्रेयसीची त्यांच्यातली आभासी लुडबुड सहन करू शकते का?

आपल्या प्रियकराने लग्न केलंय हे कळल्यावर देखील प्रेयसी त्याच्यावर तेवढेच प्रेम करत राहू शकते का?

एक पुरुष एकाच वेळी दोन स्त्रियांवर एकसारखे प्रेम करू शकतो का??

‘इजाज़त’च्या संदर्भात काही अर्थच नाहीये या प्रश्नांना! यातल्या सगळ्या वेदनेच्या गाठी या मायाच्या स्वभावातल्या, तिच्या वर्तनातल्या गाठी आहेत. आणि ती अतिशय निरागस आहे, तिचं महेंदरवर जान से ज्यादा प्रेम आहे हे आपल्याला पटवून देण्यात लेखक-दिग्दर्शक गुलज़ार यशस्वी झालाय. सगळ्यात आधी हे सुधालाच पटलेलं आहे, त्यामुळे आपल्याला ते पटवून घ्यावंच लागतं. मायाची भूमिका करणाऱ्या अनुराधा पटेलने कमालची माया रेखाटली आहे. ती कुठेच उथळ, छचोर वाटत नाही. मनस्वीच वाटते. तिला पोटाशी घ्यावंसं वाटतं. तिचा अपघात होतो तेव्हा, एक वादळ शमलं असं वाटतं.. तोच तो सुधाने परत पाठवलेला मफलर तिच्या गळ्यात आहे.. तोच चाकात अडकून तिचा जीव गेलाय.. तिचं हे मरण आपल्याला सहन होत नाही. आई व्हायचंय म्हणून बाळ विकत आणणारी, अमक्याकडे मोटारबाईक आहे मग मी करते त्याच्याशी लग्न, असं म्हणणारी आणि महेंदरची बायको आपल्यामुळे घर सोडून गेलीये याची खात्री झाल्यावर स्वत:ला संपवणारी माया, संपली तरी व्यतीत होत नाही. ठुसठुसत राहते मनात! कॅरेक्टराईजेशन असावं तर असं!

 

ती ‘अशी’ भळभळत्या जखमेसारखी आहे म्हणूनच ‘इजाज़त’मधल्या वेदनेच्या गाठी घट्ट होत राहतात, सुटतच नाहीत. पण मग सुधाचं काय?? तिची काय चूक आहे?? तिनं तर कधीच मायाच्या नावाने आकांडतांडव केलं नाही. धोब्याला कपडे देतांना नवऱ्याच्या कोटावर सापडलेलं मायाचं कानातलं शांतपणे नवऱ्याच्या हातावर ठेवणारी, त्याची पर्स उघडल्यावर त्यात मायाचा फोटो आहे हे पाहून मुकाट्याने पर्स बंद करून त्याच्याकडे पैसे मागणारी बाई ती..! की तिचा हाच शांतपणा असह्य झाला महेंदरला?? ती भांडती, कटकट करती तर…?? या दोन चांगल्या स्त्रियात सापडलेला महेंदर! त्या दोघींना तो कळत नव्हता.. पण त्याला दोघी कळल्या होत्या.. त्याचं दोघींवर प्रेम होतं.. त्याला सुधा आणि माया, दोघींना दु:ख द्यायचं नव्हतं.. पण एक त्याच्या जगातून निघून गेली, दुसरी जग सोडूनच निघून गेली!

आपल्यामुळे आपल्या बायकोने खूप सहन केलंय हे त्याला समजतं.. आपण याला समजून घेतलं नाही हे तिला जाणवतं.. आणि त्याच वेळी तिचा नवरा तिला घ्यायला येतो.. शशी कपूरने चार मिनिटांची ही भूमिका अजरामर केलीये. तो तिची बैग घेऊन पुढे जातो.. रेखाचं पाऊल निघत नसतं.. ती नसीरच्या पाया पडते..

-“मैं चलूँ? पिछली बार बिना पूछे चली गई. इस बार ‘इजाज़त’ दे दो..!”

-“जीती रहो, सुखी रहो, खुश रहो!” तो म्हणतो..

जिवंत तर ती राहीलच. पण खुश कशी राहील?? आशीष देतांना थरथरता, हळवा झालेला त्याचा आवाज तिची पाठ सोडेल?? त्याची विकल, दुखरी नजर आपल्यालाच विसरता येत नाही, सुधा कशी विसरेल?

आणि महेंदर कसा जगत राहील??

आदतें भी अजीब होती हैं..

सांस लेना भी एक आदत ही है..

जिये जाते हैं.. जिये जाते हैं..

आदतें भी अजीब होती हैं..

असं म्हणणारी माया तरी जिथं असेल तिथं शांत असेल का??

का ही नाती एवढी जीवघेणी कठीण असतात? का??

*******

हे सुद्धा नक्की वाचा-बंदिनी : बकुळफुलासारखी दरवळणारी-https://bit.ly/3vijxzH

(मिथिला सुभाष या नामवंत पटकथाकार व संवाद लेखिका आहेत)

[email protected]

Previous articleवारली चित्रकलेत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गंधाली घोंगडे
Next articleसमाज आणि व्यक्ती
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.