काळ्या गव्हाची चकित करणारी कहाणी

-युवराज पाटील

गहू म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर लाल तांबूस आकाराचे धान्य डोळ्यासमोर दिसते पण मी म्हटलं, अहो… गहू काळा पण असतो बरं… तर क्षणभर तुमचा विश्वास बसणार नाही. वाचा तर काळ्या गव्हाची गोष्ट प्रत्यक्ष शेतातून. खास तुमच्यासाठी …

जगभर आरोग्याच्या बाबतीत खूप मोठी क्रांती होताना दिसत आहे. कार्बयुक्त, प्रोटीनयुक्त आहारामुळे जगभर ओबीसीटी ( लठ्ठपणा ) ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे. यावर मात करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर संशोधन होतं आहे. तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही मी खात असलेला गहू मुळात मध्यपूर्वेतील लेबान्त क्षेत्रातील म्हणजे आजचे सिरीया, लेबनान, जॉर्डन, सायप्रस, फिलिस्तान या देशातील गवत होते. त्याच्यातल्या सत्वाने ते जगभर खाण्याचे धान्य म्हणून लोकप्रिय झाले.आज जगभर मक्याच्या पिकाखालोखाल गव्हाचे उत्पादन घेतले जाते. गव्हात कोणते प्रथिनं असतात ? माहिती व्हावे म्हणून सांगतो, कार्बज 72 टक्के,कॅलरीज 34 टक्के, बाकी घटकात पाणी, प्रोटीन, शुगर, फायबर आणि फॅट असते… त्यामुळे हे खूप पौष्टिक अन्न म्हणून जगभर वापरले जाते. गव्हातील कार्बजच्या अधिकच्या मात्रामुळे वजन वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर जगभर संशोधन सुरु झाले त्यात आपल्या देशातही संशोधन सुरु झाले.

काळ्या गव्हाच्या वाणाची निर्मिती

नॅशनल ऍग्री फूड बायॉटेक्नॉलॉजी इन्स्टिटयूट, मोहाली, पंजाब येथील प्रयोग शाळेत डॉ. मोनिका गर्ग यांनी काळ्या गव्हाच्या वाणावर संशोधन केले. या काळ्या गव्हात कोणते घटक आहेत, तर यात झिन्क, मॅग्नेशियम, लोह, याचे प्रमाण सामान्य गव्हापेक्षा अधिक आहे. तसेच ऍथोसायनिन या घटकाचे प्रमाण या गव्हामध्ये 100 ते 200 पीपीएम आहे. त्यामुळे शरीराची होणारी झिज लवकर भरून निघते. या गव्हात शर्करेचं प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे मधुमेहासारख्या आजरासाठी फायदाच होईल, तसेच काळ्या गव्हाला पाणी कमी लागते. यावर तांबोरा रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत नाही.  गव्हाच्या या वाणात फुटव्याची संख्या अधिक असल्यामुळे बियाणे कमी लागते. ही माहिती देत होते, महाबळेश्वर तालुका कृषी सहायक दीपक बोर्डे आणि मी माझ्या पोटावर हात ठेवून ऐकत होतो.  कारण हजारो लोकं पोट खूप वाढले यार… कमी कसं करु? याची सगळीकडे  चौकशी करतात .त्यांना काय माहिती त्यांच्या इन्टेकमध्येच गोंधळ आहे. अशा या बहु्गुणी गव्हावर अभ्यास केल्यानंतर दीपक बोर्डे यांनी काही शेतकऱ्यांना पटवून दोन क्विंटल बियाणे मोहालीरून मागविले.

 महाबळेश्वरच्या लाल मातीत काळ्या गहू चा प्रयोग

गणेश जांभळे, पंढरीनाथ लांगी (क्षेत्र महाबळेश्वर ), मनोहर भिलारे, विजयराव भिलारे ( माजी सभापती ), अवकाळी ता. महाबळेश्वर, जयवंत भिलारे, भिलार, ता. महाबळेश्वर आणि युवराज माने क्षेत्र माहुली ता. सातारा या लोकांनी या काळ्या गव्हाच्या वाणाची पेरणी केली. हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. जवळपास सर्वांनी सेंद्रिय पद्दतीने या गव्हाची वाढ केली आहे. कमी पाण्यात एक बियाण्याला सात ते दहा फुटवे येऊन आपल्या साध्या गव्हापेक्षा चांगला आला आहे. सर्व सामान्यपणे आपला लोकवन किंवा इतर गव्हू कंबरेपर्यंत येतात पण याची उंची कंबरेपेक्षा अधिक असून ओंबीचा आकार मोठा आहे.

काळ्या गव्हाच्या शेतात

मी शेतकऱ्याचा पोरगा असल्यामुळे असे प्रयोग ऐकल्यानंतर कधी एकदा जाऊन हा प्रयोग पाहू असे झाले होते. कारण आता शेतकरी विषमुक्त शेतीत अधिक प्रयोगशील होतो आहे.फक्त त्याला योग्य माहिती व्हायला हवी म्हणून मी महाबळेश्वर येथील काळ्या गव्हाच्या शेतात जायचं निश्चित करून गेलो. वाईचा पसरणी घाट ओलांडून पुढे पाचगणी, नंतर भिलार फाटा त्यापुढे आपण महाबळेश्वरला ज्या केट किंवा विल्सन पॉईंटला जातो  त्याच्या अलीकडच्या बाजूने दोन एक किलोमीटरवर अवकाळी गाव सह्याद्रीच्या कुशीत लपून बसावं तसं वसलेलं आहे. तिथं मनोहर भिलारे आणि विजयराव भिलारे यांचा स्ट्रॉबेरीचा पाहुणचार घेऊन त्यांच्या शेतात गेलो. त्यांनी दाखवले हाच तो काळा गहू.. उंच आणि मोठमोठ्या ओंब्या असल्याने मी तर म्हटलं याचं काड पांढरं, ओंब्या पण पांढऱ्या मग गहू कसा काय काळा. मनोहर भिलारे यांनी गव्हाची ओंबी चूरगाळून आतला गव्हू काढला तर तो चक्क काळा होता…म्हटलं वाण काळा गुण मात्र पांढऱ्याला लाजवणारा …!!

पर्यटकांना चाखवणार चव

महाबळेश्वरला दरवर्षी दहा ते बारा लाख पर्यटक देशाच्या काना-कोपऱ्यातून येतात. त्यांना असं त्यांच्याकडे नसलेलं आरोग्यदायी देण्यात आम्हालाही आनंद वाटेल, अशी माहिती विजयराव भिलारे यांनी दिली. त्यांचे स्वतः चे हॉटेल आणि रिसॉर्ट असल्यामुळे त्यांचा गहू थेट त्यांच्या या किचन मध्ये जाईल पण पुढच्या वर्षी त्यांना अधिक लावायचा मानस पण आहे. श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथील पंढरीनाथ लांगी म्हणाले. मी प्रत्येक वर्षी गहू पेरतो पण एवढा जोरात कधीच आला नव्हता आता मी ह्या गव्हाचे बियाणे म्हणून वापरेन. हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता.

एक अधिकाऱ्याची करामत

महाबळेश्वर तालुका कृषी सहायक दीपक बोर्डे हे कमालीचे प्रयोगशील अधिकारी आहेत हे तिथल्या शेतकऱ्यांना काही तरी नवीन करण्याचे प्रोत्साहन देत राहतात. जिल्हा कृषी अधिक्षक गुरुदत्त काळे, उपसंचालक विजयकुमार राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत गोरड,तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे यांच्या सहकार्याने नेहमी अग्रेसर असणारे बोर्डे यांच्या सारखे अधिकारी निर्माण व्हावेत. आळस झटकून शिवारं आणि शेतकऱ्यांचे खिस्से आणि जनतेचं आरोग्य श्रीमंत होईल यात शंका नाही.

(लेखक साताराचे जिल्हा माहिती अधिकारी आहेत)

8888164834

नक्की पाहा- समोरील Blue link वर क्लिक करा काळ्या गव्हाची….. पांढरी गोष्ट...https://bit.ly/3rm8wKx

Previous articleसमाज आणि व्यक्ती
Next articleओटीटी प्लॅटफॉर्म्स विरुद्ध सिनेमा : आगामी लढ्याची नांदी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here