‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०१६
माणिक मुंढे
जग केवढं झपाट्यानं बदलतंय? म्हणजे आजोबा नातीला सांगतोय की तुझ्या स्कर्टची लांबी किती आहे यावरून तू तुझं चारित्र्य कुणाला मोजू देऊ नको. नातंही अशी की नव्या नवेली, अमिताभ बच्चनची नात. तिचं नाव सर्च केलं की एका झटक्यात पंधरा सोळा वर्षातले बिकीनीवरचे, शाहरूखच्या पोरा बरोबर पार्टीत नाचतानाचे फोटो स्क्रिनवर येतात. बरं आता हे सर्च करायची तसदीही घ्यायची गरज नाही. कारण नव्यानं स्वत:च सगळे फोटो ट्विटरवर टाकलेत. तिथून मग ते तुमच्या आमच्या व्हॉटस अपवर कधी डाऊनलोड झाले, फन फॉर फन ग्रुपवर शेअर करता करता बायकोच्या अकाऊंटला गेले कधी कळलंच नाही. मग बायकोही म्हणणार, तुला ना सगळं सोळाव्या वर्षासारखं हवंय राजा, पण आता होत नाही रे. कारण तू तरी कुठं सलमान आहेस. तुझे आपले फोर अॅब्स पण पोटाचे? सांग, फन फॉर फनवर किती फन करणार?
माझ्या लहाणपणी लग्नासाठी मुलीचा फोटो आला की तो जशास तसा परत करावा लागायचा. एक तर फोटो धुवायला, काढायला त्यावेळेस पैसे बऱ्यापैकी लागायचे. बरं त्यातच पोरगी पसंद नसेल तर अनोळखी पोराच्या हातात आपल्या पोरीचा फोटो? छे धोका. आता बघा. मी लोकलमध्ये बसलेला असतो. माझ्या मोबाईलवर व्हॉटस् अप, फेसबुक सगळं ऑन आहे. त्यावर हजारो पोरींचे, पोरांचे(मुलींसाठी) फोटोज आहेत. वेगवेगळ्या पोजमधले. हवे हवेसे वाटणारे, कुणी तरी बिचवर जाऊन स्वीमिंग कॉश्चुममध्ये काढलेले..असे सगळे. मनात भावनांच्या लाटा धडका घेत रहातात. घरी गेलं की बायको एक तर त्या बिकिनीत दिसत असते नाही तर त्या बिचवर. पण जहाँपना, वास्तवासारखं झणझणीत काही नाही. मग काय फॅन्टसी. इच्छा, आकांक्षांची विचित्र मेळ घालणारी वास्तववादी फॅन्टसी.
बरं जे घरात मिळत नाही किंवा घरात मिळूनही ती जी भूक आहे ना ज्याच्याबद्दल माल्थसचा सिद्धांत बोलत रहातो. तिचं काय करायचं? जहाँपनाह, ती भूकच माणसाला जगभर फिरवते. फिरस्ती बनवणते. रूढपणे चांगलं चाललेलं आयुष्य रस्त्यावर आणते, रस्त्यावरच्याला राजवाड्यात नेते, राजवाड्यातल्याला सुस्त बनवते. ह्या प्रेरणांचं मुळ कुठंय? धग. शरीराच्या आतल्या अंधारात मांजरीसारखी दडी मारून बसलेली धग. ती कधीच सुरु असलेल्या जगाच्या नियमात मावत नाही, बसत नसते. पण काळाला पुरून उरते ती भूक. ती संपली की आपण संपतो, संपलोय असं वाटायला लागलं की ती जीवंत ठेवण्यासाठी धडपडतो, ती धडपड कामाला येतेय असं वाटलं की मग आणखी भूकेची भूक लागते. आणि मग त्या भूकेतून नवं जग जन्माला घालायची ऊर्मी ज्वालामुखीसारखी फुटत रहाते. स्वत:च्या आत जेवढी जगं आहेत त्यांचा अविष्कार पहाण्याचा ती भूक. गुलजार त्याच भूकेला तुम जिसे भटकना कहती हो ना मानसी, उसे मै और जानने की कोशिश कहता हूँ असं म्हणतो.
माणसाला काही जमो ना जमो त्याला भटकंती जमली पाहिजे. कशाचीही भटकंती? एरॉल फ्लीन जगभर बायकांच्या अनुभवाच्या शोधात फिरला. किती बायका अनुभवाव्या? काही हजार. बापरे. आता ह्या व्हॉटस अप फेसबुकच्या जमान्यात असता तर आकडा कितीवर गेला असता? लाखावर? आपण काही त्याच्याऐवढे देखणे नाहीत किंवा त्याच्यासारखं हॉलीवुड नायकाचं करीअरही नाही. पण आपआपल्या पातळीवर जसं जमेल तसं भटकणं सुरुच असतं की? कधी लपून, कधी उघडपणे, कधी दांभिक. गांधी चाळीशीत भटकंतीला निघाला त्यावेळेस त्याची कुठली भूक संपली असेल आणि कुठली लागली असेल?
ह्या जगात आता लपून काहीच रहात नाही. कसं राहील? आता आपण फोटो काढतो आणि डीपी ठेवतो. त्यावेळेस तो लाखो लोकांना उपलब्ध असतो. ही माझी सोशल लाईफ आणि ही माझी प्रायव्हेट म्हणणारे दुधखुळे. त्यामुळे मला काय हवंय काय नकोय हे आता बायकोपासून, मैत्रिणींपर्यंत एकमेकांना मोकळेपणानं सांगितलेलं बरं. कारण तुमच्यापेक्षाही आता तुमचं स्टेटस जास्त बोलतं. म्हणजे माझं व्हॉटअस अपचा डीपी होता गोव्यातल्या बीचवर पिऊन असा निवांत झोपी गेलेला. तोही उशाला बॅग वगैरे. स्टेटस अर्थातच अव्हेलेबल. एका मैत्रीणीचा पहिला मेसेज पडला. यूवर डीपी सुटस् टू यूवर स्टेटस. तिनं कॅच केलं माझं अव्हेलेबल असणं. महिन्याच्या आत आम्ही दोघेही त्याच बीचवर हातात हात, पेग घेऊन उभे.
हे सगळं कुठून घडलं? ती मला ओळखते फेसबुकमुळे, मला तिच्या फेसबुकवरच्या पोस्ट प्रचंड आवडतात. तिच्या एका पोस्टमध्ये तिनं नवऱ्याला सीसीटीव्ही असं म्हटलं आणि मला ते जाम आवडलं. बरं तिचं लिहिणं एवढी भारी की वाचणारा तिच्या शब्दांसोबत झोपतो असं वाटतं. तिला मिळवण्याची, आपली करण्याची भूक तिचे शब्द निर्माण करते. तिच्या फेसबुक पोस्टला प्री लाईक मिळतात. ती आहे दिसायला साधारणच पण तिचे शब्द हजारो जणींवर भारी पडतात. शब्दात पकडते त्यावेळेस केवढी सुंदर दिसते ती? मी सरळ फेसबुकवरूनच विचारून टाकतो. भेटुया. जरा मोकळेपणानं. असे किती तरी मेसेज तिच्या मेसेज बॉक्समध्ये असतील. पण ती त्यातून निवड करते तिला हवा तसा मोकळा स्पेस देणारा. कदाचित तो मीच आहे. मग आम्ही भेटतोत. पनवलेच्या स्टेशनवर ती दिल्लीहून गोव्याला जात असताना. दहा मिनिटांसाठी. प्लॅटफॉर्मवर एक दिर्घ किस. सीसीटीव्ही तपासायला हवा त्यादिवशीचा. नाही तर तो कुणी तरी पॉर्न साईटवर अपलोडही केला असेल. फेसबुकनं आम्हाला एकमेकांची निवड करण्याचं स्वातंत्र्य दिलं. तिनं डिप्रेशनच्या केवढ्या मोठ्या तळघरातून बाहेर काढलं? तर तिनं केवढ्या मोठ्या डिप्रेशनच्या अंधाऱ्या विहिरीत मरायला सोडून दिलं? पोहायचं म्हटलं तर कधी तरी तळ पहावाच लागेल ना?
फेसबुकवर आताही दर काही महिन्यांनी ती फोटोसह स्क्रिनवर येते. अॅड मी. पण ती ह्या जगातच नाही तर अॅड कसं करायचं? ह्या जगात एकदा चिकटलेलं काहीच अनलिंक करता येत नाही. ती बंगलोरला रहायची. माणसं, झाडं सगळ्यात तिला उंच उंच इमारतींचे नकाशे दिसायचे. ती आर्किटेक्ट होती. एका मैत्रिणीची ती मैत्रिण. तिच्या साडीतल्याच फोटोंना मी फेसबुकला लाईक करायला लागलो तर तिनं मैत्रिणीला कळवलं. ये देख तेरा हिरो मुझे साडी में बहोत लाईक करता है. शेअर कर ले? बापरे किती जमाना बदलून गेलाय? नंतर कधी तरी तिनं अख्खं काश्मीर बुलेटवरून पालथं घातलं. कसली भूक असेल तिची? नंतर बराच काळ असाच वांझोटा. मी फेसबुकवर नको. एके दिवशी कुर्ल्याच्या ती जीवघेण्या रात्रीच्या गर्दीत उभा. एक लोकल सोडली, दुसरी सोडली, तिसरी सोडली. कुत्र्यासारखी गर्दी. मी तसाच रंगपंचमीचा विदुषकी चेहरा घेऊन उभा. मला वाटलं बरेच दिवस झाले साडीचे काही फोटो दिसले नाहीत. मी त्या गर्दीत तिला फेसबुकवर शोधत गेलो आणि दिसले ते तिला RIP म्हणणारे मेसेज. एका क्षणात अख्खी गर्दी ऐकू येईनाशी झाली. नंतर कित्येक लोकल निघून गेल्या. मी मध्यरात्रीनंतरही त्याच फ्लॅटफॉर्मवर उभा. तिनं फेसबुकवर दिवस टाकून सुसाईड केली. तीही प्रेमात. तिची कुठली भूक संपली असेल? ती फेसबुकवर दिवस टाकत होती त्यावेळेस आपण काय करत होतोत?
स्वातंत्र्य पडझड घेऊन येतं. पहिला पाऊस येतो ना तो उन्हाळा संपवतो पण पुराचा धोकाही तर निर्माण करतो. स्वातंत्र्याचंही तसंच आहे. आपल्या आजुबाजुला, फेसबुकवर, व्हॉटस अपवर लोकं जे फोटो वगैरे टाकतात त्यातून ते कायम तुम्हाला खिजवत असतात. बघा मी कसला भारी जगतोय आणि तुम्ही? झालं तर मग?
नवऱ्याला बायकोला घेऊन कुठं फिरायचं नसतं. बायकोला नवऱ्यासोबत जायचं नसतं. अर्थातच हे सगळं कमाई करणाऱ्या बायका. मग करायचं काय? आहे ना ऑफिसमधला फेसबुक फ्रेंड. त्याच्यासोबत मग एखादा दिवस आऊटींग. दूर गेलं तर नवऱ्याला कळेल किंवा कळालं तरी तो सवाल विचारेन. शेवटी तो सीसीटीव्ही. पण मग त्या एका आऊटींगमध्येही जसं जमेल तसं आऊट होणं. घरी आलं की सगळं कसं ठिकठाक. नवरा हवाच आहे पण वेटलेस, कसलंच ओझं न होता पूर्णपणे अनुभवता येईल, मोकळा श्वास घेऊ देणारा मित्रंही हवाय. मग ताणतणाव. लोभ, प्रेम,मत्सर, द्वेष, मोह, माया, खून, सुसाईड असं सगळं.
मग पुन्हा गुलजार म्हणतो त्या भटकंतीची ओढ. मग दोघांचं घर धोक्यात येणं. लेकराचं काय करायचं? ईएमआयवर भांडणं. मग वेगळं होणं, मग पुन्हा नव्याशी जुळण्याचा प्रयत्न करणं. परत नवं जुनं होत जाणं. पुन्हा आपण बॅक टू झिरो असणं, परत शुन्यातून नव्याचा शोध घेत रहाणं.
नव्यात परत प्रयोग करावासा वाटणं. रॉजर बेकन सांगूनच गेलाय. प्रयोग करा, प्रयोग करा. मग आता भटकलोच आहोत तर भूक आणखी थोडी वाढवू, आणखी थोडं जास्त भटकू. मग थांबूच नये कशासाठी. मग कसलीच भीडभाड न ठेवणं. नैतिकता वगैरे गेली भाडमध्ये. मग दोन मैत्रिणी आणि मी. कोकणातल्या त्या धडाडणाऱ्या समुद्राच्या एका शांत झाडीतल्या एका घरात तिघांनी कधी सुला वाईन तर कधी टुबोर्गचे पेग रिचवणं. मग एकाचे दोघे होणं, दोघाचे तिघं. थ्री सम होता होता विषम होत जाणं. ते न कळणं, भान हरपणं, पुन्हा भानावर येणं. पुन्हा त्याच भान हरपण्याच्या शोधात शहरं पालथी घालणं. फेसबुकवर एकमेकांना पाहून घेणं.
एकमेकांना एकदाही न भेटता, पहाटे चार वाजता तिच्या दारात उभं रहाणं. तिच्या साथीनं दरवाजा उघडणं. ती झोपलीय त्या खोलीचा दरवाजा दाखवणं. ती अंधारात एकटीच वाट पहात पडलेली. लाईट नको टाकू, असाच ये जवळ, चादरीत. आणि एवढं बेसावधपणे कुणाच्या जवळ जाणं.
ती जी माणसं बसलीयत ना जहाँपनाह, ज्यांची नावं बिल गेटस्, स्टीव्ह जॉब्स अशी आहेत. त्यांनी जग मुक्त केलंय. मला हवं तसं जगण्याचं स्वातंत्र्य दिलंय. निवड करण्यासाठी अख्खं जग मुठीत बसवलंय. मी मात्र बिचारा. आम्ही मात्र भांडत बसलोयत तिनं माझ्यासोबतचा डीपी का ठेवला नाही म्हणून. आता घरात ह्यावरूनच भांडणं होतायत जहाँपनाह, पण आता स्वातंत्र्याचं हे धरण फुटलंय आणि त्याला बांध नाही घालता येणार. मग फक्त अनुभवा. त्याच्यासारखं आयुष्य नाही. पण घराचं काय? साहीर आता असता तर कदाचित त्यानं लिहिलं असतं, डीपी के मोहताज रिश्तों की दुनिया..
(लेखक आयबीएन – लोकमत या वृत्तवाहिनीत वृत्त संपादक आहेत )
९८३३९२६७०४
सौजन्य – मीडिया वॉच पब्लिकेशन