(साभार:’कर्तव्य साधना’ –आंतरधर्मीय विवाह केलेल्यांच्या मुलाखती :४)
……………………………………..
(मुलाखत व शब्दांकन – हिनाकौसर खान-पिंजार)
……………………….
अरुणा तिवारी – अन्वर राजन: सत्तरच्या दशकातील बदलत्या राजकीय-सामाजिक समीकरणांचे दोघंही साक्षीदार. त्याच काळात जोर धरत असलेल्या चळवळींकडे दोघंही आकृष्ट झाले. अकरावीत शिकत असताना छात्र युवा संघर्ष वाहिनीच्या अभ्यास मंडळात अरुणा यांची सामाजिक-वैचारिक समज पक्की होत गेली. आणि त्या हुंडा विरोधी चळवळ, मराठवाडा नामांतर आंदोलन, मुस्लिम महिला सिनेमा बंदी विरोधी आंदोलन आदींमध्ये सहभागी होत गेल्या, तर दुसरीकडं अन्वर युवक क्रांती दल, मुस्लीम सत्यशोधक मंडळ अशा सामाजिक संघटनांमध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून घडत गेले. दोघंही चळवळींशी संबंधित, सामाजिक कामाशी निगडित… त्यामुळं दोघांची भेट अशाच कुठल्या सामाइक कार्यक्रमात घडली असेल असा अंदाज जर आपण लावत असू तर तो सपशेल चूक आहे.
या दोघांनी आंतरधर्मीय विवाह केलेला असला तरी तो मळलेल्या वाटेनं जाणारा ‘प्रेमविवाह’ नाही. सर्वसाधारणपणे प्रेमविवाहात आधी मैत्री, मग प्रेमात पडून पुढं लग्नाचा निर्णय होतो. इथं मात्र तसं घडलं नाही. जातव्यवस्थेला आव्हान म्हणून, हुंडापद्धतीला विरोध म्हणून आणि तरीही वैचारिक मेळ साधल्यानंतर दोघांनी अत्यंत समजून-उमजून हा आंतरधर्मीय विवाह केला. अर्थातच पुरेसा वेळ घेऊन एकमेकांना आपण आवडल्याची खात्री झाल्यानंतरच हा निर्णय झाला. हा अरेंज मॅरेज पद्धतीचा आंतरधर्मीय विवाह असला तरीही इथंही तो रुळलेल्या पद्धतीनं झालेला नव्हता. या विवाहाची ‘अरेंजमेंट’ विवाहेच्छुक व्यक्तींनी केलेली होती. घरच्यांचा सहभाग शून्य. विरोध प्रखर. तरी त्यातून मार्ग काढत मागील 37 वर्षांपासून दोघंही जण भरभरून सहजीवन जगत आहेत.
………………………………………………………..
अरुणा तिवारी या मूळच्या जळगावच्या. आईवडील आणि दोघी बहिणी असं त्यांचं आटोपशीर कुटुंब होतं… मात्र अरुणा लहान असतानाच यांच्या वडलांचं निधन झालं होतं. घरातली मोठी मुलगी म्हणून त्यांच्यावर खूप लवकर कामाची जबाबदारी पडली. राहतं घर स्वतःचं होतं… शिवाय त्यांच्या वडलांची स्वतःची गिरणी होती, ती आई आणि त्या चालवायला लागल्या… त्यामुळं किमानपक्षी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नव्हती. त्यांच्या लहानपणी मारवाडी समाजात मुलींच्या शिक्षणाबाबत कुटुंबीय फारसे उत्सुक नसायचे. नातेवाईकांचा ही शिक्षणाला फारसा पाठिंबा नव्हता पण अभ्यासात हुशार असल्यानं घरात हट्ट करून त्या शिक्षण घेत राहिल्या. दरम्यान त्यांचा परिचय छात्र युवा संघर्ष वाहिनीशी आला. त्या तिथल्या अभ्यासमंडळात जाऊ लागल्या. तिथं मनाची सामाजिक-वैचारिक अंगानं मशागत झाली त्याची परिणती आंतरधर्मीय विवाहाचा निर्णय घेण्यात झाली
कॉलेजमध्ये बी. ए. च्या दुसर्या वर्गात शिकत असतानाच नॅशनल बँकेसाठी जागा निघाल्या. त्यावेळी दहावी व बारावीच्या गुणांवरच अर्ज भरायचा होता. त्यांनी अर्ज केला. परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात पास झाल्या. बी. ए. पूर्ण होण्याआधी त्यांच्या हातात नोकरी होती. मार्च 2021मध्ये त्या बँकेच्या नोकरीतून निवृत्त झाल्या.
अन्वर यांचं मोठं खटल्याचं घर होतं. आई-वडिल, सात भावंडं आणि आजी असा मोठा परिवार. त्यांचं कुटुंब हे व्यापारी समुदायाशी निगडित होतं… मात्र त्यांच्या वडलांनी – अब्दुल अजीज राजन यांना राजकारण-समाजकारणात रूची होती. त्यांचा प्रभाव अन्वर यांच्यावर होत राहिला.
अन्वर यांनी गुजराती माध्यमातून शालेय शिक्षण घेतले. वाडिया कॉलेजमध्ये शिकत असतनाच ते युवक क्रांती दलाचे सक्रिय कार्यकर्ते झाले. अणीबाणीच्या काळातल्या विविध आंदोलनांत सहभागी झाले. अणीबाणीविरोधात छेडलेल्या सत्याग्रहात सामील झाले… त्यामुळं त्यांना तुरुंगवासही सोसावा लागला. तुरुंगातूनच त्यांनी दुसर्या आणि तिसऱ्या वर्षाची परीक्षा दिली. शिक्षण संपल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून सामाजिक कार्यात वाहून घेतलं. आज वयाची साठी ओलांडूनही ते विविध सामाजिक संघटनांमध्ये सक्रिय आहेत.
27 मे 1984मध्ये दोघंही विवाहबद्ध झाले. त्यांच्या समजून-उमजून आणि ठरवून सुरू केलेल्या संसारवेलीवर त्यांची मुलगी जुईसुद्धा बहरत गेली. सदोतीस वर्षांच्या दीर्घ सोबतीचा अनुभव गाठीशी असणार्या अरुणा आणि अन्वर यांच्याशी केलेला हा संवाद…
प्रश्न – तुमचा आंतरधर्मीय विवाह हा जुळवून आणलेला विवाह आहे ही आजच्या काळातही नवल वाटावी अशी गोष्ट आहे. अशा तर्हेनं ठरवून प्रेमात ‘पडण्याचा’ आणि विवाहात अडकण्याचा निर्णय कसा घेतला?
अन्वर – आंतरधर्मीय लग्न करण्याचा ठरवून विचार झाला हे खरंय. घरी जेव्हा लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या तेव्हा त्यांच्यापुढं मी काही अटी ठेवल्या. त्यांना स्पष्ट सांगितलं की, मी काही धार्मिक वृत्तीचा नाही… त्यामुळं धर्माचरण करणं, नमाज पढ़णं हे काही मी करणार नाही. मुलीला जर नमाजपठण करायचं असेल, इतर धार्मिक गोष्टी करायच्या असतील तरी माझी त्याला काहीही हरकत नाही. तिचं ते स्वातंत्र्य राहील… मात्र मी निकाह करणार नाही. स्पेशल मॅरेज अॅक्टखाली लग्न करीन, हुंडा घेणार नाही वगैरे वगैरे. माझे हे विचार ऐकून घरातले हबकले. अशा अटी मान्य करणारं कुटुंब मिळणं अवघड… त्यामुळं त्यांच्या मनात असणारी जी काही तीनचार कुटुंबं होती तिथं त्यांनी विषय काढण्याचंच टाळलं.
खरंतर तोवर माझा सामाजिक-राजकीय चळवळींशी संबंध आलेला होताच. चळवळींच्या शिबिरांमध्ये त्या काळात हुंडा घेणार नाही देणार नाही अशी शपथ घेणं सुरू होतं. साधेपणानं लग्न व्हायला पाहिजेत. खर्चीक लग्न नको हा त्यामागचा विचार. देशात तेव्हा बरीच टंचाई होती. 1965 साली भारत-पाकिस्तानचं युद्ध झालं होतं. त्यातल्या विध्वंसामुळं देशाची आर्थिक कोंडी झालेली होती. अन्नटंचाईसुद्धा होती. सणसमारंभ साधेपणानं साजरे व्हावेत, मोठ्या जेवणावळी नसाव्यात असा तो काळ होता. समारंभांवर बंधनं टाकलेली होती. लग्नाबाबतचा हा विचार पटलेला होता. आता मुद्दा जातीसंदर्भातला होता. त्या काळी हुंड्यामुळे स्त्रीचे फार शोषण होत असे. शासनानं हुंडा प्रतिबंधक कायदा केला होता… मात्र हा कायदा फार कोणी मनावर घेत नव्हते. अर्थात कायद्यामुळं हुंड्याची मागणी काही प्रमाणात कमी झाली होती. किमान त्याची प्रतिष्ठा कमी झाली होती. वरपक्षाची अपेक्षा असायची पण ते मागायचे नाहीत. हुंडा प्रथेचं मूळ जातींमध्ये दडलेलं होतं. अजूनही आहे. मुलींचा विवाह जुळवताना वधूच्या घरच्यांवर दडपण असायचं मुख्य कारण जातीतच लग्न करण्याचा असणारा आग्रह. हा आग्रह मोडून काढायचा तर आंतरजातीय विवाह व्हायला हवेत. डॉ.बाबासाहेब आंबडेकरांनी जातिव्यवस्थेच्या अंतासाठी आंतरजातीय विवाह सुचवलेला होताच… शिवाय हुंड्यावरही हे औषध ठरू शकतं असा विचार मनात घोळत होता. आंतरजातीय व आंतरधर्मीय लग्न केल्यामुळे स्त्रियांविरुद्धच्या अशा सर्व बाजारू प्रथांना निष्प्रभ करता येईल अशी ती कल्पना होती.
…शिवाय घरचे जसे लग्नासाठी सुचवत होते तसंच माझ्याही मनात जोडीदार हवा अशी भावना घर करत होती… त्यामुळं त्या दिशेनं प्रयत्न सुरू होते.
अरुणा – होऽ म्हणजे आंतरधर्मीय लग्न करायचं असं मी कधीचं ठरवलं नव्हतं. आंतरजातीय करायचं एवढं मात्र निश्चित होतं. त्या काळात स्त्रीमुक्ती चळवळीचा रेटा चांगला होता त्यामुळं हुंडा द्यायचा नाही, स्त्रीआभूषणं घालायची नाहीत, मुलींना कमी लेखणार्या रूढी टाळायच्या, धार्मिक चिन्ह राखणार्या गोष्टींचा त्याग करायचा अशा गोष्टींचा प्रभाव मनावर होता. मी माझं शालेय शिक्षण संपवून एचएससीत आले. त्याच सुमारास छात्र युवा संघर्ष वाहिनीत जायला लागले. जयप्रकाश नारायण यांच्या सप्तक्रांतीच्या विचारांनी प्रभावित झाले होते. भारतीय समाजाचा एकंदरीत विकास व्हायचा असेल तर जातिभेद नष्ट व्हायला हवेत हे जाणवायला लागलं होतं. आम्ही यासंदर्भात कॉलेजेसमध्ये तरुणींची शिबिरं घ्यायचो, अभ्यासवर्ग घ्यायचो. त्यातूनच लग्नाबाबत आंतरजातीय करायचं हे ठरत गेलं होतं. आंतरधर्मीय ही अपघातानं म्हणजे अन्वरचं स्थळ वासंती दिघे या मैत्रिणीनं सुचवल्यामुळं झालं.
प्रश्न – तुम्ही दोघंही सामाजिक चळवळींच्या संपर्कात आल्यामुळं ठरवून लग्न करू शकलात असं दिसतंय. तुमच्या या सामाजिक जडणघडणींची मुळं तुम्हाला कुठं सापडतात?
अन्वर – सामाजिक जाणिवा आणि राजकीय समज निर्माण करण्यामध्ये माझ्या वडलांच्या व्यक्तिमत्त्वाचा माझ्यावर प्रभाव राहिला. वडलांची जडणघडण पेणमधल्या मराठी शाळेत झाली होती. त्यांची पिढी मुळातच स्वातंत्र्य चळवळीनं भारलेली अशी होती. राजकारण-समाजकारणाबाबत ते सजग होते. छोडो भारतच्या आंदोलनासाठी वडील पेणहून मुंबईला गेले होते. त्या काळी युवक काँग्रेसच्या स्थापनेच्या उपक्रमात वडील सहभागी होते. मग वडील पुण्यात आले. माझा जन्मही पुण्यातला. भवानी पेठेतल्या मुस्लीम मोहल्ल्यात आम्ही वाढलो. वडील खासगी दुकानात दीवाणजी म्हणून नोकरी करत होते. त्यांचं काँग्रेसमध्ये असणं, चळवळींशी स्वतःला जोडून घेणं, त्यांच्यावर समाजवादी विचारांचा प्रभाव असणं आणि दुसरीकडं सावकरांचं आकर्षण असं त्यांचं संमिश्र व्यक्तिमत्त्व होतं… मात्र त्या काळात घरांमध्ये, वाड्यांमध्ये राजकारण-समाजकारण हे काही घरातल्या चर्चेचे विषय नसायचे… पण आमच्या घरात मात्र ते होते. वडील या विषयांवर बोलायचे. माझ्या इतर भावंडांवर या गोष्टीचा परिणाम झाला नाही… मात्र मला आवड निर्माण झाली. वडीलही मग सभांना मला घेऊन जायचे. कर्मकांडांवर त्यांचा विश्वास नव्हता. तेही धार्मिक नव्हते. त्याबाबत आग्रहीपण नव्हते. त्यांचं तर सगळ्या धर्मांचं वाचन होतं. मात्र श्रद्धा नव्हती. देवत्व नाकारणं इथपर्यंत त्यांचा स्वभाव होता. हे सगळं माझ्यात झिरपत गेलं. घरची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या हलाखीची होती. एकटे कमवते वडील आणि खाणारी दहा माणसं. मुलांची शिक्षणं. थोडक्यात परिस्थिती आर्थिकदृष्ट्या वाईट होती मात्र वैचारिक दृष्ट्या चळवळींमध्ये सहभागी होण्यास पोषक होती. त्यातूनच माझा कल सामाजिक चळवळींकडे झुकला.
अरुणा – चळवळीकडे मी अपघातानंच वळले. माझं कुटुंब, गल्लीतलं विस्तारित कुटुंब आणि नातलग यांच्यात मी रममाण होते. अकरावीत मात्र वासंती दिघेशी ओळख झाली. ती राष्ट्रसेवा दलाचं कार्य करत असे. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, तळागाळातल्या लोकांना मदत करण्यासाठी ती कायम तत्पर असायची. तिच्या सोबत सेवादलाच्या शाखेत जायला लागले. छात्र युवा संघर्ष वाहिनीच्या अभ्यासवर्गाला जायला लागले. वाहिनीच्या शिबिरातही जात असे. तिथंच माझी पुरोगामी विचारांशी ओळख झाली. ते विचार पटत गेले. शेखर सोनाळकर सर आणि वाहिनीचे इतर कार्यकर्ते यांचे विचार ऐकून मीही बदलत गेले. तसंही आमच्या घरातलं वातावरण फार कर्मठ नव्हतंच.
प्रश्न – अरुणामॅम तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगा ना…
अरुणा – माझं बालपण जळगाव इथं गेलं. आमचं गाव आटोपशीर होत. घरात आई आणि बहीण अशा आम्ही तिघी जणीच होतो. आईच्या कडक शिस्तीत आम्ही दोघी बहिणी वाढत होतो. वडलांचं लहानपणीच निधन झाल्यानं घरातल्या सर्व जबाबदार्या माझ्यावर पडल्या. वडलांची गिरणी होती… त्यामुळं आम्ही स्वाभिमान राखून जगत होतो. कष्ट होते पण खाऊनपिऊन सुखी असं आमचं कुटुंब होतं.
आमच्या घरात मी पहिली पदवीधर मुलगी होते. त्या वेळी मुलींच्या शिक्षणाकडं फार गांभीर्यानं पाहिलं जात नसे. घरात आणि आम्ही राहत होतो त्या गल्लीतही शिक्षणाचं वातावरण नव्हतं… पण मला मात्र शिक्षणाची आवड होती. साधारणपणे त्या काळी मुलगी जोपर्यंत पास होतीये तोपर्यंत तिला शिकू दिलं जायचं. मी दरवर्षी पास होत गेले. मग त्या वेळच्या रिवाजाप्रमाणे मी सातवीत गेल्यावर नातेवाइकांनी माझ्या लग्नाचा विषय काढला. मी पुढे शिकण्याचा हट्ट धरला. हीच स्टोरी मी दहावी झाल्यावर रिपीट झाली. दरवेळेस हट्ट करून मी शिकत राहिले आणि पदवीधर झाले. पुढंही शिकायचं होतं पण हट्ट करण्याची जिद्द संपली होती. तेच तेच लढे किती वेळा द्यायचे?
प्रश्न – राईट! अन्वरसर तुम्ही पुण्यात, अरुणामॅम जळगावमध्ये या परिस्थितीत तुम्हाला एकमेकांविषयी कुणी आणि कसं सुचवलं?
अन्वर – माझ्या घरी लग्नाचा विषय निघाल्यानंतर मी अटी तर सांगितल्या होत्याच शिवाय आणखी एक गोष्ट होती. ती म्हणजे कामाची सोय. खरं पाहता घरची आर्थिक स्थिती पाहता मी पैसे कमवण्याची गरज आहे ही घरच्यांची अपेक्षा होती. तशा नोकर्याही केल्या छोट्यामोठ्या. थोरला भाऊ होता मात्र तो आयआयटीमध्ये शिक्षण घेत होता. त्याला दरमहा साडेतीनशे-चारशे रुपये पाठवावे लागत होते त्यामुळं त्याच्याआधी मी कमवणं गरजेचं होतं. दरम्यान नोकरी-कॉलेज आणि तुरुंगवास असा प्रवास झाला होता. तुरुंगातून बाहेर पडल्यावर नोकरी करण्याकडे ओढा नव्हता हे अधिक स्पष्ट झालं. राजकारण, चळवळी यांकडे मन अधिक झुकत होतं त्यामुळं वडलांमध्ये आणि माझ्यात अंतर पडलं होतं. संवाद होता पण मी नोकरीची अपेक्षा पूर्ण करत नव्हतो. पुढं मग लग्नाचा विषय निघाला. मुलगा कमवत नसेल किंवा त्यांच्या घरचं दुकान नसेल तर मग काही उपयोग नाही असा समज आमच्या नातेवाइकांमध्ये होता. आम्ही व्यापारी समुदायातले. सगळे नातेवाईक व्यापारातच होते. वडीलच तेवढे नोकरीत होते. व्यापारी व्हायचं तर टोकाची कोडगी भूमिका किंवा नीतिशून्य वृत्ती बाणवावी लागते. तसा वडलांचा स्वभाव नव्हता… त्यामुळं ते नोकरीच्या वाट्याला गेलेले. व्यापार्याचे प्रयोग केले पण फसले होते त्यामुळं आमचं काही दुकान नव्हतं… शिवाय पूर्ण वेळ नोकरीच्याबाबतीत माझा मेळ जमणारा नव्हता.
लग्नाबाबतचा माझा विचारही पक्का होता. मी ज्येष्ठ कार्यकर्ते इंदुमती केळकर आणि आचार्य केळकर यांच्याकडे माझ्या मनातली गोष्ट सांगितली. हे केळकर दाम्पत्य लोहियांच्या साहित्याची पुस्तकं प्रकाशित करत असे. इंदुमती यांनी तर सॅफ्रजेट आंदोलनावर फार महत्त्वाचं पुस्तक लिहिलं होतं. या दाम्पत्याशी माझा चांगला संबंध होता. त्यांना मी कल्पना दिली होती. त्यांनी ही गोष्ट त्यांची जळगावची मैत्रीण आणि प्रखर लोहियावादी कार्यकर्त्या डॉ.यशोदा चौधरी यांना सांगितलं. त्यांच्या माध्यमातून अरुणाची ओळख झाली.
अरुणा – आंतरजातीय विवाह करायचं ठरवलं तेव्हा समविचारी मंडळी म्हणजे वासंती, शेखर यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले होते. पुण्यातल्या इंदूताईंकडून यशोदाताईंना अन्वरविषयी माहिती झाली होती. यशोदाताईंनी वासंतीकडे अन्वरविषयी सांगितलं. आंतरजातीय विवाहासाठी मनाची तयारी होती. जातिअंत व्हावा वगैरे विचार मान्यच होते परंतु वासंतीनं जेव्हा अन्वरचं नाव सांगितलं तेव्हा मात्र मनात वीज चमकल्यासारखं झालं… पण जर आपण जात-धर्मभेद मानत नाही तर अन्वरला भेटायला काय हरकत आहे असा विचार करून मी अन्वरला भेटले. भेटीत आम्ही चर्चा केल्या. अन्वरकडून काही काळ आंतरदेशीय पत्रं येत राहिली. त्या पत्रात आम्ही लग्नानंतरच्या पुढच्या आव्हानांवर चर्चा केल्या. अन्वरचं व्यक्तिमत्त्व सौम्य आहे. वैचारिक स्पष्टता आणि सामाजिक प्रश्नांचं भान आणि बांधिलकी या त्याच्यातल्या गोष्टी मला अधिक आवडल्या होत्या. आमचे विचारही जुळत होते. त्यातूनच मग आम्ही लग्नाचा निर्णय घेतला.
प्रश्न – तुमचे कुणी मुस्लीम मित्रमैत्रीण होते का?
अरुणा – बारावीच्या वर्गात तबस्सुम फहीम ही एक बोहरा मुलगी होती आणि आमचं घर मुस्लीम मोहल्ल्याजवळ होतं… तिथली बरीच कुटुंबं निम्नमध्यमवर्गीय होती. अगदी पुढं रजिया पटेल जळगावला आली तेव्हा तिची राहण्याची व्यवस्था माझ्या घरी केली होती. तेव्हा माझा अगदी इतकासाच संबंध मुस्लीम समाजाशी होता.
प्रश्न – घरच्यांना कधी सांगितलं? त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या?
अन्वर – अरुणाचा होकार आल्यानंतर मी घरी कळवलं. हे लग्न ठरवलेलं आहे यावर वडलांचा अजिबात विश्वास नव्हता. त्यांना वाटत होतं की, आम्ही खोटं बोलतोय. पुढंही त्यांचा कधीच विश्वास बसला नाही. त्यांचं म्हणणं होतं की मी प्रेमविवाहाला जाणूनबुजून असं सांगत आहे. त्यांना आमचा प्रेमविवाह आहे असं वाटत होतं तर त्यात बिघडत काही नव्हतं. उलट आम्हाला आनंदच वाटत होता. वडील पुरोगामी विचारांचे होते तरीही ते वंशावळीबाबत खूप संवेदनशील होते. आम्ही काठ्यावाडी आहोत याचा त्यांना फार अभिमान होता. काठ्यावाडी ही एक प्रादेशिक आयडेंटिटी… जसे वैदर्भी, वर्हाडी तशी. त्याला धक्का बसला होता… त्यामुळं त्यांनी त्यांच्या परीनं परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण मी ठाम आहे म्हटल्यावर त्यांनी मग फार विरोध केला नाही. अशा तर्हेचं लग्न माझ्या आईलाही आवडणारं नव्हतं पण तिची बिचारीची काहीएक भूमिका नव्हती. वडलांनी होकार दिला मग झालं.
अरुणा – घरच्यांना हे जगावेगळं आणि एकाच मातीत पण दोन ध्रुवांचं अंतर असणार्या समाजातलं लग्न कसं आवडणार? त्यामुळे विरोध होताच. माझ्या घरच्यांच्या बाजूनं जरा जास्त होता. ते सारं आठवायलाही नको वाटतं. माझ्या आईचा एकच प्रश्न होता, ‘तुझ्यात काय कमी आहे म्हणून तू असं लग्न करत आहेस?’ तिच्यासाठी हे लग्न फारच मानहानिकारक होतं. एक वेळेस प्रेमविवाह असेल तरी ठीक पण हे असं ठरवून… पटणार नव्हतंच त्यांना. तरीही आमच्या पालकांनी आमचे विचार आणि आचार स्वातंत्र्य मान्य केले. त्यासाठी त्रासही सहन केला.
अन्वर – आणि मग 27 मे 1984ला आम्ही स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार लग्न केलं. जळगावमध्ये. माझे आईवडील, कुमार सप्तर्षी अशा अगदी मोजक्या लोकांना घेऊन आम्ही जळगावात गेलो. लग्न रजिस्टर पद्धतीनंच करायचं होतं पण काही कार्यकर्त्यानी सांगितलं की, हे वेगळ्या प्रकारचं लग्न आहे. साध्या पद्धतीनंच करू. मात्र याचा छोटेखानी समारंभ व्हायला हवा. नाहीतर कुणी म्हणायला नको की, मुस्लीम मुलानं हिंदू मुलीला पळवलं. पुण्यातही छोटा घरगुती समारंभ केला. एस.एम. जोशी, ना.ग. गोरे, भाई वैद्य, बाबा आढाव, कुमार सप्तर्षी, सय्यदभाई तसेच अमर हबीब, युक्रांदचे आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
प्रश्न – मग तुम्ही एकत्र कुटुंबात राहू लागलात?
अन्वर – सुरुवातीचा अगदी थोडा काळ. मी आधी सांगितलं तसं वडील सुधारणावादी होते तरीही काही प्रमाणात पितृसत्तेच्या प्रभावाखालीही होतेच. माझ्या आतेभावाची बायको तिच्या नवर्याला अरेतुरे करून बोलायची. माझी आत्या आणि माझे वडील दोघं भेटल्यानंतर हा विषय चघळत बसायचे. बायकोनं नवर्याला अरेतुरे करणं त्यांना पसंत नव्हतं. यावरून पुढं काय वाढलेलं असेल याची मला कल्पना होती त्यामुळं मी घरी कळवलं की, आम्ही वेगळे होणार. आमच्या काठ्यावाडी संस्कृतीत वेगळं होणं हा कुटुंबाशी द्रोह समजला जायचा. इतर छोट्यामोठ्या गुन्ह्यांना क्षमा होती पण या गुन्ह्याला क्षमा नाही. यावरून माझ्या आणि वडलांच्या संबंधांमध्ये भेग पडली. आम्ही वेगळं झाल्यानंतरही त्यांच्याशी आमचे संबंध नॉर्मल ठेवले, त्यांना बोलवत असू, आम्ही त्यांच्याकडे जात असू. वडलांना पुरणपोळी आवडायची. आईला ती करता येत नव्हती. अरुणा त्यांना आवडीनं पुरणपोळी करून द्यायची पण एकत्र राहणं टाळलं. त्यातून माझ्याविषयीची अप्रीती वाढली पण तो निर्णय योग्यच होता हेही खरं.
प्रश्न – अरुणामॅम, लग्नाआधी तुमच्या मुस्लीम समाजाविषयी काही धारणा होत्या का?
अरुणा – मुस्लीम समाजाविषयी सर्वसामान्यपणे ज्या धारणा असतात… म्हणजे की, मुस्लीम लोक अस्वच्छ असतात, ते हिंसक असतात… तशाच काहीशा माझ्याही होत्या. त्या धारणा अन्वरच्या घरात अगदीच चुकीच्या ठरला. त्यांच्या घरात खूप स्वच्छता पाळली जात असे. माझी धाकटी जाऊ तर या बाबतीत माझ्या आईप्रमाणेच स्वच्छताप्रिय आहे आणि हिंसक म्हणाल तर आमच्या घरात तर सोडाच पण ज्या मुस्लीम वाड्यात आमचं घर होतं तिथंही कुणी तसं आढळलं नाही. ती सगळीच सामान्य आणि धर्मपरायण अशी माणसं आहेत. एकमेकांशी संबंध आल्यानंतरच मनात विनाकारण तयार झालेल्या धारणा, समज गळून पडतात.
माझ्या सासर्यांनी लग्नाला आधी खूप विरोध केला तरी लग्नानंतर त्यांनी मला फार चांगलं वागवलं. मी लग्नानंतर नाव बदललं नव्हतं. काही जण म्हणायचेही तिचं नाव बदलू तेव्हा ते सहज म्हणायचे, का? अरुणा छान नाव आहे. मी आडनाव लावत नाही याची मात्र त्यांना खंत होती शिवाय मी शाकाहारी असल्यानं मला कधीही मांसाहारासाठी आग्रह झाला नाही. अन्वरच्या घरी काही रोज मांसाहार नसायचा. कधी कुणी पैपाहुणा आला किंवा सणावाराला मात्र हमखास असायचा पण माझ्यासाठी मात्र सुरुवातीपासून वेगळा स्वयंपाक व्हायचा. अजूनही माझ्यासाठी वेगळी भाजी केली जाते किंवा मागवली जाते. कधीतरी कुणी पाहुणा म्हणायचा की ‘भाभीऽ जरा चाखीने जोवो’ म्हणजे टेस्ट घेऊन तर पाहा. यावर माझे सासरे म्हणायचे ‘तिला या विषयावर अजिबात कुणी बोलायचं नाही.’ गमतीतही असं म्हटलेलं त्यांना चालायचं नाही. तसं पाहता, सासर-माहेर दोन्हीकडे घरांतलं वातावरण वेगळं होतं. संस्कृती वेगळी, भाषा वेगळी होती पण भारतीय संस्कृती म्हणून जे काही साम्य असतं ते अगदी सेम टू सेम होतं.
पुढं माझ्या बहिणीनं आंतरजातीय लग्न ठरवलं. तिचं लग्न वैदिक पद्धतीनं होणार होतं. कन्यादानासाठी मामा असणं आवश्यक. माझ्याप्रमाणे याही लग्नाला नातेवाइकांचा विरोध. त्या वेळेस माझ्या सासर्यांनी तिचं कन्यादान केलं.
प्रश्न – हा ठरवून झालेला आंतरधर्मीय विवाह त्यामुळं संसारात जुळवून घेताना काही अडचणी आल्या का?
अरुणा – खरंतर हे लग्न समाजाच्या दृष्टीनं ‘आंतरधर्मीय’ होतं पण तसे आम्ही समविचारी असल्यानं आम्हाला एकमेकांशी जमवून घ्यायला अडचण आली नाही आणि सासरच्यांनी आमचे वेगळे विचार मान्य केले होते. सासरे म्हणायचे, ‘ई बेऊ जणा एकजेवाच! ते दोघं एकसारखेच आहेत.’ सासरी गुजराती बोलतात.
प्रश्न – आणि आंतरधर्मीय विवाहामुळं समाजात कधी कुठल्या अप्रिय घटनांना तोंड द्यावं लागलं का?
अन्वर – नाही. केवळ एक गोष्ट होती. आम्ही पूर्वी पुण्यात बिबवेवाडी परिसरात राहत होतो. जुईला आम्हाला मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचं होतं. ‘अक्षरनंदन’ ही नेहमीच्या पुस्तकी पद्धतीला फाटा देणारी शाळा होती. मुलांच्या आवडीच्या गोष्टींना प्रोत्साहन देणारी शाळा होती शिवाय तिथं 90 टक्के शिक्षक आमच्या विचारांचे होते त्यामुळं आम्ही तिला त्या शाळेत घातलं होतं… पण ती शाळा गोखलेनगर परिसरात होती. अंतर जास्त असल्यामुळं आम्ही तिकडंच घर मिळवण्याचा प्रयत्न केला होता पण ते काही झालं नाही. याशिवाय अशी कुठली अडचण आली नाही.
एक प्रसंग मात्र घडला होता. अप्रिय नव्हे. बोलका प्रसंग. आम्ही राहत होतो त्या सोसायटीत आम्हाला सत्यनारायणाच्या पूजेला बोलावलं होतं. आम्ही दोघंही पूजेला गेलो, प्रसाद घेतला आणि निघालो तेव्हा तिथल्या लोकांनी अडवलं. म्हटले, ‘बसा जरा. बोलायचंय.’ थांबलो. त्यांनी थेट विचारलं, ‘तुमच्या दारावर अन्वर राजन आणि अरुणा तिवारी असं लिहिलंय तर तुमचा एकमेकांशी काय संबंध आहे?’ मग आम्ही अगदी विस्तारानं त्यांच्याशी बोललो. नाव का नाही बदललं, चळवळी म्हणजे काय, समता म्हणजे काय असं पंधरावीस मिनटं सांगत राहिलो. त्यावर त्यांची प्रतिक्रिया होती, ‘बरं झालं तुम्ही हे सांगितलं. आम्हाला हे काही माहीत नव्हतं.’ त्यांनीही विषय संपवला. त्यावरून बाहेर लोक काय विचार करत असतील हे आमच्या लक्षात आलं पण त्यानंतर त्या सोसायटीत तरी आम्हाला कुणी काही म्हटलं नाही. उलट सोसायटीच्या गणपतीउत्सवात मुलांच्या स्पर्धेचं पारितोषिक माझ्या हस्ते दिलं.
जोपर्यंत लोकांना कळत नाही. नुसतं कळणं नव्हे तर त्यामागची आपली भूमिका कळणंही महत्त्वाचं असतं… त्यामुळं कुणी विचारलं तर आहेत हिंदू-मुस्लीम तुम्हाला काय करायचंय? असंही म्हणता येऊ शकलं असतं पण आपल्याला खरंच जर काही प्रभाव टाकायचा असेल तर कुणी आपल्या लग्नाबाबत काही विचारलं तर त्यांना नीट समजावून सांगण्याची ही संधी आहे असंच मानायला हवं. आम्हीही सविस्तर आपली भूमिका काय आहे, अशी लग्नं का व्हावीत हे वेळ घेऊन आणि अत्यंत शांतपणे सांगायचो. तेवढं झाल्यानंतर लोक आनंदानं रिस्पेक्ट देतात आणि अॅक्सेप्ट करतात.
प्रश्न – जुईला वाढवण्याबाबत काही ठरवून घेतलं होतं का?
अरुणा – आम्हाला तिला कोणताही धर्म द्यायचा नव्हता इतकं पक्कं होतं. बाकी विशेष असं काही नाही. बाहेर समाजातून तिला गणेशोत्सव, दिवाळी या गोष्टी माहीत होत होत्या. माझ्या घरी अशा सणांना एकत्र येणं व्हायचं. माझ्या सासूबाई जिवंत असेपर्यंत त्यांच्या घरी ईदसाठी जमायचो आणि माझ्या नणंदेनं ख्रिश्चन मुलाशी लग्न केल्यानं तिच्याकडं ख्रिसमस व्हायचं. या तिन्ही धर्मांची तिला ओळख होत होतीच. नणंदा, दीर, जावा आम्ही एकत्र आलो की घरात छोटा भारताच गोळा झालाय अशी भावना दाटायची. त्यामुळं जुईनं तिला जे हवं ते तिनं घ्यावं असा आमचा होरा राहिला. जाणीवपूर्वक कुठल्याही धर्माची शिकवण आम्ही दिली नाही. तिरस्काराची भावनाही जागू दिली नाही. आम्ही दोघं तर नास्तिकच आहोत पण आनंदासाठी सणावारांना आम्ही सगळेच भेटतो. वेगवेगळ्या घरांतल्या या वेगळ्या संस्कृती ती एन्जॉय करत होती असं एकदा तिनं विचारवेध या यूट्युब चॅनेलवरच्या मुलाखतीत म्हटलंय. ते ऐकून आम्हाला आनंद झाला.
खरंतर अगदी लहान असतानाच आम्ही तिच्याशी या सर्व गोष्टींवर बोलत होतो. मुलांबाबत असं असतं की, पालकांचा व्यवहार पारदर्शक असला की मुलांमध्ये ते झिरपत जातं. पालक बोलतात एक वागतात वेगळं तेव्हा मात्र मुलांच्या मनात शंका निर्माण होतात. काही वेळा ते विचारण्याचीही मुभा नसते. जुईच्या बाबतीत तसं काहीच घडलं नाही. ती खूप लहान असल्यापासूनच अन्वरबरोबर शिबिरांना जात होती. रविवार सोडून सार्वजनिक सुट्टी आली तरी मला सुट्टी नसायची आणि पाळणाघरही बंद. तेव्हा तिला अन्वरबरोबर सभांना, व्याख्यानांना जावं लागायचं त्यामुळं लहानपणीचे तिचे खेळ कोणते? तर मागच्या लोकांनी बसून घ्या, पुढच्या लोकांनी थोडं अजून पुढं सरकून घ्या. मुलींना गोळा करून ती हे असे खेळ खेळायची. ती एकटं अपत्य असल्यानं ती सोशल होईल ना, खाऊ वाटून घेईल ना, मिसळून वागेल ना अशी एक चिंता वाटायची पण ती पहिल्यापासूनच सोशल राहिली.
प्रश्न – आंतरधर्मीय विवाहितांच्या मुलांची लग्न ठरवाताना अडचणी येतात का?
अरुणा – आंतरधर्मीय विवाहितांच्या मुलांच्या लग्नाबाबत एक भीती असतेच. समाजाची सामान्यपणे अपेक्षा असते की, वडलांचा धर्म हाच मुलांचा धर्म असतो. आम्ही तर काहीच मानत नव्हतो. तरीही आम्हाला ही भीती नसली तरी काळजी होतीच. मी अन्वरचं नाव-धर्म स्वीकारला असता तरीही अडचण आली नसती पण अर्थात आमचं थोडं वेगळं पडत होतं. चळवळीतले अनेक जण आपुलकीनं याविषयी विचारणा करत होते पण जुईने स्वत:च मुलाची-मिहीरची निवड केली. हेमलकसा इथं श्रमसंस्कार शिबिरात जुई-मिहीर एकमेकांना भेटले. दोघांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आणि नोकऱ्या लागल्यानंतर आम्ही त्यांच्या लग्नाचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे मिहीरच्या पालकांनी समंजसपणा दाखवल्याने आम्हाला फारशा अडचणी आल्या नाहीत. अर्थात आम्हीही जर खूप बंदिस्त समाजात राहत असलो असतो तर अधिक आव्हानं असली असती.
प्रश्न – नवर्यानं कमवतं असणं ही आपल्या पारंपरिक समाजाची अपेक्षा असते पण तुमच्या घरात आर्थिक भिस्त मॅम तुम्ही सांभाळली. याबाबतचा विचार काय राहिला?
अरुणा – अन्वरचा ओढा ठाऊक होता. 1993नंतर तो पूर्ण वेळ कार्यकर्ता झाला… शिवाय त्यानं नोकरीसाठी प्रयत्न केले नसले तरी अधूनमधून अल्पकाळासाठी असणारी कामं त्यानं केली आहेत शिवाय माझी नोकरी चांगली होती… म्हणूनच हे शक्य झालं. आमच्या घरकामाची वाटणी ही नकळत होत गेली होती. पूर्वी काही सगळ्या कामांना बाई नव्हती पण अन्वर घरकाम मनापासून करायचा. जुईच्या एका कॅसेटमध्ये तिची बडबड रेकॉर्ड झालीये. त्यात ती म्हणते, ‘बाबा भाजी करतोय. आई धुणं धुतीये.’ अन्वरची याबाबतची भूमिकाही आडमुठी नव्हती म्हणूनच हे सर्व शक्य झालं.
प्रश्न – साधारण 1984मध्ये तुम्ही स्वतःच्या पसंतीच्या मुलाशी लग्नाचा निर्णय घेतला… आता तर शिक्षण, खुलेपणा वाढला आहे मात्र अजून म्हणावं तेवढ्या प्रमाणात आंतरधर्मीय विवाहांचं प्रमाण दिसत नाही. तुम्हाला आत्ताच्या मुली त्याबाबत किती स्वतंत्र वाटतात?
अरुणा – आता शिक्षणाचं प्रमाण वाढलंय हे खरंय आणि आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांची संख्याही तुलनेनं वाढत आहे पण दुर्दैवानं आपल्याकडं मुलीच काय मुलंसुद्धा विवाहाचा निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकत नाहीत. बव्हंशी भारतीय मुलंमुली तारुण्यसुलभ वयात प्रेमात पडतात पण लग्न करताना मात्र स्वधर्मीय आणि स्वजातीय मुलीशी लग्न करतात. लग्नाच्या वेळी त्यांना आठवतं की, आपण ठरवलेलं लग्न पालकांना पसंत पडणार नाही मात्र यात मुलींचं नुकसान होतं. या संदर्भात दोघांनाही पुरेसा खुलेपणा आणि प्रगल्भता येणं अजून बाकी आहे.
अन्वर – प्रमाण कमी आहे असं वाटत असलं तरी पूर्वीपेक्षा ते वाढतंच आहे. फक्त तसं भासवलं जातंय की, कमी आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे कथित संस्कृतिरक्षकांना स्वयंप्रेरणेनं निर्णय घेतलेलं आवडत नसतं… विशेष करून मुलींनी. मुलींचं स्वातंत्र्य कायम पुरुषी व्यवस्थेकडे असावं असं त्यांना वाटत असतं त्यामुळं केवळ हिंदुमुस्लीमच नाही तर कुठल्याही जातिधर्माची बंधनं तोडून लग्न करायचा निर्णय घेतला गेला की संस्कृतिरक्षक मंडळी एनकेन प्रकारेण त्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. भीतीचं वातावरण तयार करतात… त्यामुळं आपल्याला वाटतं की, कुणीही अशा विवाहांना धजावत नसेल पण प्रत्यक्षात तसं नाहीये. नैसर्गिक गतीनं त्यांचं प्रमाण वाढतच आहे.
प्रश्न – सूरज येंगडे या ‘कास्ट मॅटर्स’ पुस्तकाच्या तरुण लेखकानं एक मांडणी केली होती की, अरेंज मॅरेजमुळं जातव्यवस्था अधिक बळकट होते आणि या व्यवस्थेला प्रत्युत्तर म्हणूनच तुम्ही अरेंज मॅरेजच पण वेगळ्या पद्धतीनं केलं होतं. साधारण पस्तीस-सदोतीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट… मात्र अलीकडं स्वजातीचा अभिमान खूप वाढल्याचं दिसतं. स्वजातीय छत्र्यांखाली एकत्र येणारे तरुण दिसतात तेव्हा एक ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून तुम्ही याकडे कसं पाहता?
अन्वर – अलीकडचे तरुण जातीचा अभिमान बाळगातात असं मला वाटत नाही. काही तुटपुंजे प्रयत्न होतात तेव्हा जात अभिमान फुलारून येतो पण तो तेवढ्यापुरताच. दीर्घकालीन व्यवस्थेचा विचार करता हे अभिमान आणि स्वजातीचे झेंडे घेणं ही गोष्ट लांब पल्ल्याची वाटत नाही. उलट जातव्यवस्थेनं शेवटची घटका मोजायला प्रारंभ केलाय असं म्हणायला हरकत नाही. दिवा विझताना अधिक फडफडतो, अधिक प्रकाशमान होतो तशी ही फडफड आहे. शिक्षण, नोकरी यांमुळं मोठ्या प्रमाणात स्थलांतर वाढत आहे. एकमेकांमध्ये मिसळण्याचं प्रमाण वाढत आहे त्यामुळं ते टिकविण्यासाठी किंवा त्याच्या रक्षणासाठी कितीही प्रयत्न झाले तरी त्याचा फार उपयोग होणार नाही. जाती बळकट झाल्याचा आभास आहे. आतून मात्र ती व्यवस्था खिळखिळी व्हायला सुरुवात झालीच आहे त्यामुळं आपण आपल्यावाटचे प्रयत्न करत राहावेत.
प्रश्न – दोघांकडून खूप चांगले मुद्दे पुढे आले आता शेवटचा प्रश्न. तुमच्या दीर्घ सहजीवनाची भिस्त कशावर वाटते…?
अरुणा – काही नाही. बायकांची सवय असते गंऽ आदळाआपट करतात आणि निभावूनही नेतात. मीही तेच केलं असणार.
अन्वर – (हसत) आणि मीही.
अरुणा – आणि खरं सांगायचं तर आमच्या प्रदीर्घ यांच्यावरच आहे.
greenheena@gmail.com
……………………………………
जातीयता कमी करण्यासाठी घेतलेला महत्त्व पूर्ण निर्णय,आज ही गरज आहे.
अशा प्रबोधनाची खूप गरज होती.
खूप छान उपक्रम राबवताय मिडिया वाॅच….