हिंदू, जैन,बौद्ध संस्कृतींचा ऐतिहासिक वारसा जपणारे बदामी

-राकेश साळुंखे

‘बदामी’ हे नाव हृदयाच्या खूप जवळचे वाटते. बदामी रंगात न्हाऊन निघालेला परिसर तसेच लेण्या कोरलेले बदामी रंगाचे डोंगर यावरून या गावाला बदामी हे नाव पडले असावे. चालुक्यांची राजधानी ‘वातापी ‘म्हणजेच कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील हल्लीचे बदामी होय. वातापीवरूनच बदामी हा शब्द बनला असावा असेही म्हणता येते. पौराणिक संदर्भ असलेल्या व हिंदू, जैन,बौद्ध संस्कृतींचा संगम असणाऱ्या बदामीमध्ये चालुक्यकालीन म्हणजे इसवीसन सहाव्या ते बाराव्या शतकातील बरीच मंदिरे पहायला मिळतात.आज हे ठिकाण चालुक्यांच्या पुरातत्त्वीय स्मारकांसाठी प्रसिध्द आहे. इ. स. ५४० मध्ये चालुक्य साम्राज्याची स्थापना झाल्यानंतर सम्राट पुलकेशी पहिला याने बदामी येथे किल्ला बांधला व बदामीला राजधानी म्हणून घोषित केले.जवळपास सतराशे- अठराशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा जपणारे हे ठिकाण आहे. या परिसरात अश्मयुगातील आदिमानवाची वसतिस्थाने व अवजारेही सापडली आहेत.

बदामीची ट्रिप आपण फक्त बदामी,पट्टदक्कल, ऐहोळे किंवा त्याला जोडून विजापूर , अलमट्टी, कुडलसंगम, हंपी अशीही करू शकतो. काही लोक एक ते दीड दिवसात बदामी ट्रिप करतात. पण त्यामध्ये खूप घाई होते. जर तीन दिवस काढले तर आपण आरामात बदामी व आसपासचा परिसर पाहू शकतो. माझ्या पूर्वानुभवावरून या निष्कर्षाप्रत मी आलोय. बदामीला जायला एक मार्ग NH 4 ने निपाणी-चिकोडी- मोहोळ – लोकापूर – बदामी, दुसरा मार्ग NH4 नेच संकेश्वर – गोकाक – लोकापूर – बदामी व तिसरा मार्ग सोलापूर- विजापूर- अलमट्टी – बदामी असा आहे. सर्व मार्गांवरचे रस्ते चांगले आहेत, पण कर्नाटकात जागोजागी असलेल्या स्पीड ब्रेकरचा त्रास खूप होतो.

बदामीच्या प्रवासातील एक आठवण सांगावी वाटतेय . आताच्या काळात GPS, भाषांतराचे ऍप या सारख्या सुविधा असूनही आपण कधी कधी रस्ता चुकतो. ऐच्छिक ठिकाणी फिरून फिरून पोहोचतो किंवा भरकटतो . लोकल भाषेतील लिपीत जर बोर्ड लिहिले असतील तर आपण भाषांतर करून रस्ता किंवा अंतराची खात्री करू शकतो. पण जेव्हा १९-२० वर्षांपूर्वी मी दुसऱ्यांदा बदामीला गेलो होतो तेव्हाची ही घटना- मी वडील व ड्रायव्हर तिघेजणच होतो. संध्याकाळी बदामीतून निघालो व सौंदत्तीला आलो . तेथून बेळगावला मुक्कामाला जायचे असे ठरले. बहुतांश बोर्ड कन्नडमध्येच होते. मला तेव्हा एक सवय होती ती म्हणजे ज्या ठिकाणी इंग्लिशमध्ये व कन्नडमध्ये रस्त्याच्या अंतराचा बोर्ड असेल तेथे कन्नड शब्द लक्षात ठेवायचो . वाटेतील एका मोठ्या गावाचे नाव कन्नडमध्ये मी लक्षात ठेवले होते. रात्रीचे ८-९ वाजले होते , रस्त्यावर कोणतेही वाहन नव्हते. मुळात त्याकाळी त्या भागात वाहनेच कमी होती तर रात्रीची कुठे असणार? छोटी छोटी गावे लागत होती. ज्याठिकाणी रस्त्याला फाटा असेल तेथे तो बोर्डवरचा कन्नड शब्द पाहायचो व त्यावरील बाणाच्या दिशेने गाडी ड्रायव्हरला घ्यायला सांगायचो.

असे करता करता आम्ही बरंच पुढं आलो. आता पूर्ण माळरान लागले होते . गाडीतून वरचं टिपूर चांदणे दिसत होते. पण पुढचा सुनसान रस्ता माझे टेन्शन वाढवणारा होता. आणि ज्याची शक्यता वाटत होती तेच झाले. एक सारखे दोन रस्ते फुटलेले . ना बोर्ड ना मनुष्य ना जवळपास वस्ती . तिथे फक्त टिपूर चांदणे आणि माझ्या डोक्यात वेगवेगळ्या शक्यतांची चक्रे . १०-१५ मिनिटे अशीच निःशब्द गेली. तेवढ्यात एक बस आली . बस रिकामीच होती. त्यात फक्त ड्रायव्हर व कंडक्टरच होते. ड्रायव्हरने बस थांबवली . मी त्याला झाला प्रसंग सांगून रस्ता विचारला व पुढे बेळगावकडे जायचे आहे, हे सांगितले. त्याने आम्हाला बसमागोमाग या असे सांगितले व ज्या गावाजवळ बेळगावकडे जाणारा रस्ता लागला तेथे त्या ड्रायव्हरने बस थांबवली आणि आम्हाला रस्ता दाखवून तो म्हणाला, तुम्ही जेथे थांबला होता तो भाग रात्रीसाठी खूप धोकादायक होता. महाराष्ट्रातील गाडी दिसली व तुम्हाला अडचण आली असणार हे ओळखूनच मी गाडी थांबवली व तुमच्या गाडीसोबत बस घेतली. तेथे तुम्हाला तिथला धोका सांगून घाबरवायचे नव्हते, म्हणून तुम्हाला काही सांगितले नाही. अर्थातच तो ड्रायव्हर मराठी भाषिक होता. त्यानंतर तेथून पुढे NH4 ला लागून बेळगावमध्ये मुक्कामी पोहोचलो.

२००२ ला जेव्हा मी पहिल्यांदा या भागात गेलो होतो, तेव्हा गोकाकमार्गे गेलो होतो. ऑगस्ट महिना असल्याने गोकाकचा धबधबा भरून वाहत होता. त्यामुळे तो पाहून व त्यावरच्या झुलत्या पुलाचा अनुभव घेऊन पुढे गेलो. गोकाकपर्यंत रस्ता चांगला होता परंतु त्यापुढचा रस्ता मात्र गाडी, गाडीचालक व आमची परीक्षा घेणारा होता. आता मात्र रस्ते चांगले झाले आहेत. त्यावेळी बदामी येथे हॉटेल्स पण फारशी नव्हती. आम्ही एका नवीनच सुरू झालेल्या हॉटेलमध्ये थांबलो होतो. कर्नाटकातील मुक्कामी व मी स्वत योजलेली ही बहुदा पहिलीच ट्रिप असल्याने खाण्यासाठी बाहेर कोठे नि काय मिळेल हे माहित नसल्याने सोबत जेवणाचा डबा, खाण्याचे बरेचसे पदार्थ घेतले होते. पण त्या हॉटेलमध्ये सगळ्या सोयी होत्या. गंमत म्हणजे त्या हॉटेलमध्ये परराज्यातील आलेले पहिले पर्यटक आम्हीच होतो, त्यामुळे त्यांनाही आमच्याबद्दल खूप कुतूहल वाटत होते. माझ्या मुलाचे नाव पुलकेशी आहे. आमच्या बोलण्यात पुलकेशीचा उल्लेख आला की सगळे आमच्याकडे पहात रहायचे. शेवटी दुसऱ्या दिवशी त्यांच्यापैकी एकाने ज्याला हिंदी बोलायला जमत होते त्याने येऊन बदामी सम्राट पुलकेशीबद्दल सांगितले. मग मीही त्याला त्या राजाच्या पराक्रमाने प्रभावित होऊन माझ्या मुलाचे नाव पुलकेशी ठेवले आहे हे सांगताच आमच्याबद्दल त्यांना जास्तच आपुलकी वाटू लागली. त्यावेळी खूप धावाधाव करून तीन दिवसांत बदामी,पट्टडकल,ऐहोळे, हंपी अशी ट्रीप केली होती. त्यानंतर खूपदा बदामीला भेट दिली. पहिल्यांदा फार दूरवर वाटणारे बदामी आता मात्र साताऱ्यातून पाच ते सहा तासांच्या अंतरावर आलेय. रस्ता आणि वाहन सुविधा यामुळे फारच फरक पडलाय. तसेच GPS मुळेही वेळ वाचतो. पूर्वी रस्ता मॅप वरून शोधावा लागायचा किंवा स्थानिकांना विचारत विचारत जावे लागायचे. भाषेचा प्रॉब्लेम असायचा. त्यामुळे तेथील लोकांना इच्छा असूनही मदत करताना अडचण यायची. एक गंमत म्हणजे त्यावेळी आम्ही रस्ता विचारला की लोक ज्या दिशेने जायचे असेल तिकडे हात करून फक्त ‘स्ट्रेट’ असे कानडी लहेजात म्हणायचे. सगळीकडे हाच अनुभव यायचा. पूर्ण कर्नाटक ट्रिप मध्ये स्ट्रेट हा शब्द वारंवार कानावर पडायचा.

मला आठवते की लहान असताना जेव्हा मी इतिहास वाचनास सुरुवात केली, तेव्हा चालुक्य राजा पुलकेशी व त्याच्या बदामीने मला अक्षरशः झपाटून टाकले होते. त्यावेळीच बदामीला भेट देऊन इतिहास अनुभवायचा असं नक्की केले होते. खूपदा जाऊन आलो, अगदी अलीकडे म्हणजे कोरोना काळात लॉकडाऊन उठल्यावर पहिली ट्रिप केली ती बदामीचीच. बदामीचा इतिहास जेवढा रंजक आहे तेवढाच तिथला परिसर . बदामी रंगाच्या वालुकाश्म दगडांमध्ये कोरलेल्या गुंफा, फोर्ट, भूतनाथ मंदिर सगळंच अद्भुत आहे. मोठमोठे दगड खोदून त्यात कोरलेली लेणी तसेच त्यातील काही लेण्यांमध्ये भरलेले रंग ( काळाच्या ओघात बहुतांश रंग नाहीसे झालेत ) आपल्याला अजंठा-वेरूळची आठवण करून देतात.

या ठिकाणी चार गुंफा आहेत. पहिली गुंफा नटराज स्वरूपातील शंकराच्या शिल्पासाठी प्रसिद्ध आहे. अठरा हात असलेली ही मूर्ती वेगवेगळ्या ८१ मुद्रा दर्शविते. येथे हरिहराची अठरा फूट उंचीची मूर्ती आहे, तसेच शिव- पार्वती, विविध पशुपक्षी यांचीही शिल्पे पाहण्यास मिळतात. दुसरी गुंफा विष्णूला समर्पित आहे. यामध्ये काही पौराणिक कथा कोरल्या आहेत. कृष्णजन्म, कृष्णलीला, समुद्रमंथन,ब्रह्मा,विष्णू अशी शिल्पे कोरलेली आहेत.थोडक्यात देव-देवता व त्यांचे अवतार या संदर्भातील शिल्पे पाहण्यास मिळतात. तिसरी गुंफाही विष्णूला समर्पित केली असून ही सर्वात मोठी गुंफा आहे. यामध्ये हरिहर, नरसिंह, वराह इ.च्या विशाल मूर्त्या कोरलेल्या असून येथे ‘फ्रेस्को पेंटिंग’ पहायला मिळते. परंतु त्यातील रंग उडालेले आहेत. चौथी गुंफा जैन तीर्थंकरांना समर्पित आहे. येथे महावीर, डोक्यावर पाच फणा असणारे पार्श्वनाथ, जैन धर्मातील २१ तीर्थंकर यांची शिल्पे आहेत. याव्यतिरिक्त काही छोट्या गुंफा आहेत, त्यात बौद्ध गुंफेचा समावेश आहे. या ठिकाणी तिसऱ्या गुंफेनंतर चौथ्या गुंफेकडे जाताना एक दगडी चौकट आहे, त्याच्या उजव्या बाजूला किल्ल्यावर जाणारी वाट आहे. परंतु ती खूप वर्षे झाली बंद आहे.

या गुंफांच्या खालील बाजूस अगस्त्य तलाव व भूतनाथ मंदिर आहे. वरून हा तलाव व मंदिर एखाद्या चित्रकाराने चित्र रेखाटावे तसे दिसते. इकडे जाण्यासाठी आपल्याला बदामी गावातून वाट आहे. मात्र हा रस्ता खूपच अरुंद असल्याने थोडी गैरसोय होऊ शकते. त्यासाठी छोट्या वाहनातून जावे. अगस्त्य तलावाचे नाव हे पुराणातील अगस्त्य मुनीवरून पडले असावे. त्यांनी वातापी नावाच्या असुराला ठार केले, अशी आख्यायिका सांगितली जाते. या तलावाच्या काठावरच भूतनाथ म्हणजे शंकराचे मंदिर आहे. दिवसभर या तलावावर कपडे धुणाऱ्यांची गर्दी असते , ही गर्दी मात्र त्या तलावाचे सौंदर्य हिरावून घेते. तेथेच आर्किऑलॉजी डिपार्टमेंटचे संग्रहालय आहे. तेथून वर किल्ल्यावर जाता येते. मोठ्या दोन दरवाज्यातून आत गेल्यावर सुरुवातीला दोन शिवमंदिरे आहेत. त्याच्या जवळ प्राचीन तोफा दिसतात. पुढे गेल्यावर एक मोठा बुरुज लागतो. तेथून पुढे वर गेल्यावर धान्याची कोठारे दिसतात. त्यांचा आकार विशाखापट्टणम जवळील थोट्टलकोंडा स्तुपांप्रमाणे आहे. या कोठारांपुढे अतिप्राचीन शिवमंदिर आहे. त्या परिसरातच पुढे जुन्या वाड्यांचे अवशेष, एक मंदिर व दर्गा आहे. वेळ व उत्सुकता असेल तर त्यापुढेही जाता येते. संध्याकाळी गेले असता हा परिसर खूपच रम्य दिसतो. संध्याकाळच्या सूर्यकिरणांनी हा परिसर उजळून जातो. त्यावेळी तो ग्रेगरी पेक यांच्या ‘मॅकनिज गोल्ड ‘ या चित्रपटातील सोन्याच्या खाणीप्रमाणे दिसतो. या वाटेवरच एक विठ्ठल मंदिर आहे. त्यात संत तुकाराम आणि शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा आहेत. इतक्या आत ही शक्ती -भक्ती संगमाची मनोभावे आठवण जपली जातेय, हे पाहून खूप आनंद झाला.

(लेखक ‘लोकायत’ प्रकाशनाचे संचालक आहेत)

84849 77899

चला बदामी लेण्यांचा फेरफटका मारून येऊया- क्लिक करा …

https://www.youtube.com/watch?v=oT4Lf807_P0

Previous articleअरुणा तिवारी-अन्वर राजन: सहजीवनाची भिस्त प्रेम, विश्‍वास आणि कमिटमेंटवर!
Next articleकडू दूध आणि सुरंगीचा कडवटपणा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.