…धूप की चादर बिछाये बैठ गये!

 -मिथिला सुभाष

…………………………….

And those who were seen dancing

were thought to be insane by those

who could not hear

THE MUSIC

– Nietzsche

     ‘एकटेपण’ हा शब्द तसा फार फसवा आहे. एकांतात असलेलं माणूस एकटं असतं आणि एकाकी असलेलं माणूस पण एकटं असतं. मात्र, एकांत आणि एकाकीपण या दोन वेगळ्या गोष्टी असतात. एकांत म्हणजे एकाकीपण नव्हे. आपल्यातल्या ‘एकम’चा अंत, युनिट म्हणून आपण जे जगात मिसळलेले असतो, त्याचा अंत म्हणजे एकांत. एकांत ‘आतून’ बाहेर येतो, एकाकीपण बाहेरून अंगावर कोसळते आणि मग आत शिरून मनात दडी मारून बसते. एकांताची निर्मिती ‘आत’ होते, म्हणून तो सुदीप्त असतो, एकाकीपण अंधारलेले असते.

     माझ्या मुलीचं लग्न झाल्यापासून म्हणजे 2003 पासून मी रीतसर एकटी आहे, एकांतात आहे. 1996 साली माझा घटस्फोट झाला. पण मुलगी होती आणि तिचं शिक्षण, नोकरी हे सगळं सुरु होतं. ती आणि मी पूर्णपणे एकमेकीत गुरफटलेल्या आहोत. त्यामुळे ती खूप-खूप तास घरात नसली तरी मला एकटेपण मिळालेलं नव्हतं. एकटेपण मिळालेलं नव्हतं हा शब्दप्रयोग थोडा विचित्र वाटला असेल ना? पण नाही, ते तसंच होतं. मी एकांतलोभी आहे, आणि म्हणूनच एकाकीपण हा शब्द माझ्या शब्दकोशातच नाहीये. मला वाटतं ही वृत्ती माणसात उपजत असते. माझ्या कुटुंबात ती होती/आहे. माझं हे म्हणणं मांडण्यासाठी काही शब्द खर्ची घालायला पाहिजेत.

     माझे वडील अतिशय विद्वान, ज्ञानी गृहस्थ होते. बोलायला बसले तर तासाचे तास मैफलीला गुंगवून ठेवायचे. पण तेही दिवसातले काही तास कुणाशीच बोलायचे नाहीत. घरात असायचे, आम्ही आमचं काम, गप्पा, अभ्यास करत असायचो, आणि त्यांना त्यातले काहीही रजिस्टर व्हायचे नाही. शून्यात बघत बसलेले असायचे. घर एका खोलीचं! पण वडील तेवढे काही तास वेगळ्या विश्वात असायचे. मी अडीच-तीन वर्षाची असल्यापासून घरात कुणीही बाहेरचं माणूस आलं तर भिंतीकडे तोंड करून बसायची. भूक लागली तर भिंतीचा चुना चाटायचा, झोप आली तर भिंतीवर कपाळ टेकून झोपायचं पण एकजात ‘इकडे’ तोंड करायचं नाही असा माझा खाक्या होता. एका खोलीच्या त्या घरात येणार्‍या पाहुण्याचा तो निषेध आहे असं तेव्हा सगळ्यांना वाटायचं. आज मला कळतंय की माझ्या ‘एकांतलोभा’चा तो एक भाग होता. आजही मला माझ्या आसपास ‘फॉरेन बॉडीज’ फार वेळ सहन होत नाहीत. माझ्या लहानपणाच्या आठवणीत, मी एकटीच खेळतेय, घरासमोरच असलेल्या कब्रस्तानातल्या एखाद्या झाडावर चढून नुसताच भोवताल, ती थडगी, त्यावर उगवलेली झाडं पाहत बसलेय, माझं घर आणि कब्रस्तान याच्या मध्ये असलेल्या मोठ्या मैदानात असलेल्या वॉलीबॉलचा खांब धरून एकटीच तासाचे तास, चक्कर येईपर्यंत, गोल-गोल फिरतेय, या आठवणी खूप आहेत. माझं बालपण काही दु:खाचं वगैरे नव्हतं. मध्यमवर्गात जेवढी मजा त्या काळात असायची, ती सगळी आम्हाला मिळालेली आहे. सुखी कुटुंब होतं. पण काहीतरी खिन्न वेगळेपण तेव्हाही होतंच.

माझा जन्म पन्नासच्या दशकातला. माझ्याहून सहा वर्षे मोठी माझी बहीण. आणि त्याआधी वर्षभर माझ्या आई-वडलांनी केलेला आंतरप्रांतीय विवाह. दोघांच्या दोन भाषा. त्यामुळे आम्हाला लहानपणापासून हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषा अस्खलित यायच्या. अगदी दोन्ही भाषातले साहित्य वाचण्याएवढ्या अस्खलित! पण ‘आमचं जवळचं’ असं कुणीच नव्हतं आम्हाला. आम्ही पाच एकमेकांचे, बास! तिची माणसं आम्हाला महाराष्ट्रीयन समजत नव्हती, त्यांची माणसं आम्हाला उत्तर भारतीय समजत नव्हते. त्यात वडलांचा स्वभाव बर्‍यापैकी जगावेगळा. त्यामुळे आम्ही ‘संन्याशाच्या मुलां’सारखे समाजाच्या समासात जगत होतो. कदाचित माझ्या एकांतलोभाचे मूळ या सामाजिक उपेक्षेत असेल. ‘सामाजिक उपेक्षा’ हा शब्द अगदी सहज लिखाणाच्या ओघात आला. आम्ही आमच्या कुटुंबात उपेक्षित मुलं वगैरे अजिबात नव्हतो. पण आम्हाला दोस्त मंडळी नव्हती. खेळायला, धतिंग करायला सगळे असायचे. पण कुणाच्या घरी काही धार्मिक, सामाजिक कार्यक्रम, मुंज, हळदीकुंकू असलं काही असलं तर त्यात आमचा सहभाग फक्त आईचा पदर धरून जाऊन येणे. तिलाही काही फार मानाची वागणूक मिळत नव्हती तेव्हा, हे आत्ता कळतंय. बिच्चारी माझी आई! आम्हीच पाचजण एकमेकांचे दोस्त होतो. आमचा तो जगावेगळा बाप आमचा दोस्त होता. तासाचे तास आमच्याशी गप्पा मारायचे ते. पण मुलांना जशी बाहेरची, मैत्रीची नाती असतात, तशी आम्हाला नव्हती. तेव्हा त्याचं काहीच वाटत नव्हतं. आमच्या आई-वडलांनी आम्हाला तसं वाटू दिलं नाही. आज वळून बघतांना दुष्यन्त कुमार यांच्या गज़लमधला एक शेर आठवतो, ‘‘कहीं पे धूप की चादर बिछाये बैठ गये, कहीं पे शाम सिरहाने लगाके बैठ गये…! ’’आणि मग संन्याशाच्या त्या तीन पोरांना पोटाशी घ्यावंसं वाटलं. असो.

     तर, मला वाटतं, या परिस्थितीत वाढल्यामुळे मला एकांताची आवड आहे. त्यामुळे नंतरच्या काळात आलेलं एकटेपण मला ‘एकाकीपण’ न वाटता, एकांत वाटला. वडलांच्या वेगळ्या ज्ञानलोभी स्वभावाने, त्यांच्या वाचनाने आणि त्यांच्या आमच्याशी भरपूर गप्पा मारण्याने आम्हाला आयुष्याकडे बघण्याची परिष्कृत दृष्टी दिली होती, त्यामुळे असेल कदाचित, पण मी एकटेपणाला कधीच नाकारले नाही.. आमची आई साधी संसारी बाई होती. पण तिची मूल्ये आजच्या जगण्यात खूप कामाची आहेत हे आत्ता जाणवते आहे.

     या एकांताचे काही लाभ असतात. ज्यांना एकटेपणा हा एकाकीपणा न वाटता, एकांत वाटतो, त्यांनाच हे लाभ मिळत असावेत असा माझा कयास आहे. मी स्वत: कायम मुंबई, इंदूरसारख्या शहरात राहिल्यामुळे माझे अनुभव शहरी आहेत. पण मला वाटतं ‘एकटेपणा’ – मग ते एकाकीपण असो नाहीतर एकांत – ही शहरी माणसाचीच मिळकत आहे. त्यावरून एक गंमत आठवली. मला कायमच एकांताचे आकर्षण आहे/होते. पण माझ्या सासरी इंदूरमध्ये घरातच तीस माणसं. मग येणारे-जाणारे. समारंभ.. बाळंतपण.. बारशी.. लग्न..डोहाळजेवणं..त्यात सणवार.. मी खोटी-खोटी ‘मिळूनमिसळून’ कंटाळून जायची. खोटं-खोटं हसून जबडा दुखायला लागायचा. पण वेळ मारून न्यावी लागते हे तोपर्यंत कळलेलं होतं. एकवीस वर्षे मारून नेली. आणि जेव्हा घटस्फोटाची वेळ आली तेव्हा इतर सगळ्या दु:खांच्या तळाशी कुठेतरी एक ऊबदार अस्तर होतं की आता मला एकटं राहता येईल! मुलगी आहे ती काय, शिक्षण-नोकरी-लग्न अशा टप्प्याने शारीरिकदृष्ट्या दूर राहणार.

     शहरी माणूस लौकिकदृष्ट्या मोठा असो की सामान्य, त्याला आयुष्याच्या कुठल्यातरी वळणावर एकटेपणाला अपरिहार्यपणे सामोरं जावं लागतं. कारण कुठलंही असो, एकटेपणाची फेज बहुतेकांच्या आयुष्यात येतेच. कधी जोडीदार आधी ‘निघून गेला’ म्हणून, कधी मुलांची लग्नं होऊन ती वेगळी झाली, परदेशी गेली म्हणून. पण शहरी माणसाच्या आयुष्यात हा एकटेपणाचा टप्पा बहुतेक येतेच. त्यापुढचे माणसाचे आयुष्य, तो या एकटेपणाला कसं पाहतो, कसं घेतो, यावर अवलंबून असतं. मी माझं एकटेपण कसं स्वीकार केलं हे माझ्या आत्तापर्यंतच्या सुरावरून वाचकांच्या लक्षात आलं असेल. आता तेच थोडं विस्ताराने सांगते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, या एकटेपणाचा शौक़ त्यालाच करता येतो जो आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभा असतो.

     एकांत ही मनाची Evolve अवस्था असते. अगदी नेमकं सांगायचं झालं तर ‘एकांत’ हे अध्यात्माने माणसाला दिलेलं वरदान आहे. नेहमीचं जगत असतांना आलेल्या तुटक अनुभवांचा ‘कोलाज’ एकांतात बनवता येतो. हा कोलाज पूर्ण झाला की ते तुटकपण टोचेनासे होते. त्याचे कोपरे घासले जातात. माणूस क्षमाशील होत जातो. आणि मग एक दिवस असा येतो जेव्हा गर्दीतही माणूस आतल्या एकांताचा अनुभव घेत असतो. तो गर्दीत आहे असे दिसते, पण तो असतो एकांतातच! ज्यांना एकटेपण हवेहवेसे वाटते, अशी माणसं स्वत:सोबतच स्वत:ला ‘पूर्ण’ समजतात. यांचा अपनेआपशी दोस्ताना असतो! या गुणामुळे त्यांच्यात आत्मविश्वास ठासून भरलेला असतो. त्यांचे विचार सकारात्मक असतात. याचं कारण लेखाच्या सुरुवातीला लिहिलंय. एकांत ‘सुदीप्त’ असतो. तो आतून बाहेर आलेला असतो. बाहेरून कुठूनतरी येऊन माणसावर कोसळलेला नसतो. या माणसांचा आत्मविश्वास यांना वरकरणी थोडं बेपर्वा, उद्धट रूप देतो. यांना कुणाच्या काही बोलण्याची, टीका करण्याची फार पर्वा नसते. स्वत:चे निर्णय स्वत:च घेण्याची आणि त्याच्या बर्‍यावाईट परिणामांची जबाबदारी घेण्याची सवय असते. परिपूर्ण असल्याचा हा आत्मविश्वासच आणि त्यामुळे भरभरून जगण्याची त्यांची असोशी त्यांना उग्रउद्धट रूप देत असतो.

एकांतलोभी माणूस भावनिकदृष्ट्या भक्कम असतो. त्याच्या आयुष्यात आलेले आणि त्याने उडवून लावलेले छोटेबडे तूफान त्यांच्या आसपासच्या लोकांना कळलेले देखील नसतात. जगण्याचे नियम-मूल्ये यांची यांनी बनवलेली असतात. आणि त्या नियमांचे ते अतिशय निग्रहाने पालन करतात. यांची नैतिक मूल्ये अतिशय खुली असतात. यात एक गोष्ट लक्षात घ्यायला’च’ पाहिजे. ‘स्वतंत्र व्यक्ती’ आणि ‘स्वच्छंद व्यक्ती’ यातली सीमारेषा अतिशय धूसर असते. एकांतलोभी व्यक्ती ‘स्वतंत्र’ असते, ‘स्वच्छंद’ नाही! अर्थात हे समजण्याचा वक़ूब आजूबाजूच्या सगळ्यांकडे नसतो आणि मग यांच्यामागे खुसपूस, कुचाळक्या वगैरे होतात. ही माणसं स्पष्टवक्ती आणि प्रामाणिक असतात. सामनेवाल्याला खुश करण्यासाठी हे लोक काहीही करू शकत नाहीत. त्यांच्या मनाला जे पटेल तेच करतात आणि त्यामुळे सामान्य माणसांकडून उर्मट समजले जातात. ते कुठल्याही संकटाला, सिच्युएशनला समर्थपणे भिडू शकतात.

     पण या सगळ्याचा अर्थ असा होतो का की या माणसांना भावना नसतात? नाही! सतत एकांतात राहिल्यामुळे आणि एकांत सकारात्मक नजरेने स्वीकारल्यामुळे या लोकांची बुद्धी परिष्कृत झालेली असते. त्यांचा त्यांच्या भावनांवर अंकुश असतो. एकांत म्हणजे निसर्ग! एकांतात राहणे म्हणजे निसर्गासोबत राहणे! त्यामुळे निसर्गात असलेल्या दया, क्षमा, शांती आणि टोकाचा कोपिष्टपणा, निर्दयपणे शिक्षा देण्याची वृत्ती, आणि या सगळ्याकडे सम्यकपणे पाहण्याची नजर यांच्याकडे असते. यालाच कंट्रोल म्हणतात. बुद्ध यालाच ‘भानावर असणे’ म्हणतात.

     आता थोडं एकाकीपणाकडे बघू. हा पण एकांतच. एकटेपणाच. पण यात नकारात्मकता असते. एकांताचा संबंध फार पूर्वीपासून ‘अध्यात्मा’शी जोडलेला आहे. पण आध्यात्मिक असणे सोपे नसते. एकांतात राहणारा प्रत्येकजण आध्यात्मिक नसतो. हे भान सकारात्मक एकांतात राहणार्‍याला असतं. त्याला समजत असतं की आपण एकांतलोभी आहोत, आध्यात्मिक नाही. (खरं तर हाच विचार त्यांना आध्यात्मिकतेकडे नेत असतो, पण सध्या ते असो.) एकाकी माणूस ‘दिल को बहलाने केलिये’ असं समजायला लागतो की आपण आध्यात्मिक आहोत. मग तो ‘गुरुछाप’ वागायला लागतो. सुविचार आणि आध्यात्मिक वचनांनी आपले आणि इतरांचे आयुष्य बरबटून घेतो. त्या निमित्ताने समर्थक जमवण्याचा, आपलं एकाकीपण संपवण्याचा प्रयत्न करायला लागतो. पण अध्यात्म एवढं नकारात्मक नसतं. अध्यात्म ही लाईफस्टाईल असते, अधनंमधनं येणारे झटके म्हणजे अध्यात्म नव्हे. स्पष्ट विचार, निर्भीड अभिव्यक्ती, सहवेदना आणि सत्य ही अध्यात्माची चार चाकं आहेत. या चार तत्वांचे पालन म्हणजे असिधारा व्रत – तलवारीच्या धारेवर चालणे असते. ही माणसं कधीच समर्थक गोळा करत नाहीत. भोवती ‘जी जी रे जी’ करणारी प्रभावळ घेऊन फिरत नाहीत. ही कामं एकाकी माणसाची. एकाकी माणूस घाबरलेला असतो, त्यामुळे दयनीय असतो. घाबरणे आणि दयनीय होणे याचा सरळ संबंध ‘मृत्यू’शी असतो. ही एकच घटना अशी आहे जी अटळ असते आणि तरी ते नेमकं काय आहे, कधी येणारे, कशी येणारे याबद्दल काहीच माहीत नसतं. प्रत्येक सुजाण माणूस कधी ना कधी मृत्यूचा विचार करतो. मग तो एकांतात असो नाहीतर कुटुंबकबिल्यात. एकटं राहणारं माणूस मृत्यूवर चिंतन करू शकतो, नव्हे, करतो.

     मृत्यूच्या विचाराला दोन दिशा असतात. एक लौकिक आणि एक अलौकिक. आपल्यानंतर आपल्या मुलाबाळांचे काय, कसं होईल? आपण मागे सोडलेल्या संपत्तीची वाटणी नीट होईल की नाही? किंवा काहीच सोडले नसले तर मुलांना अडचण येईल का? आपलं सगळं नीट करतील ना? त्याचा खर्च किती येईल? वगैरे..दुसरी दिशा म्हणजे मृत्यूबद्दलचे अज्ञात भय किंवा कुतूहल किंवा जिज्ञासा. हे स्वभावानुसार ठरतं. आणि भय असलं तरी कुतूहल असतंच, ते भयमिश्रित असतं. आपण मृत्यूबद्दल खूप कायकाय ऐकलेलं, वाचलेलं असतं. गर्भाशयातून जगात येण्याचा प्रवास जसा एका अंधार्‍या बोळातून होतो, तसाच प्रवास जीवनातून मृत्यूकडे जातांना होतो असं म्हणतात. जन्माला येणारा जीव चिमुकला असतो, म्हणून त्याच्यासाठी कमी लांबीचा मार्ग, मरणार्‍या माणसाला मात्र तशाच खूप मोठ्या मार्गातून जावे लागते असं म्हणतात. मी स्वत: त्या मार्गाचा विचार करते. तिथून जातांना काय-काय होईल, जन्माला येतांना त्या मार्गावर पुढे सरकतांना वेदना होतात, तशा मृत्यूमार्गावर पण होत असतील का? त्या वेदनांची तीव्रता माणसाच्या कर्मानुसार कमी-जास्त असत असेल का? त्या मार्गातून बाहेर पडल्यावर बाहेर प्रकाश असेल की अधिक काळोख? त्यानंतरचा मार्ग माझा मला कळेल की कुणीतरी वाटाड्या सोबत असेल? आणि पुढे काय? हा विचार मी करते. हा विचार करत असतांना भूतकाळातल्या अनेक गोष्टी मला अस्वस्थ करतात. अनाहूतपणे आणि समजून-उमजून केलेल्या चुका, जाणीवपूर्वक लोकांचे केलेले अपमान; आळस, नादानपणा आणि करियर बनवण्याच्या भरात मुलीकडे झालेलं थोडंसं दुर्लक्ष, हे सारे मला भोगावे लागेल का? या विचारांनी मी अस्वस्थ होते. पण माझी बैठक ‘एकांताची’ असल्यामुळे, तसंच मी टोकाची नियतीवादी असल्यामुळे विचारांच्या एका टप्प्यावर मी स्वत:चीच समजूत घालू शकते.

शिवाय, मूळ बैठक नियतीवादाची असल्यामुळे समजायला लागल्यापासून जाणीवपूर्वक वर्तन चांगलेच राहिलेले आहे. चुका केल्या, पण त्या चुका आहेत याची जाणीव ठेऊन केल्या, बुद्धीतली मस्ती जिरत नव्हती म्हणून केल्या, आपण चुका करतोय याची रोख जाणीव असतांना केल्या, त्याचं फळ भोगावं लागेल हे माहित असतांना केल्या. व्यावसायिक चुका, व्यक्तिगत चुका, नात्यात चुका, भविष्याचे निर्णय घेतांना चुका… अशा सगळ्या आघाड्यांवर चुका केल्या. त्यानंतर त्याची फळं भोगली. मनस्ताप झाला, त्रास झाला, पीछेहाट झाली. पुन्हा उसळी मारून उभं राहावं लागलं. माझ्यावरून मला एकूणच माणसाचा अंदाज आला. जाणीवपूर्वक चुका करण्यात एक प्रकारची झिंग असते, रग असते. जी माणसं अभावितपणे चुकतात त्यांच्याबद्दल काही बोलायचेच नाही, पण माझ्यासारखी, जिला हे माहित आहे की आपल्याला प्रत्येक चुकीची किंमत द्यावी लागणार, तिने चुका का बरं कराव्या? मी माझ्यापुरते त्याचेही उत्तर शोधून काढले आहे. डायेट करणारा माणूस कधीतरी कंटाळून एक दिवस सगळी पथ्यं सोडतो, मनाला येईल ते मन:पूत खातो. त्यामागे एक मानवी भावना असते. मरू दे, जो होगा देखा जायेगा ही ती भावना. याच भावनेमुळे मी चुका केल्या. मागे दबा धरून बसलेल्या नियतीचा कधीतरी राग येतो. हिंमत असेल तर समोर ये आणि उरावर वार कर, हे आव्हान देखील असतं त्यात. त्याच भरात केलेल्या सगळ्या चुका होत्या त्या. पण ही मस्ती, ही रग वयोमानानुसार जिरते, तशी माझी ही जिरली. त्यानंतर त्या चुकांचे फळ म्हणून जे मिळालं त्याचा प्रामाणिकपणे स्वीकार केला. पश्चात्ताप केला. ज्या सुधारण्यासारख्या होत्या त्या सुधारल्या. शिक्षा भोगली. ज्यांची शिक्षा मिळाली नाही त्यांची शिक्षा पुढच्या जन्मी भोगायला सादर प्रस्तुत आहे. आयुष्य प्रवाहित राहिले. माझ्या आयुष्यात, मनात एवढी उलथापालथ होतेय, होऊन गेलीये, याची खबर या कानाची त्या कानाला लागली नाही. अभावितपणे चुका करणार्‍यांच्या बाबतीत हे होत नाही. ते शेवटपर्यंत चुका करत राहतात. सुखी असतात ते!

     लेखाचा समारोप करतांना याची मला स्पष्ट जाणीव आहे की मी एकटेपणाची भलामण केली आहे. पण ती एकटेपणाची भलामण नसून ‘माझ्या एकटेपणा’ची भलामण आहे. पण याचा अर्थ अजिबातच असा नाही की प्रत्येकाने या एकटेपणातून जावं. ज्यांना माणसांत राहण्याची सवय, आवड आहे, त्यांच्या वाट्याला आलेलं एकटेपण काही दिवसातच ‘एकाकीपण’ बनून जातं. मग बोलायला कुणी नसल्यामुळे उदास वाटतं. आसपासच्या लोकांना, मित्रांना, नातेवाईकांना त्यांची-त्यांची कामं असतात. ते लोक तासाचे तास तुम्हाला फोनवर वेळ देऊ शकत नाहीत. मग ‘माझीच माणसं मला वेळ देत नाहीत,’ असा विचार बळावतो. त्यातून एकाकीपण तीव्र होत जातं. डिप्रेशन – औदासिन्याच्या लहरी यायला लागतात. त्यांची फ्रिक्वेन्सी – वारंवारता वाढते. त्या लहरी जास्त वेळ टिकायला लागतात. याला साध्या भाषेत ‘डिप्रेशनमधे जाणे’ म्हणतात. अशी अनेक माणसं आपण आपल्या आसपास पाहतो. ती चिडचिडी झालेली असतात. हळूहळू सगळं जग माझ्या वाईटावर आहे असं त्यांना वाटायला लागतं. भवतालची जी माणसं संवेदनशील, सुजाण नसतात, त्यांचे गैरसमज व्हायला लागतात. त्यामुळे डिप्रेशनमधे गेलेलं माणूस स्वत:ला अधिक आकसून घेतं. दुष्टचक्र फिरत राहतं. हे वाढलं तर यातून Schizophrenia होण्याचा धोका असतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीवर जर एकटं राहण्याची वेळ आली तर त्याच्या इतर नातेवाईकांनी, मित्रांनी त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. त्यांच्या संपर्कात राहायला पाहिजे. आपल्याला फार गोष्टी कळत नसतात. किंवा आपण त्याकडे लक्ष देत नाही. एखाद्या एकट्या व्यक्तीशी फोनवर बोलतांना जर असं म्हणालात की, तुमचा आवाज किती गोड/भारदस्त/एक्स्प्रेसिव्ह आहे! तर हे त्या एकट्या माणसाला दिवसभर खुश राहायला पुरतं. दुसरी एक अगदीच नगण्य गोष्ट. फोनवर किंवा प्रत्यक्ष बोलतांना समोरच्या व्यक्तीचं नाव आपल्या संवादात पेरावं. तू जेवलीस का मिथिला हे वाक्य तू जेवलीस का यापेक्षा जास्त आपलेपणाचं वाटतं. आणि एकाकी माणसाला त्याची गरज असते. आपलं नाव आपण स्वत: कधीच घेत नाही. ते दुसरं कुणीतरी घेतंय हे ऐकून आपल्या नेणीवेत सुखाची जाणीव होते. (संवादात नाव पेरण्याचे कौशल्य एरवीही मैत्री, नाती दृढ करण्याच्या कामी येतं.)

     मी मात्र फार मजेत ‘एकटी’ असते. गाते, नाचते, आरशात बघून अभिनय करते, एखादा Scene लिहित असतांना त्यातल्या प्रत्येक पात्राला संवादांचे टोनिंग देते.. वगैरे..! निर्विवाद ही सारी एकटेपणाची लक्षणे आहेत. पण जोपर्यंत त्यात आनंद आहे, तोपर्यंत तो ‘एकांतलोभ’ आहे. फोनची किंवा घरची डोअरबेल वाजल्यावर जर तुम्ही डिस्टर्ब होत असाल, कुणी दारात बोलायला आल्यावर तुमचे कान त्याच्या बोलण्याकडे कमी आणि घरात वाजणार्‍या गाण्यांकडे जास्त असेल तर तुमचं एकटेपण हे ‘एकाकीपण’ नक्की नाही. त्यासाठी एका गोष्टीची मात्र पक्की खात्री असली पाहिजे. आपला प्रवास हा आपण निवडलेला नाही. एखाद्या रिळातून सूत सुटावं तसं विश्वाच्या पसार्‍यातला एक रस्ता सुटून आपल्या पायाखाली आलेला आहे आणि आपण त्यावर चालतोय! ही खात्री असली की जे अपरिहार्य आहे ते आवडीचं होऊन जातं आणि मग तुम्ही एकटे असतांना, वयाच्या सहासष्टाव्या वर्षी पण नाचू शकता, खिडकीत बसून तासाचे तास पावसाचे विभ्रम पाहू शकता, घरातल्या एखाद्या रोपट्याला नवीन पालवी आली की तुमच्या डोळ्यात कौतुकाचं पाणी येतं, तुम्ही गुपचूप त्या कोवळ्या नवलाईचं चक्क औक्षण करता… आणि आयुष्याचा पुरेपूर आनंद घेता. मी अशी आहे, एकांतलोभी!

रेखाटन – सुनील यावलीकर

( पूर्वप्रसिद्धी -‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक – २०२०)

……………………………………….

(मिथिला सुभाष या नामवंत पटकथाकार व संवाद लेखिका आहेत)

[email protected]

……………………………………….

मिथिला सुभाष यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात – मिथिला सुभाष- type करा आणि Search वर क्लिक करा.