आकाश अनावर झाले… क्षितिजांना पडल्या भेगा…!!

-स्नेहल सोनटक्के

तपासून घे शरीर अवघे, 

पुढे वयाला उत्तर आहे..!

चला जरा उतरवून ठेवू, 

जीवास हा देह भार आहे..!!

 यवतमाळ जिल्ह्यातील कवीरत्नांच्या मुकुटातील कोहिनूर गळून पडला. आर्णी येथील प्रतिभावंत गझलकार आदरणीय कलीम खान सरांचे कोरोनामुळे शनिवारी दुःखद निधन झाले.सरांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. फक्त गझलकार म्हणूनच नव्हे, तर दमदार निवेदक, शब्दसम्राट कवी, शिस्तप्रिय प्राचार्य म्हणूनही त्यांचा लौकिक होता.’ कलीम च्या कविता’, ‘गझल कौमुदी’ ,’मंजर’ , ‘कलीम के दोहे’ ही त्यांची प्रकाशित पुस्तके आहेत. तर येत्या काळात ‘चांद की टहनिया’, ‘सूर्याच्या पारंब्या’ , ‘कलीमच्या रुबाया’ ही त्यांची पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर होती.

मीच दिल्ली मीच केरळ मीच हिंदुस्तान आहे,

मरणही माझे भुईला कुंकवाचे दान आहे..

बाबरी मस्जिद असो वा जन्मभू पुरुषोत्तमाची,

माझियासाठी अयोध्या आदराचे स्थान आहे..

  ज्यांच्या नसानसातून माणुसकी धर्म वाहतो, हा सम्यक दृष्टीकोण फक्त त्यांच्यातच उगवतो. धर्माने मुस्लिम असले  तरी कलीमखान सरांची मराठी आणि संस्कृत भाषेवर पकड होती. धर्म, जाती, प्रांत,भाषा यांच्यात गुंतून न पडता  ‘एक ईश्वर.. एक अल्लाह..’ ही वृत्ती असणाऱ्या परोपकारी जीवांना धार्मिक वितंडवाद तुच्छ वाटायला लागतो.त्यांच्या कविता- गजलेतील प्रतिमा आणि प्रतिभेतून याचा प्रत्यय येतो. जितक्या श्रद्धेने त्यांनी कुराणाची पारायणे केली तितक्याच श्रद्धेने गीता देखील वाचली.त्यांची वेद, उपनिषदे व भगवद्गीतेवरील व्याख्याने हिंदूंना अपील होणारी आहेत. धर्माने मुस्लिम असूनही हिंदूंना लाजवेल असे भगवतगीतेचे त्यांना ज्ञान होते, परंतु असा शब्दप्रयोग करणे म्हणजे त्यांच्यातील सच्च्या देशभक्ताला, सर्वधर्मसमभाव हा शब्द खऱ्या अर्थाने जगणाऱ्या त्यांच्या पावित्र्याला, गालबोट लावण्यासारखे होईल. जीवनाकडे बघण्याचा उदात्त दृष्टिकोन त्यांच्या साहित्यात आहे. आणि जीवन भर त्यांनी तो जगण्यात उतरवलेला होता.

ये रे भगीरथा ये अता पापे मिळायाला हवी,

गंगेस या दुःखातूनी मुक्ती मिळायाला हवी..

देहा सहित वैकुंठाची भूलथाप आम्हाला नको,

हत्येस तुक्याच्या अता वाचा फुटायाला हवी..

   हिंदू धर्मातील संचिताचा त्यांनी काठोकाठ अभ्यास केला होता. ते परखड आणि स्पष्टवक्ता होते. ईश्वरावर त्यांची नितांत श्रद्धा होती. धार्मिकतेचा व्यासंग असला, तरी अंधश्रद्धेला त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून किंवा लिखाणातून कुठेही थारा दिला नाही.हृदयाला पाक-साफ ठेवण्यासाठी कुराण किंवा गीता गरजेची आहे, परंतु मेंदू काबूत ठेवण्यासाठी त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. देशभक्ती, सांप्रदायिक एकता, सर्वधर्मसमभावाच्या मिथकांनी त्यांचे साहित्य समृद्ध आहे. गजले प्रमाणे त्यांची ‘दोहा’ या काव्यप्रकार पकड होती. संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील आसक्ती त्यांच्या दोह्यातून स्पष्ट होते. आवाजातील कणखरपणा,मार्दव ,स्पष्टोक्ती, रुबाबदार सादरीकरण आणि प्रचंड अभ्यास यांच्या जोरावर त्यांनी हिंदूधर्म, श्रीमद्भगवद्गीता, वेद उपनिषदे,पुराण यांच्यावर केलेली व्याख्याने आजही ऐकणाऱ्यांच्या काना-मनात रुतून बसली आहे. त्यांनी केलेल्या सूत्रसंचालनाने संमेलने मुशायरे बहारदार झाले. जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्ह्याबाहेरच्या साहित्यिकांशी त्यांच्या कितीतरी आठवणी जुळलेल्या आहे. त्यांच्या एक्झिटमुळे साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

  गजलेबद्दल त्यांच्या मनात अपार प्रेम होते. त्यांचा मोठा शिष्य परिवार देखील होता. पेशाने प्राचार्य असल्याने ते शिस्तप्रिय होते. कायद्याचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्यांनी एलएलबीची पदवी मिळवली होती. साहित्यक्षेत्रात मूठभर ज्ञानाने पिवळे झालेल्यांचा दबदबा वाढला आणि निधी गोळा करून पुरस्कार देण्याची पद्धत सुरू झाली. पण कलीम खान सर हे त्याला अपवाद होते.त्यांनी असे कित्येक पुरस्कार नाकारले.

जिसे कहें तू जिंदगी तालमेल का खेल है 

सिग्नल जबतक है सही पटरीपर रेल है

हे ओळखून त्यांनी आयुष्य योग्य त्या सिग्नल वर ठेवले आणि आपल्या शागिर्दांना देखील तेच धडे दिले. महाराष्ट्रभर त्यांचे शिष्य आहेत. त्यांची मुलगी समीना शेख त्यांच्या लिखाणाचा वारसा पुढे नेत आहे. त्यांनी घडवलेले कित्येक विद्यार्थी या चांगल्या स्तरावर पोहोचले आहेत.

कामगार दिनानिमित्त त्यांनी लिहिलेल्या या

ओळी आहेत-

आकाश अनावर झाले

क्षितिजांना पडल्या भेगा 

मी माती घेऊन येतो 

तू हाती कवचा घे गा…

(लेखिका निवेदिका व मुक्त पत्रकार आहेत)

8999699287

Previous articleकरोनाशी आमने-सामने…An Encounter with Corona
Next articleमी युगाच्या वादळाने घेतलेली तान आहे  …
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.