-किशोर बळी
दहा वर्षांपूर्वी अमरावतीच्या एका कवीसंमेलनात कलीम खान यांची भेट झाली होती. अत्यंत साधी राहणी असलेल्या कलीम सरांनी आपल्या दमदार सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली होती. दुसऱ्या दिवशी अमरावतीतल्या सर्व वृत्तपत्रांमध्ये त्यांच्याच ओळींचे शीर्षक करून कवीसंमेलनाचा वृत्तांत छापला गेला होता.
आर्णीच्या एका ज्युनिअर कॉलेजचं प्राचार्यपद भूषवणारं हे व्यक्तिमत्त्व होतं. सर्वधर्मीय तत्त्वज्ञानाचे ते अभ्यासक होते. भगवद्गगीतेवर तर त्यांची कित्येक व्याख्यानेही झाली होती. नंतर वेगवेगळ्या निमित्ताने भेटी होत गेल्या. त्यांची गझल मनावर मोहिनी घालत गेली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी नुकतीच प्रकाशित झालेली त्यांची दोन पुस्तके पाठवली. त्यानिमित्ताने फोनवर दिलखुलास संवाद झाला. तोच शेवटचा ठरला. गेल्या काही वर्षांपासून अनेक व्याधींनी त्यांना ग्रासलं होतं. शेवटी कोरोनाने गाठलं आणि एका नितांतसुंदर गझलकाराने आपला अखेरचा निरोप घेतला.
थोड्या वेळापूर्वी हास्यकवी मिर्झा बेग यांचेशी बोलत होतो. मिर्झा साहेबांची पत्नी ही कलीम सरांची बहिण. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या. आम्ही आर्णीच्या उरुसात एक हास्यकवीसंमेलन केले होते. त्यावेळी आम्ही सर्व कवी त्यांना भेटायला गेलो होतो,हीदेखील आठवण ताजी झाली. केवळ एक शिक्षक आणि कवी म्हणूनच नव्हे, तर एक माणूस म्हणूनही त्यांचे मोठेपण सदैव प्रभावित करीत राहिले.
– तर मी सांगत होतो की अमरावतीच्या त्या कवीसंमेलनाचा वृत्तांत वृत्तपत्रांनी कलीम सरांच्या ओळींचे शीर्षक करून छापला होता.
जातींच्या पाणवठ्यावर घननीळ देश तळमळतो
अन् भगव्या सुखात येथे मी हिरवे दुःख मिसळतो
ही अभिव्यक्तीच नितांत वेगळी होती. गहिऱ्या दुःखाचे ठसठशीत प्रतिबिंब होते ते. ह्या ओळींनी भारावून गेलो. आज कानावर पडणाऱ्या आणि वाचनात येणाऱ्या हजारो कवितांच्या गर्दीत अशी अस्सल कविता लकाकतेच.
मी पहिल्या वर्गापासून जयगान जयाचे गातो
तो भारतभाग्यविधाता रस्त्यावर चिवडा खातो
कलीम साहेबांचे शब्द अंगावर काटा आणतात. किती किती सोप्या शब्दांमध्ये आणि अगदी दोन ओळींमध्ये किती मोठा आशय मांडला आहे त्यांनी … वाह !! लाजवाब !! … आणि असा त्यांचा चाहता होत गेलो.
मीच दिल्ली,मीच केरळ,मीच हिंदुस्थान आहे
मरणही माझे भुईला आसवांचे दान आहे
बाबरी मस्जिद असो वा जन्मभू पुरुषोत्तमाची
माझियासाठी अयोध्या आदराचे स्थान आहे
आज आपण पाहतो की सभोवताली धर्मांधता प्रबळ होताना दिसते.जातीयता आपली पाळं-मुळं अधिकच घट्ट करीत जाते. विषमतेची भयावह सावली पसरत जाते. तेव्हा कवी काय करीत असतो ? त्याने काय करायला हवं ? आपली लेखणी गहान टाकून गप्प बसायला हवं की ती विकून माणुसकीच्या शत्रूंच्या कळपात सामील व्हायला हवं ? नाही. कदापि नाही. – तर त्याने मानवतेचा आवाज बुलंद करायला हवा. तेच काम आयुष्यभर ह्या कवीने केलं, म्हणून हा कवी मोठा वाटतो आणि मग –
शेवटी पण एक निश्चित, ते मला टाळू न शकती
मी युगाच्या वादळाने घेतलेली तान आहे
हा कवीच्याच नव्हे तर अगदी ह्या वादळात तेवत राहणाऱ्या प्रत्येकाच्याच सामर्थ्याचा जयघोष आहे, हे आपल्याला पटल्यावाचून राहत नाही.
अल्पसे हे दुःख याचा फार बोभाटा नको
किन्तु भय वाटेल इतका दीर्घ सन्नाटा नको
किंवा
सांत्वनाचे दिवे आत येऊ नये
दुःख माझे उजेडात येऊ नये
हुंदके चावती,आसवे चावती
वेदनेला नवे दात येऊ नये
अशा कित्येक सुंदर गझला त्यांनी मराठीला दिल्या आहेत. कलीमच्या कविता, गझलकौमुदी, कलीम के दोहे ह्या त्यांच्या पुस्तकांमध्ये आपल्याला अशा अनेक सुंदर रचना पानापानावर भेटतात. ‘कलीम के दोहे’ ह्या त्यांच्या संग्रहात तब्बल सातशे दोहे समाविष्ट आहेत. उदाहरणादाखल त्यांचे काही दोहे इथे देत आहे –
रात बुहारन आ गयी,झाड़ गयी सब तेज
डर लागे वो माइरी,दिया चाँद का भेज
महिमा मंडित मत करो,मत रौंदो एहसास
औरत,औरतही रहे, ना देवी ना दास
जिसे नहीं संवेदना,वो क्या जाने दर्द
दर्द नहीं होता जिसे, वो काहे का मर्द ?
एक मुल्क है इंडिया,दूजा भारत देस
ख़रगोषों के साथ में फिर कछुओं की रेस
गीता हो या धम्मपद,या हो फिर कुरआन
नैतिकता का पाठ सब,देवै एक समान
असे एकाहून एक सरस दोहे ‘कलीम के दोहे’मध्ये सापडतात. त्यांनी त्यांच्या एकूणच साहित्यातून आणि जीवनप्रवासातून मानवतेचा विचार उजागर करण्याचा वसा जपलेला दिसतो. काही वर्षांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, तेव्हा त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. आपल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, हीच त्यामागची प्रामाणिक भावना होती. गेली अनेक वर्षे ते अनेक आजारांशी लढत होते. ह्या प्रवासात त्यांनी आपला स्वाभिमान, आपले आत्मभान, आपली टवटवीत गझल आणि खणखणीत आत्मविश्वास कधीही हरवू दिला नाही.काल कलीम खान साहेब गेल्याची बातमी काळीज उसवून गेली. कलीम खान आज आपल्यात नसले तरी त्यांच्या काव्यातून त्यांचे अस्तित्व सदैव दरवळत राहील, यात शंका नाही. भावपूर्ण आदरांजली.
हे सुद्धा नक्की वाचा -आकाश अनावर झाले… क्षितिजांना पडल्या भेगा…!! https://bit.ly/2Sk482N
(लेखक नामवंत कवी , गझलकार व हास्य कलावंत आहेत)
94216 77181