दुसऱ्या दिवशी त्यांनी मला साकिब या लोकल मुलाबरोबर गुलमर्ग फिरायला पाठवून दिले. साकिबचे वडील गंडोला राईडच्या ठिकाणी काम करतात. साकिब सांगत होता, ‘पहलगाम तर गुलमर्गसमोर काहीच नाही परंतु पहलगाम श्रीनगरपासून जवळ आहे, रोडवर आहे म्हणून तिथे जास्त फिल्म्सचे चित्रीकरण होते. गुलमर्ग थोडे आत असल्याने लोकांना इथे येणे अवघड जाते.’ मग मी दिवसभर गुलमर्गमध्ये बर्फाचा आनंद लुटला. संध्याकाळी थंडीने गारठून जयादीदींच्या घरी परतले. त्यांनी मला गरमगरम वरणभात, वरून तूप असे छान खाऊ घातले. त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळातील अनेक आठवणी, कामातील समस्या सांगितल्या. सुरुवातीला कसे लोक मुलांना वसतिगृहात पाठवायला, विशेषतः मुलींना शिकवायला तयार नसायचे. त्यांनी काम सोडून कायमचे निघून जावे म्हणून त्यांच्या राहत्या घरासमोर दहशतवाद्यांनी गोळीबारसुद्धा केला होता. मी त्यांना म्हटले, ‘तुम्हाला या सर्व वातावरणात एकटे वाटत नाही का?’ त्यावर त्यांचे उत्तर, ‘माझा देव आहे सोबत. मी जिथे जाईल तिथे तो आहे.’
बीडब्ल्यूएफचे आरोग्य विभागातही योगदान आहे. कामाच्या सुरुवातीला अधिक सरांनी पाहिले की, सरकारी ॲम्ब्युलन्स खराब प्रतीच्या होत्या. तेव्हा बीडब्ल्यूएफने सरकारी आरोग्ययंत्रणेला अद्यायवत, सर्व सोयींनी युक्त ॲम्ब्युलन्स दिल्या… ज्यात स्त्रीची प्रसुतीही सुरक्षितपणे होऊ शकेल. अशा आत्तापर्यंत 14 ॲम्ब्युलन्स त्यांनी प्रशासनाला दान म्हणून दिल्या आहेत. अनेक वेळा बीडब्ल्यूएफतर्फे संवेदनशील भागात आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात. महाराष्ट्रातील अनेक डॉक्टर्स या कामात अधिक सरांशी जोडले गेले आहेत. मी परत येते वेळी पुण्यावरून रोटरी क्लबचे डॉक्टर्स इथे आरोग्य शिबिरासाठी येणार होते. 2016मध्ये काश्मीरमध्ये जी अशांतता निर्माण झाली होती त्यात अस्वस्थ तरुणांनी दगडफेक केली. त्यांना नियंत्रित करण्यासाठी पेलेट गनचा वापर झाला. आकाराने लहान पेलेट्समुळे शरीरावर जखमा होतात. वेळेत जर ऑपरेशन झाले नाही तर डोळ्यांना झालेल्या इजेमुळे कायमचे अंधत्व येऊ शकते.
अधिक सर सांगतात, ‘माझी 99 टक्के शक्ती ही इथल्या नकारात्मकतेशी लढण्यातच जाते. जे काही काम उभे आहे ते केवळ एक टक्काच होऊ शकले आहे कारण इथे विरोधच खूप होतो. हेच काम मी महाराष्ट्रामध्ये करायला गेलो असतो तर आत्तापर्यंत भरपूर मोठे काम उभे राहू शकले असते… परंतु काश्मीरमधला संघर्षच खूप वेगळ्या प्रकारचा आहे. अनेक धार्मिक शक्ती, दहशतवादी शक्ती आणि काश्मीरकडे दहशतवादामुळे भेदभावाच्या दृष्टीने पाहणाऱ्या नकारात्मक शक्ती कामात व्यत्यय आणत राहतात.’ अशा प्रतिकूलतेतही अधिक कदमचे काम सकारात्मक ऊर्जेने फुलले आहे.
अधिक कदम सरांचे प्रयत्न अभिनंदनीय आहे खरे तर राजकीय लोकांनी, मीडिया ने काश्मीर विषयी नकारात्मक वातावरण निर्माण करून पर्यटकांच्या मनात भीतीचे सावट उभे केले. काश्मीर आपला आहे तेथील नागरिक आपले आहे, आपण त्यांना प्रेमाची वागणूक दिली, तर दुरावा दूर होण्यास मदतच होईल. पण सरसकट काश्मिरी लोकांच्या विषयी नकारात्मक भूमिका घेतली, त्यांना भारत विरोधी लेबल लावले तर दुरावा आणखी वाढेल. सकारात्मक बातम्या, राजकीय स्थैर्य याची आवश्यकता आहे.
लेखिकेला काश्मीर, तेथील अधिक कदम सरांचे कार्य विषयी आलेला अनुभव निश्चितच विशद करण्यासारखे आहे असेच सकारात्मक लिखाण काश्मीर विषयी आवश्यक आहे,जेणे करून लोकांच्या मनातील काश्मीर आणि तेथील नागरिक यांच्या विषयीं भीती दूर होण्यास मदत होईल.
अधिक कदम सरांच्या कार्यास ईश्वर अधिक यश देवो हीच या प्रसंगी प्रार्थना….