हसीना मुल्ला – राजीव गोरडे: धर्मजातीच्या आंधळ्या संकल्पनांतून बाहेर यायला हवं

(साभार:’कर्तव्य साधना’ –आंतरधर्मीय विवाह केलेल्यांच्या मुलाखती : भाग ६)

(मुलाखत व शब्दांकन – हिनाकौसर खान-पिंजार)

………………………………..

हसीना मुल्ला – राजीव गोरडे. विद्यार्थी चळवळीमुळे हसीना आणि राजीव, दोघंही एकमेकांच्या संपर्कात आले. काही कॉमन मित्रांमुळं दोघांची जुजबी ओळख झाली आणि मग त्याच मित्रांच्या मध्यस्थीमुळं दोघांनाही एकमेकांचं लग्नासाठी प्रपोजल दिलं गेलं. त्याआधी खरं तर हसीना यांच्या कुटुंबीयांनी त्यांचं लग्न अत्यंत पारंपरिक-धार्मिक असणाऱ्या कुटुंबातल्या मुलाशी ठरवलं. ही गोष्ट मित्रमैत्रिणींना कळली. पारंपरिक घरात आपली मैत्रीण गेली तर ती दबून जाईल ही भीती वाटून मित्रमैत्रिणींनी हसीनासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली. यामध्ये राजीवही होतेच. तेही चांगला मुलगा शोधण्याच्या कामाला लागले आणि या शोधमोहिमेत इतर मित्रमैत्रिणींनी त्यांचा मोर्चा अचानक राजीव यांच्याकडे वळवला.

राजीव यांना हसीना आवडल्या होत्या, म्हणून मग हा प्रस्ताव जर हसीनाला मान्य असेल तर आपण लग्नास तयार आहोत, हा निरोप राजीवनं पाठवला. आपलं मत अजिबातच विचारात न घेतलेल्या लग्नात उडी मारणं ही आत्महत्या ठरेल. उलट आपल्या इच्छा-भावनांची कदर असणाऱ्या, स्वप्नांना साथ देऊ पाहणाऱ्या आणि विचारआचारानं कृतिशील असणाऱ्या व्यक्तीची निवड करणं जास्त योग्य ठरेल, असा विचार हसीना यांनीही केला. 1992मध्ये आंतरधर्मीयच मात्र ठरवून घडवून आणलेल्या या वैचारिक विवाहबंधनात दोघंही अडकले.

हसीना या अमरावती जिल्ह्यातल्या मोझरी या गावच्या. शेती व शेतीजन्य व्यवसाय करत असलेल्या कुटुंबात हसीना यांचा जन्म झाला. त्यांचे वडील काँग्रेसी विचारसरणीचे होते. घरातलं वातावरण खुलं होतं. दहावीपर्यंतचं शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांनी धार्मिक शिक्षणही घेतलं. महाविद्यालयीन जीवनात त्या ‘स्टुंडट फेडरेशन ऑफ इंडिया’ या संघटनेच्या संपर्कात आल्या. त्यांचा सक्रिय सहभाग वाढला. चळवळींच्या कार्यासोबतच त्यांनी एम.ए.बी.एड. आणि लग्नानंतर एम.ए. या पदव्या मिळवल्या. अमरावतीच्या यशवंत सोसायटीच्या शाळेत त्या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. आठ वर्षं त्या अंगणवाडी सेविका युनियनच्या राज्याच्या सेक्रेटरी राहिल्या. कम्युनिस्ट पक्षाची ट्रेड युनियन केंद्रात पदाधिकारी राहिल्या. महिलांचे आरोग्याचे प्रश्न, गावातली दारूबंदी, कौटुंबिक हिंसाचार या प्रश्नांवर त्यांनी कायम आंदोलनं केली. त्याचबरोबर त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या राजकीय-धोरणी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारं छोटेखानी चरित्रलेखनही केलं आहे.

राजीव गोरडे हे अमरावती जिल्ह्यातल्याच तिवसा या गावचे. सहा भावंडांमध्ये राजीव थोरले. त्यांचे वडील शिक्षक तर आई गृहिणी. राजीव चौथीपर्यंत आपल्या आजोळी इंदौरला होते. त्यांचे आजोबा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. लहानपणी त्यांच्यावर आजोबांचा प्रभाव राहिला. चौथीनंतर राजीव पुन्हा आपल्या आईवडलांच्या गावी आले. पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेताना विद्यार्थी चळवळींशी राजीव यांचा संपर्क आला. त्यांनी महाविद्यालयीन निवडणूक आणि तिवसा गावची ग्रामपंचायत निवडणूकही लढवली. भाषणकौशल्य, नेतृत्वगुण, प्रश्नांची जाण आणि पाठपुरावा करण्याची चिकाटी यांमुळे ते गावातले सर्वांत तरुण सरपंच ठरले. त्यांनी इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र या विषयात एम. ए. केले. पत्रकारितेची पदवी घेतली.

लग्नगाठीत अडकल्यानंतर त्यांनी गाव सोडलं आणि पुढे पत्रकारितेची कास धरली. गेली 28 वर्षं ते पत्रकारितेत आहेत. लहानमोठ्या दैनिकांतून काम करत आज विदर्भ मतदार या वृत्तपत्रात वर्धा जिल्ह्याचं काम सांभाळत आहेत. याशिवाय मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचं काम ही करत आहेत.

हसीना-राजीव यांनी लग्नाबाबत घरात कुणालाही थांगपत्ता लागू दिला नाही. ऐन मोक्याच्या वेळी राजीव यांच्या घरी कुणकुण लागलीच, मात्र त्यांनी संयम राखला आणि संधी मिळताच घरातून बाहेर पडले. कामाचं निमित्त करून हसीनाही थेट विवाह नोंदणी कार्यालयात पोहोचल्या आणि 30 मार्च 1992 रोजी दोघं विवाहबद्ध झाले. समजून-उमजून केलेल्या या त्यांच्या आंतरधर्मीय विवाहानिमित्त दोघांशी केलेला हा संवाद…

प्रश्न – रुढार्थानं तुमचं लव्हमॅरेज नाही. आंतरधर्मीय लग्न तेही जाणीवपूर्वक ठरवून केलेलं. ते कसं हे जाणून घेण्याआधी असा निर्णय घेण्याची वैचारिक बैठक कशी घडत गेली हे माहीत करून घ्यायला आवडेल…

हसीना – मी अमरावतीतल्या मोझरी गावची. मोझरी म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्यांनी पावन झालेली भूमी. आमचं कुटुंब मध्यमवर्गीय. मी अडीच वर्षांची असताना आई गेली त्यामुळं पुढं आजीनंच माझा सांभाळ केला. आजीचा माझ्यावर खूप जीव होता. मी खूप शिकावं ही तिचीच इच्छा होती. आजीआजोबा दोघांचंही माझ्या जडणघडणीकडे प्रचंड लक्ष होते. पुढं वडलांनी दुसरं लग्न केलं. त्यानंतर घरात आणखी तीन बहिणी, एक भाऊ असा परिवार वाढला. वडलांचा स्थानिक समाजकारणात सहभाग होता त्यामुळं साहजिकच घरात माणसांची ऊठबसही कायम असायची. त्या वर्तुळाचा प्रभाव माझ्यावर राहिला. शालेय जीवनातच निबंधलेखन करणं, भाषण करणं या गोष्टी मला आवडायला लागल्या.

पुढे कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर ‘स्टुडंट्‌स फेडरेशन ऑफ इंडिया’ या विद्यार्थी संघटनेशी माझा संबंध आला. साधारणतः 1987पासून संघटनेच्या कार्यात सक्रिय झाले. वाचनाची आवड निर्माण झाली. मार्क्स, लेनीन, भगतसिंग, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबडेकर, शाहू महाराज यांसारख्या सामाजिक विचारवंतांची चरित्रं माझ्या जीवनाला आकार द्यायला लागली.

पुस्तकं वाचण्याचं वेड आणि त्याला संघटनेच्या कार्याची जोड यांमुळं समाजभान यायला लागलं होतं. जात, धर्म, पंथ वजा करून मानवीय दृष्टीकोन डोक्यात ठेवून जीवनाची वाटचाल केली पाहिजे ही वैचारिक बैठक 1990पर्यंत पक्की झाली होती.

राजीव मी घरात थोरला आहे. माझ्या आईचं माहेर इंदोरचं. ती जेव्हा लग्न होऊन आली तेव्हा तिला मराठीही येत नव्हतं, पण ती त्या काळातली अकरावी झालेली होती. माझे आजोबा – आईचे वडील – अण्णासाहेब इंदौरकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्य करायचे. मी दहा वर्षांचा होईपर्यंत आजोबांकडेच राहायला होतो, मात्र तोवर माझा शाळेत प्रवेश झालेला नव्हता. माझ्या वडलांची स्थिती जरा बरी झाल्यानंतर आजोबांनी मला माझ्या मूळ गावी सोडलं.

इथं शाळेत घातल्यानंतर एकाच वर्षात मी चौथीपर्यंतच्या परीक्षा देऊन उत्तीर्ण झालो. पुढं नियमित शिक्षण सुरू झालं. महाविद्यालयात विद्यार्थी चळवळींमध्ये सहभाग वाढला. विद्यार्थ्यांच्या होस्टेलचे, इबीसी फॉर्मचे प्रश्न दिसायचे. खेळांसाठी मैदान असलं तरी साहित्याचा अभाव दिसायचा. विद्यार्थ्यांचा गट करून हे प्रश्न प्राचार्यांपुढे सतत मांडायला लागलो.

पुढं महाविद्यालीन निवडणुकीत सहभागी झालो. माझ्यातले नेतृत्वगुण बहरत गेले… तेव्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून कामही करत होतो. त्या वेळी आणखी एक घटना घडली. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी रहिवासी पुराव्याची आणि अन्य काही कागदपत्रांची जुळवाजुळव करायला लागायची. ग्रामपंचायत कार्यालयातून ही कागदपत्रं मिळवावी लागत, मात्र ग्रामसेवक काम करत नव्हते. तरुण रक्त उफाळून आलं. त्याच वर्षी निवडणूक लागणार होती. कॉलेजच्या निवडणुकीचा अनुभव होताच. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून उभा राहिलो. गावातल्या प्रश्नांचा बारकाईनं अभ्यास करून जाहीरनामा तयार केला. लोकांना विश्वासात घेतलं आणि ती निवडणूक जिंकलोही. गावकऱ्यांनी सरपंचपदी बसवलं. हे सगळे उपद्व्याप कॉलेजजीवनातच चालू होते.

त्या काळात मला एक गुरू भेटले असं म्हणायला हरकत नाही. आमच्या महाविद्यालयातल्याच इतिहास आणि इंग्रजी शिकवणाऱ्या जोशी नावाच्या शिक्षकांनी मला सांगितलं की, तू नेतागिरी करतोय ते ठीक आहे पण ती नेतागिरी टिकवायची असेल तर अभ्यासात फर्स्ट असायला हवं. तुला प्रश्न कळतात हे चांगलंय. त्यासाठी धडपडतोस तेही चांगलं पण याला जर अभ्यासाची-ज्ञानाची जोड मिळाली नाही तर उद्या कुणीही तुझ्यासोबत उभं राहणार नाही. मला त्यांचं म्हणणं पटलं. त्यानंतर मी पुन्हा जोमानं अभ्यास सुरू केला. वाचन सुरू केलं. आपल्याकडे आचारविचार दोन्ही हवेत हे लक्षात येत गेलं. एम.ए. पूर्ण केल्यानंतर एल.एल.बी. पूर्ण केलं. दरम्यानच्या काळात पत्रकारितेचा डिप्लोमाही केला होता.

प्रश्न – मग तुमची एकमेकांशी ओळख कशी कुठं झाली?

हसीना आम्ही विद्यार्थी चळवळीतले सहकारी होतो त्यामुळं तसे एकमेकांना ओळखत होतो. पण आमच्या दोघांमध्ये खास मैत्री होती किंवा आम्ही एकमेकांशी खूप बोलत होतो असं काहीही नव्हतं. आमची आंदोलनं, निदर्शनं, गावातल्या तरुणांच्या समस्या सोडवणं या प्रकारच्या कामांत कामानिमित्तच भेटीगाठी होत होत्या.

राजीव चळवळीतली एक हुशार आणि झोकून देऊन काम करणारी कार्यकर्ती अशी हसीनाची प्रतिमा माझ्या मनात होती. मुद्दे चांगले मांडते, भाषण चांगलं देते हे पाहत होतो, पण याहून जास्त काही वाटत नव्हतं. पुढं मित्रांनीच आम्हाला एकमेकांविषयी सुचवलं तेव्हा आम्ही याबाबत गांभीर्यानं विचार केला.

प्रश्न – मग लग्नाबाबत तुम्ही एकमेकांचा विचार करावा असं मित्रांनी तुम्हाला का सुचवलं? तुम्ही दोघांनीही आंतरधर्मीय विवाह करण्याचं आधीच ठरवून ठेवलं होतं का?

हसीना नाहीऽ नाही. तसं काहीही ठरवलं नव्हतं. उलट लग्नाचा असा कुठलाही विचार मनात नव्हता. माझं तेव्हा बी.ए. बी.एड. झालं होतं. अनुभवासाठी मी एका शाळेत शिकवतही होते. इतर वेळेला चळवळीच्या कार्यकर्तेपणाला वाहून घेतलेलं होतं त्यामुळं फुरसतीनं या सगळ्याचा विचार करावा असं तोपर्यंत तरी काही वाटलंच नव्हतं… पण मी आधी सांगितलं तसं माझे वडील काँग्रेसी विचारसरणीचे होते. मी मात्र कम्युनिस्ट पार्टीमध्ये कार्यरत झाले. वडलांचे काही मित्र-सहकारी यावरून त्यांना टोमणे मारायला लागले. ‘क्यों मियाँ? आपकी अभी तक की पिढ़ी काँग्रेसी और आपकी बेटी कम्युनिस्ट कैसे हो गई?’ ही गोष्ट वडलांच्या मनाला दुखवायची. ते रागावून म्हणायचे, ‘आता कुठल्याही आंदोलनात जाऊ नको. तसंही शिक्षण झालंय ना? मग आता लग्नाचा विचार कर.’

वडलांना वाटत होतं की, माझं लग्न लावून दिलं की संघटना, आंदोलन, विविध कार्यक्रमांसाठी फिरणं हे सगळं मी विसरून जाईन. संसारात रमून जाईन आणि मग लोकही त्यांना कुठल्याही प्रकारचे बोल लावणार नाहीत.

त्यांनी मला काहीही कल्पना न देता लग्न ठरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वडलांनीच माझ्यासाठी मुलाची निवड केली. त्यांनी निवडलेला मुलगा सामाजिक-राजकीय विचारांपासून कोसो दूर होता. उलट धार्मिकदृष्ट्या कट्टर मुस्लीम होता. वडलांचा धाक खूप असल्यानं मला त्यांना थेट नकारही देता येईना. माझी चलबिचल सुरू झाली.

एक दिवस राजीव हर्णे, मेघा साखरवानी आणि गणेश खोडस्कर या मित्रमैत्रिणींनी विचारलं, ‘काही प्रॉब्लेम आहे का?’ वडलांच्या, लग्नाच्या प्रस्तावाबाबत सांगितलं. ‘ज्या विचारसरणीनं माझी जडणघडण झाली ती विचारसरणी सोडून जगणं मला शक्यच नाही. मी काय करू मला कळत नाहीये.’ मी घडाघडा बोलून टाकलं. यावर संघटनेच्या वैचारिक मित्रांनाही पटकन काही सुचेना. मग तेच मला म्हणाले, ‘हे लग्न मोडायचं असेल तर त्यासाठी एक चांगला पर्याय शोधणं गरजेचं आहे.’ माझ्या जडणघडणीला आणि भूमिकेला समजून घेणारा नवरा मुलगा शोधण्याची जबाबदारी घेण्यासाठी तिघांनी पुढाकार घेतला.

राजीव – होऽऽ आणि हसीनासाठी चांगला मुलगा शोधायचा आहे, अशीच माहिती हसीनाच्या मित्रमैत्रिणींकडून मिळाली. पारंपरिक धाटणीच्या कुटुंबात गेली तर चौकटी मोडून बाहेर पडलेली मुलगी पुन्हा त्याच चक्रात अडकून जाईल, हाच पहिला विचार मनात आला. मग चळवळीतलीच संभाव्य व्यक्ती कोण असेल याचा विचार सुरू झाला. त्या वेळी मग कुणीतरी मलाच याबाबत विचारलं. हसीना एक चांगली व्यक्ती आहे याची मला पूर्ण खात्री होती. तिच्या कार्यकर्तेपणाचा प्रवास मी पाहत होतोच. त्यामुळं मित्रांनी सुचवल्यावर मला त्यात काहीही वावगं वाटलं नाही. उलट बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गानं जाण्याची ही संधी वाटली. हसीनाची हरकत नसेल तर मी हे लग्न करायला तयार आहे, असा निरोप मी तिला दिला.

दुसरा असा ही मुद्दा होता कि माझ्या मामांनी माझ्यासाठी एक स्थळ आणले होते. त्यांच्याकडून विचारणा झाली होती की मुलगा काय करतो. सरपंच आहे म्हंटल्यावर राजकारण-समाजकारण करणारा मुलगा नको असं उत्तर आलं होतं. माझ्यादृष्टीने असं होतं की मी हे काम आयुष्यभर करणार होतो. हसीना याच कामात असल्यानं तिला समाजकार्य ठाऊक होतं. तिची साथ मिळाली तर पुढे आमच्यात आमच्या आनंदी क्षेत्रात काम करण्यासाठी झगडा होणार नव्हता. त्यामुळं तिची हरकत नसेल तर या सर्वच दृष्टीने मलाही हा प्रस्ताव माझ्यासाठी योग्य वाटत होता.

हसीना – मित्रांनी राजीवचा प्रस्ताव ठेवल्यानंतर मला थोडी भीतीच वाटली. राजीव सिनिअर असल्यामुळं त्यांचा एकूणच प्रभाव माहीत होता… शिवाय तेव्हा ते तिवसा या गावच्या राजकीय इतिहासातले सगळ्यांत कमी वयाचे सरपंच होते. त्यांच्या घरची स्थितीही आमच्यापेक्षा चांगली होती. या सगळ्याच गोष्टींचं मला दडपण आलं. मी तत्काळ निर्णय देऊ शकत नव्हते. आम्ही दोघांनी चर्चा केली. तरीही मी विचार करण्यासाठी अवधी मागितला. त्या वेळी मित्र म्हणाले की, ‘विचार कर पण दोन्ही प्रस्तावांचा साधकबाधक विचार कर. भविष्यात तू स्वतःला घेऊन जाऊ पाहतेस याचाही विचार कर.’

घरच्यांनी सांगितल्याप्रमाणे पारंपरिक तऱ्हेच्या लग्नबंधनात मला अडकायचं नव्हतं. तोवर मला इतर स्त्रियांच्या अनुभवांमुळं एकूणच शहाणपण आलं होतं. केवळ चूल आणि मूल हे आपलं आयुष्य असू शकत नाही. त्या वर्तुळाच्याही पलीकडं आयुष्य आहे याची खातरी होती. राजूचा प्रस्ताव स्वीकारला नाही तर त्याच चौकटीत अडकून पडावं लागणार आणि प्रस्ताव स्वीकारला तर चौकटीच्या पलीकडचं आयुष्य मिळणार, एक माणूस एक व्यक्ती म्हणून आपल्याला मोकळीक मिळणार. द्विधा अवस्था झाली. महिनाभर उलटसुलट पद्धतीनं विचार करत राहिले आणि शेवटी होकार कळवला.

प्रश्न – घरी या नव्या प्रस्तावाबाबत कल्पना दिली?

हसीना – अजिबात नाही. ते शक्यच नव्हतं. अशा तऱ्हेनं आंतरधर्मीय लग्नाचा विचार मी करत आहे ही गोष्ट ते स्वीकारूच शकले नसते. शिवाय मी काही प्रेमात पडून निर्णय घेत नव्हते. वैचारिक स्तरावर हा माणूस आपली चांगली सोबत करेल. आपल्या विचारांना बळकटी मिळेल. स्वतंत्र व्यक्तिमत्त्व जपलं जाईल अशा भरवशावर निर्णय घेतला होता. त्यामुळं बंड करून घरच्यांना कल्पना देणं याचं माझ्यात धार्ष्ट्य नव्हतं. उलट पाहता पायावर धोंडा मारून घेण्याची इच्छाही नव्हती. आम्ही दोघांनीही आपापल्या घरात याविषयी काहीच सांगितलं नव्हतं.

आमचा निर्णय योग्य आणि पक्का आहे याची खात्री  झाल्यावर आम्ही अमरावतीच्या विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन अर्ज केला. सामाजिक कामांसाठी घराबाहेर पडतच असायची… शिवाय तेव्हा नोकरीही चालू होती. घराबाहेर पडण्याला अटकाव नव्हता तरीही हे सगळं खूपच लपतछपत केलं. नियमानुसार अर्जाची प्रत कार्यालयात लावली जाते पण तिकडं कुणीही फिरकणार नाही याची खातरी होती.

प्रश्न – म्हणजे घरातून गुपचूप बाहेर पडून लग्न करायचं ठरवलं होतं?

हसीनाहोऽऽ पण ऐन वेळेवर एक घोटाळा झाला. अर्जाचा कालावधी 27 मार्च 1992 या तारखेला पूर्ण होणार होता. त्या दिवशी विवाहनोंदणी करणार होतो पण कसं कुणास ठाऊक त्या दिवशी राजीवच्या एका मित्राचं पत्र त्यांच्या घरी आलं. ज्यावर हसीना मुल्लाशी लग्न केलंस त्याबद्दल अभिनंदन असं लिहिलं होतं. हे पत्र नेमकं त्यांच्या आईच्या हातात पडलं. तोवर राजीव घरातून निघाले नव्हते. ते घरातच अडकले. इकडं मी अमरावतीच्या कार्यालयात पोहोचले होते. मला या पत्राबाबत काहीच कल्पना नव्हती. तेव्हा काही फोन नव्हते की मोबाईलही. संध्याकाळचे चार-साडेचार झाले तरी राजीव आलेच नाहीत. मनात नाना शंका यायला लागल्या. त्रागा व्हायला लागला. आपली फसगत झाली का… इथवर विचार आले पण मग मित्रांपैकीच कुणीतरी खबर आणली की, राजीवच्या घरी एक पत्र आलं आणि म्हणून हा घोळ झाला. तातडीनं त्याला काही हालचाल करता येणार नाही पण तो आपल्याला कळवत राहील.

मी सकाळी लवकर गेलेले. माझ्या गावाहून 27 किलोमीटर अंतरावर अमरावती. पुढं ते कार्यालय. घरी उशिरा आले. मानसिक स्तरावर खूप थकून गेले होते. नशीब एवढंच होतं की, त्यात माझं स्पष्ट नाव असतानाही माझ्या घरापर्यंत कसलीच कुणकुण लागली नव्हती.

राजीवघरी पत्र आलं. तेव्हा गहजब झाला. कुठल्या तरी मुस्लीम मुलीशी लग्न केलंस? हा काय प्रकार आहे? असं साधारण टिपिकल घडलं. पण मी मात्र हा कुणीतरी खोडसाळपणा केला आहे असं सांगत राहिलो. नावासकट पत्र असल्यानं घरच्यांनी मला त्या दिवशी घराबाहेर पडू दिलं नाही. मलाही जास्त ताणता येणार नव्हतं कारण हसीनाच्या घरी उडतउडत जरी बातमी गेली तरी पुढं अधिक पेच वाढणार होता त्यामुळं त्या दिवशी मला त्यांच्या मनाखातर ऐकत राहावं लागलं.

दरम्यान एक मित्र घरी येत असल्यानं पुढचा ॲक्शन प्लॅन आम्ही ठरवत होतो. पुढं 28, 29 मार्च या दोन दिवशीही मला काही हालचाली करता आल्या नाहीत. घरचे फारच बारीक लक्ष ठेवून होते पण त्या दिवसांत मी सरपंचपदी होतोच. मग 30 तारखेला ग्रामपंचायतीचं काम काढून घराबाहेर पडलो.

हसीना होऽऽ पण त्या दिवशीही माझा जीव टांगणीलाच लावलेला होता. राजीवना कार्यालयात यायला पावणेपाच झाले. पुढच्या दहापंधरा मिनटांत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आम्ही 30 मार्च 1992 रोजी विवाहबद्ध झालो. फक्त पाच रुपये लागले तेव्हा. आमच्या लग्नात शेतकरी कामगार पक्षाचे रमेशचंद्र कांबळे आणि पंकज आवारे या दोघांनी खूप मदत केली.

प्रश्न – त्याआधीचे तीन दिवस तणावात गेले असतील?

राजीव अगदी! फार बेक्कार! काय होईल, काय नाही त्याचा काही अंदाजच येत नव्हता. जर का कुणाला काणकुण लागली तर या सगळ्यात हसीनाला जास्त त्रास दिला गेला असता… त्यामुळं धास्तावलो होतो. संपर्काची काही साधनंही नाहीत. ख्यालीखुशाली तरी विचारणार कशी?

हसीना – खरंय ते दिवस खूपच भयानक होते. माझ्या संपर्कात एक मैत्रीण होती. ती सांगत राहायची, ‘शांत राहा. राजीवशी बोलणं झालंय. पुढं जे वाढलं असेल त्यासाठी मानसिकता तयार कर.’

घरच्यांना कळलं तर काय याची भीती सारखी वाटत होती, पण माझ्या घरी लग्न होईपर्यंत माहीतच झालं नाही. राजीवच्या आईला पत्र मिळालं होतं तरी त्यांनी माझ्या घरच्यांना कळवलं नाही हे सुदैवच म्हणावं लागेल. कदाचित त्या पत्रानं स्वतःच घाबरल्या. त्यामुळं माझ्या घरी हे सांगायला हवं हा विचारच त्यांच्या मनात आला नाही. उलट काहीच नसताना उगीच मामला का वाढवायचा असा विचार त्यांनी केला असेल. पण जे झालं ते चांगलंच झालं. त्यांनी जर घरी सांगितलं असतं तर कदाचित आमचं लग्नच होऊ शकलं नसतं.

प्रश्न – लग्न केल्यानंतर तर घरी कळवलं असेल… ते कसं?

हसीनामी एक पत्रच लिहिलं. त्यात वडलांनी आणलेला प्रस्ताव मला मंजूर नव्हता. माझी मर्जी कुणीही विचारली नाही वगैरे वगैरे असं बरंच लांबलचक मांडलं. राजीवचा प्रस्ताव आणि लग्नाचा निर्णय यांविषयी सांगितलं. मी सुशिक्षित आहे. समाजामध्ये समाजाचं अवलोकन, महिलांची स्थिती काय आहे याची मला जाणीव आहे. आम्ही संघटनेत काम करतोय. मॅच्युअर्ड आहोत. कलेक्टरलाही पत्र दिलंय त्यामुळं काहीही करू नये. मी हा निर्णय पूर्णपणे स्वतःच्या मर्जीतून घेत असल्याचंही स्पष्ट केलं. वडलांना आणि घरच्या मंडळींना वाईट वाटलं आणि ते साहजिकही होतं. राजीवच्या घरीही मित्रांनी सांगितलं.

प्रश्न – लग्नानंतर पुन्हा सासरी आलात?

हसीना शक्यच नव्हतं. लग्न झाल्यानंतर तिथूनच आम्ही निघालो. तत्कालीन शेतकरी कामगार पक्षाचे प्रा.चंद्रकांत तुरकाले यांची पत्नी अकोल्याला डॉक्टर होती. त्यांनी त्यांच्याकडे आठवड्याभरासाठी पाठवलं लपवण्याच्या हेतूनंच. वातावरण निवळल्यावर आम्ही येणार होतो. घरचे नाराज असल्यामुळं त्यांच्याकडून काहीच मदत मिळणार नव्हती. अकोल्याहून अमरावतीला आलो. शरद म्हणून एक मित्र होता. त्यानंच खर्च करून रूम करून दिली. त्याच्या घरातली निम्मी भांडीकुंडी दिली. देशोन्नती पेपरमध्ये 500 रुपयांवर नोकरीलाही लावून दिलं. त्या वेळेस मी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात क्लार्कचं काम करायला लागले. आमची घडी बसायला लागली. पुढं मी गरोदर राहिले तरीही तणाव टिकून राहिला. कम्युनिस्ट विचारसरणीचे आमचे कितीतरी मित्र होते, मात्र त्या काळात फारच थोड्या लोकांकडून आम्हाला मदत मिळाली.

प्रश्न – मात्र काही काळानं तरी कुटुंबीयांची नाराजी दूर झाली असेल.

हसीनामाझ्या मोठ्या मुलीचा जन्म झाल्यानंतर वगैरे नाराजी दूर व्हायला सुरुवात झाली. अर्थात माझ्या सासरच्या कुणीही फार तीव्र विरोध केला नाही. सासूबाई तर कधीच काही बोलल्या नाहीत. मोठ्याच मुलानं धर्माबाहेरची मुलगी आणली याची खंत त्यांना होती मात्र त्यांनी कधी बोलून नाही दाखवलं. त्या एकट्याच रडायच्या. माझ्याही घरून विरोध मावळायला वर्ष-दीड वर्ष लागलंच.

साधारणतः आंतरजातीय, आंतधर्मीय हे प्रेमविवाह असतात पण माझ्या बाबतीत फार वेगळंच घडलं. या विवाहाला वैचारिक विवाहच म्हणावं लागेल. गंमत अशी की, माझ्या विवाहाचं स्वागत अनेक राजकीय मंडळींनी तर केलंच शिवाय ज्या परिसरात मी वाढले त्या परिसरातल्या मंडळींनीही माझ्या विवाहाला भक्कम पाठिंबा दिला.

ग्रामीण भागात मनाजोगता जोडीदार निवडला की ‘मुलगी पळून गेली, नाक कापलं’ अशा शब्दांत अवहेलना केली जाते… पण माझ्याबद्दल असं ऐकिवात आलं नाही. उलट माझ्या गावातले लोक म्हणायचे, ‘मुलीनं योग्य निर्णय घेतला. ती इतकं छान भाषण देते, लेखन करते आणि तिला बंधनात बांधायचं हे योग्य नाही. उलट तू हे केलंस ते बरंच…’ असं म्हणायला लागले. याचा चांगला परिणाम माझ्या कुटुंबीयांवर झाला.

कुठूनच तीव्र विरोध न होण्याचं आणखी एक कारण असावं. कदाचित तोवरच्या आयुष्यातही आम्ही दोघांनी सामाजिक चळवळीत झोकून देऊन काम केलं होतं. लग्न झाल्यानंतरही माझं सामाजिक कार्य सतत चालू ठेवलं होतं त्यामुळं आमचा एक वरचश्मा तयार झाला. तुम्ही स्वतःला सिद्ध केलं की मग कुणीही तुम्हाला काहीही बोलण्याचा अधिकार राहत नाही. आमच्याबाबत तसं झालं होतं.

आंतरधर्मीय विवाह केला म्हणून आमचा तर सन्मान-सत्कार करण्यात आला, तेही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात. हा कार्यक्रम देशव्यापी असतो. आठवडाभर महिला-युवा मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम असा होतो. त्यात आमचा सन्मान ही मोठी बाब होती. इतकंच नव्हे तर राजीवच्या आजोबांनीही आमचा जाहीर सत्कार केला होता.

प्रश्न – सुरुवातीला सासरमाहेरचे लोक सोबत नव्हते, पहिलं बाळांतपण कुठं केलं मग?

हसीना – रोझाच्या जन्माची कहाणी आहे. तुम्ही चांगले असाल तर तुमच्या पाठीशी लोक उभे राहतात. कुठूनही तुम्हाला मदत मिळतेच. तसंच झालं. मी त्या काळी स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये लेखन करायचे. चालू घटना-घडामोडी, राजकीय-सामाजिक विषयांवरचं हे लेखन वाचून अनेक वाचक पत्र लिहायचे. त्यांतलेच एक होते डॉ.गोगटे म्हणून. वयोवृद्ध आणि थकलेले होते. पूर्वी आत्तासारखे मोबाईल नव्हते. घरचा पत्ता असायचा. तेव्हा लोक पोस्टकार्ड पाठवायचे. गोगटेसुद्धा भेटायला ये असं पत्रातून कायम म्हणायचे. एकदा मी आणि राजीव एकदा त्यांना भेटायला गेलो तेव्हा अगदीच गर्भारपणाचे सुरुवातीचे दिवस होते. लेखणीला किंमत बघा किती असते. इतके मोठे डॉक्टर पण माझ्यासारख्या नवख्या मुलीला प्रोत्साहन देत होते. त्यांच्या पत्नीही अतिशय प्रेमळ होत्या. डॉक्टर थकल्यानं त्यांची मुलगी हॉस्पिटल सांभाळत होती.

डॉ.गोगटेंनी त्यांची लेक वसुधा गोगटे-गुजर हिला माझ्या बाळंतपणाची जबाबदारी दिली. दीदींनी खूप मदत केली. बाळंतपणानंतर पूर्ण पैसे एकदम भरू शकत नव्हतो. त्या बाबतीतही त्यांनी काही आढेवेढे घेतले नाहीत. उलट बाळंतपणात डबा वेळेवर आला नाही तर गोगटे आजींकडून डबा यायचा, चहा-नाश्ता यायचा. ज्या दिवशी डिस्चार्ज मिळाला त्या दिवशी वसुधादीदींच्या आईनं बोलावून घेतलं. भरपूर खाऊ आणि हातानं शिवलेले डझनभर झबले-लंगोट दिले. नातं ना गोतं पण लोक मायेनं जीव लावतात.

राजीवजर्मन पत्रकार रोझा लुक्झेमबर्ग हिच्या नावावरून रोझा हे नाव ठेवलं. माझ्या आईला ते पसंत नव्हतं. तिला ते मुस्लीम नाव वाटत होतं आणि ते हसीनानं सांगितलं असेल असं तिला वाटत होतं, पण मीच ठेवलंय म्हटल्यावर ती काय म्हणणार होती.

हसीना – बाळांतपणानंतर घरच्या जबाबदारीत राजीवनं खूप साथ दिली. घरचं आवरून ते ऑफिसला जायचे. शेजारीणही काहीबाही मदत करायची. त्यानंतर मग आम्ही वर्ध्याला गेलो. रोझा झाल्यावर पूर्ण वेळ नोकरी नव्हती पण समाजकार्य आणि दैनिकांतून लेखन सुरूच होतं. पाच वर्षांनी क्षितिजाचा जन्म झाला. 1998 मध्ये वर्ध्यातच यशवंत सोसायटीच्या शाळेत नोकरी लागली.

प्रश्न – राग निवळल्यावर येणंजाणं सुरू झालं…

हसीना – वर्ष-दीड वर्षानंतर हळूहळू सगळं नॉर्मल व्हायला लागलं. सासूसासरे आमच्या घरी यायला लागले. दीरही यायला लागले. पुढं दीरांची शिक्षणं आणि लग्नं तर आम्हीच केली. माझ्या घरून आधी माझी बहीण यायला लागली, कालांतरानं भाऊही. पुढं-पुढं तर माझ्या सासूचं आणि बहिणीचं खूप जमायला लागलं. आजही माझा एक दीर आमच्यासोबतच राहतो. घरात सतत सासरमाहेरची माणसं येतात. तेही लोक एकमेकांसोबत आनंदानं राहतात.

सासूबाईंना देव्हारा हवा होता. त्यांच्यासाठी आम्ही देव्हारा करून दिला. महिना-महिना त्या आमच्याकडे राहतात. आम्ही चळवळीतले असल्यामुळं कार्यकर्तेही मुक्कामाला असायचेच, अजूनही असतात. दीर सोबतीला आल्यानंतर माझ्या दोन्ही मुलींना घरी सोडून मला माझी शिक्षिकेची नोकरी करणं सोपं गेलं. सुरुवातीला विभक्त कुटुंब होतं. पुढं कायमच माणसांनी भरलेलं एकत्र कुटुंब झालं. आजही सगळे जण गुण्यागोविंदानं राहू शकतात याचा प्रत्यय त्यांचाच त्यांना आला.

आता तर अशी स्थिती आहे की, माझ्या माहेरी तर मला विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेत नाहीत. बहीण-भावंडांच्या लग्नातही त्यांच्या डोक्यातून कट्टर विचार काढण्यात यशस्वी झाले. चांगल्या विचारांची कुटुंबं शोधून भावंडांची लग्न लावली. त्या वेळेसही माझ्या आंतरधर्मीय विवाहाचा कुठलाही अडसर कुणालाही जाणवला नाही.

प्रश्न – मुलींना कुठलं धर्मशिक्षण दिलंत?

हसीना – त्यांना आम्ही माणूसकीचं शिक्षण दिलंय. निधर्मी विचार दिले. आनंदी जगण्यावर भर द्या हेच सूत्र सांगितलं. मानवतेचा धर्म जपता यावा असं उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. आज रोझा एमबीबीएस आणि एमडी झाली आहे. ती दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. क्षितिजा बीएएमएस करते आहे.

मुलींनी कायमच घरातला गोतावळा खूप एन्जॉय केलाय. सणवार साजरे करतानाही तीच मजा. ईदच्या वेळी घरी शिरखुर्मा करतो आणि सगळे जण त्याच दिवशी माहेरी जातो. तिथं दिवस आनंदात घालवतो. दिवाळीच्या वेळेस माझे माहेरचे आणि सासरचे असे दोन्हीकडचे आमच्या घरी येतात. भरपूर पदार्थ करणं, खाणं, हसणं-खिदळणं यांतच आम्हाला आमचा सण दिसतो.

कुठलाही सण परंपरागत म्हणून करू नये पण घरात उगीच आपण अमकं मानत नाही तमकं मानत नाही म्हणून उदास वातावरण करायला आवडत नाही. शेजारीपाजारी उत्साहानं करतात मग आपण खाद्यपदार्थांसाठी, आपल्यातलाच उत्साह टिकवण्यासाठी तरी सण साजरे करावेत असं मनापासून वाटतं.

प्रश्न – मुलींच्या लग्नाबाबत चिंता वाटते?

हसीना – आत्तापर्यंत मुलींच्या भवितव्याबाबत कुठलीच काळजी, चिंता वाटत नव्हती. आता मात्र थोडी तरी नक्कीच वाटते. आमचा आंतरधर्मीय विवाह आहे म्हणून आमच्या मुलींच्या लग्नात अडचण येईल अशी भीती नाही. आम्ही जात-धर्म-पंथ असं काहीच मानत नसल्यानं आम्हाला या दृष्टीनं कुठलाच प्रॉब्लेम नाहीये… मात्र मुलीला योग्य जोडीदार मिळावा, तो तिला समजून घेणारा असावा ही अपेक्षा आहेच. दोघं एकमेकांसोबत आनंदी असले म्हणजे पुरे. वयात आल्यानंतर मुलांच्या लग्नासाठी प्रत्येक पालक काळजीत असतात. आम्हीही त्याला अपवाद नाही पण याकडे आम्ही समस्या म्हणूनही पाहत नाही.

प्रश्न – तुम्ही ग्रामीण भागात राहता तर तिथंल्या माणसांकडून तुमच्या आंतरधर्मीय सहजीवनाला कसा प्रतिसाद मिळाला?

हसीना कुठल्याही प्रकारचा वाईट अनुभव आला नाही. शेजारीपाजारी  सहकार्याने आणि खूप प्रेमानेच वागतात. शिकल्यासारवल्या लोकांकडून काहीवेळा अनपेक्षित प्रतिसाद मिळतो. उलट त्यांचे विचार मागास वाटतात. आश्चर्य वाटेल पण कम्युनिस्टांमध्येही जातीयवाद असतो असा बऱ्याचदा अनुभव आला. आणि म्हणूनच 2017नंतर मी पक्षाच्या कार्यातून बाहेर पडले. आणि स्वतंत्रपणे सामाजिक काम करू लगले.

प्रश्न – अच्छा! हसीना मॅम तुम्ही नाव बदलले आहे का?

हसीना नोकरीच्या जागेची गरज म्हणून मला नाव बदलावे लागले. राजीव किंवा सासरच्या कुणीही त्याबाबत कुणीही जबरदस्ती केली नाही. मात्र नोकरीच्या ठिकाणी नाव, धर्म यावरून खूप त्रास दिला जाऊ लागला. नोकरीची गरज होती. बुरसटलेल्या विचारसरणीच्या मंडळीना समजावणे अवघड होऊ लागले तेव्हा नाईलाजाने नावात बदल करून सीमा गोरडे करावं लागलं.

प्रश्न – तुम्ही अगदी ठरवून आंतरधर्मीय विवाह केलाय. तेव्हा तुम्हाला अशा तऱ्हेच्या विवाहांचं काय महत्त्व वाटतं?

हसीना पूर्वीपेक्षा आता जातीयवाद वाढला आहे असं वाटतं. लोक समोरासमोर जहर ओकतात. दोन समाजांत विभाजन व्हावं, राजकारण करावं असं चित्र देशात आहे. जातीजातींमधलं अंतर कमी होणं गरजेचं आहे. अशा स्थितीत समाजाचा समतोल राखण्यासाठी आंतरधर्मीय विवाह ही फार मोलाची गोष्ट वाटते. केवळ प्रेमविवाहच नव्हे तर ठरवून लोकांनी असे विवाह करायला हवेत. चांगली व्यक्ती, आपल्या मुलांचा आनंद महत्त्वाचा मानून ॲरेंज मॅरेज पद्धतीनंही असे विवाह व्हायला हवेत. धर्मापेक्षा आनंद महत्त्वाचा. समाजामध्ये प्रेम आणि सद्भावना पेरण्याची जबाबदारी आजच्या युवा पिढीवर सोपवायची असेल तर त्यांना धर्मजातीच्या आंधळ्या संकल्पनांतून बाहेर काढायला हवं. त्यासाठी असे विवाह एकोपा आणण्याचं काम करतील.

राजीवआंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह करणं सोपं आहे. पुढं ते निभावणं अवघड आहे. तुमच्याकडे विचार असेल आचार-विचारांची देवाणघेवाण असेल तर असे विवाह होणं आणि टिकणं काहीच अवघड नाही. आता आमच्या लग्नात काका-मामा-नातेवाईक असं कोणीही नव्हते मात्र विचार होता. आम्हीदेखील काही जणांची लग्न लावून दिली आहेत. आमच्याकडे कोणी मदत मागितली कि आम्ही आमचे जुने दिवस आठवून आम्ही तत्काळ सहकार्य करतो. आनंद वाटतो मग.

प्रश्न – आणि तुमच्या 29 वर्षांच्या दीर्घ सहजीवनाचं यश तुम्हाला कशात दिसतं?

राजीव मला तर जिंकल्याचा आनंद होतो. अनेकदा प्रोग्रेसिव्ह विचारांचे लोकही बाता मारत राहतात. कृती करायची वेळ आली की कच खातात. शेवटी आपली लढाई आपल्यालाच लढावी लागते. कोणतीही गोष्ट करणं फार सोपं असतं मात्र तिचा निपटारा करणं अवघड. ते आम्हाला जमलं म्हणून आम्ही आनंदी राहू शकलो असं वाटतं.

चांगल्या मार्गाने जगण्यासाठी उतमात करावा लागत नाही. साधेपणानं जगावं लागतं. आम्ही दोघेही मध्यमवर्गातून येत होतो. त्यामुळं पुढं एकटे पडलो तेव्हा जगण्याच्या ज्या खाचाखोचा अनुभवताना जास्त जवळ आलो. एकमेकांची साथ देताना स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण राहिलो. चळवळीतून काय मिळतं तर भरपूर बौद्धिक खाद्य. आणि हे बौद्धिक खाद्यच जगण्याचा सुकर मार्ग दाखवत राहतो. जगण्याचं बळ देतं. नकारात्मक प्रसंग आले तरी तुमच्याकडे वैचारिक दृष्टीकोन असेल तर तुम्ही खचून जात नाहीत. जोमाने लढता. आणि याच आमच्यातल्या  कॉमन गोष्टी होत्या. ज्यामुळं  आमचा बंध दृढ झाला.

हसीना चांगला जोडीदार मिळणं हे आमच्या दीर्घ सहजीवनाचं यश तर आहेच शिवाय त्याचबरोबर योग्य वेळी घेतलेल्या निर्णयावर ठाम राहणंही आहे. राजीवच्या प्रस्तावानंतर किंवा कालांतरानंही मी जर लग्नाच्या निर्णयावर कायम राहिले नसते तर आयुष्यभराच्या सुखी सहजीवनालाच गमावून बसले असते… त्यामुळं तेव्हा आम्ही समजून-उमजून घेतलेला निर्णयही तितकाच महत्त्वाचा वाटतो. आपलं मन आपल्याला योग्य दिशा देत असतं. आपल्याला ते शांतपणे ऐकता आलं पाहिजे आणि त्यावर निर्भयपणे चालून पाहता आलं पाहिजे. हे जमलं की सुख आहेच वाटेत… आपली वाट पाहत उभं!

[email protected]

(ही मुलाखत ‘कर्तव्य साधना’ च्या https://kartavyasadhana.in/ या वेब पोर्टलवरून घेतला आहे .अनेक विषयांवरील उत्तमोत्तम लेख/मुलाखती वाचण्यासाठी या पोर्टलला नियमित भेट द्यायला विसरू नका.)

…………………………………

‘धर्मरेषा ओलांडताना’ या सदरातील इतर आंतरधर्मीय विवाहित जोडप्यांच्या मुलाखतीही नक्की  वाचा—

१. समीना-प्रशांत: विवेकी जोडीदाराची निवड म्हणजे सुंदर सहजीवनाकडं वाटचाल-https://bit.ly/3sACons

२. धर्मारेषा ओलांडताना-श्रुती पानसे आणि इब्राहीम खाhttps://bit.ly/30HHulP

३. प्रज्ञा केळकर – बलविंदर सिंग: सहजीवनात कुटुंबाची सोबत अधिक अर्थपूर्ण! https://bit.ly/2PdAUkU

४. अरुणा तिवारी-अन्वर राजन: सहजीवनाची भिस्त प्रेम, विश्‍वास आणि कमिटमेंटवर!https://bit.ly/3mBVFmF

5.  दिलशाद मुजावर आणि संजय मुंगळे:माणूस म्हणून वाढण्यासाठी धार्मिक भिंती तोडल्या पाहिजेतhttps://bit.ly/2RZ1izX

1 COMMENT

  1. छान !
    आमचा सुद्धा आंतरजाती धर्मीय विवाह आहे, आणी तोही अरेंज मॕरेज.
    मी विनायक कांडलकर – हिंदू माळी
    सहचारिणी ममता सोनोने – बौद्ध
    पहिली मुलगी – वॕलेंटीना ख्रिश्चन
    दुसरी मुलगी – अल् रिदा मरयम मुस्लिम
    विवाह – नोंदणी पद्धतीने २८ फेब्रुवारी १९९६ (राष्ट्रीय विज्ञान दिवस)
    नोकरी – शिल्प निदेशक, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था , अमरावती
    चळवळ – सत्यशोधक समाज
    सहचारिणी ममता – गृहिणी –
    राजकिय सहभाग – शेतकरी कामगार पक्ष, सत्यशोधक समाज
    २००९ च्या लोकसभा निवडणूकीत अमरावती मतदारसंघात उमेदवार
    २००९ मोर्शी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here