२६ मे ला सुपर फ्लॉवर मून

                                               

– प्रा. सुरेश चोपणे

    मागील महिन्यात विलोभनीय सुपरमून बघितल्यानंतर आता २६ मे रोजी पुन्हा सुपर फ्लॉवर मून पहावयास मिळणार आहे. या वर्षातील हे एकमेव खग्रास चंद्रग्रहण अमेरिका,ऑस्ट्रेलिया आणि पूर्व आशियातून सुपर ब्लड मून म्हणून  पहावयास मिळेल. २६ तारखेला दुपारी  चंद्रग्रहणाला सुरवात होत असल्याने  भारतातून मात्र चंद्रोदय होताना ३५ मिनिटांसाठी छायाकल्प चंद्रग्रहण दिसेल. २०२१ वर्षातील हा दुसरा सुपरमून असून या पौर्णिमेला  फ्लावर मून असे म्हणतात. या वेळेस चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर वर्षातील  सर्वाधिक कमी असल्याने  चंद्र १५ % मोठा आणि ३० % तेजस्वी दिसेल. यावेळी चंद्र आणि पृथ्वीतील अंतर वर्षातील सर्वाधिक कमी म्हणजे ३,५७,३११ किमी असेल.

       प्रत्येक वर्षी  सुपरमूनच्यावेळेस चंद्र-पृथ्वी मधील अंतर कमी अधिक होत असते. हे कमीतकमी अंतर ३,५६,५००  किमी तर दूरचे अंतर ४,०६,७०० किमी असते .या वर्षीचे पृथ्वी व चंद्रातील सर्वाधिक कमी अंतर २६ मे २०२१ रोजी होणाऱ्या सुपरमूनच्या वेळी असणार आहे. २६ जानेवारी १८४८ रोजी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ आला होता,त्यानंतर नोव्हेबर  २०१६ ला चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ आला होता.  पृथ्वी आणि चंद्रातील सर्वाधिक कमी अंतर हे २५ नोव्हेंबर २०३५ रोजी असेल.  ६ डिसेंबर २०५२ रोजी शतकातील सर्वात मोठे सुपरमून दिसणार आहे.

       चंद्र जेव्हा जवळ येतो तेव्हा चंद्राच्या गुरुत्वाकर्षाणामुळे समुद्राला मोठी भरती येते .पृथ्वीवर सजीवांची निर्मिती होण्यासाठी भरती-ओहोटीचे खूप महत्व आहे.परंतु आपल्या सोबत सतत राहणारा,प्रेमाचे प्रतिक आणि धार्मिक महत्वाचा हा चंदामामा  हळूहळू पृथ्वीपासून दरवर्षी २ इंचाने  दूर जात आहे. भविष्यात हजारो वर्षाने चंद्र खूप दूर जाईल आणि पृथ्वीवर ग्रहणे होणार नाहीत. भरतीचे चक्र राहणार नाही. चंद्र स्वत: भोवती आणि पृथ्वीभोवती २७.३ दिवसात प्रदक्षिणा करतो मात्र चंद्राच्या लंबवर्तुळाकार प्रदक्षिणेमुळे पौर्णिमा ते पौर्णिमा हा महिना २९.५  दिवसाचा असतो. पाश्चात्यांनी या पौर्णिमेला नैसर्गिक कारणामुळे  फ्लॉवर मून म्हणून संबोधले आहे .

 या वर्षातील सर्वात मोठा चंद्र

   २६ मे रोजी होणारी पौर्णिमा ही सुपरमून असली तरी याच दिवशी  अमेरिका,ऑस्ट्रेलिया आणि पूर्व आशियातून ह्या वर्षीचे एकमेव खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. पौर्णिमेचा चंद्र ग्रहणात लाल दिसतो म्हणून या पौर्णिमेला सुपर-ब्लड मून असे म्हणतात. भारत्ताच्या  अनेक राज्यातून हे चन्द्रोदयावेळी छायाकल्प चंद्रग्रहण दिसणार असले तरी पूर्वोत्तर भारतात आसाम आणि मणिपूर येथून खंडग्रास ग्रहण दिसेल. दुपारी  २.१८ वाजता ग्रहणाला सुरवात झालेली असेल, आपल्याकडे  संध्याकाळी ७.२० वा ग्रहण सुटेल. त्यामुळे चंद्र रात्रभर तेजस्वी दिसेल.चंद्रग्रहणाच्या वेळेस  सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी सरळ रेषेत येते आणि पृथ्वीच्या छायेतून चंद्र जातो. गडद छायेतून गेल्यास खग्रास तर उपछायेतून गेल्यास छायाकल्प चंद्रग्रहण होते.

        महाराष्ट्रातून सूर्यास्तानंतर चंद्र पूर्वेकडून उगविताना छायाकल्प ग्रहणातच उगवेल. नंतर केवळ ३५ मिनिटाने ग्रहण सुटेल, म्हणजे ग्रहण केवळ ३५ मिनिटासाठीच पाहता  येईल. ७.२० नंतर ग्रहण राहणार नाही. मात्र रात्रभर सुंदर सुपरमून पाहाता येईल. चंद्र हा आकाराने खूप मोठा आणि तेजस्वी दिसेल. वसंत ऋतूतील ही  वैशाख पौर्णिमा असून  ती वृश्चिक  राशीत असेल. सुपरमून पाहण्यासाठी दुर्बिनीची आवश्यकता नाही परंतु दुर्बिणीला फिल्टर लावून त्यावरील विवर पाहू शकतो. द्विनेत्री असेल तर उत्तमच. यावेळेस चंद्र आकाराने मोठा आणि खूप तेजस्वी दिसणार असल्याने  या खगोलीय घटनेचा मनापासून आनंद घ्यावा .सध्या कोरोना संकट आणि संचारबंदी असल्याने आपण या मनोहारी आणि आनंदी घटनेचा घराच्या आवारातून  वा गच्चीतूनच आस्वाद घ्यावा.

(लेखक नामवंत खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष आहेत)

9822364473