वैचारिक क्षमतांवर आघात करणारे ‘फिल्टर बबल्स’

-नीलांबरी जोशी

Three of us आणि Animal सारख्या चित्रपटांवरुन सोशल मीडियावर उठलेल्या वादंगांमागे “फिल्टर बबल्स”चं तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात काम करतं आहे. काय आहे हे “फिल्टर बबल्स”?

जो माणूस इंटरनेट वापरत असतो त्याचं ठिकाण, तो कोणत्या गोष्टींवर क्लिक करुन त्या गोष्टी जास्तीत जास्त वेळा पहातो (उदाहरणार्थ, स्त्रिया दागिने आणि पुरुष मोटारगाड्या) आणि तो कोणकोणत्या गोष्टी सर्च करतो (उदा. शिवाजी महाराज, डोनाल्ड ट्रंप, गोवा, पॅरिस, मिसळ असं काहीही) अशा अनेक गोष्टींवरुन असंख्य वेबसाईटस माहिती गोळा करतात. त्यावर अल्गॉरिदम्स लिहितात. त्या पर्सनलाईज्ड सर्चवरुन त्या माणसापुरतं त्याचं वैयक्तिक विश्व वेबसाईटस तयार करतात. यानंतर इंटरनेट वापरणा-या प्रत्येकाला आपल्या आवडीनिवडी सोडून इतर गोष्टी/ दृष्टिकोन वेबसाईटसवर दिसणं बंदच होतं. यालाच एली पॅरिसर या लेखकानं “फिल्टर बबल” असं नाव दिलं आहे.

“तंत्रज्ञानाचं काम तुम्हाला जग दाखवणं हे आहे पण त्यासाठी तुम्ही आणि जग याच्या मध्ये तंत्रज्ञान येऊन बसतं. कॅमे-याच्या लेन्समधून जसं तुम्ही जग पहाता तसं मग या तंत्रज्ञानाच्या डोळ्यातून पहाता. मग तंत्रज्ञान जे दाखवेल ते तुम्हाला पहावं लागतं” असं स्टॅनफर्ड विद्यापीठातला लॉ या विषयाचा प्राध्यापक रायन कालो म्हणतो. माशाला जसं आपण पाण्यात आहोत हे लक्षात येत नाही तसं आपण फिल्टर बबलमध्ये आहोत हे आपल्याला कळत नाही.

नवीन संकल्पनांमधूनच सृजनशीलता जन्म घेते. पण त्यासाठी विविध विषय, सर्व दृष्टिकोन, विचारसरणी, असंख्य प्रकारची माहिती आणि निरनिराळ्या संस्कृती यांची ओळख आपल्यापर्यंत पोचायला हवी. पण “फिल्टर बबल” तेच मार्ग थांबवतो. वैयक्तिक पातळीवर पहायला गेलं तर वैचारिक क्षमतांवरच फिल्टर बबल्स आघात करतात. तर्कनिष्ठ विचार करणं किंवा समीक्षात्मक विश्लेषण करणं मेंदू बंद करतो. “आपल्याला हवं तेवढंच समोर आणून आणि ज्याला आपण घाबरतो ते दडवून” “फिल्टर बबल्स” जिथे वापरले आहेत त्या साईटस आपल्या विचारांना बंदिस्त करतात. हे पर्सनलायझेशन जितकं अचूक होत जाईल तर आपल्या समजुती, गृहीतकं, संकल्पना यांना हादरे देणारं असं आपल्यासमोर काही येणारच नाही. आपण एकसुरी विचार करुन रटाळ आयुष्य जगू. याला एलि पॅरिसर यानं “आॉटोप्रपोगंडा” असं नाव दिलं आहे.

“आपल्या कल्पनाशक्तीवर मर्यादा आणणं, आपल्याला ज्ञात गोष्टींचं आकर्षण वाढवणं आणि अज्ञात गोष्टींबद्दल आपल्याला अंधारात ठेवणं हे पर्सनलायझेशन फिल्टर्स करतात” असं तो म्हणतो.

“फिल्टर बबल्स”च्या वैयक्तिक परिणामांबरोबरच सामाजिक पातळीवरही परिणाम होत जातात. उदाहरणार्थ, “कन्फर्मेशन बायस” खूप वाढतो. आपल्या गृहीतकांवर, धारणांवर आधारित समोर जे येईल ते आपल्याला कन्फर्म करुन न घेता आवडतं हा प्रकार “कन्फर्मेशन बायस”. आपण जी सेलिब्रिटी, जो राजकीय नेता, राजकीय पक्ष आदर्श मानतो – त्याबद्दल सोशल मीडियावर काहीही दिसलं तरी डोळे मिटून आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. त्या पक्षाविरुध्द, नेत्याविरुध्द लिहिलेलं सगळं खरं आहे का खोटं याची शहानिशा न करता आपण त्याच्यावरही विश्वास ठेवतो. त्याच दृष्टिकोनांमधून लाईक्स, कॉमेंटस करतो. गुगल तुम्ही कोणत्या गोष्टींवर क्लिक करता ते साठवत जातं आणि तुम्हाला आवडत्या पोस्टस समोर येत जातात.

आपल्या आवडीच्या कल्पनांवरच आधारित असा जगाबद्दलचा दृष्टिकोन करुन घेणं हे आल्हाददायक असतं. सोपं असतं. आपल्याला नवनवीन विचारांना किंवा दृष्टिकोनांना सामोरं जावं लागेल अशा माहितीचा आपल्याला तिटकारा वाटत असतो. आपल्या गृहीतकांना हादरा देणारं काहीतरी समोर यावं असं कोणालाच वाटत नाही. आपल्या गृहीतकांना आव्हान देणा-या गोष्टींपेक्षा क्लिक करुन हवं ते वाचायला आपोआप कन्फर्मेशन मिळतं.आपल्या ओळखीच्या विश्वात आपण रमल्यानंतर शिकण्यासारखं काहीच उरत नाही.

जगाबद्दलचा दृष्टिकोन गढूळ करण्याचे अनेक मार्ग आहेत. तेच सगळे मार्ग हे “फिल्टर बबल्स” वापरतात. या “फिल्टर बबल्स”चे सामाजिक घातक परिणाम आता थेट दिसायला लागले आहेत.

(“माध्यमकल्लोळ” या पुस्तकातून)

(नीलांबरी जोशी ‘कार्पोरेट कल्लोळ’ , ‘झपूर्झा’, ‘जिथे मुलांना पंख फुटतात’ आदी गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका आहेत)

[email protected]

………………………………………………………………………………………….

नीलांबरी जोशी यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –नीलांबरी जोशी type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleसावित्रीमाई, तुझ्या लेकींना खरंखुरं आत्मभान मिळू दे!
Next articleताडोबातील वाघांचे ‘सत्तांतर’
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.