ताडोबातील वाघांचे ‘सत्तांतर’

-प्र.सु.हिरुरकर

झाडाझुडपातील सावलीत बसलेला वाघ जागेवरून उठला. अंग झटकले. शरीराला वाक दिला आणि तेथे पसरलेल्या वृक्षलतांच्या छायेतून, काड्याकाटक्यांतून हळुवार एक एक पाऊल सावधपणे टाकत पाणवठ्याकडे येऊ लागला. स्वारी जसजसी पाणवठ्याकडे येत होती, तसतसं त्याचं रूपडं स्पष्ट होऊ लागलं होतं. अखेर झाडाच्या दाट सावलीत असलेल्या पाणवठ्यावर हळुवार पावलांनी तो आला. पाणवठ्याच्या काठावर खाली बसून, समोरचे दोन पाय मानेजवळ पुढ्यात घेतले आणि जिभेने लपक् लपक् आवाज करीत पाणी पिऊ लागला. काय त्याचा रुबाब! अहाहा! हा होता ‘छोटा मटकासुर’! गेल्या जवळपास १५ वर्षापासून वाघडोह, गब्बर, बजरंग, मटकासुर आणि छोटा मटकासुर असे हे ताडोबातील वाघांचे ‘सत्तांतर’ ठरले आहे. अरण्यातील तृणवर्गीय प्राणी असो वा शिकारी प्राणी, सत्तांतर हा त्यांच्या जीवनातील आणि जंगलाच्या संतुलनाच्या आणि संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो.
…………………
शिशिराच्या भल्या पहाटे खडसंगीवरून 12 किलोमीटरवरच्या निमढेला प्रवेशद्वाराकडे निघालो. पूर्वेची काळीमा हलकीसी तांबड्या रंगाने भारली जात होती. थंड वारा अंगाला झोंबत होता. काही वेळातच प्रवेशद्वारावर पोहोचलो. सफारीसाठीचे सोपस्कार पार पाडले गेले. जिप्सी ताडोबा-अंधारीच्या निमढेला अरण्य क्षेत्रातील तांबड्या रानवाटेवरून धावू लागली. उघडीबोडखी साग वृक्षाची झाडे, तपकिरी-पिवळ्या छटांच्या पानांचे विशीर्ण रंग, एक प्रकारचा चमत्कारिक अस्ताव्यस्तपणा साऱ्या जंगलावर दिसून येत होता. एखादा विशाल वृक्ष जणू एखादा बैरागीच वाटू लागत होता. शुष्क पर्णगळीच्या वनात नदी-नाले-डोह-नैसर्गिक पाणवठ्याच्या परिसरात जांभूळ, आंबा, कडुनिंब, चिंच आणि वड मात्र आपल्या हिरव्या लसलसत्या पानाने मायावी माघाचे एक रूप साकारत होते. बऱ्याच ठिकाणी नैसर्गिक पाणवठे, छोटे मोठे जलाशय आणि बंधारे इ. ठिकाणं सांबर, चितळ वानरं इ. वन्यजीवांसाठी जीवनदान देण्याचे कार्य करताना दिसत होते.

जवळपास तीन तास अरण्य भटकंती सुरू होती. जंगलच्या राजाचा मात्र कुठेही सुगावा लागत नव्हता. तलाव, नदीकाठचे डोह आणि सारे नैसर्गिक पाणवठे पाहणे झाले होते. तांबड्या रानवाटेवरच्या उडणाऱ्या मातीच्या धुराळ्यामुळे अंगावरील कपडे भुरकटले होते. राहिलेला वेळ एखाद्या पाणवठ्याजवळ घालावावा, असे ठरले. सूर्य हातभर वर आला होता. उन्हे रखरखायला लागली होती. अखेर उमरी खोरा भागातील एका पाणवठ्यावर जिप्सी पोहचली. चार जिप्सी अगोदरच तेथे उभ्या होत्या. पाणवठा असावा जेमतेम 125 फुटांवर. पाणवठ्याच्या काठावर हिरव्या – बोडख्या वृक्षलतांचा दाट पसारा पसरला होता. भर दिवसा झाडंझुडपांमुळे पाणवठ्याच्या परिसरात सावली दाटली होती. सर्वांच्या नजरा पाणवठ्याच्या पलीकडच्या एका ठिकाणी झाडाच्या सावलीत काही तरी शोधत होत्या. बारीक हालचाली तेथे होत होत्या. अखेर वन्यजीव अभ्यासक तथा उत्कृष्ट छायाचित्रकार अभिमन्यूने कसरतीने आपल्या मोठ्या कॅमेराची झूम वाढवून शोध घेतला आणि काय आश्चर्य! कॅमेराच्या स्क्रीनवर झूम करून पाहता वाघाच्या शेपटीचा एक भाग त्यात आढळला. परत एकदा क्लीक करून पाहिले, तर वाघाच्या पायाचा एक भाग दिसला. मीही डोळे फाडून पाहिले, तर कधी हालचालीने अंगावरील काळे पट्टे मागे पुढे होत होते. एक पक्के झाले होते, ते म्हणजे व्याघ्रराज त्या झुडपात आराम करत बसले होते. आता उत्सुकता होती ते कधी उठतात याची. शेवटी जंगलाचा राजा तो!

बराच वेळ झाला होता. जंगलाच्या राजाचे कधी एकदाचे पूर्ण दर्शन होते, यासाठी जीव कासावीस होत होता. ताटकळत शांत बसणे, हाच त्यावर एकमेव उपाय होता. डोळे आणि कान पुढ्यातील हालचालीवर बारीकपणे नजर ठेवून होते. काही वेळ गेला आणि काय आश्चर्य! अखेर तो क्षण आला. झाडाझुडपातील सावलीत बसलेला वाघ जागेवरून उठला. अंग झटकले. शरीराला वाक दिला आणि झाडंझुडपं, काड्या-काटक्यांतून हळुवार एक एक पाऊल सावधपणे टाकत पाणवठ्याकडे येऊ लागला. स्वारी जसजशी पाणवठ्याकडे येत होती, तसतसं त्याचं रूपडं स्पष्ट होऊ लागलं होतं. अखेर वाघ झाडाच्या दाट सावलीतून पाणवठ्याजवळ आला. पाणवठ्याच्या काठावर खाली बसून समोरचे दोन पाय मानेजवळ पुढ्यात घेतले आणि जिभेने लपक् लपक् आवाज करीत पाणवठ्यातील पाणी पिऊ लागला. काय त्याचा रुबाब! अहाहा…! आपल्या वडिलांनंतर त्याने स्वत:चे साम्राज्य निर्माण केले होते. सत्तांतर झाले होते. हा होता छोटा मटकासुर.

काय ते राजबिंडं शरीर. पिवळसर-तांबड्या रंगावरील काळ्या रंगाचे धनुष्यासारखे लहान मोठे पट्टे. नाकाजवळ्या पांढऱ्या मिशा, भेदक डोळे, चेहऱ्याचा रुबाब शाही. जसजसा तो पाणी पीत होता, जिप्सीतील मोठमोठ्या कॅमेरांचे खटखटणे शिगेला पोहचले होते. जणूकाही स्टेनगनमधून बुलेट बाहेर पडत आहेत, असा तो बारीक हलकासा आवाज होत होता. छोट्या मटकासुराला मात्र आमचे काही घेणे देणे नव्हते. शेवटी जंगलाचा राजाच तो. वाघाचे पाण्यावर जिभल्या चाटत मनसोक्त पाणी पिणे सुरू होते. अखेर राजाची तहान मिटली असावी. छोटा मटकासुर उभा झाला. हळूहळू उजवीकडच्या झुडपातून आम्ही असलेल्या मुख्य रानवाटेवर येऊ लागला. मग काय गाड्यांची मागे-पुढे, इकडे तिकडे फिरवण्याची खटपट सुरू झाली. कारण, प्रत्येकाला वाघ रानवाटेवर पोहचेपर्यंत आपली गाडी सर्वात पुढे वाघाच्या सर्वात जवळ कशी जाईल, याची अहमहमिका लागली होती. अखेर छोटा मटकासुर रानवाटेवर पोहचला आणि शाही चालेने चालू लागला. काही गाड्या पुढे काही मागे आणि मध्ये व्याघ्रराज चालू लागले.

उन्हेही वाढू लागले होती. अंगाला त्याचे चटके बसत होते. तांबड्या रानवाटेवरून छोटा मटकासुर आपल्या शाही थाटात चालत होता. चालता चालता काही अंतरावर, रानवाटेच्या काठावरच्या झाडाच्या खोडांवर तो मूत्रशिंपण करत होता. स्वतःच्या साम्राज्याच्या अधिवासाची ती आखणी होती. वाघ-वाघीण ज्या क्षेत्रात असतात, तेव्हा हा प्रकार करत असतात. व्याघ्रदर्शनाचा जंगलातील ‘रोड शो’ सुरू होता. याला अलीकडची पिढी टायगर हेड ऑन म्हणतात. मागे पुढे जवळपास 13 जिप्सी होत्या. पुढच्या जिप्सीमधील पर्यटकांना तो जवळून पाहता यावा, म्हणून अनेकदा मटकासुरचे आणि जिप्सीचे अंतर अत्यंत कमी कमी होत होते. अनेकदा अगदी दहा-बारा फूट एवढेच अंतर शिल्लक राहत होते. अर्थात, हे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत चुकीचे होते. किमान तीस फुटाचा नियम असताना चालकाची ही वर्तणूक चुकीची वाटत होती. कारण, मी ज्या जिप्सीत होतो, तिचे अंतरही चार-पाच वेळा जास्तीत जास्त दहा फूट एवढेच राहत होते. त्यात मी गाडीच्या मागच्या सीटवर असल्याने मटकासुर छोटाची आणि माझी अनेकदा नजरानजर होत होती. त्यावेळी मनात धस्स होत होते. कित्येक वेळा वाघ माझ्या गाडीच्या इतक्या जवळ पोहचत होता की, कॅमेराच्या फ्रेममध्येही तो बसत नव्हता. त्यामुळे मी त्याला नुसते डोळे भरून पाहून घेत होतो. त्यामुळे वाघाबाबतचे माझ्यातील भय कमी झाले. त्याच्याविषयी एक दरारायुक्त आदर वाटत होता. प्रेम, जिव्हाळा वाटत होता. काही जिप्सीतील पर्यटकांनाही हा अनुभव येत होता. वाघाचे शाही चालणे आणि गाड्यांचे मागे-पुढे होणे, हा प्रकार बराच वेळ सुरू होता. पर्यटकांच्या आवाजाच्या गोंधळामुळे काही चुकीचे घडू नये, असे मला वाटत होते. अलीकडे हा प्रकार ताडोबात सर्वत्र सुरू आहे.

वाघाला कॅमेरात टिपण्याची आपापली कसरतही वेगात सुरू होती. पाणवठ्यापासून जवळपास एक सव्वा किलोमीटरपर्यंत छोटा मटकासुर पायी चालल्याने आणि डोक्यावरचे उन्हही वाढल्याने तो थकला असावा. अखेर, रानवाटेवरच एका ठिकाणी झाडाच्या सावलीत तो पाय पुढे करून बसला. एक मोठी जांभई दिली, त्यावेळी त्याच्या मुखातील अख्खं गुलाबी ब्रह्मांड दिसून आलं. यावेळी त्याच्या बाहेर आलेल्या जिभेतून लाळेचे थेंबही पडत होते. सकाळच्या सफारीचा वेळ जवळपास पूर्ण होत आला असावा. गाईडने तशी सूचनाही केली. परंतु, छोट्या मटकासुराहून नजर काही केल्या हटत नव्हती. अखेर तेथून निरोप घेण्याचे ठरले.

छोटा मटकासुर हा तरुणाईत आल्यापासून तृणवर्गीय वन्यप्राण्यांच्या शिकारी फार कमी करतो. कारण, त्याला जास्त परिश्रम लागतात. त्यामुळे या भागात नेहमी गुरा-ढोरांच्या शिकारीसाठी येत असल्याचेही गाईडने सांगितले. बाजूलाच एक गाव असून तेथे गुरंढोरंसुद्धा आहेत. हळूहळू एक एक गाडी निघू लागली. एक शेवटची जिप्सी मागे असताना आमची जिप्सीही परतीवर निघाली. पुढे जवळपास 50-60 मीटर अंतरावर एक वयाने वृद्ध व्यक्ती वाघाकडे रानवाटेवरून चालली होती. आम्हाला धस्स झालं. समोर रानवाटेवर वाघ बसला असल्याचं त्याला सांगितलं. त्याला गाडीत बसण्याची विनंती केली. पांढरे धोतर, पांढरी दाढी, डोक्यावर फेटा आणि खांद्यावर कुऱ्हाड घेतलेल्या त्या व्यक्तीने आम्हाला नकार दिला व चालू लागला. अखेर, शेवटच्या जिप्सी चालकाने जबरदस्तीने त्या व्यक्तीस गाडीत घेतले. पलीकडे जवळपास दोन-किलोमीटरवर जंगलात रामदेगी हे शंकराचे मंदिर असल्याने, तो नेहमी या भागातून दर्शनासाठी जात असतो, असे कळले. त्यात एक दिवस आधी महाशिवरात्र झाल्याने तेथे भक्तांची वर्दळ आज दुसऱ्या दिवशी आम्हालाही दिसली होती. परंतु, आमच्या सोबत मागे असलेली जिप्सी जर निघून आली असती, तर नक्कीच गंभीर प्रकार झाला असता. कदाचित त्या व्यक्तीवर छोटा मटकासुरने हल्ला सुद्धा केला असता. कारण, वाघ ज्या रानवाटेवर झाडाच्या सावलीत बसला होता, त्यापासून हे अंतर केवळ चार-पाच मिनिटांचेच होते. सकाळची सफारी आटोपून आम्ही मुक्कामी पोहचलो. तोच निरोप मिळाला, छोटा मटकासुरने नाल्यात गाईची शिकार केली. दुपारच्या व्याघ्र सफारीत आम्ही त्याला नाल्यात शिकारीजवळ बसल्याचे प्रत्यक्ष पाहिले.

मोठा मटकासुर हा छोटा मटकासुराचा बाप आहे. याच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित वनात तो राहतो. आपल्या जीवनाच्या अखेरच्या चरणात आज तो जीवन जगत आहे. छोटी तारा ही छोटा मटकासुराची आई असल्याचे कळले. छोटी ताराची आई प्रसिद्ध माया वाघीण आहे. छोटा मटकासुर हा आज जवळपास आठ वर्षांचा असून, गेल्या तीन वर्षांपासून त्याचे या वनक्षेत्रात साम्राज्य आहे. त्याने येथे यापूर्वी असलेल्या मोगली नावाच्या वाघाशी युद्ध करून, जिंकून आपले साम्राज्य निर्माण केले असल्याचेही कळले. एक महत्त्वाची बाब म्हणजे, छोटा मटकासुर हा जास्तीत जास्त गाय, बैल, वासरं यांचीच शिकार करतो. यांच्या शिकारीमुळे त्याची फारशी ऊर्जा खर्ची पडत नाही; आणि सततच्या अशा शिकारींमुळे त्याचे शरीरही थोडेफार विशिष्ट आकाराचे झाले असावे. या वाघाला छोटा मटकासुर असेही म्हणतात.

माझे मित्र, वन्यजीव अभ्यासक तसेच व्याघ्र सफारीचे शतक पार केलेले श्री. सुरेश खांडेकर यांनी याच छोटा मटकासुराबद्दल स्वत: डोळ्याने पाहिलेली, जवळपास सहा वर्षांपूर्वीची घटना सांगितली. त्यावेळी हा लहान मटकासुर अंदाजे दोन-अडीच वर्षांचा असावा. एका पायाने तो जखमी झाला होता. त्यामुळे लंगडत लंगडत तो चालत असे. जखमी अवस्थेमुळे त्याला शिकारही करता येत नव्हती. त्याची उपासमार होत होती. प्रकृतीही कमी जास्त वाटत होती. पिता मोठ्या मटकासुराच्या ही बाब लक्षात आली असावी. त्या दिवशी त्याच्या वडिलांनी, म्हणजेच मोठ्या मटकासुराने शिकार केली. दूरवर असलेल्या आपल्या जखमी पुत्राजवळ, लहान मटकासुराजवळ आला. त्याला सोबत घेऊन त्या शिकारीजवळ घेऊन गेला. त्याला पोटभर शिकार खाऊ घातली. याला म्हणतात जेनेटिक रिलेशन. आज याच छोटा मटकासुराने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या निमढेला अरण्यक्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. आम्हीही आज सकाळी सफारीच्या अखेरच्या क्षणी रानवाटेवर झाडाच्या सावलीत बसलेल्या छोटा मटकासुराचा निरोप घेतला. दूर दूर जाईपर्यंत नजर त्यावऊन हटत नव्हती. वाघाबद्दलचा हा आदर, हे प्रेमच वन्यजीव संरक्षण व संवर्धनात हातभार लावण्यास निश्चितच मोलाचे ठरू शकेल, यात तिळमात्र शंका नाही.

रानावनातील सत्तांतर, हा वन्यजीवांच्या जीवनातील अविभाज्य भाग असतो. रानगव्यांच्या कळपातील नायक असो, नीलगाईंच्या कळपातील नायक असो, रानकुत्र्यांच्या कळपातील नायक असो, वानरांच्या कळपातील नायक असो वा वाघाच्या नायकत्वाचे सत्तांतर असो, हे चक्र हजारो वर्षांपासून चालत आले आहे आणि असेच चालत राहणार आहे. ताडोबात वाघाच्या सत्तांतराबाबत दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पहिला म्हणजे प्रसिद्ध माया वाघिणीला पहिल्यांदा पिल्लं गब्बरमुळे झाली. त्यानंतर नवेगाव नावाच्या वाघासोबत तिचे सूत जुळले व दुसऱ्यांदा पिल्लं झाली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील उदा, म्हणजे छोटा मटकासुरचा पिता, मोठा मटकासुरने एके काळी सॅटर्न, टायसन, गब्बर इ. वाघांशी युद्ध करून माया वाघिणीशी संगत केली. मोठा मटकासुर हा एकेकाळी उत्तर ताडोबातील अनभिषिक्त सम्राट होता. त्याच्या माया व तारा दोन माद्या होत्या. तारापासून ताराचंद व छोटा मटकासुर हे दोन पिल्लं 2016 मध्ये झाली. ताराचंदचा दोन वर्षाचा असताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. मग छोटा मटकासुर हा एकटा राहिला. त्याचे पालनपोषण कऊन छोटा मटकासुर वाढला. मात्र, तरुण वयात छोटा मटकासुरला रुद्र, बजरंग व रावीसमोर दोन हात करून हार पत्करावी लागली होती. त्यामुळे त्याने गावांकडे आपला मोर्चा वळवून, गुरा-ढोरांची शिकार करून वाढू लागला. हळूहळू छोटा मटकाने अलीझंजाकडे आपली पावलं वळविली. रामदेगी येथील शिवमंदिराच्या परिसरात त्याने मोगली वाघाशी युद्ध करून स्वत:चे वर्चस्व सिद्ध केले. या परिसरात तो आठवड्यातून दोन-तीन वेळा चक्कर मारतोच. येथे बारमाही जिवंत असलेले पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत. यानंतर याच भागात छोटा मटकाची बबली, झरणी व भानुसखिंडी या तीन वाघिणींशी सलगी झाली व त्यापासून त्यांनाही पिल्लं झाली. झरणी वाघिणीला दोन, बबलीला तीन, तर भानुसखिंडी वाघिणीला चार पिल्लं असून, आज ती सर्व जवळपास दीड-दोन वर्षाची होत आहेत. उत्तरोत्तर आपले पिता मटकासुरच्या पावलावर पावलं टाकीत आज छोटा मटकासुराने उत्तर ताडोबा अरण्य क्षेत्रावर आपले साम्राज्य प्रस्थापित केले आहे. सत्तांतर घडवून आणले आहे.

प्र.सु.हिरुरकर

वाघांची ओळख त्याचा आकार, चेहऱ्यावरील खुणा, अंगावरील काळे पट्टे, अधिवास क्षेत्र यावरून केली जाते. कारण, वाघ आपले अधिवास क्षेत्र निश्चित केल्यावर बहुधा त्याच भागात असतो. स्थानिक गाईड हे त्याच्या खाणाखुणांवरून पटकन ओळखतात. सत्तांतराबाबत दुसरा मतप्रवाह म्हणजे, छोटा मटकासुरचे पिता मोठा मटकासुरचे अगोदर, म्हणजे जवळपास 2012 मध्ये त्या भागात ‘वाघडोह’ नावाच्या वाघाचे साम्राज्य होते. वाघडोह हा केवळ ताडोबातीलच नव्हे, संपूर्ण आशिया खंडातील आकाराने सर्वात मोठा वाघ होता. त्याचा प्रचंड दरारा होता. यामुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची लोकप्रियता वाढली होती. ‘माया’ वाघिणीचा जन्म 2010 मध्ये झाला. तिची आई ‘निरा’ असून बाप ‘W’ आहे. माया ही वाघीण ताडोबाची गेल्या 12 वर्षांपासून राणी आहे. मायानेही ताडोबाला जगात प्रसिद्धी मिळवून दिली आहे. 2013 मध्ये ऐन तारुण्यात पदार्पण केलेल्या मायाच्या मिलनासाठी गब्बर, टायसन आणि सॅटर्न या नर वाघांमध्ये सतत लढाया व्हायच्या. 2012 मध्ये ‘वाघडोह’च्या शेवटानंतर कोलारा भागात ‘मटका’ नावाच्या नैसर्गिक पाणवठ्याजवळ मटकासुर आढळून आला. मटका नावाच्या पाणवठ्याच्या नावावरून त्याचे नाव मटकासुर ठेवण्यात आले. मटकासुरचा आकार आणि रुबाब यामुळे माया वाघिणीशी त्याचे सूत जुळले. मटकासुरापासून मायाला तीन वेळा पिल्लं झाली. एकदा आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी मायाला ‘मोगली’ नावाच्या वाघाशी ‘फेक मेटिंग’ सुद्धा करावे लागले. बलराम वाघापासूनही मायाला एकदा पिल्लं झाली. पांढरपौनीच्या समृद्ध वनक्षेत्राची राणी असलेल्या मायासोबत मिलनासाठी नर वाघांची चढाओढ चालायची. आज माया जवळपास 14 वर्षाची आहे. तिला जवळपास पाच वेळा पिल्लं झाली. परंतु, प्रत्येक वेळी पिल्लांचे संगोपन आणि संरक्षणात ती थोडीफार निष्काळजी ठरली. कारण, प्रत्येक वेळी चार-पाच पिल्लं होऊन शेवटपर्यंत एखाद दुसरेच टिकले. ताडोबाची जगात ओळख करून देणारी माया आता जीवनाच्या अखेरच्या चरणात पदार्पण करीत आहे.

छोटा मटकासूर हा माया वाघिणीची मुलगी ‘छोटी तारा’चा मुलगा असून, बाप मटकासुर आहे. आज छोटा मटकासुर जवळपास आठ वर्षाचा असून, त्याचा निमढेला वनक्षेत्रात प्रचंड दरारा आहे. वडील मटकासुराच्या साम्राज्याला त्याने आव्हान देऊन स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे. ‘मोगली’ वाघासोबतही छोटा मटकाची यशस्वी लढाई झाल्याचे समजते. वाघडोह, गब्बर, बजरंग, मटकासुर आणि छोटा मटकासुर असे हे या व्याघ्रप्रकल्पातील वाघांचे सत्तांतर ठरले आहे. अरण्यातील तृणवर्गीय प्राणी असो वा शिकारी प्राणी, सत्तांतर हा त्यांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. त्यातूनच स्वकुळाची वाढ आणि संरक्षण या बाबी ठरत असतात. कालांतराने छोटा मटकासुराची सुद्धा सत्ता जाईल. परंतु, आज ताडोबा-अंधारी जंगलावर डरकाळी ऐकू येते ती छोटा मटकासुराचीच.

(‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२३)

सर्व छायाचित्रे – प्र. सु. हिरुरकर

(लेखक वन्यजीव अभ्यासक व छायाचित्रकार आहेत)

9822639798

Previous articleवैचारिक क्षमतांवर आघात करणारे ‘फिल्टर बबल्स’
Next articleकालचं गाव आज झालंय कसं…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here