कालचं गाव आज झालंय कसं…

-इंद्रजित भालेराव

।। कालचं गाव आज झालंय कसं ।।
दिवाळीचा सण । गाई वासरांचा
मामा भाचरांचा । आनंदाचा ।।
नदीतले पाणी । होऊनी निर्मळ
वाहे खळखळ । दिवाळीत।।
रानातली सारी । रोगराई हटे
जिथे तिथे भेटे । हिरवाई ।।
घरात दिसती । धनधान्य राशी
शेतातही खुशी । जागजागी ।।
घुमती आखाडे । पहिलवानांचे
कणखर तनाचे । कष्टकरी ।।
खाऊनिया चारा । हिरवा हिरवा
भोगूनी गारवा । पुष्ट बैल ।।
गाई वासरांचा । ज्या देशी सुकाळ
तिथे कधी काळ । येत नाही ।।
सुखी सर्व राहो । एवढी प्रार्थना
दिवाळीच्या सणा । ऐक माझी।।

माझ्या लहानपणी पाहिलेल्या दिवाळीचं हे चित्र. माझ्या स्मृतिरंजनातून वर आलेलं आणि एका कवितेत गुंफलेलं. चार वर्षांपूर्वी डॉ. अशोक जोंधळे यांनी या कवितेला एक सुंदर चाल दिली. आशाताई जोंधळे यांनी ती कविता गायली. माझा मुलगा चंद्रगुप्त म्हणाला, ‘‘पप्पा, दिवाळीत ही कविता आपण चित्रीकरणासह टाकूयात.’’ त्यासाठी काही चित्रीकरणाचे तुकडे हवे होते; म्हणून भाच्याला गावाकडून गोठ्यात गाई वासरांना ओवाळतानाचं थोडंसं चित्रीकरण करून, वासरं हुंदडतांनाचं चित्रीकरण करून पाठव, असं मी सांगितलं. तो म्हणाला, ‘‘मामा, आता आमच्या घरी गाईही नाहीत आणि वासरंही नाहीत. त्यामुळं गोठाही नाही. तुम्हाला हवं ते चित्रीकरण मिळणं आता मुष्कील आहे. कुठंतरी असलेल्या गोशाळेतून ते आता करून आणावं लागेल’’

या गोष्टीची मी कल्पनाच केली नव्हती की, गावाकडं आता गाई-वासरं, गुरं-गुराखी, बैल-आवतं यांचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. त्याची जागा यांत्रिक अवजारांनी घेतलेली आहे. माणूस, गाईगुरं, औतफाटा आणि शेतजमीन यांचं असलेलं अतूट नातं आता तुटलेलं आहे. गाईगुरांसाठी गुराखी मिळत नाहीत. पूर्वीसारखी गायरानं राहिलेली नाहीत. शेताचे मोठमोठे धुरे आता राहिलेले नाहीत. नदीकाठी मुद्दाम गाईबैलांना चरण्यासाठी ठेवलेली पडीक जमीन असायची, तीही आता राहिलेली नाही. आहे ती जमीन इंच इंच कसायला लोकांनी सुरुवात केलेली आहे. त्यामुळं पडीक जमिनी नाहीत. गाईगुरांना चारा नाही. त्यांना राखण करण्यासाठी गुराखी मिळत नाहीत. त्यामुळं आता गाई पाळणं परवडत नाही. म्हणून ही सगळीच साखळी तुटलेली आहे. आता गाईगुरांशिवायच गावाकडची दिवाळी साजरी होते. हे किती भयंकर आहे ! हे चांगलं का वाईट, हा प्रश्न वेगळा आहे; पण शेताचं शेतपण आणि गावाचं गावपण बरंच उसवत गेलेलं आहे, हे खरं!

हजारो वर्ष विकसित होत आलेला आणि स्थिर राहिलेला गावगाडा स्वातंत्र्यानंतर, त्यातल्या त्यात संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर उसवत गेलेला आहे. ज्या माणसांना या गावगाड्यात आपणाला अपमानाची वागणूक दिली जाते असं वाटत होतं, ती माणसं गाव गाड्यातून बाहेर पडली. त्यांनी त्यांच्यासाठी शहरं जवळ केली, नवे पर्याय निर्माण केले. त्यांची जागा भरून काढण्यासाठी बाहेरून नवी माणसं गावात आली नाहीत. महात्मा गांधी जरी म्हणाले, ‘खेड्याकडं चला’ तरी बाबासाहेबांनी सांगितलं होतं शहराकडे चला. बाबासाहेबांचं म्हणणं बाबासाहेबांच्या अनुयायांनी ऐकलं. गांधींना कुणी अनुयायीच राहिला नाही. म्हणून त्यांचं म्हणणं कुणीही ऐकलं नाही. माणसांच्या फायद्याचं, सोयीचं जे आहे ते ती माणसं करतात आणि त्यात काहीही चूक नाही.

मराठवाड्यात गावागावातून निजामी राजवट संपल्यानंतर पारतंत्र्यात रजाकारांनी निर्माण केलेल्या दहशतीचा परिणाम म्हणून; मुसलमानांचा सूड घेण्यासाठी ज्या गोष्टी केल्या, त्या भीतीतून मुसलमानांनी गाव सोडलं. बाबासाहेब म्हणाले म्हणून आणि मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या दंगलीमध्ये गावोगाव जाळलेल्या दलित वस्त्या, या दोन कारणांमुळे गावातून दलित बाहेर पडले. ब्राह्मणांनाही गावात फारसं स्थान राहिलं नाही म्हणून आणि शिक्षणाचं साधन त्यांच्या हाती होतं म्हणून त्यांनी आधीच नोकरीनिमित्तानं गावं सोडली होती. अशाप्रकारे गावगाड्याचा एक एक घटक गावाबाहेर गेला. शेती डोक्यावर घेऊन जाता येत नाही आणि शेतीशिवाय जगण्याला दुसरा पर्याय नाही, म्हणून फक्त शेतकरी तेवढा गावात राहिला. तो अमुकच जातीचा होता, असं नाही. एका जातीचं प्राबल्य होतं, हे खरं आहे. पण, कमी जास्त प्रमाणात सर्वच जातींजवळ शेती होती. दलितांकडं ती खूप कमी होती, तर वतनदारांकडं ती खूप जास्त होती.

आता सगळीकडून नाडलेला शेतकरी तेवढा गावात राहिलेला आहे. त्यामुळं सुताराचा नेहा राहिलेला नाही. चांभाराचं सांधवण राहिलेलं नाही. सोनाराची बागेसरी राहिलेली नाही. मातंगांचं दोरवन राहिलेलं नाही. कुंभाराचा आवा राहिलेला नाही. धोब्याचा घाट राहिलेला नाही. अलुतेदार आणि बलुतेदार वाटा मिळतील तिकडं निघून गेले. यंत्रयुगाच्या आगमनानं त्यांचे व्यवसाय बंद पडले, म्हणून निर्माण झालेल्या पर्यायी व्यवस्था हस्तगत करत ही माणसं गाव सोडून परागंदा झाली. त्यात त्यांचा काहीच दोष नव्हता. पोटापाण्याचा प्रश्न होता. पोट जिकडं नेईल तिकडं माणसं गेली आणि गाव उसवत गेला. गावाचा एक एक टाका उसवत गेला. या उसवत गेलेल्या उदास गावात उदास झालेला केवळ हतबल शेतकरी राहिला.

माझा जन्म १९६२ चा. मी जन्माला आलो, तेव्हा १९४८ ला मिळालेलं मराठवाड्याचं स्वातंत्र्य पंधरा वर्षांचं होतं आणि संयुक्त महाराष्ट्राचं वय दोन वर्ष होतं. रिधोरा हा आमचा गाव हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या पश्चिमेला आहे. तेव्हा गावाची लोकसंख्या तीनेकशे असावी. आता ती हजारबाराशे आहे. या छोट्याशा गावात माझं बालपण गेलं. मी पूर्ण पारंपरिक असलेला गाव पाहिला. सर्व सणवार, रीतीरिवाज पाळणारा गाव पाहिला. शेतीची एक स्वतंत्र संस्कृती होती. त्या संस्कृतीतल्या संकल्पना माझ्या मनात खूप मुरलेल्या होत्या; म्हणून माझ्या पहिल्या ‘पीकपाणी’ या कवितासंग्रहाच्या परिशिष्टात माझ्या कवितेत येणारे शेती संस्कृतीचे संकेत समजण्यासाठी मला खुलासे द्यावे लागले होते. असा गाव एकेकाळी मी पाहिलेला होता.

मी पाचसहा वर्षांचा असताना आमच्या गावात खूप मोठं हत्याकांड झालं. तीन माणसांची एकाच वेळी हत्या करण्यात आली. ते चौघंही कुप्रसिद्ध डाकू होते. गंगाराम, नागोराव आणि कोंडाजी अशी त्यांची नावं होती. पण, या नावानं समाजात त्यांची ओळख नव्हती. गंग्या, नाग्या आणि कोंड्या याच नावानं लोक त्यांना ओळखत असत. निजामी राजवट संपली असली, तरी आमचं गाव त्याच सरंजामी अवस्थेतच जगत होतं. या दरोडेखोर भावांमुळं गावात जंगलराजच होतं. हे तिघंही दरोडेखोर आंध्र, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीनही राज्यात मोठमोठे दरोडे टाकीत असत. गंगाराम हा त्यांचा म्होरक्या होता. तो विदर्भातील खतरनाक दरोडेखोर शामादादा कोलाम यांचा शिष्य होता. गावालाही त्यांचा त्रास होताच, दहशत होती.

हे तिघंही दलित समाजात जन्माला आलेले होते. कदाचित त्या काळात दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची प्रतिक्रिया, म्हणून देखील दलित समाजातून असे दरोडेखोर निर्माण होत असावेत. अण्णाभाऊंचा फकीर हाही त्यातलाच होता, हे आपणाला माहीत आहे. दरोडेखोरांविषयी आणि त्यांच्या सद्गुणांविषयी असणाऱ्या सर्व दंतकथा आमच्या गावातल्या दरोडेखोरांविषयी देखील होत्याच. एका अर्थानं स्वतः स्वतःला मिळवलेलं स्वातंत्र्य, असाही त्यांचा जगण्याचा आपण अर्थ लावू शकतो. शामादादा कोलाम आणि रुक्म्या डाकू यांनी पुढं दलित चळवळीत भाग घेतला. राजकारणातही सहभागी झाले. आमच्या गावचे हे दरोडेखोर जिवंत असते, तर कदाचित तेही भारतीय रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते झाले असते. पण, एकदा दरोडेखोरी सुरू झाल्यावर त्यात नीतीनियम थोडेच असतात? या तिघांवर मिळून आंध्र, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये ऐंशी खुनाचे दावे होते. पण, पोलिस त्यांना पकडू शकत नव्हते. त्यामुळं परेशान झालेले गावकरी एकत्र आले आणि त्यांनी या तीन दरोडेखोरांची गावच्या पाराच्या पाठीमागं सकाळी सकाळी ते तिघंही शेतातून घरी येत असताना हत्या केली. ते बेसावध असताना आणि रात्रीची नशा अजून उतरलेली नसताना गावकऱ्यांनी त्यांना घेरलं. ते जरी दरोडेखोर असले, तरी त्यांची हत्या करण्याचा अधिकार अर्थातच गावकऱ्यांना नव्हता. त्यामुळं कोर्टकचेऱ्या सुरू झाल्या. गावातली घरटी एक मुख्य माणूस पोलिसांनी पकडून नेला. काही घरातून दोघांनाही नेलं. त्यांना जेलमध्ये डांबून ठेवलं. अर्थात हे सगळे संशयित म्हणून पकडलेले होते. ही केस दहाअकरा महिने चालली.

तेवढ्या काळात गावातली सगळी कारभारी मंडळी जेलमध्ये होती. गावात केवळ महिला आणि मुलं होती. अशावेळी ज्या घरात आवश्यकता होती अशा घरात आधारासाठी कुणी कर्तृत्ववान पाहुणे येऊन राहिले. गावाचा कारभार गावातल्या म्हाताऱ्या बायांनी सावरला. आणसामाय, सुजानामाय, सौंदरामाय आणि गिरजामाय अशी त्या म्हाताऱ्यांची नावं होती. या म्हाताऱ्यांनी गावाचा कारभार केला. गावाचा एकोपा टिकवून ठेवला. अवघ्या पंचवीसतीस घरांची ही सवर्ण वस्ती. अर्थातच, दलित वस्ती यात गृहीत नाही. त्यांची पंधरावीस घरं होती. या मराठ्यांच्या घरातले चाळीसच्या चाळीसही पुरुष तुरुंगात होते. वर्षभरानंतर ते सुटले. प्रमुख १२ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली. दोघांना फाशीची शिक्षा झाली. पण, १९७२ साली आलेल्या गांधी शताब्धीनिमित्त या लोकांची फाशी रद्द झाली. या काळात गाव उसवलेला नव्हे, तर पूर्ण उद्‌ध्वस्त झालेला होता. या काळातला गाव हा एका स्वतंत्र कादंबरीचा विषय आहे.

त्या काळात मी खूपच लहान होतो, म्हणजे पाचसहा वर्षांचा. त्यामुळं मला फारशा गोष्टी कळत नव्हत्या. त्यामुळं फारसं काही आठवतही नाही. पण वडीलधाऱ्यांच्या सांगण्यातून त्या सगळ्या गोष्टी सततच कानावर पडत होत्या, अजूनही पडतात. माणसांची मनं, शेतशिवारं किती उद्‌ध्वस्त झाली होती, याचं चित्र फार भयानक होतं. शेती सगळी मोडून पडलेली होती. माणसं गर्भगळीत झालेली होती. काय करावं तेच माणसांना कळत नव्हतं. पण, जगलं तर पाहिजे म्हणून वर्षभरानंतर परत आलेल्या माणसांनी हळूहळू गाव उभा केला. गाव मुळातच खूप चांगला होता. माणसं सद्गुणी होती. जवळजवळ सगळा गाव महानुभावपंथीय होता. त्यामुळं गावात मांसाहार आणि दारूचं नावंही कुणी घेत नसे. अनेक दलित कुटुंबंही महानुभाव पंथाची अनुयायी होती. त्यामुळं तेही मांसाहार करीत नसत. पण, या हत्याकांडाच्या प्रकरणानंतर पुन्हा गाव वसत असताना तो आणखीच सद्गुणी झाला. गावावरचा दरोडेखोरांचा कलंक गाववाल्यांनी पुसला होता. त्यासाठी जन्मठेपेची शिक्षाही भोगली होती. माणसांनी भयंकर दुःख पाहिलेलं आणि अनुभवलेलं होतं. मरणकळा अनुभवलेल्या माणसांनी इथून पुढं सद्गुणाशिवाय दुसरं कशाचं नावही नको, अशी प्रतिज्ञाच जणू केलेली होती. त्या दुःखातून बाहेर पडताना माणसं ताकही फुंकून पीत होती. आणखीच सदगुणानं वागत होती.

नेमकं त्याच वेळी गावात येलदरी धरणाचं पाणी आलं. एक दोन वर्ष लोकांना त्याचा उपयोग कसा करावा ते समजलच नाही. त्यामुळं ते पाणी नुसतंच नदीतून वाहत गेलं. ते शेतात आणावं, शेतं पिकवावीत हे लोकांना कळालंच नाही. हळूहळू पाटबंधारे विभागाचे लोक गावात येऊन लोकांना सगळं समजावून सांगू लागले. मुख्य कॅनॉलला उपकॅनॉल निघाले, उपकॅनॉलला चाऱ्या निघाल्या. त्या चाऱ्यांनी प्रत्येकाच्या शेतापर्यंत हे पाणी पोहोचवलं. १९७० नंतर हे पाणी शेतात आल्यावर कोणती पिकं घ्यायची हा प्रश्न लोकांना पडला. कारण पारंपरिक पिकं केवळ वराडा आणि पिवळा अशी दोनच होती. थोडीफार तूर आणि कापूस पिकवला जायचा. पण, आता बारमाही भिजवणीची शेती करायची, म्हणजे काय करायचं ? हा प्रश्न लोकांसमोर पडला. आधी वर्षातून फक्त एक पीक घ्यायचं आणि वर्षभर शेताकडं ढुंकूनही पाहायचं नाही, अशी सवय गावकऱ्यांना होती आणि आता वर्षातून तीन-तीन पिकं घेता येतील, असं साहेबलोक सांगत होते. सुरुवातीला आलेलं पाणी नदीला चाललेलं होतं. मिळणारं बी-बियाणं लोक दळून खात होते. खत जाग्यावरच कुजत होते. पण, हळूहळू या सगळ्यांचा उपयोग करायला लोक शिकले. लोकांनी ते सगळं समजून घेतलं आणि हळूहळू शेती पिकवायला सुरुवात केली.

जेव्हा लोकांना या नव्या पीकपपद्धतीचा आवाका लक्षात आला, तेव्हा शेती अमाप पिकू लागली. पिकाचा इतका उतारा गाववाल्यांनी कधी पाहिला नव्हता. पिकाला मिळणारा इतका भावही त्यांनी कधी पाहिला नव्हता. गावाचा जो मुळातच खडकाळ भाग होता तिथं हे धरणाचं पाणी आलं, त्यामुळं त्या जमिनी अमाप पिकू लागल्या. मग वेगवेगळी पिकं आली. कधीच न घेतलेलं भुईमुगाचं पीक आलं, उसाचं पीक आलं, गव्हाचं पीक आलं, साळीचं पीक आलं, ही पिकं शेतकऱ्यांनी याआधी कधीच घेतलेली नव्हती. आता लोक ती पिकं घेऊ लागले. रोजमजुरीसाठी माणसं उपलब्ध होती. शेतकरी कष्ट करू लागले. शेतं पिकू लागली. आलेल्या संपत्तीतून आर्थिक स्थिरता मिळू लागली. हळूहळू खूप पुढं लोकांनी नवी घरं बांधायला सुरुवात केली. शेतात झोपडींचे आखाडे करण्याऐवजी विटांच्या भिंती बांधून पत्रे टाकून शेतातही एक एक बंगला लोक बांधू लागले. सगळं चित्रच बदलून गेलं. खूपच सुखद आणि आनंदी चित्र निर्माण झालं. लोक हत्याकांडाच्या काळातली दहशत विसरून गेले. गावात आनंद भरून राहिला. त्यामुळं एकेकाळी गंग्या डाकूचं म्हणून सर्वत्र दहशतवादी गाव अशी असलेली प्रतिमा आता पूर्णपणे बदलून खूप चांगलं, सज्जन लोकांचं गाव, धार्मिक लोकांचं गाव, म्हणून गावाची नवी प्रतिमा निर्माण झाली.

महानुभाव पंथांचे मोठमोठे साधुसंतांचे जत्थे गावात येऊ लागले. चातुर्मास करू लागले. लोक त्यांना भरपूर दानधर्म करू लागले. तीन-चारच वारकरी घरांनीही वारकरी सप्ते सुरू केले. कीर्तनकार महाराज येऊ लागले. त्यांची कीर्तनं होऊ लागली. महानुभाव पंथाचे अनुयायीही त्यांच्या कार्यक्रमात वर्गणी देऊन सहभागी होऊ लागले. गावाची कीर्ती परिसरात वाढू लागली. सद्गुणसंपन्न गाव म्हणून गावाची कीर्ती वाढल्यावर आधी नको रे बाबा त्या गावात मुलगी देऊ नका, असे म्हणणारे लोक आता द्यायची असेल तर मुलगी त्याच गावात द्या, असं म्हणू लागले. १९८० ला मी हे गाव सोडलं तेव्हा गावाची स्थिती ही अशी होती.

१९८० ला मी शिक्षणासाठी गाव सोडलं, पण नोकरी लागेपर्यंत पुढं दशकभर मी गावाच्या संपर्कात होतोच. सुट्ट्या सगळ्या गावाकडंच जात असत. त्यामुळं बदलता गाव दिसतच होता. १९८० च्या दरम्यान गावात यष्टी बस येऊ लागली. तालुक्याला, जिल्ह्याला जोडणारा एक पक्का रस्ता झाला. गावात वीज आली. तोपर्यंत लोकांनी सिमेंट काँक्रिटची घरं बांधायला सुरुवात केलेली होती. काही लोकांनी नंतर ती घरं बांधली. महानुभाव मंदिराच्या समोर मोठा सभामंडप टाकला. पुढं हनुमान मंदिराचंही प्रचंड मोठं बांधकाम झालं. त्यासाठी जमा केलेली वर्गणी व्याजव्यवहारात गुंतवून आलेल्या व्याजावर हे हनुमंताचं मंदिर बांधण्यात आलं. ते आता अतिशय भव्य स्वरूपात उभं आहे. त्यामुळं कीर्तनाचे खूप मोठे कार्यक्रम आता तिथं होतात. सुप्रसिद्ध कीर्तनकार आणले जातात.
मी शिकायला होतो, तोपर्यंत गावातली शाळा चौथीपर्यंतच होती. पुढचं सगळं शिक्षण मला आजूबाजूच्या गावी जाऊन घ्यावं लागलं. पण १९९० च्या दरम्यान गावातली शाळा सातवीपर्यंत झाली. आता आजूबाजूच्या तीन-चार गावची मुलं आमच्या गावी येऊ लागली. शाळा वाढत गेली. शिक्षक वाढले. शिक्षिका गावातच राहू लागल्या. त्यांच्या मार्गदर्शनानं गावातल्या काही मुली शिकू लागल्या. शिक्षणात पुढं जाऊ लागल्या.

गावात आणि गावातल्या संस्कृतीत होत गेलेल्या बदलात सगळ्यात महत्त्वाचे बदल म्हणजे, मातंग आणि बौद्ध या दोन समाजातल्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात गाव सोडला. मुंबई, नाशिक, औरंगाबाद, परभणी, नांदेड, हैदराबाद अशा ठिकाणी गावातली दलित कुटुंबातली मुलं जाऊ लागली. पडेल ते काम करून शहरात राहू लागली. गावात राहणं त्यांना नको वाटू लागलं. तसं शहराची हवा लागलेल्या प्रत्येकच माणसाला वाटू लागलं. जसं ते दलित वस्तीतल्या मुलांना वाटू लागलं, तसं सवर्ण वस्तीतल्या मुलांनाही वाटू लागलं. मग ती मुलं कुठल्या का निमित्तानं होईना, शहरात राहण्याचा प्रयत्न करू लागली. मोठी माणसं सकाळीच शहरात निघून जाऊ लागली आणि दिवसभर शहरात राहून संध्याकाळी घरी परत येऊ लागली. ही शहराची हवा १९९० नंतर मोठ्या प्रमाणात गावात शिरली.

हळूहळू शिकलेल्या मुलांच्या थोडं फार शिकलेल्या, शहरांचे रंग माहीत झालेल्या बायका गावात राहायला नको म्हणू लागल्या. पण, शहरात राहायला निमित्त काय सांगणार? त्यांच्या नवऱ्यांना नोकऱ्या नव्हत्या. पण, पुढं मुलंबाळं झाल्यावर लेकरांच्या शिक्षणाच्या निमित्तानं या सुनांनी शहरात राहण्याचा आग्रह धरला. दलितांना जमिनीच नसल्यामुळं ते सर्वसंगपरित्याग करून निघून गेले. पण, या जमीनवाल्यांना जमिनीशी खिळून राहून शहरात राहणं भाग होतं. जमिनी भिजवणीखाली आल्यामुळं मिळणाऱ्या उत्पन्नात त्यांना तिथं राहणं शक्यही होऊ लागलं. मग घरातल्या सुना आणि लेकरं शहरात, घराचा मालक दिवसभर गावात आणि रात्री मुक्कामी शहरात, नाहीतर कधीमधी गावात आणि शहरातच राहू लागला. घरातली म्हातारीकोतारी गावात राहू लागली. असेही बदल गावात होऊ लागले. त्यामुळं कुटुंबं तुटायला लागली. पूर्वीसारख्या एकत्रित कुटुंबातला गोतावळा टिकेनासा झाला. माणसं सुटीसुटी झाली. एकाकी झाली. सुखदुःखाला आधार उरला नाही. अशी माणसं जगण्याची उमेद हरवून बसली. माणसं खंगून मरू लागली. नाहीतर आत्महत्या करू लागली. हे आमच्याच गावचं असं म्हणून नाही सांगत; ही गावोगावची कथा सांगतो आहे. हा असा प्रकार गावोगाव सुरू झालेला आहे.

मी आणि माझा भाऊ दोघं शिकलो आणि गावाबाहेर पडलो. आमच्या आई-वडिलांनी आमच्या शिक्षणासाठी जिद्द धरली आणि शिकवलं. मी वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक झालो आणि धाकटा भाऊ हॉलंडला शिकून कृषिशास्त्रज्ञ म्हणून परत आला. त्यानं आधी इतर कंपन्यांचा मॅनेजमेंट डायरेक्टर म्हणून काम पाहताना स्वतःची कंपनी हैदराबादेत सुरू केली. आम्हा दोघांची झालेली प्रगती पाहून गावातल्या अनेक मुलांनी शिक्षणाची प्रेरणा घेतली. त्यांच्या पालकांनाही आशा निर्माण झाल्या आणि लोकांनी जिद्दीनं मुलं शिकवली. त्यातली बरीच मन लावून शिकली. काही नोकरीला लागली. मुली देखील बँकेत लागल्या. इंजिनियर झाल्या. चांभार समाजातील मुलंही पोलिसांत मोठ्या पदावर लागली. गावातली मेहनतीनं शिकलेली मुलं सैन्यात, पोलिसात, बँकेत, कंपन्यात लागू लागली. पण जे मन लावून शिकले नाही, जे नुसत्याच अपेक्षा ठेवत गेले, त्यांनी मेहनत केली नाही अशा मुलांचा भ्रमनिरास झाला. त्यांच्या आई-वडिलांचाही भ्रमनिरास झाला. ही मुलं शेतातून उसवली होती आणि शहरात निसवत नव्हती. अशा मुलांचं काय करावं, हे पालकांना समजत नव्हतं. स्वतः त्या मुलांनाही आता आपण काय करावं ते समजत नव्हतं. त्यांची लग्न होत नव्हती. अशा अवस्थेत अपमानास्पद जिणं जगत ही मुलं व्यसनाधीनही होऊ लागली, चुकीच्या मार्गाला लागू लागली, भ्रष्ट यंत्रणेत अडकू लागली, दुष्ट लोकांच्या नादी लागू लागली. मग, गावात कधी नव्हे ती गुप्तपणे का होईना दारू मिळू लागली.

पूर्वी जत्राखेत्रांमधून किंवा सुगीच्या दिवसात नाचतमाशे यायचे. करमणूक म्हणून लोक ते पाहायचे. ते तमासगीरही गरीब असायचे. या तमासगिरांसाठी गावात घरोघरी फिरून भाजी-भाकरी जमा करून दिली जायची. तमाशा संपला की, जेवण करून ते तमासगीर झोपायचे. दुसऱ्या दिवशी उठून निघून जायचे. आता जमाना बदलला. कॅब्रे डान्स करणाऱ्या नर्तिका आल्या. शहरात डान्सबार बंद झाले, म्हणून त्या गावात शिरल्या. त्यांचा दिमाख फार मोठा होता. त्यांची मागणी मोठी होती. हातात पैसे असलेली मुलं त्यांच्याही नादी लागायला लागली. अगदी शंभर, दीडशे, दोनशे किलोमीटर दूर जाऊन गौतमी पाटीलचं नृत्य पाहणारेही गावात निपजले. त्यावर फुशारकी मारणारेही निपजले. हे सगळेच बदल गाव उसवणारेच होते.

गावात काही चांगले बदल झालेच नाही, असं नाही. काही चांगले बदलही झाले. पण, गावाची घडी आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक सर्वार्थानं पार विस्कटून गेली. ती थांबवायची कशी, हे आता कुणाच्याच हातात राहिलेलं नाही. प्रत्येक घटक ती घडी आणखी उस्कटून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. कारण, पूर्वीसारखा संपूर्ण गावगाडा एका कलानं एका दिलानं चालणारा राहिला नाही. प्रत्येकाचं दिल वेगळं. प्रत्येकाचा कल वेगळा. त्यामुळं प्रत्येक गोष्टीला फाटे फुटले. ज्यांनी कष्ट मेहनत केली, कुठल्या वाईट नादाला लागले नाही अशी कुटुंबं सुधारली देखील! त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली. त्यांच्या घरातली मुलं घरातल्या सुसंस्कृत वातावरणामुळं काळजीपूर्वक शिकली. त्यांचा आर्थिक विकास झाला. अशा घरातल्या लोकांना गावातली घरं आता अपुरी वाटायला लागली म्हणून त्यांनी गावाबाहेर घरं बांधायला सुरुवात केली. ही अद्ययावत पद्धतीची टुमदार बंगलीमजा घरं आता गावोगाव दिसतात. शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावरच ती बांधलेली असतात. अशी घरं मोठे शेतकरी, नोकरदार किंवा राजकारणात सहभागी असलेले लोकच बांधू शकतात. शहराकडं जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला ज्यांची शेती आहे त्यांनी प्लॉटिंगही केलं. त्या जागेत हे लोक घरं बांधू लागले. शेतीत कष्ट करून ज्यांनी पैसे कमावले, ते लोक हे प्लॉट विकत घेऊ लागले. ज्यांची जमीन शहराच्या रस्त्यावर आली, त्यांना आपोआपच पैसे मिळू लागले. हे गावात झालेले आर्थिक बदल गावाची घडी बसवणारे म्हणायचे का उसवणारे म्हणायचे, हा प्रश्नच आहे.

परवा शहरात राहून शेती करणारे, अधून-मधून शेतात जाणारे, काम असेल तर रजा टाकून जाणारे आमचे एक प्राध्यापक मित्र त्यांचा अनुभव सांगू लागले, ‘‘मला निघण्याची घाई असते, तेव्हा पोळीवर लोणचं किंवा भाजी टाकून त्या पोळीचा गुंडाळा करून माझी बायको कागदात घालून देते. मी ते मोटरसायकलच्या डिकीत टाकून घेऊन जातो. दुपारी शेतात जेवण करतो. त्याचवेळी शेतातले कामाला आलेले जे मजूर असतात, त्यांच्याकडं मात्र जेवणाचे सुंदर डबे असतात. सगळं जेवण व्यवस्थित असतं. बऱ्याचदा वरण, भात, भाजी, पोळी, ठेचा, लोणचं, कांदा, पापड, काकडी असं सगळं त्यांच्या जेवणात असतं. त्याचवेळी मी शेताचा मालक मात्र कागदाचा पुटुळा सोडून त्यांच्यासमोर जेवत बसतो. तेव्हा तेच त्यांच्या डब्यातलं काहीबाही माझ्या कागदात टाकतात. मालकाला वेळ मिळाला नसावा, निघण्याच्या घाईत तसेच आले असावेत, असं समजून ते हे टाकतात.’ पूर्वी शेतमालकाचा रुबाब होत. आता शेतात काम करणाऱ्या मजूर माणसाचा रुबाब आहे, असंही तो मित्र म्हणाला.’’ खरं तर ही समाज परिवर्तनाची खूण म्हणता येईल. कुठल्याही गोष्टीला दोन अंगे असतातच. त्यामुळं एकाच बाजूचा रुबाब कायम चालावा, असं आपण म्हणणंही चुकीचंच आहे.

पूर्वी सुसंस्कृत कीर्तनकार गावात आणले जात असत. आता खूप चांगलं कीर्तन करणारे महाराज आले, तर त्यांच्यासमोर ऐकायला कुणी नसतं. कारण, त्यांचं ज्ञान कुणाला नको असतं. त्यांनी उभी केलेली संस्कृती कुणाला नको असते. त्यांची गायनीकळा कुणाला नको असते. लोकांना विनोद सांगणारे, पोट धरून हसवणारे आणि नुसत्या बाता मारणारे महाराज हवे असतात. त्यांच्या कीर्तनाला प्रचंड गर्दी होते. पंचक्रोशीतली सगळी गावं उलथून कार्यक्रमाला येतात. हा बदल चांगला की वाईट, हे ज्याचं त्यानं ठरवायचं. या बदलानं गावातला वारकरी संस्कृती उसवली की नाही, हे ज्यानं त्यानं ठरवायचं. असे अनेक बदल होत गेलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कीर्तन आता सेवा राहिलेली नाही. तो व्यवसाय झालेला आहे. चांगली आर्थिक उलाढाल असलेला व्यवसाय. कीर्तनकार हे आता चारचाकी वाहनाशिवाय फिरत नाहीत. त्यांचं मानधनही भरपूर असतं. त्यांची आर्थिक, शारीरिक स्थितीही चांगली असते. हे अर्थातच चांगलंच आहे. त्यामुळं घराघरातून आता आपलाही एखादा मुलगा कीर्तनकार व्हावा, अशी आकांक्षा निर्माण झालेली आहे. पूर्वी आपल्याही घरातला एखादा मुलगा नोकरीला असावा असं वाटायचं, तसंच आता आपल्याही घरातला एखादा मुलगा कीर्तनकार व्हावा, असं पालकांना वाटू लागलंय. त्यामुळं मोठ्या हौसेनं मुलं कीर्तनशाळेत घातली जातात. त्यासाठी आता आळंदीला जाण्याची गरज नाही.

गावोगाव कीर्तनशाळा सुरू झालेल्या आहेत. ही मुलं शाळेतही जातात आणि कीर्तनशाळेतही शिकतात. कीर्तनकार महाराजांना ब्रह्मचारी राहण्याची सक्ती नसते. ते विवाह करू शकतात. त्यांचे छान संसार असतात. त्यामुळं मुलांनाही त्या मार्गानं जायला फार अवघड वाटत नाही. बऱ्याचशा कीर्तनाचे संयोजक राजकीय नेते असतात. या कीर्तनाच्या व्यवस्थेत त्यांचे कार्यकर्ते स्वयंसेवक असतात. कीर्तन संस्कारासाठी असतं, पण या कार्यकर्त्यांवर त्या कीर्तनाचे काहीही संस्कार होत नाहीत. कीर्तन संपलं की हे सगळे कार्यकर्ते धाब्यावर जाऊन बसलेले असतात. कीर्तन संस्कृतीची ही आता एक पोटसंस्कृतीच झालेली आहे. त्यामुळं सप्ते आणि कीर्तनांचं प्रमाण गावोगाव वाढलेलं असूनही, तितक्याच प्रमाणात व्यसनाधीनताही वाढलेली आहे. हा बदल चांगला की वाईट, हेही ज्याचं त्यानंच ठरवायचं. कीर्तनानं कधी महाराष्ट्र सुधारला नाही आणि तमाशानं तो कधी तो बिघडला नाही, असं रामदास फुटाणे म्हणतातच की !

पारावरच्या पोथ्याही आता बंद झाल्यातच जमा आहेत. पूर्वी पारावरच्या पोथीला सगळा पार पुरत नसे. पाऊस नसेल, तर पाराबाहेरही मोकळ्या जागेवर माणसं पोथी ऐकत बसलेली असायची. कारण तेव्हा करमणुकीसाठी इतर पर्याय नव्हते. दूरदर्शन नव्हतं, मोबाईल नव्हते. त्यामुळ लोक हमखास पोथीला गर्दी करायचे. पोथी संपल्यावर पोथीची मोठी समाप्ती व्हायची. संपूर्ण गावाला जेवण असायचं. त्या दिवशी कीर्तनही ठेवलं जायचं. आजूबाजूच्या गावचे लोकही बोलवले जायचे. आता पोथी ऐकायला फारसं कुणी येत नाही. पण, प्रत्येक पारावर लाऊडस्पीकर मात्र कायमचा लावलेला असतो. तो सगळ्या गावाला ऐकू येतो. त्याकडं फारसं कुणाचं लक्ष नसतं. त्यामुळं पोथी लावणारेही उत्सुक नसतात. लावणाऱ्यांनी नवस म्हणून पोथी लावलीच, तर ऐकणारे कुणीच नसतात. दोन-तीन म्हाताऱ्या समोर येऊन बसलेल्या असतात. ज्यांना फारसं ऐकायला येत नाही आणि दिसतही नाही. अशी ही पोथीची अवस्था झालेली आहे.

लग्नात होणारे खर्च कमी व्हावेत म्हणून सामूहिक विवाह, गेटकेन विवाह, साधे विवाह अशा संकल्पनांचा प्रचार आपण करतो आहोत. त्यामुळं विवाहातला सरंजाम तर काही कमी होतच नाही, उलट लहान लहान मुलांचे वाढदिवस आणि त्यांचे जंगी कार्यक्रम होऊ लागलेले आहेत. त्यातही स्पर्धा निर्माण झालेली आहे. त्यामुळं आई-वडिलांना सुद्धा आपल्या मुलाचा वाढदिवस मोठा करावा, असं वाटतं. ज्या लेकरांना त्या वाढदिवसातलं काहीच कळत नाही, त्या लेकरांचेही जंगी वाढदिवस साजरे केले जातात. ती लेकरं आरबळून रडत असतात आणि मायबाप डान्स करत असतात. हे शहरातलं लोण आता गावागावात आणि घराघरात पोहोचलेलं आहे.

पूर्वी गावखेड्यातून साबुन फक्त दिवाळीच्या वेळी आणला जायचा. दिवाळीच्या काळातच वापरला जायचा. उरलेला साबुन नंतर कधीतरी असाच सणावाराच्या निमित्तानं वर्षभर वापरला जायचा. हळूहळू रोज साबुन वापरायची लोकांना सवय लागली. आता दिवसातून चार वेळादेखील साबुन लावून तोंड धुणारे लोक गावखेड्यात आहेत. सौंदर्यप्रसाधनांचा लोकांना परिचयच नव्हता. आता तरुणवर्गात सौंदर्यप्रसाधनांचं प्रचंड फॅड वाढलेलं आहे. मुलांमध्येही सौंदर्यप्रसाधनांचा प्रसार झालेला आहे. तरुण पिढीचा हा खर्चही वाढलेला आहे. कमावण्याची साधनं काहीच नाहीत, पण खर्चाच्या वाटा अनेक निर्माण होत आहेत. या तफावतीनंच माणूस गोत्यात येतो आहे. वेडा होतो आहे. सैरभैर होतो आहे. आत्महत्या करतो आहे. गावातल्या काही मुलांनी ऑटो घेतलेले आहेत. शहराजवळची मुलं दिवसभर शहरात ऑटो चालवतात, संध्याकाळी ऑटो घरी आणून सोडतात आणि पल्सर गाडीवर बसून, वेगळे कपडे घालून शहरात हिरोगिरी करायला निघून जातात. रात्री खूप उशिरा कधी शुद्धीत, तर कधी धुंदीत घरी परत येतात.

माझ्या लहानपणी रेडिओची खूप चलती होती. लोक हौसेनं घरोघर रेडिओ घ्यायचे, रेडिओवर कार्यक्रमही खूप चांगले असायचे. सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधन केलं जायचं. सुंदर कीर्तनं व्हायची, उत्तम गाणी ऐकायला मिळायची, माहितीपर भाषणं असायची, महिलांसाठी, मुलांसाठी स्वतंत्र कार्यक्रम असायचे, ते आवर्जून ऐकले जायचे. आता रेडिओ कुठल्या सांदीत पडला माहीत नाही. नंतर टीव्ही आला. त्यालाही सांदीच्याच मार्गानं जावं लागलं. आता मोबाईल आलेले आहेत आणि सगळे लोक मोबाईलमध्ये तोंड घालून बसलेले असतात. पारावर बसलेले लोकही आता एकमेकांशी गप्पा मारत नाहीत, तर ते मोबाईल पहात बसतात.

नव्या पिढीची नवी गाणी येणारच, हे गृहीतच आहे. त्या गाण्यात कोणती नवी संस्कृती आली एवढाच फरक असतो. संस्कृती आली का विकृती आली, हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. कारण, ज्या पिढीला संस्कृती काय आणि विकृती काय हेच कळत नाही, त्या पिढीच्या अभिरुचीला आपण विकृती म्हणायचं आणि त्यांनी तीच संस्कृती म्हणायचं किंवा नवी संस्कृती म्हणायचं, असा प्रकार होऊ शकतो. तो गृहीतच आहे.

आमच्या लहानपणी शिक्षणाला फार चांगले दिवस होते. शिक्षण फार महत्त्वाचं समजलं जायचं. त्यामुळं सगळीकडं मुलं शाळेत जाऊ लागली. नवीन शिक्षकांची चांगली पिढी त्या काळात भरती झालेली होती. ते गुरुजी शिकवायचेही खूप चांगलं. पण, आता जिल्हा परिषदेच्या शाळा मोडीत निघू लागलेल्या आहेत. एकेकाळी त्यांना भरभराटी होती. आता खाजगी शिक्षणसंस्थांच्या शाळा भरभराटीला येऊ लागलेल्या आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची तर भयंकरच चलती आहे. त्यामुळं प्रत्येकाला आपली मुलं स्पर्धेत उतरावीत, त्यासाठी खूप चांगल्या शाळेत शिकावीत असं वाटतं, म्हणून लोक ज्या शाळेचा नावलौकिक झाला तिकडंच दुर्मडी देऊन जातात. खरंतर मुलं शिकून सुसंस्कृत व्हावीत, असं आज कुणालाही वाटत नाही. फक्त शिकून त्यांना नोकरी मिळावी आणि स्पर्धेत ती पहिली यावीत, एवढाच उद्देश पालकांच्या डोक्यात असतो. तो विद्यार्थ्यांच्या डोक्यात भरवला जातो. त्यामुळे अनेक विद्यार्थी मनोरुग्ण होतात. आयुष्यातून उठतात. हा समाजाचा शैक्षणिक विकास झाला असं म्हणायचं का? कारण तसं आपण म्हणू शकतो; इंग्रजी शाळांची एवढी संख्या वाढली असेल तर विकासच झाला, असं म्हणायला हवं. पण, ही सगळी मुलं ना धड इकडची ना धड तिकडची अशी बेंगरूळ होऊन जातात, त्याला काय म्हणायचं?

सकाळ-संध्याकाळ एस्टीची वाट पाहणारे लोक आता गावात राहिलेले नाहीत. खाजगी वाहनानं लोक भुर्रकन निघून जातात. एसटी रिकामी आदळत येते आणि रिकामी आदळत जाते. एक दिवस या मार्गावर प्रवासी नाहीत, असा रिपोर्ट दिला जातो आणि एसटी बंद करण्यात येते. एकेकाळी जी एसटी गावात यावी म्हणून आंदोलनं केली होती, ज्या एसटीनं काही पिढ्या शिकल्या, तीच एसटी आता गावात नकोशी झालेली आहे. खाजगी वाहनांनी तिची जागा घेतलेली आहे. गावातल्या नाल्या पूर्वी सगळ्या रस्त्यावर काढून दिलेल्या असायच्या. गावात रस्तेच नसायचे. त्यामुळं नाल्यांवरून उड्या मारतच गावातून फिरावं लागायचं. आता गावातले सगळे रस्ते काँक्रिटचे झालेले आहेत आणि नाल्याही बांधण्यात आलेल्या आहेत.

माझ्या लहानपणी संजय गांधी निराधार योजना आली. गावातल्या निराधार म्हाताऱ्या माणसांना या योजनेतून पैसे मिळायचे. ते खूप कमी असायचे, पण गावातल्या लोकांना ते खूप वाटायचे. त्यामुळं संजय गांधी निराधार योजनेत आपला नंबर लागावा म्हणून लोक धडपडायचे. खरंच निराधार असलेले लोकच अशी धडपड करायचे. नंतर नंतर लग्गा आणि वशिलेबाजीनं कुणालाही संजय गांधी निराधार योजनेत प्रवेश मिळू लागला. राजकारणाची सोय म्हणूनही या योजनेकडे पाहिल्या गेलं. आता संजय गांधी निराधार योजना मागं पडली. मोदीचे पैसे लोकांच्या खात्यावर जमा होऊ लागलेले आहेत. मोदींच्या पैशांचा आता म्हाताऱ्या-कोताऱ्यांना मोठा आधार वाटू लागलेला आहे. घरातली कारभारी मुलं शेतीतील सगळं उत्पन्न स्वतःच्या हातात ठेवतात आणि म्हाताऱ्या-कोताऱ्यांना मोदीचे आलेले पैसे मिळतात. कारण, ते त्यांच्याच नावावर आलेले असतात. त्यामुळं मोदीच आमचा मायबाप, असंही खेड्यापाड्यातले म्हातारे-कोतारे शेतकरी म्हणू लागलेले आहेत. याला चांगलं म्हणायचं की वाईट, हे सापेक्षच आहे.

गावात पूर्वीही वृत्तपत्रं येत नव्हती आणि आताही वृत्तपत्रं येत नाहीत. पूर्वी सगळ्या बातम्या रेडिओवरून समजायच्या. आता त्या मोबाईलवरच समजतात. पूर्वी गावातून शहरात गेलेली माणसं एखादा पेपर हातात घेऊन यायची. सगळ्या गावातली माणसं उत्सुकतेने तो पेपर चाळत बसायची. आता असा पेपर कोणीही गावाकडं आणत नाही. त्याची गरज कोणाला वाटत नाही. टीव्ही असेल तर त्यावर, नाहीतर मोबाईलवर लोकांना सगळ्या बातम्या कळू लागलेल्या आहेत. गावातून खूप चांगल्या गोष्टी गेल्या त्याबरोबरच वाईट गोष्टी जायला पाहिजे होत्या, पण त्या गेल्या नाहीत. गावात जे वाईट होतं, जायला पाहिजे होतं ते तसंच राहिलं. लोक सुशिक्षित होऊनही गावातलं अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्र्य, जातीयता, हेवेदावे हे कमी होण्याऐवजी वाढत गेलेले आहेत. त्यामुळं गाव उसवायला मदतच झालेली आहे. हे कमी व्हावेत म्हणून पूर्वी कीर्तनाचा उपयोग व्हायचा. कीर्तनातून गावातली भांडण मिटवली जायची. आज कीर्तनातून भांडणं लावली जातात. त्यामुळं दुभंगलेला गाव अभंग कसा करावा, याचा काही इलाजच कुणाला दिसत नाही आणि गाव तर दुभंगतच जातो आहे.

लेखातील सर्व रेखाटने – जितेंद्र साळुंखे ( 99707 83405)

(इंद्रजित भालेराव हे नामवंत कवी , ललित लेखक व समीक्षक आहेत)
84322 25585

……………………………..

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२३