सर्वार्थाने प्रगत .. आधुनिक जर्मनी

-तेजल राऊत 

जर्मनी हे नाव घेतलं की ढोबळमानाने काही कीवर्ड्स डोळ्यासमोर येतात.

उदाहरणार्थ… मर्सिडीज बेंझ, BMW सारख्या गाड्या, फुटबॉल, बीयर, हिटलर, दुसरं महायुद्ध, नाझीवाद. Autobahn (विना स्पीड लिमिट गाड्या चालवता येणारे जगातले फार मोजके रस्ते. जर्मनीतल्या ह्या रस्त्यांना ऑटोबाऽन म्हणतात.) खरं तर जर्मनी या सगळ्या कीवर्ड्ससकट आणखी बरीच काही आहे.

ऑफिशियल कामासाठी किंवा पर्यटनासाठी मी पूर्वी अनेक वेळा भारतातून जर्मनीला आले होते. २०१४  साली ऑगस्टमध्ये जर्मनीत स्थलांतर केलं. गेल्या १०  वर्षांपासून इथे राहत असल्यामुळे जर्मनी कशी आहे? तिथलं काय आवडतं? काय आवडत नाही? तिथे मायग्रेट व्हावं का? उच्च शिक्षणासाठी जर्मनीला जावं का? जर्मनीत मायग्रेट व्हायचं असेल, तर काय करावं लागेल? इत्यादी प्रश्न मला भारतातले मित्रमैत्रिणी, आप्तेष्ट विचारत असतात.

तर…जर्मनी कशी आहे? याचा  आढावा घेण्याचा हा प्रयत्न.

ज्या देशात, राज्यात, शहरात आपण जन्माला येतो, वाढतो; तिथल्या राहण्याची, वागण्याची, एकंदर आयुष्याची आपल्याला सवय असते. त्याशिवाय दुसरं काही अनुभवलं नसल्यास ‘हे असं असतं आणि असंच मस्त असतं’ अशी मनाची पक्की समजूत असते. अशीच समजूत आणि अनुभवांचं गाठोडं सोबत घेऊन मी जर्मनीत आले. सुरुवातीला फार गोंधळायला झालं, इथे राहणं नको वाटलं. घरची आठवण येणं, मित्रमैत्रिणी हा गोतावळा इथे नसणं, हा एक मुद्दा. दुसरा म्हणजे, मला इथे सुरुवातीला मित्रमैत्रिणी बनवणं जमलंच नाही; आणि तेही मी पराकोटीची बहिर्मुख (extrovert) असूनही! याचं मुख्य कारण म्हणजे, सर्वसाधारण जर्मन माणूस हा अत्यंत प्रायव्हेट आहे. त्याच्याशी मैत्री करणं तितकं सोप्पं नाही. ढोबळमानाने भारतीय स्वभावाने Warm असतात, तर जर्मन्स Cold. एकाच ऑफिसमध्ये शेजारच्या क्युबिकलमध्ये बसून 20 वर्षं एकत्र काम करूनही, दोन कलिग्जना एकमेकांच्या घरच्यांची अजिबात माहिती नाही, असं ऐकल्यास त्यात अतिशयोक्ती बिलकूल नसेल. जर्मन्स आपलं ऑफिशियल आणि प्रायव्हेट आयुष्याची सरमिसळ होऊ न देणं पसंत करतात. याचा अर्थ त्यांच्याशी अजिबात मैत्री होऊ शकत नाही, असं नाही. पण, त्याला बराच काळ जावा लागतो; किंवा कधी कधी बराच काळ लोटूनही ते शक्य होत नाही.

इथे आल्यावर आणखी एक गोष्ट पचनी पडायला वेळ लागला, ती म्हणजे रविवारी आणि पब्लिक हॉलिडेला कुठलंही सुपरमार्केट किंवा शॉपिंगचं ठिकाण उघडं नसणे. नाही म्हणायला, शहराच्या मुख्य रेल्वे स्टेशनला संलग्न एखाददुसरं सुपरमार्केट उघडं असतं, पण त्यासाठी एवढ्या लांब कोण जाणार? भारतात वीकएंड म्हटलं की शॉपिंग आली. ऑफिस आणि घर यात आठवडा निघून गेल्यावर शनिवार आणि रविवार निवांत शॉपिंग करायची सवय आणि इथे रविवारी सगळं बंद. इथे रविवारला Ruhetag (शांततेचा दिवस) म्हणतात. त्याचा अर्थ असा की, आठवड्यातून किमान या एका दिवशी तरी कोणी काम करू नये; आणि ते सगळ्या क्षेत्रांतल्या कर्मचाऱ्यांना लागू व्हावं, म्हणून रविवारी जवळपास सगळी दुकानं बंद असतात. रविवारी विशेष शांततादेखील पाळली जाते. त्यामुळे इथे एखाद्या फ्लॅटमध्ये राहत असल्यास शेजाऱ्यांना आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून रविवारी मोठा आवाज करणारी उपकरणं (व्हॅक्युम क्लिनर, मिक्सर, ड्रिलिंग मशीन इत्यादी) वापरू नये, असा अलिखित नियम आहे.

इथे आवाजाचा नियम अलिखित असेल, तर कचऱ्याचं साग्रसंगीत विभाजन हा लिखित नियम आहे. तो न पाळल्यास प्रचंड मोठ्या रकमेचा दंड होऊ शकतो. जर्मनीत कचऱ्याचं वर्गीकरण काटेकोरपणे पाळलं जातं. फक्त सुका कचरा किंवा ओला कचरा असं नाही, तर कचऱ्याची अनेक भागांत विभागणी होते. त्यानुसार कचरा कुठे टाकायचा किंवा जमा करायचा, हेही ठरतं. कचरा घरी जमा करताना त्यासाठी नेमून दिलेल्या वेगवेगळ्या रंगाच्या पिशव्या असतात. स्वतःचं घर असल्यास, प्रत्येक घरामागे कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी वेगवेगळे डबे दिले जातात. अपार्टमेंटमध्ये राहत असल्यास प्रत्येक बिल्डिंगमागे तसेच पण मोठ्या साईझचे डबे दिलेले असतात. प्रत्येक डब्यावर तो कुठल्या प्रकारच्या कचऱ्याचा डबा आहे, हे लिहिलेलं असतं. त्यात त्याच प्रकारचा कचरा टाकायचा असतो. आठवड्यातून किंवा पंधरवड्यातून एक दिवस हा कचरा उचलला जातो. कचऱ्याचं विभाजन ढोबळमानाने चार प्रकारांत केलं जातं.

1. कागद, पुठ्ठे, कार्डबोर्ड बॉक्सेस हा पेपर बेस्ड कचरा
2. बायोडिग्रेडेबल कचरा
3. रिसायकलेबल (बहुतांशी प्लास्टिक बेस्ड) कचरा. हा कचरा घरी जमा करण्यासाठी पिवळ्या रंगाच्या पिशव्या असतात, ज्या सुपरमार्केटच्या कॅश काउंटरवर बसलेल्या व्यक्तीकडे विचारणा करून विनामूल्य घेता येतात.)
4. या व्यतिरिक्त कचरा

कचरा विभाजनासाठी सर्वसाधारणपणे चार डबे दिलेले आढळतात. या व्यतिरिक्त रद्द केलेले जुने तवे, भांडी, जुन्या मॅट्रेसेस, फर्निचर इत्यादीकरिता प्रत्येक लोकॅलिटीमध्ये राखून दिलेली सार्वजनिक जागा असते. काचेच्या रिकाम्या बाटल्यांसाठी नगरात ठराविक ठिकाणी ब्राऊन, पांढऱ्या आणि हिरव्या रंगाचे मोठे कंटेनर्स ठेवलेले असतात. प्रत्येक कंटेनरला एक गोलाकार तोंड असतं. कंटेनरच्या रंगाच्या बाटल्या (ब्राऊन काचेच्या बाटल्या ब्राऊन कंटेनरमध्ये, हिरव्या बाटल्या हिरव्या कंटेनरमध्ये इत्यादी) त्या तोंडातून कंटेनरच्या पोटात टाकायच्या. पोटात बाटली पडल्या पडल्या काचेचा खळकन आवाज होतो. तो कितीसा मोठा असेल? पण, रविवारी हेही करायला मनाई आहे; कारण त्या दिवशी Ruhetag असतो. शिवाय, रात्री उशिरा किंवा दुपारी वामकुक्षीच्या दरम्यानही काचेच्या बाटल्या या सार्वजनिक ठिकाणी टाकण्यास मनाई आहे.

सुपरमार्केटमध्ये पाण्याच्या, सोड्याच्या, बीयरच्या काही बाटल्यांवर एक डिपॉझिट (दर बाटलीमागे 8 किंवा 25 किंवा 50 सेंट्स किंवा 1 युरो) आकारलेलं असतं. त्या डिपॉझिटला Pfand म्हणतात. रिकामी झालेल्या अशा बाटल्या जमा करण्यासाठी प्रत्येक सुपरमार्केटमध्ये एक किंवा अनेक Reverse vending machines असतात. त्याला Leergutautomat म्हणतात. त्यात एकामागोमाग एक रिकामी बाटल्या टाकायच्या. जसजशा बाटल्या आत जातात, तसतसा बाटल्यांवरचा बारकोड स्कॅन होऊन प्रत्येक बाटलीमागच्या डिपॉझिटची बेरीज त्या मशीनच्या डिस्प्लेवर दिसत राहते. सगळ्या बाटल्या आत टाकल्यावर मशीनवरचं प्रिंट बटण दाबल्यास जमा केलेल्या बाटल्यांचा आकडा आणि डिपॉझिटची रक्कम दाखवणारी पेपर स्लिप बाहेर येते. त्या सुपरमार्केटमध्ये ती स्लिप देऊन रोख रक्कम घेता येते किंवा सुपरमार्केटमधून काही खरेदी केलं असल्यास, ती रक्कम बिलाच्या रकमेतून वजा होते.

जर्मनीतील सगळे सरकारी, निमसरकारी, खासगी संस्थांतील दस्तावेज (Documentation) हे जर्मन भाषेतच असतात. सुपरमार्केट, बँक्स, हॉस्पिटल्स किंवा अशा कुठल्याही ठिकाणाहून मिळालेली कागदपत्रं, बिल्स, फॉर्म्स इत्यादीही जर्मन भाषेतच असतात. सुपरमार्केट्स, हॉस्पिटल्समधला बहुतांशी स्टाफ हा जर्मन भाषेतच बोलतो. जर्मन्समध्ये इंग्लिश बोलणं हळूहळू रुजत असलं, तरी अजूनही बहुतांशी संवाद जर्मनमधूनच चालतो. ठिकठिकाणी असलेले साईनबोर्ड्स, ट्रेनमधल्या अनाऊन्समेंट्स याही जर्मन भाषेतच केल्या जातात. फ्रँकफर्टसारख्या शहरातल्या ट्रेन्समध्ये जर्मनपाठोपाठ इंग्लिश अनाउन्समेंटदेखील होते. पण, इतर अनेक शहरांत फक्त जर्मन भाषेतला आवाज ऐकू येतो. त्यामुळे जर्मनीत वास्तव्य करत असल्यास जर्मन भाषा किमान वाचता आणि बोलता येणं इथलं आयुष्य सुखकर करतं.

आयुष्यात वर्क लाईफ बॅलन्स असणं, हेही आयुष्य सुखकर करतं. हा बॅलन्स साधणं इथल्या कामाच्या पद्धतीचा एक भागही आहे आणि साध्यही. ऑफिसमध्ये वेळेत येणे, ठरलेले तास फक्त काम करणे आणि कामाची वेळ संपताच घरी निघून जाणं, हा खास जर्मन शिरस्ता. वेळेत येणं, जाणं, वेळ पाळणं हे जर्मन रक्तात भिनलं असल्यामुळे त्यांना इतरांकडूनही तीच अपेक्षा असते आणि ती पूर्ण न झाल्यास त्यांचं त्या व्यक्तीबद्दलचं मत वाईट होऊ शकतं. जर्मन्स इंडियन स्टँडर्ड टाईमसारख्या जोक्सवर हसू शकत नाहीत, कारण मुळात त्यांना ते जोक्स कळतंच नाहीत. जॉबच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कामाचे तास ठरलेले असतात. ते पूर्ण करायचे आणि घरी जायचं. कुठल्याही कारणाने आणि सलग अनेक दिवस ओव्हरटाईम होत असल्यास, ते वरिष्ठांना कळवावं लागतं. कर्मचाऱ्याचा ऑफिसमधला वेळ ऑटोमॅटिकली (कार्ड पंचिंगद्वारे) रेकॉर्ड होत असल्यास आणि तो ठरावीक थ्रेशोल्डच्या वर गेल्यास ‘तुमचा टीम मेंबर इतकं काम का करतोय?’ असं स्पष्टीकरण मागणारं ईमेल वरिष्ठांना जाऊ शकतं. वर्क लाईफ बॅलन्स हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो पाळला जायला हवा, हे त्यामागचं कारण. कुठल्याही कारणानिमित्त शनिवारी किंवा रविवारी काम करायची गरज भासल्यास त्यासाठी ह्यूमन रिसोर्सेस विभागाची आणि लेबर युनियनची आगाऊ आणि रीतसर परवानगी घ्यावी लागते आणि त्यानंतर काम केलेल्या वेळेचा योग्य मोबदला (सुट्टी किंवा रोख रक्कम) कर्मचाऱ्याला द्यावा लागतो. वर्षातून ठराविक सुट्ट्या (जनरली २९  किंवा ३०) असतात. तुम्ही काम करत असलेल्या डोमेनमध्ये किंवा त्या डोमेनेतर एखादं तांत्रिक प्रशिक्षण घ्यायचं असल्यास, त्यासाठी सुट्टी आणि बऱ्याच कंपन्यांमध्ये ते स्पॉन्सरही केलं जातं. त्याव्यतिरिक्त एखादी भाषा शिकायची असल्यास (भाषेचे बेसिक) त्यासाठी 5 दिवसांची सुट्टी घेता येते. त्या सुट्टीनंतर केलेल्या भाषेच्या कोर्सचं सर्टिफिकेट सबमिट करणं, हे अनिवार्य असतं.

मॅटर्नल आणि पॅटर्नल अँड पॅरेंटल लीव्ह ही इथली खास बाब. डिलिव्हरीच्या ६  आठवडे आधी ते डिलिव्हरीनंतर ८  आठवड्यांपर्यंत (मल्टिपल बर्थ असल्यास डिलिव्हरीनंतर १२ आठवडे) मॅटर्नल लीव्ह असते. त्या दरम्यान त्या महिलेला जवळपास पूर्ण पगार मिळतो. त्यानंतर मूल एक वर्षाचं होईस्तोवर सुट्टी घेता येते, जिला पॅरेंटल लीव्ह म्हणतात. एकूण पॅरेंटल लीव्ह ही १४  महिन्यांची असते आणि बाळाचे आई बाबा ही सुट्टी एकमेकांत विभागून घेऊ शकतात. उदाहरणार्थ आईने १०  महिने, तर बाबाने 2 महिने सुट्टी घेतली. यादरम्यान महिन्याचा ७० % पगार किंवा अमुक एक रक्कम (१८००  युरो) यापैकी जी रक्कम लहान असेल ती मिळते. त्यानंतर आणखीन २  वर्षं पॅरेंटल लीव्ह घेता येते, जी विनापगारी असते, पण जॉब सेक्युअर्ड असतो. म्हणजे एखाद्या फॅमिलीने तसं ठरवलं असल्यास, मूल तीन वर्षाचं होईस्तोवर आई सुट्टीवर राहू शकते. त्यानंतर ती कंपनीत ज्या हुद्यावर कार्यरत होती, त्याच हुद्यावर पुन्हा रुजू होऊ शकते. मूल जन्माला आल्यापासून ते १८  वर्षांचं होईस्तोवर प्रत्येक मुलामागे पालकांना दरमहा २५० युरो मिळतात, ज्याला Kindergeld (उच्चार किंडरगेल्ड, किंडर म्हणजे मुलं आणि गेल्ड म्हणजे रोख रक्कम) म्हणतात. असं ऐकिवात आहे की, जर्मनीत जर्मन्सची लोकसंख्या उतरंडीवर होती. एखादं मूल जन्माला घालणं म्हणजे त्यासाठी जॉबमधून ब्रेक घेणं आलं, मुलामागचा खर्च, पगार नसणं इत्यादी आलं. त्या दृष्टीने एखाद्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावून त्यांना प्रजननासाठी प्रोत्साहन देण्यासाठी जर्मनीत या सगळ्या योजना राबवल्या गेल्या. पण महत्त्वाची गोष्ट ही की, या योजना फक्त जर्मन्ससाठीच नाहीत, तर जर्मनीत राहण्याऱ्या प्रत्येक कुटुंबासाठी आहेत. आणि हो, पॅरेन्टल लीव्ह ही जशी मुलाच्या जन्मानंतर घेता येते, तशी ती मूल दत्तक घेतल्यानंतरही घेता येते.

जर्मनीत हेल्थ इन्शुरन्स ही महत्त्वाची बाब आहे. हेल्थ इन्शुरन्सचे पब्लिक आणि प्रायव्हेट असे दोन प्रकार असतात. नोकरी करत असाल तर हेल्थ इन्शुरन्स असणं अनिवार्य आहे. ज्याचा/जिचा हेल्थ इन्शुरन्स असतो, त्यावर १८  वर्षांखालील मुलं आणि डिपेन्डन्ट पार्टनर (स्वतः नोकरी न करत असलेला नवरा किंवा बायको) हेही इन्शुअर्ड असतात. हेल्थ इन्शुरन्स असला की, एखाद्या आजारामुळे दवाखान्यात जावं लागलं किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं, तर त्याचा पूर्ण खर्च इन्शुरन्स कंपनी करते, मग तो खर्च कितीही मोठा असो. मोठ्यांची औषधं डिस्काउंटेड असतात आणि मुलांची औषधं फ्री. हेल्थ इन्शुरन्समध्ये दातांच्या अत्यावश्यक ट्रीटमेंट्स (दात काढायला लागणे, कॅप बसवणे, रूट कॅनाल इत्यादी) देखील कव्हर्ड असतात. कर्मचारी आजारी पडल्यास आणि सलग तीन किंवा अधिक दिवस कामावरून सुट्टी घ्यावी लागल्यास, डॉक्टरांकडून सर्टिफिकेट घेऊन ते ऑफिसमध्ये आणि हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडे सबमिट करावं लागतं. रजा घेतलेल्या दिवसांचा पगार हेल्थ इन्शुरन्सकडून दिला जातो. घरी लहान मूल आजारी असल्यास आणि त्याची काळजी घेण्यासाठी आईला किंवा बाबाला रजा घ्यावी लागली, तर ती लहान मुलांसाठी पालकांना मिळू शकणार्‍या Sick Leave मध्ये मोडते. दर मुलामागे वर्षाकाठी प्रत्येक पालकाला २० दिवस अशी सुट्टी घेता येते आणि तिचा पगारही हेल्थ इन्शुरन्सकडून येतो.

जर्मन इन्कम टॅक्स हा एक रोचक प्रकार आहे. भारतात एका व्यक्तीच्या मिळकतीनुसार इन्कम टॅक्सचे स्लॅब्स आहेत, तर एका कुटुंबाची मिळकत हा जर्मन इन्कम टॅक्सचा पाया आहे. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती सिंगल असेल आणि तिला मूल नसेल, तर त्या व्यक्तीचा इन्कम टॅक्स हा सर्वात जास्त (जवळपास 40%) असतो. एका व्यक्तीचं लग्न झालं असून त्या व्यक्तीच्या लाइफपार्टनरचं आर्थिक उत्पन्न नसल्यास, हा टॅक्स बऱ्याच टक्क्यांनी कमी होतो. त्यांना मूल असल्यास टॅक्स आणखीन कमी होतो. एकाच कंपनीत एकच ग्रॉस सॅलरी असणाऱ्या दोन व्यक्तींच्या नेट सॅलरीत बरीच तफावत असू शकते आणि याला कारण जर्मन इन्कम टॅक्स स्ट्रक्चर. या इन्कम टॅक्समधला मोठा भाग हा ‘सोशल सिक्युरिटी’ कडे जातो; ज्यात हेल्थ इन्शुरन्स, नोकरीनंतरचं पेन्शन, (नोकरी गेल्यास) बेकारभत्ता, लॉन्ग टर्म केयर इत्यादी गोष्टी कव्हर्ड असतात.

जर्मनीत ढोबळमानाने सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत मुलांना दिवसा daycare किंवा Creche मध्ये ठेवता येतं. त्यासाठी आकारली जाणारी फी राहतं शहर किंवा राज्यपरत्वे वेगळी असू शकते. एका मुलावर होणाऱ्या खर्चाचा बराचसा भाग सरकारकडून दिला जातो. वय वर्षे तीन ते सहाच्या दरम्यान मुलांना दिवसा किंडरगार्टनमध्ये ठेवता येतं. हे मात्र विनामूल्य असतं. कारण ह्याचा पूर्ण खर्च सरकार करते. तेव्हा फक्त मुलांना तिथे दिल्या जाणाऱ्या जेवणाचा तेवढा खर्च पालकांना करावा लागतो. वय वर्षं सहापासून मुलांना शाळेत जाणं अनिवार्य आहे. जर्मनीत शिक्षण (शालेय किंवा महाविद्यालयीन किंवा उच्चशिक्षण) मोफत आहे. अर्थात, मुलांना एखाद्या प्रायव्हेट/ इंटरनॅशनल शाळेत/कोर्सला घालायचं असल्यास तिथे मात्र फी आहे.

जर्मनीतली शिक्षणपद्धतही निराळी. वयाची सहा वर्षं पूर्ण झाल्यावर शाळेत जाता येतं. ऑगस्ट महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होतं. ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या लोकॅलिटीमधल्या शाळेचा फॉर्म घरी येतो. तो भरून द्यायचा आणि त्या शाळेत अ‍ॅडमिशन घ्यायची. ती शाळा आवडत नसल्यास आणि काही इतर कारण असल्यास, दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याची मुभा असते, पण त्यासाठी योग्य ती कारणं द्यावी लागतात. सोबत जोडलेल्या फोटोमध्ये जर्मनीच्या शालेय व्यवस्थेची एक झलक दिली आहे (फोटो सौजन्य www.make-it-in-germany.com) वय वर्ष ६  ते १० ही चार वर्षं मूल प्रायमरी शाळेत शिकतं. त्या दरम्यान त्याची प्रगती कशी असते, यावरून पालक आणि शिक्षकांमध्ये चर्चा होते आणि मुलाचा कल, प्रगती पाहून तो त्यापुढे चारपैकी कुठल्या दिशेला जाईल हे ठरतं. सेकंडरी शाळा किंवा सेकंडरी जनरल शाळेत प्रवेश घेतलेली मुलं व्होकेशनल/टेक्निकल साईडला जातात. उदाहरणार्थ- कार्पेंटरी, प्लम्बिंग इत्यादी. कॉम्प्रिहेन्सिव्ह किंवा अ‍ॅकॅडेमिक सेकंडरी शाळेत गेलेली मुलं पुढे युनिव्हर्सिटीत जाऊन इंजिनियरिंग, मेडिकल इत्यादी दिशेला जातात. शाळेतली मुलं म्हणजे गणवेश, हे जे एक घट्ट समीकरण लहानपणापासून पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे त्याला जर्मनी तडा देते. इथे शाळेतल्या मुलांना युनिफॉर्म नसतो.

जर्मन माणूस हा आधी लिहिल्याप्रमाणे खूप प्रायव्हेट आहे. आठ तास ऑफिस आणि त्यानंतर घरी. घरून लागलीच एखाद्या जिममध्ये नाहीतर वॉक किंवा जॉगिंगसाठी बाहेर रस्त्यावर. जर्मन जेवण तसं काही खास नाही आणि वेळखाऊ तर अजिबात नाही. कोविडकाळाच्या आधी जेव्हा आम्ही सगळे ऑफिसमध्ये जाऊन काम करायचो, तेव्हा बहुतांशी जर्मन्ससाठी ऑफिसमधलं लंच हे दिवसातील सर्वात प्रमुख अन्न असायचं. मग घरी गेल्यावर भूक लागली, तर एखादं सॅन्डविच किंवा सूप किंवा सॅलड, तेवढंच डिनर. वर्षभर नोकरी करायची आणि त्यातून साठवलेली रक्कम एखाद्या Exotic holiday वर जाऊन खर्च करायची. स्वतःच्या भविष्यासाठी किंवा पुढल्या पिढीसाठी आर्थिक तरतूद करणे, हे जर्मन कल्चरमध्ये बसत नाही. कारण त्यासाठी सोशल सेक्युरिटी आहे. जनरली मुलं १८ -१९  वर्षांची झाली की, शिक्षणासाठी/नोकरीसाठी घराबाहेर पडतात; शिकतात, पार्ट टाईम जॉब्स करतात, शिक्षणातून, जॉबमधून ब्रेक घेऊन साठवलेल्या मिळकतीतून दुसऱ्या एखाद्या देशात फिरून येतात; पुढे शिकतात किंवा नोकरीधंदा करतात. घरातून बाहेर पडलेल्या मुलांचे पालकांशी संबंध कसे असतात, हे कुटुंबपरत्वे भिन्न असतं. पण, मी जवळून पाहिलेल्या उदाहरणांमध्ये मला फार भावनिक गुंतवणूक दिसली नाही. हे दोन्ही बाजूंना होताना पाहिलं आहे. आईवडील आणि घरातून बाहेर पडलेली मुलं यांच्यामध्ये महिन्यातून एखादादुसरा फोन आणि ख्रिसमसला एकमेकांच्या घरी जाणे, हे एका टिपिकल जर्मन कुटुंबाचं चित्र असू शकतं.

लहान मुलांसोबत थिएटरला, पार्कमध्ये, स्विमिंग पूलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये, आईस्क्रीम पार्लरला बसलेलं जर्मन कुटुंब हे चित्र सर्रास दिसतं. इथे नॉर्मली जून-सप्टेंबर असे चार महिने दिवस मोठे असतात, तापमान फार थंड नसून सूर्यप्रकाश भरपूर असतो आणि त्या दरम्यान टिपिकल जर्मन कुटुंब घराबाहेर जास्त दिसतं. सज्ञान झालेली मुलं घराबाहेर पडतात आणि त्यानंतर त्यांचं आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगतात. आयुष्यात पुढे काय करायचं, शिकायचं की नोकरी करायची, कोणासोबत राहायचं, लग्न करायचं की नाही, इत्यादी सगळेच निर्णय स्वतः घेतात. एकदा इथल्या मित्रमैत्रिणींसोबत बोलताना लग्न ह्या विषयाची चर्चा सुरू होती. भारतातली अरेंज्ड मॅरेज ही संकल्पना ऐकून त्यांना आश्चर्य आणि मौज वाटली. इथे हा कॉन्सेप्ट नाही. इथे मुलं (भिन्नलिंगी, समलिंगी) एकमेकांच्या प्रेमात पडतात. एकमेकांना काही काळ डेट केल्यानंतर जर दोघांना एकमेकांबद्दल त्याच भावना असतील, तर पुढची पायरी असते लिव्ह इन रिलेशनशिपची. माझ्या माहितीत अशा काही जोड्या आहेत, ज्या अनेक वर्षं एकमेकांच्या प्रेमात असून एकत्र राहत आहेत, पण त्यांनी लग्न केलं नाही. काहीजण लग्नही करतात. पण, लग्न करणे अनिवार्य नाही. लग्न न करता एकत्र राहणं इथे कॉमन आहे. ज्यांचं प्रेमप्रकरण होत नाही किंवा टिकत नाही किंवा अनेक कारणांमुळे जे सिंगल असतात, त्यांच्यासाठी टिंडरसारखे प्लॅटफॉर्म्स आहेत. त्यावर काही लोकांना चांगले, तर काहींना अत्यंत वाईट अनुभव आहेत. त्या पार्श्वभूमीवर एक मैत्रीण भारतातलं आईवडिलांनी मुलांच्या लग्नासारख्या गोष्टीत इन्व्हॉल्व्ह्ड असणं तिला आवडलं, असं म्हणून गेली. आपल्याला ओळखणारे, आपली काळजी करणारे कोणीतरी आहेत, जे आपल्या साथीदाराच्या निवडीत आपल्यासोबत आहेत, ही गोष्ट तिला फार reassuring वाटली. त्याउलट आपल्याकडे अनेकवेळा मुलांच्या पसंतीचा जोडीदार त्यांच्या आईवडिलांना रुचत नसल्यामुळे घोडं असून बसतं आणि मुलांना स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेता न आल्याचं शल्य असतं. The grass is greener on the other side. लग्न करायचं की नाही, ह्याबाबत क्लियर असणारे जर्मन्स मूल हवं की नको, या बाबतही क्लिअर आहेत. मूल होणं ही लग्न होण्याच्या पुढची नैसर्गिक पायरी नाही. मूल होण्यासाठी लग्नाच्या बंधनाची आवश्यकता नाही. मुलाच्या फॉर्मवर त्याचे बायोलॉजिकल पेरेंट्स असणारे एकमेकांचे नवरा बायको असतीलच, असं नाही.

आधी नमूद केल्याप्रमाणे जर्मनीत जर्मन्सशी लोकसंख्या उतरंडीवर असल्यामुळे सरकारने लोकांनी मुलं जन्माला घालावीत म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी बऱ्याच योजना राबवल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान जर्मनीची अपरिमित हानी झाली होती. त्यातून जर्मनीची उभारणी करण्यासाठी लोकसंख्याही नव्हती. म्हणून १९५०  च्या सुमारास खास करून ब्ल्यू कॉलर्ड जॉब्ससाठी जर्मनीने आपले दरवाजे उघडले आणि तुर्कस्थानातून बरेच लोक इथे कामानिमित्त आले, राहिले, स्थायिक झाले. आज त्यांची तिसरी पिढी इथे राहतेय. दुसरं महायुद्ध ज्या कारणामुळे झालं, त्या कारणाचं ओझं जर्मनीने कैक वर्ष वागवलं. किंबहुना तो गिल्ट अजूनही आहे. हिटलर आणि त्याचा युनिफॉर्म हा इतिहास शाळेतल्या मुलांना अजूनही युनिफॉर्म नसण्याला कारणीभूत आहे, असं ऑफिसमधल्या सहकाऱ्यांशी चर्चा करताना समजलं. हिटलर, त्याचा नाझीवाद यावर उघड चर्चा होत नाहीत. त्यातून कोणी चुकीचा बोध घेऊन त्याचा पुरस्कार करायला नको, ही त्यामागची भावना. वर्णद्वेषी, वंशद्वेषी विचारधारा ह्या देशात पुन्हा अजिबात रुजायला किंवा वाढायला नको, यासाठी पॉलिसीज आहेत. ज्या ऑफिसेसमध्येही राबवल्या जातात. त्याचबरोबर जर्मनीत बाहेरून येणाऱ्या आणि दीर्घकाळ/कायमस्वरूपी लोकांना जर्मनीतल्या संस्कृतीत मिसळता यावं, याकरितादेखील प्रयत्न होत असतात. जर्मन भाषेचे कोर्सेस, जर्मनीत इंटेग्रेट करणारे कोर्सेस अश्या अनेक कोर्सेसमध्ये ऐच्छिक भाग घेता येतो. हे कोर्सेस विनामूल्य असतात किंवा कंपनीतर्फे स्पॉन्सर्ड असतात.

जर्मन bureaucracy हा एक सुरुवातीला किचकट वाटणारा प्रकार आहे. उदाहरणार्थ, इथे राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी ब्ल्यू कार्ड (ब्ल्यू कार्ड हे इथलं टेम्पररी रेसिडंट परमिट आहे, ज्याची वैधता जास्तीत जास्त चार वर्षांची असते) किंवा PR (पर्मनन्ट रेसिडेन्सी) किंवा नागरिकत्व मिळवणे. पण, इथे काही काळ राहिल्यावर आणि अशा अनेक प्रोसेसेसमधून गेल्यावर जाणवतं की, हे प्रकरण वेळखाऊ असलं, तरी त्यात सगळं प्रोसेसवरच चालतं. तुमच्याकडे त्या त्या गोष्टीची पात्रता असली आणि ते दाखवणारी योग्य कागदपत्रं असली की, त्या प्रोसेसमध्ये कुठेही अडथळे येत नाहीत.

जर्मनीतल्या कार्स कितीही फेमस असल्या, तरी इथे कारवाचून काही अडत नाही. लांब पल्ल्याच्या ट्रेन्स, फास्ट ट्रेन्स, सुपरफास्ट इंटरसिटी एक्सप्रेस ट्रेन्स, ट्राम्स, बसेस ह्यांनी इथली राज्यं, शहरं, गावं आणि त्यातली ठिकाणं एकमेकांशी जोडली आहेत. मोठ्यांसोबत पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करणाऱ्या वय वर्ष 14 खालील मुलांना तिकिटाची आवश्यकता नसते. युक्रेन-रशियाच्या युद्धामुळे जर्मनीत इंधनाची मोठी समस्या निर्माण झाली होती. पेट्रोल-डिझेलचे भाव बरेच वाढले होते. त्यावर तोडगा म्हणून जास्तीत जास्त लोकांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरावं म्हणून स्पेशल ऑफर्स देण्यात आल्या. बऱ्याच लोकांनी पर्सनल कार न वापरता ट्रेन्स, ट्राम्स वापरल्यामुळे इंधनबचत आणि हवेतील प्रदूषण कमी करणे ह्या दोन्ही गोष्टी साध्य झाल्या. सध्या Deustchland Ticket ही ऑफर सुरू आहे. हे तिकीट एका महिन्याचं आहे (म्हणजे ऑगस्टच्या कुठल्याही तारखेला घेतलं, तरी त्याची व्हॅलिडिटी ऑगस्ट महिन्याची आहे) आणि त्याची किंमत आहे 49 युरो. सुपरफास्ट ट्रेन्स आणि स्पेशल ट्रेन्स वगळून इतर कुठल्याही पब्लिक ट्रान्सपोर्टने ह्या तिकिटात एका महिन्यात अख्ख्या जर्मनीभर प्रवास करता येतो. ही ऑफर जुलै महिन्यात सुरू झाली. जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून ते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जर्मनीत सर्वसाधारणपणे शाळांना उन्हाळी सुट्ट्या असतात. त्या दरम्यान अनेक कुटुंबं फिरायला जातात. त्यांना अशा ऑफर्सचा भरपूर लाभ घेता येतो.

जून-जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर हे महिने, म्हणजे जर्मनीतले प्रवासाचे महिने. कारण दिवस मोठे असतात आणि रात्र छोटी. भरपूर सूर्यप्रकाश आणि जॅकेट घालायची गरज नसणारं तापमान. पण, कोणी शारीरिकदृष्ट्या धडधाकट नसेल तर? वयोमानामुळे किंवा अपंगत्वामुळे व्हीलचेअर वापरावी लागत असेल तर? कसा करणार प्रवास? जर्मनीतली ट्रेन स्टेशन्स, ट्रेन्स, ट्राम्स, बसेस, शहरं (निदान मी फिरलेली शहरं) व्हीलचेअर फ्रेंडली आहेत. व्हीलचेअरवर असलेली व्यक्ती कोणाच्याही आधाराशिवाय बऱ्याच प्रमाणात पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरून प्रवास करू शकते आणि असे बरेचजण प्रवास करताना मी पाहिले आहेत.

तर…अशी आहे जर्मनी. कुठलाही देश कसा आहे, हे ठरवण्याचे प्रत्येक व्यक्तीचे निकष वेगवेगळे असू शकतात. माझ्या मते ज्या देशात एका सामान्य व्यक्तीचं जीवन सुखकर असेल आणि ते आणखीन सुखकर, सोप्पं व्हावं म्हणून प्रयत्न केले जात असतील, तो देश सर्वार्थाने एक प्रगत देश आहे. या न्यायाने आणि या लेखाच्या अनुषंगाने मी जर्मनी कशी आहे, हे वेगळं सांगायला नको ना?

(‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२३)
——————–

(लेखिका IT Consultantअसून एक आंतरराष्ट्रीय कंपनीत कार्यरत आहेत. त्या एक दशकापासून जर्मनीत राहतात. लिहिणे ही त्यांची Passion आहे.)

[email protected] 

http://www.facebook.com/CrimeMasterGoGo1

Previous articleकालचं गाव आज झालंय कसं…
Next articleराष्ट्रपिता जोतिबा फुले अभ्यासिका : सामाजिक संचित निर्माण करणारी चळवळ
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.