-संजय आवटे
“तथागत गौतम बुद्धांएवढा बुद्धिमान, प्रगल्भ, परिपूर्ण माणूस जगाने आजवर पाहिलेला नाही. बुद्धांच्या सामर्थ्याचा एक थेंब माझ्याकडे असता, तरी खूप झाले असते! एवढा थोर तत्त्वचिंतक कोणीच आजवर बघितला नाही. असा शिक्षक यापूर्वी कधी होऊन गेला नाही. काय सामर्थ्य होते पाहा. जुलमी ब्राह्मणांच्या सत्तेसमोरही हा माणूस वाकला नाही. उभा राहिला. तेवत राहिला…”
हे कोण म्हणतंय?
साक्षात स्वामी विवेकानंद.
हिंदुत्वाचा ध्वज जगभर घेऊन जाणारे विवेकानंद १९०० मध्ये तथागत गौतम बुद्धांविषयी कॅलिफोर्नियात बोलत होते.
भारताची जगभरातली खरी ओळख आजही ‘बुद्धांचा देश’ हीच आहे. भलेही त्यांचे जन्मगाव असणारे लुंबिनी आता नेपाळमध्ये असेल, पण बुद्ध आपले आणि आपण सारे बुद्धांचे.
‘बुद्धांशी तुलना होईल, असा एकही माणूस नंतर जन्मलाच नाही’, असे आचार्य रजनीशांनी म्हणावे!
बुद्ध थोर होतेच, पण बुद्धांची खरी थोरवी अशी की, आपण प्रेषित असल्याचा दावा त्यांनी कधी केला नाही. येशू, पैगंबर, कृष्ण यांच्याविषयी आदर स्वाभाविक आहे. पण, बुद्ध हे या इतरांप्रमाणे प्रेषित नव्हते. स्वतःला परमेश्वर मानत नव्हते. मला सगळं जगणं समजलंय, असा त्यांचा दावा नव्हता. मीच अंतिम आहे, असे बुद्ध कधीच म्हणाले नाहीत. डॉ. आ. ह. साळुंखे म्हणतात त्याप्रमाणे, “अन्य धर्मसंस्थापकांनी लोकांना कर्मकांडाची चाकोरी दिली. त्या चाकोरीने बांधून टाकले. तथागतांचा धम्म ही विचारांची चाकोरीबद्ध मांडणी नव्हती. चाकोरी तोडून मुक्त करणारा धर्म बुद्धांनी सांगितला.”
‘प्रत्येकामध्ये पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्णत्व दडलेले आहेच’, असे विवेकानंद म्हणाले, तो प्रभाव बुद्धांचाच तर होता. तुम्ही सगळं जग ओळखलं, पण स्वतःला ओळखलं नाही. म्हणून तर स्वतःला शरण जा, असे तथागत म्हणाले. ‘बुद्धं सरणं गच्छामि’ म्हणजे अन्य काही नाही. स्वतःला शरण जा, हाच त्याचा अर्थ. “कोणी काही सांगेल, म्हणून विश्वास ठेऊ नका. उद्या मीही काही सांगेल. म्हणून ते अंतिम मानू नका. पिटकात एखादी गोष्ट आली आहे, म्हणून विश्वास ठेऊ नका”, असं म्हणाले बुद्ध.
जगातला एक धर्म सांगा, एक धर्मसंस्थापक सांगा, की जो स्वतःची अशी स्वतःच चिरफाड करतो! चिकित्सेची तयारी दाखवतो!
‘भक्त’ वाढत चाललेले असताना, विखार ही मातृभाषा होत असताना आणि ‘व्हाट्सॲप फॉरवर्ड’ हेच ज्ञान झालेलं असताना बुद्धांचा हा दृष्टिकोन आणखी समकालीन महत्त्वाचा वाटू लागतो.
माणूस बदलतो, यावर बुद्ध विश्वास ठेवतात. कोणीही मानव बुद्ध होऊ शकतो, याची हमी देतात. मात्र, स्वतःला शरण जा, हीच पूर्वअट सांगतात.
ज्याला बुद्ध समजला, त्याला ‘सो कॉल्ड सक्सेस’वरची गल्लाभरू पुस्तकं वाचण्याची काही गरज नाही. ‘अत्त दीप भव’ म्हणणारे बुद्ध तुमच्या आत असलेला दिवा प्रकाशमान करत असतात. दिवा असतोच आत, पण काजळी एवढी चढते की, आपण आपल्यालाच अंधारकोठडीत ढकलून देतो.
बुद्ध जगात दुःख आहे, हे मान्य करतात. पण दुःखावर मात करण्याचं बळ देतात. दुःख आहे, हे समजायला तर हवंच. मग त्याचं स्वरूप शोधायला हवं, अशा वाटेनं जात तुमच्या आयुष्यात बुद्ध आनंदाची उधळण करतात. जन्मापूर्वी काय आणि मृत्यूनंतर काय, अशा कोणत्याही हुबासक्या न मारता, बुद्ध जीवनाविषयी बोलतात. जगण्याविषयी बोलतात. त्यातला प्रत्येक पदर उलगडून दाखवतात. अगदी झोपेवर बोलतात आणि आहारावरही. मैत्रीवर बोलतात आणि संसारावरही. आधुनिक मानसशास्त्रज्ञांनाही बुद्ध थक्क करतात. मनाची गुपितं उघड करतात आणि मानवी मनाचं विश्वरूपदर्शन घडवतात.
बुद्ध माझ्या आयुष्यात आले ते डॉ. प्रदीप आवटे यांच्या ‘धम्मधारा’ या पुस्तकामुळे. बुद्ध एवढा रसाळ, सोपा आहे; तो कोणी परका नाही. तो तर ‘मित्र’ आहे, असे वाटले ‘धम्मधारा’ हा कवितासंग्रह वाचताना. डॉ. आवटे म्हणजे तेच, जे आज ‘कोरोना’विषयी अखंड बोलताहेत आणि अथक लढताहेत. त्यांच्या शब्दातून मी बुद्धाची ‘करूणा’ही वाचलीय! विनोबांनी जे ‘गीताई’त केलं, गदिमांनी ‘गीतरामायणा’त केलं, त्यापेक्षाही महत्त्वाचं काम बुद्धांच्या संदर्भानं ‘धम्मधारा’नं केलं. मलाच काय, अनेक साध्यासुध्या मराठी माणसांना बुद्ध त्यामुळं समजला.
बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचं संस्कृत भाषांतर करावं, अशी इच्छा काही शिष्यांनी व्यक्त केली होती. त्यावर बुद्ध भडकले होते. संस्कृतला त्यांचा विरोध नव्हता. पण, जी कोणाचीच मातृभाषा नाही, त्या भाषेत माझे तत्त्वज्ञान कशाला? मूठभरांना मिरवण्यासाठी हे तत्त्वज्ञान नव्हतेच. सर्वसामान्य माणसासाठी बुद्ध मांडत होते. त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवू पाहात होते. भाषेवरून आठवलेः संवादाची आवश्यकताही बुद्ध एके ठिकाणी सांगतात. आणि, मतभेद असले तरीही भाषेचा स्तर घसरता कामा नये, हेही स्पष्ट करतात.
बुद्धांनी सगळ्यात महत्त्वाचे काय केले?
एक प्रसंग आहे. बुद्ध कोसल देशात विहार करत होते. झाडाखाली झोपले होते. तेव्हा एक ब्राह्मण तिकडे अग्निहोत्र करत होता. तो ब्राह्मण बुद्धांना प्रसाद देण्यासाठी गेला. पण, आधी त्याने बुद्धांना जात विचारली. तेव्हा, बुद्ध म्हणाले, “जात नको विचारूस. आचरण विचार.” पुढे बुद्ध त्याला म्हणाले, “हे ब्राह्मणा, यज्ञात लाकूड जाळून शुद्धी मिळत नाही. मी लाकूड जाळत नाही. आंतरिक ज्योती उजळवतो. माझा हा अग्नी नित्य प्रज्वलित असतो!” त्यांचे हे विचार ऐकून ब्राह्मण प्रभावित होतो आणि त्यांना भोजनाचा आग्रह करू लागतो. तेव्हा, बुद्ध म्हणतातः “जेथे मी धम्माचा उपदेश करतो, तेथे भोजन करत नाही.”
बुद्ध तपस्वी खरेच, पण तसेच जिप्सीही. ते विलक्षण संघटकही होते. अमोघ वक्ते होते. अभिव्यक्तीची अनेक माध्यमे त्यांनी प्रातिभ शैलीने हाताळलेली दिसतात. तुकडोजी महाराज म्हणतात त्याप्रमाणे, हातात तलवार न घेता बुद्धांनी जगावर राज्य केले. अशोकासारखे जगज्जेते सम्राटही बुद्धाच्या वाटेने चालू लागले. तेही त्या काळात. (इ.स.पू ६२३ – ५४३ हा बुद्धांचा काळ मानला जातो. ८० वर्षांचे आयुष्य बुद्ध जगले.) बुद्धांनी संघ स्थापन केला. संघामुळेच धम्म जगभर पोहोचला. बुद्धांचे अपहरण करणा-यांनी बुद्धाला विष्णूचा अवतार तर केलेच, पण पुढे ‘संघ’ हा शब्दही चोरला. बुद्धांना ‘भगवान’ म्हणतात, ते ‘भगवा’ यावरून आले आहे. पण, या भगव्या रंगाचेही अपहरण झाले. माणूस मोठा झाला की त्याचे अपहरण करायचे, पण त्याच्या विचारांच्या विपरित वागायचे! हा डाव कळला नाही, म्हणून बुद्धाचेही बोट आपण सोडले. बुद्धांच्या निधनानंतर चारशे वर्षांनी ‘मनुस्मृती’ येते, याची आणखी कारणपरंपरा कोणती सांगणार?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला पुन्हा ख-याखु-या बुद्धाची वाट दाखवली. प्रज्ञा, शील, करूणा आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता सांगणारा- ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ सांगणारा बुद्ध बाबासाहेबांना प्रकाशमान करणे अगदीच स्वाभाविक होते. बुद्ध म्हणजे असा प्रकाश आहे, जो अनुभवता येतो. भरून घेता येतो, असे बाबासाहेब सांगतात.
रजनीश म्हणतात त्याप्रमाणे, बुद्धाचे खरे वेगळेपण हेच की त्याला स्पर्श करता येतो. बाकी सगळे धर्म धमकावत असताना, हा आईच्या मायेने जवळ घेतो. मनात घर करतो. आणि, मुख्य म्हणजे, त्याला शोधायला कुठे हिमालयात जावे लागत नाही. अगदी बाहेरच्या चौकात बुद्ध भेटतो.
बुद्ध बाहेर भेटत असला, तरी तो असतो तुझ्या-माझ्या मनात.
गोंधळलेल्या अर्जुनाला साक्षात परमेश्वर विश्वरूपदर्शन देतात. परमेश्वराला शरण ये, असे सांगत स्वतःच्या दैवी प्रकाशाने थक्क करतात. मग, युद्धाचा मार्ग सांगतात. इथे मात्र गोंधळलेल्या अर्जुनांना ‘तू स्वतःलाच शरण जा. तुझ्यातला प्रकाश तुला सापडेल’, असे समजावत बुद्ध युद्धाची नव्हे, तर शांतीची- प्रेमाची दिशा दाखवतात.
हेही नक्की वाचा -वैशाखातील चंद्रकळा: यशोधरा –https://bit.ly/3yC9zux
बाबासाहेब म्हणतात त्याप्रमाणे, संपन्न शेतकरी कुटुंबातला हा सिद्धार्थ.
आपल्यासारखाच गोंधळलेला सिद्धार्थ ‘बुद्ध’ होऊ शकतो. तर, तू का नाही? मी का नाही?
व्यवस्थेला शरण जाणारे तू नि मी स्वतःला शरण का जात नाही?
गृहत्यागानंतर सिद्धार्थला समजले, ते बुद्ध सोबत असताना गृहवासात आपल्याला का समजणार नाही?
आजचा दिवस आहे, हाच प्रश्न या गृहवासात स्वतःला विचारण्याचा.
‘अत्त दीप भव’ हाच तर ‘पासवर्ड’ आहे ‘बुद्ध’ होण्याचा!
…………………….