शरणकुमार लिंबाळे यांची व्यवस्थेला नकार  देणारी- ‘सनातन’

-अरुण खोरे

……………

भारताच्या साहित्यविश्वाला एक वेगळी कलाटणी देणारी बातमी मार्च महिन्यात आपल्या सर्वांना वाचायला मिळाली. मराठीतील नामवंत लेखक आणि समीक्षक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या सनातन या कादंबरीला के.के.बिर्ला  फाऊंडेशनचा सरस्वती सन्मान पुरस्कार गौरव जाहीर झाला.

यापूर्वी मराठीतील भालचंद्र नेमाडे आणि महेश एलकुंचवार या दोन ज्येष्ठ लेखकांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. तिसरा पुरस्कार इतक्या वर्षांनी लिंबाळे यांच्या सनातन कादंबरीला जाहीर झाला.

भारतीय साहित्य सृष्टीने अतिशय हार्दिकपणे, अंतःकरणपूर्वक लिंबाळे यांच्या पुरस्काराचे कौतुक केले, त्यांचा गौरव केला.

खरे सांगायचे तर मराठी समीक्षकांच्या चाळणीतून आणि हातातून ही कादंबरी निसटून गेली होती. त्यामुळे सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर झाल्यावर सनातनची चर्चा सुरू झाली. भारतातील अनेक प्रादेशिक भाषांमधून आणि या भाषांमधील अनेक वृत्तपत्रांनी, साप्ताहिक, नियतकालिकांनी गेले तीन महिने या कादंबरीचे कौतुक करत या पुस्तकावर जी परीक्षणे लिहिली, त्या निमित्ताने शरणकुमारच्या मुलाखती घेतल्या; त्यातून एक गोष्ट ठळकपणे अधोरेखित झाली.

गेली अनेक वर्षे मराठी समीक्षकांनी आणि साहित्य विश्वाने दुर्लक्षिलेल्या शरणकुमार लिंबाळे यांना भारतातील सर्व प्रमुख प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादाच्या माध्यमातून आपल्या कादंबऱ्यांना आणि समीक्षा लेखनाला एक विशेष स्थान मिळत गेले होते आणि त्यांनी ते सातत्यपूर्ण लेखनाच्या जोरावर आणि सामाजिक विषमता टिपण्याच्या भूमिकेतून मिळवलेले होते.

सरस्वती सन्मानाच्या निमित्ताने मराठी साहित्य समीक्षेला नव्याने शरणकुमार लिंबाळे यांचा चेहरा दिसला आणि त्यांच्या साहित्याची पुन्हा एकदा नीट ओळख झाली. शरणकुमार हे खूप विविध विषयावर लिहिणारे असे लेखक आणि समीक्षक आहेत.

‘अक्करमाशी’ या त्यांच्या आत्मकथेने त्यांना मराठी साहित्यात स्थान मिळाले आणि त्यानंतर त्यांचा प्रवास सुरू झाला. ते अतिशय चांगले संवेदनशील कवी आहेत, राजकीय, सामाजिक भाष्यकार आहेत.. आणि तरीही त्यांच्या एकूण लेखनाकडे मराठी समीक्षकांनी फारसे गंभीरपणे पाहिले नाही, हेही लक्षात येते.

या पार्श्वभूमीवर सरस्वती सन्मानामुळे या समीक्षक विश्वाला पुन्हा एकदा शरणकुमार लिंबाळे यांच्या साहित्याची, त्यांच्या पुस्तकांची दखल घेणे भाग पडले आहे.

विषयांची विविधता, साहित्य प्रकारांचे वेगळेपण या सर्वांचे एक वेगळे आणि व्यापक असे दर्शन शरण कुमार यांच्या साहित्यातून होते. त्यांच्या साहित्याकडे एक नजर टाकली तरी या लेखकाने किती फॉर्ममध्ये आणि कोणकोणत्या विषयांमध्ये आहे याचा लिहिले आहे, याचा अंदाज येतो.

मी वर उल्लेख केल्याप्रमाणे ते चांगले कवी आहेत आणि त्यांच्या नावावर तीन कवितासंग्रह आहेत. जात वास्तव टिपणाऱ्या अनेक कथा त्यांनी लिहिल्या आहेत. ‘हरिजन’, ‘रथयात्रा’, ‘दलित ब्राह्मण’ आणि ‘बारा माशी’ हे त्यांचे कथासंग्रह आहेत. अनेक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. ‘भिन्नलिंगी’, ‘उपल्या’, ‘हिंदू’, ‘बहुजन’, ‘झुंड’,’ओ’ आणि ‘सनातन’ या त्यांच्या कादंबऱ्या.

राजकीय आणि सामाजिक विषयावरील संपादन केलेले अनेक ग्रंथ या नोंदीत आहेत. मुख्यतः दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र, दलित साहित्य आणि सौंदर्य, दलित आत्मकथा: एक आकलन, ब्राह्मण्य हे ग्रंथ यात आहेत.

मराठी साहित्यात शरणकुमारांची नोंद अगदी आरंभी घेतली गेली ती १९८४/८५ साली प्रसिद्ध झालेल्या अक्करमाशी या त्यांच्या  आत्मकथेने. या आत्मकथेच्या आधारावर एकविसाव्या शतकाच्या आरंभी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने अक्करमाशीचे इंग्रजी भाषांतर प्रकाशित केले. या बरोबरच त्यांचे अनेक ग्रंथ विशेषत: दलित साहित्याची समीक्षा करणारे, हे इंग्रजीमध्ये अनुवाद रुपाने प्रसिद्ध झाले आहेत.

भारतातील हिंदी, कन्नड, गुजराती, पंजाबी, मल्याळम, तमिळ, उर्दू ,तेलुगु आणि बंगाली या भाषांमध्ये त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. या सर्व बहुतेक भाषांमध्ये अक्करमाशी ही त्यांची आत्मकथा आणि दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र ही पुस्तके अनुवादरुपाने प्रकाशित झाली आहेत.

………

मराठी साहित्यात १९७० नंतरच्या काळात दलित साहित्याचा प्रवाह  सशक्त होत असताना कवितेपाठोपाठ दलित तरुणांच्या आत्मकथांनी एक वेगळे समाजजीवन समोर ठेवले. एका प्रकारे आपल्या समाजाची झाडाझडती घेतली.

‘आठवणींचे पक्षी’, ‘बलुतं’, ‘उपरा’, ‘उचल्या’ या पुस्तकांच्या पाठोपाठ दलित साहित्याला एक वेगळाच पैलू देणारा आणि यांचेही जग आहे याकडे आपले लक्ष वेधणारे पुस्तक समोर आले -शरणकुमार लिंबाळे यांची ‘अक्करमाशी’ ही आत्मकथा. या मुलाला आपल्या वडिलांचे नाव माहीत नाही, अशा एका अर्थाने अनौरस असलेल्या  मुलाची ही कथा मराठी साहित्याला नवीन होती आणि अशा बाप माहीत नसलेल्या मुलाच्या लेखणीतून आपल्या समाज जीवनाचे एक जुलमी पुरुषप्रधान स्वरूप बाहेर पडले!  असा हा वेगळाच लेखक होता.  आपला जन्म, आपले बालपण, शिक्षणातील एकूण टक्केटोणपे आणि एक संसारी गृहस्थ म्हणून जीवन सुरू करताना होत असलेली कोंडी असे एक चित्र या आत्मकथनातून वाचायला मिळाले.

आज अक्करमाशी सर्व भारतीय भाषांमध्ये पोहोचलेली आहे. अक्करमाशीची सुरुवात आपले काळीज  फाडून टाकते!

त्याची सुरुवात अशी आहे:

“महारोगाचा चट्टा लपवून ठेवावा तसं हे जीवन लपवून ठेवावं वाटायचं मला. माझा इतिहास माझ्या आईपुरता सांगता येईल. जास्त झालं तर आईच्या आईपुरता. यापलीकडे मला माझं कोण नाही. यापलीकडे मला माझं कूळ नाही.”

…………………..

आपली  आई अस्पृश्य असल्यामुळे दलित समाजाच्या वेदना आणि दुःख यांचा भोगवटा शरणकुमारसमोर होता. त्यामुळे या आत्मकथेचा शेवटही इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारतच झाला आहे.

अक्करमाशीची पाचवी आवृत्ती प्रकाशित होत असताना लेखकाने जी प्रस्तावना लिहिली आहे, त्यातून इथल्या वर्णीय आणि प्रस्थापित जातीव्यवस्थेला प्रश्न विचारणे आणि व्यापक अर्थाने त्याविरुद्ध एक सामाजिक युद्ध पुकारणे ही भूमिका देखील स्पष्टपणे लक्षात येते.

शरणकुमार प्रस्तावनेत लिहितात : ” दलित चळवळ महायुद्ध आहे; दलित साहित्य महाकाव्य आहे, अशी माझी श्रद्धा आहे. देशात कोठेही झालेला स्त्रीवरचा  अत्याचार मला माझ्या आईवरचा वाटायचा. दलितांवरील अन्याय अत्याचाराच्या बातम्या वाचल्या की, अस्वस्थ व्हायचो. अशीच अवस्था तमाम दलित तरुणांची आहे. हा सर्वांच्या मनातील असंतोष आम्हाला एकत्र करायचा आणि आम्ही प्रतिकाराची चर्चा करायचो. अशी दलित चळवळ मनात मूळ धरायची.”

ही प्रस्तावना वाचल्यानंतर आणि अक्करमाशी पूर्णपणे वाचल्यावर हे गोष्ट जाणवते आणि ती म्हणजे त्यानंतरचा शरणकुमार लिंबाळे यांचा प्रवास या विविध विषयांच्या अभ्यासातून आणि साहित्याच्या विविध प्रकारातून झाला, त्या प्रवासाचे एक बीज निश्चितपणे अक्करमाशीमध्ये पडलेले होते. त्याचाच विकास एका व्यापक सामाजिक संघर्षाच्या अध्यायाची कहाणी सनातनच्या रूपातून पूर्ण झाला असे म्हटले पाहिजे.

सनातन कादंबरीच्या प्रकाशनाची तारीख आहे १ जानेवारी २०१८. हा दिवस आता भारताच्या सामाजिक इतिहासात नोंदला गेला आहे. भीमा कोरेगाव येथे ब्रिटिशांच्या सैन्यात असलेल्या  काहीशे महार सैनिकांनी पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याचा जो पराभव केला, ती घटना एक अस्मितेचा मानबिंदू म्हणून अस्पृश्य समाजाच्या इतिहासात नोंदली गेली आहे. ही घटना घडली, दि. १ जानेवारी १८१८ रोजी. या घटनेची १ जानेवारी  २०१८ रोजी द्विशताब्दी  होती. त्यामुळे पुणे-नगर रस्त्यावरील भीमा कोरेगाव जवळच्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंची गर्दी उसळली होती. त्यानंतर जे काही झाले, त्याच्या तपशिलात येथे मी जात नाही.

शरणकुमार लिंबाळे यांनी आणि त्यांच्या प्रकाशकांनी जाणीवपूर्वक १ जानेवारी २०१८ रोजी ही  कादंबरी प्रकाशनासाठी सिद्ध केली, ही नोंद आवर्जून केली पाहिजे. कारण सनातन कादंबरीमध्ये शरणकुमार यांनी ज्या वर्णीय आणि प्रस्थापित व्यवस्थेला लक्ष केले आहे, त्यामुळे भीमा कोरेगाव, भीमा कोरेगावचा विजय स्तंभ, अस्पृश्य महार सैनिकांची शौर्यगाथा आणि येथील पारंपारिक, पोलादी अशा विषम समाजव्यवस्थेने अस्पृश्य आणि आदिवासी समाजाची केलेली कोंडी या सगळ्यांचा एक लेखाजोखा आहे.

सनातनची प्रस्तावना फार मोठी नाही. लेखकाने आपण कोणत्या संदर्भ साहित्यातून काय  घेतले आहे  आणि आपली भूमिका काय याचे नेमके आणि थोडक्यात विवेचन केले आहे. नवा माणूस घडवण्यासाठी आणि नव्या समाजाच्या उभारणीसाठी आपण हे लिहित आहोत, असे लिंबाळे सांगतात. त्याबरोबरच भारताच्या इतक्या प्रदीर्घ इतिहासात अस्पृश्य, दलित आणि आदिवासी या सर्वांनी या देशासाठी जे बलिदान केले, ज्या यातना सहन केल्या आणि त्यामुळेच या उपेक्षित, वंचित समूहांची जी वाताहत झाली त्या वाताहतीचा हिशोब करावा लागेल आणि त्यासाठी आपण हे लिहिले आहे; असे ते स्पष्टपणे नमूद करतात. त्यामुळे ही कादंबरी वाचताना लेखकाची भूमिका समजावून घेतली तर एकूण कादंबरीत असलेले सामाजिक गुंते, सामाजिक विषमतेचे विविध पैलू उलगडण्यासाठी निश्चित मदत होईल.

सनातनच्या गाभ्यात प्रवेश करत असताना एक जाणीव बाळगून आपण गेलो तर मग वेगळा असा सामाजिक अध्याय आपल्याला दिसू शकेल. लेखकाने जाणीपूर्वक ही प्रस्तावना लिहून वाचकांच्या मनातील उत्सुकता आणि काही प्रश्न निर्माण केले आहेत.

…………………………..

शरणकुमार लिंबाळे यांच्या सनातन कादंबरीची अर्पणपत्रिका पुढीलप्रमाणे आहे:

” गो हत्या केली म्हणून 

ज्यांची हत्या केली त्यांना. “

या अर्पणपत्रिकेमुळे साधारण लेखक कोणत्या सामाजिक विषयाकडे आपल्याला घेऊन जाणार आहे याची चाहूल लागते.

हिंदू धर्म संस्कृतीच्या विषम समाज व्यवस्थेवर भाष्य करणारी ही कादंबरी आहे आणि तिचे निवेदन लेखकाने दुहेरी निवेदन शैलीने केले आहे. म्हणजे कादंबरी लिहिणारा लेखक कथा सांगत पुढे निघाला आहे आणि त्याच वेळी लेखकातील सूत्रधार अथवा भाष्यकार हा इतिहासातील काही नोंदी टिपत टिपत कथा जोडून घेतो आहे,बांधून घेतो आहे. अलीकडच्या काळात या स्वरूपात कादंबरी लेखनाचे असे प्रयोग मराठीत झालेले मला तरी फारसे ठाऊक नाहीत.

लेखकाने जी अर्पण पत्रिका लिहिली आहे, ती वाचल्यानंतर आपण एकविसाव्या शतकाच्या आजच्या दिवसाशीच जोडले जातो. याचे कारण गेल्या दहा-पंधरा वर्षात गोहत्या आणि गोरक्षक यासंबंधीचे राजकारण आणि त्याच्या आत दडलेले धर्मकारण हे आपल्यासमोर येते.  त्यामुळे या कादंबरीचा विचार करताना दुपेडी स्वरूपात करावा लागेल. या अर्पणपत्रिकेमुळे सनातन ही कादंबरी भारताच्या वर्तमानाकडे आपले लक्ष वेधते.

या देशातील दलित, आदिवासी यांच्या जगण्याचे मूलभूत हक्क नाकारणारी एक समाजव्यवस्था इथे धर्म परंपरेच्या आधाराने निर्माण झाली आणि त्यामुळे एकूण भारतीय समाजात बहुसंख्येने असलेल्या या वंचित, शोषित वर्गाला पाणी पिण्याच्या मूलभूत हक्कापासून ते ज्ञान मिळविण्याच्या अधिकाऱ्यापर्यंत हजारो वर्षे वंचित राहावे लागले, उपरे राहावे लागले. ह्या कादंबरीचा कालखंड उत्तर पेशवाईनंतर सुरू होतो ते  विसाव्या शतकापर्यंत येऊन भिडतो आणि अर्पण पत्रिकेमुळे एकविसाव्या शतकाशी तो जोडला जातो. उत्तर पेशवाईतील ब्राह्मणी वर्चस्वाची, समाजव्यवस्था, ईस्ट इंडिया कंपनीच्या आगमनानंतर या व्यवस्थेत बदल झाला नसला तरी ख्रिस्ती धर्माचे प्रचारक आल्यामुळे  विषम व्यवस्थेतून बाहेर पडण्यासाठी निर्माण झालेली नव्या धर्माची एक वाट आणि त्यानंतर लष्करात प्रवेश करण्याच्या अधिकारामुळे मिळालेले सामाजिक प्रतिष्ठेचे स्थान असा एक मोठा प्रवास या कादंबरीने केलेला आहे. साधारणत: दोन अडीच शतकांचा कालखंड टिपणारा हा प्रवास प्रत्येक पानावर एक  धगधगती मुद्रा ठेवून जातो.

बहामनी राज्यातील सोनई येथील महारवाड्यात साजऱ्या होणाऱ्या होळीने कादंबरीची सुरुवात होते. सोनई येथील मशीद आणि नंतर देवगड या गावात नव्याने उभारलेली ख्रिश्चनांची गिरीजाघरे किंवा चर्चेस यांचे संदर्भ येतात. कादंबरीच्या शेवटच्या टप्प्यात भारतातून मागासवर्गीय समाजातील जे मजूर काम करण्यासाठी परदेशात नेले जातात, त्यांची कुचंबणा आणि त्यांची कोंडी याकडे लेखक घेऊन जातो.कादंबरीच्या शेवटी पुन्हा आपण एकविसाव्या शतकात

नदीजवळ ही घटना घडते आणि  कादंबरी संपते.

सोनई गावातील महारांच्या होळी सणाची तयारी सुरू असताना लेखकाने पुढील शब्दात जे व्यक्त केले आहे त्यातून या समाज व्यवस्थेवरील त्याचे भाष्य  उमगायला लागते:

“महार  – ब्राह्मणांच्या सनातन संबंधांची  होळी भडकू लागली ..”

 या पहिल्या भागात लेखकाने सोनईच्या महारवाड्याची ओळख करून दिली आहे, ती अशी :

“सोनईच्या महारवाड्यात  फलटणच तयार झाली होती –  पोरांची  आणि कुत्र्यांची.

महारवाडयात कुत्री आणि डुकरांची वर्दळ होती. महाराचं घर ओळखता याव म्हणून घरावर जनावरांची हाडे खोवलेली असत. सिदनाकच्या घरावर म्हशीच्या पायाच हाड,

भीमनाकच्या घरावर फासोळी लोंबलेली. अंबरनाकच्या घरावर गायीचे खुर. भूतनाकच्या घरावर बैलाचा जबडा. धोंडाबाईच्या घरावर बैलाची शिंगे.

कादंबरीच्या पूर्वार्धात गावकीतील महारांची कोणती कामे असायची त्याचा एक सामाजिक तपशील आपल्याला  मिळतो. याही कामात उणे-दुणे आणि मानपान काय आहे याचा उलगडा आपल्याला होतो.

आपल्या ग्राम व्यवस्थेला किती विविध प्रकारची सेवा हा अस्पृश्य समाज देत होता आणि तरीही या वर्गाला पिण्याचे पाणी देखील सन्मानाने दिले जात नव्हते, या विषमतेकडे लेखक लक्ष देतोच; पण या व्यवस्थेतील या समाजाची होणारी कोंडीही तो अधोरेखित करतो. कादंबरीच्या पूर्वार्धात बहामनी राज्याचा संदर्भ येतो आणि गावातील महार बादनाक महार हा जो मुसलमान होतो, त्याची नोंद येथे  मिळते.

विषम समाज व्यवस्थेने गांजलेले अनेक समाज घटक हिंदू धर्मातून अन्य धर्मात जे गेले त्याची सुरुवात भारतातील मुसलमानी राजवट स्थिर होत असतानाच्या काळात झाली.(थोडा वेगळा संदर्भ येथे देऊ इच्छितो. काही वर्षांपूर्वी दक्षिण भारतात मीनाक्षीपुरम येथील शेकडो दलितांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता, त्याच्या बातम्याही मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. या धर्मांतरावर आधारित साक्षीपुरम या नावाचे नाटक मराठीतील ज्येष्ठ दलित लेखक  व नाटककार प्रा. रामनाथ चव्हाण यांनी लिहिले होते. त्या नाटकाची समीक्षकांनी प्रशंसा केली होती.धर्मांतरासारखा अतिशय संवेदनशील व गंभीर असा सामाजिक विषय त्या नाटकात मांडण्याचा प्रयत्न चव्हाण यांनी केला होता.) त्यामुळे लिंबाळे यांच्या कादंबरीतील धर्मांतर संदर्भातील पैलू यानिमित्ताने स्पष्ट होतात. कथनाच्या ओघात लेखकाने दोन कथा यात सांगितल्या आहेत. यातील पहिली कथा ज्येष्ठ दलित नाटककार भि. शि. शिंदे यांनी लिहिलेल्या ‘अमृतनाक’ कादंबरीतील आहे आणि दुसरी कथा मंगळवेढ्यातील विठ्या महाराची आहे. या दोन्ही कथा सर्वश्रुत आहेत. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती येथे मी करत नाही.

………………….

उत्तर पेशवाईचा काळ आणि दक्षिणेतील बहामनी आणि विजापूर यांच्यासारख्या मुसलमान राजवटी अशा काळात अस्पृश्य आणि आदिवासी समाजावर इथल्या ब्राह्मणी आणि प्रस्थापित व्यवस्थेने जे जुलूम केले , त्यांना जे अन्याय सोसायला भाग पडले; या सर्वांचा  व्यापक अर्थाने म्हणायचे तर सामाजिक सांस्कृतिक शोध सनातनमध्ये वाचायला मिळतो.

रहिमतपूर, देवगड, रामपूर, झोळ, सायखेडा, सोनई आणि या सर्वांच्या मधोमध वाहणारी फाल्गुनी नदी असा प्रदेश येथे दिसतो. विशेषत: रामपूर आणि  झोळ ही दोन स्वतंत्र संस्थाने, दोन्ही ठिकाणी हिंदू राजे, शिवाय देवगड, रहीमतपुर, सुलतानपूर, सायखेडा या ठिकाणचे मातब्बर सुभेदार आणि हा सगळा परिसर सातपुडा पर्वताच्या रांगामध्ये असलेला.

देवगडच्या विठ्ठल मंदिरमध्ये गोविंद भटाची पोथी सुरू आहे तो राम रावण युद्ध कथा वाचतो आहे, निरूपण करतो आहे आणि यावेळी अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश  नाही, ते दूर कोठेतरी उभे राहिले आहेत…आणि या निरूपणात अखेर अस्पृश्यांना तप करण्याची मुभा धर्माने दिलेली नाही. त्यामुळे कठोर तपश्चर्या करणार्‍या शंबुकाची माहिती प्रभू रामाला मिळते, तेव्हा ते तप करणाऱ्या

शंबुकाला विचारतात आणि तो आपण शूद्र असल्याचे सांगतो, तत्क्षणी त्याचा शिरच्छेद केला जातो; अशी ही कथा पुढे जाते. महिपतीराव पाटलासारखा जमीनदार त्याने भारावून जातो.

अशा धार्मिक कथाकथनात इथल्या समाजातील विविध घटकांना ज्या पद्धतीने ही प्रस्थापित व्यवस्था जखडून ठेवते, गुंतवून ठेवते, दडपून ठेवते;  या सर्वांचा नेमकेपणाने घेतलेला समाचार यात विविध घटनांतून आपल्याला दिसतो. लेखकाचे हेच कौशल्य आहे की त्याने या सामाजिक घटनांची चित्रे अतिशय बारीक-सारीक रीतीरिवाज याचे तपशील देत आपल्यासमोर जिवंतपणे उभी केली आहेत.

शरणकुमार लिंबाळे यांची सनातन कादंबरी वाचत असताना अनेक चित्रमय दृश्यांची एक मालिका मला दिसू लागली. अगदी सुरुवातीच्या पानांमधील होळीचे वर्णन असो किंवा

नरसोपंताने केलेला फादरचा खून असो किंवा जादूटोणा करणाऱ्या   आदिवासी वस्तीतील  सैरभैर झालेले  लोक असोत;किंवा भारतीय मजुरांना परदेशात कामासाठी नेल्यावर बोटीच्या प्रवासात येताना आणि जाताना त्यांची होणारी मानसिक कोंडी आणि भावनिक आंदोलने यांचेही चित्रण अतिशय सशक्तपणे लेखकाने केले आहे.

या संपूर्ण कादंबरीचा एक थेट धागा जो आहे, तो इथल्या महार अस्पृश्यांच्या अखंड संघर्षाचा आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी सुरू असलेल्या अविरत जिद्दीचा. असे लढे  लढणाऱ्या अनेक व्यक्तिमत्त्वांच्या  चित्रणातून लेखकाने हे मांडले आहे, चितारले आहे.

उत्तर पेशवाईच्या काळात अस्पृश्यांच्या गळ्यामध्ये आलेली गाडगी, त्याचवेळी शनिवारवाड्यावर दक्षिणेसाठी उसळलेली ब्राह्मणांची गर्दी आणि यावेळीच हिंदू धर्माला निर्माण झालेल्या आणि ब्राह्मणांच्या श्रेष्ठत्वाचा आव्हान देऊ पाहणाऱ्या  परधर्मांचे आक्रमण कसे उलटवून लावायचे आणि त्याच वेळी अगोदर मुसलमान राजवटीमुळे आपला धर्म आणि उच्च वर्ण कसा टिकवायचा यासंबंधीचे पुण्यातील ब्राह्मण वर्गात सुरू असलेले तत्कालीन वर्णनही यात वाचायला मिळते. अगोदर मुसलमान राजवटीमुळे अस्पृश्य समाजाला मिळालेले एक वेगळे भान, त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारामुळे लष्करात सहभागी होण्याची मिळालेली संधी आणि या दरम्यानच्या काळात मी वर म्हटल्याप्रमाणे ख्रिश्चन धर्म प्रसारक सहजी येत असल्यामुळे धर्मांतराचे निर्माण झालेले मोठे आव्हान आणि त्यामुळेच चिंतित झालेला उच्चवर्णीयांचा वर्ग अशी ही सगळी एक मोठी घडामोड या सर्व प्रदेशात होते आहे.

यातील हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व आणि ब्राह्मणांच्या सर्वोच्च स्थानाबद्दल  अनेक नोंदी या संवादातून येथे  वाचायला मिळतात. या उच्चवर्णीयांच्या दबावामुळे अस्पृश्य महार समाजाची जी कोंडी होते, त्यामुळे मग ते लष्करात जातात, परदेशात मोलमजुरीला जातात आणि हे सर्व असह्य झाल्यावर मग धर्मही बदलतात!

भारताच्या मध्ययुगीन काळातील आणि प्रबोधन काळ सुरू होण्यापूर्वीचा हा जो टप्पा आहे;त्या टप्प्यातील विलक्षण असा सामाजिक विषमतेचा इतिहास प्रत्येक पानातून उलगडत जातो.

मी अगदी आरंभी म्हटल्याप्रमाणे लेखकाने कथेचे सूत्र आणि त्याला जोडलेले इतिहासाचे पान  याचा दुपदरी मेळ घालत ही कादंबरी लिहिली आहे. त्यामुळे इसवी सनाचे उल्लेख येतात. त्यात या कालखंडातील महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक घटनांचे संदर्भ समोर येतात आणि लेखकाने ते या सगळ्या अस्वस्थ आणि अस्थिर अशा  समूह जाणिवांशी जोडून घेतले आहे.

शरणकुमारच्या या कादंबरीचे वेगळेपण फक्त ऐतिहासिक संदर्भ देण्यात नाही, तर या देशातील अस्पृश्य आणि आदिवासी समाजाच्या मानहानीची आणि विटंबनेची जी परंपरा होती ती स्पष्टपणे नमूद करत त्याविरुद्ध उभे राहण्याची उर्मी जागवणारी आहे. मग झाशीच्या राणी बरोबरच आदिवासींची झलकारीबाई देखील येते, मग एकोणिसाव्या शतकातील शिवराम जानबा कांबळे यांची संघटनात्मक कामाची सुरुवात येते, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि साऊथबरो कमिशन समोरचे विसाव्या शतकातील संदर्भही यात लेखक लिहून जातो .

लेखकाने कथासुत्रासाठी महाराष्ट्राचा टापू निवडलेला असला तरी भारताच्या विविध भागातील आदिवासी आणि अस्पृश्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या प्रथांना आणि कथांना आपल्या भूमिकेशी जोडून घेतले आहे. त्यामुळेच सनातनचे संघर्षशील वेगळेपण हे उठून दिसते आणि आपल्या मनात ठसते.

शरणकुमार लिंबाळे यांना सरस्वती सन्मान जाहीर झाल्यावर त्या सन्मानाचे नाव सरस्वती आहे यावरून काही मतमतांतरे व्यक्त झाली. सनातन वाचताना या सरस्वतीची आपली कादंबरीच्या शेवटच्या भागात भेट होते. कारण ज्या नरसोपंताने फादरचा खून केलेला आहे त्याला  देहांताची शिक्षा होते. त्यामुळे त्याची पत्नी असलेली सरस्वती ही विधवा होते. वैधव्य सोसताना समाजव्यवस्थेत तिची जी  कुचंबणा झाली त्याबद्दल ती आपल्या भिक्षुकी करणाऱ्या मुलाला बजावून सांगते आहे. कादंबरीच्या शेवटच्या भागात सरस्वतीचे प्रश्न आणि तिचे मनोगत वाचताना आपल्याला लिंबाळे यांनी  ही वेगळी सरस्वती समोर आणली, असे वाटल्याशिवाय राहणार नाही. या सरस्वतीचा आणि तिच्या मुलाचा जो संवाद यात वाचायला मिळतो त्यात ती आपल्या मुलाला माणूस होण्याचे आवाहन करते. ही विधवा माता आपल्या मुलाला खडसावून बजावते की ‘माझं सोडून दे. अस्पृश्यांचा विचार करा. आज नाही तर शंभर वर्षांनी तरी ते हिशोब विचारतील’. शेवटी सरस्वती लेखकाची भूमिकाच मांडते आणि ती म्हणते,”  “जोपर्यंत पीडित आपला इतिहास लिहिणार नाहीत, तोपर्यंत त्यांना जेत्यांच्या गौरवगाथा वाचाव्या लागतील. पीडित लिहीतील, आज ना उद्या!”

यानंतर ही कादंबरी पुढे सरकते.मग तुळशीचे लग्न महिपती  पाटलाच्या वाड्यात बघायला आलेला फादर येथे भेटतो आणि शेवटच्या पर्वात परदेशातून मोलमजुरी करून आलेला कॉर्टर जेव्हा आपल्या वस्तीवर निघतो, तेव्हा मी वर उल्लेख केल्याप्रमाणे, त्याने गायीची विटंबना केली म्हणून हिंदू वाहिनीचे तरुण त्याला ठार करतात.

 येथे कादंबरी संपते आणि आजच्या एकविसाव्या शतकातील वर्तमानाकडे आपण पाहू लागतो. तिथून आपल्या विचार विचार मंथनातील नवे पान उघडते…!

शरणकुमार लिंबाळे यांनी  या कादंबरीच्या रूपाने  ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्धची एक बंडखोर कहाणी लिहिली आहे आणि विविध घटनांच्या, संवादांच्या आवर्तात ती फिरत राहते. महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे इतिहासाचे एक चक्र फिरवत ती  आपल्या प्रत्येकाला विचार करायला भाग पाडते.

लिंबाळे हे मराठी समीक्षकांनी बरीच वर्षे दुर्लक्षिलेले लेखक आहेत. त्यांचा लेखनाचे विविध विषय असूनही, एकसंधपणे त्यांच्या साहित्याकडे पाहणारे मराठीतील समीक्षक तरी मला कमी दिसतात. सनातन  या कादंबरीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे लखलखीतपणे त्यांचे नाव समोर आले आहे. त्यांनी जे अस्पृश्य आणि आदिवासींच्या अन्यायाचे  गाठोडे उलगडून दाखवले आहे, ते पाहत असताना आजच्या वर्तमानापासून आपण कोणीही पळ काढू शकत नाही.

दिलिपराज प्रकाशनला या निर्मितीसाठी मनःपूर्वक धन्यवाद दिले पाहिजेत.

मी विशेष अभिनंदन करेन ते म्हणजे या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि आतील रेखाचित्रे करणारे ज्येष्ठ चित्रकार भ. मा.परसावळे यांचे.त्यांनी कादंबरीच्या  गाभा सूत्राला सार्थक ठरवणारे मोलाचे योगदान केले आहे.

दिलिपराज प्रकाशनचे राजीव बर्वे हे गेली तीस वर्षे लिंबाळे यांचे ग्रंथ प्रकाशित करत आले आहेत. मराठी अभिजन प्रकाशकांच्या गटात त्यांना बहुदा प्रवेश नसावा. त्यामुळेही त्यांनी प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकांकडे अनेक समीक्षकांचे दुर्लक्ष झाले असणार. पण तरीही नेटाने दिलीपराजने ही पुस्तके प्रकाशित केली आणि आज त्याचे एक सुयोग्य असे स्थळ फळ लेखक व प्रकाशकांना मिळाले आहे.

सरस्वती सन्मान जाहीर झाल्यानंतरच्या काळात शरणकुमार लिंबाळे आणि विविध मुलाखती दिल्या आहेत. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत आणि सनातन कादंबरीनेही अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. या कोणत्याही प्रश्नांपासून एक लेखक म्हणून त्यांना पळ काढता येणार नाही. अभ्यासक, कार्यकर्ते आणि वाचक त्याची उत्तरे वेळोवेळी त्यांना विचारत राहतीलच.

या राष्ट्रीय सन्मानाबद्दल पुन्हा एकदा माझे मित्र शरणकुमार लिंबाळे आणि हे त्यांचे प्रकाशक राजीव बर्वे यांचे भरभरून कौतुक आणि अभिनंदन !

(साभार- ‘दिलीपराज वृत्त’ या दिलीपराज प्रकाशनाच्या मुखपत्रातून)

(लेखक ‘लोकशाहीसाठी समंजस संवाद’ या मासिकाचे संपादक आहेत )

9604001800

 

 

Previous articleहो, मी हिंदू आहे!
Next articleपंडित नेहरू-एडविनाची उत्कट प्रेमकहाणी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.