मला एकदा ते म्हणाले, ‘मी मराठी बोलतो ती नाशिककडची. मुंबई, पुण्याची मराठी मला काही नाही जमत.’
आणखी एक प्रसंग आहे. अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते. तर पाकिस्तानात नवाज शरीफ. भारत – पाकिस्तान समोरासमोर ठाकले होते. प्रसंग मोठा बाका होता. अचानक बांद्रा पाली हिलला दिलीपकुमार यांच्या घरात फोन खणखणला. खुद्द वाजपेयी साहेब बोलत होते. त्यांनी तातडीने दिल्लीला बोलावलं. डॉ. जहीर काझी यांना घेऊन दिलीपकुमार थेट दिल्लीला पोहचले. जहीर काझी हे त्यांचे जवळचे डॉक्टर, मित्र. जहीर काझींच्या घरात आणि सासरी स्वातंत्र्यसैनिकांची समाजवादी परंपरा. काझींचे सासरे मोहिद्दीन हॅरिस दिलीप कुमारांचे मित्र. त्यामुळे काझींवर दिलीप कुमारांचा फार भरवसा.
दिलीपकुमार यांच्या या दीर्घ आयुष्यात त्यांना साथ होती ती सायराबानोंची. त्या त्यांच्या धर्मपत्नी. पण अखेरच्या दिवसांमध्ये त्या जणू त्यांच्या आई बनल्या होत्या. लहान मुलासारखी त्या दिलीप कुमारांची काळजी घेत होत्या. दिलीप कुमारांच्या अनेक सामाजिक उपक्रमात त्या भाग घेत होत्या. लोकांना मदत करत. सायरा बानोंनी आपलं सगळं आयुष्य दिलीप कुमारांना समर्पित केलं. अभिनेत्री म्हणून त्या मोठ्या आहेतच. पण जीवनसाथी म्हणून त्यांनी दिलेली साथ त्याहून मोठी आहे. त्या सतत दिलीप कुमारांच्या सोबत राहत. एक क्षणही अंतर देत नव्हत्या. दिलीप कुमारांचं वय ९८ झालं होतं. गेल्या काही वर्षात त्यांचं फिरणं मुश्किल झालं होतं. Bedridden होते. आठवणी पुसल्या जात होत्या. त्यांची शेवटची भेट आठवतेय. ताज एंडला झालेल्या रितेश देशमुख आणि धीरज देशमुख यांच्या रिसेप्शनला ते आले होते. मला पाहताच त्यांनी माझा जो हात पकडला ते माय फ्रेंड कपिल, कपिल करत. ते हात सोडायलाही तयार नव्हते. मोठ्या मुश्किलीने मी त्यांचा हात हळूच काढून पुन्हा सायराजींच्या हातात दिला. तो प्रसंग मला आठवला की आजही गलबलल्यासारखं होतं. कारण दिलीपकुमार तेव्हा हरवत चालले होते.