लिडर – 50 इन्साईट्स फ्रॉम मायथॉलॉजी

-हर्षदा परब

पौराणिक कथा (Stories from Mythology) आणि कॉर्पोरेट कल्चर यांच्यातलं साम्य दाखवण्याचा एक मस्त प्रयत्न या पुस्तकातून केलाय. पौराणिक कथांच्या आधारे कॉर्पोरेट जगाशी कसं जुळवून घ्यायचं हे समजावलंय. म्हणजे नवीन असं काहीच नाही. फक्त ते बदललेल्या बॅकग्राऊंडमुळे कॉर्पोरेट जगतात वावरताना आपला घोळ होतो. काही जण अस्वस्थ होतात, काहीजण मागे पडतात. काही जण अपयश कवटाळून जगू लागतात.या पुस्तकाचा मला झालेला फायदा म्हणजे ‘नवं काही नाही जे आधीच्या लोकांनी केलंय तेच तर करायचंय’ हा विश्वास मिळाला. ऑफिसात घडणाऱ्या गोष्टींमागच्या गोष्टी समजून घ्यायला थोडी मदत या पुस्तकातून मिळू शकेल.

पुस्तकाच्या नावावरुन वाटेल की यात ‘लीडर’ होण्याबद्दल मार्गगर्शन केलंय किंवा टिप्स मिळतील. तर तसं मात्र काही फारसं नाही. कॉर्पोरेट जगातल्या छोट्या छोट्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे यातून. बस्स. तेव्हा दिलेल्या नावाला हे पुस्तक जागत नाही असं मला वाटलं.

हे पुस्तक मला अपूर्ण वाटलं. कारण, त्यात कॉर्पोरेट मधला किंवा कोणत्याही ऑफिसात दिसणारा, जाणवणारा जात, प्रांत, धर्मवाद आणि त्यातून होणारे गट, तट किंवा ग्रुप यावर काहीच आलेलं नाही. भारतातल्या ऑफिसमध्ये अगदी कॉर्पोरेट म्हणवणाऱ्या आणि सामाजिक विषयांवर काम करणाऱ्या संस्थांच्या ऑफिसमध्येही दिसणारं, तुम्हाला ओढणारं नाहीतर, नेस्तनाबूत करणारं, खचवणारं अनेकदा पारावरच्या रिकामटेकडेपणातून आलेलं पॉलिटिक्स किंवा सहकारी खेळत असलेलं राजकारण यावर काहीच सापडत नाही किंवा आलेलं नाही. त्यामुळे अशा ‘सहकार’ राजकारणावर किंवा ‘कोलिग्स पॉलिटिक्स’ वर उतारा शोधणाऱ्यांना यात फारसं काही सापडत नाही.

पहिलीच कॉर्पोरेट नोकरीवाल्यांसाठी हे पुस्तक मार्गदर्शनाची एक पायरी ठरू शकते. किंवा ‘हे असं कसं किंवा का’ याचं उत्तर शोधायला मदत मिळू शकते.

पण इंंटरेस्टिंग आहे पुस्तक.

देवदत्त पटनाईकांची (Devdatta Patnaik) एक गोष्ट मला आवर्जून नमूद करायची ती म्हणजे, पौराणिक कथांकडे किती वेगवेगळ्या अँगलने पाहता येतं हे त्यांच्या पुस्तकातून शिकण्यासारखं आहे. म्हणजे जुन्याच गोष्टीतून अनेक पुस्तकं तयार करता येऊ शकतात. केली जातात. हे सोपं वाटतं पण तितकंच कठीणही आहे. कारण, तोच तोच पणा येऊ द्यायचा नाही हे आव्हान मोठं. तर मी देवदत्त यांची दोन पुस्तकंच वाचलीत. पण हे आवर्जून जाणवलं. बराचसा खजिना पौराणिक कथांमध्ये दडलाय.

शिखंडी आणि लिडर अशी देवदत्त यांची दोन पुस्तकं मी वाचलीत. सोप्पं इंग्रजी असल्यामुळे नवीन इंग्रजी वाचणाऱ्यांनी आणि लिहिणाऱ्यांनी नक्की वाचा. समजायला सोप्पं आणि हलकं फुलकं असं इंग्रजी असल्यामुळे पुस्तक लवकर पूर्ण होईल

हे पुस्तक ऑक्टोबर २०२० मध्ये वाचायला घेतलं होतं. दोन दिवसांपूर्वी संपवू शकले.मध्ये बराच काळ पुस्तक पूर्ण करायचं राहिलंय ही आठवण टोचत रहायची. पण, नव्हतं मन आणि शरीर एकत्र ठेवून वाचू शकले. अगदी दोन दिवसांपूर्वी पुस्तक पूर्ण केलं. रस्त्यावर मिळालेलं पुस्तक आहे. गिफ्ट करण्यासाठी शोधत होते मार्च – एप्रिलमध्ये तेव्हा बाजारात हे पुस्तक नसल्याचं दोन एक दुकानात सांगितलं होतं. तेव्हा जर पुस्तक वाचायचं असेल तर रस्त्यावर मिळेल. एकदा वाचून पुन्हा अर्ध्या किंमतीत परत करता येईल.

(लेखिका ‘मुंबई तक’ ला बातमीदार आहेत)

9619196793

Previous articleआठवणी …दिलीपकुमारांच्या!
Next articleअविस्मरणीय लेह- लडाख सहल
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.