अविस्मरणीय लेह- लडाख सहल

-पी.जी. सवडतकर

मार्च,एप्रिल आणि मे या तीन महिन्याच्या काळात सतत लॉकडाऊनचा अनुभव घेतल्यावर घरात बसून बसून कंटाळा आला होता. कुठेतरी आसपास ऐतिहासिक किंवा नैसर्गिक रम्य ठिकाणी दोन चार दिवस फिरायला जावे अशी मानसिकता झाली होती.अशातच आमचे मित्र ‘मीडिया वॉच’ चे मुख्य संपादक अविनाश दुधे यांनी लेह लडाख सहल आयोजित केल्याचे कळवले.ही बातमी ऐकून आनंद झाला. मी ताबडतोब होकार कळवला. अविनाश दुधे साहेब,किशोर वाघ सर ,माझे मेहुणे गजानन पाटील साहेब ,त्यांची पत्नी मनीषा पाटील ,मी आणि माझी पत्नी मंगल सवडदकर असे सहा सदस्य सहलीसाठी तयार झालो.

सहल म्हंटले की पूर्वतयारी आलीच.आमचे लेह – लडाखचे ७ रात्र आणि ८ दिवसाचे पॅकेज फिक्स झाले. लेहपर्यंत पोहचण्याची जबाबदारी आमची होती. लेहपर्यंत विमानाने जाण्यासाठी बुकिंग अगोदर केले. कोविड कालावधी असल्यामुळे सर्वांना RT-PCR टेस्ट करून ते प्रमाणपत्र प्रवासात सोबत घेणे आवश्यक होते. त्यामधे आमचे सर्वांचे २ -३ दिवस गेले. सोबत कमीतकमी सामान घेण्याच्या सूचना अविनाश दुधे साहेब देत होते. त्यानुसार आम्ही बॅग भरत होतो. सर्व तयारी करून आम्ही १९ जूनला घरून निघालो. १९ जूनच्या सायंकाळी आम्ही दिल्लीला पोहचलो.त्या दिवशी दिल्लीला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्ली विमानतळावरून लेहकडे रवाना झालो. विमानातून खालचे नैसर्गिक सौंदर्य पाहत पाहत लेह विमानतळावर सकाळी ८.३० ला आम्ही पोहचलो.तेथे आमचे RT-PCR रिपोर्ट तपासून पुन्हा आमच्या रॅपिड टेस्ट करण्यात आल्या.टेस्टमध्ये आमचे सर्वांचे रिपोर्ट Negative आल्यामुळे आम्हा सर्वांना हायसे वाटले. एकदाचे सर्व अडचणीतून बाहेर पडल्याचा आनंद झाला.त्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या भरात आम्ही लेह येथील आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी हॉटेल सिटी पॅलेसला पोहचलो .

पहिला दिवस –

लेहचे तापमान १२ डिग्री असल्यामुळे हॉटेलमध्ये अल्पोपहार केल्यावर आम्हाला ४.०० वाजेपर्यंत आराम करायला सांगितले. त्या मागचे कारण म्हणजे लेह येतील थंड वातावरण आणि वातावरणातील ऑक्सीजनचे कमी प्रमाण. शरीराला या वातावरणाशी जुळवून घेता यावे यासाठी लेहमध्ये आलेल्या कुठल्याही पर्यटकाला सुरुवातीचे दोन दिवस कमीत कमी हालचाली करण्यास सांगितले जाते.

दुपारी चारनंतर आम्ही लेहमधील दोन स्थळांना भेटी दिल्या. त्यामधे लेह शहराच्या पश्चिमेला उंच डोंगरावरील व समुद्र सपाटीपासून ११८०० फूट उंचीवर असलेल्या शांती स्तूप आणि पूर्वेकडील उंच डोंगरावर लडाखच्या नोमग्याल राजघराण्याचा माती व दगडांपासून उभारण्यात आलेला ५०० वर्षांपूर्वीचा ९ मजली राजवाडा. हे दोन्ही ठिकाणं मनाला प्रसन्न करून टाकतात . लेह शहराच्या चारही बाजूला बर्फाच्छादित उंच डोंगर रांगा आहेत. त्या प्रसन्नतेत भर घालतात .

दुसरा दिवस-

.२१ जून रोज सोमवारला आम्ही चार स्थळांना भेटी दिल्या.

सिंधू – झांस्कर नदीचा संगम- आशियातील सर्वात मोठ्या नद्यापैकी एक मोठी नदी म्हणजे सिंधू (Indus) नदी. जिचा उगम तिबेटमधील मानस सरोवराच्या जवळून होतो आणि भारत ,पाकिस्तान मधून वाहत जाऊन शेवटी ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. सिंधू नदीचे एक वैशिष्टय म्हणजे तिने तिचा प्रवाह आजपर्यंत कधीच बदलला नाही.

भारताला ‘भारत’ हे नाव सिंधू नदीवरून पडले आहे.तसेच भारतीय प्राचीन सिंधू संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली आहे.सिंधू नदी ज्या भौगोलिक भागातून वाहते त्या भागात चुन्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे सिंधू नदीच्या पाण्याचा रंग हिरवा दिसतो. भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या सिंधू नदीचे दर्शन घेण्याचा आज योग आला त्यामुळे जीवन धन्य झाल्याचा आनंद मिळाला.

सिंधू नदीला अनेक उपनद्या येऊन मिळतात त्यापैकी एक म्हणजे झांसकर नदी होय.Zanskar (Zangs-kar) means “white copper” or brass. या नदीच्या पाण्याचा रंग भुरकट आहे व तो सिंधू नदीच्या पाण्याच्या तुलनेत लगेच ओळखू येतो.ही झांसाकर नदी मिंन या ठिकाणी सिंधू नधीला येऊन मिळते त्याला सिंधू – झांसकर संगम म्हणतात.हा संगम लेहापासून दक्षिणेला ३५कि.मी.अंतरावर आहे.

गुरुद्वारा फत्तर साहिब

सिंधू – झांसकर संगमापासून लेहकडे येत असताना मध्ये गुरुद्वारा फत्तर साहिब हे शिखांचे धार्मिक स्थळ लागते.या स्थळाबद्दल एक दंतकथा सांगितली जाते (अर्थात ती वैज्ञानिक कसोटीवर टिकत नाही) ती म्हणजे या ठिकाणच्या डोंगरावर एक राक्षस राहत होता आणि तो तेथील आसपासच्या लोकांना त्रास देत होता.ही गोष्ट गुरू नानकजीना समजली. ते त्या ठिकाणी आले व ध्यानस्थ बसले हे पाहून तो राक्षस रागाने बेफाम झाला व त्याने डोंगरावरून एक मोठी दगडी शीळा गुरू नानकच्या अंगावर फेकली .ती शीळा जेव्हा गुरू नानकच्या अंगावर पडली तेव्हा ती शीळा मेणासारखी मऊ झाली . गुरू नानक यांना काहीच झाले नाही.ती शीळा आजही तेथे आहे व गुरू नानक यांच्या भेटीची आठवण म्हणून तेथे गुरुद्वारा आहे. त्यालाच ‘गुरुद्वारा फत्तर साहिब’ असे म्हणतात.

अर्थात ही दंतकथा अवैज्ञानिक आहे.वस्तुस्थिती ही आहे की गुरू नानक या ठिकाणी प्रबोधन करण्यासाठी आले होते व त्यांनी लोकांचे प्रबोधन केले त्याची आठवण म्हणून लोकांनी गुरुद्वारा बांधला आहे.

आपल्या देशात वैदिक धर्म नाकारून ज्या ज्या महापुरुषांनी अवैदिक धर्माची स्थापना केली कालांतराने वैदिकांनी त्या त्या धर्मात प्रवेश करून त्या धर्मात अवैज्ञानिक गोष्टी घुसडून त्या त्या धर्माला पुन्हा दैववादी,दैववादी , कर्मकांडी बनवले आहे त्याचे उदाहरण म्हणजे गुरुद्वारा फत्तर साहिब होय.

Magnetic point –

गुरुद्वारा फत्तर साहिब येथून लेहकडे येत असताना निसर्गाचा एक चमत्कार पाहण्यास मिळतो त्याला Magnetic hill point असे म्हणतात.या पॉइंटचे वैशिष्ठे म्हणजे न्युट्रल मध्ये उभी असलेली चार चाकी गाडी आपोआप चढावर चालायला लागते म्हणत गुरुत्वाकर्षनाच्या विरुद्ध घटना घडते.बाजूच्या पहाडा मध्ये असलेल्या चुंबकीय क्षेत्रामुळे असे घडते म्हणून या क्षेत्राला Magnetic point म्हणतात.

Hall of fame

हे लेहमध्ये मिलिटरी एरियात असलेले Museum आहे.यामधे भारत – पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांच्या स्मृती जतन करून ठेवलेल्या आहेत.तसेच पाकिस्तानकडून हस्तगत केले शस्त्र जपून ठेवले आहे. लडाख व तेथील राजघराण्याचा इतिहास सांगणारे दालनही या संग्रहालयात आहे . या संग्रहालयाच्या भेटीमुळे लडाखबाबत भरपूर माहिती मिळाली .

तिसरा दिवस-

खरदुंगला मार्गे लेह ते नुब्रा व्हॅली हा १२५ कि.मी. चा निसर्गरम्य व थरारक प्रवास

लेह लडाख हा जगातील सर्वात उंच(१२००० ते १८००० फूट ) व नैसर्गिक सौंदर्याने नटलेला पर्वतीय भौगोलिक प्रदेश आहे त्यामुळे या प्रदेशात कमी तापमान(-१८ डिग्री ते +१२ डिग्री),सतत बर्फ वृष्टी, ऑक्सीजनचे कमी प्रमाण,शेती योग्य जमिनीचे कमी प्रमाण या नैसर्गिक समस्या आहेत.असे असले तरी पिढ्यानपिढ्या तेथे राहणाऱ्या लोकांनी या परिस्थितीशी अनुकूलन साधले आहे.ज्यांना या वातावरणाची सवय नाही त्यांना या वातावरणाशी जुळून घेण्यास अवघड जाते.

आम्ही २० व २१ जून या दोन दिवसात लेहच्या आसपासच्या भागांना भेटी दिल्या व लेहमध्ये मुक्काम केला त्या मागील कारण म्हणजे या भागातील विषम वातावरणाशी जुळून घेण्याची सवय करणे होय. दोन दिवस लेहला थाबल्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे आज दि.२२ जूनला नुब्रा व्हॅलीला जाण्यासाठी आम्ही लेह हे शहर सोडले.नुब्रा व्हॅली ही लेहच्या उत्तर दिशेला आहे.लेह ते नुब्रा व्हॅली हा रोड जगातील सर्वात उंच रोड आहे.त्यामुळे या रोडने प्रवास करतांना वातावरणातील ऑक्सीजनचे प्रमाण कमी असते आणि थंडी खूप असते याची कल्पना आम्हाला देण्यात आली होती त्यामुळे कमी ऑक्सीजनच्या समस्येवर मात करण्यासाठी सोबत ऑक्सीजन सिलेंडर नेण्याचे ठरले व थंडीसाठी सोबत कपडे आणले असतांनाही आम्ही पुन्हा थंडीच्या कपड्यांची लेहला खरेदी केली.अशा प्रकारे आम्ही पूर्व नियोजन केले व सकाळी नुब्रा व्हॅलीसाठी Innova त बसलो.लेहमध्ये ऑक्सीजन सिलेंडरची कमतरता असल्यामुळे आम्हाला ऑक्सीजन सिलेंडर मिळाले नाही त्यामुळे बिना ऑक्सीजन सिलेंडर आम्ही प्रवासाला सुरुवात केली.

लेहपासून ते खरदूंगला चेक पॉइंट पर्यन्त ४० कि.मी.वेडीवाकडी वळणे घेत व नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेत जगातील सर्वात उंच (१८००० फूट) उंचीवर आम्ही पोहचलो.तेथे पोहचताच हिमवृष्टी सुरू झाली व तापमान कमी झाले.आम्हा सर्वांच्या अंगावर थंडीचे कपडे असून सुद्धा हातपाय गारठायला लागले व ऑक्सीजनची कमी जाणवायला लागली अशा परिस्थितीत आम्ही तेथे काही वेळासाठी थांबून फोटोग्राफीचा आनंद घेतला व बर्फासोबत मस्ती केली.त्याचा परिणाम असा झाला की आमच्या काही सदस्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला व काही सदस्यांचे हातपाय निळे पडून बधीर झाले.त्यामुळे आम्ही तेथून निघण्याचा विचार केला. पण आम्हाला पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला कारण हिमवृष्टी झाल्यामुळे रस्ता ब्लॉक झाला होता व तो मोकळा होण्यास कमीतकमी १ तास लागणार होता.आमच्यातील एका सदस्याला ऑक्सीजन कमतरतेमुळे घबराट होत होती व श्वास घेण्यास त्रास होत होता.तेव्हा आम्ही आमच्या जवळचे उपाय करणे सुरू केले.त्यामधे कापूर व ओवा सुंगायला दिला ,ORS चे पाणी पिण्याला दिले व सोबत आणलेले गोड लाडू खायला दिले .या सर्व बाबींचा परिणाम त्या सदस्यावर झाला. त्याला हायसे वाटले. त्यामुळे आम्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला.साधारण एक तासानंतर रोड वाहतुकीस खुला झाला. रोड बंद झाल्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांची संख्या खूप वाढली होती त्यामुळे वाहने हळू चालत होती.१८०००फूट उंच असलेल्या खरंदुला पॉइंट वरून वेडीवाकडी वळणे घेत व नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेत आम्ही १२०००फूट उंचीवर असलेल्या नुब्रा व्हॅलीत उतरलो.

नुब्रा नदी या व्हॅलीतून वाहत असल्यामुळे या व्हॅलीला नुब्रा व्हॅली म्हणतात.नुब्रा नदीचे पात्र फार विस्तीर्ण आणि सुंदर आहे. *”भाग मिल्खा भाग”* या चित्रपटाचे शूटिंग याच नदीच्या पात्रात झाले आहे.या नदीच्या डाव्या किनाऱ्यावर असलेल्या रोडने या नदीचे व व्हॅली चे सौंदर्य पाहत पाहत आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलो.

मुक्काम नुब्रा नदीच्या पात्रात असलेल्या हुंडर या छोट्याश्या खेड्यात होता. येथे आमची राहण्याची व्यवस्था नदीच्या पात्रात असलेल्या कापडी तंबूत केली होती. पुढील तीन दिवस आमचा मुक्काम वेगवेगळ्या ठिकाणी याच व्हॅलीत असणार होता. हुंडर हे गाव श्योक आणि नुब्रा नदीच्या संगमावर आहे.येथील नैसर्गिक सौंदर्य अवर्णनीय आहे.

चौथा दिवस -\

आज दि.२३ जून रोज बुधवारला सकाळी आम्ही Nubra व्हॅलीतील Diskit & Hunder या मुक्कामाच्या ठिकाणावरून पश्चिमेला ८० की.मी.अंतरावर असलेल्या Turtuk आणि Tyakshi या सीमावर्ती खेड्याला भेट देण्यासाठी निघालो.हा संपूर्ण प्रवास Nubra व्हॅलीतील Shyok नदीच्या काठाने आहे.Shyok नदीचे वालुकामय पात्र विस्तीर्ण असून नदीच्या दोन्ही काठाच्या बाजूने बर्फाच्छादित उंच डोंगर रांगा आहेत.नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या व्हॅलीतून प्रवास करण्याचा आनंद वेगळाच आहे.जवळपास ४ तासाचा प्रवास करून आम्ही Turkut गावाच्या पुढे असलेल्या Tyakshi या गावाच्या पायथ्याशी पोहचलो.तेथे मिलिटरी कॅम्प आहे.तेथून पुढे गाडी नेण्यास आम्हाला परवानगी मिळाली नाही त्यामुळे गाडी तेथेच ठेऊन आम्ही पायीच निघण्याचा निर्णय घेतला.योगायोगाने तेथेच Tyakshi या गावचे मुखिया (नंबरदार) हाजी अब्दुल कादीर हे ७८ वर्षाचे गृहस्थ आम्हाला भेटले ते सुध्दा Tyakshi गावाला चालले होते.चालता चालता ते आम्हाला या गावाचा इतिहास सांगू लागले.त्यांनी सांगितले की,बाल्टिस्तानचा भाग असलेली Turtuk,Tyakshi,Chalunkha आणि Thang ही चार गावे १९४७ ते १९७१ पर्यंत पाकिस्तानाचा भाग होती. १९७१ च्या युद्धात भारताने ही गावे जिंकून घेतली.तेव्हापासून ती भारतात सामील झाली आहे. अब्दुल कादीर सांगत होते त्यांना पाकिस्तान आणि भारत दोन्ही देशाचे नागरिक असण्याचा अनुभव आहे. ते सांगतात-‘माझा सख्खा भाऊ व अनेक नातेवाईक पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहतात. येथून १० किमीवर ते राहतात. पायी जरी निघालो तरी दोन तासात पोहचता येते. पण १९७१ नंतर त्याची भेट नाही. शेवटी काही वर्षांपूर्वी तो गेला.आमची भेट झालीच नाही.’ रक्ताच्या नात्याचे सगेसोयरे अवघ्या २-३ किलोमीटरवर आहे. पण कित्येक वर्षे उलटलीत त्यांचा चेहराही पाहता येत नाही. त्यांना भेटायचं असल्यास पासपोर्ट, व्हिसाची भानगड पूर्ण करून वाघा बॉर्डरमार्गे लाहोर-इस्लामाबाद असे २५०० किमी अंतर पार करून त्यांना जिवलगांना भेटता येतं. मात्र यासाठी येणारा खर्च येथे कोणाला परवडत नाही. त्यामुळे कोणीही तो द्रविडी प्राणायाम करत नाही.अलीकडे मोबाईल आल्यापासून व्हाट्स अपवर संपर्क करता येतो. पण सीमेलगतचे गाव असल्याने येथील मोबाईल सेवा वारंवार खंडित केली जाते. येथील लोक कोणाशी बोलतात, यावर प्रशासनाचे बारीक लक्ष असते.अब्दुल कादीर म्हणाले, ‘आमच्या दोन्ही देशाच्या सरकारकडून काही अपेक्षा नाही. फक्त वर्षातून एखाद्या वेळी तरी आमच्या नातेवाइकांना भेटता यावं. वयाच्या ७७ व्या वर्षी दुसरी काही अपेक्षा नाही.’ कादीर यांच्या डोळ्यातील पाणी येथील नागरिकांची व्यथा सांगून जात होती.

येथे अशा कहाण्या अनेकांच्या आहेत. १९७१ मध्ये या चारही गावातील अनेक लोक पूर्वी पाकिस्तान सरकारच्या सेवेत, सैनिकांत होते. ते तिकडेच राहिलेत.

अब्दुल कादीर हा सर्व इतिहास सांगत असताना आम्ही तो एकाग्रतेने ऐकत होतो त्यासोबत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली हिरवीगार गव्हाची शेती, आक्रोडची झाडे पाहत चाललो होतो.थोड्याच वेळात आम्ही गावात पोहचलो.गावात पोहचल्यावर आम्हाला पाणचक्की दिसली.अब्दुल कादीर सांगत होते की,बर्फ वितळ्यावर उंच डोंगरावरून येणारे पाणी आम्ही एका दांडात (पाण्याचा पाट) जमा करून तो पाण्याचा पाट या पाणचक्कीच्या पात्यावर सोडतो त्यामुळे ही चक्की फिरते आणि गावातील सर्व लोक या चक्कीवर आपले दळण दळतात.हाच पाण्याचा पाट पुढे गावातून मुख्य रस्त्याच्या एका बाजूने वाहत जाऊन शेतीसाठी या पाण्याचा उपयोग केला जातो.

गावात प्रवेश केल्यावर गावातील लहान मुले मुली आमच्याजवळ आली आणि त्यांनी आम्हाला Hi,Hallo,Good Mornig ,How are you ? अशी वाक्ये बोलून आमचे स्वागत केले आणि आमच्या सोबत सोबत चालू लागली. ती गोरी गोमटी , गुलाबी गाल असलेली सुंदर,निष्पाप मुले पाहून आम्हाला खूप छान वाटले.आम्ही सुध्दा त्यांची नावे विचारली.कोणत्या वर्गात शिकत आहेत ते विचारले.Tyakshi गावाची शाळा गावापासून पाकिस्तान सिमेकडे साधारण १ ते १.५ कि.मी.अंतरावर आहे.आम्ही त्यांची शाळा पाहण्यासाठी गावातून पुढे निघालो तेव्हा ही लहान मुले मोठ्या आनंदाने बागडत खेळत आमच्या सोबत आली.पाण्याच्या पाटाच्या काठा काठाने शाळेकडे जाणारा रस्ता होता.एका बाजूने गव्हाची शेती आणि दुसऱ्या बाजूने खळखळ वाहणारा पाण्याचा पाट यामधून चालत चालत आम्ही शाळेत पोहचलो.

तेथे अब्दुल कादीर आम्हाला सांगत होते की, या गावाच्या सीमेवर भारत-पाकिस्तानचा कडक पहारा आहे. अब्दुल कादीर तेथील जुन्या सरकारी प्राथमिक शाळेच्या आवारातून समोरच्या पर्वतरांगेकडे बोट दाखवून सांगतात- तो पुढचा डोंगर पाकिस्तानच्या ताब्यात, तर… या बाजूचा भारताच्या ताब्यात आहे. येथील प्राथमिक शाळेची जुनी इमारत १९६९ मध्ये पाकिस्तान सरकारने बांधली होती. पुढे१९७१ मध्ये भारत सरकारने याच इमारतीत शाळा सुरू केली.

या गावात भारतीय सैनिकांचा कॅम्प आहे. भारतीय सैन्याने या गावाला जवळपास दत्तकच घेतले आहे. येथे भारतीय सेनेने आर्मी वेल्फेअर स्कुल सुरू केले आहे. या शाळेत शिकून अनेक स्थानिक मुलं डॉक्टर झाली आहेत. प्रशासनातही अनेक मुलं-मुली आहेत.

भारतीय सेनादल येथील नागरिकांसाठी केवळ शाळाच चालवत नाही तर अस्थायी स्वरूपाची पण नियमित पैसे मिळतील, असे अनेक कामे त्यांना उपलब्ध करून देते. तेथील शासकीय प्राथमिक शाळेतील शिक्षिका नजमा मॅडम म्हणाल्या की, ‘भारतीय सैन्याचे आमच्यावर खूप उपकार आहेत. आमच्या नवीन पिढीचे आयुष्य बदलत आहे, त्यामागे केवळ भारतीय सेनादल आहे.’ येथील अनेकांची हीच भावना आहे.शाळेच्या आवारातून त्यांनी पाकिस्तानच्या सीमेजवळ व नदीच्या काठावर असलेली Chalunkha आणि Thang ही गावे दाखवली .ती भारत पाकिस्तान सीमेवरील शेवटची गावे दुरूनच बघून आणि शिक्षिका नजमा मॅडम यांचे आभार मानून आम्ही माघारी आमच्या गाडीजवळ परत आलो.

Turtuk या गावाला भेट –

Tyakshi या गावाला भेट देऊन परतीच्या मार्गावर असलेल्या Turtuk या गावाला आम्ही भेट दिली.या गावात एक वस्तू संग्रहालय आहे.त्याला भेट देण्यासाठी आम्ही तेथे गेलो.

Turtuk येथे बाल्टिस्तान राजघराण्याच्या तीन शाखांपैकी एका शाखेचे विद्यमान राजे मोहम्मद खान यांची त्यांच्या ४०० वर्ष जुन्या महालात (ज्याचे आता संग्रहालयात रूपांतर करण्यात आले आहे) भेट झाली. त्यांचा महाल आता पार मोडकळीस आला आहे. जुने वैभवही लयास केले आहे. मोहम्मद खान स्वतःच आता स्वतःच्याच संग्रहालयात गाईडची भूमिका बजावून शे-पाचशे रुपये कमावतात.

खान यांनीही पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशाच्या नागरिकत्वाचा अनुभव घेतला आहे. कोणता देश अधिक आवडला, असे त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘साहेब, भारत असो वा पाकिस्तान किंवा इतर कुठलाही देश, तो आपल्यासाठी काही करत नसतो. आपल्या उपजीविकेसाठी आपल्यालाच मेहनत करावी लागते.’

“१९४७ पूर्वी बाल्टिस्तानच्या प्रदेशाला ब्रिटिशांनी भरपूर स्वायत्तता दिली होती. १५ ऑगस्ट १९ ४७ पासून वर्षभर आमचे पूर्वजच राजे होते. मात्र ४८ मध्ये जिनांनी भारताची भीती दाखवून आमचा सुंदर प्रदेश ताब्यात घेतला. तेव्हा आम्हाला आमची स्वायत्तता कायम राहील, असे सांगितले होते, पण ते कागदावरच राहिले. नंतर खूप जाचक कायदे आमच्यावर लादले. त्या तुलनेने भारताचा, येथील सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांचा अनुभव छान राहिला.’

बाकी येथील मुस्लिम जनता अतिशय प्रेमळ व अतिथ्यशील वाटली. अनेक वर्षे जगापासून संपूर्ण तुटलेल्या अवस्थेत ते होते. त्यामुळे त्यांच्या जुन्याकाळातील जगण्याच्या अनेक खाणाखुणा गावात आढळतात. पाण्यावर चालणारी पाणचक्की, चारा, कापून आणलेले पीक सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक घरासमोर दगडांची रास रचून बंदिस्त शेड तयार करण्यात आले आहे. २०१० पासून हा परिसर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.

बाल्टिस्तानी स्त्री-पुरुष व लहान मुले दिसायला अतिशय देखणे व गोड आहेत. पुरुष उंचेपुरे व बांधीव शरीरयष्टीचे आहेत.स्त्रिया अतिशय लाजाळू आहेत. बाहेरील व्यक्तींसोबत त्या कमी बोलतात. मुले चटपटीत आहे.

बाकी संपूर्ण लडाखप्रमाणे निसर्गाची मेहेरनजर येथेही आहे. विविध रंगाच्या अनेक छटा दाखवणाऱ्या पर्वतरांगा, नितळ, स्वच्छ पाण्याने वाहणाऱ्या नद्या व झरे येथेही आहेत. सीमेवरील गावांना आणखी एक वरदान लाभलंय. येथे हिरवा रंगही भरभरून आढळतो. सफेदीसारखे आकाशाला भिडणारे वृक्ष, गव्हाची हिरवीगार शेती व जर्दाळूची झाडे या गावाच्या सौन्दर्याला चार चांद लावतात.

अशा प्रकारे Turtut व Takshi या दोन गावांना प्रत्यक्ष भेट देऊन आणि Chalunkha व Thang या गावांचे दुरून दर्शन घेऊन आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी परत आलो.त्या दिवशी पौर्णिमेची रात्र होती.जेवण केल्यावर आमच्या काही सहकाऱ्यांनी तंबूच्या बाहेर शेकोटी करून गुलाबी थंडीचा आनंद घेतला तर काही सदस्य जेवण करून तंबूत जाऊन झोपी गेले.

पाचवा दिवस –

दि.२४ जून रोज गुरुवारला सकाळी नाष्टा करून आम्ही आजच्या पुढील प्रवासासाठी तयार झालो.

आजचा आमचा प्रवास हा मुक्कामाच्या ठिकाणापासून पूर्वेला १५० कि.मी.अंतरावर व भारत आणि चीनच्या सीमेवर असलेल्या Pangong Lake ला भेट देण्यासाठी होणार आहे.हा संपूर्ण प्रवास Nubra Valley मधून असणार होता.

Nubra Valley ही उत्तरेकडील काराकोरम पर्वत रांग आणि दक्षिणेकडील लडाख रांग या दोन डोंगर रांगामधून वाहणाऱ्या नुब्रा (Nubra) आणि स्योक(Shyok ) नदीच्या संगमाने तयार झालेली व्हॅली आहे.

Nubra,which means an orchard or garden.

नुब्रा व्हॅली पाकिस्तान व चीन या दोन देशांना जोडते.भारतात तिची लांबी जवळपास २७० कि.मी.आहे.यापैकी २३०कि.मी. चा प्रवास पाकिस्तान सीमेपासून ते चीन सीमेपर्यंत आम्ही या व्हॅलीतून केला आहे.दोन नदीच्या संगमामुळे व त्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे तेथे शेतीला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे सफरचंद आणि जर्दाळूच्या फळबागा, विलो आणि ध्रुवीय झाडे , गहू, बार्ली, वाटाणे आणि बाजरी यासारख्या विविध पिकांची शेती दृष्टीस पडते.तसेच प्राणी जीवन सुध्दा दृष्टीस पडते . या व्हॅलीला रेशीमचा रस्ता ( Silk Route) असेही म्हणतात. उंच पर्वतांनी वेढला गेलेल्या या आश्चर्यकारक व्हॅलीतून प्रवासाचा आनंद काही वेगळाच आहे.

या व्हॅलीतून ५ ते ६ तासाचा निसर्गरम्य असा प्रवास करून आम्ही संध्याकाळी ५.०० वा.Pangong Lake ला पोहचलो.

Pangong Lake –

हा तलाव भारत आणि चीनच्या सीमेवर आहे.या तलावाची लांबी १३० कि.मी.असून रुंदी ६ ते ७ कि.मी.आहे. हा तलाव समुद्र सपाटीपासून ४२२० मी.उंचीवर असून याचे क्षेत्रफळ ६०४ वर्ग कि.मी.आहे पण यापैकी १/३ भागच भारताच्या ताब्यात आहे उर्वरित २/३ भाग चीनकडे आहे.

लेह लडाख सहलीतील अनेक आकर्षणापैकी महत्त्वाचे आकर्षण म्हणजे pangong Lake होय.येथे आल्यावर आणि येथील तलाव आणि त्याच्या सभोवतालचे सौंदर्य पाहून प्रत्येकजण मोहीत होतो.आम्ही सुध्दा तो विविध रंगाच्या छटा दाखवणारा निळाशार तलाव,स्वच्छ वातावरण,तलावाच्या काठावरील स्वच्छ रेती ,चारही बाजूला असलेले बर्फाच्छादित डोंगर रांगा.या डोंगर रांगावरून येणारी थंडी हवा याचा अनुभव घेऊन तृप्त झालो.

या तलावाचे पाणी खारे असून त्यामध्ये प्राणी जीवन नाही पण तलावाच्या पाण्यावर काही बदक आणि गुल्स हे पक्षी दिसतात.

Pangong Lake प्रसिद्धीला येण्याचे आणखी एक कारण म्हणजे या lake वर *थ्री इडियट* या सिनेमाचे झालेले शूटिंग होय.त्या सिनेमाच्या क्लायमॅक्स सीनमध्ये आमिरखान पर्वतरांगांनी वेढलेल्या निळ्याशार पाण्याच्या विशाल तलावाकाठी लडाखी पोरांसोबत पतंग उडवत असतो. तेवढ्यात करीना कपूर नववधूच्या वेशात पिवळ्या रंगाच्या स्कुटरवर लाल रंगाचे हेल्मेट घालून त्याच्याकडे येते. (गजब कलर कॉम्बिनेशन होतं ते) आमिर चकीत होऊन पाहत असतानाच ती स्कुटरवरून उतरते, ‘न सांगता का निघून गेलास?’ असा प्रश्न करते.आमिर काही उत्तर देण्याचा आतच ती त्याच्या गालावर सणसणीत एक लावून देते. नंतर ती विचारते

लग्न केलं? तो उत्तर देतो- नाही ती थोडी रिलॅक्स होऊन पुढचा प्रश्न विचारते-‘किसीं से प्यार करते हो?’

तो उतरतो-yaah

करिनाचा चेहरा एकदम पडतो. तरी शेवटचा प्रश्न विचारायचा म्हणून ती विचारते, -Who?

आमिर म्हणतो-You

त्याक्षणी सारं विसरून ती त्याच्या ओठाचे करकचून चुंबन घेते.

आवेग ओसरल्यावर ती म्हणते-देखा…नाक बिचमे नही आती है स्टूपिड…

‘थ्री इडियट्स’ चा हा सीन लडाखमधील ज्या pangong लेकवर चित्रित झाला, त्या लेकवर आज आम्ही होतो.

या लेकबाबत जेवढं सांगितलं जातं, त्यापेक्षा तो अधिक सुंदर आहे. याचं सौन्दर्य अनुभवणं म्हणजे lifetime experience आहे.

चारही बाजूने सतत रंगसंगती बदलणाऱ्या पर्वतरांगा, त्यातील अनेक पर्वतरांगा बर्फाने झाकलेल्या आणि त्याच्या मधोमध निळ्याशार पाण्याचा हा विशाल जलाशय.

स्वच्छ सूर्यप्रकाशाच्या दिवशी पर्वतरांगाचे सप्तरंगी प्रतिबिंब स्पटिकासारख्या चकाकत्या पाण्यात पाहण्याचा आनंद काही औरच असतो.

*Pangong लेकच्या काठावर उभं राहून याचं सौदर्य डोळ्यात किती साठवू नी किती नाही, असं होतं. अशावेळी शरीराच्या विविध भागांवर डोळे उगवले असते, तर बरं झालं असतं, असे वाटल्याशिवाय राहत नाही.*

Pangong lake आज भारतातील Hot destination पैकी एक आहे. या लेकवर देशातील अनेक राज्यातील पर्यटक भेटतात. कोरोनाची लाट ओसरल्यांनातर सध्या लडाखला पर्यटकांची चांगली गर्दी आहे. सध्या एकट्या दिल्लीतून दिवसाला दहा विमान लेहसाठी सुटतात. मुंबई, चंदीगड व इतर शहरातून येणारी विमान वेगळी. याशिवाय श्रीनगर वा मनालीवरून मोठ्या संख्येने बायकर्स येतात.

सोनू नावाचा Guide सांगत होता- ‘थ्री इडियट्स’ नंतर Pangong ला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. वर्षाला किमान दीड लाख लोक येतात.

Pangong lake हा भाग संरक्षणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात व वन्य जीव अभयारण्यात येत असल्याने येथे कायमस्वरूपी बांधकामाला परवानगी नाही. Tourist Season च्या काळात कापडी वा लाकडी तंबू उभारण्यास परवानगी दिली जाते. त्यात पुरेशा सोयी असतात. वीज मात्र रात्री काही तासच जनरेटरच्या साहाय्याने पुरवली जाते. मोबाईल येथे चालत नाही. कोणतंच नेटवर्क नाही.

जगात कुठला तरी भाग असा आहे की जिथे मोबाईल नेटवर्क नसतं आणि विजही नसते, हे पाहून खूप शांत वाटतं.

Pangong lake च्या ज्या भागात ‘थ्री इडियट्स’ चा तो सीन चित्रित झाला तिथे आता करीना कपूरच्या चित्रपटातील नववधूच्या गेटअपमध्ये फोटो काढून देण्याची सोय आहे. शिवाय ढुंगणाच्या आकाराच्या सीटवर बसून आमीर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी हे तिघे ‘ऑल इज वेल…’म्हणतात. तसे फोटोही युवक काढून घेतात.

थोडक्यात ‘थ्री इडियट्स’ चित्रपटामुळे या भागाचं अर्थकारण बदललं आहे

मात्र प्रचंड संख्येने येणारे पर्यटक, त्यांच्या गाड्या, त्यांच्या शहरी सवयी, त्या पूर्ण करण्यासाठी नियमांची मोडतोड करणारे व्यावसायिक, कोणत्याही चांगल्या गोष्टीची वाट लावण्याच्या आपल्या भारतीयांची सवय यामुळे या परिसराचं Virgin सौन्दर्य किती दिवस कायम राहील,याबाबत शंका आहे. या वेळी आम्ही सारे भटके समूहातील काही सदस्यांनी लेह लडाख अभ्यास सहलीचा मनसोक्त आनंद घेतला.

या स्वर्गीय सौन्दर्याला मानवी नजर लागण्यापूर्वी एकदा नक्की जाऊन या.

त्या दिवशी अंधार पडेपर्यंत आम्ही तलावाच्या काठावर याक सवारी,फोटोग्राफी,थ्री इडियट फेम बम आणि स्कूटर सवारीचा आनंद घेतला.

अंधार पडल्यावर आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी तंबूत परतलो फ्रेश झालो आणि रात्रीचे जेवण करून गरम कपडे अंगावर घेऊन झोपी गेलो.

सहावा दिवस –

दि.२५ जून रोज गुरुवारची आमची नियोजित भेट Pangong Lake वरून Chushul मार्गे २२० कि.मी.अंतरावर असलेल्या Tsomoriri Lake ला होणार होती व तेथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी २३५ कि.मी. अंतरावर असलेल्या लेह येथील बेस कॅम्प असलेल्या मुक्कामाला पोहचायचे होते.या दोन दिवसाच्या प्रवासात एकूण ४५५ कि.मी.चा प्रवास आणि पहिल्या दिवसाच्या प्रवासात उंचावरील Tsaga La Pass ज्याला दुसरे नाव Chagga La Pass आहे.या सारखे तीन शिखरे (high altitude passes) लागणार होते तसेच दुसऱ्या दिवशी Polo-Kongka Pass आणि Tanglangla Pass (5350 meter) या उंच शिखरावरून जावे लागणार होते.

आम्ही अगोदरच्या दोन दिवसाच्या प्रवासाने थकलो होतो त्यामुळे पुन्हा पुढील दोन दिवस सतत ४५५ कि.मी.चा प्रवास करणे शक्य नव्हते त्यामुळे आम्ही नियोजित स्थळांना भेटीचा बेत रद्द करून लेह जवळ करण्याच्या दृष्टीने अनियोजित स्थळांना भेटीचे नियोजन केले .

गुरुवारी सकाळी ९.०० वा.आम्ही परतीच्या प्रवासाला निघण्यापूर्वी पुन्हा एकदा Pangong Lake चे सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी थोडा वेळ Lake वर गेलो तेथे फोटोग्राफी गेली आणि पुन्हा कधी येणे होते ही नाही ? या भावनेने Lake चे सौंदर्य कायमस्वरूपी डोळ्यात साठवून परतीच्या प्रवासाला निघालो.परतीचा प्रवास हा Silk Route ने Durbuk पर्यन्त होता.Durbuk पासून आम्ही Silk Route सोडून लडाख पर्वत राग चढायला सुरुवात केली.या पर्वत रांगेच्या शिखरावर Chang La Pass (5320 meter) वर आम्ही पोहचलो .आमच्या आतापर्यंतच्या प्रवासात लागलेला हा दुसऱ्या नंबरचा सर्वात उंच Pass होता.तेथे आम्ही थोड्या वेळासाठी थांबून चहा नाश्ता घेतला पण तेथे आम्हाला ऑक्सीजनची कमतरता जाणवू लागली त्यामुळे लगेच पुढील प्रवासाला सुरुवात करून या पर्वत रांगेच्या पायथ्याशी असलेल्या आणि सिंधू नदीच्या काठावर असलेल्या Karu या गावी पोहचलो.Karu या गावा जवळ आणि सिंधू नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर Hemis Monastery म्हणून बौद्ध धर्माचा मठ आहे.तो पाहण्यासाठी आम्ही तेथे पोहचलो.

हेमिस मॉनेस्ट्री

लेह लडाख मध्ये बौद्ध धर्मियांची लोकसंख्या जवळपास ४०% आहे.त्यामुळे तेथे बौद्ध स्तूप आणि मठ मोठ्या प्रमाणात आहेत.त्यापैकी हेमिस हा एक बौद्ध मठ आहे.

हेमिस हे सिंधू नदीच्या पश्चिमेला लेहच्या दक्षिणेस सुमारे 45 कि.मी. अंतरावर आहे. हेमिस मठ लडाखमधील सर्वात मोठा आणि अत्यंत श्रीमंत असलेला मठ आहे. हा मठ 1630 मध्ये बांधला आहे. हेमिस लडाखच्या इतर महत्वाच्या मठांपेक्षा भिन्न आहे.मठाच्या चारही बाजूं रंगीबेरंगी प्रार्थना ध्वजांनी सजविल्या आहेत .

हेमिस मठात तिबेटी पुस्तकांचे एक महत्त्वाचे ग्रंथालय आणि थांगका (धार्मिक पेंटिंग), सोन्याचे पुतळे आणि स्तूप यांचा मौल्यवान दगडांनी भरलेला अतिशय सुंदर आणि मौल्यवान संग्रह आहे.

जून-जुलैमध्ये दोन दिवस होणाऱ्या हेमिस फेस्टिव्हलमध्ये दर 12 वर्षांनी सर्वात मोठा थांगका (धार्मिक पेंटिंग) दाखविला जातो. गुरु पद्मसंभवच्या ( दुसरा बुद्ध) जयंतीनिमित्त वार्षिक उत्सव मठाच्या अंगणात भरतो. रंगीबेरंगी स्पर्धेत वाईटावर चांगला विजय मिळवणाऱ्या या सणात दुर्गम भागातील लडाखी लोक माल विकत घेतात व विक्री करतात. उत्सवाच्या वेळी या अंगणात विविध विधी आणि मुखवटा नृत्य केले जाते.

या मठामध्ये तीन मोठी मंदिरे आहेत व त्यामधे अनुक्रमे गौतम बुद्ध,धर्मपाल आणि गुरू पद्मसंभव (दुसरा बुद्ध) यांच्या मोठमोठ्या व उंच मुर्त्या आहेत. या तीनही मुर्त्यांची रोज पूजाअर्चा केली जाते.

अशा प्रकारे लडाख मधील सर्वात मोठा आणि श्रीमंत असलेला बौद्ध मठ पाहून आम्ही kharu येथील Singhy Palace Hotel ला त्या दिवशी मुक्काम केला.

सातवा दिवस

दि.२६ जून रोज गुरूवारला सकाळी आम्ही तयार होऊन पुढील प्रवासाला म्हणजे लेहला जाण्यासाठी तयार झालो. Karu हे गाव लेह-मनाली हायवेवर लेह पासून दक्षिणेला ४५ कि.मी.अंतरावर आहे. तेथे मिलिटरी कॅम्प आहे.लेहला निघण्यापूर्वी आम्ही तेथील मिलिटरी कॅम्प मधील कॅन्टीनमध्ये थोडी खरेदी केली आणि पुढील प्रवासाला निघालो.

karu- लेह मार्गावर Shey नावाचे एक छोटेसे शहर लागते.तेथे आम्ही दोन स्थळांना भेटी दिल्या.

Rancho’s School

‘थ्री इडियट’ सिनेमातील तो प्रसंग आठवlला की प्रत्येक जण खदखदून हसतो.

अमीर खान ( Rancho) ला शोधत शोधत त्याची मैत्रीण प्रिया (करीना कपूर) त्याचे दोन मित्र फरान ( माधवन) आणि राजू ( शर्मन जोशी) हे एका शाळेत येतात.त्या शाळेतील विविध वैज्ञानिक उपकरणे व ती हाताळणारे विद्यार्थी पाहून त्या सर्वांची खात्री पटते की ही शाळा त्यांचा मित्र Rancho ची (अमीर खान) असली पाहिजे.त्या वेळेसचा एक प्रसंग आहे .Rancho चा कॉलेज जीवनातील प्रतिस्पर्धी मित्र चतुर हा पुढे एका मल्टी नॅशनल कंपनीचा मॅनेजर बनतो आणि त्याची कंपनी Rancho सोबत करार कण्यासाठी त्याच्या कंपनीचे करार पत्र घेऊन त्यावर सही घेण्यासाठी चतुर Rancho च्या शाळेत आलेला असतो.तेथे त्याला जोराची सू-सू आलेली असते तेव्हा तो एका भिंतीचा आडोसा घेऊन सू-सू करण्याच्या तयारीत असतो तेवढयात वरच्या मजल्यावरील खिडकीतून दोन विद्यार्थी चतुरला पाहून तेथे सू सू करू नको म्हणून मना करतात पण चतुर ऐकत नाही आणि त्या भिंतीवर सू सू करतो तेव्हा ती मुले वरच्या खिडकीतून इलेक्ट्रिक बल्ब लावलेली वायर सोडतात आणि त्यामुळे चतुरला चांगला झटका देतात त्याने चतुर जोराने विव्हळत खाली पडतो.

वरील प्रसंग ज्या शाळेत चित्रित केला त्या शाळेला आम्ही भेट दिली व जेथे तो प्रसंग चित्रित झाला तेथे फोटो काढले. आम्ही त्या शाळेची चौकशी केली तेव्हा कळाले की सिनेमात दाखवले तशी ती विशेष शाळा नसून सर्वसामान्य शाळे सारखी ती एका संस्थेची शाळा आहे.फक्त थ्री इडियट सिनेमाचे शूटिंग तेथे झाल्यामुळे त्या शाळेला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.तसेच Rancho आणि वांगचू बांगडोचा त्या शाळेशी काही संबंध नाही.अशा प्रकारे त्या शाळेला भेट देऊन आमचा सिनेमातील गैरसमज दूर झाला.

Shey Palace –

त्याच शहरातील दुसरे ठिकाण म्हणजे shey palace होय.

Shey हे जुन्या काळी लडाखची उन्हाळी राजधानी होती. तेथे एक राजवाडा आहे.मूळ राजवाडा आता भग्नावस्थेत आहे, दहाव्या शतकात लडाखचा राजा (त्यावेळी मेरील नावाचा) ल्हाचन पलगीगन यांनी शे गावाजवळ हा राजवाडा बांधला होता.११ व्या शतकात लडाखवर आक्रमण केल्यावर मोगल खानदानी मिर्झा हैदर दुगलट येथेच राहला होता.

दिवंगत राजा सेनगे नामग्याल यांच्या स्मरणार्थ, वर्तमान शे पॅलेस आणि मठ देखील १६३५ मध्ये डेल्टन नामग्यालच्या सूचनेनुसार बांधला गेला होता.

या राजवाड्यावरून सिंधू नदीच्या पात्रातील हिरवळीने नटलेला सुपीक प्रदेश दिसतो.

राजवाडा बघून आम्ही लेहला आलो व तेथील मिलिटरी कॅन्टीन मध्ये सर्वांनी त्या दिवशी खरेदी केली व संध्याकाळी आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलो.

अशा प्रकारे दि.२० जूनला लेह पासून सुरू झालेल्या लेह-लडाख सहलीचा समारोप २६ जूनला लेह येथेच झाला.

लेह लडाख सहलीदरम्यान आलेल्या विविध अनुभवाची शिदोरी सोबत घेऊन आणि त्या परिसराचे अविस्मरणीय सौंदर्य डोळ्यात साठवून आम्ही दि.२७ जूनला सकाळी १०.०० वा लेह विमान तळावरून लेह सोडले.

लेह लडाख या सहलीचे सुरुवातीपासुन ते शेवटपर्यंत यशस्वी आयोजन आणि नियोजन अविनाश दुधे यांनी केल्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करून हे प्रवास वर्णन थांबवतो .

(सर्व छायाचित्रे-अविनाश दुधे)

(लेखक मराठा सेवा संघाच्या संत गाडगेबाबा प्रबोधन कक्षाचे राज्य उपाध्यक्ष आहेत)

9404490980/9822194166

Previous articleलिडर – 50 इन्साईट्स फ्रॉम मायथॉलॉजी
Next articleआदित्यनाथ : योगी की हट्टी योगी ?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.