मानवी जीवनाशी भयावह खेळ खेळणाऱ्या फार्मा कंपन्या

नीलांबरी जोशी

“हे तर काहीच नाही.. फ्लूच्या साथीनंतर आता नवीन भयंकर साथ येणार आहे.. देव खरोखर दयाळू आहे..”

“मला वाटतं, आपण आपल्या कामगारांना दुप्पट बोनस द्यायला हवा..“

“जरा थांबा, नवीन येणाऱ्या साथीत अजून माणसं मरतील.. मग आपल्याही कंपनीतले काही कामगार कमी होतील, तेव्हा बोनस देऊ..“

“सच है दुनियावालों के हम है अनाडी” सारख्या गाण्यांमुळे, राजकपूर-नूतन-मोतीलाल यांच्या अभिनयामुळे गाजलेल्या १९५९ सालच्या हृषिकेश मुखर्जी यांच्या “अनाडी” चित्रपटातला हा संवाद इंदर राज आनंद यांनी लिहिला आहे. “अनाडी” चित्रपटातल्या एका दृश्यात कंपनीच्या भागधारकांचा हा संवाद चालू असताना राजकपूर दरवाजा ओलांडून आत येतो.

त्याला पाहून मोतीलाल म्हणतो, “मिसेस डिसा मरण पावल्याचं कळून वाईट वाटलं.”

राजकपूर म्हणतो, “तिचा मृत्यू हा खून होता.. तुमच्या कंपनीनं बनवलेल्या आौषधानं ती मरण पावली.. आता तिला जिवंत करायचंही आौषध काढा..”

मोतीलालच्या कंपनीनं आौषधांमध्ये भेसळ करुन लाखो रुपयांचा नफा कमावलेला असतो..

*********

२०१९ साली अमेरिकेत opioid असलेली आौषधं जास्त प्रमाणात घेतल्यानं ५०,००० लोक मरण पावले. त्यांना या आौषधांमधल्या हेरॉईनसारख्या ड्रग्जचं व्यसन लागलं होतं. त्यांनी घेतलेल्या वेदनाशामक गोळ्यांमध्ये तो ड्रग विपुल प्रमाणात होता.

हे कसं सुरु झालं? तर १९९० साली अमेरिकेतल्या काही फार्मा कंपन्यांनी मेडिकल विश्वाला “opioid असलेल्या वेदनाशामकांचं व्यसन रुग्णांना लागणार नाही” हे पटवून दिलं. त्यानंतर या वेदनाशामक गोळ्यांच्या प्रिस्क्रिप्शनचं प्रमाण भरमसाठ वाढलं. त्याचा जवळपास गैरवापरच सुरु झाला.

२०१७ साली opioid असलेल्या वेदनाशामक गोळ्या घेऊन ४७००० अमेरिकन मरण पावले. इतकंच नव्हे तर १७ लाख लोकांना त्याचं व्यसन लागलं. या प्रकारालाच opioid use disorder असं नाव आहे. या गोळ्या घेणाऱ्या ८ ते १२ टक्के लोकांना हे व्यसन लागतं. त्यातले ४ ते ६ टक्के लोक नंतर हेरॉईनच्या व्यसनात अडकतात. गर्भवती महिलांनी या गोळ्या घेतल्यामुळे नवजात बालकांमध्ये काही आजार दिसून आले.

या गोळ्या तयार करणारी मुख्य कंपनी आहे. पर्ड्यु फार्मा. २१ आॉक्टोबर २०२० रोजी या कंपनीनं ८३० कोटी डॉलर्सची नुकसानभरपाई देण्याची तयारी दाखवली होती. या कंपनीवर “काही आजारांवर वैद्यकीय गरज नसतानाही हेतूपूर्वक या गोळ्या देण्यासाठी डॉक्टर्ससोबत हातमिळवणी करुन कट रचल्याचा“ आरोप होता. २० वर्षात opioids मुळे अमेरिकेत ४,५०,००० जण मरण पावले आहेत.

*******

“पर्ड्यु फार्मा” ही कंपनी चालवणारं कुटुंब आहे सॅकलर..! सॅकलर्स पिढीजात फार्माच्या व्यवसायात आहेत. त्यांनी करोडो डॉलर्सची नुकसानभरपाई दिल्यानंतर आता पर्ड्यु दिवाळखोरीत निघाल्यानं बंद पडणार आहे. पर्ड्युमधल्या नफ्याच्या तुलनेत ही रक्कम किरकोळ आहे. मात्र लाखो लोकांचे प्राण घेणाऱ्या या कंपनीवर कोणतेही फौजदारी गुन्हे दाखल नाहीत. तशी व्यवस्था त्यांनी केली आहेच..!

**************

“आॉक्सिकॉंटिन“ हे पर्ड्युचं गाजलेलं वेदनाशामक. डोनाल्ड ट्रंप यांना त्या आौषधानं निवडणूक जिंकून दिली. कशी? अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत ज्या राज्यांनी / ठिकाणांनी ट्रंपला मतं दिली तिथे दारु किंवा ड्रग्ज यांचं व्यसन असणारी, नैराश्यग्रस्त, बेरोजगार गोरी माणसं जास्त प्रमाणात होती. त्यांना व्यसन लागण्यामागे आॉक्सिकॉंटिन या वेदनाशामक गोळ्यांचा मोठा हात होता.

“जागतिकीकरण आणि बाहेरुन आलेल्या देशांमधल्या माणसांमुळे आपल्या नोकऱ्या गेल्या” या विचारानं ही माणसं व्यसनाधीन झाली होती. त्यांच्यात आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं होतं. “बाहेरुन आलेल्या माणसांमुळे तुमच्या नोकऱ्या गेल्या” अशा प्रकारचा प्रचार ट्रंपनं भरपूर केला होता. त्या प्रचाराला बळी पडून सगळ्यांनी ट्रंपला मतं दिली होती.

********

हे सगळं वाचायला मिळतं ते “एंपायर आॉफ पेन” या पॅट्रिक कीफी या लेखकाच्या पुस्तकात..! हे पुस्तक सॅकलर कुटुंबानं लोकांच्या वेदनांवर आपलं साम्राज्य कसं उभारलं याचा खळबळजनक इतिहास मांडतं. कीफीचं “से नथिंग” हे आयर्लंडवरचं पुस्तकही बेस्टसेलर होतं.

“एंपायर आॉफ पेन” हे उत्कंठावर्धक कादंबरीसारखं उलगडत जाणारं पुस्तक असलं तरी त्यात अनेक महत्वपूर्ण मुलाखती आणि अनेक कागदपत्रांचे उल्लेख आहेत. सॅकलर कुटुंबियांनी अर्थातच या पुस्तकाला सहकार्य केलेलं नाही. त्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन थांबवण्याचाही प्रयत्न केला.

*****

आर्थर, मॉर्टिमर आणि रेमंड ही तीन सॅकलर भावंडं डॉक्टर होती. आर्थर १९८७ साली मरण पावला तेव्हा त्यानं संपत्ती कुठून जमा केली होती हे कोणालाच ठाऊक नव्हतं. पण त्याचं उत्तर होतं व्हॅलियम. रॉशे ही कंपनी व्हॅलियम बनवत होती. आर्थर त्याचा मालक नसला तरी त्याचं तिथे जाणं येणं संशयास्पद होतंच. मार्केटिंग आणि जाहिरातबाजीत तो निपुण होता. “न्यूयॉर्क टाईम्स”मध्ये संपादकीय भासावं असं एक insert व्हॅलियमवर घालण्याची त्यानं “व्यवस्था” केली होती. डॉक्टरांकडून या आौषधाबाबत उत्तम रिपोर्टसही त्यानं छापून आणले होते. अर्थात जरा खोल गेल्यावर ते रिपोर्टस काल्पनिक असल्याचं उघडकीला आलं होतं.

“आॉक्सिकॉंटिन” बनेपर्यंत आर्थर जिवंत नव्हता. त्याच्या भावंडांनी “पर्ड्यु” ही कंपनी १९५२ साली विकत घेतली. मॉर्टिमर आणि रेमंडस यांनी, यांच्या मुलांनी आणि नातवंडांनी ती चालवली. Opioids खरंतर उपयोगी आहेत. पण त्या योग्य प्रमाणात घेतल्या तर..! पर्ड्युनं मात्र त्यांचा गैरवापर होईल अशीच व्यवस्था केली. Opioids मध्ये हेरॉईन, मॉर्फिन, फेंटानाईल, कोडाईन अशा गोष्टींचा समावेश होतो. अमेरिकेतल्या वैद्यकीय विश्वाशी सहभागी असलेल्या अनेक कंपन्या / संस्था यात पर्ड्युचे हस्तक कसे आहेत ते या पुस्तकात जागोजागी उदाहरणं देऊन विशद केलं आहे. कंपनीला यासाठी अधूनमधून दंडही भरावे लागले.

२००७ साली फार्मा कंपनीच्या विश्वातला सर्वात जास्त दंड “पर्ड्यु”नं आॉक्सिकॉंटिनच्या गैरवापरासाठी भरला होता. तरीही २०१९ पर्यंत त्या गोळ्या विकल्या जात होत्याच.

********

“एंपायर आॉफ पेन” वाचताना सहजच सिडनी शेल्डनची “ब्लडलाईन” आठवली. “ब्लडलाईन” ही कादंबरी सॅम्युएल रॉफी या ज्यू घेट्टोतल्या एका जर्मन-ज्यू पासून सुरु होते. (सॅकलर्स ज्यू आहेत..!) सॅमला ज्या मुलीशी लग्न करायचं असतं तिचा हात मिळवण्यासाठी (मैंने प्यार किया स्टाईल) तो एक व्हॅक्सिन तयार करतो. रॉफी कुटुंब निरनिराळ्या देशांमध्ये आपला जम बसवतं. मात्र सॅम रॉफी हा वारसदार अचानक मरण पावतो आणि इस्टेटीसाठी हपापलेले रॉफी काय काय क्लृप्त्या करतात ते ब्लडलाईनमध्ये आहे.

रॉफी अॅंड सन्सचा सगळा डोलारा एका फार्मा कंपनीच्या जिवावर उभा असतो. स्वित्झर्लंडमध्ये स्कीईंग करताना मरण पावलेल्या सॅमचा एका विशिष्ट आौषधावर सगळा भरवसा असतो. अॅना, सिमोनेट्टा, हेलेन या तीन बहिणी आणि अलेक निकोलस या चौथ्या बहिणीचा मुलगा हे त्याचे वारसदार असतात. पण सॅम रॉफीची स्वत:ची मुलगी एलिझाबेथ या सगळ्यातून कसा मार्ग काढते ते ब्लडलाईनमध्ये आहे. फार्मा कंपन्यांमधल्या कामाची खूप तपशीलवार माहिती या पुस्तकात आहे..!

********

फार्मा कंपन्यांचा असा इतिहास यावर एकर्स आॉफ माईल, बॅड फार्मा, ड्रीमलॅंड, Pain Killer: An Empire of Deceit and the Origin of America’s Opioid Epidemic अशी काही पुस्तकं आहेत. अनेक वर्षं हे सगळं चालू आहे.

विरोधाभास म्हणजे सॅकलर कुटुंबियांनी अनेक शैक्षणिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक संस्था उभ्या केल्या आहेत…!

दुसरीकडे १९९६ साली एका इमेलमध्ये रिचर्ड सॅकलर या पर्ड्युचा अध्यक्षानं

opioid crisis मध्ये आपली काहीच भूमिका नसल्याचं सहजपणे विधान केलं होतं. तर कॅथी सॅकलरनं आॉक्सिकॉंटिनचं गुणगान गायलं होतं. त्याला चांगलं आणि सुरक्षित आौषध म्हणलं होतं.

“अनाडी” चित्रपटात नवीन साथ ही देवाची कृपा मानणारे भांडवलदार आहेत ते चित्र आजही तसंच आहे. मॉडर्ना, फायझरपासून ते छोट्या मोठ्या हॉस्पिटल्सपर्यंत अनेकांचा कोरोनाकाळातला नफा लक्षणीय आहे. या काळात वैद्यकीय विश्वातल्या हजारो लोकांनी जिवावर उदार होऊन सगळ्यांना मदत केली हे जितकं खरं तितकं काही प्रमाणात तरी चित्रं काळं आहे हे मान्य करायला हवं..!

संदर्भ :

१. एंपायर आॉफ पेन – द सिक्रेट हिस्ट्री आॉफ सॅकलर डिनास्टी – पॅट्रिक कीफी

(नीलांबरी जोशी ‘कार्पोरेट कल्लोळ’ , ‘झपूर्झा’, ‘जिथे मुलांना पंख फुटतात’ आदी गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका आहेत)

[email protected]

…………………………

नीलांबरी जोशी यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –नीलांबरी जोशी– type करा आणि Search वर क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here