माशा लिहिते, ‘कंदाहारमधल्या महिलेच्या गोष्टीत किंवा लोगरमधल्या एखाद्या तरुणीने लिहिलेल्या कवितेत आपल्याला इतका रस का असावा? कारण या कथा, मनोगतं, कविता यांच्या माध्यमातून अनेक स्त्रिया स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहेत. स्वतःच्या मनातल्या भावना व्यक्त करण्याचं धाडस गोळा करत आहेत. स्व-ओळखीबरोबर आत्मविश्वास कमावत आहेत. आज त्या स्वतःमध्ये बदल करण्यासाठी धडपडत आहेत, उद्या त्या त्यांचा समाज बदलावा म्हणून प्रयत्न करतील आणि त्यानंतर देश सुधारणेचे प्रयत्नही करतील. या महिलांनी पहिल्यांदा लिहायला सुरुवात केली तेव्हा त्या धास्तावल्या; घाबरल्या; काय लिहायचं, कसं लिहायचं; कुणी काही म्हटलं तर? कुणाला हे आवडलं नाही तर? पण आज त्या घाबरत नाहीत. मुक्तपणे लिहितात. हा बदल महत्त्वाचा नाही का?’
सलमा मझारी अफगाणिस्तानची पहिली महिला राज्यपाल. पुरुषप्रधान व्यवस्थेत काम करणारी आणि स्वतःचा ठसा उमटवलेली हुशार बाई. सरकारमधले सगळे पुरुष कातडी वाचवण्यामागे लागलेले असताना आणि सैन्यानं लढाईच करण्याचं नाकारलेलं असताना, तालिबानी राजवटीखाली अफगाणिस्तान जात होतं तेव्हा सलमा पळून गेली नाही. हिमतीनं उभी होती विरोध करत… तिला तालीबान्यांनी पकडल्याची बातमी आहे. हा लेख प्रसिद्ध होईल तोवर कदाचित तिला मारून टाकलं जाईल. तालिबानच्याविरुद्ध उभं राहिल्याबद्दल… सहरा करिमी या अफगाण फिल्ममेकरनं जगाला उद्देशून लिहिलेलं पत्र तिच्या ट्विटरवरून प्रसिद्ध केलं होतं. तालिबाननं काबूल काबीज करण्याआधी दोन दिवस हे पत्र तिनं प्रसिद्ध केलं होतं. तिनं तिची भीती, असुरक्षिततेची भावना यात व्यक्त केली आहे. स्वतःचा जीव वाचवायला तीही अफगाणिस्तानातून बाहेर पडली आहे.
तालिबान्यांना झरिफा गफारीचा आणि तिच्यासारख्या स्त्रियांचा आवाज ऐकू येईल का, पत्रकार परिषदेत स्त्रियांचे हक्क राखले जातील अशी ग्वाही देणारे तालिबानी नेते खरंच अफगाण स्त्रियांना सुखानं जगू देतील का हे प्रश्नच आहेत… कारण सामान्य अफगाण स्त्रीपुरुषांना याची खातरी नाहीये म्हणूनच आपलं अफगाणिस्तानमध्ये काहीही झालं तरी चालेल पण आपल्या मुलांचं भवितव्य सुरक्षित असलं पाहिजे या विचारातून अमेरिकी सैनिकांच्या ताब्यात मुलांना सोपवणारे अफगाण स्त्रीपुरुष हेच आत्ताच्या अफगाणिस्तानचं जळजळीत वास्तव आहे.