–नीलांबरी जोशी
“तुला स्वतंत्र व्हावं असं वाटत नाही का लेनिना?” त्यानं विचारलं.
तुला काय म्हणायचं आहे तेच मला कळत नाही. मी स्वतंत्रच आहे. मला हवा तसा वेळ घालवण्यासाठी मी स्वतंत्र आहे. इथे सगळेच आनंदात आहेत”. लेनिनानं उत्तर दिलं.
यावर तो हसून म्हणाला. “हो. आजकाल सगळेच आनंदात आहेत. आपण मुलांमध्ये त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षीच त्यांनी आनंदी रहावं असं कंडिशनिंग करतो. पण तुला असं दुसऱ्या कोणीतरी कंडिशनिंग केलेलं आयुष्य नाकारुन स्वतंत्र विचार करायला आवडणार नाही का?”
“तू काय म्हणतो आहेस तेच मला कळत नाही.”
आल्डस हक्सलेच्या “ब्रेव्ह न्यू वर्ल्ड” या १९३२ सालच्या कादंबरीतला हा संवाद. यातल्या लेनिनाला स्वतंत्र विचार करणं म्हणजे काय हेच कळत नसतं. या कादंबरीतल्या माणसांचा मेंदू लहानपणीच कंडिशन करुन त्यांना कला, धर्म, संगीत, इतिहास, राजकारण, मानसशास्त्र अशा विषयांचा विचारच करता येणार नाही अशी व्यवस्था केलेली असते. टेस्ट ट्यूब बेबीज निर्माण करुन त्यांचे अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा आणि एप्सिलॉन असे विभाग केलेले असतात. डेल्टा जातीच्या मुलांना फुलं आणि पुस्तकं यांची नावड निर्माण करण्याचं कंडिशनिंग केलं जातं. त्यांच्यातल्या इच्छा, आकांक्षा अशा भावना नष्ट करण्यात आपण यशस्वी झालो असा त्यांना अभिमान असतो..!
******
काल अतुल पेठे / केतकी थत्ते यांनी अप्रतिमरीत्या सादर केलेलं “शब्दांची रोजनिशी” हे नाटक पहाताना हक्सलेच्या या कादंबरीची सारखी आठवण येत होती. “जगात लुप्त होत चाललेल्या भाषा आणि त्यामुळे माणसाच्या अस्तित्वावर होणारे परिणाम” हा या नाटकाचा विषय आहे. कोणतीही भाषा हा आयुष्याकडे पहाण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. भाषा त्या त्या समाजाची संस्कृती मांडते. कोणतीही भाषा शिकताना आपण केवळ त्यातले शब्द शिकत नाही, तर विचार करण्याची एक वेगळी पध्दत शिकतो.
“शब्दांची रोजनिशी”मध्ये असंच वेगवेगळ्या वेळी, प्रसंगी प्यायच्या चहाला तीनशेपेक्षा जास्त शब्द असलेल्या एका समृध्द भाषेचा उल्लेख आहे. तसंच नाटकातल्याच एका संदर्भानुसार १९६२ साली भारतात १६५२ मातृभाषा नोंदवल्या होत्या. त्यानंतर १० वर्षांनी फक्त १०८ मातृभाषा होत्या. उरलेल्या सगळ्या १०९व्या एका मातृभाषेत कोंबल्या..!
हक्सलेच्या कादंबरीतल्या मुलांच्या भावनांच्या कंडिशनिंगप्रमाणेच आपण भाषा नष्ट करुन माणसाच्या व्यक्त होण्यावर मर्यादा आणतोय. त्याला काही मर्यादित गटात कोंबण्याचं कंडिशनिंगच करतोय. माणसांना एका विशिष्ट समूहात बसवून त्यांच्या विचारांना, भावनांना, बुध्दीला, कलांना मर्यादा आणतोय असं “शब्दांची रोजनिशी” पहाताना जाणवत गेलं.
**********
याचं पुढचं येऊ घातलेलं भयावह पाऊल तंत्रज्ञानात दडलेलं आहे. ते म्हणजे अल्गॉरिदम्स.
अल्गॉरिदम्स काय करतात याचं एक उदाहरण पाहू..!
समजा, वैदेहीनं आपण पुढचे तीन आठवडे डाएटवर जाणार असं फेसबुकवर जाहीर केलं. लगेच तिला “तुला तू लठ्ठ आहेस असं वाटतं का?” वगैरे प्रश्न आणि डाएट फूडच्या जाहिराती फेसबुकवर दिसायला लागतात. त्या साईटशी संलग्न असलेले जाहिरातदार ते सगळं दाखवत असतात.
पण याहून पुढचं पाऊल म्हणजे वैदेहीनं वारंवार डाएटिंग करावं (आणि उत्पादनं खपावी) अशी अल्गॉरिदम्सची इच्छा असते. त्यासाठी ते वैदेहीचा डाएटचा, खाण्याचा इतिहास तपासतात. ती डाएटिंग कधी करते त्याचा पॅटर्न त्यांना ओळखायचा असतो. तो पॅटर्न त्यांच्या लक्षात यायचा त्यांचं निदान जर ८० टक्के बरोबर येत असेल तर ते प्रमाण ९० टक्के कसं होईल ? याची त्या अल्गॉरिदम्सना चिंता असते.
या हेतूनं ते वैदेहीला “तू लठ्ठ झाली आहेस असं तुला वाटतं का” असे मेसेजेस मधूनच सहज पाठवत रहातात. ते मेसेजेस वाचून जर वैदेही दरवेळी नक्की पुढच्या दिवसापासून डाएट करायला लागली तर त्यांना तिच्या डाएट करण्याबाबतच्या भविष्यातल्या हालचालींचा अचूक अंदाज येतो. यातून त्यांचा वैदेहीच्या एकूण वागण्याबद्दलचा अंदाज वाढतो. मग ते वैदेही जसं वागते त्या यादीतल्या इतरांवरही वैदेहीसारखेच (मेसेजेस पाठवणं वगैरे) प्रयोग करायला सुरुवात करतात.
अशा वेळी वैदेहीच्या यादीत टाकलेले लोक कसे वागतील यासाठी पॅरेटोचा नियम लावता येतो. पॅरेटो या इटालियन अर्थतज्ञानं इटलीमधली ८० टक्के जमीन ही २० टक्के व्यक्तींच्या मालकीची आहे असा निष्कर्ष मांडला होता. त्यानंतर पॅरेटोचा हा ८०/२० नियम म्हणून ओळखला जायला लागला. अनेक बाबतीत त्यानंतर तो नियम लावला जातो.
उदाहरणार्थ, इंटरनेटवर ८० टक्के लोक व्हिडिओज पहातात. पण २० टक्केच लोक व्हिडिओवर कॉमेंट करतात. ८० टक्के मुलं इंटरनेटवरचे गेम एकाच प्रकारे खेळतात. फक्त २० टक्के मुलं हा गेम “कसा डिझाईन करायला हवा होता” याबद्दल विचार करतात वगैरे.
तसंच वजन कमी करण्यासाठी ८० टक्के लोक डाएट करायची योजना आखतात. उरलेले २० टक्के वजन कमी करण्यासाठी डाएटबरोबरच योगा / जिम / सायकलिंग अशा इतर वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. हे लोक काय करतील? कोणत्या वेगळ्या, नावीन्यपूर्ण गोष्टी ते वजन कमी करण्यासाठी करतील? याचा विचार अल्गॉरिदम्सना करायचा असतो. २० टक्के लोकांचं हे
वेगळ्या मार्गानं जाणारं वागणं बदलणं आणि त्यांना ८० टक्केवाल्यांच्या कळपात आणणं हा अल्गॉरिदम्सचा हेतू असतो. माणसाचं अनपेक्षित, नावीन्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण वागणं त्यांना काबूत आणायचं असतं. अल्गॉरिदम्सदेखील माणसाला स्वतंत्र विचार करायची संधी नाकारुन वेगळ्या प्रकारे कंडिशनिंग करत चालले आहेत.
**********
“शब्दांची रोजनिशी”मध्ये आपापल्या भाषेत अफाट साहित्य निर्माण केलेली माणसं कशी लुप्त झाली त्याची उदाहरणं आहेत. साहजिकच तेवढे विचार, शब्द, एकमेकांशी वागण्याच्या पध्दती, असंख्य भावभावना, भोवतालच्या माणसांशी / निसर्गाशी संवाद साधण्याचे प्रकार अशा अनेक गोष्टी गडप झाल्या. वेगळ्या, नावीन्यपूर्ण मार्गानं जाण्याच्या तितक्या संधी संपल्या. “भाषेला मर्यादा असणं म्हणजे माझं जगच मर्यादित करुन घेणं” असं विटगेनस्टाईन हा तत्ववेत्ता म्हणतो. जगाचा अनाकलनीय पसारा समजून घेण्यालाच भाषा संपत गेल्यानं मर्यादा येणार हे उघड आहे..!
ठरावीक, संकुचित आक्रसलेल्या शब्दांमुळे भोवतालचा समाज आणि जगही तसंच होत चाललेलं आहे. “वजीर” चित्रपटात अभिताभ म्हणतो “आमच्याकाळी असलेलं तरल, गहिरं प्रेम आता कसं दिसेल? आता तर love चं spelling सुध्दा आक्रसून luv असं झालेलं आहे.”
“शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते, ते वाहतात ओझे, जे तुमचे माझे असते..!” आपलं सुखदु:ख मांडणारे, माणूस म्हणून आपलं वेगळेपण स्पष्ट करणारे हे शब्दच जर नष्ट होत गेले तर काय होईल? याचा भयावह विचार करायला
“शब्दांची रोजनिशी” भाग पाडते.. याबद्दल या नाटकाच्या निर्मितीमागच्या सगळ्यांचेच आभार..!
(नीलांबरी जोशी ‘कार्पोरेट कल्लोळ’ , ‘झपूर्झा’, ‘जिथे मुलांना पंख फुटतात’ आदी गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका आहेत)
[email protected]
…………………………