सोमवारी जन्माष्टमीनिमित्त घरी कृष्णदेवाचे सपत्निक आगमन झाले. इकडे पूर्व विदर्भात आणि विशेषतः भंडारा, गोंदिया, गडचिरोली याआमच्या शेतीप्रधान भागात गणपतीपेक्षा कृष्ण लोकांना जास्त जवळचा वाटतो. इकडे घरोघरी कृष्णमूर्तीची स्थापना केली जाते. यात बहुजन समाजाचा सहभाग अधिक प्रमाणात आहे. (कृष्णाचे बालपण सर्वसामान्य लोकांमध्ये गेले. त्यामुळे बहुजन समाजात तो जास्त लोकप्रिय असावा. ) कृष्णाला आवडणाऱ्या धानाच्या लाह्या आणि दूध, दही वगैरे पदार्थ इकडे भरपूर उपलब्ध आहेत. त्यामुळे मूर्तीचे विसर्जन स्थापनेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी (घरी जशी परंपरा असेल त्यानुसार) केले जाते. त्यानुसार त्याला ‘दीड किंवा अडीच दिवसांचा कान्होबा’ असे म्हटले जाते. (होय. विठ्ठलाला प्रेमभावाने जसे ‘विठोबा’ म्हणतात, तसे इकडे कृष्णाला ‘कान्होबा’ म्हणतात.) सोबत राही (राधा) आणि रुख्माई असतात. (काहींच्या मते त्यापैकी एक राधा नव्हे,तर सत्यभामा आहे.)
कृष्णाच्या आगमनाची तयारी साधारणतः आठवडाभराआधी सुरू होते. यात घरातले आबालवृद्ध उत्साहाने आणि आनंदाने सहभागी होतात. मूर्तीच्या दोन्ही बाजूला ठेवण्यासाठी छोट्या टोपल्यांमध्ये गहू पेरले जातात. त्यांना ‘गौर’ असे म्हणतात. कृष्णासाठी छायाचित्रात दिसतो आहे तसा खाऊ तयार केला जातो. त्याला इकडे ‘फुलोरा’ असे म्हणतात. यात करंज्या, अनारसे, डाळीचे वडे, पुऱ्या, कणिक किंवा मैद्यापासून तयार केलेल्या वेण्या- फण्या, शेव इ. पदार्थांचा समावेश असतो. यासाठी अनारशाचे तांदूळ २-३ दिवस भिजत घालणे, तांदूळ कुटून साखर किंवा गूळ मिसळून त्याची उंडी तयार करणे, करंजीचे सारण करण्यासाठी गव्हाची पिठी दळून आणणे,आदी कामे उरकली जातात. जन्माष्टमीच्या आदल्या दिवशी घरातील गृहिणी हे पदार्थ तयार करते. या कामी शेजारणी देखील उत्साहाने सहकार्य करतात. यावेळी घरातील लहान मुले देखील जमेल तशी मदत करतात. मूर्तिस्थापनेनंतर हे सर्व पदार्थ मूर्तीच्या डोक्यावर लटकवले जातात. त्यासाठी आकडे (हुक्स) असलेली एक विशिष्ट थाळी बाजारात मिळते. पण थोड्या वेळाने नरम पडून एकेक पदार्थ खाली गळू लागतो; म्हणून काही जण ते देवाजवळ एका थाळीत ठेवतात.
ज्यांच्याकडे परंपरेने फुलोरा तयार करण्याची पद्धत आहे किंवा ज्यांनी देवाला तसे कबूल केले आहे किंवा नवस बोलला आहे, केवळ तेच लोक फुलोरा तयार करतात. अन्यथा त्याशिवायही कृष्णमूर्तीची स्थापना केली जाते. मूर्तीची स्थापना करण्यासाठी योग्य जागा आधीच निश्चित केली जाते. त्यानुसार तिची स्वच्छता आणि सजावट केली जाते. विजेच्या माळा लावल्या जातात. साधारणतः आदल्या दिवशी बाजारातून किंवा आपल्या ठराविक कुंभाराच्या घरून मूर्तीची खरेदी केली जाते. त्यासाठी काही लोक आगावू नोंदणी देखील करतात. मूर्ती घरी आणताना तिला नव्या वस्त्राने झाकले जाते. हे आवरण स्थापनेच्या वेळीच काढले जाते. घरी आणल्यावर मूर्तीची आणि मूर्ती आणणाऱ्याचीही घराच्या प्रवेशद्वारावरच आरती ओवाळली जाते. यासाठी निरांजन,अक्षता, हळद-कुंकू इ.ने तबक सज्ज ठेवले जाते. घरातली ज्येष्ठ सुवासिनी मूर्ती आणणाऱ्याच्या पायावर तांब्यातले पाणी ओतून त्याचे पाय धुते. मूर्तीसोबतमूर्ती आणणाऱ्याचेही हळद- कुंकू, अक्षता लावून मूर्तीचे स्वागत केले जाते . तबक हाती धरून दोघांनाही ओवाळले जाते . नंतर मूर्ती घरात आणली जाऊन एका सुरक्षित ठिकाणी स्थानापन्न केली जाते.
जन्माष्टमीच्या दिवशी दाराला आणि ज्या लाकडी चौरंगावर मूर्तीची स्थापना होते त्याला आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते. चौरंगाला केळीचे खांब बांधले जातात. चौरंगाखालील टेबलावर नवी चादर टाकली जाते. चौरंगावर रांगोळी काढून त्यावर लाल किंवा अन्य रंगाचे वस्त्र अंथरले जाते. त्यावर सव्वा मूठ तांदूळ किंवा गहू ठेवले जातात. मूर्तीवर वाहण्यासाठी दुर्वा, तुळशीची पाने वगैरे तोडली जातात. कृष्ण, त्याच्या दोन पत्नी, शेषनाग आणि गाय या सगळ्यांसाठी फुलांचे हार तयार केले जातात. हे काम सगळ्यांच्याच विशेष आवडीचे. मात्र हार तयार करण्याचे विशेष कौशल्य असलेल्या किंवा घरातील वृद्ध व्यक्तीकडे हे काम सोपवले जाते. हारांसाठी सकाळी फुले तोडायला जाणे, हे घरातल्या लहानग्यांचे आवडते काम. लहानपणी आम्ही कुणाच्या परसात फुले आहेत, हे अगोदर दिवशीच हेरून ठेवत असू. मग दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे ‘स्वखुशीने’ उठायचे, त्यासाठी पहाटेच्या साखरझोपेवर पाणी सोडायचे, डास चावत असताना-पाऊस येत असतांना-ओल्या गवतातून चालण्याची प्रचंड भीती वाटत असतांना- पुरेसे उजाडले नसतानाही अंदाजे फुले तोडायची- या सगळ्यांत जी मजा यायची, ती शब्दांत सांगणे कठीण आहे. प्रसंगी लोकांचा ओरडाही खाल्ला आहे. हल्ली अनेक घरी बाजारातून तयार हार आणले जातात. आम्ही मात्र बाजारातले तयार हार वापरत नाही. फुले तोडून आणून घरीच हार तयार करतो. फरक एवढाच की आता ही फुले आमच्या किंवा आमच्या परिचितांच्या घरची असतात. मात्र लहानपणीची ती मजा आता राहिली नाही!
मूर्तिस्थापना साधारणतः संध्याकाळी करतात. या वेळी घरातील सर्व सदस्य नवी वस्त्रे घालतात. घरातील ज्येष्ठ किंवा कर्ती व्यक्ती मूर्ती उचलून आणून ती चौरंगावर ठेवलेल्या धान्यावर स्थानापन्न करतो. यावेळी मूर्तीवरील आवरण दूर केले जाते. कृष्णाच्या हाती बासरी ठेवतात, त्याला विविध आभूषणे, जानवे चढवले जाते. मूर्तीच्या डोक्यावर नवे वस्त्र ठेवले जाते. मूर्तीसमोर सव्वा मूठ गहू किंवा तांदूळ ठेवतात. त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवून त्यात विड्याची पाने आणि त्यावर श्रीफळ ठेवले जाते. कलशाला सुताचे पाच वेढे घालतात, हळद- कुंकू- चंदन वाहतात. श्रीफळाला हळद-कुंकवाची बोटे लावतात. बाजूला सव्वा मूठ गहू किंवा तांदूळ ठेवून त्यावर अखंड जळणारा दिवा किंवा नंदादीप ठेवला जातो. त्याच्या बाजूला विड्याच्या पानांवर सुपारीचा गणपती ठेवतात. मूर्तीची विधिवत पूजा करून तिच्यात प्राणप्रतिष्ठा केली जाते. फुलांचे हार वाहून आरती केली जाते. देवाला बकान, कदंब यांचा पाला, आघाडा, केणा या वनस्पती आणि केवड्याचे पान इ. तसेच केळ किंवा अन्य एखादे फळ, मक्याचे कणीस, काकडी वगैरे अर्पण केले जाते; शिवाय पुरणा- वरणाचा साग्रसंगीत स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला जातो.
स्थापनेच्या दिवशी रात्री जागरण करून मध्यरात्री कृष्णजन्म साजरा केला जातो. यावेळी मूर्तीवर धानाच्या लाह्या- फुटाणे उधळले जातात. आरती करून लाह्या- फुटाण्यांचा प्रसाद वाटला जातो. रात्री देवाजवळ उजेड राहील आणि झोपतांना चुकूनही देवाकडे पाय होणार नाहीत, याची काळजी घेतली जाते. काही लोक या दिवशी जमिनीवर अंथरुण हातरून त्यावरच झोपण्याचा नियम पाळतात. काही घरी भजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मूर्तीची पूजा,आरती केली जाते. नवीन हार अर्पण केले जातात. रव्याचा शिरा (त्याला इकडे ‘कढई’ असे म्हणतात.) देवासमोर ठेऊन मग सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटला जातो. शिवाय घरी केलेल्या स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी काही घरी परिचित आणि नातेवाईकांसाठी भोजनाचा कार्यक्रमही ठेवला जातो. संध्याकाळी पुन्हा एकदा देवाची आरती केली जाते. घरातील बाल-गोपालांना राधा- कृष्णाचा वेश देऊन चिमुकल्या कृष्णाच्या हातून चिमुकली दहीहंडी फोडली जाते. यावेळी धानाच्या लाह्या, फळांचे काप, चणा डाळ, दही, साखर इ. एकत्र करून कृष्णाचा प्रिय पदार्थ गोपालकाला तयार केला जातो. त्याची पूजा करून तो प्रसाद म्हणून वाटला जातो.
रात्रीची जेवणे झाली की मूर्तिविसर्जनाची तयारी केली जाते. देवाजवळचे कणीस भाजून तसेच केळ किंवा अन्य फळे, काकडी वगैरे चिरून त्याचा प्रसाद तयार केला जातो. अंगणात रांगोळी काढून त्यावर पाट ठेवला जातो. मूर्ती विसर्जनासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी भरून ठेवले जाते. (घरी विहीर असेल तर तिचे ताजे पाणी काढले जाते. मूर्ती मूळ स्थानापासून किंचित हलवून मग बाहेर आणली जाते. देवाची आरती केली जाते. नारळ फोडून त्याचा आणि काकडी कणसाचा प्रसाद वाटला जातो. नंतर मूर्तीवरील हार आणि अन्य निर्माल्य, आभूषणे इ. बाजूला केली जातात. देवाच्या नावाचा जयघोष करून, त्याची क्षमा मागून आणि पुढल्या वर्षी परत येण्याचे आमंत्रण देऊन मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते. दुसऱ्या दिवशी ही माती झाडांच्या बुडाशी किंवा कुणाचा पाय पडणार नाही, अशा ठिकाणी टाकली जाते. काही जण सार्वजनिक जलाशयात मूर्तिविसर्जन करतात. गावाकडे तर स्थापना करताना आणि विसर्जनाच्या वेळीही सर्व मूर्त्या एकाच वेळी वाद्यांच्या गजरात भजने गात वाजत-गाजत नेल्या-आणल्या जातात. यानंतर ‘गौर’ (टोपलीत पेरलेला आणि वाढलेला गहू) उपटून तो घरातील सगळे सदस्य एकमेकांच्या कानाला किंवा केसांमध्ये खोचतात आणि लहान मंडळी मोठ्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतात. दुसऱ्या दिवशी फुलोऱ्याचे पदार्थ प्रसाद म्हणून नातेवाईकांकडे पोचवले जातात किंवा घरीच खाल्ले जातात आणि आठवडाभराच्या हव्याहव्याशा श्रमांचा परिहार केला जातो. केवळ दीड किंवा अडीच दिवसांसाठी घरी आलेला हा लडिवाळ ‘कान्होबा’ खूपच घाईने सगळ्यांचा निरोप घेतो; पण दर वर्षी त्याची आतुरतेने वाट बघावी, इतका लळा लावून जातो!
भगवान कृष्णासंदर्भात आकाशवाणीच्या वृत्तनिवेदिका वीणा डोंगरवार यांचा “कान्होबा “हा नितांत सुंदर लेख वाचला,आपला महाराष्ट्र अशा विविध संस्कृतीने नटलेला आहे,विदर्भातील या कान्होबाची माहिती प्रथमच वाचावयास मिळाली,त्याबद्दल आणि चांगली माहिती दिल्याबद्दल श्रीमती डोंगरवार यांचे हार्दिक अभिनंदन आणि धन्यवादही !
……..
कैलास ढोले,
ज्येष्ठ पत्रकार,
अहमदनगर.
भगवान कृष्णासंदर्भात आकाशवाणीच्या वृत्तनिवेदिका वीणा डोंगरवार यांचा “कान्होबा “हा नितांत सुंदर लेख वाचला,आपला महाराष्ट्र अशा विविध संस्कृतीने नटलेला आहे,विदर्भातील या कान्होबाची माहिती प्रथमच वाचावयास मिळाली,त्याबद्दल आणि चांगली माहिती दिल्याबद्दल श्रीमती डोंगरवार यांचे हार्दिक अभिनंदन आणि धन्यवादही !
……..
कैलास ढोले,
ज्येष्ठ पत्रकार,
अहमदनगर.
वीणा डोंगरवार, नागपूर यांचा ” कान्होबा ” वाचला. खुप छान वर्णन… बालपण आठवले.