डॉ. आरजू तांबोळी आणि विशाल विमल: एकमेकांना कशी स्पेस देतो, यावर सहजीवन फुलतं…

(साभार:’कर्तव्य साधना’ –आंतरधर्मीय विवाह केलेल्यांच्या मुलाखती : भाग १२)

(मुलाखत व शब्दांकन – हिनाकौसर खान-पिंजार)

डॉ. आरजू तांबोळी आणि विशाल विमल…  डॉक्टर असलेली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असणाऱ्या आरजूची पत्रकारितेसाठी धडपडणाऱ्या विशालशी ओळख झाली ती एका कॉमन मित्रामुळे. हा एक योगायोग पण वैचारिक कार्यक्रमांना त्यांच्या सतत भेटी होणं, राहण्याची ठिकाणं जवळच असणं आणि दोघांचाही गप्पिष्ट स्वभाव असेही योगायोग जमून आले आणि त्यांची मैत्री वृद्धिंगत होत गेली. दोघांचा स्वभाव, दोघांच्या विचार करण्याच्या पद्धती, जगण्याच्या भूमिका एकमेकांवर प्रभाव तर टाकत होत्याच शिवाय पूरकही होत्या. मग त्यांच्या संवादाची आणि चर्चांची गाडी प्रेमाच्या मार्गावर न जाती तरच नवल… एकत्र राहू शकतो याची खातरी पटल्यावर मे २०१६ मध्ये त्याचं पुण्यात जाहीररीत्या विशेष विवाह कायद्यानुसार लग्न झालं. नोंदणीविवाहातला रुक्षपणा टाळत त्यांनी कुटुंबीय, नातेवाईक आणि सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या मदतीनं त्याचं सांस्कृतिक सोहळ्यात रूपांतरणही केलं.

आरजू ही सांगलीतल्या आटपाडी गावची. आरजूला एक मोठी, एक लहान बहीण आणि एक भाऊ होता. ती चार भावंडं आणि आईवडील असं सहा जणांचं तिचं कुटुंब. वडलांची छोटी शेती. आई तहसील कार्यालयात उपलेखापाल होती. बारावीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर आरजू बीएएमएस होण्यासाठी सांगलीत आली. शैक्षणिक कर्ज काढून तिनं अण्णाभाऊ डांगे आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुढे 2010मध्ये स्पर्धा परीक्षा देण्यासाठी ती पुण्यात आली. डॉक्टर झाली, तर आता प्रॅक्टिस कर म्हणून स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवातीला घरच्याचा विरोध राहिला. मात्र ती पहिल्याच प्रयत्नात विक्रीकर निरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण झाली. नोव्हेंबर 2013मध्ये ती मुंबई इथं विक्रीकर निरीक्षक म्हणून रुजू झाली. सध्या ती पुण्यात राज्य कर निरीक्षक म्हणून कार्यरत आहे.

विशाल पुणे जिल्ह्यातल्या मंचरजवळील पिंपळगावचा. तीन भाऊ आणि एक बहीण, आईवडील असा त्याचा परिवार. घरच्या हलाखीच्या परिस्थितीची त्याला लहानपणीच जाणीव झाली ती सातवी-आठवीत अंगावर पडलेल्या जबाबदारीमुळे… मात्र त्याच काळात वाचन आणि चळवळी यांचाही त्याच्यावर प्रभाव पडला. पुढे मंचर इथं महाविद्यालयीन शिक्षण, जॉब, कॉलेजमधील उपक्रम, महाराष्ट्र अंनिसच्या विवेक वाहिनीचं काम, गावातील-तालुक्यातील विविध उपक्रम, वक्तृत्व स्पर्धा यातून विशाल घडत होता. उभा राहत होता. बीएचं शिक्षण पूर्ण करून तो नोकरी आणि पत्रकारिता करण्यासाठी पुण्यात आला. लोकमत, पुढारी या दैनिकांत आणि सुगावा मासिकात त्यानं काम केलं. पत्रकार मित्रासोबत एक शैक्षणिक मासिक अंकही तो प्रकाशित करत होता. तसंच पुण्यातल्या चळवळीतही तो सक्रिय राहिला. सध्या तो मुक्त पत्रकारिता आणि विवेक जागर प्रकाशनमध्ये काम करत आहे. तसेच, अंधश्रद्धा निर्मुलन समिती, परिवर्तन मिश्र विवाह संस्थेत तो सक्रीय सहभागी आहे.

दोघांना अर्शल नावाचा मुलगा आहे. त्यांच्या पाच वर्षांच्या ‘तरुण’ सहजीवनाविषयी त्यांच्याशी साधलेला हा संवाद…

प्रश्न – तुमची जडणघडण कशी झाली? बालपण कसं गेलं याविषयी सांगा…

विशाल – मी गरीब शेतकरी कुटंबातून आलोय. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातलं मंचरजवळचं पिंपळगाव हे माझं मूळ गाव. मी मुळात गरिबीतून आल्यामुळे संघर्षमय जीवन जगताना खऱ्याखोट्या गोष्टी आपोआपच समजायला  लागल्या. त्याला वाचनाची जोड मिळाली. त्या वाचनातून समता, न्याय, स्वातंत्र्य, पुरोगामित्व हे विचार कळत गेले. सहावीत असतानाच कर्मवीर भाऊराव पाटील यांचं साहित्य, संतसाहित्य वाचलं होतं. त्याच काळात फुले-शाहू-आंबेडकर यांचंही लेखन वाचलं होतं. शालेय जीवनातच पुरोगामी चळवळीशी, विचारांशी जोडला गेलो. उपक्रमांच्या पातळीवर, स्थानिक स्तरावर जोडला गेलो. माझ्यावर संतसाहित्याचा खूप प्रभाव होता. अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार संत तुकारामांच्या गाथेतून मला आधी माहीत झाला होता आणि नंतर अंनिसच्या संपर्कात आलो.

सातवी-आठवीत असताना मी ‘ऐसे कैसे झाले भोंदू’ हे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचं पुस्तक वाचलं. तोपर्यंत आपल्यावरची संकटं कमी व्हावीत म्हणून बाबाबुवा या गोष्टी कुटुंबातून अनुभवल्या होत्या. गळ्यात तुळशीची माळ घालणं, हरिपाठ म्हणणं अशा गोष्टी मीही केले होते. पण त्यातून सारे प्रश्न सुटणार नाहीत हे लक्षात आलं होतं. पुस्तकात डॉक्टरांनी कार्यकारणभाव अर्थात वैज्ञानिक दृष्टीकोन हे सूत्र मांडलं होतं आणि ते मला खूप भावलं होतं. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, कुठलाही  प्रश्न निर्माण होण्यामागे कारण असतं त्याअर्थी तो प्रश्न सुटण्याचा मार्गही असतो. माझ्या आजवरच्या आयुष्यातल्या जगण्याचा पायाच हे सूत्र आहे. त्यानंतर मी प्रचंड वाचत गेलो आणि पुढे मंचरमधल्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर मी पुरोगामी चळवळीच्या कार्यक्रमात सक्रिय झालो. त्यातून तालुक्यांमध्ये अनेक उपक्रम राबवायचो. राज्यभर वक्तृत्व स्पर्धेसाठी फिरायचो, विवेकवाहिनीची शिबिरं घ्यायचो. त्या काळात अंनिसशी जोडला गेलो तो कायमचा.

आंतरजातीय विवाह, आंतरधर्मीय विवाह यांचा पुरस्कार अंनिसने जास्त केला आहे. मुळातच जात ही एक अंधश्रद्धा आहे असं अंनिस मानते आणि या सगळ्याचा प्रभाव माझ्यावर होता. माझ्यावर दोनतीन जणांचा खूप प्रभाव आहे. त्यांतले एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी सांगितलं की, ‘माणसामाणसांमध्ये जातीच्या आधारे भेद केला जातो किंवा एकमेकांचा द्वेष केला जातो. तो जर कमी करायचा असेल तर त्याला पर्याय आंतरजातीय लग्न आहे. जोपर्यंत तुम्ही रक्तबंधनानं जोडले जात नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये प्रेमभाव निर्माण होऊ शकत नाही. इतर धर्मांच्या, जातींच्या लोकांच्या संपर्कात आल्यावर तुम्हाला माहीत होतं की, खरंच तो इतका वाईट आहे का?’

गोविंद पानसरे यांचं एक वाक्य ऐकलं होतं की, ‘जाति-अंत करायचा असेल तर तुम्ही तुमच्या जातींची चिकित्सा करायला सुरुवात करा. तुमच्या जातीतली उतरंड शोधा. तुमच्या जातीने केलेले शोषण शोधा.’ बघ ना… प्रत्येक जात स्वतःला श्रेष्ठ समजते आणि म्हणून मानवी गुणांपेक्षा जातीजातीवरून श्रेष्ठत्व ठरवलं जातं. मी माझ्या जातीचं विश्लेषण करायला लागलो. मी ज्या जातवर्गातून येतो त्यानं आजपर्यंत काय केलं, इतर जातिधर्मांशी त्यांचा व्यवहार कसा आहे. प्रत्येक जात शोषणच करत आलीये मग आपण जातीच्या आधारे श्रेष्ठत्व का ठरवायचं, धर्म नाकारून आपण मानवी मूल्यांच्या आधारेच एकमेकांना जोखलं पाहिजे. महात्मा फुले, महात्मा गांधी यांचीही मांडणी अशीच आहे. या सगळ्याचा माझ्यावरती प्रभाव होता आणि मी कॉलेजमध्ये असतानाच असं ठरवलं होतं की, आपण आंतरजातीय विवाह करायचा.

आरजू – कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात माझा जन्म झाला. टिपिकल मुस्लीम कुटुंब. आमच्या गरजा भागत होत्या, पण त्या काळात इतर मुलींपेक्षा माझ्याकडे वाचनाची आवड हा एक वेगळा गुण होता. माझ्या आईला, आजोबांना, मामांना वाचनाची आवड होती. ते लोक वाचनालयातून, ग्रंथालयातून पुस्तकं आणून वाचायचे. ते पाहतच मी मोठी झाले. इतर मुलींच्या तुलनेत माझे स्वतःचे वेगळे असे विचार लहान वयातल्या वाचनानं घडत गेले. बारावीनंतर मी सांगलीला मेडिकल कॉलेजमध्ये गेले. तिथे माझा परीघ वाढला. तिथेही वाचनाची आवड कायम राहिली. त्यातूनच माझे विचार अधिक सकस होत गेले. कुटुंबाशी झगडा करून, राग पत्करून मी स्पर्धा परीक्षेसाठी म्हणून पुण्यात आले. इथं तर माझ्यासाठी जग खुलं झालं. आपल्यासारख्या विचारांचे इतरही लोक आहेत याचा मला आनंद झाला. अभ्यासाचं आणि इतर वाचन चालूच राहिलं. माझ्यात उपजत वैचारिक बीजं होती. ती पुण्यासारख्या ठिकाणी फुलत गेली.

प्रश्न – मग तुम्ही एकमेकांना कुठं भेटलात?

आरजू – मे 2012मध्ये एका मित्राच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विशालशी भेट झाली. सुरुवातीला ओळख, मग चांगली ओळख आणि मग मैत्री झाली.

विशाल – मी त्या वेळेस साधना मिडिया सेंटरमध्ये कामाला होतो. आरजूचा आणि माझा एक कॉमन मित्र होता. तो मित्र साधनेतच कामाला होता. आरजू एका मित्रासोबत त्याच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक घेण्यासाठी मिडिया सेंटरवर आली होती. त्या मित्रानं माझी आरजूशी ओळख करून दिली. गप्पांची आवड असल्यामुळे आम्ही अर्धा-एक तास बोलत राहिलो. तिची स्पष्ट मराठी ऐकून मला आधी ती पुण्याच्या पेठांमध्ये राहणारीच वाटली. पण ती गेल्यानंतर मित्रानं पुन्हा तिचं नाव सांगितलं तेव्हा मी चकित झालो. आपल्याला सांगितलेलं असतं ना की, मुस्लीम म्हणजे त्यांना मराठी नीट येत नाही की हिंदी नीट येत नाही. म्हटलं हे तर भारी आहे. हिची तर माझ्यापेक्षा चांगली मराठी आहे. तो मित्र आणि मी एकत्र राहत होतो. त्याचे आणि हिचे स्पर्धा परीक्षेचे शिक्षकही एकच होते. तेपण पुरोगामी विचारांचे होते. विद्यार्थ्यांसाठी ते विविध उपक्रम राबवायचे. मित्रांसोबत या उपक्रमांना जाणं, आरजूची भेट घडणं हे होतच होतं.  शिवाय आमच्या दोघांच्याही रूम्स जवळच होत्या, त्यामुळे रात्री उशिरापर्यंत आम्ही गप्पा मारत बसायचो.

मैत्री घनिष्ठ होण्यास आणखी एक घटना घडली. त्या काळात माझ्या वहिनी केईएममध्ये ॲडमिट होत्या. त्या वेळेस आरजू अभ्यास करता-करता संजीवनी हॉस्पिटलमध्ये नोकरीपण करत होती. वहिनीचे मेडिकल रिपोर्ट्स आणि इतर गोष्टी यांच्या अनुषंगानं सल्लामसलततीसाठी मी तिची मदत घेत होतो. त्यातून आमचा संवाद वाढला. त्याच काळात डॉ. दाभोलकर यांचा खून झाला. त्या निमित्तानं आंदोलन पेटलं. त्यात तीही सक्रिय होती. मग अशा निमित्ता-निमित्तानं आमच्या भेटी वाढायला लागल्या.

प्रश्न – तुम्ही मैत्रीची सीमारेषा ओलांडून प्रेमाकडे वळलात हे कधी लक्षात आलं?

विशाल – साधारण 2014मध्ये आम्ही एकमेकांकडे कबूल केलं की, आम्ही प्रेमात आहोत. मला नेहमी वाटतं, प्रेम आपल्या जगण्यातून कळतंच. त्याच्यासाठी मागे लागण्याची गरज नाही आणि थेट विचारण्याची गरज तर त्याहून नाही. मला आजही असंच वाटतं.

खरंतर आम्ही खूप विषयांवरती चर्चा करायचो. माझी आधी एक प्रेयसी होती, पण आमच्यात वाद व्हायचे. ते मी आरजूला सांगायचो. मग ती तिच्या आणि माझ्या अशा चुका सांगायची. अनेकदा तिच्यावतीनं तिची बाजू मांडायची आणि गंमत म्हणजे त्या काळात आरजूसाठीसुद्धा स्थळ पाहणं सुरू होतं आणि हिच्यासाठी चांगलं स्थळ शोधा म्हणून मी चळवळीतल्या विविध लोकांना सांगायचो.

आरजू – मी डॉक्टर होते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते. त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या चांगली स्थळं येत होती. पण माझी एकच अट होती की, आमचे विचार जुळावेत. घरातले वैतागून विचारायचे की, मग तुला मुलगा नक्की कसा हवाय? मुलगा विचारांच्या बाबतीत प्रगत आणि समता मानणारा असावा हे क्रिस्टल क्लिअर होतं. त्यांना पटवून देणं अवघड होतं. त्यातून त्यांचा दबाव निर्माण व्हायचा. अरेंज मॅरेज पद्धतीनं लग्न करण्याच्या हेतूनं एखाददोन मुलांना भेटले. त्याबाबतही माझी विशालसोबत चर्चा व्हायची. यातून घडत हे होतं की, आम्हाला एकमेकांविषयी कळत होतं की, याला कशी लाइफ पार्टनर हवी आणि मला कसा लाईफ पार्टनर हवा आहे. मुळात काय घडत होतं… आम्ही खूप चर्चा करायचो. लग्न झाल्यानंतर घरात स्त्रीपुरुष समानता कशी रुजली पाहिजे हा आमच्या बोलण्याचा एक बेस असायचा. स्त्रीवाद, लैंगिकता, स्त्रियांच्या शोषणाचं मूळ अशा गोष्टींवर आम्ही खूप जास्त बोलायचो. पितृसत्तेमध्ये पुरुष कसे वागतात, घरात समता येण्यासाठी दोघांनी काय केलं पाहिजे यावर बोलायचो.

विशाल – मी चळवळीत असल्यानं तिथंही खूप सजगपणे आजूबाजूला पाहत होतो. चळवळीतला रोमँटिसिझम मला कधीच भावला नाही. मी प्रॅक्टिकली पाहायचो. यातल्या  विसंगती ही बोलून दाखवायचो. कार्यकर्त्यांच्या जगण्यावागण्यात प्रचंड विसंगती दिसायची. कार्यकर्ते स्वातंत्र्य, न्याय, समता असं खूप बोलतात; मात्र स्वतःच्या कुटुंबामध्ये त्याचा अवलंब करत नाहीत. अशा चर्चेमुळे आमच्यात खूप क्लॅरिटी होती. आता स्वयंपाकाचंच घे. केला मुलानं तर काय बिघडणार? असं पुरुष असून मी म्हणायचो तर तेही काही मुलींना पटायचं नाही. तर चळवळीतल्या मुलांचं काय… त्यांना वाटायचं की, आता आजपर्यंत बाहेरचं खाल्लं; मात्र लग्नानंतर तरी घरचं मिळायला हवं. कौटुंबिक संस्कारातून, पितृसत्तेतून आलेला हा ऑर्थोडॉक्सपणा याही मुलांमध्ये दिसायचा. विचारानं पटलेला मुद्दा ते आचरणात आणायला तयार नव्हते. माझ्यावर डॉ. विठ्ठल प्रभू यांचाही प्रभाव होता. त्यांच्या लेखनामुळे स्त्रियांच्या लैंगिकतेसंबंधीचे समज-गैरसमज मला आधीच माहीत झाले होते. माझ्यासाठी स्त्री-पुरुष संबंध, सहजीवन या संदर्भातल्या संकल्पना आधीच क्लिअर होत्या.

आरजू – थिअरॉटिकली मला प्रगत विचार माहीत होते मात्र प्रत्यक्षातही त्या विचारांचा, आचारांचा मुलगा पाहून सुरुवातीला मलाही जरा धक्का बसला. डॉक्टरी शिकत असलेली मुलं ही कितीतरी रुढिप्रिय असलेली मी पाहिली होती. 2012 ते 14 या काळात आम्ही खूप खोलवर अनेक विषयांवर चर्चा केली. ज्या विषयांवर लग्नानंतरही पार्टनर्स बोलत नाहीत अशा विषयांवर आम्ही बोलत होतो. अर्थात आम्ही एकमेकांचे साथीदार होणार आहोत याची कल्पना त्या वेळी आम्हाला नव्हती. आम्हाला दोघांनाही बोलायला खूप आवडायचं, त्यामुळे या चर्चा घडत होत्या. तो त्याचं दैनिकातलं बातमीदारीचं काम संपवून रात्री माझ्या अभ्यासिकेजवळ यायचा. माझा त्या दिवशीचा ठरलेला अभ्यास झाला नसेल तर मी लवकर खाली यायची नाही, पण तो वाट पाहत थांबून राहायचा आणि मी अभ्यास संपवून आल्यावर बारा-एक वाजेपर्यंत पुन्हा आमच्या खूप गप्पा व्हायच्या.

एकमेकांपाशी व्यक्त होणं हा आमचा वीक पॉइंट झाला होता. 2013च्या नोव्हेंबरमध्ये मला मुंबईची पोस्टिंग आली. मग मी मुंबईला गेल्यामुळे आमच्या गप्पांवर मर्यादा आल्या. त्या दरम्यानच्या काळामध्ये आम्ही एकमेकांना मिस करतोय आणि एकमेकांची भावनिक ओढ आहे याची जाणीव झाली. त्या काळात फोनवर त्यानं आपण मैत्रीच्या पुढे गेलोय असं मला वाटतंय हे सांगितलं होतं. पण मला असं काही वाटत नाहीये म्हणून मी त्याला उडवून लावलं होतं. मात्र एप्रिल 2014मध्ये मी पुन्हा पुढच्या परीक्षेच्या तयारीसाठी सुट्टी काढून पुण्यात आले होते. त्या काळात मला प्रकर्षानं जाणीव झाली. मग आम्ही भेटून मान्य केलं की, आम्ही परस्परांच्या प्रेमात आहोत. मित्रमैत्रिणींनी आम्हाला जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आम्हीच ते मान्य करत नव्हतो. एकदा मान्य झाल्यावर पुढे काय करायचं हे विशालनं विचारलं. म्हटलं ‘आयुष्यभर सोबत राहू.’

प्रश्न – त्याच वेळी पुढचा, घरच्यांना सामोरं जाण्याचा, त्यांना कसं सांगायचं असा काही विचार डोक्यात आला होता का?

विशाल – एकदा एकमेकांना कबुली दिल्यानंतर आमच्या लग्नात आव्हानं आहेत. हे प्रकरण अवघड आहे, असं काहीही पुढच्या दोन वर्षांत आमच्या मनात आलं नाही.

आरजू – माझ्याही मनात कधी आलं नाही. मला कन्व्हिन्स करण्याचे प्रयत्न करावे लागतील हे ठाऊक होतं, पण त्यानंतर घरातले राजी होतील याचीही खातरी होती. बाकी नातेवाइकांचा विचार मी केलेला नव्हता. तोपर्यंतच्या आयुष्यातल्या संघर्षात नातेवाइकांनी कोणताही रोल निभावलेला नव्हता, त्यामुळे माझ्या वैयक्तिक निर्णयाविषयी त्यांचं काय मत आहे याची फिकीर मी केली नव्हती. माझं एक निश्चित ठरलेलं होतं की, माझ्या विचारांशी जुळणारी व्यक्ती नाही मिळाली तर लग्न करणार नाही… घरातल्यांच्या, नातेवाइकांच्या दबावाला बळी पडून उगाच कुठल्याही मुलाशी मी लग्न करणार नव्हते. विशाल भेटला नसता तर मी खरंच लग्न केलं नसतं.

आमच्यात प्रेम असल्याचं मान्य केल्यावर पुढं आम्ही लग्नासाठी दोन वर्ष थांबलो. तेव्हा माझा संपूर्ण फोकस अभ्यासावर होता. तेही एक कारण होतं आणि आम्हालासुद्धा प्रेमात असण्याचा आनंद मिळत होता. तोपर्यंत माझ्या घरात माझ्या लग्नाच्या अनुषंगानं बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या. मी शाळेत, कॉलेजमध्ये, स्पर्धा परीक्षेच्या काळात ज्या पद्धतीचं आयुष्य जगले होते त्या सगळ्या जडणघडणीनं मी बंडखोर आणि वेगळी झाली आहे, येणाऱ्या स्थळांच्या बाबतीतही चिकित्सक आहे… तेव्हा मी सहजी कुणाशीही लग्न करणार नाही हे त्यांना कळून चुकलं होतं.

ॲक्च्युअली मी घरातल्यांना सांगण्याचा क्षण योगायोगानं घडला. डिसेंबर 2015मध्ये मी गावी गेले होते. आई आणि मी क्राईम पेट्रोल ही सिरिअल पाहत होतो. ऑनर किलिंगचा एपिसोड होता. पोटच्या मुलांपेक्षा एवढी काय जातीधर्माची इज्जत महत्त्वाची… लावून द्यायचं लग्न असं म्हणून ती हळहळत होती. त्या वेळेस मी तिला म्हटलं ‘दुसऱ्यांविषयी असं बोलणं सोपं आहे. आपल्या घरात कुणी केलं तर तुला चालेल का?’ ती पटकन ‘हो…’ म्हणाली. मग मी विशालविषयी तिला सांगितलं. त्यावरही ‘मी भेटून, बोलून चांगला वाटल्यास होकार देईल.’ अशीच भूमिका तिनं घेतली आणि त्यावर ती कायम राहिली. बाकी कुणाला नाही पण आईला मी कन्व्हिन्स करू शकेल याची खातरी मला होती. माझी आई तलाठी होती. तेव्हाची एमकॉम होती. तिला सामाजिक भान होतं. या गोष्टी समजून घ्याव्यात असा तिचा आवाका होता, त्यामुळे मला तिच्याविषयी आत्मविश्वास होता. वडिलांना सामाजिक दडपण खूप होतं. भावानंही थोडा विरोध केला, पण तो लहान असल्यामुळे त्याचं काही चाललं नाही.

जानेवारी 2016मध्ये ती विशालला भेटायला आली. तिच्या परीनं तिनं त्याची चौकशी केली. सुभाष वारे, शमसुद्दीन तांबोळी यांना ती भेटली. दुसऱ्या दिवशी आम्ही विशालच्या घरी गेलो. त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, गावातले लोक उपस्थित होते. चर्चा झाल्या आणि कौटुंबिक सपोर्ट आम्हाला मिळाला. तिथेच एंगेजमेंटपण झाली.

विशाल – माझं सतत सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणं; त्याविषयी कुटुंबीयांशी सतत बोलणं; बुवाबाजी, अंधश्रद्धा यांविषयी पुस्तकांतले उतारे वाचून दाखवणं हे सतत चालू होतं. सुरुवातीला ते नाही-नाही करतात पण नंतर ते तुमचं ऐकून घेतात, पटल्यावर बदलतात हा अनुभव मी घेतलेला होता. माझे विचार कसे आहेत ते घरच्यांना माहीत होतं. त्यामुळे मी जेव्हा असा लग्नाचा निर्णय सांगितला तेव्हा त्यांना अजिबात आश्चर्य वाटलं नाही. उलट त्यांना अपेक्षित होतं. तरीही गाव पातळीवर समाज काय म्हणेल याची भीती त्यांना होती… पण कुणीही विरोध केला नाही.

प्रश्न – पण तुम्ही इतक्या प्रगल्भपणे नातेसंबंध, लग्नव्यवस्था यांवर चर्चा करत होतात. ते तुम्हा दोघांना पटत होतं. असं असतानाही तुम्हाला लग्न या पारंपरिक व्यवस्थेचा विचार का करावा वाटला? त्यात तुम्ही तर जाहीर लग्न केलंत…

आरजू – हो… जाहीर लग्न केल्यामुळे तर माझ्या लग्नाला नातेवाइकांचा विरोध जास्त झाला. आम्ही असंच रजिस्टर लग्न केलं असतं तर त्यांचं काहीएक म्हणणं नव्हतं.

विशाल – जाहीर लग्न करण्यामागे निश्चित एक भूमिका होती. लोक आम्हाला म्हणतात तसे आम्ही लिव्ह इनमध्ये राहूही शकलो असतो. आजही आम्ही एका अर्थानं तसेच स्वतंत्र आणि मोकळे आहोत. पण आम्ही सामाजिक उपक्रमांत सहभागी असल्यानं आम्हाला वाटत होतं की, हिंदू-मुस्लीम लग्नपण जाहीररीत्या कुटुंबाच्या, नातेवाइकांच्या, मित्रांच्या, चळवळीच्या पुढाकारानं, सोबतीनं होऊ शकतं यातून एक चांगला संदेश जाऊ शकतो. बाराशे ते पंधराशे लोक आमच्या लग्नाला होते, पण आमचं लग्न इतकं व्हायरल होईल याची कल्पना आम्हाला नव्हती. टीव्ही नाईननं आणि इतरही मिडियानं आमच्या लग्नाला खूप कव्हरेज दिलं. लग्नाच्या वेळेस आम्हाला त्याची माहितीही नव्हती, कल्पनाही नव्हती. हे सगळं नंतर कळलं. बाबा आढाव म्हणतात तुम्हाला पारंपरिक प्रथा नकोत तर मग त्याला सांस्कृतिक पर्याय काय? लोकांना आनंदही वाटायला हवा. फक्त रजिस्टर लग्न करण्यात मजा ती काय? बरं दारात, मंदिरात, हॉलमध्ये… कुठंही लग्न केलं की नोंदणी करावीच लागते. हिंदू विवाह कायद्यानुसार किंवा मुस्लीम विवाह कायद्यानुसार आंतरधर्मीय विवाह करता येत नाही. तुम्हाला धर्मानुसार लग्न करायचं असेल तर धर्मांतर करावं लागतं. पण आम्हाला धर्मांतर करायचं नव्हतं म्हणून आम्ही स्पेशल मॅरेज ॲक्टखाली लग्न करायचं ठरवलं. नोंदणी अधिकारी तुमच्या विवाहस्थळी येऊ शकतात हाही या ॲक्टचा एक फायदा होता. आमच्या लग्नपत्रिकेवरही महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, परिवर्तन मिश्र विवाहसंस्था आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळ यांची नावं निमंत्रक म्हणून होती.

तुमच्या लग्न, मयत, वैयक्तिक सांस्कृतिक जीवनात मित्रमैत्रिणींना कुठलाही रोल नसतो. तिथे पुन्हा तुम्ही नातेवाइकांनाच सामावून घेता हे आम्हाला मोडायचं होतं. आमच्या लग्नाची जबाबदारी आमच्या मित्रमैत्रिणींनी घेतली. वनिता फाळके, सदाशिव फाळके, ओंकार आडके, अक्षय दावडीकर, रविराज थोरात, प्रिया देशपांडे, दीपक देशपांडे, भानुदास धुसाने या आणि इतर मित्र कार्यकर्त्यांच्या पुढाकारानं – कष्टनं पुण्यात लग्न होऊ शकलं. रजिस्टर पद्धतीसोबत सांस्कृतिक पर्याय म्हणून कुटुंबीयांचा परिचय करून दिला. आम्ही एकमेकांविषयी बोललो. आमच्याविषयी आमचे मित्र बोलले. आमचे कुटुंबीय बोलले. चळवळीतल्या लोकांनी आमच्या कुटुंबीयांना कौतुक म्हणून मानपत्र दिलं. आपोआप आनंदाचा उत्सव झाला आणि हेच आम्हाला साधायचं होतं. आमच्या लग्नाचा खर्च आम्ही दोघांनी अर्धा-अर्धा केला. आपल्याला लग्न करायचं एकमेकांच्या आनंदासाठी एकमेकांच्या सोबत राहण्यासाठी आणि त्याचा खर्चाचा भार आपणच घ्यायचा हे आमचं ठरलं होतं. खरं तर लग्नाचा इतका गाजावाजा झाला, पण कुठलीही उधळपट्टी नसल्यानं, देणंघेणं नसल्यानं अत्यंत कमी खर्चात आमचं लग्न झालं.

प्रश्न – पण लग्नाच्या वेळेस आरजूच्या कुटुंबीयांना धमकावण्यात आलं होतं ना..

आरजू – हो… निरनिराळ्या इस्लामिक जमातींकडून विरोध व्हायला लागला. घरातल्यांना धमक्यांचे फोन आले. नातेवाइकांकरवी आमच्यावर दबाव आणण्यास सुरुवात झाली. याचा परिणाम म्हणजे तिचे वडील लग्नालाच आले नाहीत. सुरुवातीला लग्नाला यायला उत्सुक असलेल्या इतरही आप्तेष्टांनी माघार घेतली. लग्नाच्या आधीचे चार दिवस त्यांच्यासाठी अगदीच तणावाचे राहिले. धमक्यांपेक्षा कुणाला इजा होऊ नये याची जास्त काळजी वाटत होती. यासंदर्भात त्यांनी पोलीस स्टेशनला अर्ज देऊन ठेवला. काही पोलीस साध्या वेशात लग्नाला उपस्थित राहिले.

प्रश्न – शेवटी लग्न नीट पार पडलं. लग्नानंतर कुटुंबीयांना कसा प्रतिसाद द्यायचा हे काही ठरवलं होतं?

आरजू – काही गोष्टी आम्ही ठरवल्या होत्या. काही गोष्टी आमच्या भूमिकांच्या अनुषंगानं होत्या. आम्ही गावी राहणार नव्हतो. तरीही ते आमचं कुटुंब असल्यामुळे आम्हाला त्यांच्याशी संवादी राहणं महत्त्वाचं वाटत होतं आणि ते हळूहळू विकसित होत गेलं. त्याला बराच वेळही लागला. अकरावीपासूनच घराबाहेर होस्टेलमध्ये राहत होते त्यामुळे मला स्वतःच्या सवयीच्या नाही तर ग्रामीण भागात, वेगळ्या घरात, वेगळ्या सांस्कृतिक भागात आणि तेही आंतरधर्मीय लग्न करून राहायचंय याची सुरुवातीला निश्चित भीती वाटत होती. साडी, मंगळसूत्र, टिकली अशा त्यांच्या अपेक्षा स्वाभाविक होत्या आणि मला साडी नेसता यायची नाही.

…पण मला कधीही चुकून चुकूनही ही वेगळ्या धर्माची आहे अशी जाणीव त्यांनी कुणीही करून दिली नाही. अर्शलच्या जन्मानंतर आमचं जाणंयेणं वाढलं. सणवारांना जेव्हा गावी जातो तेव्हा मला तिथं कधीही परकेपणाची, तुसडेपणाची जाणीव होत नाही. काही सांस्कृतिक गोष्टी माहीत नसतात तेव्हा मी वेगळ्या धर्मातून आले म्हणून माहीत नाहीत असं कुणीही सुनावत नाही. उलट घरच्यांनी ज्या लेव्हलला जाऊन आमचं लग्न स्वीकारालं, परकं मानलं नाही, त्यांच्या कक्षा आमच्यासाठी रुंदावल्या ही खूप मोठी गोष्ट आहे तर त्यांनाही बदलण्यासाठी वेळ द्यायला हवा असं मी त्याला सांगत असते. गावाकडे कुटुंबीयांशी माझं इतकं चांगलं आहे की, त्यांच्या छोट्या अपेक्षांनी फार फरक पडत नाही. आपण कुठल्या अपेक्षा पूर्ण करायच्या आणि कुठे ठाम नकार द्यायचा एवढं मात्र आपल्याला समजलं पाहिजे. तुम्ही माणसांना कसं स्वीकारता त्यावर तुमचं कुटुंब कसं पुढे जाईल हे ठरतं.

विशाल – मला माझ्या गावात असणारी मुस्लीम कुटुंबं, त्यांचा वेश, त्यांचं राहणीमान, खाणं हे आमच्या इतर घरांसारखंच वाटत होतं. आमच्या जवळ एक मुस्लीम कुटुंब राहत होतं. त्आयांची मुलगी आणि माझी बहिण, त्मयाच्चीया घरातील मुलगा आणि मी एकाच वर्गात शिकत होतो. माझ्या बहिणीनं एकदा लहानपणी तिच्या मैत्रिणीसोबतरोजे केल्याचं मला आठवतं. गावच्या नवरात्र मंडळाचा प्रमुख कार्यकर्ता हा माझा मुस्लीम मित्र आहे. वारकऱ्यांचं स्वागत करायलाही आमचे मुस्लीम तरुण सोबत असायचे. एकंदरीत मला मुस्लीम समाजाची चांगली माहिती होती. त्यामुळे असं लग्न केल्यानं मला फार वेगळ्या सांस्कृतिक पातळीवर सामोर जावं लागलं असं मला कधीच वाटलं नाही.

प्रश्न – प्रेम, लग्न यानंतर तुम्ही वास्तव जगण्याकडे वळलात तेव्हा आर्थिक बाबतीत तुमच्या भूमिका काय होत्या… 

विशाल – मी नेहमी म्हणतो हे प्रेम मला मैत्रीनं दिलेलं आहे. 2014पर्यंत मी कशाचाही विचार केलेला नव्हता. आमच्या दोघांमध्ये प्रेम होतं पण वर्गीय अंतरही होतं. ती मध्यमवर्गीय कुटुंबातून आली होती आणि मी गरीब कुटुंबातून. ती बीएएमएस आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती आणि मी बीए जर्नालिझम. आमचं लग्न होईल असा विचार केला नव्हता. फार तर प्रेम व्यक्त करू इतकंच वाटत होतं. लग्न होईल असा कधी विचारही मनाला शिवला नाही. तरी तिनं माझा स्वीकार केला याचं मला नेहमी कौतुक वाटतं. एकूण आपल्या सगळ्या धर्मांमध्ये पुरुषप्रधानता आहे आणि त्यामुळे लग्नांमध्ये मुलांपेक्षा मुलींना अधिक सोसावं लागतं. त्या अर्थानं मला काहीच ॲडजस्टमेंट करावी लागली नाही.

आरजू – मी आधी म्हणाले तसं माझं ठरलेलं होतं की, एखादी व्यक्ती मनापासून आवडल्यानंतर तिच्या इतर गोष्टींचा बाऊ करायचा नाही. एकदा प्रेमाचा स्वीकार केला की त्यानंतर जात, धर्म, शिक्षण यांत किंवा आर्थिक अंतर असलं तरी या कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही हे माझं हे ठरलेलं होतं. आमच्या गरजाही फार आणि वायफळ अशा कधीच नव्हत्या. सगळ्याच गोष्टी आर्थिक संपन्नतेवर अवलंबून नसतात.

प्रश्न – ज्याची कमाई जास्त त्याची घरात चलती याबाबत काय अनुभव आहे?

 विशाल – हा खूप मूलभूत प्रश्न आहे. पण सहजीवन, कुटुंब याबद्दलचे दोघांचे विचार जर पक्के असतील तर आर्थिक कमाईवर कुणाची चलती अधिक याला अर्थ रहात नाही. आम्हाला घरात विनाकारण वस्तू घेण्याचा सोसही नाही. तुमचे सणवार यांमध्ये भरपूर पैसे खर्च होतात आणि आम्ही दिवाळी आणि ईद इतकंच साजरं करतो.

आरजू – विशालचं सामाजिक स्तरावरच्या कामाचं मूल्य, कायदेशीर ज्ञान यांचा फायदा कुटुंबीयांना, मित्रपरिवाराला होतो. त्याचंही तर मूल्यांकन व्हायला हवं. सामाजिक ठिकाणी वेळ देता आला, त्या वेळेचं मोल पैशात केलं तर ते कमी कसं भरेल? त्यामुळं कोण किती कमवतो हे असं तपासता येणार नाही.

प्रश्न – फार महत्त्वाचा विचार! पुढं अर्शलचा जन्म झाला आणि त्याच्या संगोपनामध्ये विशालही सक्रिय राहिला आहे. सहजीवनात मुलांचं संगोपन, त्याची जबाबदारी दोघांनी घेणं यांबाबतचा तुमचा अनुभव  सांगा.

आरजू – एक्झॅक्टली. मला मगाशीपण हेच सांगायचं होतं. फक्त आर्थिक गोष्टींनी तुमच्या सहजीवनाची पूर्तता होत नाही. पैसा, सुबत्ता हे तुमचं आयुष्य जगण्याचं साधन आहे, साध्य नाही. नुसती आर्थिक गोष्ट न मोजता सहजीवनामध्ये कोण, कोणत्या गोष्टींसाठी उभं राहतंय, योगदान देतंय हेही खूप महत्त्वाचं आहे.  बाळंतपणासाठी माहेरी जायचं नाही हे तर आम्ही ठरवलं होतं. पुढे अर्शल सहा महिन्यांचा झाला. त्यानंतर मला नोकरीच्या जागी उपस्थित राहणं भाग होतं. अशा वेळी विशालनं त्याची जबाबदारी घेऊन मला आश्वस्त करणं ही खूपच मोठी गोष्ट होती. अशी फ्लेक्झिबिलिटी त्या-त्या वेळी ओळखून एकमेकांनी वागणं,  प्रतिसाद देणं गरजेचं असतं त्यामुळं कुटुंब म्हणून अर्शलची जबाबदारी आमच्यासाठी सुकर झाली. अर्शलच्या वाढीमध्ये, त्याच्या जडणघडणीमध्ये विशालचा वाटा खूप जास्त आहे. माझ्या कामामुळे, जबाबदाऱ्यांमुळे मला खरंच त्याला तितका वेळ देता येत नव्हता… त्यामुळं त्यांच्या दोघांमध्ये जिव्हाळाही खूप आहे. आपल्याकडे मातृत्वाचंही खूप गौरवीकरण केलेलं असतं, मात्र मुलाच्या संगोपनात वडीलही सहभागी होऊ शकतात.

विशाल – लहान मुलांना लळा, जिव्हाळा या भावनांची उणीव माझ्यामध्ये होती. बाळ नको अशीच माझी भूमिका होती. पण एका टप्प्यावर आम्ही बाळाचा निर्णय घेतला. त्यामुळे वडील म्हणून मी सर्व काही करू लागलो. अडीच दिवसांपासून मी त्याला अंघोळ घालण्यापासून त्याचं खाणंपिणं, शी-शू, बाळुतं धुण्यापर्यंत सगळं केलं. आम्ही बाळाची हिंदू धर्माप्रमाणे पाचवी, बारावी किंवा मग तीट लावा, दृष्ट काढा असं काहीही केलं नाही. कुठल्याच धर्माचं आम्हाला काही करायचं नव्हतं. त्याचे कान टोचले नाहीत, त्याच्या कंबरेला करदोटा बांधला नाही की सुंता केली नाही. उलट अर्शलच्या जन्माआधी दोघांनी मिळून बालसंगोपनाची तीसेक पुस्तकं वाचून काढली. वडील बाळाला जन्म देऊ शकत नाही आणि दूध पाजू शकत नाही एवढं सोडलं तर मुलांचं सर्व काही वडलांना करणं शक्य आहे. माझ्या कामाची वेळ त्याच्या दिवसाप्रमाणे करून घेतली. आम्ही काही तासांसाठी अर्शलला पाळणाघरात ठेवायला लागलो. अवघ्या साडेपाच महिन्यांच्या अर्शलला दुपारी एकच्या सुमारास तिथं सोडायचं आणि संध्याकाळी सहा वाजता आणायचं. याचाही आम्ही बाऊ केला नाही, गिल्ट घेतला नाही. करोना काळात तर एकमेकांना जास्त वेळही देता आला. आता अर्शल चार वर्षांचा आहे. अनुभवातून आलेलं एक सूत्र सांगतो… बालसंगोपनातून अधिक संवेदनशील झालो, अधिक सयंम वाढला आणि सर्जनशीलता कळली. रोज बाळ वाढतं हा किती जिवंत अनुभव आहे.

प्रश्न – अर्शल या नावाबाबतीत तुम्ही काहीतरी विचार केला होता ना…

आरजू – हो… कुठलाही धर्म प्रतीत होईल असं नाव आम्हाला नको होतं म्हणून मग आरजूतला आर आणि विशाल मधला शाल असं करून आम्ही अर्शल हे नाव ठरवलं होतं शिवाय मुलगामुलगी कुणीही झालं तरी हेच नाव ठेवायचं हे ठरलं होतं.

प्रश्न- तुम्ही ईद-दिवाळी साजरी करता का?

विशाल- हो. सण साजरा करताना सणांमध्ये दडलेली खाद्य संस्कृती, वेशभूषा संस्कृती आणि निखळ आनंदाची संस्कृती जपण्याचा आमचा प्रयत्न असतो. आम्ही लग्नानंतर जाणीवपूर्वक काही सण साजरे करायला लागलो. त्यात दिवाळीतला बळीराजाचा महोत्सव, ईद आणि वारी अशा सणांचा समावेश आहे. दिवाळीच्या वेळेस आम्ही आमच्या गावी जातो. फराळ करणं, नवीन कपडे घालणं अशा सगळ्या गोष्टी आम्ही करतो. ईदच्या वेळेस आमच्या गावाकडची मंडळी, आमचे पुण्यातले मित्रमैत्रिणी आमच्या घरी येतात. गावाकडून केवळ माझे कुटुंबीयच नाहीत तर इतर नातेवाईकही येतात.

प्रश्न- तुम्ही दोघांनीही लग्नाआधीच आंतरजातीय/आंतरधर्मीय लग्नाबाबत फार विचार केला आहे. तर अशा प्रकारचं लग्न करूनही जातिधर्मांमध्ये द्वेष मिटवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतात का? बऱ्याचदा तर नवऱ्याचा धर्म स्वीकारण्याकडे कल असतो… तुमचा काय अनुभव आहे?

विशाल – आंतरजातीय-धर्मीय विवाह करून त्या दोन व्यक्ती एकत्र येतात, नांदू लागतात तेव्हा आपोआपच त्यांना दुसऱ्या जाती/धर्मीय व्यक्ती, कुटुंब आणि समाजाची ओळख होते आणि त्यांच्या विषयीचे असलेले समज-गैरसमज दूर होण्यास मदत होते. यातूनच धार्मिक-जातीय द्वेष मिटतो, वेगळ्या जातीधर्मातील जोडीदार ही आपल्यासारखीच व्यक्ती आहे, हा खरा अनुभव मिळतो. त्यामुळे जातीय-धार्मिक द्वेष हा अवास्तव आहे, हे समजल्यानं अधिक जागृतपणे आपण समाजाकडे पाहू लागतो. आंतरजातीय-धर्मीय लग्नातून साध्य होणारी ही पहिली गोष्ट आहे. पण त्या पुढं जाऊन व्यापकपणे आंतरजातीय/धर्मीय विवाहातून परिवर्तन अपेक्षित आहे. पण ते फार घडत नाही. धर्मांतरण हा पुन्हा व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग असला तरी मुलाचा धर्म मुलीला लग्नानंतर स्वीकारावा लागणं, ही आंतरजातीय/धर्मीय लग्नाची साध्यता नाही. तसंच मुलाकडील धार्मिक रूढी, परंपरा, रिवाज, राहणीमान मुलाला स्वीकाराव्या लागणं हेही फारसं योग्य नाही. खरं तर बहुसंस्कृतीचा तो संकोच असून पुन्हा तो एकसुरीपणाच आहे.

पत्नीला पतीचा धर्म स्वीकारायला न लावणं, प्रथा-परंपरा पाळायला न लावणं हा खूप मोठा सामाजिक संघर्षाचा प्रश्न आहे. आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाहापेक्षाही हे नाकारणं आव्हानात्मक आहे. लग्न एकदा होतं, पण रूढी परंपरा या दररोजच्या जगण्याचा भाग असतात, तेव्हा तिथं दररोज संघर्ष होतो. याकडं केवळ कुटुंबाचं नाही तर समाजाचंही लक्ष असतं. सर्वसामान्य माणसं आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करतात तेव्हा त्यांच्या लग्नातून जातीयधर्मीक द्वेष कमी होईल, तसा इतरांना संदेश जाईल, ही माफक अपेक्षा आहे. मात्र स्वतःला विचारशील परिवर्तनवादी म्हणवणाऱ्या व्यक्तींकडूनच आपल्या पत्नीला प्रथा-परंपरा पाळायला लावल्या जातात तेव्हा मात्र खेद होतो. हा मुद्दा खरंतर सजातीय विवाहाच्या बाबतीतही तितकाच लागू आहे. सुरुवातीला दोनतीन वेळा आरजूसह मी गावी गेलो होतो. नंतरच्या वेळेस मी एकटाच गेलो तेव्हा ती का नाही आली म्हणून विचारणा केली. म्हटलं, तुम्हाला टिकली प्रिय आहे की आरजू? टिकली हवी असेल तर टिकल्याचं पाकीट देतो. त्यानंतर पुन्हा कधीही बायकांनी टिकली, मंगळसूत्र, साडी असा विषय काढला नाही. केवळ लग्न करून बदल साधत नाही. तुम्हाला तुमच्या भूमिकाही वेळोवेळी तपासत राहाव्या लागतात. तिनं माझं नाव लावावं हे मला कधीही पटणारं नव्हतं.

आरजू – या प्रथांच्या अनुषंगानं सांगायला आवडेल. आपण सहजीवनात असतो तेव्हा आपल्या साथीदारानं आपल्या विचारांच्या, भूमिकेच्या पाठीशी नाही तर आपल्यासोबत असणं खूप जरुरीचं असतं. विशाल तसा आहे. माणसाच्या सुखदुःखाशी तुम्ही एकरूप झालात तर जातधर्मानं काही फरक पडत नाही.

अर्शलच्या बाबतही आम्ही त्याला कुठलाच धर्म लागणार नाही याची दक्षता घेतो. दोन्ही धर्मांतल्या सांस्कृतिक गोष्टी माहीत व्हायला पाहिजेत हे आम्ही पाहतो. आमच्या घरातले विचार अधिक रुंदावत नेणारी शाळा असावी असा विचार करूनच आम्ही त्याच्यासाठी अक्षरनंदन या शाळेची निवड केली.

प्रश्न – लग्नात स्वातंत्र्य, समता ही मूल्यं किती महत्त्वाची आहेत?

आरजू – बहुतांश लग्नांत व्यक्तिस्वातंत्र्य हे मूल्य पाळलं जात नाही. केवळ अपेक्षा असतात. घरकाम किंवा जबाबदाऱ्या यांची एकमेकांत पूरक वाटणी हा विचार केलेला नसतो. क्षमता, मर्यादा या भिन्न असू शकतात. नीट विचार व्हायला हवा. यातही पुन्हा तंतोतंत पन्नास पन्नास टक्के वाटा असं होईलच असं नाही. तो तुमच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगचा भाग असतो. प्रत्येक कुटुंबानुसार जबाबदाऱ्यांचं वाटप भिन्न असेल पण ते एकमेकांसाठी आनंददायी असेल असं पाहायला हवं. अजूनही 95 टक्के वेळा अर्शलची आवराआवर विशालच पाहतो. लहान बाळ होतं तेव्हाही त्याला झोपवत होता. ते त्याला जमतं. मी वेगळं काहीतरी करते. एकमेकांसाठी असं पूरक असणं हेच खरंतर समतेचं सूत्र आहे.

प्रश्न – अलीकडच्या काळात धर्मजाणिवा आणि लव्ह जिहादसारख्या संकल्पनांच्या पार्श्वभूमीवरच्या तुमच्या सहजीवनाविषयी तुम्ही काय सांगाल?

विशाल – आंतरधर्मीय विवाह हा उलट अधिक इंटरेस्टिंग असतो कारण भिन्न सांस्कृतिक गोष्टी तुम्हाला अनुभवता येतात. राहणीमानापासून खाद्यपदार्थांपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी असतात… ज्यातून तुम्हाला तुमचं सहजीवन अनेक अंगांनी फुलवता येतं. माझ्या अनुभवानुसार मुस्लीम समाज उत्तम आदरातिथ्य करतो. तुम्ही पूर्वी जे अनुभवलेलं असतं ते अनुभव घेण्याची संधी तुम्हाला मिळते आणि ते आनंददायी असतात. आता गणेशोत्सव किंवा कोणताही सण असला की माझ्या सासूकडून शुभेच्छा येतात. त्या वेगळ्या वाटतात. यातून नातेसंबंध दृढ होत जातात.

आरजू – लव्ह जिहाद ही राजकीय संकल्पना आहे. आमच्या वेळेसही काही लोक उलटा लव्ह जिहाद आहे का असं म्हणत होते. हा केवळ प्रोपागांडा  भाग आहे. जनरली काय होतं… लव्ह मॅरेज आहे म्हटलं की तिथं सगळंच छान छान आहे, तुम्ही शंभर टक्के खूश आहात, तुमच्यात कुठलेही वाद नाहीत, सगळं सुरळीत आहे असा एक समज तयार होतो. प्रेमात आहात म्हणजे सगळं परिपूर्ण आहे असं होत नाही. दोन भिन्न माणसं आहेत म्हणजे गुणदोष येणारच आणि फक्त तुम्ही कसं समजून घेऊन पुढे जाता हे महत्त्वाचं. उलट लव्ह मॅरेजमध्ये अधिक वाद होतात. एकतर तुम्ही एकमेकांना अधिक ओळखता आणि एकमेकांना स्वातंत्र्य देण्याची भाषाही अधिक केलेली असते. स्वातंत्र्याचा संकोच व्हायला लागला की वाद होतातच.  एकमेकांना कशी स्पेस देता, एकमेकांना कसं स्वीकारता यावर सहजीवन फुलतं. आता काही जण म्हणतात की, विशाल स्पष्ट आणि फटकळ आहे. अर्थात अर्शलच्या जन्मानंतर तसा तो शांत झाला, पण याच्या मित्रांना वाटायचं की मी याच्यासोबत कसं जगते… पण आमचा बेस संवाद हा आहे… जो आजही कमी झाला नाही. आमच्यात वाद होतात, पण त्यातूनच आम्ही शिकत गेलो. नातं हळूहळू खुलत जातं. आमचा तरी तसाच अनुभव आहे.

[email protected]

(ही मुलाखत ‘कर्तव्य साधना’ च्या https://kartavyasadhana.in/ या वेब पोर्टलवरून घेतला आहे .अनेक विषयांवरील उत्तमोत्तम लेख/मुलाखती वाचण्यासाठी या पोर्टलला नियमित भेट द्यायला विसरू नका.)

१. समीना-प्रशांत: विवेकी जोडीदाराची निवड म्हणजे सुंदर सहजीवनाकडं वाटचाल-https://bit.ly/3sACons

२. धर्मारेषा ओलांडताना-श्रुती पानसे आणि इब्राहीम खान-https://bit.ly/30HHulP

३. प्रज्ञा केळकर – बलविंदर सिंग: सहजीवनात कुटुंबाची सोबत अधिक अर्थपूर्ण! https://bit.ly/2PdAUkU

४. अरुणा तिवारी-अन्वर राजन: सहजीवनाची भिस्त प्रेम, विश्‍वास आणि कमिटमेंटवर!https://bit.ly/3mBVFmF

५.  दिलशाद मुजावर आणि संजय मुंगळे:माणूस म्हणून वाढण्यासाठी धार्मिक भिंती तोडल्या पाहिजेतhttps://bit.ly/2RZ1izX

६.हसीना मुल्ला – राजीव गोरडे: धर्मजातीच्या आंधळ्या संकल्पनांतून बाहेर यायला हवं https://bit.ly/2QJrePQ

७.महावीर जोंधळे आणि इंदुमती जोंधळे: एकमेकांच्या पायांत गुंता न करताही छान जगता येतं.https://bit.ly/3x8cVnp 

८. मुमताज शेख – राहुल गवारे…तक्रार करण्यासाठी जागा मिळाली की निम्मी भांडणं कमी होतातhttps://bit.ly/2U7YEJh

९.जुलेखा तुर्की-विकास शुक्ल: आम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही!-https://bit.ly/3xQB56Q

१०.वर्षा ढोके आणि आमीन सय्यद: जात-धर्म-लिंगनिरपेक्ष राहणं हाच आमच्या सहजीवनाचा आधार-https://bit.ly/2TYwMYw

११.शहनाज पठाण आणि सुनील गोसावी: आम्ही विचारांशी, तत्त्वांशी ठाम राहिलो.https://bit.ly/2Y9UbIb

Previous articleशरद पवार बोलले खरं , पण…
Next articleराजकारण्यांनी आक्रमक व्हावं असुसंस्कृत नाही !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here