-समीर गायकवाड
हिचे नाव हाशी. वय सतरा. तीन गर्भपातानंतर तिच्या मालकिणीने तिला सांगितलं की आणखी एक-दोन गर्भपात झाले तर तुला पुन्हा आई होता येणार नाही. कारण गर्भधारणा होताच आपोआप गर्भपात होतील. तेव्हा आई व्हायचे असेल तर आताच हो. तिच्याकडे नेहमी येणाऱ्या एकाचे बीज तिच्या उदरात वाढले नि ती आई झाली. तिच्या पोटी मुलगी जन्माला आली याचं मला वाईट वाटते कारण तिच्या नशिबी हेच भोग असण्याची शक्यता जास्ती.
जिया वयाच्या दहाव्या वर्षी लाईनमध्ये आली तेंव्हा ती अगदी मरतुकडी नि कथित अनाकर्षक अशा देहयष्टीची होती. तिच्या मालकिणीने तिची उचल फेडून घेण्यासाठी तिला ओरेडेक्सॉन खाऊ घातलं. मग तिच्या ठायी काही भागी सुजेची गोलाई आली नि मग कुठे ती नजरेत भरू (?) लागली. त्यातून व्हायचे ते झाले तिच्या अनेक ग्रंथी फुगल्या तर काही ग्रंथी सुकल्या. तिची प्रसूती झाल्यानंतर तिला पान्हाच फुटला नाही.
महागडी दूध पावडर आणण्याइतके पैसे जवळ नसल्याने आधी बकरीचे नंतर गायीचे दूध असा तिच्या मुलीचा प्रवास सुरु झाला. हाशीला दूध आले असते तर ते गुलाबी रंगाचे असले असते कारण तिच्या अनौरस पोरीसाठी ती जीव गहाण टाकायलाही तयार आहे, नव्हे आई होण्यासाठी तिने ऑलरेडी जीव पणाला लावलाय. कारण तिने घेतलेल्या औषधांचे साईड इफेक्ट्स म्हणून तिच्या कंबरेचे सांधे निखळण्याची शक्यता अधिक आहे आणि खेरीज तिची प्रसूतीही कमी वयात झालीय. सबब तिचे अकाली अपंगत्व पक्के आहे. तिच्या स्तनांत दूध नाही मात्र तिची मुलगी तिच्या छातीला चिकटली की झोपी जाते. हाशीचे दूध नक्कीच गुलाबी असले असते कारण तिची माया जगावेगळी आहे आणि जालिम जग गुलाबी रंगाला प्रेमाचा रंग म्हणतं .
हाशी जिथे राहते तो आशियातला दुसऱ्या क्रमांकाचा कुंटणखाना. कंदपाडा भागातला. बांग्लादेशातील तंगैल जिल्ह्यातले हे बदनाम गाव. ब्रिटीश कालापासून इथे वेश्या व्यवसाय अस्तित्वात आहे. २०१४ मध्ये मुलतत्ववाद्यांनी यांना हा इलाखा सोडून जाण्यास भाग पाडले. यांची घरे लुटली, जाळली, पाडली, उध्वस्त केली. मात्र बांग्ला महिला वकील समितीने यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात लढा लढून न्याय मिळवून दिला. या बायका पुन्हा आपल्या हक्काच्या घरात पोहोचल्या. त्यांना नव्याने उभं राहणं खूप कठीण गेलं.
सर्वसाधारणपणे दहा ते चौदा वर्ष वय असताना मुली इथे आणल्या जातात. वयाची नि देहाची बरबादी झाल्यानंतर त्यांना इथून जावे वाटत नाही. यांचे पुनर्वसन हे अपवाद वगळता थोतांड असते कारण लोक यांचा भूतकाळ कळताच आहे त्या जागी त्यांचे लचके तोडू पाहतात.
हाशीच्या मुलीचा स्त्रीदेह या नरकात फुलू नये, इथे त्याला गुलाबी छटा लाभू नये. तिला जन्माचा जोडीदार लाभावा आणि तिच्या स्तनातून गुलाबी दुध जरुर पाझरावे. आता हाशी जिवंत असेल तर ती बावीस वर्षांची असेल आणि तिची पोर सहा वर्षांची. येत्या चार वर्षात तिचा फैसला होईल. असो.
नवरात्रीच्या झुठ्या नि कथित रंगसंहितेनुसार आजचा रंग गुलाबी ! नरकयातना भोगणाऱ्या माझ्या माता भगिनींना गुलाबी रंगाच्या शुभेच्छा तर देऊ शकत नाही. किमान त्यांच्या पुढच्या पिढीत तरी प्रेमाचा हा गुलाबी रंग झिरपावा, विधात्याने इतके कठोर होऊ नये !
(छायाचित्र-बीवार्ताचे संपादक वानी इस्माईल यांच्या सौजन्याने)
(लेखक नामवंत स्तंभलेखक व ब्लॉगर आहेत)
८३८०९७३९७७
…………………………………….