अमरावतीचे रहस्यमय साध्वी भस्म प्रकरण
-अविनाश दुधे
१५ ऑक्टोबर २००६ हा दिवस मी कधी विसरूच शकत नाही. माझ्या पत्रकारितेच्या प्रवासातील तो सर्वात संस्मरणीय दिवस आहे. रविवार असल्याने मी निवांत होतो. वर्तमानपत्रांच्या रविवारच्या पुरवण्या चाळत होतो. दहा वाजताच्या दरम्यान मोबाईल वाजला. ‘लोकमत’ चे वितरक अजय लुंकड फोनवर होते. ते म्हणाले- ‘भैय्या, हमारे समाज की साध्वी भस्म हो गयी. समाज के बहोत सारे लोग दर्शन लेने जा रहे है, अपना रिपोर्टर, कॅमेरामन भेजना’ अजयने जे काही सांगितलं, ते नेमकं मला समजलं नाही. पण काहीतरी वेगळा प्रकार घडला हे लक्षात आलं. लगेच एका पत्रकार मित्राचा फोन आला. ‘अरे, तू घरी काय करतोस? तातडीने ओसवाल भवनला ये.’ मी लगेच बाहेर पडलो. ओसवाल भवनाच्या रस्त्यावर पोहोचताच नेहमीपेक्षा वाहनांची गर्दी अधिक जाणवायला लागली. भवनात पोहोचल्यानंतर जिकडे पाहावे तिकडे जैन समाजातील स्त्री-पुरूषांची गर्दी दिसत होते. समाजातील अनेक प्रतिष्ठित माणसं चेहऱ्यावर अतिशय गंभीर भाव घेऊन तेथे उपस्थित होते. ओसवाल भवनातील एका बंद खोलीसमोर लांबच लांब रांग लागली होती. प्रत्येक जण त्या खोलीच्या खिडकीत डोकावून अतिशय श्रद्धाभावाने नमस्कार करीत होता. नेमकं काय घडलं याची माहिती मी आणि इतर पत्रकार मित्रांनी घेणे सुरू झाले. तेथील उपस्थितांच्या बोलण्यातून जो काही प्रकार कळला तो थोडक्यात असा होता- ‘चातुर्मासासाठी आलेले जैन साधू व साध्वींपैकी एक, साध्वी सिद्धीश्री उर्फ समता खाबिया यांची उत्तररात्री अद्भुत शक्तीने राख झाली. साध्वी खोलीमध्ये ज्या चटईवर झोपत होत्या त्या तेवढ्याच ठिकाणी जळाल्याच्या खुणा दिसत असून बारीक हाड व राख पसरलेली आहे. केवळ संतांच्या बाबतीतच हे घडू शकतं.’ प्रत्येकजण थोडयाफार फरकाने हीच कहाणी सांगत होता.
हे ऐकून काय प्रतिसाद द्यावा, कसं व्यक्त व्हावं, हेच कळत नव्हतं. दरम्यान गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढत होती. लोक हार तुरे, नारळ, उदबत्त्या घेऊन येत होते. जैन समाजातील काही महिलांनी ‘त्या’ खोलीसमोर भजनं गाण्यास सुरूवात केली होती. वातावरण संपूर्णतः धार्मिक होतं. तेथे उपस्थित कोणाच्याही डोक्यात साध्वींचे अद्भुत शक्तीने भस्म झाले, राख झाली ,याबाबत काहीही शंका नव्हती. प्रत्येकजण अतिशय श्रद्धाभावाने एकदुसऱ्याला हीच कहाणी सांगत होता. अशा वातावरणात शंका उपस्थित करणे उपयोगाचे नसते, हे एवढ्या वर्षाच्या अनुभवाने माहीत झाले होते. त्यामुळे मी आणि पत्रकार मित्र शिवराय कुळकर्णीने ‘भक्त’ बनून प्रकरणाचा तडा लावण्याचे ठरविले. चेहऱ्यावर अतिशय विनम्र आणि श्रद्धायुक्त घेऊन आम्ही जैन समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडे गेलो. ते सांगत असलेल्या स्टोरीवर आमचा शंभर टक्के विश्वास आहे, असे आम्ही आमच्या चेहऱ्यावर दाखवले. ही अद्भुत घटना संपूर्ण देशात जाण्याची आवश्यकता आहे. देश आणि जगभरातील जैन समाजापर्यंत हा दैवी, अद्भुत चमत्कार पोहचायला हवा, हे त्यांना पटवून देताना वाचकांपर्यंत हा प्रकार अधिक परिणामकारक पद्धतीने पोहचविण्यासाठी ज्या खोलीत हा प्रकार घडला ती खोली आम्हाला दाखवा, अशी विनंती त्यांना केली. तोपर्यंत त्यांचा विश्वास आम्ही संपादन केला होता.
साध्वींची ज्या खोलीत अद्भुत शक्तीने राख झाली, असे सांगण्यात येत होते , त्या खोलीसमोरील भक्तांच्या रांगेत त्यांनी आम्हाला उभे केले. काही वेळातच आम्ही खोलीच्या खिडकीजवळ पोहोचलो. खिडकीतून आम्ही संपूर्ण ‘स्पॉट’ काळजीपूर्वक पाहिला. त्या खोलीमध्ये काहीही जळल्याचे वा जाळल्याच्या काहीही खाणाखुणा दिसत नव्हत्या. फक्त एक चटई जळालेल्या अवस्थेत होती. चटईच्या आजूबाजूला पेटल्याच्या काळपट खाणाखुणा होत्या. राख आणि काही छोटे हाडाचे तुकडे पसरवून ठेवण्यात आले होते. खोलीच्या छतावर किंवा भिंतीवर जळाल्याच्या वा ज्वाळांची धग लागल्याच्या कुठल्याही खुणा नव्हत्या. खोलीतील दृष्य पाहून कोणत्याही जाणत्या माणसाला काय झाले असावे, याचा अस्पष्ट असा अंदाज येत होता . मात्र त्यावेळी तिथे तोंड उघडून उपयोग नव्हता.
आम्ही पत्रकारांनी आमचा मोर्चा पोलिस अधिकाऱ्यांकडे वळविला अधिकारी काहीच सांगायला तयार नव्हते. ओसवाल भवनाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांना जो काही घटनाक्रम सांगण्यात आला तोच सांगून बाकी तपासानंतर बोलू , एवढंच ते पत्रकारांना सांगत होते. त्यांच्यावर प्रचंड दडपण आहे, हे स्पष्ट दिसत होतं. समाजाची भाबडी श्रद्धा आणि जैन समाजातील प्रतिष्ठितांचं दडपण सर्वांनाच जाणवत होतं. यात कहर म्हणजे आमच्या काही पत्रकार मित्रांचाही जे काही सांगितलं जात होतं, त्यावर विश्वास बसला होता. ते श्रद्धाभावाने भाविकांचे छायाचित्र व त्यांच्या प्रतिक्रिया टिपत होते. सामूहिक वेडेपणाचं दर्शन तेथे घडतं होतं. आमची अवस्था अतिशय अवघड होती. काहीतरी मोठी गडबड झाली आहे हे स्पष्ट दिसतं होतं; पण बोलता काहीच येत नव्हतं. मोठी अवघड परिस्थिती होती. संपूर्ण तपास झाल्याशिवाय काहीच सांगणार नाही, असं पोलिस सांगत होते. अशा परिस्थितीत खरं काय आहे ते शोधून काढणं, हे आव्हान होतं. आम्ही जी काही माहिती मिळत होती ती संकलित करीत होतो. साध्वी कुठून आल्या होत्या? त्यांच्यासोबत कोण होतं? त्यांचं दिवसभरातील रूटिन कसं असायचं? शनिवारच्या रात्री त्या किती वाजता विश्रांतीसाठी गेल्या? वगैरे वगैरे.
दिवसभरातील या खोदकामातून ठोस असं काही फार हाती आलं नाही. संध्याकाळी कहर झाला. अमरावतीतून प्रकाशित होणाऱ्या एका सांध्यदैनिकाने अतिशय ग्लोरिफाय करून स्टोरी छापली होती. ‘स्वामी रामदेवबाबा कहते है , योगशक्तीसे हो सकता है आदमी का भस्म!’ अशी आठ कॉलम स्टोरी त्यांनी छापली होती . सोबत रामदेवबाबांची थोडक्यात मुलाखत होती . ‘योगशक्तीमुळे माणसाचं भस्म होऊ शकतं. योगात ही ताकद आहे.’ वगैरे आचरट दावे बाबांनी त्या मुलाखतीत केले होते. त्या बातमीची शहरात जोरदार चर्चा झाली. लोक आणखी मोठ्या संख्येने ओसवाल भवनाकडे यायला लागले. दरम्यान वृत्त वाहिन्यांवरही ही बातमी झळकायला लागली होती. अशा परिस्थितीत आपण नेमकी बातमी काय द्यायची, हा माझ्यासमोर पेच होता. यापूर्वी अंधश्रद्धेतून लोक जो वेडाचार करतात, त्यापद्धतीची अनेक प्रकरण मी हाताळली होती. येथे मात्र मामलावेगळा होता. पोलीस याविषयात काहीच बोलायला तयार नव्हते. पहिल्या दिवशी संध्याकाळपर्यंत नेमकं काय झालं असावं याचा अंदाज येत नव्हता. साध्वी सिद्धीश्री उर्फ समता खाबियाला कोणीतरी जाळून मारलं किंवा लैंगिक प्रकरणातून हे घडलं असावं, या निष्कर्षापर्यंत मी आलो होतो. पण माझ्याकडे पुरावे काहीही नव्हते . पोलिसांकडून कुठल्याही शक्यतेला दुजोरा मिळत नसल्याने या अशा शंका उपस्थित करणं वेडेपणाचं होतं. शेवटी मी अतिशय सेफ बातमी देण्याचा निर्णय घेतला. ‘अमरावतीत चातुर्मासासाठी आलेली एक जैन साध्वी रहस्यमयरित्या गायब झाली असून तिच्या खोलीत जळालेली चटई व राख आढळली. या प्रकाराबाबत भाविकांमध्ये अशी -अशी चर्चा आहे. पोलीस अधिक तपास करीत आहे.’ वगैरे…वगैरे.
बातमीत अंधश्रद्धा निमूर्लन समितीचं म्हणणं कोट करायला मात्र मी विसरलो नव्हतो. ‘हा असा प्रकार विज्ञानाच्या कसोटीवर टिकत नाही. हे असे घडू शकत नाही. माणसांचं अचानक भस्म वगैरे होऊ शकत नाही.’ हे अंनिसचे म्हणणे मी ठळकपणे प्रसिद्ध केले होते. बहुतेक मोठ्या वर्तमानपत्रांनी हा असाच स्टॅण्ड घेतला होता. दरम्यान बातमी संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात पोहोचली होती. बुद्धीप्रामाण्यवादी कुठल्याही माणसाला ही घटना कमालीची अस्वस्थ करणारी होती. रात्री मी माझ्या संपादकीय विभागाची बैठक बोलावली. सर्व टीम या प्रकरणाच्या मागे लावण्याचा निर्णय घेतला. मी स्वतः संपूर्ण ताकदीने उतरलो. दुसऱ्या दिवशी नागपूरहून उमेश चौबे व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे इतर ज्येष्ठ कार्यकर्ते अमरावतीत येऊन धडकले. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा नव्या उमेदीने खोदकाम सुरू केले. एका जैन साध्वीच्या बोलण्यातून एक महत्त्वपूर्ण माहिती माझ्या हाती लागली. -अमरावतीत चातुर्मासासाठी आलेल्या जैन साध्वींसोबत राजेश तलवार नावाचा एक सांगलीचा तरूण सेवेकरी म्हणून सोबत होता. मागील काही महिन्यात जिथे जिथे साध्वी सिद्धीश्री जायची, तेथे तो असायचा. अमरावतीतही तो आला होता. शनिवारी रात्रीपासून म्हणजे साध्वी गायब झाल्यापासून वा तिची राख झाल्यापासून तो सुद्धा गायब होता. – अशी ती माहिती होती.
मी ही माहिती तातडीने पोलीस आयुक्त जगननाथ यांना दिली. ते मंद हसले. पोलीस उपायुक्त अविनाश बारगळ माझे मित्र. त्यांनी मला सांगितले, ‘आमचा सुद्धा त्याच्यावरच संशय आहे. फक्त २४ तास थांबा. सारं काही स्पष्ट होईल.’ राजेश तलवारबाबत मिळालेली माहिती आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेतून नेमकं काय झाले असावे, याचे चित्र मनात तयार झाले होते. साध्वीचं भस्म वगैरे काही झालं नसून साध्वी म्हणून असलेल्या कठोर निर्बंधामुळे वा प्रेमप्रकरणामुळे ती स्वतःहून पळून गेली असावी असा अंदाज मला आला होता. मात्र तोपर्यंत तरी उघडपणे हे बोलता येत नव्हतं. पोलीस अधिकारी आणि पत्रकार एका निष्कर्षापर्यंत पोहोचत असताना बाहेर भाविकांमध्ये मात्र पूर्वीचेच वातावरण होते. चमत्कार घडला, असेच त्यांच्या डोक्यात भिनले होते. त्यादिवशी मी बातमीचा फॉलोअप देताना राजेश तलवारवर एक चौकट छापून त्याच्यावर संशय व्यक्त केला. या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं, तर प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर पडेल, असेही मी लिहिले होते.
पोलीस युद्धस्तरावर कामाला लागले होते. मीडियात ज्यापद्धतीने बातम्या येत होत्या त्यामुळे ते अस्वस्थ होते. त्यांना तपासात बरेच धागेदोरे हाती लागले होते. दोन दिवस मीडियापासून सारेच केवळ अंदाज बांधत होते. प्रकरण संवदेनशील व एका प्रभावशाली समाजाच्या श्रद्धेशी निगडित असल्याने सारेच काळजी घेत होते. शेवटी तिसऱ्या दिवशी मंगळवारी संध्याकाळी पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद बोलावली. साध्वी सिद्धीश्री व राजेश तलवार हे सांगलीत असून अमरावती पोलीस त्यांना घेऊन अमरावतीसाठी निघाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. भस्म प्रकरणातील सस्पेन्स काही मिनिटात संपला. सारी कहाणी बाहेर आली. एका चातुर्मासादरम्यान राजेश तलवार आणि साध्वी सिद्धीश्रीची भेट झाली. तो तिच्या प्रेमात पडला. त्यामुळे सेवेकरी बनून साध्वी जिथे जिथे जाईल तेथे तो जायला लागला. काही दिवसात साध्वीही त्याच्या प्रेमात पडली. दोघांच्या मनात लग्न करण्याची इच्छा निर्माण झाली. मात्र साध्वीचं साध्वीपण त्यांच्या प्रेमात आड येत होतं.
जैन साधू व साध्वींसाठी अतिशय कठोर नियम आखून दिले असतात. अशा परिस्थितीत साध्वीच्या मनात प्रेमाचा विचार येणंही पाप मानलं जातं. मात्र जगातील कोणताही धर्म नैसर्गिक भावनांना आवर घालू शकत नाही. सिद्धीश्रीसाठी धमपिक्षा प्रेम महत्वाचं ठरलं. मात्र अजाणत्या वयात स्वीकारलेल्या साध्वीपणापासून सुटका कशी करून घ्यायची, हा तिच्यासमोर पेच होता. शेवटी दोन प्रेमवीरांनी डोक लढविलं. अमरावतीत ‘रहस्यमय भस्म प्रकरण’ उभं करण्याचं त्यांनी ठरविलं. (ही आयडिया एका हॉलिवूडच्या चित्रपटावरून सुचल्याचे पुढे तपासात त्यांनी सांगितले.) प्रकरण उघडकीस येईल तेव्हा समाजातील मंडळी बदनामीच्या भितीने याबाबत वाच्यता करणार नाही. मोजकी मंडळी सोडलीत तर कोणाला काहीही माहित होणार नाही , असा अंदाज त्यांनी बांधला होता .मात्र सकाळी साध्वीच्या खोलीत जेव्हा राख दिसली तेव्हा काही भाबड्या भक्तांनी जैन समाजाच्या पदाधिकाऱ्यांना याची माहिती देण्याअगोदर घटनेला चमत्काराचं स्वरूप दिलं होतं. त्यामुळे काही वेळातच प्रचंड गर्दी जमा झाली होती व त्याचा गवगवा झाला होता. सर्वांची मती गुंग करणाऱ्या या प्रकरणाची कहाणी थोडक्यात ही अशी होती.
या प्रकरणातील संपूर्ण सत्य जेव्हा बाहेर आलं तेव्हा स्थानिक जैन समाज पदाधिकाऱ्यांची परिस्थिती मोठी अवघड झाली होती. आपल्या धार्मिक भावनांशी झालेला खेळ पचविणे त्यांना अवघड जात होतं. जे भाविक भाबडेपणाने तीन दिवस पूजाअर्चा करीत होते, भजन करीत होते. (दुसऱ्या दिवशी या भाविकांनी कौंडण्यपूर येथे जावून अस्थिविसर्जनही केले होते.) त्यांना तर तोंड कुठे लपवावे याचा पेच पडला होता. चौथ्या दिवशी पोलीस साध्वी सिद्धीश्री उर्फ समता, राजेश तलवार याला घेऊन अमरावतीत पोहोचले. त्यांच्यासोबत सांगली जिल्हा काँग्रेसची पदाधिकारी असलेली राजेशची आईही होती. त्यांनी अतिशय ठामपणे आपल्या पोराची पाठराखण केली. ते दोघं एकमेकांवर प्रेम करतात. आपण त्यांचं लवकरचं लग्न लावून देऊ’, असे त्यांनी सांगितले. दरम्यान पोलिसांनी दोघांनाही बोलतं केलं. राजेशच्या बयाणातून कहाणी आणखी स्पष्ट झाली. भस्म नाट्याचा बनाव करण्यासाठी रॉकेल कुठून आणलं होतं? चटई अर्धवट जाळून खोलीत कशी आणली? हाड आणि राख स्थानिक हिंदू स्मशानभूमीतून कशी आणली? अशी सारी माहिती त्याने दिली.
पुढील चार-पाच दिवस मीडियात याविषयात रसभरीत माहिती येत होती. एक साध्वी प्रेमात पडून सनसनाटी नाट्य उभं करते, ही निश्चितच सनसनाटी बातमी होती. त्यामुळे मीडिया प्रत्येक अँगलने तपासणी करत होता. साध्वी होण्याची प्रक्रिया कशी असते? साधू व साध्वींना कुठकुठले नियम पाळावे लागतात, याविषयात धर्माचे नियम काय आहेत? याअगोदर जैन साधू व साध्वी पळून जाण्याच्या घटना कुठे घडल्यात, असं बरंच काही मीडियाने छापलं. टीव्हीवर त्याबाबत चर्चा झडल्या. ज्या दैनिकांनी सुरुवातीला या घटनेला चमत्काराचं स्वरूप दिलं होतं. ते लगेच फिरले. त्यांनी साध्वीची ही अनोखी प्रेमकहाणीही कॅश केली. पोलिसांनी या प्रकरणात रमेश तलवार व साध्वीविरूद्ध गुन्हे दाखल केले. दोघांनाही अटक झाली. मात्र जैन समाजातील पदाधिकाऱ्यांनी समाजाची बदनामी होते. त्यामुळे जास्त ताणू नका, अशी विनंती पोलिसांना केली. काही दिवसातच दोघांनाही जामीन मिळाला. ते लगेच सांगलीला रवाना झाले. लवकरच दोघांनी लग्न केल्याची बातमी आली. दोनेक महिन्यानंतर ते नवरा- बायको बनून अमरावतीत आले. आणखी काही महिन्यानंतर साध्वी एका सुरेख बाळाची आई झाल्याची बातमी आली. सांगलीत समताचा संसार सुखात सुरू आहे. आता हे प्रकरण सर्वांच्याच विस्मरणात गेलं आहे. मला मात्र या प्रकरणाचा कधीही विसर पडणार नाही.
(लेखक ‘मीडिया वॉच’ अनियतकालिक व वेब पोर्टलचे संपादक आहेत )
8888744796
मला आठवते ही बातमी….आणि तो गौपयस्फोट !
तेव्हा मी , लोकसत्ताच्या विदर्भ आवृत्तीचा निवासी संपादक होतो आणि या बातमीबाबत भूमिका घेतांना बरीच दमछाक झाली होती .
नेमकं लिहिलं आहेस .
-प्रब
सर, मन:पूर्वक आभार. तुमची दाद मिळाली म्हणजे भरून पावल्यासारखं होतं.
सर सही । लेखने के लिए भी हिम्मत चाहिए .
.
आपण त्या वेळी घेतलेली योग्य डोळस भूमिका आणि शब्दांकन अतिशय समर्पक.
संजय इंदूरकर