-डॉ मंजुषा वाठ
युगांपासून साचलेली परंपरांची दलदल
त्यात रुतलेले किड्यामुंग्यांसारखे आयुष्य
आमच्या काळ्याकभिन्न आयुष्यात
तू पेरत गेलीस हजारो प्रकाशकण
चूल आणि मूल यापलिकडील दाखवलस जग.
सत्यवानाच्या सावित्रीला पुजतो
खरं तर तुझ्या पूजनाचा सोहळा.
मोठा असायला हवा होता
अज्ञानरूपी यमाच्या तावडीतून सोडवलेस
सोप्पं नव्हतंच मुळी कुचक्या नजरा झेलून
स्वतःचं माणूसपण तेवत ठेवणं
खरं तर तू असू नये आमच्या साठी
कॅलेल्डर मधील फक्त एक तारीख
तू जीवनदायी आम्हास नव जीवन देणारी आई
तु क्रांतीज्योती तू धैर्याची मूर्ती
तुझ्या ऋणातून कशा होऊ आम्ही उतराई!
तू नसतीस तर कुठे असतो
नुसता विचारही अस्वस्थ करतो
हातात लेखणी घेऊन लढलीस
आमच्या वेदनेला नवा आयाम देण्यासाठी.
झुंजलीस, झगडलीस अखंड आयुष्यभर…
घेतला नाहीस श्वास निवांत मनाने,
तूच मोकळे केले शिक्षणाचे महाद्वार
माणूस म्हणून जगण्याचा दिला अधिकार
स्वतः तुडवून काटेरी वाट
मखमली राजरस्ता निर्माण केल्याबद्दल
तमाम स्त्रीवर्गातर्फे तुझे शतशः आभार
अजूनही बंधनं पुरती नाही सरली
कुटुंब मुले आज आणि पूर्वीही तिनेच जपली
नोकरीच्या ठाई वेगळ्या समस्या
विकृतीच्या विळख्यात कित्येक निर्भया
बरेचदा ठेचाळतो ,अडखळतो
परंतु परत उभे होतो तुला स्मरून
समस्यांचे हल्ली बदलले जरी रूप
प्रत्येकीला व्हावे लागेल सावित्री स्वरूप
व्हॅलेंटाईन डे, रोझ डे च्या तुलनेत
कित्येकीना ज्ञात ही नसेल
कदाचित तुझा जन्म दिवस
इतर कार्यक्रमापेक्षा हा दिवस
साजरा करण्यासाठी कमी पडतो आम्ही
पण ह्रदयी जपतो अपार सन्मान
आज जगतोय त्या प्रत्येक क्षणाकरिता
सावित्री तुला कोटी कोटी प्रणाम!
(कवयित्री शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती येथे अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहेत)
9423424710