गुडबाय… ‘ब्लॅकबेरी १०’

-श्रीरंग जोशी

३० जानेवारी २०१३: न्यूयॉर्क, टोरांटो, लंडन, पॅरिस, दुबई, जोहान्सबर्ग, जकार्ता व नवी दिल्ली येथे रिसर्च इन मोशन कंपनीच्या नव्या फोन ऑपरेटिंग सिस्टम ( ब्लॅकबेरी १०) व दोन नव्या फोन्सच्या लॉन्च इव्हेंटचा दिमाखदार सोहळा झाला होता. याच सोहळ्यात कंपनीने आपले नाव बदलून ‘ब्लॅकबेरी’ ठेवत असल्याचे जाहीर केले. साधारण २००० च्या दशकात साध्या फोन्सपासून वापरकर्त्यांना तुलनेत स्मार्ट फोन्सकडे वळवण्याची यशस्वी कामगिरी कंपनीने केली होती. फोनमधे ईमेलाची जोडणी व फिजिकल QWERTY कीबोर्ड अशा सुधारणा टप्प्याटप्प्याने करत कॉर्पोरेट क्षेत्रात कंपनीने उत्तम बस्तान बसवले. इतर फोन्सच्या तुलनेत माहितीच्या सुरक्षेच्या बाबतीत ब्लॅकबेरी फोन्स अधिक परिणामकारक होते. या सर्व काळात नोकिया कंपनी मोबाइल फोन्सच्या व्यावसायिक वापरकर्त्यांच्या संख्येच्या बाबतीत लक्षणीयरित्या पहिल्या क्रमांकावर होती. मायक्रोसॉफ्टही कॉर्पोरेट क्षेत्रातल्या फोन्सच्या बाजारात बस्तान बसवण्यासाठी हातपाय मारत होती. पण त्यांना फारसे यश मिळत नव्हते.

२००७ मधे अ‍ॅपलने आयफोन बाजारात आणला. पुढील दोन वर्षात अमेरिका व काही देशांत या उत्पादनाने वेगवान घोडदौड केली. याच काळात गूगलने विकत घेऊन विकसीत केलेल्या अ‍ॅन्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारे फोन्सही जम बसवू लागले होते. या फोन्समधल्या आधुनिक सुविधा व नावीन्यपूर्ण कल्पना पाहून ब्लॅकबेरी फोन्स वापरणारे त्यांच्याकडे वळू लागले. रिसर्च इन मोशन आता फोनवरील अनेक सुविधांच्या बाबतीत कॅच-अप गेम खेळू लागली. जसे टच स्क्रीन कंट्रोल इत्यादी. एवढे करूनही सोडून जाणार्‍या वापरकर्त्यांचे प्रमाण कमी होईना.

यावर जालीम उपाय म्हणून त्यांनी २०१० साली QNX ऑपरेटिंग सिस्टिमच्या कंपनीला विकत घेतले. QNX वर आधारीत नावीन्यपूर्ण फोन ऑपरेटिंग सिस्टिम बनवायला कंपनीने सुरुवात केली. मल्टी-टच टच स्क्रीन, जेस्चर कंट्रोल्स, सहजपणे करता येणारे मल्टी-टास्कींग तसेच हे सर्व उपलब्ध करून देताना माहितीच्या सुरक्षेची उत्तम यंत्रणा. या ओएससाठी पहिले ब्लॅकबेरी एक्स (रोमन १०) असे नाव ठरले होते. प्रत्यक्षात ‘ब्लॅकबेरी १०’ हेच नाव वापरले गेले. वर उल्लेखलेल्या सोहळ्यानंतर नवे फोन्स प्रत्यक्ष ग्राहकांना मिळायला २०१३ चा मार्च महिना उजाडला.

मी स्वतः स्मार्टफोन वापरायला खूप उशिरा सुरुवात केली. सप्टेंबर २०११ मधे मी पहिला स्मार्टफोन घेतला ब्लॅकबेरी टॉर्च ९८१०. जेव्हा नवा झेड १० माझ्या हातात पडला तेव्हा झालेला आनंद अवर्णनीय होता. आयुष्यात प्रथमच कुठलेही मोठे उत्पादन मी बाजारात आले त्याच दिवशी विकत घेतले होते.

तेव्हापासून पुढची पावणेआठ वर्षे मी हा व ब्लॅकबेरी लीप हे दोन फोन वापरले. आंतरजालाचा अतिरेकी वापर करणार्‍या माझ्यासारख्या वापरकर्त्यासाठी ब्लॅकबेरी हबसारख्या सोयी असणारी ओएस फारच उपयुक्त होती. ब्लॅकबेरी १०चा व्हर्चुअल कीबोर्ड आपल्या वापरानुसार शब्द लक्षात ठेवून ऑटो कम्प्लिटचे पर्याय सुचवित असे. मराठी आंतरजालावर मी फोनवरून टंकत असणारे मराठी शब्द देवनागरी लिपीत मला सहजपणे मिळत असत. तसेच कीबोर्डच्या दोन अक्षर रेषांदरम्यानच ऑटो कम्प्लिटचे पर्याय मिळत असल्याने टंकणारे बोट न उचलता केवळ वरच्या दिशेने फ्लिक करून वेगवान टंकन करता येत असे. या इतका सोयीस्कर व्हर्चुअल कीबोर्ड नंतर मला आय ओएसवर मिळू शकला नाही.

माझ्या ब्लॅकबेरी झेड १० व लीप फोन्सचे फोटो

ब्लॅकबेरी १० फोन्समधे स्क्रीनच्या वर एक लहानसा एलइडी दिवा होता. आलेल्या नोटिफिकेशननुसार त्यात सात पैकी सेट केलेला नेमका रंग दिसत असे. उदा. नव्या ईमेलासाठी मी तांबडा, नव्या एसएमएससाठी हिरवा, मेसेंजरच्या संदेशासाठी आकाशी, कॅलेंडर इव्हेंट रिमाइंडरसाठी पांढरा असे रंग सेट केले होते. फोनला हात न लावताही आठ-दहा फुटांवरून कुठल्या प्रकारचे संदेश आपल्याला मिळाले आहेत, हे कळत असे. अलार्म लावण्यासाठी अ‍ॅनालॉग घड्याळाभोवती अलार्मच्या वेळेचा डॉट सरकवून अलार्मची वेळ सेट करता येत असे. तास व मिनिट पाठोपाठ सेट करण्यापेक्षा हे खूप सोपे होते.

मुख्य म्हणजे यासारख्या अनेक सोयीसुविधा ऑपरेटिंग सिस्टिमच्या कोअर फंक्शनॅलिटीतच होत्या. प्रत्येक गोष्टीसाठी थर्ड पार्टी अ‍ॅपवर विसंबण्याची गरज नसायची. ब्लॅकबेरी कंपनीच्या व ब्लॅकबेरी फोन्स आवडणार्‍यांच्या दुर्दैवाने ब्लॅकबेरी १० ओएस बाजारात यशस्वी होऊ शकली नाही.

माझ्या अनुमानाप्रमाणे ही ओएस व संबंधीत फोन्स दोन वर्षे आधीच बाजारात आले असते तर कदाचित अजूनही मुख्य प्रवाहात आपले अस्तित्व राखून असते. पहिल्या वर्षी अनेक दशलक्ष फोन्स खपले तरी नंतर अत्यंत वेगाने घसरण होऊन कदाचित काही हजार (किंवा लक्ष) वापरकर्ते उरले. पुढच्या कुठल्याच फोनला पहिल्या दोन एवढा प्रतिसाद मिळू शकला नाही.

तेरा महिन्यांपूर्वीच मी ब्लॅकबेरी १० वर चालणारा फोन वापरणे थांबवले. आजही अनेक कामे करताना ब्लॅकबेरी १० च्या सुटसुटीतपणाची आठवण येते. आज ब्लॅकबेरी १० व त्या पूर्वीच्या ब्लॅकबेरी ७ ओएसच शेवटचा दिवस आहे. यानंतर ब्लॅकबेरी कंपनीद्वारे या उपकरणांसाठी कुठलाही सपोर्ट मिळणार नाही व आंतरजालाद्वारे मिळणार्‍या अनेक सुविधाही चालणार नाहीत. जीवनातल्या अनेक चांगल्या गोष्टींचा अंत एक दिवस येतोच. त्याविषयी निराश होण्याऐवजी अनेक वर्षे मिळालेल्या समाधानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा लेखनप्रपंच.

(लेखक अमेरिकेत Cognizant या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत)

[email protected]

Previous articleसावित्री तू होतीस म्हणून…
Next articleजगातील सर्वात शक्तिशाली दुर्बिण
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.