जगातील सर्वात शक्तिशाली दुर्बिण

-अमित जोशी

जगातली शक्तीशाली अवकाश दुर्बिण ‘जेम्स वेब टेलिस्कोप’ नुकतीच प्रक्षेपित करण्यात आली. अमेरिका , युरोपियन स्पेस एजन्सी आणि कॅनडा स्पेस एजन्सी या तीन अवकाश संस्थांनी आणि त्यांच्याशी संबंधित इतर अवकाश संशोधन संस्थांनी या दुर्बिणीची निर्मिती केली आहे.

नासाचे १९६१ – १९६८ या काळातील प्रशासक ( प्रमुख ) असलेल्या जेम्स वेब ( James Wbb ) यांचे नाव या दुर्बिणीला देण्यात आले आहे. अमेरिकेचा चांद्र विजय प्रत्यक्षात आणण्याची पायभरणी जेम्स वेब यांच्या नेतृत्वाखाली झाली होती.

ही दुर्बिण नेमकी कशी आहे ?

दुर्बिणीच्या निर्मितीच्या हालचालीला २००५ मध्ये सुरुवात झाली मात्र विविध कारणांनी या दुर्बिणीच्या निर्मितीला उशीर होत गेला. करोना काळामुळे काही महिने या दुर्बिणीचे काम ठप्प झाले होते. या दुर्बिणीच्या निर्मितीला १० अब्ज डॉलर्सपर्यंत खर्च आलेला आहे.

एका टेनिस कोर्टच्या पसाऱ्याएवढा या दुर्बिणीता विस्तार असून १८ छोट्या षटकोनी आरशांपासून बनवलेली ६.५ मीटर व्यासाची, सोन्याचा मुलामा असलेली बेरेलियम धातूने तयार केलेली भव्य लेन्स या दुर्बिणीत असणार आहे. मुख्यतः विविध इन्फ्रोरेड तरंगलांबीच्या माध्यमातून ही अवकाश दुर्बिण विश्वाचा वेध घेणार आहे. याचबरोबर व्हीजीबल ( दृश्य प्रकाश ) आणि अल्ट्राव्हालेट अशा तरंग लांबीच्या माध्यमातून अवकाश न्याहाळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे उष्णतेपासून संरक्षण करणारे – उष्णतेला थोपवून धरणारे विशिष्ट धातूंचे पाच पातळ पडदे हे या दुर्बिणीच्या खाली असणार आहेत. यामुळे या दुर्बीणचा पसारा वाढलेला आहे.

शास्त्रीय भाषेत Lagrange points L 2 च्या ठिकाणी ही अवकाश दुर्बिण अवकाशात पृथ्वीसोबत भ्रमण करणार आहे. म्हणजेच सूर्य – पृथ्वी यांच्या सरळ रेषेत पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर हे दुर्बिण असणार आहे.

ही दुर्बिण शक्तिशाली का आहे ?

हे सांगण्याच्या आधी काही माहिती समजून घेऊ. सूर्याचा प्रकाश हा सूर्यापासून निघाल्यानंतर सुमारे १५ कोटी किलोमीटर प्रवास करत ८ मिनिटात पृथ्वीवर पोहचतो. म्हणजेच सूर्य हा आपल्याला प्रत्यक्षात ८ मिनिटांनंतर दिसतो, जाणवतो. सूर्य हा आपल्यासाठी ८ मिनिटे जुना असतो. आकाशातील ताऱ्यांचे हे असंच आहे. हे तारे काही प्रकाशवर्ष ( अवकाशातील अंतर मोजण्याचे एकक ) अंतरावर असतात. म्हणजेच अवकाशातील एखादा तारा, ताऱ्याचे अवशेष, आकाशगंगा ह्या प्रत्यक्षात आपल्याला अनेक वर्षांनी दिसत असतात, जेव्हा ते दिसतात तेव्हा ते प्रत्यक्षात तिथे अस्तित्वात असतीलच असं नाही.

जेम्स वेब टेलिस्कोप ही अवकाशात आणखी दूरवर बघू शकणार आहे. म्हणजेच जेवढी दूरवर बघेल तेवढा तो प्रकाश तो जुना असेल. म्हणजेच ती भूतकाळात डोकवणार आहे. भूतकाळात किती मागे ? तर ही अवकाश दुर्बिण १३. ४ अब्ज प्रकाशवर्षं अंतरावरचे बघू शकणार आहे. असं समजलं जाते की विश्वाची निर्मिती ही १३.८ अब्ज वर्षांपूर्वी झाली. थोडक्यात विश्वनिर्मितीच्या पहिल्या टप्प्यात विश्वाची जी अवस्था होती ती समजण्यास जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपमुळे मदत होणार आहे.

ही टेलिस्कोप एवढी संवेदनशील आहे की चंद्राएवढ्या अंतरावरून ती मधमाशीच्या उष्णतेचा मागोवाही ( heat signature ) नोंदवू शकते.

ही अवकाश दुर्बिण ‘हबल’ दुर्बिणीने केलेलं काम आणखी पुढे नेणार आहे. फक्त हबलची जशी अवकाशातच स्पेस शटलच्या सहाय्याने अनेकदा दुरुस्ती करण्यात आली होती, तिच्यामधील लेन्स – यंत्रणा या बदलण्यात आल्या होत्या तशी दुरुस्ती ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’ दुर्बिणीच्या बाबतीत शक्य नाही.

ही दुर्बिण अवकाशाचे कोणते नवे रहस्य उलगडवून दाखवणार याची आता उत्सुकता आहे.

याबद्दलची अधिक आणि लक्षवेधी माहिती NASA च्या पुढील लिंकमधूनही मिळेल

https://www.youtube.com/watch?v=v6ihVeEoUdo

(लेखक ‘झी २४ तास’ वृत्त वाहिनीत कार्यरत आहेत)

9833224281

Previous articleगुडबाय… ‘ब्लॅकबेरी १०’
Next articleओबीसींमध्ये ‘गर्व से कहो … ‘ ची लागण
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.