–नीलांबरी जोशी
“Every person has their own melody,” “if you just take the time to listen to it.” “माय फादर्स व्हायोलिन” या तुर्कस्तानी चित्रपटातला हा संवाद ऐकल्यावर साहिरचे “तू एक साज है..” हेच शब्द आठवले.
अशा तरल, भावुक शब्दांची, घटनांची आणि क्षणांची आठवण करुन देणारा हा एक हळवा चित्रपट आहे. दारिद्र्य, नात्यांमधली कासावीस, लहान मुलांचा छळ आणि त्याचे नंतरच्या आयुष्यातले परिणाम अशा अनेक संकल्पनांना स्पर्श करत जाणाऱ्या या चित्रपटात दोन गोष्टी जास्त ठळकपणे जाणवतात.
**********
त्यातली पहिली गोष्ट म्हणजे नार्सिसिझम..
रस्त्यावर व्हायोलिन, फिडल, क्लॅरिनेट, ड्रम अशी वाद्यं वाजवून उदरनिर्वाह करणाऱ्या एका भटक्या वादकांमधल्या व्हायोलिनवादकाची चिमुरडी आणि गोंडस मुलगी आणि तिचा जगप्रसिध्द व्हायोलिनवादक असलेला काका.. यांच्यातली ही कथा.
तो जगप्रसिध्द व्हायोलिनवादक नार्सिसिस्टीक आहे.. स्वत:वर अत्यंत प्रेम करणाऱ्या त्याला स्वत:शिवाय काहीच दिसत नाही. दुसऱ्या कुणालाही स्टेजवर महत्व दिलेलं त्याला चालत नाही. तसं वर्तमानपत्रात छापून आल्यावर “असं लिहिणारे लोक माझ्यावर जळतात” असं तो बिनदिक्कतपणे म्हणतो.
“कुटुंब वगैरे सांभाळायचं असेल तर तू गेलेली बरी…” असं आपल्या एका सहाय्यक वादकाला सांगणारा तो पाहून “द डेव्हिल वेअर्स प्राडा”मधली मेरिल स्ट्रीप आठवते.
काळाच्या ओघात अनेक वर्षांनी भेटलेला सख्खा भाऊ “आपण दोघंही musicians झालो” असं म्हणतो तेव्हा आढ्यतेखोरपणे तो भावाला सुनावतो.. “मला Violin VIRTUOUSO मानतात.. ”
(स्वत:च्या कामापुढे दुसऱ्यांना तुच्छ लेखणं, “इस जमी से आसमां तक मैं ही मैं हूँ” असा अॅटिट्यूड बाळगणं, आपल्यावर टीका करणारे आपल्यावर जळतात असं सरसकट मानणं.. ही सगळी नार्सिसिस्टीक पर्सनॅलिटीची लक्षणं आहेत.)
**********
यातल्या लहान मुलीचं (Gulizar Nisa Uray) काम सुरेख आहे. ती धीट, स्बाभिमानी आणि लहान वयात जग ओळखायला शिकलेली आहे. आईवडील नसल्यामुळे, लहान वयातच तिला आलेला समजूतदारपणा पाहून कुठेतरी द. भा. धामणस्करांची ही कविता आठवली.
पोरवयात उमगले तिला प्राक्तनाचे संदर्भ
आपल्या जन्मजात दारिद्र्याइतके स्पष्ट,
विरून फाटलेल्या अंगावरील कपड्यांइतके ढळढळीत.
तेव्हा तिने मेमसाब बरोबर प्रवास करताना
नाकारला हट्ट खिडकीच्या सीटचा
पोरक्या पोरवयासह पळणाय्रा झाडांसकट;
भवतीच्या समवयीन भाग्यवंतांचे
बोबडे कौतुक तिने नाकारले;
नाकारला स्पर्श वत्सल, हळवा,
अहंकार जागवणारा….
तिने फ़क्त ओठ घट्ट मिटले,
डोळे स्थिर समोर….
आणि समजूतदारपणे
मेमसाबची बॅग सांभाळली.
त्यावेळी मी हादरलो माझ्या वयासकट….
प्रिय आत्मन,
इतक्या कोवळ्या वयात,
तू
तुझी जागा ओळखायला नको होतीस….
**********
चित्रपटातली मोठी उणिव म्हणजे एक तर तो फार predictable आहे आणि अनेक व्यक्तिरेखा, संकल्पना, घटना यांना न्यायच मिळालेला नाही.. लहान मुलांचा छळ आणि त्याचे मानसिक परिणाम, तुर्कस्तानात रस्त्यावर वाद्यं वाजवायला असलेली बंदी आणि वादकांचा पाठलाग करणारे पोलिस, आर्थिक-सामाजिक विषमता, मूल हवं असून होत नसेल तर दांपत्यांमध्ये येणारे तणाव, दोन वादकांमधली स्पर्धा, संगीतात भावना नसणं म्हणजे काय?.. अशा अनेक संकल्पनांना चित्रपट फक्त स्पर्श करतो. संवादही काही वेळा अचानक येतात.. असो..!
************
चित्रपटातली महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे संगीत. मुळात यातल्या नावातच संगीत आहे. तुर्कस्तानातल्या पारंपारिक संगीतापासून स्टेजवरच्या नेटक्या परफॉर्मन्सपर्यंत यात संगीत सतत ऐकू येतं. विवाल्डीच्या काही रचना यात वापरल्या आहेत. व्हायोलिन हे वाद्य वेगवेगळ्या प्रकारच्या संगीतात कसं वेगवेगळं ऐकू येतं ते जाणून घेण्यासाठी यातलं वादन ऐकायला हवं.. !
मैं यह सोचकर उसके दरसे उठा था, बैय्या ना धरो.. अशा गाण्यांमध्ये खास हिंदी फिल्मसंगीतातलं व्हायोलिन आहे.. “माय फादर्स व्हायोलिन”वरुन “कोल्या” नावाचा एक झेक चित्रपट आठवतो. त्यात चेलो वाजवनारयाला एका वादकाचं एका लहान मुलाशी कसं नातं जुळत जातं ते उत्तमरीत्या दाखवलं आहे.
********
चित्रपटाचा नायक अखेरीस “Family is the most beautiful composition that is made up of different notes,”.. हे मान्य करतो.. ते किती खरं आहे त्याची प्रचीती कोरोनाकाळात विशेषत: येते आहेच..
1. https://www.youtube.com/watch?v=TJ7XTi9S_Ag…
2. https://www.youtube.com/results…
3. https://www.youtube.com/watch?v=6ZOZwUQKu3E…
(नीलांबरी जोशी ‘कार्पोरेट कल्लोळ’ , ‘झपूर्झा’, ‘जिथे मुलांना पंख फुटतात’ आदी गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका आहेत)
[email protected]
………………………………………………………………………………………….