Why Gandhi Still Matters

-राधाकृष्ण मुळी

महात्मा गांधींचे नातू आणि ख्यातनाम लेखक राजमोहन गांधी यांच्या एका छोटेखानी पुस्तकाचे शिर्षकच आजच्या लेखाला दिलेले आहे.

महात्माजींच्या जन्माला दीडशे वर्षे होऊन गेली आणि त्यांच्या हत्येला पाऊणशे वर्षे होत आली तरी गांधीजींवर नवनवीन पुस्तकं प्रकाशित होत असतात. तथापि कविवर्य कुसुमाग्रजांनी त्यांच्या ‘अखेरकमाई ‘ या कवितेत गांधीजींच्या पाठीशी फक्त सरकारी भिंती असल्याचे जे विदारक सत्य सांगून ठेवले , ते खरेच असले पाहिजे असाच अनुभव हल्ली येत असतो. अभ्यास , पात्रता , सभ्यता , सहिष्णुता , शहाणपण , विवेक , बुद्धिमत्ता यातील एकही गुण ज्यांच्यापाशी असत नाही अशी माणसं गांधीजींवर घृणास्पद टीका करतात. त्यांच्या विधानांचा , भूमिकांचा विपर्यास करून टिंगलटवाळी करताना दिसतात….!

गांधीजींचे सारे आयुष्य निर्दोष होते , त्यांच्या व्यक्तिमत्वात काहीच उणीवा नव्हत्या , त्यांची सगळीच मांडणी इतिहास आणि वर्तमानाच्या निर्दोष आकलनावर उभी होती असे वस्तुनिष्ठ अभ्यासक म्हणत नाहीत.पण त्यांच्या आयुष्यात , त्यांच्या चळवळीत , त्यांच्या आंदोलनात , त्यांच्या मांडणीत , त्यांच्या तत्वज्ञानात असे काही तरी आहे , ज्याचा आजही आपल्या वैयक्तिक आणि सामुहिक जगण्यावर प्रभाव पडतो.आपल्या मनाला आणि समाजमनाला त्याचा कधी स्पर्श होतो.या प्रभावाला /स्पर्शाला इतिहास आणि भूगोलाची सीमा नसल्याचाही अनुभव येतो.असे का घडते ?

राजमोहन गांधी यांनी या पुस्तकात गांधीजींचा प्रभाव आजही जाणवतो का आणि जाणवत असेल तर तो का किंवा गांधीजींनी सांगितलेल्या , आचरणात आणलेल्या कोणत्या बाबी आजही कालसुसंगत आहेत याची यादी दिलेली नाही.पुस्तकातील त्यांचे विवेचन समजावून घेत वाचकानेच काय तो निष्कर्ष काढायला हवा.अशा निष्कर्षासाठी आवश्यक असलेला सप्रमाण तपशील नेमकेपणाने त्यांनी मांडला आहे.या संदर्भसंपन्न पुस्तकात एकूण ९ प्रकरणे आहेत.त्यातील आठ प्रकरणे ही लेखकाने २०१६ साली अमेरिकेत मिशिगन विद्यापीठातील जेम्स मेडिसन कॉलेजमध्ये दिलेली भाषणं आहेत.नववे प्रकरण हे ‘ हिंद स्वराज्य ‘ च्या शताब्दी निमित्ताने लिहिलेला निबंध आहे.

सरहद्द गांधी ( १८९० – १९८८) , नेल्सन मंडेला (१९१८ – २०१३ ) , मार्टिन ल्युथर किंग (१९२९- १९६८ ), दलाई लामा (१९३५ ) आणि अँग स्यू की ( १९४५ ) या पाच जणांचा राजमोहन यांनी एका प्रकरणात उल्लेख केला आहे. सरहद्द गांधी जेथे आणि ज्या समाजात जन्मले , तेथील मुल हाती शस्त्र घेतच जन्माला येते असे म्हटले जात होते.मंडेला यांची २७ वर्षे तुरुंगात गेली.वंशभेदाविरुद्ध लढणाऱ्या मार्टिन यांनी अक्षरशः प्राणाचे मोल दिले.दलाई लामा मायभूमीत राहू शकले नाहीत आणि अँग यांचा संघर्ष संपता संपत नाहीच.गांधींना भले नोबेल मिळाले नसेल.या पाचांपैकी सरहद्द गांधी वगळता इतर चार जणांना ते मिळाले , हे लक्षात घेण्यासारखे आहे. सरहद्द गांधी यांनी म्हटले होते की त्यांच्या प्रांतात ब्रिटिशांची जबर दहशत होती आणि एखाद्याने हाती शस्त्र घेत एखाद्या इंग्रजाला लक्ष्य केले तर अनेकांना इंग्रजांच्या रोषाला तोंड द्यावे लागत असे.पुढे मात्र अहिंसेचे पालन करणाऱ्या पठाणांच्या संघटनेला ब्रिटीश घाबरू लागले.गोऱ्यांच्या वंशभेदाला विरोध करत तुरुंगवास पत्करणारे डॉ.मंडेला कोणत्याही गोऱ्याला अगदी राष्ट्राध्यक्ष क्लर्क यांनाही शत्रूस्थानी मानत नव्हते.मार्टीन ल्युथर यांनी गांधीजींवरील एक भाषण ऐकले आणि नंतर गांधीजींवरील पुस्तके वाचून त्यांचे जीवन समजावून घेतले.गांधींनी अन्यायाचा प्रतिकार करण्याचा व्यवहार्य आणि नैतिक मार्ग दाखवला असे त्यांचे म्हणणे. स्यू की यांनी गांधीजींचे फार अर्थपूर्ण वाक्य नमूद केलेले आहे: Real Swaraj will come not by acquisition of authority by a few but by the acquisition of the capacity by all to resist authority when it is abused…

विसाव्या शतकात आशिया, आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील ज्या देशांत स्वातंत्र्यलढे झाले , त्या देशांपैकी फक्त भारतच असा देश आहे की जेथे स्वातंत्र्य लढ्याशी ज्याचे नाव कायम जोडले गेले , तो नेता ( अर्थात गांधीजी ) सत्तास्थानी गेला नाही.(३१ साली पत्रकारांनी त्यांना पंतप्रधानपदाबद्दल विचारले होते तेव्हा त्यांनी नकार देताना ते पद तरुण मनाच्या आणि सक्षम हृदयाच्या माणसासाठी आहे असे उत्तर दिले होते .) गांधीजींची अहिंसक चळवळ आणि त्यांनी स्वतःला सत्तेपासून दूर ठेवणे यामुळे देशात लोकशाही व्यवस्था आकाराला येण्यास मदत झाली असा लेखकाचा अभिप्राय आहे.

१८५७ चे बंड मोडून काढण्यात ब्रिटिशांना यश आले. त्यावर भाष्य करताना एका ब्रिटिश लेखकाने मुस्लिमांच्या मनात हिंदू राजवटीबद्दल असणारी भीती , संस्थानिकांची त्यांचीत्यांची संस्थाने राखण्याची भूमिका आणि लक्षावधी खेड्यात विखुरलेली, केवळ शेतीवर अवलंबून असलेली तसेच वर्तमानाशी फार देणेघेणे नसलेली लोकसंख्या यामुळे येथे राष्ट्रवादी चळवळ आकाराला येणे कठीण आहे , असे म्हटले होते.त्याचा उल्लेख करून राजमोहन यांनी लिहिले आहे की स्वराज्य , हिंदू – मुस्लिम सलोखा आणि अस्पृश्यता निर्मूलन या बाबी गांधीजींनी अभिन्न मानल्या.त्याला स्वावलंबन ( चरखा ) आणि स्वच्छता ( झाडू ) याची जोड दिली.चरख्याने ग्राहक हा उत्पादक झाला.त्याने सामाजिक भेदभाव संपवण्यात मदत केली.चरखा आणि झाडू यांनी जणू पारंपरिक श्रमविभागणी संपवली.गांधीजींनी अशाप्रकारे राजकीय , सामाजिक आणि आर्थिक विचारांची सांगड घातली होती. त्यांचे घड्याळ तर प्रसिद्धच होते.काळ अमर आणि अनंत आहे अशी श्रद्धा असलेल्या समाजाला त्यांनी वेळेचा हिशोब मांडणारा वक्तशीरपणा शिकवला !

१९१७ ते १९४२ दरम्यानच्या विविध सत्याग्रहांचा उल्लेख करून लेखकाने म्हटले आहे की एक खिलाफत वगळता अन्य कोणत्याही सत्याग्रहाचा धर्माशी संबंध नव्हता. अहिंसा आणि सत्याग्रह या बाबी परस्परांपासून वेगळ्या काढता येत नाहीत हे महात्माजींनी सुरुवातीपासून सांगितले.भारतीय परंपरेत ( विशेषतः आहारविहाराबाबतीत )समाविष्ट असलेल्या अहिंसेला गांधीजींनी जणू शस्त्राचे रूप दिले.त्यामुळे त्यांच्या चळवळीला नैतिक परिमाण लाभले आणि त्यात महिलांसह सर्वांना सहभागी होता आले.जालियनवाला बागेतील हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर अमृतसर येथील अधिवेशनात गांधीजींनी घेतलेली भूमिका आणि तिचा परिणाम याचा लेखकाने उल्लेख केला असून तो लक्षात घेण्यासारखा आहे.डिसेंबर १९१९ मध्ये अमृतसरला भरलेल्या त्या अधिवेशनात मांडण्यासाठी गांधीजींनी एक ठराव तयार केला. त्यात त्या हत्याकांडाचा धिक्कार तर होताच पण त्या हत्याकांडापूर्वी पंजाबातील हिंसाचारात पाच ब्रिटिश युवक मारले गेले आणि एका युवतीवर हल्ला झाला होता त्याचाही निषेध करण्यात आला. हा ठराव बेझंटबाईंनी (त्या भारतीय नसल्याने) तयार केला असावा अशी अनेकांची धारणा झाली होती. असा ठराव एक भारतीय तर लिहूच शकत नाही अशी एका प्रतिनधीची प्रतिक्रिया होती. पहिल्या दिवशी या ठरावातील जालियनवाला हत्याकांडाचा धिक्कार करणारा भाग मान्य झाला पण तो हिंसाचाराचा निषेधाचा भाग मंजूर झाला नाही.दुसऱ्या दिवशी अध्यक्षांनी सांगितले की मूळ ठरावाबाबत गांधीजी आग्रही आहेत. सुरुवातीला अध्यक्षांच्या म्हणण्यास अनेकांनी विरोध केला.आक्षेप घेतला.शेवटी गांधीजींना पुन्हा तो मूळ ठराव मांडता आला.त्यांची प्रकृती बरी नव्हती.ते बसून बोलले.हा ठराव भारतीय आईच्या पोटी जन्म घेतलेला माणूस लिहू शकत नाही या टीकेचा उल्लेख करीत गांधीजी म्हणाले की एक भारतीयच असा ठराव लिहू शकतो असे आपले पूर्ण विचारांती मत झाले.या ठरावावर गांधीजी बोलले आणि मग तो मूळ रूपात मान्य झाला.गांधीजींची अहिंसेबाबतची भूमिका अधोरेखित करणारा हा प्रसंग आहे. तरुण वयातील के.एम.मुन्शी या अधिवेशनाला हजर होते . त्यांनी याप्रसंगाचे वर्णन करून गांधीजींच्या भाषणानंतर we were at his feet असे म्हटले! आपला विरोध साम्राज्यसत्तेला आहे.सारेच ब्रिटिश आपले शत्रू नाहीत ही गांधीजींची भूमिका होती. अहिंसा आणि सत्याग्रह या तत्वाचा जन्म काही द्वेषभावनेतून झालेला नव्हता. ‘युद्ध तुझे निवैर परंतु जुलूमाच्या प्रतिकारापूरते ‘ हे गांधीजींच्याबाबतीत खरेच होते. त्यांना अर्धनग्न फकीर म्हणणाऱ्या आणि साम्राज्यवादी अहंकाराचे प्रतीक असलेल्या विन्स्टन चर्चिल यांचे युद्धानंतर गांधीजींनी अभिनंदन केले होते.

अहिंसा आणि चरखा या बाबी आपण ‘ शोधलेल्या ‘ नाहीत हे गांधीजी आवर्जून सांगत असत.आपण अहिंसा कस्तुरबांकडून शिकलो हे त्यांनी सरहद्द प्रांतात सांगितले. गांधीजींच्या अहिंसक सत्याग्रहाच्या साधनाने सत्याग्रहींना आत्मप्रतिष्ठा दिली. आपण साम्राज्यसत्तेच्या दारातील याचक नसून त्या सत्तेविरुद्धचे रास्त आंदोलक आहोत अशी भावना त्यांच्या मनात आकाराला आली.दांडी यात्रेचे पडसाद ब्रिटीश पार्लमेंटमध्ये उमटले.तेव्हा तर चर्चिल म्हणाले: ब्रिटिशांनी भारतीय भूमीवर पाय ठेवल्यापासून असा अपमान आणि प्रतिकार पाहण्याची वेळ आली नव्हती ! यातील अपमान हा गांधीजींचा हेतू नव्हता मात्र शरणागती न पत्करता शांततापूर्ण प्रतिकार ही त्यांची शिकवण होती.लेखकाने एकेठिकाणी म्हटले आहे की कोणत्याही सत्तेसमोर शरणागती पत्करण्यास कधीही तयार नसणारे गांधीजी परमेश्वर किंवा अंतरात्मा यांच्याबाबतीत शरणभाव बाळगत होते.पण त्यांची धर्म किंवा परमेश्वराची कल्पनाही पारंपरिक नव्हती. ‘ राम ‘ त्यांना प्रिय.त्यांचा राम जन्ममरणातीत होता. परमेश्वर हे सत्य आहे असे म्हणणारे गांधीजी सत्य हाच परमेश्वर म्हणू लागले.धर्माबद्दलची त्यांची धारणा नैतिकतेशी निगडीत होते. त्यात विवेकभाव होता.त्यामुळे एकीकडे ते देवळांचे दरवाजे सर्वांसाठीच उघडे असले पाहिजेत असे बजावत असले तरी स्वतः दररोज मंदिरात वगैरे जात नव्हते आणि कोणती मूर्ती / प्रतिमा पूजेसाठी जवळ बाळगत नव्हते.त्यांच्या धर्मभावनेत द्वेषाला किंवा वैरभावाला कधीही जागा नव्हती.रोजच्या सायंप्रार्थनेत सर्वांना स्थान होते.ते नौखालीत जातीय वणवा शांत करण्यासाठी पायपीट करत होते तेव्हा अमेरिकेत एका विद्यापीठात डीन असणारे विल्यम स्टुअर्ट नेल्सन तेथे गेले होते.गांधीजींनी त्यांना ख्रिश्चन परंपरेतील प्रार्थनागीत म्हणण्यास सांगितले.त्यांनी ‘ O God Our Help in Ages Past..’ हे त्या परंपरेतील पद म्हटले.समोरच्या श्रोत्यांसाठी महात्माजींनी त्याचा अनुवाद केला.त्या श्रोत्यांत मुस्लिमांची संख्या अधिक होती.

गांधीजी आणि डॉ.आंबेडकरांवर पुस्तकात एक प्रकरण आहे.त्यात अर्थात पुणे कराराचा उल्लेख आहेच.त्या करारातील तत्व पुढे राज्यघटनेत समाविष्ट झाले याकडे लेखकाने लक्ष वेधले आहे.काँग्रेसच्या कराची अधिवेशनात ( १९३१ : अध्यक्ष : सरदार वल्लभभाई पटेल ) मुलभूत अधिकारांचा ठराव मंजूर करण्यात आला .या ठरावात स्वतंत्र भारतात अस्पृश्यतेला स्थान नसेल आणि सर्वांना समान अधिकार असतील असे म्हटले होते.हा ठराव गांधी – नेहरूंनी लिहिला होता. गांधीजींनी अस्पृश्यता निर्मूलनाचा आग्रह धरला होता आणि ते याबाबतीत जाणीवपूर्वक बोलत आणि कृती करीत होते.

फाळणीचे परिणाम आणि महात्माजींच्या शेवटचे दिवस ही दोन प्रकरण वाचली म्हणजे हिंदू – मुस्लिम प्रश्न आणि फाळणीतील गुंतागुंत लक्षात येण्यास मदत होते. यात गांधीजींची भूमिका आदर्शवादी , त्यांच्या ‘ आतल्या आवाजाशी ‘ प्रामाणिक राहणारी होती. गांधीजींनी शेवटच्या दिवसात केलेली पायपीट कोणत्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारी आहे.

पुस्तकातील शेवटचे प्रकरण ‘ हिंद स्वराज्य ‘ या गांधीजींच्या पुस्तकावर आहे..त्यातील गांधीजींची मतं आधुनिकीकरणाला विरोध करणारी आहेत असा अनेकांचा आक्षेप होता आणि आहे.लेखकाचे म्हणणे असे आहे की गांधीजींचा साम्राज्य सत्तेला , हिंसाचाराला आणि सामर्थ्याच्या जोरावर वर्चस्व गाजवण्याच्या प्रवृत्तीला विरोध होता आणि यादृष्टीने ‘ हिंद स्वराज ‘ मधील विवेचनाकडे पाहिले पाहिजे.

गांधीजींचे भारतीय राजकारणात पदार्पण झाल्यावर झालेले बदल परिणामकारक होते.उदाहरणार्थ खादी वापरण्याचा आग्रह साध्या आणि काटकसरीच्या राहिणीमानास प्रतिष्ठा देणारा होता .काँग्रेसच्या अधिवेशनात एक तर हिंदीत ( गांधीजी हिंदुस्थानी असा शब्द वापरत)बोलावे किंवा मातृभाषेत असा त्यांचा आग्रह होता.त्यांचा केवळ आंदोलन अथवा चळवळीवर भर नव्हता तर विधायक कामाबाबत ते आग्रही होते.त्यांच्या प्रेरणेने अनेकजण विविध क्षेत्रांत कार्यरत झाले , वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात वेळेप्रमाणे पैसाही काटकसरीने वापरला पाहिजे हा त्यांचा संस्कार पचवलेले कार्यकर्ते आज दुर्मिळ असले तरी त्यांचे अस्तित्व गांधीजींचा प्रभाव अधोरेखित करते.लेखकाने या बाबींची आणि त्यांच्या प्रभावाची दखल घेतलेली दिसत नाही.

हा लेख संपवताना विषयांतराची जोखीम पत्करून ‘ India and the Bangladesh Liberation War ..’ या चंद्रशेखर दासगुप्ता यांच्या पुस्तकातील बाबींचा उल्लेख करायला हवा.त्यात बांगला देशाच्या निर्मितीचा मागोवा घेताना त्यांनी लिहिले आहे की पाकिस्तान अस्तित्वात आल्यानंतर थोड्याच कालावधीत पूर्व पाकिस्तानात ( आजचा बांगला देश) भाषेचा प्रश्न उभा राहिला.पूर्व पाकिस्तानी जनता बंगाली भाषेला उर्दूच्या बरोबरीने राष्ट्रभाषेचा दर्जा हवा अशी मागणी करीत होती. त्यासाठी ढाक्यात एक कृती समिती स्थापन झालेली होती. ‘ आपण एका टाईपरायटरवर पाकिस्तान मिळवले ‘ असे म्हणणारे बॅ. महंमद अली जिना तो देश अस्तित्वात आल्यावर फक्त एकदा पूर्व पाकिस्तानचा दौरा करू शकले.या दौऱ्यात त्यांनी बंगालीला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्याची मागणी फेटाळली. ही मागणी कम्युनिस्ट आणि फुटीरतावादी लोकांची आहे.या लोकांना पूर्व पाकिस्तान पुन्हा भारतात सामील करायचा आहे असा आरोप त्यांनी केला.कृती समितीतील युवकांशी त्यांचा वादही झाला. जिना त्यांना समजावून घेऊ शकते नाहीत किंवा त्यांच्या एखाद्या विश्वासू सहकाऱ्यावर तशी जबाबदारी सोपवू शकले नाहीत.नियतीने त्यांना दुसऱ्या दौऱ्याची संधी दिली नाही.पुढे लष्करी राजवट असताना ढाक्यात पाठवण्यात आलेल्या सैन्याधिकाऱ्यांनी ” येथील प्रश्नावर राजकीय तोडगा काढणे योग्य ” असा अभिप्राय वरिष्ठांना कळवला. त्यांना तर बदलण्यात आले आणि लष्करी अंमल निर्दयपणे राबविण्यासाठी कुख्यात असलेले अधिकारी तेथे पाठवले गेले.त्याचे परिणाम काय झाले , त्या इतिहासाला परवा पन्नास वर्षे झाली..!

दक्षिण आफ्रिका असो की भारत…जेथे असंतोष आहे , अशांतता आहे , अन्याय आहे , वैमनस्य आणि वैरभावाने थैमान घातले आहे , तेथे जाण्यात , अशा भागातील लोकांशी संवाद साधण्यात, त्यांचे लढे उभे करण्यात अथवा जातीय सलोख्यासाठी प्रयत्न करण्यात गांधीजींची हयात गेली.प्रत्येक वेळेला लोकांनी त्यांचे किंवा त्यांनी लोकांचे ऐकलेच असेही झाले नाही. पण गांधीजींनी कधी पाठ फिरवली नाही. लोकांनी ऐकावे म्हणून त्यांनी प्राण पणाला लावले.

सरहद्द गांधी असोत की आचार्य विनोबा , राजेंद्रप्रसाद असोत की सरदार पटेल , नेहरू असोत की सुभाषचंद्र बोस , राजाजी असोत की मौलाना , जयप्रकाश असोत की लोहिया…या सर्वांनी मतभेदासह त्यांचे नेतृत्व मान्य केले होते.यातील काहींनी काँग्रेस पक्ष सोडला पण त्यांची गांधीजींवरील निष्ठा कायम होती.

सर्वसामान्य माणसांनी तर गांधीजींनाच नेतृत्व दिलेले होते.

असे इतरत्र अपवादाने घडले.

लेखकाने म्हटल्याप्रमाणे कोणताही माणूस परिपूर्ण नसतो .तसे गांधीजी परिपूर्ण नव्हते. त्यांच्यापाशी सगळ्या प्रश्नांची उत्तरे नव्हतीच.

पण आजही समोर अंधार असेल तर अंदाज घेत पुढे पावलं टाकताना गांधी नावाची विजेरी उपयोगाला येते…

म्हणून

Gandhi Still Matters..

आणि आपण गांधींजींना म्हणायचे

Abide by me….!

(लेखक महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क खात्यात संचालक होते)

9422648925

(पुस्तक – Why Gandhi Still Matters

Rajmohan Gandhi

Aleph Publications

First Edition 2017

Pages 200 , Price 499₹ )

Previous articleतू एक साज है छेडा नहीं किसीने जिसे..!
Next articleअर्थसंकल्प : काही आठवणी आणि गमती जमती !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here