– आशुतोष शेवाळकर
अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत असे. शंकर नगर चौकात काही अॅक्सिडेंट झाला म्हणून ट्रॅफिक अडला होता. मी गर्दीजवळ जाऊन कानोसा घेतला. मोठी गर्दी जमली होती व आतमधे सगळे मिळून कोणाला तरी मारत होते. बहुदा स्कूटर व सायकल मध्ये झालेला तो अॅक्सिडेंट होता व सगळे मिळून त्या स्कूटरवाल्याला शिव्या देत मारत होते.
माझ्यासमोर एक शर्ट-इन केलेला, बुटका सडपातळ, फाटकासा माणूस उभा होता. अचानक तो गर्दीत शिरला व स्कूटरवाल्याला दोन-तीन थापडा मारून परत बाहेर येऊन उभा राहिला. तेवढं मारण्यानीही त्याला धाप लागली होती. पण त्याच्या चेहर्यावर एक विकृत आनंद आणि डोळ्यात आसुरी समाधान होतं. थोड्या वेळ तो तसाच उभा राहिला व मग पुन्हा आत जाऊन दोन-तीन थापडा लगाऊन परत आला. याचा अर्थ तो ही कृती आधीही एक-दोनदा करून आला होता. हे भांडण आणखीन लांबावं व आपल्याला त्या काळात आणखीन दोन-तीनदा मारून घेता यावं अशी त्याची भेकड इच्छा त्याच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होती. नागपूर मधे अशा प्रवृत्तीसाठी ‘हात साफ कर लेना’, ‘हात धो लेना’ व ‘दुसरे के फटे मे पैर डालना’ असे काही वाक्प्रचार आहेत.
सामूहिक हिंसेच्या अशा मिळालेल्या एरवी दुर्मिळ संधीच्या वेळी माणसातल्या अतृप्त इच्छा, असूया अशा उफाळून वर येतात हे मला तेव्हा लक्षात आलं. एक व्यक्ती म्हणून समाजात आपली वागणूक वेगळी असते आणि समूह, जमाव म्हणून वागतांना आपली मानसिकता, वागणूक अगदीच वेगळी होते हे पण मला त्या दिवशी पहिल्यांदा लक्षात आलं. त्या माणसाचा तो विकृत आनंदाचा चेहरा मला अजूनही जसाचा तसा लक्षात आहे.
आपल्याशी अर्थाअर्थी काहीच संबंध नसलेल्या घटनांचा आपल्याला आनंद वा दुःख होत असतं. दुसऱ्यांच काही वाईट झालं त्यानी आनंद होणं आणि दुसऱ्याचं काही चांगलं झालं तर त्याच वाईट वाटणं हा पण एक सामान्य माणसाच्या स्वभावात मुबलक प्रमाणात आढळणारा गुण आहे.
खरं तर ही अशी प्रवृत्ती माणसांमधे असणे ही एक अत्यंत आश्चर्याची गोष्ट आहे. उत्क्रांतीमध्ये आपल्या खूप मागे असलेल्या प्राण्यांमध्येही ही प्रवृत्ती आढळत नाही. उलट समूह म्हणून प्राणी एकमेकांना मदत करतांना दिसतात. वाघ पाठी लागला असतांना धावणाऱ्या कळपामधलं एखादं हरिण पाय अडकून पडलं तर इतर हरणं आपला जीव धोक्यात टाकून त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात. त्याला उठणं अगदीच शक्य नसेल, त्याचा पायाच मोडला असेल तर सगळा प्रयत्न करून झाल्यावर मगच शेवटी ते पुढे पळतात. एखाद्या एकाट रानम्हशीवर वाघानी पाळत ठेवून हल्ला केला तर तिनी ओरडून आवाज देताच इतर म्हशी स्वतःचा जीव धोक्यात घालून धावून येतात व शिंगांनी प्रहार करत त्या वाघाला पळवून लावण्याचा प्रयत्न करतात.
स्वतःच्या जातीच्या, कळपातल्या प्राण्याला मदत करणं हे तर सोडाच पण इतरही जातीच्या प्राण्यांनाही मदत करण्याची उदाहरणं पण जंगलात घडत असतात. झाडावरून त्यांना वाघ दुरूनच दिसत असतो म्हणून माकडं विशिष्ट प्रकारचा आवाज करून इतर प्राण्यांना सावधगिरीचा ‘कॉल’ देत असतात. उन्हाळ्यात बुटक्या प्राण्यांची झाडांची खालची पानं खाऊन संपल्यामुळे उपासमार व्हायला लागली की ते आशाळभूतपणे वरच्या फांद्यांकडे पाहतात. माकडं मग शेंड्याच्या फांद्या तोडून खाली टाकतात व त्यावर हरणं व इतर कमी उंचीचे प्राणी आपलं पोट भरतात.
‘काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट सध्या गाजतो आहे व त्यावर उलट-सुलट असे अनेक वादविवाद दोन्ही बाजूंनी रंगतात आहे. पण असं काही झालेली आपल्या देशाच्या इतिहासातली ही काही एकमेव घटना नाही. या घटनेच्या नंतर ‘गोधरा’ च्या घटना घडल्या होत्या व तीच्या थोडच आधी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीख समूहाला या देशात अशाच हिंसेला व अत्याचाराला सामोरं जावं लागलं होतं. गोधराच्या घटनांमध्ये तरी दोन वेगळ्या व कट्टर विरोधी धर्माचे समूह एकमेकांविरुद्ध उभे होते. पण या घटनेत तर हिंदू धर्माचे रक्षक असलेल्या शिखांच्या विरोधातच हिंदू समाजातल्या बांधवांनी अत्याचार केले होते. अत्याचार करणारे सगळेच काँग्रेसचे कार्यकर्ते होते, इंदिरा गांधीच्या हत्येच्या दुखा:नी सैरभैर होऊन दिसेल त्या शिखाला ते मारत होते असं समजण्याची गरज नाही. ‘मौका मिलनेपर हात साफ कर लेना’ हीच प्रवृत्ती तेव्हा अग्रेसर होती.
त्या आधी गांधींच्या खुनानंतर ब्राह्मणांवर अशाच अत्याचारांना सामोरे जाण्याचा प्रसंग आला होता. अनेक सुस्थितीतील ब्राह्मण कुटुंब तेव्हा देशोधडीला लागलीत. नागपूर मधले एक प्रसिद्ध पुरोगामी विचारवंत या काळातला एक किस्सा मला एकदा सांगत होते. महाल मधल्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यालाही या काळात लोकांनी सोडलं नाही. वर चढून पायातल्या चपला, जोडे काढून लोक पुतळ्यालाच ‘घे बामणा, घे बामणा’ म्हणत मारत होते. नुकताच नागपूरच्या नव्वद वर्षांच्या एका प्रसिद्ध माणसाला ते आजारी असतांना दवाखान्यात भेटायला गेलो होतो. या गृहस्थाचा तर नाहीच पण त्यांच्या आधीच्या पिढीचाही संघाशी काहीच संबंध नव्हता. स्वातंत्र्या आधीच्या त्या काळात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त ब्राह्मण कुटुंब गांधीच्या प्रवाहात सामील झालेले होते. नव्वदीच्या या वयात व अशा आजारपणांत जसं सगळ्यांचच होतं तसं त्या सद्गृहस्थाचं त्यादिवशी होत होतं. त्यांना खूप जुन्या जुन्या गोष्टी आठवत होत्या व त्या ते मला सांगत होते. त्यातच ते गांधींच्या खुनानंतरच्या दिवसांबद्दलही बोलत होते. “वर्धा रोडला आता जिथे हिंदुस्तान कॉलनी आहे, त्यामागे आमचा संत्र्याचा बगीचा होता. लोकांनी कुऱ्हाडी घेऊन आमची संत्र्याची सगळी झाडं तोडलीत. शंभु नावाचा आमचा एक कुत्रा होता. त्याला झाडाला बांधून व काठ्यांनी मारून मारून लोकांनी मारून टाकला”. हिंसेची सामूहिक संधी मिळताच जमावानी पुतळे व कुत्रे यांना सुद्धा मारून आपल्या विकृतीचं समाधान करून घेतलं होतं.
हा हिंसाचार करणारे सगळे गांधीच्या चळवळींमध्ये सामील होते, तुरुंगात जाऊन आलेले सत्याग्रही होते, गांधींच्या विचाराने हे सगळे अतिशय भारावलेले व प्रेरित झालेले होते, असं समजायचं का? खरं तर एकाने गांधीचा खून केल्यावर त्याची प्रतिक्रिया म्हणून या सगळ्यांनी मिळून लगेच पुढच्याच आठवड्यात गांधीचा हा दुसरा खून केला होता. गांधींशी अर्थाअर्थी संबंध नसलेल्यांचीच असूया, विकृती व ‘सॅडीसीझम’ यावेळेस वर आलेलं असेल.
गांधीच्या खुनाच्या थोडच आधीही फाळणीच्या निमित्तानी पूर्ण देशात जागोजागी असेच हिंसाचार झाले होते. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतही तेव्हा रक्ताचे पाट वाहिले होते. “सत्ता बदल होतो तेव्हा प्रत्येक वेळी दिल्लीत रक्ताचे पाट वाहतात व ही राजधानी पुन्हा नवीन सत्तेसाठी सवाष्ण होते” असं राम मनोहर लोहियांनी दिल्लीविषयी लिहिलेलं आहे.
कुठल्याही कारणानी सामाजिक उद्रेक पेटला तर त्या विषयाशी काहीही संबंध नसलेली माणसं या संधीचा फायदा घेवून हा हिंसाचार वाढवतात व त्यात आपली विकृती पूर्ण करून घेतात हेच सत्य या सगळ्या घटनांमागे दिसून येते.
काश्मीर फाइल्स वरच्या चर्चांमधून पुन्हा एकदा एकमेकांविरुद्ध उभं ठाकण्या आधी आपण आपल्या समूह म्हणून असलेल्या अशा मानसिकतेचा, पशुंमधेही दिसत नाही अशा या आदिम प्रवृत्तीचा विचार केला पाहिजे.
कुठल्याही वैचारीक वा तात्विक अधिष्ठानामुळे हिंसेची एखादी ठिणगी पडली तर तीचा वणवा पेटवायला आपल्यातली ही प्रवृत्ती अति उत्सुक असते. एरवी कार्यहीन असलेले हे ‘पौरुष’ अशा काळात अति कार्यरत होत असतं.
या सगळ्या घटना २०-३० वर्षांपूर्वीच्या आहेत. १९९० ते २०२० या तीस वर्षांच्या काळात आपल्या समाजाचं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक असं अजून कितीतरी जास्त अध:पतन, स्खलन झालेलं आहे. व्यक्ति म्हणून किंवा समाज म्हणून आपण फक्त आर्थिक क्षेत्रात प्रगती केलेली आहे व त्याची किंमत या इतर सर्व क्षेत्रातल्या अध:पतनानी मोजलेली आहे. समाज म्हणून आपण आता आपसात अधिकच दुभंगलो आहोत. धर्मानी झालेली विभागणी तर सोडूनच द्या पण जातीनुसार झालेल्या विभागणीमुळे एक धर्म म्हणूनही आपण एकत्र नाही आहोत. ‘भारतीय’ असा एकसंधपणा आता आपल्यात फारसा राहिलेलाच नाही. नेपोलियनला हवा असायचा तसा आपसात ‘पूर्ण दुभंगलेला’, ‘जिंकायला सोपा’ असा समाज आता आपण झालेलो आहोत.
अशा या काळात थोड्या जरी काही वैचारिक, तात्विक अधिष्ठान असलेल्या हिंसेची ठिणगी पडली तर तीचा पेटणारा वणवा भयंकर असेल या शक्यतेचा अतिशय गांभीर्याने विचार केला करणं आता आवश्यक आहे.
कॉलेज मधे शिकत असतांना एका प्रसिद्ध विद्रोही स्त्री नेत्याचे आम्ही अनुयायी होतो. त्या एकदा मला म्हणाल्या होत्या “देशात अनेक कुटुंबांना राहायला घर नसताना शंकर नगर, शिवाजी नगर मधे तीन-चार हजार फुटाच्या प्लॉटवर एकाच कुटुंबासाठी घर बांधून लोकं कसे काय राहू शकतात रे..?? क्रांती होईल तेव्हा लोकं यांच्या घरात घुसून यांना बाहेर काढतील व तिथे राहायला जातील.” अशा काही क्रांतीची थोडी जरी ठिणगी पेटली तरी उरलेली आग भडकवायला अनेक विकृत साथीदार या क्रांतीत जागोजागी सहज सहभागी होतील.
मी अगदी आठ-दहा वर्षाचा असताना वणीला घडलेली एक घटना मला आत्ता या संदर्भात आठवते आहे. तेव्हा नुकताच कापसाचा एकाधिकार महाराष्ट्र सरकारने सुरू केला होता. महाराष्ट्रात ‘फेडरेशन’ कापसाला भाव कमी द्यायची व थोड्याच दूर असलेल्या आंध्र प्रदेशाची सीमा ओलांडल्यावर तिथे जवळपास हजार पाचशे रुपये क्विंटल मागे भाव जास्त मिळायचा. बरेचसे शेतकरी तेव्हा अपरात्री बैलगाड्यांमध्ये कापूस भरून ‘बॉर्डर क्रॉस’ करून आंध्राच्या जिनिंग फॅक्टरी मध्ये कापूस विकायला जायचे. त्यावेळी वणीला पोलीस इन्स्पेक्टर असलेले एक गृहस्थ ‘बॉर्डर’ वर उभं राहून या शेतकऱ्यांकडून खंडणी वसूल करत असत. [खरे खुरे पोलिस इंस्पेक्टरही नसलेले एक सद्गृहस्थ सुद्धा त्या काळात नाटकांसाठी मिळतो तो इंस्पेक्टरचा ड्रेस भाड्याने आणून अशीच वसूली करत असत. या ‘उद्योग’ धंद्यामधून वाढत जात पुढे मग त्यांना राज्याचं मंत्रीपदही मिळालं होतं.]
एकवर्षी 2 जानेवारीला कुठल्या तरी आंदोलनाच्या निमित्ताने तहसील ऑफिस समोर मोठा जमाव जमा झाला होता. त्याला आवरायला वणीचा हा पोलीस इन्स्पेक्टर समोर आला. लोकांचा त्याच्या विरुद्धचा राग त्या ऐन वेळी उफाळून आला. लोकांनी एकत्रित येऊन त्याला मारायला सुरुवात केली. तो पळून जाऊन तहसील ऑफिसमागे असलेल्या ‘रेंजर’च्या क्वार्टर मध्ये लपला. लोकांनी त्याची जावा मोटरसायकल पेटवून दिली व त्याला जाळून मारण्याच्या उद्देशानी रेंजरच्या क्वार्टरला घेराव घातला. इंस्पेक्टरने पोलिसांना ‘फायरिंगची’ ऑर्डर दिली. वणीच्या पोलिसांना गोळीबाराची काहीच सवय नव्हती. त्यावेळेस पोलिसांजवळ ‘थ्री नॉट थ्री’ या प्रत्येक गोळीसाठी खटका मागे-पुढे करावा लागणाऱ्या ‘रायफल्स’ असायच्या. गुडघ्याखाली गोळीबार करायचा असतो हे विसरून पोलिसांनी जवळच्या एका टेकाडा मागून जमावावर सिनेमात पाहिलेला, ‘टिपण्या’सारखा गोळीबार केला. सात लोकं त्यात मारल्या गेलीत. शाळेत माझ्या दोन वर्ष पुढे असलेला एक मुलगा पण त्यात मारल्या गेला.
सगळा जमाव पळून घरोघरी पांगला. त्यानंतर एक सुनसान, सन्नाट शांतता त्या सरकारी कार्यालयांच्या परिसरात पसरली. तासा-दोन तासांनी हळूहळू करत लोकं पुन्हा तिथे येऊ लागलेत. पुन्हा जमाव जमा झाला. ज्यांच्या घरची लोक गोळीबारात गेली होती त्यांचे नातेवाईक प्रेतांजवळ बसून रडत होते. लोकांनी ती प्रेतं उचलली. तहसील ऑफिस समोर एका रांगेत मांडून ठेवलीत. मग पूर्ण जमाव त्या वेळेसच्या गावच्या एकेका नेत्याच्या घरासमोर गेला. त्या नेत्याला घराबाहेर काढून त्यांना मारत, त्यांचे कपडे फाडत, पायी पायी चालवत त्यांना तहसील ऑफिस समोर घेऊन आला. एकेका प्रेताला त्यांना साष्टांग नमस्कार करायला लावला. एरवी खादीचे कडक कपडे, टोपी घालणारे व ‘ॲम्बेसेडर’ कार मधून फिरणारे ते सगळे नेते त्या दिवशी पट्ट्या-पट्ट्यांची ‘अंडरवेअर’ व ‘बनियन’ मधे तहसील ऑफिस समोर जमावाला हात जोडून उभे होते.
हा सगळा मग जमाव गांधी चौकातल्या बाजारपेठेत गेला. या घटनेमुळे सगळी बाजारपेठ आधीच बंद झालेली होती. या जमावाने कपडा, दारू, किराणा अशी ठरावीक दुकानं निवडून त्यांचे टाळे तोडलेत व ती लुटलीत. जाळपोळ केली. बऱ्याच वेळपर्यंत हा हिंसाचार सुरू होता. सन्नाटा पसरलेला, संध्याकाळीच काळोख झालेला गाव त्या दिवशी मी पाहिल्यांदा बघितला.
दुसऱ्या दिवशी राज्यातल्या सगळ्या वर्तमानपत्रात पहिल्या पानावर ती बातमी होती. आकाशवाणीच्या दिल्ली स्टेशनने सुद्धा त्या दिवशी ही बातमी दिली. वणीचं नाव देशभरात गाजलं. मग या गोळीबाराची रीतसर चौकशी झाली. अरवींद इनामदार व भिष्मराज बाम हे दोघही तेव्हा ‘प्रोबेशन’ वरचे ‘आयपीएस’ अधिकारी होते. ते दोघं या चौकशीसाठी वणीत आलेत. गावात त्यांना बोलण्यासारखं फारसं कोणी नसल्यानी व बाबांचं नाव त्यांनी ऐकलेलं असल्यानी घरी येऊन त्यांनी बाबांशी ओळख करून घेतली. रोज दिवसाचं कामकाज आटोपल्यावर गप्पा मारायला ते संध्याकाळी आमच्या घरी टेरीकॉटची पॅन्ट आणि टेरेलिनचा हाफ शर्ट अशा ‘सिव्हिल’ वेशात यायचे. मी दाराआड, पडद्याआड उभं राहून त्यांच्या या गप्पा ऐकत असे. मधे चहा-पाणी नेऊन देतांना मुद्दाम थोडा जास्त वेळ तिथे रेंगाळत असे. त्या बालवयात या घटनेचं दडपण व उत्सुकता अशी दोन्हीही मला प्रचंड होती.
आता या घटनेतलं त्या ‘इन्स्पेक्टर’ला मारायला जाणं, नेत्यांना मारत मारत गोळीबारात मेलेल्यांच्या प्रेतापर्यंत आणणं या घटना आपण जमावाचा त्यांच्यावरचा राग म्हणून समजू शकतो. पण त्याच जमावानी मग या सगळ्याच प्रकरणाशी अर्थाअर्थी काहीच संबंध नसलेल्या व्यापाऱ्यांची दुकाने का लुटली असावीत? या घटनेचा काय अन्वयार्थ लावायचा? कुठल्याही विषयावरून पडलेल्या ठिणगीचा वणवा हिंसक झालेला जमाव कुठेही घेऊन जावू शकतो याचं ते उत्तम उदाहरण होतं. अर्थात ‘ये साले रईस बेपारी, बम पैसा कमाते है” वगैरे तात्विक मुलामा या जमावानी ही दुकानं लुटतांना याही घटनेला दिलाच होता.
दुसऱ्यांच्या सुस्थितीच, श्रीमंतीचं मला दुःखं होतं, असूया वाटते. समूहाच्या हिंसेत ‘मौका’ मिळाला की माझी ही आसुरी असूया मी शांत करून घेत असतो. हाच अर्थ या घटनेपासून मी माझ्यासाठी काढतो.
बाजारपेठेत एका व्यापाऱ्याची दारू व औषधं अशी दोन दुकानं होती. त्यांच दारूचं दुकान लुटल्या गेलं व औषधांच जसच्या तसं राहीलं. गोळीबारात व नंतरच्या हिंसाचारात जखमी झालेले लोक आंबेडकर चौकातल्या सरकारी दवाखान्यात भरती होते. दवाखान्यात पुरेशी औषधं नव्हती. दिवसा त्यांचं दारुचं दुकान लुटलं गेलेलं असतांनाही हे सद्गृहस्थ रात्री औषधाचं दुकान स्वतः उघडून सरकारी दवाखान्यात व येईल त्याला विनामूल्य औषध देत होते. दारूचं दुकान लुटल्या गेलं तेव्हाच हे पण दुकान लुटल्या गेलं असं आपण समजू असं ते कुटुंबाला समजावत होते. कपड्याचं दुकान लुटल्या गेलेला त्यांचा एक वकील मित्र तेव्हा घरी अक्षरश: रडत बसला होता. त्याच्या घरी जाऊन ते त्याला रागावून आलेत. “पुरुषासारखा पुरुष असून तु असं रडत काय बसला आहेस? घरातल्या बायका-मुलांची अशानी काय अवस्था होईल? आपण काय घेऊन आलो होतो या गावात? शून्यापासूनच सुरुवात केली होती नं? पुन्हा ती तशीच करु!!” असं ते त्याला समजाऊन आलेत. त्यांच्या त्या दिवशीच्या या वागणुकीचा गावावर तेव्हा फार ‘इम्पॅक्ट’ झाला होता. पुढील अनेक दिवस त्यांच्या या किश्श्याची गावात चर्चा होती. (पुढे मोठं झाल्यावर, या घटनेनंतर बरोबर सोळा वर्षांनी मी गावावरच्या त्यांच्या या उपकाराची परतफेड म्हणून त्यांच्या मुलीशी लग्नच करून टाकलं!!!)
करोनाच्या पहिल्या दोन ‘वेव्हस्’ मध्ये शासकीय यंत्रणेनी दाखविलेल्या पराकोटीच्या अकार्यक्षमतेमुळे हा काळ थोडा आणखी लांबला तर या यंत्रणेला अशाच उद्रेकाला सामोरं जावं लागेल व सर्व देशात हिंसाचार उफाळेल अशी भीती मला वाटत असे.
प्रत्येक माणसातली ही आसुरी असूया, विकृती तो व्यक्ति म्हणून समाजात वावरतो तेव्हा त्याने ती लपवलेली असते. पण कुठलीही बारीकशी ठिणगी पडून जेव्हा समाज एखाद्या विषयाने पेटतो तेव्हा उफाळलेल्या हिंसेच्या त्या आवरणात तो आपली ही अतृप्त, आसुरी इच्छा पूर्ण करून घेत असतो. तेव्हाच्या त्या ‘इश्यू’च्या तात्विक संरक्षणाचं, ‘सॅंक्टीफाईड सॅंक्शन’ चा वापर तो आपल्या सुप्त मनातल्या आसुरी भावनांना वाट करून द्यायला करत असतो.
अशा सामूहिक हिंसाचाराला जात नसते, धर्म नसतो, पंथ नसतो, देशही नसतो. या हिंसेला असते ती फक्त एक आसुरी विकृती व पौरुषाचा उसना आव आणलेली नपुंसकता. असा हिंसाचार करणारे सगळीच माणसं शंकर नगर चौकातल्या त्या पाच फुटी, सडपातळ, शर्ट इन केलेल्या माणसासारखे भेकड आणि नपुंसक असतात. जमावाच्या थोडं जरी बाजूला नेऊन यांची कॉलर पकडली तर त्यांचे पाय लटलटा कापतात, हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे.
सध्या आपल्या देशातल्या दोन राज्यांमध्ये कोणी जमीन-जुमला, घर, शेती विकली किंवा घेतली किंवा अगदी नवीन गाडी घेतली किंवा विकली तरी त्या किमतीच्या ५ टक्के रक्कम खंडणी म्हणून वसुल केल्या जाते. ही खंडणी विकणारा आणि घेणारा या दोघांकडूनही वसूल केल्या जाते. तोंड दाबून बसत असलेला हा बुक्यांचा मार तिथली जनता निमूट पणे एखाद्या अलिखित नियमाप्रमाणे सहन करते. या दोन राज्यांमधलं हे लोण आता त्यांच्या सीमेला लागून असलेल्या कला आणि साहीत्यामधे पूर्वापारपासुन समृद्ध असलेल्या राज्यातही पोचलेलं आहे. ‘मनी, मसल पॉवर व मिडिया’ या तीन ‘एम’ च्या भरोशावर सत्ता मिळवणे वा राखणे हे लोण आता पूर्ण देशात, सगळ्याच राज्यांमधे पोचलेलं आहे. आपल्या भरोशावर इतरांना सत्ता मिळवून देण्यापेक्षा आपणच सत्ताधारी का होऊ नये अशा महत्वाकांक्षेची लागण त्या दोन राज्यांनंतर आता पूर्ण देशातल्या ‘मसल पॉवर’ला होऊ लागलेली आहे. बाहुबलींच्या भरोशावर राजकारण करण्याचे परिणाम म्हणून आता बाहुबलीच राजकारणात उतरू लागले आहेत. लोकशाही ही आता ‘नंबर गेम’ झाल्यामुळे निवडून येऊ शकण्याची ताकद असलेल्यालाच उमेदवारी देणे ही आता सगळ्याच राजकीय पक्षांची मजबूरी झालेली आहे. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे असं ‘इलेक्टोरल मेरीट’ वर ‘तिकीट’ देणे ही मजबुरी अगतिकतेने स्वीकार न करता सर्वच राजकीय पक्ष तिचा ‘पॉलिसी’ म्हणून आनंदाने स्वीकार करतांना दिसतात आहेत.
या सगळ्याच परिणाम म्हणून देशातल्या इतर राज्यांचीही त्या दोन राज्यांसारखी स्थिती होण्याला आता काही वर्षांचाच अवधि उरलेला आहे. तुमच्या जवळ घर, शेती, जमीन-जुमला अशी काही ‘प्रॉपर्टी’ असेल किंवा गाठीला काही पैसे तुम्ही काटकसरीनी जोडून ‘फिक्स डिपॉझिट’ मध्ये ठेवले असतील, किंवा तुमची बायको, बहिण किंवा मुलगी यांच्यापैकी कोणी दिसायला सुंदर असेल आणि तुमची सामाजिक क्षेत्रात फारशी ओळख वा वजन नसेल तर तुम्हाला या समाजात सुरक्षिततेनी राहणं अशक्य होईल अशी परिस्थिती आता काही दशकातच येऊ घातलेली आहे. आज जी मुलगी आईच्या पोटात असेल ती जेव्हा तारुण्यात येईल तेव्हा तिला या असुरक्षिततेला सामोरी जायचे आहे. नोकरीच्या सुरक्षित चौकटीत असणाऱ्यांना या झळा अजून फारशा जाणवत नाही आहेत, पण स्वयंरोजगारावर जगणाऱ्या प्रत्येक माणसाला या झळांचे चटके आता बसायला लागले आहेत.
‘मला पाहिजे आहे ते मिळालच पाहिजे’ असे संस्कार आता घराघरातल्या सगळ्याच नवीन पिढीवर केल्या जात आहेत. गुंड-मवाल्यांच्या नव्या पिढयाही याला अपवाद नाहीत. गुंडाच्या घरची ही नवीन पिढी हवं ते मिळवण्यासाठी कसलेही विधीनिषेध न पाळणारी आहे. आणि तिच्या हातात पैसा व शस्त्र ही दोन्ही अस्त्रे आहेत.
मूल्य म्हणून स्वीकारलेल्या लोकशाहीचं झुंडशाहीत कधी रूपांतर झालं ते आपल्याला कळलेलंच नाही. व्यवस्थेच्या चौकटीत स्वतःला शिस्तशीरपणे बसवून हे अराजक आपल्यावर कधी राज्य करायला लागलं हे आपल्या लक्षातच आलेलं नाही.
युद्धामध्ये प्रदेश जिंकल्यावर स्त्रियांवर सरसकट बलात्कार हे अगदी अनादी काळापासून सगळ्या जगभर होत आले आहेत. जगातला सगळ्यात मोठा वर्णसंकर हा या युद्धपश्चात बलात्कारांमुळे झालेला आहे. युद्ध जिंकलेल्या या सेना वचपा काढायला म्हणून शत्रू राष्ट्रांच्या या नागरिक महिलांवर बलात्कार करत असतात असं समजायचं कां? परिस्थितीनी दिलेल्या या सनदशीर संधीचा फायदा घेत ते आपल्या विकृतीची लालसा पूर्ण करून घेत असतात. त्यांच्या हिंसाचाराच्या या एका क्षणाच्या हौसेपोटी त्यांचा वंश पोटात वाढवणाऱ्या त्या महिलांचं मग दारी तर सोडाच, पण घरीही मातेरं होत असतं.
देशातल्या अंतर्गत तर सोडाच पण सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचीही लक्षणं काही ठीक नाहीत. युक्रेन युद्धाला कितीही तात्विक व वैचारिक मुलामा दिला जात असला तरी एक बलाढ्य राष्ट्र आपल्या सीमेवरच्या एका छोट्या कमकुवत राष्ट्रावर, केवळ ते आपल्यात सामील होत नाही म्हणून आक्रमण करत आहे हे सत्य नाही का? युक्रेनचा आण्विक तळ हा रशीयासाठी गांभीर्याचा मुद्दा असेल तर रशियाने सुद्धा ५० वर्षांपूर्वी असाच अमेरिकेच्या सीमेलगत क्युबा या छोट्याश्या राष्ट्रात अण्वस्त्र तळ उभारला होताच. एखाद्या गल्लीच्या गुंड मवाल्याला शोभेल अशा भाषेतली “कुणीही मधे आलं तर आत्तापर्यंत पाहिले नसतील अशा परिणामांना सामोरे जावं लागेल” अशी धमकी एका बलाढ्य राष्ट्राचे राष्ट्रप्रमुख सध्या सगळ्या जगाला देतात आहेत आणि उर्वरित सगळं जग याच्यावर तात्विक आणि वैचारिक मौन स्वीकारून चूप आहे. अमेरिकेचही या बाबतीतलं धोरण युक्रेनला खूप काही संरक्षण देणारं नाही. आचार्य अत्रे भाषणात सांगायचे तो वाचलेला एक किस्सा या निमित्ताने आता मला आठवतो आहे. “एक नवरा-बायको एका कडक उन्हाळ्याच्या दुपारी मुंबईच्या एका निर्जन बीचवर छत्री घेऊन फिरायला गेलेत. तिथे त्यांना एक गुंड आडवा आला. त्यानी त्या गृहस्थाच्या पत्नीवर बलात्कार केला. बलात्कार करतांना त्याला वरून लागणाऱ्या उन्हाचा त्रास होत होता म्हणून त्यांनी त्या नवऱ्याला त्यांच्यावर छत्री धरून उभं राहायला सांगितलं. बलात्कार साग्रसंगीत पूर्ण होईपर्यंत तो नवरा पण तसा छत्री घेऊन उभा राहिला. त्या दिवशी घरी आल्यावर बायको अनावर रडत होती. चिडून नवऱ्याला म्हणत होती तुम्ही काही प्रतिकार तर केलाच नाहीत उलट निर्लज्जासारखे आमच्यावर छत्री धरून उभं राहिलात. यावर तो नवरा एकदम चिडला. सात्वीक संतापाने तिला तो म्हणू लागला. “तुला माझी कधी कदरच नसते. मी प्रतिकार केला नाही असं तू म्हणतेस?? तुला माहीत नाही तुझ्यावर बलात्कार करतांना मधे मधे त्या गुंडांचे लक्ष नाही असं बघून मी छत्री बाजूला करून त्याला चांगले उन्हाचे चटके देत होतो.” ‘सॅंक्शन्स’ लादून उन्हाचे चटके देण्यापलीकडे काही परिणाम बलात्कार करणाऱ्या रशियावर होणार नाही आहेत.
जगातल्या दोन बलाढ्य राष्ट्रांच्या अध्यक्षांनी सध्या स्वत:ला आजीवन अध्यक्ष म्हणून घोषित करून घेतलेलं आहे. पुढील पाच वर्षांनी पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येण्याचं वजनच मनावरून उतरलं तर कुठल्याही महत्वाकांक्षी माणसाचं पुढील पाऊल टाकल्या जाऊन संपूर्ण जगाचा अध्यक्ष होण्याची महत्वाकांक्षा त्याला साहजिकच होईल. आणि दुर्दैवाने या दोन राष्ट्रांच्या विरुद्ध एरवी उभं ठाकणारं जगातलं तिसरं बलाढ्य राष्ट्र खुशालचेंडू बील क्लिंटनपासूनच्या गेल्या पंचवीस वर्षातल्या कस नसलेल्या नेतृत्वामुळे कमजोर झालेले आहे. आर्थिक व शस्त्र सुसज्जता या दोन्ही बाबतीत या दोन राष्ट्रांशी स्पर्धेत ते तुलनेनी कमी पडत आहे. ही दोन बलाढ्य राष्ट्रे विचारांनी एक आहेत. या दोघांनी मिळून जग काबीज करण्याचं भविष्यात ठरवलं (किंवा सध्याही ठरवलेलं असेल) तर ५-१० वर्षांनंतरच्या जगाची कल्पना मनाने करून पाहिली पाहिजे. युक्रेन सारखेच आपण त्यातल्या दुसऱ्या बलाढ्य राष्ट्राच्या सीमेवर आहोत. युक्रेनमध्ये शाळा, मॉल्स या नागरी वसाहतीवर पडणाऱ्या ‘मिसाइल्स’चा आवाज म्हणजे आपण आपल्या घराच्या दारावर वाजलेली हिंसेची ‘कॉल बेल’ समजली पाहिजे.
करोनाचा जंतू हा निसर्ग निर्मित आहे की मानव निर्मित हे सगळ्या जगाचं अत्यूच्च कोटीला पोचलेलं विज्ञान अजूनही शोधू शकत नाही आहे किंवा शोधलेलं असेल तरी ते बोलू शकत नाही आहे. ही कुठल्या राष्ट्राची ‘ड्रग ट्रायल’ असेल तर जग जिंकणं हे ‘बायलॉजिकल वेपन्सनी’ जास्त सोपं आहे हे तिने आता सिद्ध केलेलच आहे.
एका बाजूला जगाची भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र अशा विज्ञानाच्या सर्वच क्षेत्रात ‘स्थूलाचा’ नाद सोडून ‘सूक्ष्मात’ शिरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यात होत असलेली प्रगती पहिली तर आपण आता उत्क्रांतीच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर येऊन पोचलो आहोत अशी आशा मनात निर्माण होते. पण दुसर्या बाजूला आदिमानवाच्या काळापासून आपल्यात असलेल्या साम्राज्य विस्ताराच्या पाशवी आदीमवृत्ती अधिकच बलाढ्य झालेल्या दिसतात आहेत. या वृत्तींच्या हाती आता अत्याधुनिक व सर्वविनाशक अशी शस्त्रे आहेत. वर्तमान शतकातल्या आधुनिक जगात हा ‘प्रगती आणि प्रवृत्ती’ मधला विरोधाभास विलक्षण आहे. या पैकी कुठल्या दिशेनी पुढील काळाचा प्रवाह जाणार आहे हे कळत नाही.
पण नीट विचार केला तर हे लक्षात येतं की सूक्ष्मामधे अशी प्रगती करून आपल्या सर्वांसाठी उत्क्रांतीची दारे खुले करणारे असे लोक या जगात फक्त दहा टक्केच आहेत. तसेच सुदैवाने पाशवी हिंसाचारानी साम्राज्य काबिज करण्याची महत्वाकांक्षा असलेले लोकही या जगात दहा टक्क्यापेक्षा जास्त नाहीत. विज्ञानाच्या संशोधनातून येणाऱ्या उत्क्रांतीचा फायदा मिळणे किंवा पाशवी महत्वाकांक्षेच्या पायदळी भरडल्या जाणे यातलं आपण उरलेल्या ऐंशी टक्के लोकांच्या हाती काहीही नाही. या दोन्ही बाबतीत आपण सारखेच असहाय्य आहोत.
तसेच सर्वसामान्य समाजामध्येही ‘मारो, काटो’ म्हणणारे लोकही सुदैवाने दहा टक्केच असतात आणि दुर्दैवाने ‘संभालो, बचाओ’ म्हणणारे सत्शील, विचारशील असे लोकही दहा टक्केच असतात. बाकी ऐंशी टक्के आपण लोक हे ‘न्यूट्रल’ असतो. हे ऐंशी टक्के लोक जेव्हा ‘मारो’ वाल्यांकडे वाहवले जातात तेव्हा नव्वद टक्के समाज हिंसक होतो. एखाद्या संतप्रवृत्तीच्या, संन्यस्त अशा प्रभावी नेतृत्वामुळे हे ऐंशी टक्के लोक जेव्हा ‘संभालो, बचाओच्या’ दहा टक्के गटा मागे उभे होतात तेव्हा नव्वद टक्के समाज समाज ‘संभालो, बचाओ’ वाला होत असतो. गेल्या चार हजार वर्षांच्या जगाच्या इतिहासात या दोन्ही टोकांची उदाहरणं अनेकदा घडलेली आहेत.
भारताच्या गावोगावी, खेड्यापाड्यात आधी माणसातल्या या पशु वृत्तीला आवर घालणारे, त्यांना उन्नत करणारे संत आणि कीर्तनकार होते. दुर्दैवाने या दोन्ही संस्थापैकी एक संस्था आता बुवाबाजीकडे व दुसरी पोटभरू वृत्तीकडे वळली आहे. कुठेही लागलेली आग वेगाने पसरत आपल्या दारापर्यंत यायला काहीच वेळ लागत नसतो हे आतातरी आपण लक्षात घेतलं पाहिजे. स्वतःची, आपल्या कुटुंबाची सुरक्षा हवी असेल तर स्वतःचीच सदसद्विवेकबुद्धी वापरुन आपली ताकद आता ‘संभालो, बचाओ’ च्या मागे उभी करणं आपल्याला भाग आहे. एकंदरीतच जगाच्या आणि आपल्या देशाच्याही अंतर्गत परिस्थितीचं हे सध्याचं भीषण वास्तव आहे.
(लेखक शेवाळकर डेव्हलपर्सचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत)
9822466401