भयगंड बाळगत खिडक्या बंद करण्याचे दुष्परिणाम

(साभार : साप्ताहिक साधना)

-रामचंद्र गुहा

आता आपण राहत असलेल्या भारताला एका अतिशय वेगळ्या प्रकारच्या राष्ट्रवादाची चौकट बसवण्यात आलेली आहे. त्याचं अधिक योग्य वर्णन बहुधा ‘फाजील देशाभिमान’ असं करता येईल. राष्ट्रीय आणि विशेषतः धार्मिक श्रेष्ठत्वाच्या कर्कश सुरांतील आणि पूर्णतः डळमळीत दाव्यांवर आधारलेला हा विचार आहे. आपल्या आर्थिक धोरणांमध्ये आणि शैक्षणिक धोरणांमध्येसुद्धा ही आत्ममग्न वृत्ती दिसून येते. एकीकडे, भारतीय उद्योजकतेचं भरणपोषण करण्याच्या नावाखाली प्रत्यक्षात अकार्यक्षमता आणि साटेलोटेपणाला चालना देणारी आर्थिक धोरणं सध्या राबवली जात आहेत. तर दुसरीकडे, आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाला बाजूला सारून हिंदू वर्चस्वाचे पक्षपाती सिद्धान्त पुढे रेटण्याचे हानिकारक प्रयत्न सुरू आहेत.

………………………………………………………

मुंबई हे माझं आवडतं भारतीय शहर आहे आणि गावदेवी इथलं मणिभवन हे मुंबईतलं माझं एक आवडतं ठिकाण आहे. या घराचं आता स्मारकात रूपांतर करण्यात आलंय. गांधी मुंबईत आल्यावर अनेकदा इथेच राहत असत आणि त्यांच्या अनेक सत्याग्रह आंदोलनांचं नियोजन याच ठिकाणी झालं.

मी 1990च्या दशकारंभी पहिल्यांदा मणिभवनात गेलो, तेव्हा तिथल्या एका लहानखुऱ्या देहयष्टीच्या वृद्ध महिलेशी माझा परिचय करून देण्यात आला. ऑफव्हाइट रंगाची साडी परिधान केलेल्या त्या बाई मितभाषी होत्या आणि अतिशय हळुवारपणे बोलत होत्या. त्यांच्या एकंदर कामगिरीचा विचार करता त्यांचं भिडस्त व्यक्तिमत्त्व अगदीच विरोधाभासी वाटावं असं होतं. या होत्या उषा मेहता. तरुणपणी त्या ‘भारत छोडो’ आंदोलनातील एक स्फूर्तिदायी व्यक्तिमत्त्व राहिल्या होत्या. गांधी आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांना 9 ऑगस्ट 1942 रोजी अटक झाल्यावर, भूमिगत नभोवाणी केंद्र तयार करण्यात उषा मेहता यांनी आघाडीची भूमिका निभावली. अजून तुरुंगात न डांबल्या गेलेल्या देशभक्तांमध्ये स्वातंत्र्याची चेतना जागी ठेवण्यासाठी विविध गोपनीय ठिकाणांवरून बातमीपत्रांचं प्रसारण करण्याचं काम या केंद्रावरून होत होतं.

या ‘काँग्रेस रेडिओ’ची सुरुवात करत असताना उषा मेहता यांनी नुकताच कुठे वयाच्या विशीमध्ये प्रवेश केला होता. मुंबईत त्या महाविद्यालयीन शिक्षण घेत होत्या. अखेरीस ब्रिटिश सत्ताधाऱ्यांना या रेडिओचं ठिकाण कळलं आणि ते चालवणाऱ्यांना अटक झाली. उषा मेहतांनीसुद्धा अनेक वर्षं तुरुंगात काढली. तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी अभ्यास पुन्हा सुरू केला आणि पुढं मुंबई विद्यापीठामध्ये राज्यशास्त्राच्या आदरणीय प्राध्यापकही झाल्या. मणिभवनच्या व्यवस्थापनातसुद्धा त्यांची कळीची भूमिका होती. वास्तूच्या देखभालीवर आणि प्रदर्शनार्थ ठेवलेल्या चित्रांवर देखरेख ठेवणं, गांधींच्या व स्वातंत्र्य चळवळीच्या वारशाविषयी व्याख्यानांचं आयोजन करणं, असं काम त्या करत असत. भूमिगत नभोवाणी केंद्र सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारी जाज्ज्वल्य मनोवृत्तीची मुलगी नंतर सौम्य मध्यमवयीन स्त्री म्हणून कार्यरत राहिली. गांधींसाठी व त्यांच्या चळवळीसाठी अतिशय महत्त्वाच्या ठरलेल्या मुंबई शहरातील त्यांचं सर्वांत महत्त्वाचं स्मारक सुरू ठेवण्यात उषा मेहता यांची भूमिका मोलाची राहिली. विद्यार्थी, अभ्यास आणि मणिभवनची देखभाल, यासाठी आयुष्य समर्पित केलेल्या मेहता अविवाहित राहिल्या.

उषा मेहतांच्या पुढाकाराने सुरू झालेला ‘काँग्रेस रेडिओ’ पूर्वीपासूनच ‘भारत छोडो’ आंदोलनाशी निगडित लोककथांचा भाग झालेला आहे. उषा ठक्कर यांच्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या ‘काँग्रेस रेडिओ : उषा मेहता अँड दि अंडरग्राउन्ड रेडिओ ऑफ 1942’ या पुस्तकामुळे सदर लोककथेची इतिहास म्हणूनही नोंद झाली. ठक्कर स्वतः उषा मेहता यांच्या माजी विद्यार्थिनी असून त्यांनीसुद्धा उत्तरायुष्यात मणिभवनच्या व्यवस्थापनामध्ये सहभाग घेतला होता. डॉ. ठक्कर यांनी अभिलेखागारांमधील सामग्रीचा काळजीपूर्वक धांडोळा घेऊन लिहिलेलं हे पुस्तक अभ्यासकांसोबतच या विषयात रस असलेल्या सर्वसामान्य वाचकांनाही तितकंच भावणारं ठरेल.

विशेष म्हणजे इतिहासाविषयीचं हे लेखन वर्तमानाशी थेट संबंधित आहे. ‘काँग्रेस रेडिओ’वरून 20 ऑक्टोबर 1942 रोजी प्रसारित झालेल्या बातमीपत्रातील पुढील सारांश पाहा :

मानवतेसाठी भारतीय लोकांनी आशेचा, शांततेचा आणि सदिच्छेचा संदेश पाठवला आहे. एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रामध्ये केलेला हिंसाचार आज आपण विसरून जाऊ. खरोखरच शांततापूर्ण व चांगलं जग निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रत्येक देशाचा दयाळूपणा, प्रत्येक राष्ट्राची व्यक्तिगत कृती गरजेची आहे, हे तेवढं लक्षात ठेवू या. आपल्याला जर्मनीचं तांत्रिक कौशल्य, तिथलं वैज्ञानिक ज्ञान, तिथलं संगीत गरजेचं आहे. आपल्याला इंग्लंडमधला उदारमतवाद, धैर्य आणि वाङ्‌मय गरजेचं आहे. आपल्याला इटलीचं सौष्ठव गरजेचं आहे. आपल्याला रशियाच्या जुन्या उपलब्धी आणि नवीन विजय गरजेचे आहेत. आपल्याला ऑस्ट्रियातील हास्याचं वरदान, तिथलं सुंदर हास्यप्रेम गरजेचं आहे. आपल्याला तिथली संस्कृती आणि तिथलं उदार जगण्याविषयीचं प्रेम हवं आहे. आणि चीन- चीनबद्दल काय बोलावं? आपल्याला चीनमधली शहाणीव, तिथलं धैर्य आणि तिथली नवीन आशा गरजेची आहे. आपल्याला तरुण अमेरिकेचं तेज आणि साहसाची प्रेरणा गरजेची आहे. आपल्याला आदिम लोकांचं ज्ञान आणि बालसुलभ साधेपणा गरजेचा आहे. शांततेच्या पुनरुत्थानासाठी, स्वप्रतिष्ठेच्या पुनरुत्थानासाठी आपल्याला सर्व मानवतेची गरज आहे.

राष्ट्राराष्ट्रांमधील एका अत्यंत विध्वंसक संघर्षाच्या काळात लिहिलेला आणि प्रसारित झालेला हा मजकूर आहे. या संदेशातील प्रेरणाच एके काळी भारतीय राष्ट्रावादामागील प्रेरणा होती. परकीय सत्तेपासून स्वातंत्र्य मिळवण्याशी कटिबद्ध असताना, राजकीय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वतःचं आयुष्य व जीव धोक्यात घालत असताना, भारतीय उपखंडाच्या विभिन्न भागांमधील भाषिक व सांस्कृतिक परंपरांना वाहून घेतलेलं असतानासुद्धा, आपण इतर देशांमधील सर्वोत्तम सांस्कृतिक, राजकीय व बौद्धिक संसाधनांना मोकळेपणानं दाद द्यायला हवी, त्यांच्याशी मोकळेपणानं संवाद साधायला हवा, त्यात आपल्या देशाचाही लाभ आहे, याची समज इथं दिसून येते.

आता मात्र आपण राहत असलेल्या भारताला एका अतिशय वेगळ्या प्रकारच्या राष्ट्रवादाची चौकट बसवण्यात आलेली आहे. त्याचं अधिक योग्य वर्णन बहुधा ‘फाजील देशाभिमान’ असं करता येईल. राष्ट्रीय आणि विशेषतः धार्मिक श्रेष्ठत्वाच्या कर्कश सुरांतील आणि पूर्णतः डळमळीत दाव्यांवर आधारलेला हा विचार आहे. आपल्या आर्थिक धोरणांमध्ये आणि शैक्षणिक धोरणांमध्येसुद्धा ही आत्ममग्न वृत्ती दिसून येते. एकीकडे, भारतीय उद्योजकतेचं भरणपोषण करण्याच्या नावाखाली प्रत्यक्षात अकार्यक्षमता आणि साटेलोटेपणाला चालना देणारी आर्थिक धोरणं सध्या राबवली जात आहेत. तर दुसरीकडे, आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाला बाजूला सारून हिंदू वर्चस्वाचे पक्षपाती सिद्धान्त पुढे रेटण्याचे हानिकारक प्रयत्न सुरू आहेत. जगाच्या दिशेनं उघडणाऱ्या आपल्या खिडक्या बंद करून घेत असतानाच खुद्द भारतातील सांस्कृतिक परंपरांच्या वैविध्यावरही रानटी हल्ला चढवला जातो आहे. भारतीयांनी कोणता पोशाख करावा अथवा करू नये, त्यांनी काय खावं अथवा खाऊ नये, आणि त्यांनी कोणाशी लग्न करावं अथवा करू नये, या सगळ्यांबाबत एकच-एक नियम लादण्याचा प्रयत्न दिसतो आहे.

आधुनिक भारताची उभारणी करणाऱ्या व्यक्तींनी अनेकदा जगभरात बराच प्रवास केला होता आणि ठिकठिकाणचे विचार आत्मसात केले होते. राममोहन रॉय हे बहुधा पहिले थोर भारतीय वैश्विकतावादी असावेत. ‘‘ते युरोपमुळे दडपून गेले नाहीत, त्यामुळे त्यांना तिथली आदर्श तत्त्वं पूर्णतः आत्मसात करणं शक्य झालं. ते स्वतः दुबळे किंवा दरिद्री वृत्तीचे नव्हते. त्यांना स्वतःच्या भूमीवर ठामपणे उभं राहून भूमिका घेता येत होती आणि तिथं त्यांना प्राप्त करता येतील अशा गोष्टी होत्या. भारताची खरीखुरी समृद्धी त्यांच्यापासून लपलेली नव्हती, कारण त्यांनी ती मुळातच स्वतःमध्ये सामावून घेतलेली होती. त्यामुळं त्यांना इतरांच्या समृद्धीचं परिशीलन करण्यासाठी काही-एक मापदंड मिळाला होता,’’ असं रॉय यांच्याविषयी नंतरच्या एका बंगाली विचारकानं लिहिलं आहे.

राममोहन रॉय यांच्या जीवनदृष्टीमधील सामर्थ्य इतक्या मार्मिक पद्धतीनं ओळखणारा हा विचारक म्हणजे रवींद्रनाथ ठाकूर. वरील उतारा त्यांच्या लेखणीतून आलेला आहे. स्वतः रवींद्रनाथांनी आशिया, युरोप आणि उत्तर व दक्षिण अमेरिका या ठिकाणी बराच प्रवास केला, आणि आपल्याला व आपल्या देशाला सर्वाधिक गरजेचं काय आहे ते या देशांकडून स्वीकारणं त्यांना शक्य झालं. रॉय यांच्याप्रमाणं रवींद्रनाथही स्वतःच्या भाषेमध्ये व संस्कृतीमध्ये मुरलेले होते आणि ‘इतरांच्या समृद्धीचं परिशीलन करण्यासाठी त्यांच्याकडेही काही-एक मापदंड होता.’

गांधी, नेहरू, आंबेडकर आणि कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्यासारख्या इतर महान देशभक्तांच्या जीवनदृष्टीलाही परदेशांमधील विस्तृत प्रवासांनी आकार दिला. जगाच्या आरशामध्ये भारताचं प्रतिबिंब पाहिल्यावर त्यांना आपल्या देशातील अपयश आणि उणिवा अधिक परिणामकारकतेने दाखवणं शक्य झालं, आणि त्यांवर उपायासाठी प्रयत्नही करता आले. भारतीय संविधान हा अशाच सर्जनशील समायोजनाचा एक दाखला आहे. आंबेडकरांनी परदेशांत घेतलेल्या कायदेशीर व समाजशास्त्रीय शिक्षणाच्या खुणा संविधानावर उमटलेल्या आहेत. तसंच, त्यांचे सल्लागार व सहकारी बी. एन. राव यांनी परदेशांमधील तज्ज्ञांशी केलेल्या चर्चांचाही हातभार त्यामध्ये लागलेला आहे. त्या वेळी, इतर देशांमध्ये अभ्यास करण्याचं किंवा राहण्याचं सौभाग्य न लाभलेल्या भारतीयांनीही प्रगतिशील विचार मोकळेपणाने स्वीकारले होते- मग या विचारांचा उगम कोणत्याही राष्ट्रात वा संस्कृतीत झालेला असो. त्यामुळं एकोणिसाव्या शतकाअखेरीला जोतिबा फुले यांनी जातीय भेदभावाविरोधात संघर्षाची धुरा खांद्यावर घेताना अमेरिकेतील गुलामगिरीविरोधी सुधारकांकडूनसुद्धा प्रेरणा घेतली. त्याचप्रमाणे, 1942मध्ये तरुण व जाज्ज्वल्य देशभक्त असणाऱ्या उषा मेहतांनी युरोप, रशिया, इटली, चीन व अमेरिका यांच्याकडून भारतानं सर्वोत्तम विचार कसे स्वीकारायला हवेत याबद्दल ‘रेडिओ काँग्रेस’च्या बातमीपत्रांमध्ये इतक्या संवेदनशीलतेनं लिहिलं.

आरंभिक काळातील या भारतीय देशभक्तांनी इतर संस्कृतींकडून काही गोष्टी स्वीकारल्या आणि काही गोष्टी इतर संस्कृतींना दिल्यासुद्धा. एकोणिसाव्या शतकारंभीच राममोहन रॉय यांनी इंग्लंडमध्ये मताधिकाराचा विस्तार करावा असं प्रतिपादन केलं होतं. एका शतकानंतर रवींद्रनाथांनी चीन, युरोप आणि लॅटिन अमेरिकेपर्यंत लेखकांना व विचारकांना स्फूर्ती दिली. अमेरिकी नागरी अधिकार चळवळीवरील गांधींचा प्रभाव सर्वज्ञात आहे. नेहरूंनी वसाहतवादाविरोधात केलेल्या संघर्षाची दखल आफ्रिकेतील तरुण स्वातंत्र्यसेनानींनी उत्साहानं घेतली होती (नेल्सन मंडेला हे त्यांपैकी एक). आंबेडकरांनी लोकशाही व सहभाव या संदर्भांत केलेल्या कामाला खुद्द त्यांच्या देशापेक्षा इतर देशांमध्ये अधिकाधिक दाद मिळू लागली आहे.

तर, एके काळी भारतीय देशभक्त खुल्या मनानं इतर संस्कृतींशी संवाद साधत होते. आज मात्र प्रमुख भारतीय नेते वेगळंच ‘बौद्धिक’ प्रशिक्षण (खरं तर विशिष्ट मत स्वतःमध्ये भिनवून) घेताना दिसतात. नरेंद्र मोदी, अमित शहा व त्यांच्यासारख्या इतर नेत्यांची जडणघडण करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये कायमच कोतेपणा आणि परकीयांविषयाचा भयगंड जोपासला गेला आहे. या शाखांमध्ये स्वतःच्या वारशाची निर्बुद्धपणे महती गाण्याची शिकवण मिळते (बहुतेकदा कल्पित स्वरूपातील), शत्रूंवर सूड उगवायच्या आणाभाका घेतल्या जातात, आणि हिंदूंनी मानवतेचं ‘विश्वगुरू’ व्हायला हवं- अशा विडंबनात्मक स्वप्नरंजनाची पोपटपंची केली जाते. पण जगानं त्यांच्याकडून शिकावं असं काहीही नाही, आणि त्याहून वाईट म्हणजे ते स्वतः जगाकडून काहीही शिकायला तयार नाहीत.

(अनुवाद – प्रभाकर पानवलकर)

Previous articleनपुंसक पौरुषाच्या फाइल्स…
Next articleही तर काँग्रेसचं अस्तित्व नाममात्र करणारी मृत्यूघंटाच !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.