इकडे भाजपने मात्र त्यांच्या पहिल्या दोन म्हणजे , पीयूष गोयल आणि डॉ . अनिल बोंडे यांच्यासाठी प्रत्येकी ४८ मतांचा कोटा निश्चित करुन दुसऱ्या पसंतीची मते आधी भाजपचे मोजली जातील यांची तजवीज करुन ठेवलेली आहे यांची कुणकुण महाविकास आघाडीला लागली नाही आणि २४ तास या निवडणुकीचे दळण दळणाऱ्या प्रकाश वृत्त वाहिन्यांनासुद्धा ! दरम्यान मतदानाच्या वेळी बरंच कांही नाट्य घडलं आणि मतमोजणीचा बॉल केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेला . मतमोजणी झाली तेव्हा पहिल्या पसंतीची मतं मिळवताना महाविकास आघाडीचे कथित ‘चाणक्य’ संजय राऊत यांची दमछाक झाली . सेनेकडे अतिरिक्त मतं असूनही संजय राऊत यांना कोट्यापेक्षा कमी म्हणजे ४१च पहिल्या पसंतीची मते मिळाली आणि ते पांचव्या क्रमांकावर फेकले गेले . ( याचा दुसरा अर्थ असा की गुप्त मतदान झालं असतं तर संजय राऊत यांचा पराभव झाला असता ? ) एक मात्र खरं , या निवडणुकीत सर्वात जास्त फटका शिवसेनेला बसला आणि तो अर्थातच राष्ट्रवादीनं म्हणजे शरद पवार यांनी दिला , असंच संकेत देणारा हा निकाल आहे . त्यामुळे राजकीय रणनीतीचा फेरविचार करण्याची वेळ सेनेवर आलेली आहे.
धनंजय महाडीक यांचा विजय म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणजे प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी आखलेल्या रणनीतीचा विजय असल्याचा त्या पक्षाकडून करण्यात येणारा दावा खरा आहे . भाजपचा तिसरा उमेदवार धनंजय मंडलिक यांना मात्र पहिल्या फेरीत चक्क ४१.५ मतं मिळालेली होती म्हणजे महाविकास आघाडीची जवळजवळ दहा मतं फुटली आणि तिथेच धनंजय मंडलिक यांचा विजय निश्चित झाला होता . ही किमया भाजपनं कशी आखली यांचा आढावा घेऊन महाविकास आघाडीला आता पुढच्या निवडणुकीत पावलं उचलावी लागतील .