एका पराभवामुळे एवढी आदळ-आपट कशाला?

-मधुकर भावे

—————–

राज्यसभेच्या ६ जागांची निवडणूक ‘लढाई’सारखी झाली. ही लढाई दिवसाही झाली आणि रात्रीही झाली. पहाटेपर्यंत झाली. ­महाराष्ट्रात ६० वर्षांत अशी निवडणूक कधीच झाली नव्हती. एवढे आरोप-प्रत्यारोप, मते बाद ठरवणे, रात्र-रात्र जागून निवडणूक आयोगाकडे तक्रारी…. जणू देशाच्या भवितव्याशी राज्यसभेची ही ६ जागांची निवडणूक जोडली गेलेली आहे. इतके अतोनात महत्त्व या निवडणुकीला राजकीय नेत्यांनी आणि प्रसिद्धी माध्यमानींही दिले. सध्याच्या प्रसिद्धी माध्यमांना असा खुराक हवाच असतो. विधान परिषद िकंवा राज्यसभा, िनवडणुकांना किती महत्त्व द्यायचे, याचे भान सरकारी पक्षातील नेत्यांचेही सुटले आणि विरोधी पक्ष नेत्यांचेही सुटले. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण मुद्दाम तापवले गेले. जणू पहिल्यांदाच या निवडणुकीत मतं फुटली, असे समजून, ज्यांनी मतं फोडली त्यांना ‘गद्दार’ ठरवले गेले. त्यांच्या याद्या आमच्याकडे आहेत…. असेही जाहीर केले गेले. जणू काही हे पहिल्यांदाच घडले आहे.

या निवडणुकीला एवढं महत्त्व देण्याची गरज नव्हती. पण सध्या महाराष्ट्रातील सगळ्याच नेत्यांचा राजकीय समतोल ढासळलेला आहे. त्यामुळे आदळ-आपट, हातवारे, मुलाखती, पेपरबाजी, ट्विटरवर धुमाकूळ…. जणू या निवडणुकीखेरीज देशात दुसरे कोणतेही प्रश्न शिल्लक नाहीत! शिवाय एखादा उमेदवार पडला म्हणून, किती आदळ-आपट करायची, याचेही भान असायला हवे. ते भानही सुटलेले आहे. त्यामुळे या राजकारणाची किळस यावी, अशी भाषा वापरून महाराष्ट्राचे राजकारण आता अधिक गढूळ केले जाईल… देशाच्या पर्यावरणाच्या कामात महाराष्ट्र तळाला गेलेला आहे, असा अहवाल प्रसिद्ध झालेला आहे. देशाच्या राजकारणात एकेकाळी अतिशय सुसंस्कृत, पुरोगामी, राज्याचे कायदे केंद्राने स्वीकारावेत इतके प्रभावी असलेले महाराष्ट्राचे विधानमंडळ आज ‘राडा’ बनले…. हे सगळे महाराष्ट्रासाठी लांच्छन आहे. खेळातील विजय-पराजय खेळाडूपणाने घ्यावा, अशी भाषणे केली जातात. राजकारणातील पराभव असे जिव्हारी लावून घेतले तर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण गटार व्हायला वेळ लागणार नाही. ती वेळ आलेलीच आहे. सगळेच राजकारण किळसवाणे झाले. ‘घोडेबाजार’ शब्द सर्रास वापरला जात आहे.

धनंजय महाडीक विजयी झाले… तर त्या नावाची फोड करून ‘धनंं’-जय अशा सूचित अर्थाने शब्द वापरले जात आहेत. या राजकारणात काय असते, घोडेबाजार म्हणजे नेमके काय? हे सर्वांना माहित आहे. त्याची खुलेआम चर्चा होत आहे. प्रत्येक पक्षाच्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याची नवीन भानगड सुरू झाली आहे. २० वर्षांपासून हे सुरू झाले आहे.  त्या – त्या राजकीय पक्षाच्या नेत्याचा आपल्याच पक्षाच्या आमदारांवर विश्वास नाही, असा त्याचा दुसरा अर्थ आहे. शेळ्या-मेंढ्यांना  मेंढपाळांनी चारही बाजूंनी घेरून ठेवावे…. एखादी मेंढी किंवा शेळी जरा बाजूला होते असे दिसले तर, दोन हातांनी खांद्यावर धरलेली काठी घेवून त्याच्यापाठी धावत जावे…. असले हे प्रकार सुरू आहेत. आपल्याच पक्षाच्या आमदारांवर ज्या नेत्यांचा विश्वास नाही, त्यांनीच गद्दारीची भाषा केली. हे पुढे अजून होत राहणार आहे. यापूर्वीही झाले…. पण त्यावेळचे पराभव किंवा मतांची फाटाफूट याला निकाल लागल्यानंतर कोणाही नेत्याने कसलेही महत्त्व दिले नव्हते.

या पूर्वी मतं फुटली नव्हती का? १९९९ च्या निवडणुकीत सोनिया गांधी यांनी खास म्हणून दिलेले उमेदवार राम प्रधान अवघ्या १ मताने पडले होते. त्यावेळी अपक्ष उमेदवार श्री. विजय दर्डा पहिल्या फेरीत मतं मिळवून निवडून आले. त्यांना शे. का. पक्षाच्या सहा आमदारांनी पहिल्या पसंतीची मते दिली होती. १९९७ साली विलासराव देशमुख विधान परिषदेच्या निवडणुकीत अर्ध्या मताने पडले होते. तो पराभव विसरून १९९९ विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात विलासराव देशमुख सर्वाधिक मतांनी निवडून आले. जय मिळाल्यानंतर फार हुरळून जायचे नसते…. आणि पराभव झाला म्हणून फार आदळ-आपट करायची नसते. उलट शहाण्या राजकीय नेत्यांनी आपला पराभव का झाला? याचे चिंतन करायचे असते. संजय राऊत ज्या दिवशी हे शिकतील, त्या दिवशी शिवसेनेचे अधिक भले होईल.

जे काही घडले आहे ते त्यांच्या आदळ-आपट या भूमिकेमुळे घडलेले आहे. आपले हात आकाशाला पोहोचले असे समजून वागणारे राजकारणात ‘कच्चे’ आहेत, असेच मानले पाहिजे. तुमच्याच शिवसेनेच्या आमदाराचे एक मत कसे बाद होते? बाकीच्यांना नंतर दोष द्या…. तुम्हाला पूर्ण कोट्याची मतं का मिळत नाहीत? कबूल करून ज्या आमदारांनी मतं दिली नाहीत, त्याची कारणं शोधा… ती कारणं दूर करण्याचा प्रयत्न करा… भाषणबाजी करून आणि  पेपरबाजी करून वस्तुस्थिती समजणार नाही. तुमचेच काही नेते खाजगीत काय बोलतात…. हे तुमच्या कानावर येत नाही. आणि आले तरी घोडे असे उधळलेले आहेत की, सिकंदरालाही मागे टाकाल…. शांतपणे घ्या… विचारपूर्वक लिहा… विचारपूर्वक बोला…. संत कबीरांना समोर ठेवा….

 ‘शब्द सम्हारे बोलयेे….

 शब्द को हाँथ ना पाँव

 एक शब्द करे औषधी

 एक शब्द करे घाव…’

 जे अतिशय शांतपणे, हुशारीने आमदार दिलीप मोहिते यांच्याबाबत मिलिंद नार्वेकर यांनी करून दाखवले, तेवढी श्रद्धा आिण सबुरी असेल तर एक पराभव जिव्हारी लावून घेण्याचे कारण नाही. राज्यसभेच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाच्या आमदाराने मत देताना आपल्या पक्षाच्या एंजटाला ते मत दाखवायचे असते. त्यामुळे मते फुटण्याचा धोका कमी आहे. आता २० जून रोजी विधानपरिषदेच्या ६ जागांची निवडणूक आहे. ती गुप्त मतदान पद्धतीने आहे. तिथंही मतं फुटू शकतात. उलट तिथं धोका जास्त आहे. त्याला किती महत्त्व द्यायचे आहे, ते ठरवा. अनेक पोटनिवडणुका तुम्हाला अशा दाखवू शकतो की, केंद्रामध्ये काँग्रेसला प्रचंड बहुमत असताना झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवारांचे पराभव झालेले आहेत. सामान्य माणसं राज्याला किंवा केंद्राला धोका न करता, आपला असंतोष या पद्धतीने व्यक्त करतात. लोकशाहीचे हेच तर मर्म आहे. सामान्य मतदार जी भावना व्यक्त करतो, तीच भावना आमदार-खासदारही व्यक्त करू शकतात. त्यातून शहाणपणाने मार्ग काढायचा असतो. दमदाटी करून आणि आदळ-आपट करून काय होणार आहे? एक संदर्भ मुद्दाम सांगतो…. १९६३ साली पंिडत नेहरू यांच्या हयातीत लोकसभेच्या ४ पोटनिवडणुका एकाचवेळी झाल्या. त्या चारही पोटनिवडणुका काँग्रेस पक्ष हारला. नेहरू पंतप्रधान असताना हा पराभव झाला. त्यातील दोन जागा उत्तर प्रदेशातील एक जागा बिहारमधील. एक  गुजराथमधील. कनोज मतदारसंघातून

डॉ. राममनोहर लोहिया निवडून आले. अमरोह मतदारसंघातून आचार्य कृपलानी निवडून आले. राजकोट मतदारसंघातून मिनू मसानी निवडूनआले. आणि बिहारमधील मुंघेर मतदारसंघातून मधु लिमये निवडून आले. काँग्रेसने आदळ-आपट केली नाही. फक्त लोकसभेत पंडितजी  एकदा रागावले आिण डॉ. लोहियांना म्हणाले, ‘इतने जोर-शोरसे आप बोल रहे हो,कितने वोटोसे चुनके आये….?’ तेव्हा डॉ. लोहिया अवघ्या ४०० मतांच्या फरकाने विजयी झाले होते. नेहरूंच्या बोलण्यात तो संदर्भ होता. डॉ. लोहिया उठले आणि पंडितजींकडे पाहून म्हणाले, ‘आदरणीय प्रधानमंत्रीजी, आपके पीछे काँग्रेसके जितने सांसदोंका आपको समर्थन है, उससे ज्यादा १०१ वोटोंसे चुनके आया हँू….’ (तेव्हा काँग्रेसचे २९९ खासदार होते.) पंडितजींनी आदळ-आपट केली नाही. उलट डॉक्टरांच्या चपखल उत्तराला हसून दाद दिली. राजकारणात त्याकरिता मन मोठं असावं लागतं. आपले हात आभाळाला लागलेत, असे समजलात तर लोक कधी आपटतील, याचा पत्ताही लागणार नाही.

मोदींच्या बाबतीत आता  तेच घडत आहे. २०१४ चे मोदी आणि त्यांचे सरकार लोकांच्या मनात आज राहिलेले नाही. महाराष्ट्रात जेव्हा आघाडीचे सरकार आले त्या दिवशीचा आपलेपणा आज राहिलेला नाही, हे कृपा करून समजून घ्या. आणि याला कोण कारणीभूत आहे, याचाही जरा अभ्यास करा… आपल्याशिवाय इतरांनाही थाेडं समजू शकतं. तुमच्याकडे लोकं दोन डोळ्यांनी पाहात नाहीत… लाख डोळ्यांनी पाहत आहेत. संजय राऊत यांना मुद्दाम सांगितले पाहिजे, खाजगीत तुमचेच शिवसैनिक काय बोलतात याची एकदा मािहती करून घ्या. पेपरबाजीने हे वातावरण बदलत नाही तर खराब होत आहे. हे स्पष्ट सांगण्याची वेळ आलेली आहे. नाकापेक्षा मोती जड झाला की, असेच होत असते.शिवाय चौथ्यांदा राज्यसभेची संधी तुम्हाला िमळाली. एक पत्रकार एवढा मोठा झाला, याचा आनंद आहे. त्याबद्दल तुमचे अभिनंदन! पण गेल्या १८ वर्षांत राज्यसभेत महाराष्ट्राचे कोणते प्रश्न आपण लावून धरले? केंद्र सरकारने आडवून ठेवलेल्या कोणत्या प्रश्नावर आपण राज्यसभेचे कामकाज रोखलेत? राज्यसभेच्या नियमांचा आधार घेवून महाराष्ट्राची किती वेळा तुम्ही बाजू मांडलीत? महाराष्ट्राचा जी.एस.टी.चा करोडो रुपयांचा वाटा केंद्राने थकवला, तुम्ही कितीवेळा अर्ध्या तासाच्या चर्चा उपस्थित केलीत? असे अनेक प्रश्न विचारता येतील… त्याची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. तुम्ही एका मतदारसंघाचे खासदार नाहीत. विधानसभेतून राज्यसभेत निवडून आलात म्हणजे, महाराष्ट्राचे खासदार आहात. महाराष्ट्राच्या ग्रामीण प्रश्नांवर आवाज किती उठवलात? याचाही हिशोब महाराष्ट्राला एकदा द्या. ‘

भाजपा सत्तेवर नको’ हे तुमच्या अगोदरपासून सांगणारे आम्ही अनेक पत्रकार आहोत. तुम्हीच त्यांच्या गळ्यात गळे घालून सरकारे बनवली होतीत. त्यामुळे उद्धवसाहेबांच्या नेतृत्त्वाखाली सरकार आलं, याचा आनंदच आहे. तुमची २५ वर्षे भाजपाने सडवली हे उद्धवसाहेबांचे विधान एकदम योग्य आहे. तुम्ही त्यांच्यापासून दूर झालात, हेही अतिशय योग्य झाले. कारण तो पक्ष आणि त्या पक्षाची धोरणं ही धार्मिक उन्मादाची आहेत. सगळ्या देशाला बरोबर घेवून चालणारी नाहीत. आज तर आर्थिक अराजकाच्या उंबरठ्यावर आपण आहोत. रुपया तळाला गेला. रुपयाची किंमत सतत  घसरते तेव्हा सरकारची किंमत आणि पतही घसरते. तीच स्थिती आज आहे. तेव्हा महाराष्ट्र भरकटू देवू नका. एक निवडणूक झाली… विषय संपला…. एक पराभव झाला… विसरून जा…. महाराष्ट्राची बांधणी अशी आदळ-आपट करून होणार नाही, हे ज्या दिवशी तुम्हाला हे समजेल त्या दिवशी हे सरकार महाराष्ट्राची बांधणी करू शकेल. तूर्त: एवढेच…..

(लेखक नामवंत  पत्रकार आहेत)

9892033458

Previous articleमहाविकास आघाडीचं गर्वहरण !
Next articleमी आणि मिनिमलिझम
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here