मी आणि मिनिमलिझम

-प्राजक्ता काणेगावकर

मी मिनिमलिस्ट आहे की नाही ते मला अजून माहित नाही. पण या वाटेवर माझा प्रवास सुरु तर झाला आहे.

मिनिमलिझम बद्दल मी पहिल्यांदा वाचलं साधारण सहा ते सात वर्षांपूर्वी. गार्डियनमध्ये एक लेख आला होता. मारी कॉंडो हिच्या स्पार्क जॉय या पुस्तकामुळे प्रेरित होऊन एका गृहिणीने घर कसं आवरलं याबद्दल लेख होता. आता घर आवरणे यावर लेख लिहिता येऊ शकतो का? तर याचं उत्तर निश्चितच हो असं आहे. कारण कितीही आवरलेलं असलं तरी घर आवरणे या विषयावर घरातली व्यक्ती डॉक्टरेट करूच शकते इतका हा जिव्हाळ्याचा विषय आहे.

मारीची पद्धत एकदम सोपी आहे. आपण घर खोलीप्रमाणे आवरतो. ती वस्तूप्रमाणे आवरायला सांगते. तिच्या मते आठ दिवसांचा हा आवरण्याचा सोहळा किंवा सण आहे, यानंतर परत कधीही घर आवरायला लागत नाही. कारण घरातली प्रत्येक वस्तू तुमच्यासाठी आनंददायी (स्पार्क जॉय) असते आणि प्रत्येक वस्तूला निश्चित घर किंवा जागा मिळते. त्यामुळे पहिल्या दिवशी कपडे, दुसऱ्या दिवशी पुस्तके तिसऱ्या दिवशी कागदपत्रे, चौथ्या दिवशी सेंटीमेंटल वस्तू किंवा मिसलेनियस असा तिचा क्रम आहे.

पहिल्या दिवशी घरातले यच्चयावत कपडे एका जागी गोळा करायचे. हे व्यक्तीप्रमाणे असू शकेल. म्हणजे कुटुंबात चार व्यक्ती असतील तर चार खोल्यांमध्ये चार जणांचे कपडे गोळा करायचे. एक कपडा हाती घ्यायचा. तो हातात घेतल्यावर मनातून आनंद किंवा स्पार्क जॉय असं वाटले पाहिजे. तसं वाटलं तर तो उजवीकडे ठेवायचा नाहीतर त्या कपड्याचा आपल्या आयुष्यातला रोल संपला असं मानून त्याला मनापासून धन्यवाद द्यायचे आणि तो डावीकडे ठेवायचा. उजवीकडच्या वस्तू घरात राहतात आणि डावीकडच्या तुम्ही दान करू शकता, विकू शकता किंवा टाकून देऊ शकता. ही प्रोसेस लिहायला जेव्हढा मला वेळ लागला त्याहीपेक्षा कमी वेळात आत्मसात करता येते आणि तितकीच सोपी आहे. स्वतःशी प्रामाणिक राहून केली तर अक्षरशः आपल्याला मनापासून थँक्यू म्हणताना थोडं भरूनही येतं. अशा पद्धतीने सॉर्ट केल्यानंतर तुम्ही ठेवून घेतलेल्या वस्तू या तुम्हाला आनंद देणाऱ्या असतात, तुमच्या प्रेमाच्या असतात आणि संख्येने कमीही असतात. त्यामुळेच त्यांची जागा निश्चित करून तुम्हाला त्यांची नीट काळजीही घेता येते. मारी कॉंडोच्या नेटफ्लिक्सवर डॉक्युमेंटरीज पण आहेत, ज्यात ती सविस्तर या पद्धतीवर बोलते. आणि हो तिचं एक वर्षाचे कॅलेंडर बुक झालेलं असतं. तिची पुस्तकं वाचणं हा मात्र खरोखर आनंदाचा भाग आहे.

माझा ट्रिगर तो गार्डीयनमधला लेख होता. लेखिकेने एका जागी जमवलेल्या, तिचे शूज आणि विविध प्रकारच्या चप्पल सॅंडल अशा ढिगाचा फोटो टाकला होता. मला तो फोटो एकदम अपील झाला कारण जोडे (खाणे नव्हे) या प्रकारावर माझा जरा विशेष जीव आहे. त्यावेळी माझ्याकडे होतेही कितीतरी प्रकारचे. अगदी पेन्सिल, स्टिलेटो हिल्स पासून कोल्हापुरी चप्पल पर्यंत सगळ्या प्रकारच्या जोड्यांचे माझ्याकडे कलेक्शन होतं. मला निग्रहाने स्वतःकडचा तो ढीग कमी करून त्यातले जोडे टाकून देणाऱ्या त्या बाईचं मनापासून कौतुक वाटलं. हे करून पहावं का असा विचार चाटून गेला मनाला पण मी त्याकडे साफ दुर्लक्ष केलं. पण विचार सुरु झाला होता.

मग नेहमीप्रमाणे मी या विषयावर पुस्तकं आणि इतर मटेरियल शोधायला सुरुवात केली. मिळेल ते मटेरियल वाचलं. अनेक डॉक्यु बघितल्या. अजूनही मी शोधात असते यावर काही वाचायला मिळतंय का, काही नवीन बघायला मिळतंय का ते.

तुम्हाला मिनिमलिझम हे व्हीगन फूड सारखं जगभर चालणारं पाश्चात्त्य देशातलं फॅड वाटू शकेल. हे बऱ्यापैकी श्रीमंती फॅड आहे असंही वाटू शकेल. किंवा आपल्याकडे हे असं सांगूनच ठेवलेलं आहे, यात तुम्ही काय नवीन सांगणार इत्यादी प्रश्न तुम्हाला पडू शकतात. मला यात पडायचं नाही.

या प्रवासात मला काही उत्तरं मिळाली, काही मिळून हरवली, काही अजून सापडतायत.

जे सापडलं ते सांगायचा हा प्रामाणिक प्रयत्न.

……………………..

एका रविवारी घर आवरावं असं ठरवलं. मला नेमाने दर रविवारी घराचा एक कोपरा आवरणाऱ्या लोकांबद्दल मनापासून आदर आहे. माझ्या सुखाच्या कल्पनेमध्ये रविवारचं स्थान जरा वर आहे कारण रविवार हा माझ्या दृष्टीने काहीही न करण्याचा दिवस. अक्षरशः काही म्हणजे काहीही करत नाही मी एखाद्या रविवारी. पण या रविवारी मला आवरण्याचा किडा चावला. झालं. कपड्यांपासून सुरूवात करावी असं ठरवून कपाटातील पसारा काढला. माझा उत्साह अर्धा ढीग होईपर्यंत टिकला आणि नंतर पुन्हा सगळा ढीग नीट घड्या करून आत टाकून दिला आणि दार लावलं. खरी गंमत पुढेच आहे. नवीन साडी घेतली की हँगरला लावून आत टाकली. नवीन ड्रेस घेतला, दोनदा तीनदा घालून, घडी करून ठेवून दिला. हळू हळू एकाची दोन कपाटं झाली. घरात येणाऱ्या सामानाची पावलं दिसत होती पण बाहेर जाणाऱ्या सामानाची चिमणी पावलं क्वचित दिसत. त्यात नोकरी करत असल्याने हे सगळे लागतच आपल्याला असाही एक समज होता. आता मला आवरण्याचा कंटाळा असल्याने मी आवरावं लागूच नये शक्यतो या प्रयत्नात होते.

यात घरात फक्त कपडेच येतात नवीन का? तर तसं अजिबातच नाही. इतक्या विविध प्रकारच्या वस्तू येत असतात घरात की आवरायला काढलं की आपण अवाकच होतो.

मी घरातलं सामान कमी केलं म्हणजे मी मिनिमलिस्टिक आहे का? तर नाही. कारण आहे त्या वस्तू कमी करणे हा मिनिमलिझम चा एक भाग झाला. त्यामुळे मिनिमलिझम म्हणजे काय हे जरा मुळातून बघूया.

मिनिमलिझम ही एक जीवनशैली आहे. तिचे अनेक पैलू आहेत. रिड्यूस म्हणजे घरातल्या वस्तू कमी करणे हा त्यातला एक मोठा आणि महत्त्वाचा भाग झाला. ही मिनिमलिझमची पहिली पायरी आहे. आपल्याला वस्तू कमी करणे यापेक्षाही त्यामागच्या भावनेशी सामना करणे अवघड जाते. मग ती भावना कुठलीही असो. इतके तटस्थ आपण नसतो. मी तर अजिबातच नाही. पण त्यामुळे घरातल्या प्रत्येक वस्तूत आपला जीव अडकलेला असतो. ममत्व असतं. आठवणी असतात. आनंद असतो कधी कधी अभिमानही असतो. वस्तू काढायची घरातली म्हणजे या सगळ्याशी सामना करावा लागतो. तिथे आपला कस लागतो. आपण आवरतो म्हणजे काय करतो? सगळ्या वस्तू छान नीट पुसून, धूळ झटकून रेखीव मांडून, घड्या करून, सॉर्ट करून ठेवतो. काही दिवस आपले आपल्याला ते बघून छान वाटतं. जोपर्यंत परत त्यांचा पसारा होत नाही तोपर्यंत. रिड्यूस ही मिनिमलिझमची महत्त्वाची पहिली पायरी आहे ते त्यामुळेच.

मिनिमलिझमची दुसरी कन्सेप्ट आहे रिसायकल. कपड्याचं उदाहरण देते कारण ते पटकन लक्षात येते. सगळ्यांप्रमाणेच माझ्याकडेही मी बारीक झाल्यावर घालेन म्हणून ठेवलेले काही कुर्ते होते. खूप दिवस मीही ते बाहेर काढून घडी घालून परत आत ठेवून देत होते. रिसायकलमध्ये मी ते ऑल्टर करून घेतले. ते मला छान बसले आणि वापरायला मला अचानक पाच नवीन कुर्ते मिळाले. पण हे मी नुसतेच घडी करून ठेवत होते कितीतरी दिवस. त्यांचा वापर शून्य होता. निव्वळ त्याच्याकडे बघत उसासे टाकणे यापलीकडे मीही काही करत नव्हते. याचा अर्थ मी बारीक होण्याची आशा सोडून दिली का, तर नाही. पण तोपर्यंत घालता येतील मला ते आता. आणि मी बारीक झाले की हे काढून टाकून मी नवीन घेईन परत. तोपर्यंत हे नवीनच झाले की मस्तपैकी.

मिनिमलिझमची तिसरी कन्सेप्ट आहे रियुज. एका वाक्यात सांगायचं तर तुम्हाला एखाद्या वस्तूसाठी समर्पक मालक किंवा घर सापडले तर त्याला ती वस्तू देऊन टाका, म्हणजेच डोनेट करा. कपडे, स्टेशनरी, शूज पासून काहीही डोनेट करता येतं आणि विश्वास ठेवा आपण विश्वासाने एखादी वस्तू दिल्यानंतर घेणाऱ्याच्या चेहऱ्यावर मनापासून उमटणारा आनंद बघताना वाटणाऱ्या समाधानाला शब्द नाहीत.

मिनिमलिझमची चौथी कन्सेप्ट आहे रिफ्युज. इन अदर वर्ड्स नो मीन्स नो. नवीन वस्तू घरात आणायला नाही म्हणणे. थोडक्यात खरेदी न करणे. इथे जरा मेख आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला वाटत असते की आपण खरेदी करत नाही. पण थोडा विचार करा. आपण कदाचित घरात येणाऱ्या एका कॅटेगरीची खरेदी करत नसू, पण आपण खरेदी करतच नाही असं नाही. म्हणजे आपण कापड खरेदी करत नसू एकवेळ पण दुसरे काहीतरी घेत असू. काहीच न घेता फक्त आवश्यक तिथेच पैसे खर्च करत असाल तर

अभिनंदन!

कारण तुमचा सेल्फ कंट्रोल उच्च दर्जाचा आहे. थोडा विचार करा यासाठीच म्हणलं आहे.

मिनिमलिझमच्या अनेक व्याख्या आहेत. पण मला मेघना सावे शहा यांनी पर्यावरणपूरक अंगाने सांगितलेल्या या कन्सपेट्स जास्त आवडल्या. रविवार पाच जूनच्या ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये त्यांनी टाइम्स प्रॉपर्टी पुरवणीत या कन्सपेट्स मांडल्या आहेत. मी त्या अजून उदाहरणासहित विस्तारपूर्वक मांडल्या आहेत. मिनिमलिझम म्हणजे मी काय करणार आहे किंवा काय करत होते ते पुरेसं स्पष्टपणे सांगण्यासाठी मला या कन्सेप्ट्स मस्त वाटल्या.

सगळ्यांच्या घराप्रमाणे माझ्याही घरात सगळ्यात जास्त आढळणाऱ्या दोन गोष्टी आहेत. बाकी पसारा आहेच पण या दोन गोष्टी सगळ्यात जास्त आहेत. एक कपडे आणि दोन पुस्तकं. मग यात भर म्हणून जोडे, कानातली गळ्यातली, पर्सेस, स्वयंपाक करायला आवडते म्हणून वेगवेगळ्या प्रकारची भांडी, सुऱ्या, क्रोकरी, एप्रन्स, याशिवाय प्रत्येक ठिकाणाहून आठवण म्हणून आणलेले काही ना काही ही यादी प्रचंड मोठी आहे. मीही आवरतच होते. एखाद्या दिवशी नाही आवरले तर आजूबाजूला बघून रडू यायचं अक्षरशः. कितीही पसाऱ्याबरोबर राहायची सवय करून घेतली तरी त्या पसाऱ्याचा आपल्यावर परिणाम होतो. आवरलं की छान वाटतं पण परत ये रे माझ्या मागल्या. त्यात नवीन खरेदी थांबत नाही. ज्या वस्तू आपल्याला खरोखर हव्याहव्याशा आहेत त्या लपून जातात या सगळ्या ढिगात. त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. कुठे ना कुठे तरी आपल्या मनाच्या शांततेचा आपल्या आसपासच्या पसाऱ्याशी फार गहन संबंध आहे. मी पहिली क्लिनिंग असाइनमेंट केली तेव्हा हाफ मॅरेथॉन पहिल्यांदा पूर्ण केल्यासारखं माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. रिकामं वाटलं काही क्षण आतून आणि तरीही त्या रिकामपणात शांतता होती.

विचार करा हे मी फिजिकल स्पेस किंवा आपल्या आसपास असणाऱ्या दृश्य वस्तूंबद्दल बोलतेय. म्हणजे डोळ्यांना दिसणारा आपल्या आसपास असणारा पसारा. डिक्लटरींग हे प्रत्येक लेव्हलवर करणे अपेक्षित आहे. त्याची फिजिकल डिक्लटरींग ही पहिली पायरी आहे. पण जोपर्यंत तुम्ही आसपास गुंतून पडलेला आहात तोपर्यंत तुम्ही स्वतःला वेळ कसा देणार?

आता मिनिमलिझम मध्ये विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न. म्हणजे कधीच खरेदी करायचं नाही का काही? मिनिमलिझम मध्ये खरेदी करू नका असं म्हणलेले नाही. आपल्याला वस्तू खरेदी करण्यातला आनंद हवाच असतो की. पण तो आनंद वस्तू घेतली, घरात आणली आणि तिच्याकडे परत बघितलेच नाही किंवा त्या वस्तूचा परत वापर केलाच नाही तर क्षणिक ठरणार ना. तुम्ही क्षणिक आनंद शोधताय का हे स्वतःला जरूर विचारा असं मिनिमलिझम सुचवतं.

म्हणजे भणंगासारखे राहायचे का? मुळीच नाही. उलट जे घ्याल ते विचारपूर्वक पैसे गुंतवून सर्वोत्तम घ्या. कारण उत्तम प्रतीची वस्तू तुम्हाला दीर्घकाळ आनंद देणारी असते, ती टिकते आणि तिचा वापरही आपण पुरेपूर करतो. दोन उदाहरणं देते. रनिंग करणाऱ्या लोकांसाठी गार्मीन हे अत्यावश्यक स्मार्ट वॉच आहे आणि ते स्मार्ट वॉच कॅटेगरीत सर्वोत्तमही आहे. तुम्ही ऍप वापरूच शकता. पण तुम्ही रनिंग सिरियसली करणार असाल तर गार्मिनला पर्याय नाही. मग आधी हे मग ते असे पैसे घालवण्यापेक्षा गार्मीनमध्ये पैसे गुंतवणे हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे. एकदा गार्मीन घेतले की विषय संपला. लेटेस्ट व्हर्शन नाही म्हणाले तरी तीन ते पाच वर्षं सहज चालते. दुसरे उदाहरण म्हणजे आपला यूज अँड थ्रो वस्तूंचा वापर. आपण यूज अँड थ्रो च्या नादी लागून वारंवार अशा वस्तू खरेदी करत राहतो. कधी वापरतो कधी नाही. वापरल्यावर आपण त्या वस्तू डिस्पोज केल्या नाहीत तर त्या आपल्या आसपास जमा होत राहतात. याचं सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे पेन आणि स्टेशनरी. थोडी आसपास नजर टाकलीत तर तुम्हाला पटेल मला काय म्हणायचंय ते.

आणि एक गंमत. ज्या गोष्टी तुमच्यासाठी बेशकिमती आहेत, तुम्हाला खरोखर आनंद देतात त्या तुम्ही ठेवायच्याच आहेत. सर्वसंगपरित्याग वगैरे करा असं मिनिमलिझम अजिबातच सांगत नाही.

आमच्या एका बॉसने सांगितलेला एक किस्सा सांगते. बॉस जेव्हा ज्युनिअर होता तेव्हा त्याच्या टेबलवर एक स्टॅक ट्रे होता. नंतर फाईल करू किंवा नंतर ऍक्शन घेऊ म्हणून तो त्या ट्रे मध्ये कागदपत्रे ठेवत असे. एकदा त्याच्या बॉसने तो ट्रे बघितला. त्याने त्यातल्या पावत्या, ऑर्डर्स, पेपर्स फाडायला सुरुवात केली. हा गडबडला. “सर ती महत्त्वाची डॉक्युमेंट्स होती.” “महत्त्वाची असती तर तू त्यावर केव्हाच ऍक्शन घेतली असतीस” त्याने शांतपणे उत्तर दिले. त्या दिवसापासून बॉसच्या टेबलवर एक लेटरपॅड सोडून कुठलेही बाकीचे कागद नसतात.

काम करत असताना नोट्स काढायला, वाचत असताना मुद्दा लिहून ठेवायला ई. ई. कारणांनी जेव्हा माझ्या टेबलवर डायरीवर ठेवलेली तीन नोटपॅड्स बघितल्यावर मला हा किस्सा आठवला. त्यांचं पुढे काय झालं ते नंतरच्या भागात.

क्रमशः

(लेखिका नामवंत ब्लॉगर आणि इंग्रजी लेखन व संवाद प्रशिक्षक आहेत)

[email protected]

Previous articleएका पराभवामुळे एवढी आदळ-आपट कशाला?
Next articleआपल्याला का सगळं हवंय आणि आत्ताच का हवंय?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.