आपल्याला का सगळं हवंय आणि आत्ताच का हवंय?

मी आणि मिनिमलिझम- भाग २

-प्राजक्ता काणेगावकर

आपण लहान होत तेव्हा आयुष्य किती साधं सोपं होतं. फार काही सोस नसायचा आपल्याला. वर्षातून दोनदा किंवा तीनदा आपण लक्ष्मी रोडला जायचो. एकदा दिवाळीच्या आधी, एकदा वाढदिवसाच्या वेळी आणि एकदा शाळा सुरु व्हायच्या आधी युनिफॉर्म वगैरे आणायला. सगळे मिळून आपल्याकडे सात आठ कपडे असायचे. दोन तीन घरातले, तेच खेळायला जाताना घालायचे, एखाद दुसरा चांगला ड्रेस जो कुठे फंक्शनला घालून जाण्याइतका चांगला असायचा आणि शाळेचे दोन युनिफॉर्म. पण आपण खूष असायचो. हा स्पोर्ट्स शूज घालतो आणि माझ्या पायात बाटाची स्लीपर आहे असं काही आपल्या मनातही यायचं नाही. खूप खेळायचो, मस्ती करायचो. आता इतकं सगळं आपल्याकडे आहे पण ते दिवस गेले ते गेलेच.

असा तुम्हाला व्हॉट्सऍप मेसेज आला, किंवा अशी कुणाची पोस्ट वाचली तर आपण काय करतो? बदाम टाकतो, उसासे टाकतो आणि ती पुढे सरकवतो.

पुढे जायच्या आधी एक डिस्क्लेमर. मी इतकीही नॉस्टॅलजियामध्येच रमणारी व्यक्ती नाहीये. आपण मोठे होणार, आपण बदलणार तसंच आपल्याबरोबर जगही बदलणार. त्यामुळे हा सगळा बदल अनिवार्य आहे हे मलाही कळतं.

मला स्वतःला या अशा पोस्ट्स वाचून दोन प्रश्न टोचायला लागले.

१. यातले उमाळे आणि उसासे भाग सोडला तरी कुठे ना कुठे ती सिम्पलीसिटी आपण सगळेच शोधतोय. ती कुठे हरवलीय?

२. आपण वर्षातून तीनदा जास्तीत जास्त एखादं कार्य असेल तर चारदा खरेदी करणारी माणसं होतो. आपला खरेदीचा पॅटर्न इतका कधी आणि का बदलला?

यातल्या दुसऱ्या प्रश्नावर खरंच विचार करायची वेळ आली आहे.

हा पॅटर्न बदलेला आपल्याला कळलासुद्धा नाहीये का? जसं इमर्जन्सी म्हणून आधी पेजर आणि मग मोबाईल आले. आता तर मोबाईलशिवाय आपलं पानही हलत नाही. इमर्जन्सी खरंच असते का इतकी असा प्रश्नसुद्धा आपल्या मनात येत नाही. तसंच आता आपलं बहुतेक खरेदीचं झालं असावं. आपल्या लक्षातही येत नाही की आपण खरेदी करतो ते.

काही आकडे मांडते. हे मी फक्त ऑनलाईन शॉपिंग डेटा इन इंडिया फॉर लास्ट ५ इयर्स इतका बेसिक सर्च केलेले आहेत. साधारण कल्पना यावी म्हणून टाकते आहे. अजून जर सर्च रिफाइन केला तर अजून चांगला डेटा हाती नक्कीच लागू शकतो. मी इंडियन इ-कॉमर्स इंडस्ट्री ऍनालिसिस आणि एक दोन वेबसाईट्स रेफर केल्या आहेत.

२०२२ मध्ये इंडियन इ कॉमर्स मार्केट २१.५ टक्क्यांनी वाढणे अपेक्षित आहे. ऑनलाईन शॉपर बेसच्या निकषावर आपण चायना आणि यूएसच्या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर आहोत. हा आपल्या अवाढव्य लोकसंख्येचाही परिणाम आहे. ४जी वरून आपण वेगाने ५जी कडे जातो आहोत. त्यामुळे इंटरनेट पेनट्रेशन हे २०२५ पर्यंत जवळपास ४५ टक्क्यांनी वाढणार आहे. पुढच्या पाच वर्षात इंडियन इ-रिटेल इंडस्ट्री मध्ये ३००-३५० मिलियन शॉपर्सची भर पडणार आहे.

(https://www.ibef.org/industry/ecommerce-presentation तुम्ही ही वेबसाईट बघू शकता.)

यातही नवीन युजर्सची भर पडणार आहेच पण सध्या ऍक्टिव्ह असलेले युजर्स, ज्याला मार्केटिंगच्या भाषेत रिपीट व्हॅल्यू कस्टमर म्हणलं जातं यांचं प्रमाण लक्षणीय आहे. पॅटर्नची कल्पना यावी म्हणून डेटा सांगितला.

यातच आपणही येतो.

आपण खरेदी का करतो? या प्रश्नाचं उत्तर शोधणं जरा अवघड जाणार आहे. खरेदी म्हणजे फक्त ऑनलाईन नाही तर ऑनलाईन आणि ब्रिक अँड मॉर्टर स्टोअर्स मिळून होते ती.

फ्लिपकार्ट जेव्हा पहिल्या फेझमध्ये जोमात होतं तेव्हा मी बेहद्द खूष होते. आपण कॅटलॉग बघायचा, वस्तू निवडायची, पेमेंट करायचे आणि कुणीतरी ती आपल्या दरवाजात आणून देतं ही कल्पनाच भारी होती. मी फ्लिपकार्टवरून तेव्हा पुस्तकं घेत असे. मग हळू हळू हिंमत करून बाकीच्या वस्तू मागवल्या. तरी अजूनही माझी इलेक्ट्रॉनिकस किंवा तत्सम घ्यायची फारशी हिंमत होत नव्हती. कपडे तर मी अजूनही ऑनलाईन घेत नाही. माझा माइण्डसेट असेल किंवा मला तेव्हढा भरोसा वाटत नाही हे कारण असेल. मग आलं अमेझॉन. आता सांगायला हरकत नाही पण मी अमेझॉन फॅन आहे. प्रचंड मोठी फॅन. कारण इतक्या वर्षात मला एकदाही अमेझॉनचा वाईट अनुभव नाही. कॅश ऑन डिलिव्हरी पासून अर्जंट डिलिव्हरी पर्यंत मी अमेझॉनचे सगळे पर्याय वापरले आहेत. मोबाईलपासून ऑक्सिडाईझ्ड दागिनायांपर्यंत काय वाट्टेल ते मागवले आहे. झिरो क्वेश्चन रिटर्न पॉलिसी आणि सांगितलेल्या वेळेच्या दोन दिवस आधी डिलिव्हरी त्यामुळे माझा अमेझॉनवर पूर्ण विश्वास आहे. एक कस्टमर म्हणून माझ्यासाठी ऑनलाईन शॉपिंगचा बेंचमार्क काय असेल तर अमेझॉन.

हळू हळू माझं अमेझॉनवर शॉपिंग करणं वाढू लागलं. इतकं की रात्री झोपायच्या आधी एकदा अमेझॉनवर चक्कर टाकून यायची. काही चांगलं दिसलं की एक तर ऍड टू कार्ट करायचं किंवा घेऊनच टाकायचं. लॉक डाऊन लागला तसा अमेझॉनवरचा वावर वाढला. त्याचबरोबर आता बाकीच्या वेबसाईट्सवरचा वावरही वाढला. शॉपिंगची सोय झाली. वस्तू घरात आल्यावर पॅकेट फोडेपर्यंत वाटणारा वा छान हा क्षण पॅकेट फोडलं की संपायला लागला. मग ती वस्तू कुठेतरी जागा शोधून ठेऊन द्यायची इतकेच काम उरलं.

मग मिंत्रा बघ, डिकॅथलॉन बघ सुरु झालं. मिंत्रावरून एक बॅग मागवली. ती फारशी काही आवडली नाही मग बॅग शोधणे सुरु झालं. मग दुसऱ्या वेबसाईटवर आवडली. मग तिथली किंमत कम्पेअर करून बघण्यासाठी तिसरी वेबसाईट उघडली. आता ही नवीन मालिका सुरु झाली. आपल्याला आवडलेली वस्तू आपण चार ठिकाणी हिंडून बघतो तशी चार वेबसाईट्स हिंडून बघता येण्याची सोय झाली.

यात आपल्याला खरंच ही वस्तू आत्ता घ्यायची गरज आहे का हा प्रश्न मनात आलाच नाही असं नाही. पण मग लागतातच की वस्तू असं स्वतःला सांगता यायला लागलं. स्ट्रेन्थ ट्रेनिंगला जायचं तर मॅट पाहिजे. ती मॅट घरात येईपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता. मॅट आल्यावर ती वापरली का? हो पण सतरंजीही चालली असती घरातली. पुस्तकं मागवली की घरात ती येऊन नीट लावली की परम आनंद. वाचायला वेळ कधी मिळणार? माहित नाही. छान छान संग्रही ठेवाव्याश्या वाटणाऱ्या वस्तू मागवल्या की त्या शोकेसमध्ये ठेवण्यात किंवा समोर मांडून ठेवेपर्यंत फसफसलेला उत्साह. समोर आहे, छान दिसतेय बास. घरात आल्याचा आनंद. पुढे त्याचं काय? माहित नाही.

आपल्याला का सगळं हवंय आणि आत्ताच का हवंय हा विचार माझ्या मनात साधारण वर्षभरापूर्वी सुरु झाला. त्याला कारण होती एक कन्सेप्ट. आपण भारंभार वस्तू आणतो कारण आपण माणसांना रिप्लेसमेंट म्हणून वस्तूंचा वापर करतो. हे शुगर रश सारखे आहे. आपल्याला साखर खाल्ल्यावर छान वाटते म्हणून आपण साखर खात राहतो. त्याच लेव्हलचं. आपण विकत घेतोय कारण आपल्यला छान वाटतंय. ते छान वाटणं पर्मनंट नाहीये हे लक्षातही येत नाहीये आपल्या. त्यातून ते छान वाटणं आपण माणसांना रिप्लेसमेंट म्हणून वापरतोय. हे सगळं वाचल्यावर मी भांबावले. इतकी वाईट परिस्थिती झालीय का आपली या विचाराने मला शॉक बसला. सुदैवाने अगदीच पॉईंट ऑफ नो रिटर्न झालेला नव्हता.

हे सगळं सविस्तर सांगावंसं वाटलं कारण हे सगळं आजूबाजूला पण दिसतंय. मला पडलेले काही प्रश्न, माझी काही मतं – निरीक्षणं प्रामाणिकपणे मांडतेय.

आपल्यापैकी प्रत्येकाच्या मोबाईलवर नेटफ्लिक्स बरोबरच ऍमेझॉन प्राईम, हॉटस्टार कमीत कमी असतील. बाकी सोनी लिव्ह, झी फाईव्ह वगैरे अनेक पर्यायही असू शकतील. यातल्या प्रत्येकाचं वार्षिक सभासदत्व कमीत कमी हजार रुपये आहे. आपण दिवसातून अर्धा ते एक तास बघायचं ठरवलं तरी आपण एका वेळी एकच ओटीटी प्लॅटफॉर्म बघू शकतो. हे मी सामान्य मध्यमवर्गीय काम करणाऱ्या, कामावर जाणाऱ्या येणाऱ्या वर्गाबद्दल बोलतेय. खरंच इतकी सब्स्क्रिप्शन्स लागतात का आपल्याला?

हेही नक्की वाचा मी आणि मिनिमलिझमभाग १- समोरील लिंकवर क्लिक करा -https://bit.ly/3xQ3xZ6

मी एका वेळी एकच पुस्तक वाचू शकते. कितीही लाडका लेखक किंवा लाडकी लेखिका असली तरी. हे मी पुस्तकांवर माझा विशेष जीव असूनही म्हणतेय.

आपण एका फॅमिली फंक्शनला जाणार असू तर त्या दिवशी घातलेले कपडे आपण शक्यतो त्याच फॅमिलीच्या दुसऱ्या फंक्शनला घालत नाही. आपल्याला शक्यतो एक्सक्लुझिव्ह कपडे हवे असतात. त्या पॅटर्नचे सगळ्यांकडे एक्सक्लुझिव्ह कपडे असले तरी.

ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा, एजिओ ही सगळी डेडिकेटेड शॉपिंग ऍप्स आहेत. याव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॉटफॉर्म वर स्वतंत्र शॉपिंग करता येतं. यातल्या प्रत्येक ऍपवर सतत कुठला ना कुठला सेल सुरु असतो. त्यात काही छान मिळूनही जातं. नाही असं नाही. पण बव्हंशी डीलचा मोह पडतोय म्हणून, फ्री मिळतंय म्हणून, डिलिव्हरी फ्री आहे किंवा केवळ छान वाटतंय घेऊन म्हणून घेतले जाण्याचीच शक्यता जास्त असते. तोच विकणाऱ्याचा उद्देशही असतो.

यात मी काहीही नवीन सांगत नाहीये याची मला पूर्ण जाणीव आहे. पण यात गुरफटून आपण वस्तूत आनंद शोधतोय का हे जेव्हा आतून जाणवलं तेव्हा हे जास्त लख्ख दिसायला लागलं.

काहीतरी बेसिकमध्ये गंडतंय आपलं हे कळल्यावर बेसिकपासून सुरुवात करायला पाहिजे, हे उघड होतं

तळटीप – ऍमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा एकूणच इ-रिटेलिंग कंपन्यांशी माझं काही वैर नाही. अजिबातच नाही. भांडवलशाही व्यवस्थेशी लढा वगैरे तर अजिबातच काही नाही कारण मी अत्यंत नगण्य सामान्य व्यक्ती आहे. त्यामुळे तसा काही रंग या सीरिजला देऊ नये ही नम्र विनंती.

क्रमशः

(लेखिका नामवंत ब्लॉगर आणि इंग्रजी लेखन व संवाद प्रशिक्षक आहेत)

[email protected]

1 COMMENT

  1. अगदी सहज सोप आणि पचेल असच लिहायच.. लिहित रहा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here