तीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध

-प्रा.डॉ. अजय देशपांडे

सांस्कृतिक संदर्भ ही राजकीय आणि सामाजिक इतिहासाची सामग्री असते.सांस्कृतिक संदर्भ खऱ्या स्वरूपात तेव्हाच तेव्हा कागदावर उतरला तर तो इतिहासाचा मौलिक साक्षीदार होतो.पण पुराव्याअभावी जर सांस्कृतिक संदर्भ लोकमानसात मौखिकरूपाने वर्षानुवर्षे टिकून राहिला तर लोकप्रतिभेने त्याची आख्यायिका होते.मग ती इतिहासाचा पुरावा असत नाही.विदर्भातील लोकनायक बापूजी अणे , थोर संशोधक डॉ.य.खु.देशपांडे आणि प्राचार्य राम शेवाळकर या तीन महनीय व्यक्तींचे परस्परांशी ज्ञानानुबंध होते. या सांस्कृतिक इतिहासाचे पुरावे आहेत.पण या इतिहासाचे दस्तऐवजीकरण मात्र फारसे झालेले नाही.

लोकनायक बापूजी अणे यांनी विदर्भात लेखन आणि संशोधनाच्या कार्याला सतत मदतीचा हात दिला. संशोधन आणि ज्ञानाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी बापूजींनी सतत प्रयत्न केले. लोकनायक राजकारण करीत होते पण त्याहीपेक्षा ते कृतिशील समाजकारणच अधिक करीत होते.म्हणूनच लोकनायक बापूजी अणे यांनी संशोधक डॉ. य.खु.देशपांडे आणि प्राचार्य राम शेवाळकर यांच्यासारख्या ज्ञानसाधकांशी स्नेहादराचे नाते ठेवले.

||०१||

खरे लोकनायक

विदर्भातील मोठ्या माणसांची कदर विदर्भाने केलीच नाही.लोकनायक विदर्भवादी होते हे सूर्य प्रकाशाएवढे खरे आहे.पण विदर्भाच्या मागणीसह लोकनायकांनी खूप मोठे आणि महत्त्वाचे कार्य व लेखन केले आहे.तेव्हा लोकनायक बापूजी अणे यांना केवळ विदर्भाच्या आंदोलनापुरत्या मर्यादित अवकाशात पाहिले जाऊ नये.

१० जुलै १९३० रोजी बापूजींच्या नेतृत्त्वात पुसद परिसरात जंगल सत्याग्रह करण्यात आला यावेळी जमलेल्या असंख्य सत्याग्रहींनी बापूजींना उत्सूर्तपणे लोकनायक ही पदवी बहाल केली असे सांगितले जाते.

१९२७ च्या आसपास आत्माराम रावजी देशपांडे (कवी अनिल) यांनी वर्धा नदीच्या तीरावरील कौंडिण्यपूर येथे उत्खनन करून थोडे संशोधन केले होते. विदर्भ- वऱ्हाडातील मौलिक अशा प्राचीन अवशेषांचे जतन करण्यासाठी शासनाचा पुरातत्व विभाग उदासीन असल्याची खंत व्यक्त करीत त्यासंदर्भातील काही प्रश्न पत्राद्वारे लोकनायक अणे आणि ॲड्. दादासाहेब खापर्डे यांना कळवले. त्यावेळी लोकनायक बापूजी लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे तर दादासाहेब काउन्सिल ऑफ स्टेटस् चे सभासद होते. दोघांनीही दोन्ही सभागृहात अनिलांचे प्रश्न मांडले.डायरेक्टर जनरल ऑफ आर्किऑलाॅजी या पदावर असणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांनी या प्रकरणी बापूजींची भेट घेऊन चर्चा केली. उत्खनन व संशोधन करून आपणास हे प्रश्न पाठवले त्या व्यक्तीला या विभागात नोकरी देण्याचेही त्या अधिकाऱ्याने बापूजींना सांगितले.लोकनायकांनी प्रश्न आणि इंग्रज सरकारने दिलेली उत्तरे असा दस्तऐवज अनिलांना देत ही सारी हकीकत सांगितली आणि नोकरीसाठी अर्ज करण्याचे सुचवले.पण त्याच वेळी अनिल यांची मध्यप्रदेशात सबजज्ज म्हणून नेमणूक झाल्याने ऑर्किऑलॉजी विभागातील नोकरीचा विषय तेथेच संपला. संशोधन आणि संशोधक या दोन्हींविषयी कृतिशील जागरुकता आणि सहृदयी आस्था लोकनायकांनी बाळगलेली दिसते.

१९६२ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत पंडित नेहरू कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ विदर्भात नागपूर येथे आले होते.नागविदर्भ समितीचे उमेदवार म्हणून बापूजी निवडणूक रिंगणात उतरले होते.नेहरूंना भर सभेत कोणीतरी प्रश्न विचारला की बापूजींना कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा का मागत नाही ? आणि तितक्याच तीव्रतेने नेहरूंनी उत्तर दिले की ‘बापूजी खास आदमी है | ताकद और हिंमत है तो उन्हे पराजित करे | वो क्या हस्ती है मैं जानता हू | अफसोस इस बात का है की आप उन्हे समझ नही पाये | “. नंतर जाहीर सभा शांततेत पार पडली.कॉंग्रेसमध्ये राहूनच बापूजींनी नागविदर्भ समितीचे उमेदवार म्हणून कॉंग्रेसच्या विरोधात निवडणूक लढून जिंकली. कारण बापूजी खरेखुरे लोकनायक होते.असे प्रसंग अजूनही सांगितले जातात.

लोकनायक कायद्याच्या पालनाच्या संदर्भात अत्यंत दक्ष होते. ०१ फेब्रुवारी १९२८ रोजी रिझर्व्ह बँकेच्या निर्मितीविषयक विधेयकासंदर्भात लोकसभेत बापूजींनी इंग्रज सरकारला कामकाजाच्या पद्धतींविषयीची समज दिली.१९२७ मध्ये मांडलेले विधेयक मागे न घेता त्याच विषयावर नवे विधेयक सरकारला कायद्याने मांडता येणार नाही, ही बाब बापूजींनी सभागृहात ठामपणे पटवून दिली आणि या दुसऱ्या विधेयकातील रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर व डेप्युटी गव्हर्नरपदी भारतीय वंशाचीच व्यक्ती असावी ही अट रद्द करण्यासंदर्भातील दुरुस्तीचे इंग्रज सरकारचे मनसुबे हाणून पाडले.लोकसभेचे सभापती विठ्ठलभाई पटेल यांनी बापूजींच्या बाजूने कौल दिला.शेवटी सरकारने ते विधेयक मागे घेतले.

बिहार मध्ये महापूरानंतर ज्यांचे सारे काही वाहून गेले अशा गोरगरीब जनतेला चोवीस तासात जर अन्नधान्य मिळाले नाही तर गंगेत प्राणाहुती देईन असे कोसी नदीच्या तीरावरून मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांना बजावणारे आणि खरोखरच पूरग्रस्तांना त्वरित अन्नधान्य मिळवून देणारे राज्यपाल बापूजी अणे साऱ्या देशाने पाहिले आहेत.

कॉंग्रेसच्या यवतमाळ येथील प्रांतिक अधिवेशनात सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले होते ,” जोपर्यंत बापूजी अणे यांच्या हातात चरखा दिसणार नाही तोपर्यंत विदर्भ- वऱ्हाड महात्मा गांधींच्या मागे आहे असे आम्ही समजू शकत नाही ” हे विधान टिळकांचे निष्ठावान असणाऱ्या बापूजींच्या संदर्भात फार महत्त्वाचे आहे.बापूजी टिळकांचे निष्ठावान होते हे खरेच आहे पण आपली विचारसरणी आणि स्वाभिमान यांचा स्वतंत्र बाणा बापूजींनी कायमच राखला. प्रसंगी टिळकांच्या गीतारहस्य सारख्या बहुचर्चित लेखनाची सप्रमाण चिकित्साही केली.जाहीर भाषणात नाव न घेता ‘मोहनास्त्र’ असा शब्द नेमका वापरून गांधींच्या धोरणांवरही टीका केली आणि योग्य त्यावेळी गांधींच्या आंदोलनांना सहकार्य ही केले.

लोकसंग्राहक लोकनायकांचे सारे लेखन आणि त्यांच्या विषयीचे सारे लेखन पुन्हा एकदा प्रकाशित करण्याची गरज आहे.

    ||०२ ||

लोकनायक आणि डॉ. य.खु.देशपांडे

  संशोधनास प्रतिकूल वातावरण विदर्भ या प्रदेशाचे एक वैशिष्ट्य आहे तसेच संशोधक व संशोधनग्रंथ यांची अक्षम्य उपेक्षादेखील या प्रांताने अनेकदा केली आहे.पण प्रतिकूल परिस्थिती हीच संशोधनाची योग्य वेळ असते.याची प्रचिती विदर्भातील अनेक संशोधकांनी वेळोवेळी घडवली आहे.

विद्याव्यासंगी थोर संशोधक डॉ.य.खु.देशपांडे यांच्या आयुष्यातील एक घटना त्यांची आणि लोकनायक बापूजी अणे यांची प्रतिकूल काळातील अविचल संशोधननिष्ठा दर्शवणारी आहे.

१९०६ मध्ये अमरावतीला डॉ.देशपांडे आणि लोकनायक बापूजी अणे यांची पहिली भेट वणी येथील रामभाऊ भागवत यांनी करून दिली. तेव्हापासून या दोघांतील स्नेहबंध कायम होते. पुढे १९२६ मध्ये यवतमाळ येथे ‘शारदाश्रम’ ही संस्था स्थापन झाली.लोकनायक अणे या संस्थेचे अध्यक्ष आणि डॉ.देशपांडे चिटणीस होते.

इ. स. १९३८ साली स्वित्झर्लंडमधील झ्युरिच येथे होणाऱ्या जागतिक ऐतिहासिक परिषद आणि बेल्जिअममधील ब्रुसेल्स येथे आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्यापरिषद या दोन महत्त्वाच्या परिषदांना प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहावयाचे व शोधनिबंध सादर करावयाचे निमंत्रण एक वर्ष अगोदर शारदाश्रम या संस्थेचे चिटणीस डॉ.देशपांडे यांना प्राप्त झाले. पण संस्थेची आणि डॉ.देशपांडे यांचीही पाच हजार रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय परिषदेस जाण्याची आर्थिक परिस्थिती नव्हती. परिषदेचे निमंत्रण मिळाले असले तरी त्यासाठीचा खर्च परवडणारा नाही , मुख्य म्हणजे तेवढ्या रक्कमेची तजवीज होणे अशक्य आहे असे डॉ.देशपांडे यांनी लोकनायक बापूजींना सांगितले. डॉ.देशपांडे यांच्या अविचल संशोधननिष्ठेविषयी व अविश्रांत संशोधनवृत्तीविषयी अपार स्नेहादर असलेल्या बापूजींनी त्यांना परिषदेस जाण्याची तयारी करा , शोधनिबंध लिहा , पाच हजार रुपयांच्या खर्चाची तरतूद होईल, असे सांगितले. परिषदेला तीन महिने अवधी असताना लोकनायकांनी हजार रुपयांची तरतूद करून देत डॉ.देशपांडे यांना जाण्या – येण्याची तिकिटे व आवश्यक ते साहित्य वगैरे घेण्यास सांगितले.पुढे आक्टोबर १९३८ ते एप्रिल १९३९ म्हणजे सात महिने डॉ.देशपांडे यांनी परदेशात राहून संशोधन केले.त्यांचा पूर्ण खर्च पाच हजार रुपये लोकनायकांनी दिला.या प्रवासासाठी दिल्ली येथील भुलाभाई देसाई यांनी सातशे रुपयांचा धनादेश देऊन मदत केली, असे लोकनायक सांगत .पण उर्वरित रक्कम लोकनायकांनीच आपल्या परीने उभी केली. डॉ.देशपांडे यांच्या संशोधनाला लोकनायकांची सहृदयी आस्था लाभली होती. हे सारे डॉ.देशपांडे व ॲड्.नारायण हूड यांनी लिहून ठेवले ,म्हणूनच आज सांगणे शक्य होते.

डॉ.देशपांडे यांनी आयुष्यभर प्राणपणाने प्रचंड संशोधन केले. त्यांनी सुमारे पाच हजार संस्कृत व मराठी हस्तलिखित ग्रंथ, सुमारे दोन हजार मराठी व फारशी ऐतिहासिक कागदपत्रे आणि विविध नाणी, शिलालेख, ताम्रपट , ऐतिहासिक स्थळांची व वास्तू शिल्पांची छायाचित्रे, दुर्मिळ मूर्ती अशी अमूल्य सामुग्री परिश्रमपूर्वक संग्रहित केली.नवी मर्मदृष्टी देणारे विपुल असे मौलिक संशोधन केले.

डॉ..देशपांडे यांचे संशोधन व स्फुट लेखन काळाच्या पडद्याआड जाऊ नये म्हणून संशोधनाप्रती अपार आदर असणाऱ्या प्राचार्य राम शेवाळकर यांनी डॉ.य.खु.देशपांडे ह्यांचा निवडक लेखसंग्रह -‘ यशोधन ‘ हा ग्रंथ परिश्रमपूर्वक संपादित केला व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने हा ग्रंथ १९८८ मध्ये प्रकाशित केला.म्हणून डॉ.देशपांडे यांचे काही संशोधन पुढील पिढ्यांसाठी जतन करून ठेवले गेले.

त्याकाळी यवतमाळसारख्या ठिकाणीही अत्यंत सजगपणे , निष्ठेने, पदरमोड करून संशोधनाचे कार्य सुरू होते.आता त्या साऱ्या संशोधनकार्याचे स्मरण सुद्धा केले जात नाही.१९५३ मध्ये “विदर्भ संशोधनाचा इतिहास” हा ग्रंथ आणि ॲड्. नारायण नागोराव हूड हे नाव आता विस्मृतीच्या गर्तेत गेले आहे. ॲड्. प्र.रा. देशमुख यांनी ‘सिंधू संस्कृती , ऋग्वेद व हिंदू संस्कृती’ हा १९६६ मध्ये परिश्रमपूर्वक लिहिलेला महत्त्वाचा संशोधन ग्रंथ विस्मृतीत जाण्याआधीच पुनर्मुद्रित करण्याची गरज आहे.

डॉ.देशपांडे यांच्यापासून आजतागायत यवतमाळ येथे संशोधनाचे कार्य सुरूच आहे.आजही यवतमाळात डॉ.अशोक राणांसारखे अभ्यासक निष्ठेने एकाकीपणे संशोधन करीत आहेत. पण आज विदर्भात संशोधकांना सहकार्य करणाऱ्या सहृदयी, उदार , निष्ठावंत, खंबीर माणसांची आणि संशोधनाची दखल घेत संशोधनकार्याच्या बाजूने आस्थापूर्वक निःपक्षपणे उभ्या राहणाऱ्या कृतिशील संस्थांची मात्र मोठी उणीव आहे.

||०३||

लोकनायक आणि शेवाळकर 

प्राचार्य राम शेवाळकर यांचे वणीशी अमीट असे नाते आहे तर लोकनायक बापूजी अणे हे वणीचे थोर सुपुत्र आहेत.विदर्भातल्या इवल्याशा वणीशी नाते असणाऱ्या या दोन्ही महनीय प्रतिभावंतांनी वाणी आणि लेखणीने या गावाचे नाव आणि अस्तित्व जगाच्या नकाशावर ठळक केले. खरे तर बापूजी अणे हे शेवाळकरांपेक्षा वयाने सुमारे पन्नास वर्षांनी जेष्ठ होते.लोकनायकांचे अतुलनीय कर्तृत्व आणि प्रतिभासंपन्न ज्ञानमग्न व्यक्तिमत्त्व शेवाळकरांच्या सृजनशील आणि ज्ञानासक्त मनाला भावले. महनीय प्रतिभेला महनीय प्रतिभेविषयीच अपार आदर असतो.लोकनायक आणि प्राचार्य शेवाळकर यांचे नाते सृजनशील ज्ञानानुबंधाचे होते .शेवाळकरांना बापूजींच्या वाणी आणि लेखणी बद्दल नितांत आदर असल्याचे दिसते.विचारशील अशा सृजनशील लेखनाविषयी शेवाळकरांना निस्सीम आस्था होती.मन:पूर्वक स्नेहशीलता जपताना या दोन्ही माणसांनी कृत्रिमता आणि कटुता कधी बाळगली नाही त्यामुळे लोकस्नेहाची अपार श्रीमंती दोघांनाही लाभली.सर्वसमावेशकता आणि गुणग्राहकता या दोन्ही गुणांचे धनी असणाऱ्या या थोर माणसांनी विरोधकांच्याही गुणवत्तेचा आदरच केला.निष्ठेने स्वत्व जोपासत समष्टीत मिसळून जाण्याचा बाणा दोघांच्याही ठायी होता.खरेतर बापूजी विदर्भवादी आणि शेवाळकर महाराष्ट्रवादी पण विचार आणि भूमिका वेगवेगळ्या असतानाही परस्पर स्नेह आणि आदर सतत वाढत राहिला. शेवाळकर लिहितात , ” मी वृत्तीने महाराष्ट्रवादी होतो .आहेही.बापूजी विदर्भावाद्यांचे पुढारी होते.हे मतभेद आमच्या ऋणानुबंधाच्या कधी आड आले नाहीत.हा अर्थात बापूजींचा मोठेपणा होता.”(पाणीयावरी मकरी पृ.१९२)

लोकनायकांविषयी शेवाळकरांनी खूप मनःपूर्वक आणि स्नेहादराने लिहिले आहे.लोकनायकांच्या वाङ्मयीन आणि वैचारिक लेखांचा ‘ अक्षरमाधव ‘ या संग्रहाचे संपादन असो की ‘ धर्मज्ञ: स.हि.माधव: ‘ हा लेख असो बापूजींविषयी लिहिताना शेवाळकरांची लेखणी अपार आदराने मोहरून येते. ज्ञानलालसा आणि प्रगमनशीलदृष्टी हे बापूजींच्या व्यक्तिमत्त्वातील मौलिक पैलू शेवाळकरांनी सृजनशीलतेने उलगडून दाखवले आहेत. ज्ञानाच्या प्रकाशात सत्याचा शोध घेणारे बापूजी शेवाळकरांना भावतात.’अक्षरमाधव ‘ या ग्रंथांच्या संपादनाचे प्रयोजन कथन करताना शेवाळकर लिहितात , ” ..आम्ही त्यांच्या वाङ्मयीन व वैचारिक लेखांचा संग्रह ‘अक्षरमाधव’ या नावाने प्रसिद्ध केला. तो करण्यामागे उद्देशच असा होता. बापूजी अण्यांचा जन्म राजकारणात गेला. टिळकभक्त असूनही टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांनी गांधीजींचे अनुयायित्व पत्करले. त्यामुळे टिळकपक्षीय राजकारण्यांमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी होती. आयुष्याच्या सायंकाळी त्यांच्याकडे महाविदर्भाच्या चळवळीचे नेतृत्व आले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या ऐन रणधुमाळीत बापूजींनी स्वतंत्र विदर्भाची पर्यायाने महाराष्ट्र विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांच्याबद्दलची अप्रियता उफाळूनच आली. राजकारणातील यशामुळे वा अपयशामुळे बापूजींच्या व्यक्तित्वातील ज्ञानोपासकाचा पैलू स्वाभाविक उपेक्षिला गेला.राजकारण किंवा राजकारणातील कर्तृत्व किंवा त्यातील यशापयश हे केव्हाही तत्कालिक महत्त्वाचे असतात. त्या धुरोळ्यात त्यांची ज्ञानोपासना झाकोळली जाणे स्वाभाविकही असते. तो धुराळा शमल्यावर ज्ञानी म्हणून असणारे बापूजींचे महत्त्व नेहमीसाठीच अधोरेखित व्हावे, अशी आमची तळमळ होती. ” ( पाणीयावरी मकरी पृ.१८८,१८९ )

लोकनायकांच्या विद्वत्तेचे, त्यांच्या राजकीय, वैचारिक आणि वाङ्मयीन लेखनाचे जतन व्हावे, त्यांच्या भाषणांचेही जतन व्हावे यासाठी शेवाळकरांनी अपार आस्थेने कृतिशील प्रयत्न केले. राजकारणातील अनेक संदर्भ तात्कालिक असतात कालांतराने राजकारणाचे संदर्भ आणि स्वरूप बदलतही असते पण विद्वत्ता कालौघात अधिक उजळून मौलिक होत जाते. लोकनायकांच्या विद्वत्तापूर्ण वैचारिक आणि वाङ्मयीन लेखनाच्या संपादनातून शेवाळकरांची मर्मग्राही दृष्टी आणि ज्ञानसाधक वृत्ती दिसून येते. पुढील पिढ्यांसाठी लोकनायकांचे लेखन जतन करणाऱ्या शेवाळकरांनी वणीत लोकनायकांचा अर्धाकृती पुतळा उभारून संस्मरणीय असे कार्य केले आहे. वणीला बापूजींच्या स्मरणार्थ दोन व्याख्यानमाला शेवाळकरांच्या पुढाकाराने सुरू झाल्या त्या आजतागायत सुरू आहेत. शेवाळकरांना लोकनायकांविषयी अपार आदर होता.महनीय प्रतिभावंतांची स्नेह आणि आदर व्यक्त करण्याची रीतही संस्मरणीय अशीच असते. बापूजींविषयीचा आदर शेवाळकरांनी वाणी , लेखणी आणि कृतीतून व्यक्त केला. लोकनायकांचे लेखन, लोकनायकांविषयीचे लेखन आदीप्रकारची संपादने , लोकनायकांचा पुतळा उभारणे आणि लोकनायकांच्या स्मरणार्थ व्याख्यानमाला सुरू करणे ही सारी कृतिशीलता शेवाळकरांच्या सर्वस्पर्शी आणि मर्मग्राही विद्वतेचे वाङ्मयीन,सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील दूरदृष्टीचे संस्मरणीय असे द्योतक आहे.

प्राचार्य राम शेवाळकर यांच्या वाणी आणि लेखणीने साऱ्या जगातल्या मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या वाणीने इतिहास घडविला. त्यांनी विपुल लेखन केले.कविता आत्मकथनपरलेख ,व्यक्तिवेध घेणारे लेखन, चरित्रात्मक लेखन ,अनुभवपर लेखन , संस्कृतसाहित्यकृतींचा आस्वाद घेणारे लेखन , शिक्षणविषयक लेखन, अलक्षित इतिहासासंदर्भात नवे आकलन मांडणारे लेखन , चिंतनात्मक लेखन, समीक्षणात्मक लेखन असे विपुल लेखन त्यांनी केले. शिवाय महत्त्वाचे अनुवाद ,वैशिष्ट्यपूर्ण संपादने आणि काही नियतकालिकांची संपादनेही केली . प्राचार्य शेेवाळकर यांच्या या सार्‍या लेखनातून त्यांच्या प्रसन्न सकारात्मक जीवनदृष्टीचा , ज्ञानासक्त विद्वत्तेचा आणि संवेदनशील कवीमनाचाही प्रत्यय येतो .हे सारे लेखन नवे संदर्भ ,नवी दृष्टी ,नवा विचार देणारे आहे. हे सारे जसे खरे आहे तसेच हे देखील खरे आहे की शेवाळकरांनी लोकनायक बापूजी अणे , थोर संशोधक य.खु.देशपांडे यांच्या साहित्याचे जतन व्हावे म्हणून केलेली संपादने आणि वाङ्मयीन व सामाजिक कार्ये फार महत्त्वाची आणि मौलिक आहेत. शेवाळकरांनी परिश्रमपूर्वक संपादित केलेले लोकनायकांच्या लेखनाचे ‘अक्षरमाधव ‘ भाग एक व दोन हे ग्रंथ पुढच्या पिढ्यांसाठी पुन्हा संपादित व मुद्रित करण्याची आज गरज आहे. खरेतर शेवाळकरांच्या समग्र लेखनाचेही संकलन करून ते प्रकाशित करण्याची गरज आहे.

खरे तर आता समग्र लोकनायक , समग्र डॉ. य.खु.देशपांडे आणि समग्र राम शेवाळकर ही तीन महत्त्वाची संपादने तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे.

( लेखक समीक्षक आहेत.)

मराठी भाषा आणि साहित्य विभाग
लोकमान्य टिळक महाविद्यालय
वणी ४४५३०४ जि.यवतमाळ
संपर्क : ९८५०५९३०३०