–प्रवीण बर्दापूरकर
■विदर्भाच्या राजकारण , समाजकारण , शिक्षण , पर्यावरण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील ज्येष्ठ नेते गिरीश गांधी आज , २३ जुलै २०२२ला वयाच्या पंच्याहत्तरीत प्रवेश करत आहेत . त्यानिमित्ताने प्रकाशित होणाऱ्या ‘सावली’ या गौरव ग्रंथातील हा ‘अनकट ‘ लेख –
एखादं शहर पूर्ण जाणून घ्यायचं असेल तर अगदी गल्लीबोळात मनसोक्त पायी फिरा , लोकांशी बोला , त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐका आणि एखादा माणूस जाणून घ्यायचा असेल तर त्याच्यासोबत फिरा , त्याचा गोतावळा बघा , त्यांच्याशी बोला ; अशी शहर आणि माणूस जाणून घेण्याची शैली अनेकांची असते ; माझीही आहे . गिरीश गांधी यांची ओळख १९८१त झाली . मानव मंदिर या संस्थेच्यावतीने गरीब-गरजू विद्यार्थ्यांना तेव्हा मोफत सायकली दिल्या जात . शेकडोनं अर्ज येत . त्यातील पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी जी समिती गिरीश गांधी आणि अनंतराव घारड नेमत , त्यात चार वर्ष माझाही समावेश होता . त्या चार वर्षात प्रशस्त रस्त्यांच्या पलीकडे असलेलं झोपडपट्टीत , नाल्याच्या कांठावर राहणारं , नागरी सुविधांचा नावनिशाणा नसलेलं आत्यंतिक गरीब नागपूर अनुभवायला मिळालं . त्या भटकंतीतून नागपूरच्या मातीचा एक भाग मी झालो . जसं नागपूर उमजत गेलं तसंच या काळात गिरीश गांधीही तुकड्या-तुकड्यात समजत गेले . माणूस म्हटल्यावर गुण आणि दोष आलेच ; गिरीश गांधीही त्याला अपवाद नाहीतच पण , हा माणूस जिव्हाळ्याची सावली होऊन आपल्यासोबत वावरत असतो , हाच आजवरचा अनेकांचा अनुभव आहे , हे नि:संकोचपणे मान्य करायलाच हवं . या म्हणण्याचे अनेक दाखले देता येतील पण , त्यातील कांही अनुभव इतके वैयक्तिक आहेत की , ते सांगितलेले गिरीश गांधी यांनाही आवडणार नाही .
नितळ गव्हाळ वर्ण , डोईवरचे काहीसे फुगवून मागे वळवलेले केस , मध्यम ऊंची , अंगावर साधारण अर्ध्या बाह्यांचा तलम खादीचा शक्यतो बुशशर्ट , त्या शर्टाच्या खिशाला हिरव्या शाईचा पेन , मंद रंगाची फुलपॅन्ट , बोलण्याचा स्वर बहुतांश वेळा ऋजू , असं गिरीश गांधी यांचं एकूण व्यक्तिमत्त्व आहे . ‘गिरीश भाऊ ‘ हे त्यांचं प्रचलित उल्लेखन परिवारात आहे . समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील गुणवंतांची मांदियाळी जमा करणं आणि त्यात रमणं , हा या माणसाचा छंद आहे . या आघाडीवर हा माणूस एवढा छंदिष्ट आहे की , एकटे गिरीश गांधी त्यांच्या घरातही पाहायला मिळत नाहीत . या छंदाचा विस्तार म्हणजे मित्र आणि मान्यवरांना , घरी किंवा हॉटेलात नेऊन भरपूर आग्रहानं खिलवणं हा आहे .
आसामात एका चहाच्या मळ्यात मॅनेजर म्हणून मिळणारी संधी नाकारुन सुमारे पाच-साडेपाच दशकापूर्वी वरुडहून नोकरीसाठी नागपूरला आलेले गिरीश गांधी आता नागपूरच्या सार्वजनिक जीवनाचा एक अविभाज्य घटक झालेले आहेत . राजकारण , समाजकारण , पर्यावरण व वृक्ष संवर्धन , पत्रकारिता , शिक्षण , कृषी तसंच सांस्कृतिकतेच्या विविध दालनात गिरीश गांधी यांचा कार्यकर्ता ते नेता असा वैविध्यपूर्ण वावर आहे . गिरीश गांधी यांच्या वावरामुळे या सर्वच क्षेत्रात उत्साह संचारला हे नाकबूल करणं आत्मवंचना ठरेल . अनेक संस्था संघटनांच्या व्यवहारात कांही क्षणांपूर्वी कार्यकर्ता किंवा संघटकांच्या भूमिकेत वावरणारे गिरीश गांधी नंतर व्यासपीठावर दिसतात . नुसतेच दिसत नाहीत तर , सभा गाजवून टाकतात . किती संस्था आणि संघटनांशी गिरीश गांधी संबंधित आहेत यांची यादी करता येईल पण , किती संस्था व संघटनांना त्यांनी प्रेरणा दिली , आर्थिक बळ पुरवलं आहे , त्याची मात्र संख्या सांगता येणार नाही इतकी ती मोठी आहे .
अगदी हेच गिरीश गांधी यांनी संकट समयी मदत केलेल्या माणसांबाबतही लागू आहे . समोरच्यांचा परदेश प्रवास असो की घर घेणं की आजारपण की गरजूला नोकरी मिळवून देणं , अशा अनेक समयी गिरीश गांधी यांचा हात कायम खंबीर दात्याच्या भूमिकेत असतो . मी तर नेहमी म्हणतो , ‘समोरचा स्नेहीजन संकटात येण्याच्या नेमक्या वेळी गिरीश गांधी यांचा धीर देणारा एक हात त्याच्या पाठीवर आणि दुसरा त्याच्या खिशात असतो’ . एखाद्याला नोकरी मिळवून देण्यासाठी तो गरजू जितक्या चकरा मारणार नाही त्यापेक्षा जास्त हेलपाटे त्या संस्थेच्या व्यवस्थापनाकडे गिरीश गांधी मारणार , असा अनुभव मी अनेकांच्या बाबतीत अनेकदा घेतलेला आहे . यातल्या फारच थोड्या माणसांनी त्या मदतीबद्दल गिरीश गांधी यांच्याबद्दल कायम कृतज्ञता बाळगली असल्याचाही अनुभव आहे मात्र , अंतरीचं हे शल्य सहसा उघड न करण्याचा सुसंस्कृतपणा गिरीश गांधी यांच्यात आहे . हे असं वागणं फार कमी लोकांना जमतं , हे नक्की .
संस्थात्मक पातळीवर वावरताना गिरीश गांधींनी बाळगलेली शिस्त आवर्जून लक्षात घेण्यासारखी आहे . पदाधिकारी म्हणून नातं असलेल्या गिरीश गांधी यांच्या प्रत्येक संस्थेची प्रशासकीय आणि आर्थिक घडी अनुकरणीय आहे . त्यांच्या नेतृत्वाखालील प्रत्येक संस्था आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आणि सर्व हिशेब तसंच कार्यालयीन रेकॉर्ड एकदम चोख . ज्या कामासाठी संस्था स्थापन केली त्या कामासाठी निधी कधी कमी पडल्याचा अनुभव गिरीश गांधी यांच्या बाबतीत येत नाही . रुपयांच्या कमी होणाऱ्या अवमूल्यनामुळे निधी क्वचित कमी पडला तर , त्यासाठी अन्य कोणत्या संस्थेतून निधी वळता करुन घेण्याचा अव्यापरेषू व्यवहार गिरीश गांधी कधीच करत नाहीत तर हवी तेवढी भर टाकतात . त्यामुळे एका संस्थेच्या आर्थिक व्यवहाराच्या तंगड्या दुसऱ्या संस्थेच्या पायात अडकलेल्या आहेत आणि एका क्षणी दोन्ही संस्थांचे व्यवहार ठप्प झालेले आहेत असं होत नाही . अनेक संस्थांचं सारथ्य करत असतांना ‘इकडून तिकडे’ पैसे वळवण्याचा ट्रेंड सार्वत्रिक असतांना गिरीश गांधी मात्र त्याला अपवाद आहेत .









