जे जे खावे आपण, तेचि करावे अर्पण

-डॉ. मुकुंद कुळे

………………………….

कुणी काय खावं आणि प्यावं, हे आताआतापर्यंत तरी धर्माच्या कचाट्यात सापडलेलं नव्हतं. माणूसच नाही तर, अगदी देवांनीही काय खावं-प्यावं ते त्याचे भक्त- सामान्यजनच ठरवत होते. कारण भक्तांचं खाणं काय नि त्यांच्या देवाचं खाणं काय; ते ठरत होतं, तिथल्या मातीत काय पिकतं त्यावर. तसंच भक्ताची सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक स्थिती काय आहे त्याच्यावर. शेवटी भक्ताला जे परवडणार तेच तर तो आपल्या देवाला नैवेद्य म्हणून दाखवणार. कुणी साजुक तुपातला शिरा नैवेद्य म्हणून देवासमोर ठेवेल, कुणी नुसतेच साखर फुटाणे, कुणी साखरेचे चार दाणे, किंवा कुणी अगदी काहीच नाही ठेवणार देवापुढे, पण त्यामुळे बिघडतं कुठे काय देवाचं नि त्याच्या भक्तांचंही… कारण शेवटी श्रद्धाच तर महत्त्वाची! अन् तरीही देव काय खातो-पितो ते आजच्या दुनियेत महत्त्वाचं ठरतं म्हाराजा! नाही तर त्या महुआ मोईत्राच्या मागे सारे हात धुऊन का लागले असते?

निमित्त होतं लीना मेखमलाई हिच्या ‘काली’ डॉक्युमेंटरीच्या वादग्रस्त पोस्टरचं. पोस्टरच्या निमित्ताने तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा फक्त एवढंच म्हणाल्या- ‘कालीच्या पूजाअर्चेत नैवेद्य म्हणून मांस-मद्याचा समावेश केला जातो. मग लीना मेखमलाई यांनी तसं दाखवलं असेल तर त्यात आक्षेपार्ह काय आहे?’ लीना मेखमलाई यांच्या पोस्टरमुळे कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर आपण समजू शकतो. परंतु महुआ मोईत्रा यांच्या वक्तव्यात मात्र काहीच वादग्रस्त नव्हतं. कारण आपल्या देवदेवता सुरापान करीत असल्याचे दाखले अनेक प्राचीन ग्रंथांत आहेत. तसंच प्रसंगी मांसाहारही त्यांना वर्ज्य नसल्याचीही उदाहरणं आहेत. अगदी देवतांना प्रसन्न करण्यासाठी केल्या जाणाऱ्या यज्ञातही पशुबळी देण्याची आणि नंतर ते खाण्याची पद्धत रूढ होती. गेला बाजार संपूर्ण भारतातल्या ज्या लोकदेवता आहेत, त्या तर बहुतांशी मांसाहारीच आहेत आणि क्वचित प्रसंगी त्यांना मद्याचा नैवेद्यही दाखवला जातो.

देवतांमध्येही काही प्रकार आहेत- सौम्य रूपा आणि उग्ररूपा! लक्ष्मी-विष्णू, गणपती, सरस्वती यांसारख्या देवता या सौम्यरूपा आहेत. साहजिकच त्यांच्या दैनंदिन किंवा वार्षिक उत्सवात कुठेही मांसाहार किंवा मद्याचा अगदी नावालाही समावेश नसतो. किंबहुना या देवतांच्या सण-उत्सव प्रसंगी त्यांचे भक्तही मांसाहार-मत्स्याहार वर्ज्य करतात. याउलट ज्या उग्रदेवता आहेत- अंबा, भवानी, काली, दुर्गा, कामाख्या, म्हसोबा, भैरोबा… यांच्या रोजच्या पूजाअर्चेत नाही, मात्र वार्षिक उत्सवात मांसाहाराचा-मद्याचा आवर्जून समावेश केला जातो. कारण या देवता एकप्रकारे तामसी आहेत, कोपिष्ट आहेत. साहजिकच मग त्यांचा आहारही तसाच असतो, त्यांच्या लौकिकाला साजेसा.

हा मांसाहार किंवा मद्याचा नैवेद्य फक्त लोकदेवता किंवा ग्रामदेवतेलाच वार्षिक उत्सवात दाखवला जातो असं नाही. काही भारतीय समाजांत तर घरी येणाऱ्या देवतेलाही मांसाहाराचा नैवेद्य दाखवण्याची पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे. अगदी उदाहरण देऊनच बोलायचं तर प्रामुख्याने मुंबई-ठाणे-उरण परिसरात वास्तव्य असणाऱ्या पाचकळशी, म्हणजेच सोमवंशी क्षत्रिय पाठारे समाजात गौरीला मत्स्याहाराचा नैवेद्य दाखवण्याची पहिल्यापासून पद्धत आहे. गौरी जेवतात, त्यादिवशी त्यांना दाखवायच्या नैवेद्याच्या ताटात भरलेलं पापलेट, खिम्याची करंजी, करंदीचं पॅटीस, कोलंबीची अळुवडी असे अनेक मांसाहारी पदार्थ ठेवले जातात. किंबहुन देवीसाठी कोणते आणि किती मत्स्याहारी पदार्थ करू, असं घरच्या गृहिणीला होतं. पूर्वी घरं मोठमोठी होती तेव्हा या मांसाहारी ताटामुळे गणपती आणि गौर वेगवेगळ्या खोलीत बसवले जायचे. कारण गणपतीला मांसाहार चालत नाही. परंतु, आता जागेअभावी गौर-गणपती बाजूबाजूला बसले तरी, गौरीचं मत्स्याहाराचं ताट तिथेच मांडलं जातं. फक्त गौरीला मत्स्याहारी नैवेद्याचं ताट दाखवताना मध्ये पडदा धरला जातो. म्हणजे मध्यभागी पडदा धरून गणपतीला शाकाहारी नैवेद्य दाखवला जातो, तर गौरीला मत्स्याहाराचा. तीन दिवसांसाठी माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौरीला प्रेमाने खाऊ-पिऊ घालताना तिला आवडणारा मत्स्याहार देण्याची प्रथा या समाजाने आजही कायम राखलीय. कारण हा समाज मूळ समुद्र किनाऱ्याजवळ राहणारा असल्यामुळे मासे हे त्याचं प्रिय खाणं आहे. आणि साहजिकच जे त्याला प्रिय तेच त्याच्या प्रिय गौराईलादेखील!

केवळ सोमवंशी क्षत्रिय पाठारे समाजातच नाही तर, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू, पाठारे प्रभू या समाजातही गौरीला आवर्जून मत्स्याहाराचा नैवेद्य दाखवला जातो आणि क्वचित कधी मद्याची लहान वाटीही गौरीसमोर ठेवली जाते. अगदी अशीच प्रथा कोकणातील कुणबी समाजातही आहे. गौरी जेवणार त्यादिवशी कुणबी समाजाच्या घरी वडे-सागोतीचा बेत हमखास असतोच. मात्र जोवर गौरबाय वडे-सागोती खात नाही आणि तीर्थ म्हणून दारू चाखत नाही तोपर्यंत घरातील कुणीही वडे-सागोती उष्टावत नाही. पण ग्रामदेवता किंवा तीन दिवसाची पाहुणी म्हणून येणारी गौरबायच कशाला, काही समाजात तर आपल्या घरातील कुलदेवतेलाही तिच्या वार्षिक घरजत्रेच्या दिवशी मांसाहाराचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. विशेषतः महाराष्ट्रातल्या पालघर जिल्हयातील वाडवळ समाजात कुलदेवतेच्या वार्षिक जत्रोत्सवात देवाची पूजा झाल्यावर त्याला कोलंबी, कांदा आणि कैरीचं कालवण नैवेद्य म्हणून दाखवलं जातं. अगदी घरात देवासमोरच कोंबडंही कापलं जातं. अर्थात आपल्या देवाला असा मांसाहाराचा-मत्स्याहाराचा व वेळप्रंसगी मद्याचाही नैवेद्य दाखवण्यात काहीच गैर नाही. कारण जो भक्तांचा-जनतेचा आहार तोच त्यांच्या देवांचाही आहार असतो आणि ते साहजिक व नैसर्गिक आहे. ज्या भौगोलिक प्रदेशात जे पीक येतं, त्या पिकांतूनच तिथल्या लोकांची खाद्यसंसकृती आकाराला येते; याच न्यायाने सर्वसामान्य जनता जे स्वतः खाते, त्याचाच नैवैद्य आपल्या देवाला दाखवणार!

हेही वाचायला विसरू नकामोदी सरकारवर बेधडक वार करणार्‍या महुआ मोईत्रासमोरील लिंकवर क्लिक कराhttps://bit.ly/3Iucpqu

मग महुआ मोईत्रा यांच्या विधानावरून एवढा गहजब माजण्याचं कारण काय? बंगाली माणसाला तर मत्स्याहार अतिशय प्रिय आहे. त्यांच्या वेगवेगळ्या सांस्कृतिक विधीत मासा हा एक अपरिहार्य घटक आहे, नव्हे मासा हा बंगाली माणसाच बहिश्चर प्राण आहे. मग त्यांची देवता असलेल्या कालीला तो वर्ज्य कसा असणार? अन् तरीही महुआ मोईत्राच्या विधानावरून वावटळ उठलं, कारण ज्यांच्या हातात धार्मिक-सांस्कृतिक सूत्र आहेत, त्यांना ‘एक देश, एक धर्म आणि एक संस्कृती’ करायचीय. भारतातील संपूर्ण हिंदू समाज जणू काही शाकाहारी आहे, असाच त्यांचा समज आहे, किंबहुना तो शाकाहारी व्हावा, अशी त्यांची तीव्र इच्छा आहे. शाकाहाराला नाव ठेवण्याची गरज नाही, तो चांगलाच आहे, परंतु त्यासाठी मांसाहार-मत्स्याहाराला दुय्यम लेखण्याची गरज नाही. परंतु प्रत्यक्षात मांसाहार आणि तो करणाऱ्याला दुय्यम लेखण्याला सुरुवात झाली आहे आणि त्यासाठीच आता धर्म व देवदेवतांनाही वेठीला धरलं जात आहे. देवता आणि त्यांच्या शाकाहारी नैवेद्याची तर अशी काही गाठ मारून ठेवलीय की, सणावाराला देवाला मांसाहारी नैवेद्य कसा दाखवायचा, असा प्रश्न आता लोकांना पडू लागला आहे. सनातन्यांनी केलेल्या प्रचार-प्रसाराच्या प्रभावातूनच, पूर्वीच्या काळी आपल्या दैवताला मांसाहारी-मत्स्याहारी नैवेद्य दाखवणारे समाजही आता शाकाहारी नैवेद्यच दाखवू लागले आहेत. एवढंच नव्हे तर देवांसकट आपण काय खायचं नि प्यायचं तेदेखील आता तेच ठरवू लागले आहेत. दिवसेंदिवस शहरांतून वाढत चाललेलं शाकाहाराचं प्रस्थ आणि ठिकठिकाणी आकाराला येत असलेल्या शाकाहारी सोसायट्या त्याच्याच तर निदर्शक आहेत!

…पण देशाची सांस्कृतिक बहुविधता टिकवायची असेल, तर शाकाहाराबरोबरच मांसाहारही तेवढाच महत्त्वाचा आहे आणि केवळ माणसासाठीच नाही, तर त्यांच्या देवासाठीही!

(इथे वापरण्यात आलेला फोटो ठाण्यातील कोळी बांधवांच्या घरातील आहे, त्यांच्याही गौरींना तिखटाचाच आहार लागतो.)

(साभार : दैनिक पुण्यनगरी)

(लेखक हे लोककला व लोकपरंपरेचे अभ्यासक आहेत)

9769982424

मुकुंद कुळे यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात मुकुंद कुळे– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleअशी होते राष्ट्रपतीपदाची निवडणूक
Next articleजिव्हाळ्याची सावली !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here