देवनूर महादेव . कन्नड साहित्यिक.
त्यांचं RSS वरचं पुस्तक: ‘RSS:अळ मट्टू अगला‘, हे पुस्तक प्रचंड गाजत आहे . आतापर्यंत या पुस्तकाच्या सुमारे ४०,००० प्रती विकल्या गेल्या आहेत. देवनूर महादेव यांनी कॉपीराईट कुणा एकाला दिला नाही. त्यामुळे सहा प्रकाशकांनी या पुस्तकाच्या प्रतींची विक्रमी विक्री केली आहे. कर्नाटकात या पुस्तकाने धुमाकूळ घातला आहे आणि आता हे पुस्तक आणखी पाच भाषांमध्ये अनुवादित होत आहे. त्यांच्या या पुस्तकाचा मराठीत प्रा. दत्ता दंडगे व मुग्धा कर्णिक यांनी अनुवाद केला आहे .
‘कुसुमबळे’ या कादंबरीकरता महादेव यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेला होता. पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं होतं. हे दोन्ही पुरस्कार त्यांनी देशातल्या वाढत्या असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर २०१५ साली परत केले.
२०१० साली कर्नाटक सरकारचा ‘नृपतुंग’ हा तब्बल ५ लाख रुपयांचा पुरस्कार त्यांनी नाकारला होता. कन्नडची दुरावस्था होत असताना मी हा पुरस्कार कसा स्वीकारू, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. १९९० मध्ये लेखक म्हणून राज्यसभेवर नामनिर्देशित केलेले असताना त्यांनी ती शिफारस नम्रतेने नाकारली. शेतकरी आंदोलनामध्ये देवनूर सक्रिय आहेत.
‘RSS: आलं मट्टू अगला’, या पुस्तकाचा मराठी अनुवाद मुग्धा धनंजय कर्णिक यांच्या सौजन्याने ‘मीडिया वॉच’ च्या वाचकांसाठी पाच भागात देत आहोत – संपादक
………………………………………………………………
भाग -१- रास्वसंघाचा प्राण कशात आहे?
संघाचे संस्थापक आणि पहिले सरसंघचालक होते डॉ. हेडगेवार. त्यांच्यानंतर गोळवलकर हे अनेक वर्षांपर्यंत रास्वसंघाचे दुसरे सरसंघचालक होते. गोळवलकर हे सावरकरांना आणि हेडगेवारांना आपले गुरू, मार्गदर्शक आणि तत्त्वज्ञ मानत- गोळवलकर आणि सावरकर या दोघांच्या लेखनातील काही महत्त्वाचे अंश पुढे दिले आहेत.
गोळवलकरांचा देवः
“आपणा सर्वांना अशा एका चैतन्यशील देवाची गरज असते, जो आपल्यातील चैतन्य जागे करू शकेल. ‘आपला समाज हाच आपला देव आहे… हिंदूंचा वंश हाच एक मूर्तीमंत विराट पुरुष आहे’- वेदांमधून सांगितलेला आदिपुरुष- सर्वशक्तीमान ईश्वराचेच रूप आहे.” हे आपल्या पूर्वजांनी म्हणूनच सांगून ठेवले आहे. जरी त्यांनी हिंदू हा शब्द वापरला नाही तरीही पुरुषसूक्तात येणारे हे वर्णन तेच स्पष्ट करते. –‘तारे आणि आकाश त्या परमात्म्याच्या बेंबीतून उत्पन्न झाले’ हे सांगितल्यानंतर, ‘सूर्य आणि चंद्र हे त्या परमात्म्याचे नेत्र आहेत’ असे त्यात म्हटले आहे. त्यानंतर त्यात असे म्हटले आहे की ‘ब्राह्मण हे त्याच्या मस्तकापासून झाले आहेत, त्याचे बाहू म्हणजे क्षत्रिय राजे, त्याच्या मांड्या म्हणजे वैश्य आणि
त्याची पाऊले म्हणजे शूद्र आहेत.’ जे लोक या चातुर्वर्ण्य पद्धतीस मानतात तेच हिंदू वंशाचे लोक आहेत आणि हाच आपला देव आहे, हाच त्याचा अर्थ.”
(संदर्भ-गोळवलकरांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’या पुस्तकामधून)
गोळवलकरांचे ‘संविधान’
लोकांच्या मनातील हिंदू असण्याचा ओतप्रोत अभिमानाची आपल्याला कल्पना आहे असे सांगत ते पुढे म्हणतात, “फिलिपाईन्सच्या दरबारात मनूचा संगमरवरी पुतळा आहे. ‘मानवजातीमधील सर्वात शहाणा असा हा पहिला माणूस ज्याने
कायदे-नियमांची आखणी प्रथम जगाला दिली’ असे त्या पुतळ्याखालील चौथऱ्यावर लिहिले आहे.”
(संदर्भ- गोळवलकरांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकामधून)
वि.दा. सावरकरांचा दृष्टीकोन
“आपल्या हिंदू राष्ट्रात, वेदांनंतर मनुस्मृती हा सर्वात पवित्र असा धार्मिक ग्रंथ आहे. प्राचीन काळापासून, आपल्या सांस्कृतिक परंपरा, विचार आणि कृती यांमागील नैतिक तत्त्वांचे दिग्दर्शन करणारा हा ग्रंथ आहे. गेली अनेक शतके आपल्या देशाचा आध्यात्मिक आणि दैवी प्रवास ज्या नियमांनुसार, ज्या आदर्शांनुसार चालत आला आहे त्याचे सारसूत्र यात आहे. मनुस्मृती हा लक्षावधी हिंदू अनुयायांच्या दिनक्रमणेचा मूलभूत आधार आहे. आज मनुस्मृती हाच हिंदूंसाठी कायदा आहे.”
(संदर्भ- वि.दा. सावरकर, मनुस्मृतीतील स्त्रिया, समग्र सावरकर,
खंड ४, प्रभात पब्लिशर्स)
आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील भारतीय संविधानाविषयी गोळवलकरांचे मत “पाश्चात्य देशांच्या संविधानांमधून उचलाउचल करून, क्लिष्ट आणि विसंगत असे तुकडे जोडून तयार केलेले आपले संविधान आहे आपले. एवढेच. युनायटेड नेशन्सच्या जाहीरनाम्यातून किंवा आधीच्या लीग ऑफ नेशन्सच्या जाहीरनाम्यातून, अमेरिकन किंवा ब्रिटिश संविधानांतून कसल्याशा लुळ्यापांगळ्या तत्त्वांच्या आधारे शिवलेली गोधडीच आहे ती जणू.”
(संदर्भ- गोळवलकरांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकामधून.)
‘ऑर्गनायझर’ या रास्वसंघाच्या मुखपत्रात ३० नोव्हेंबर, १९४९ रोजी प्रसिद्ध झालेल्या संपादकीयातून:
२६ नोव्हेंबर, १९४९ रोजी स्वतंत्र, सार्वभौम भारताने संविधानाचा मसुदा प्रकाशित करून लोकार्पण केला त्या दिवशी संविधानावरील ही टीका प्रसिद्ध करण्यात आली- “आपल्या संविधानात प्राचीन भारतीय घटनात्मक कायद्यांचे, संस्थांचे, संकल्पनांचे, व्याख्यांचे नामोल्लेखही नाहीत. मनुस्मृतीचे लेखन लायकर्गस ऑफ स्पार्टा किंवा सोलोन ऑफ पर्शिया यांच्याही आधी झाले होते. आजही मनुची कायदेसंहिता जागतिक कौतुकास पात्र आहे, हिंदू लोकांकडून त्या कायद्यांना उत्स्फूर्त असे अनुयायित्व लाभते. पण आपल्या संविधानकर्त्या पंडितांच्या लेखी याची किंमत शून्य आहे.” संघराज्यासंबंधी विषबीज: “आपल्या संविधानात राज्यांचा संघ असण्यासंबंधी जे नियम आहेत त्यावरून हे स्पष्ट होते की आपले राष्ट्र हे एकजिनसी, सुसंवादी राष्ट्र होऊ शकते याची खात्री संविधानकर्त्यांच्या मनात नाही. त्यांनी राष्ट्राला अनेक राज्यांचा संघ ठरवले आहे यावरून
यात विघटनाची बीजे आहेत हे स्पष्ट होते.”
(संदर्भ- गोळवलकरांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकातून)
“… याच कारणासाठी आपण संविधानाच्या या संघराज्यात्मक आराखड्यावरची चर्चा कायमची खोलवर गाडून टाकली पाहिजे. या एकसंध भारतात स्वायत्त किंवा अर्धस्वायत्त राज्ये असण्याची शक्यताच मिटवून टाकली पाहिजे. एकछत्री शासनाची प्रस्थापना करण्यासाठी आपण संविधानाच्या मसुद्याचा पुनर्विचार करून पुनर्लेखन करणे गरजेचे आहे…”
(संदर्भ- गोळवलकरांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’या पुस्तकामधून)
रास्वसंघाचा प्रेरणास्रोत
“रास्वसंघ हा एका ध्वजाखाली, एका नेतृत्वाखाली आणि एका विचारसरणीने प्रेरित असून या थोर भूमीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हिंदुत्वाची ज्योत पेटवणार आहे.”(१९३० साली मद्रास येथे भरलेल्या १३५० संघ नेत्यांच्या सभेतील गोळवलकरांचे जाहीर निवेदन हे त्यांच्या फॅशिस्ट आणि
नाझी विचारसरणीचे ठळक उदाहरण आहे.) हिटलरच्या नाझी आणि फॅशिस्ट विचारसरणीसंबंधी
“जर्मनवंशाभिमान हा आजच्या चर्चेचा विषय आहे. आपल्या वंशाचे आणि संस्कृतीचे शुद्धत्व राखण्याच्या हेतूने जर्मनीने जगाला धक्का बसेल असे निर्णय घेतले- ज्यू वंशीय लोकांचे देशातून उच्चाटन करण्याची सुरुवात केली. उच्च कोटीचा वंशाभिमान इथे दिसून आला. जर्मनीने हेही दाखवून दिले आहे की मुळातूनच जे वंश आणि संस्कृती विभिन्न आहेत त्यांचे एकीकरण कधीही होऊ शकत नाही- हा धडा हिंदुस्थानात आपण सर्वांनी शिकला पाहिजे
आणि त्याचा लाभ घेतला पाहिजे.”
(संदर्भः गोळवलकरांचे ‘वी, ऑर अवर नेशनहूड डिफाईन्ड’,
१९३९)
“ही सर्व प्राचीन इतिहास असलेली राष्ट्रे अल्पसंख्य समूहांची समस्या कशी सोडवतात हे पाहाणे आणि ध्यानात ठेवणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने देशात आलेल्या स्थलांतरित लोकांनी त्या त्या देशातील बहुसंख्य लोकांशी, -राष्ट्रीय वंशाशी- सहजपणे जुळवून घेतले पाहिजे- त्यांची संस्कृती, भाषा, बहुसंख्यकांच्या आशाआकांक्षा आत्मसात करताना त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व, आपले विदेशी मूळ विसरून गेले पाहिजे. त्यांनी तसे केले नाही, आणि ते परके
म्हणूनच जगत राहिले, त्यांच्या नव्या राष्ट्राला त्याचा त्रास होतअसला तरीही आपल्याच मूळ देशाच्या रूढी परंपरा पाळतराहिले तर त्यांना कोणतीही विशेष सुरक्षा मिळता कामा नये,अधिकार किंवा हक्कांचा तर विषयच संभवत नाही. परक्यांसाठी केवळ दोनच मार्ग मोकळे आहेत- त्यांनी मूळ राष्ट्रीय वंशात सामील व्हावे, नवी संस्कृती स्वीकारावी किंवा मग राष्ट्रातील वंश जोवर मान्यता देईल तोवर त्यांच्या दयेवर जगावे किंवा मग राष्ट्रीय वंशाच्या इच्छेनुसार ते म्हणतील तेव्हा देश सोडावा.
अल्पसंख्यकांचा प्रश्न सोडवायला हा एकच दृष्टीकोन परिपूर्णठरेल. हेच एक उत्तर तर्कशुद्ध आणि योग्य आहे. केवळ असे झाले तरच राष्ट्रजीवन निरोगी आणि निर्विघ्न राहील. केवळ असे केले
तरच आपले राष्ट्र अंतर्गत उपराष्ट्रे तयार होण्याच्या राजकीय कर्करोगासारख्या धोक्यापासून सुरक्षित राहील.”
(संदर्भः गोळवलकरांचे ‘वी ऑर अवर नेशनहूड डिफाईन्ड’,
१९३९)
जर्मनी आणि इटली या राष्ट्रांनी नाझीवाद किंवा फॅशिझमच्या जादूच्या कांडीने स्वतःला सावरले आणि ती राष्ट्रे पूर्वीपेक्षा अधिक शक्तीमान झाली यावरूनच हे स्पष्ट होते की या विचारप्रणालींचे शक्तीवर्धक टॉनिकच राष्ट्र निरोगी ठेवण्यात सर्वात प्रभावी आहे.”
(संदर्भ- वि.दा. सावरकरांच्या १९४०च्या मदुराई येथील हिंदू महासभेच्या अधिवेशनातील अध्यक्षीय भाषणातून.)
स्वातंत्र्य
“आपल्या स्वातंत्र्यामागची सुप्त प्रेरणा ही एकच असते, ती म्हणजे आपल्या राष्ट्रीय मूल्यांचे जतन आणि प्रसार- ही मूल्ये म्हणजेच आपला धर्म आणि आपली संस्कृती. हा आपला ऐतिहासिक
पारंपरिक दृष्टीकोन असतो.”
(संदर्भ- गोळवलकरांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकामधून)
(क्रमश 🙂