रास्वसंघाचे दस्तावेज काय सांगतात?

-देवनूर महादेव . कन्नड साहित्यिक.

त्यांचं RSS वरचं पुस्तक: RSS:अळ मट्टू अगला, हे पुस्तक प्रचंड गाजत आहे . आतापर्यंत  या पुस्तकाच्या सुमारे ४०,००० प्रती विकल्या गेल्या आहेत. देवनूर महादेव यांनी कॉपीराईट कुणा एकाला दिला नाही. त्यामुळे सहा प्रकाशकांनी या पुस्तकाच्या प्रतींची विक्रमी विक्री केली आहे. कर्नाटकात या पुस्तकाची विक्रमी विक्री झाली आहे. आता हे पुस्तक आणखी पाच भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. त्यांच्या या पुस्तकाचा मराठीत मुग्धा कर्णिक  यांनी अनुवाद केला आहे . त्यांच्या सौजन्याने या पुस्तकातील दुसरे प्रकरण ‘मीडिया वॉच’ च्या वाचकांसाठी देत आहोत – संपादक

………………………………………………………………………………………………..

‘रास्वसंघाचा प्राण कुठे आहे’ या प्रकरणात आपण गोळवलकर आणि सावरकरांनी प्रगट केलेले काही विचार आणि त्यांचे दृष्टीकोन स्पष्ट करणारे काही उतारे पाहिले. अजूनपर्यंत तरी हे सारे दस्तावेजांतूनच सापडलेले मांडले आहे. ‘परके’ म्हटले जाणारे कुणी तर सोडाच, कुणीही सुबुद्ध ब्राह्मणही रास्वसंघाचा हा सैतानी भूतकाळ मान्य करणार नाही.

गोळवलकरांनी आपल्या पुस्तकाला ‘‘बंच ऑफ थॉट्स’’ असे नाव दिले होते. याचं मराठी नाव होतं विचारधन. असो, पण यातील ‘विचार’ या शब्दाला साजेल असे काहीही या पुस्तकात नाही. जे काही अविचार आहेत त्यात आधी नमूद केलेल्या तीन गोष्टी आणि अतिशय घातक अशा श्रद्धा यांचीच बजबज आहे. भूतकाळात जमा झालेल्या घातक श्रद्धा पुन्हा जागवण्याचा प्रयत्न आहे. गेली जवळपास १०० वर्षे रास्वसंघ आणि त्याचे साथीदार भूतकाळातील घातक श्रद्धांच्या आधारे आज दिसणारे भारताचे चित्र प्रत्यक्षात आणण्यासाठी झटले आहेत.

रास्वसंघाची पहिली श्रद्धा ही- पुरुषसूक्तामधील देव कल्पनेमधून उभी रहाणारी सामाजिक व्यवस्था हाच त्यांचा देव आहे. या समाजव्यवस्थेत ब्राह्मण हे मस्तकाच्या जागी आहेत, क्षत्रिय राजे हा बाहूंच्या जागी आहेत, वैश्य हे मांड्यांच्या जागी आहेत, आणि शूद्र हे पाय आहेत- आणि हेच रास्वसंघाच्या दृष्टीने ईश्वराचे रूप आहे. गोळवलकरांनी हाच आपला देव हे स्पष्ट सांगितले आहे- ते त्या समाजव्यवस्थेचे वर्णन चैतन्यशील देव म्हणून करतात. रास्वसंघाच्या सर्व निष्ठांच्या तळाशी हाच अचल असा खडक आहे. त्यांच्या दृष्टीने हेच देवाचे दृश्य रूप आहे!

ठीक तर, देवाच्या रुपाशी जोडलेली ही चातुर्वर्ण्य व्यवस्था तपासून पाहायची तर आपण आपलेच शरीर तपासून पाहाणे पुरेसे आहे. डोके म्हणजेच मन किंवा बुद्धी. या डोक्यातून उर्वरित शरीराकडे -हात, मांड्या, पाय सर्वांकडे आज्ञा जात असतात आणि हे उर्वरित शरीर डोक्यातून आलेल्या आज्ञा पाळत असते. हेच आपण समाजाला लागू केले तर डोक्याच्या जागेवर असलेले ब्राह्मण  सांगतील त्यानुसार हातांच्या स्थानी मानलेले क्षत्रिय राज्य करतील, तसेच वैश्य व्यापार करतील आणि शूद्र सर्वांची पडेल ती सेवा करतील. रास्वसंघाच्या धारणांनुसार हाच सामाजिक न्याय आहे, हीच सामाजिक समरसता आहे. त्यांच्या देवाच्या संकल्पनेत हेच अंतर्भूत आहे- हाच त्यांचा चैतन्यशील देव.

लहान मुलांच्या मनात लहानपणापासून याच संकल्पना घट्ट बसाव्यात म्हणून आता भाजप या संघप्रणित राजकीय पक्षाने भगवद्गीतेचे शिक्षण सक्तीचे करायला सुरुवात केली आहे. या भगवद्गीतेत देवाचा अवतार श्रीकृष्ण घोषित करतो की ‘चातुर्वर्ण्यम् मया सृष्टम्’ (चातुर्वर्ण्याचा निर्माता मीच आहे).पण भगवद्गीतेची रचना कधी झाली? मूळ संहितेमध्ये कृष्णाने चातुर्वर्ण्याचा उल्लेख केला होता का? की हे गीतेमध्ये नंतर घुसडलेले आहे? घुसडले असेल तर ते नेमके केव्हा? या प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत.

गीतेच्या अधिकृत संहितेबद्दल बोलताना स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे की, “जोपर्यंत शंकराचार्यांनी गीतेवरची विस्तृत टीका  लिहिली नव्हती आणि तिचा प्रसार झाला नव्हता, तोपर्यंत लोकांना त्या रचनेचे तपशील ठाऊकच नव्हते. शंकराचार्यांच्या आधीपासून फार वर्षांपूर्वीपासून अनेक विद्वानांनी असे मत मांडले आहे की गीतेवरील टीकाग्रंथ म्हणून बोधयान वृत्ती नावाच्या ग्रंथाचा बोलबाला होता. परंतु बोधयानाने लिहिलेला वेदांतिक सूत्रांवरील टीकाग्रंथ मी भारतभर शोधला, पण तो माझ्या हाती लागला नाही. वेदान्त सूत्रांवरील या प्राचीन बोधयान टीकेमुळे बोधयानाची कीर्ती विद्वत्जगात पसरली होती, तिचेच अस्तित्व जर असे अनिश्चित असेल तर गीतेवर त्याचा टीकाग्रंथ होता हे निश्चित करणे अधिकच अवघड आहे. काहीजण असेही म्हणतात की शंकराचार्यांनी स्वतःच गीतेची रचना केली आणि त्यांनीच ती महाभारतात घुसवली.” (संदर्भ- स्वामी विवेकानंद कृती श्रेणी, खंड ७. पृष्ठ ८०-८१, श्री रामकृष्ण आश्रम प्रकाशन)

चातुर्वर्ण्याची विषम आणि गुलामीचे समर्थन करणारी व्यवस्था ही नंतर देवाच्या तोंडी घालून समर्थनीय ठरवण्याचा प्रयत्न करून घुसवण्यात आली आहे हे स्पष्ट करण्यास विवेकानंदांचे हे शब्द पुरेसे नाहीत काय? हे सारे या लोकांच्या दृष्टीने पुरेसे नाही! त्याचा त्यांना काही उपयोगच नाही. त्यांच्या श्रद्धा म्हणजेच इतिहास आणि त्यांचे शब्द म्हणजेच वेदवाक्य! सत्याची गरजच नाही. त्यांच्या मनात रुजलेल्या कल्पना म्हणजेच सत्य. त्यांच्या मनातल्या श्रद्धा वर्तमानात वास्तवात उतरल्या पाहिजेत. या सर्वांतून भारताच्या लोकशाही संविधानाला जेवढा धक्का पोहोचेल तेवढा त्यांना विजयोन्माद होतो.

त्यामुळे या विशिष्ट हिंदू धर्मीयांना असे वाटते की भारतात जन्मलेले प्रत्येक मूल जरी जगाचे नागरिक झाले तरीही जन्मल्यापासून मरेपर्यंत त्याने जाती-वर्णाच्या व्यवस्थेशी घट्ट बांधून घेतले पाहिजे. स्वतंत्र आणि आधुनिक भारताच्या संविधानाची रचना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झाली तेव्हा त्यात नागरी आणि मानवतावादी आदर्श ठेवण्यात आले. हे संविधान असल्या या लोकांच्या दृष्टीने दुःस्वप्न न ठरले तर नवल. त्यांची झोप उडवणारे संविधान आहे आपले. रास्वसंघ आणि संघ-परिवार  यांनी आपले संविधान नष्ट करण्याचे हरप्रकारे प्रयत्न आरंभले आहेत. थोडेथोडके  नाही, तर अनेकविध आणि अक्षम्य असे प्रयत्न याच उद्दिष्टापोटी त्यांनी सुरू ठेवले आहेत.

आपल्या देशाची संघराज्य रचना उद्ध्वस्त करणे, संविधानाला मुळासकट उपटण्यासाठी सार्वत्रिक प्रचार करणे या कारस्थानात रास्वसंघ परिवार अनेकांना दिशाभूल करून सहभागी करून घेत आहे. संघाच्या दृष्टीने विविधतावाद म्हणजेच फुटीरतावाद, त्यांच्या मते हे विघटनवादाचे विषबीज आहे. गोळवलकरांनी सांगितले की ‘हा सारा राज्यमंडळांचा पसारा मांडणाऱ्या संविधानाबद्दलची सारी चर्चा कायमची गाडून टाकली पाहिजे… संविधानाचा मसुदा पुन्हा तपासून, पुन्हा लिहिला पाहिजे आणि एकचालकानुवर्ती शासनाची पायाभरणी केली पाहिजे.’

शिवाय, एक ध्वज, एक राष्ट्रविचार, आणि हिटलरने सांगतलेली एकवंशी, एकाच नेतृत्वाखालील शक्तीमान हुकूमशाही हेच त्यांचे उद्दिष्ट आहे.

आठवण ठेवायला हवी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या इंदिरा गांधी या सुद्धा काही काळासाठी हुकूमशहा झाल्या होत्या. तो अतिशय छोटासा काळ होता, आणि त्यांची हुकूमशाही प्रशासकीय स्वरुपाची होती.

इंदिरेच्या या छोट्याशा हुकूमशाही काळात न्यायपालिका, प्रशासन, वृत्तपत्रे आणि स्वायत्त संस्था या आजच्या इतक्या षंढ बनल्या नव्हत्या हे लक्षात ठेवायला हवे.

पण आज, मोदींच्या सत्तेत न्यायपालिका, प्रशासन, वृत्तमाध्यमे आणि स्वायत्त संस्थांना आपले अस्तित्व राखण्यासाठी धडपडावे लागत आहे. रास्वसंघाच्या स्वप्नातील भारतात समाजातील सर्वच अवकाश संकोच पावू लागला आहे. त्यांना केवळ राजकीय सत्ता नव्हे तर समाज, संस्कृती, प्रशासन या सर्वांवर सत्ता गाजवायची आहे. सर्वव्यापी आणि निरंकुश अधिकार यालाच म्हणतात! हे आपण लक्षात ठेवायला हवे.

आणि हे सारे कशासाठी- कोणत्या उद्दिष्टासाठी? चातुर्वर्ण्यावर आधारित समाजव्यवस्थेची पुनर्स्थापना करण्यासाठी? की मनूस्मृतीवर आधारित संविधान निर्मिण्यासाठी? की देशाची संपर्कभाषा संस्कृत व्हावी या आकांक्षेसाठी? की… आपल्या देशाच्या काळ्याकुट्ट अंधाऱ्या भूतकाळातून त्यांना चढणारी नशा वर्तमानकाळातही मिळत रहावी म्हणून ते हे सारे करत असतील! संस्कृत भाषा संपर्क भाषा व्हावी या संदर्भात गोळवलकरांनी आधीच घोषित केले आहे, “जोवर संस्कृत भाषा संपर्कभाषा होण्याइतकी दृढ होत नाही तोवर हिंदीला सर्वाधिक प्राधान्य दिले पाहिजे.” (‘बंच ऑफ थॉट्स’ मधील पृष्ठ क्र.१२२ पहा). हे सारे निश्चितच भयानक बीभत्स आहे!

रास्वसंघाची तिसरी श्रद्धा आहे आर्यवंश हा सर्वश्रेष्ठ वंश असल्याची. ही तर त्यातील प्रत्येकाची अगदी व्यक्तिगत वेडगळ श्रद्धा झाली आहे. इथेही रास्वसंघ हिटलरसारख्या क्रूरकर्मा वर्णश्रेष्ठत्ववाद्याला आपले श्रद्धास्थान मानत आला आहे. अयोग्य वंश संपवला पाहिजे आणि शुद्ध वंश अधिक सुधारला पाहिजे (युजेनिक्स) हा हिटलरचा विचार होता. त्याच्याही एक पाऊल पुढे जाऊन गोळवलकर म्हणतात की अखंड भारतात आर्यांनी वंशशुद्धीचे प्रयोग प्राचीन काळापासून केले आहेत.

गुजरात विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांपुढे भाषण करताना गोळवलकर म्हणाले, “आज संकरित संततीचे प्रयोग फक्त पशूंवर केले जातात. अशा प्रकारचे प्रयोग मनुष्यप्राण्यावर करण्याचे धाडस आजच्या वैज्ञानिकांमध्ये नाही. संकरित वर्णाचे जे नमुने आज दिसतात ते वैज्ञानिक प्रयोगांचे फलित नसून केवळ लैंगिक वासनेचे फलित आहे. आपल्या पूर्वजांनी या क्षेत्रात काय प्रयोग केले ते पाहू. वर्णसंकरातून अधिक चांगले मानवी नमुने जन्माला यावेत म्हणून उत्तरेकडच्या नंबुद्री ब्राह्मणांना केरळमध्ये वसवण्यात आले. आणि असा नियम केला गेला की नंबुद्री कुटुंबातील ज्येष्ठ पुत्राला केरळच्या क्षत्रिय, किंवा वैश्य, किंवा शूद्र कन्येशीच विवाह करावा लागेल. आणखी एक साहसी नियम असाही करण्यात आला की कुठल्याही विवाहित स्त्रीला पहिले अपत्य केवळ नंबुद्री ब्राह्मणांकडूनच व्हावे. त्यानंतर ती आपल्या पतीकडून अपत्यप्राप्ती करू शकते. आज या प्रयोगाला व्यभिचार म्हटले जाईल, पण ते तसे नव्हते कारण हा नियम केवळ पहिल्या अपत्यापुरताच होता.”

आता आणखी एक विसंगती पहा. आपल्या अनुवंशशास्त्राच्या ज्ञानाची पताका गुजरात विद्यापीठातील भाषणात फडकवल्यानंतर ते भाषण जेव्हा रास्वसंघाचे अधिकृत मुखपत्र ‘ऑर्गनायझर’मध्ये प्रकाशित झाले त्यानंतर गोळवलकरांनी ते भाषण मागे घेतले! अर्थात तोवर ते छापले गेले होते आणि प्रकाशित झाले होते. मग प्रश्न आला- ते भाषणात सत्य बोलले की असत्य? त्यांनी ते मागे घेतले म्हणजेच ते असत्य किंवा मनगढन्त होते असे निश्चित झाले का? त्यांचे हे प्रखर भाषण मोठे मोहिनी घालणारे होते. त्यांची मांडणी अशी होती की जणू त्यांनी त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला असावा. अशा प्रकारे दुतोंडी मांडणी करून गोळवलकर असत्याची सूक्ष्म बीजे सर्वत्र उधळून देत होते आणि मग हीच बीजे सगळीकडे रुजून तणांसारखी वाढत राहिली. सत्य काय ते तपासले जाईपर्यंत असत्याचे हे तण अमर्याद माजत रहातात.  आजकाल वॉट्सॅप, फेसबुक, वृत्तमाध्यमे आणि सार्वजनिक भाषणे, चर्चा यांतून  असत्याचा प्रचार-प्रसार देशभर होतो आहे. अशा प्रकारे असत्यभाषण प्रसृत करायचे, देशवासीयांच्या मनात खोटेनाटे रुजवायचे आणि मग नामानिराळे व्हायचे ही देणगी गोळवलकरांनीच दिली आहे! रास्वसंघ आणि परिवार हे कार्य अथक प्रयत्नांनी पुढे नेतो आहे- मुठीमुठीने मनगढन्त असत्यांची बीजे वाऱ्यावर उधळून देतो आहे.

एकीकडे चातुर्वर्ण्य व्यवस्थेलाच आपला देव मानणारा रास्वसंघ भारतातच स्थापन झालेल्या जैन, बौद्ध, लिंगायत अशा चातुर्वर्ण्याला किंवा वेदांना न मानण्यातूनच उद्भवलेल्या धर्मांचे अस्तित्व नष्ट करू पाहातो. या धर्मांनीही चातुर्वर्ण्याचे संवर्धन करावे अशा रीतीने ते या धर्मांना वागवू पाहातात. या धर्मांनाही हिंदू धर्माचे भाग असल्यासारखेच समाविष्ट करून घ्यायचे- उदा. बुद्ध हा विष्णूचाच अवतार आहे असे सांगायचे- म्हणजे तेही आपोआपच चातुर्वर्ण्याचे भाग होतात, अशी त्यांची युक्ती आहे. दुसरीकडे इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी या धर्मांना हिंदू चातुर्वर्ण्यात सामावून घेण्याची संधीच नसल्यामुळे त्यांना नष्टच करण्याचे प्रयत्न केले जातात, परिवाराला त्यांच्यावर थेट हल्ले चढवण्यासाठी मोकळे सोडले जाते. हे हल्ले अनेक प्रकारे आणि विविध रुपांत होतात- याची सुरुवातही फार आधीपासूनच झाली आहे. या हल्ल्यांमध्ये एक साम्य निश्चित असते- लबाडी आणि दुतोंडीपणा. एकच उदाहरण पहा, १४ मार्च १९४८ रोजी तेव्हाचे राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी पंतप्रधान पंडित नेहरू आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना एक पत्र लिहिले, त्यात त्यांनी एक इशारा दिला होता- “लोकांमध्ये काही गैरसमज पसरवून दंगे घडवण्याच्या रास्वसंघाच्या योजनेसंबंधी मला माहिती मिळाली आहे. मुस्लिमांसारखे पोषाख घालून संघाचे अनेक लोक हिंदूंवर हल्ले करणार आहेत ज्यायोगे हिंदू लोक खवळतील. त्याच वेळी काही हिंदू लोक मुस्लिमांवर हल्ले करून मुस्लिमांना भडकवतील. अशा प्रकारे दोन्ही समाजांना चिथावून ते दंगलींचा भडका उडवतील.” संघाच्या लबाडीचे हेच विशेष प्रथमपासून आहे. आजच्या भारतात याची प्रचीती किती प्रकारे येते आहे? किती सोंगे काढली जात आहेत?

रास्वसंघाचा इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटीसंबंधीचा तीव्र द्वेष एवढ्यासाठीच आहे की त्यांचा चातुर्वर्ण्याशी कोणत्याही प्रकारे मेळ बसू शकत नाही. त्यांना त्यातील काहीही मान्यच होऊ शकत नाही. त्यांचे हे चातुर्वर्ण्य अमान्य करणे त्यांच्या घशात हाडकासारखे अडकते. या दोन धर्मांच्या लोकांना एका साच्यात दाबून हवे तसे वळवायचे आणि काहीही करून त्यांचे चैतन्य हिरावून त्यांना कोणत्याही मानवाधिकारांशिवाय किंवा हक्कांशिवाय सडवायचे हाच रास्वसंघाचा दृष्टीकोन आहे. ‘वी ऑर अवर नेशनहूड डिफाइन्ड’ या पुस्तकातील पृष्ठ क्र. ४७ वर गोळवलकरांनी हे अगदी सुस्पष्टपणे म्हटले आहे, ‘देशात आलेल्या स्थलांतरित लोकांनी त्या त्या देशातील बहुसंख्य लोकांशी, -राष्ट्रीय वंशाशी- सहजपणे जुळवून घेतले पाहिजे- त्यांची संस्कृती, भाषा, बहुसंख्यकांच्या आशाआकांक्षा आत्मसात करताना त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व, आपले विदेशातून आलेले असणे विसरून गेले पाहिजे. त्यांनी तसे केले नाही, आणि ते परके म्हणूनच जगत राहिले, त्यांच्या नव्या राष्ट्राला त्याचा त्रास होत असला तरीही आपल्याच मूळ देशाच्या रूढी परंपरा पाळत राहिले तर त्यांना कोणतीही विशेष सुरक्षा मिळता कामा नये, अधिकार किंवा हक्कांचा तर विषयच संभवत नाही. परक्यांसाठी  केवळ दोनच मार्ग मोकळे आहेत- त्यांनी मूळ राष्ट्रीय वंशात सामील व्हावे, नवी संस्कृती स्वीकारावी किंवा मग राष्ट्रातील वंश जोवर मान्यता देईल तोवर त्यांच्या दयेवर जगावे किंवा मग राष्ट्रीय वंशाच्या इच्छेनुसार ते म्हणतील तेव्हा देश सोडावा.’ इतकी नीतीभ्रष्ट कल्पना मांडणारा हा मनुष्य म्हणजे हिटलरचाच भाऊ.

रास्वसंघ आणि त्यांची पिलावळ कशाप्रकारे फसवणुकीचे मार्ग आखते त्याचे एक अगदी स्पष्ट उदाहरण म्हणजे टिपू सुलतानाच्या बाबतीतली बदनामीची मोहीम. टिपू सुलतानाची राजवट होती १७८२ ते १७९९ या काळातील. संघपरिवारातील संघी विद्वानांनी असे सांगायला सुरुवात केली की कोडगू (कूर्ग) या भागात ६९,००० हिंदूंचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात टिपू सुलतानाचा हात होता. कोडगू जिल्ह्याच्या स्टेट गॅझेटीअरमधील या भागाच्या तेव्हाच्या लोकसंख्येचे आकडे तपासा. कितीही प्रयत्न करून आकडे फुगवले तरीही संपूर्ण लोकसंख्या ६९,०००च्या वर जात नाही. त्यांचे म्हणणे खरे असेल तर आज कोडगूची संपूर्ण लोकसंख्या मुस्लिम असायला हवी होती नाही कां? पण प्रत्यक्षात कोडगूच्या मुसलमान लोकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या जेमतेम १५% आहे. संघाचे आंधळे विद्वान या गोष्टीची दखल घेत नाहीत, घेऊ इच्छित नाहीत. खोटे बोला, असत्याची बीजे पेरा आणि ती वाढताना पाहात रहा. दुर्दैवाने, फसवणुकीचे रान माजत चालले आहे. रास्वसंघ आणि परिवाराला या फसवणुकीच्या रानातून निघणारे खोटारडेपणाचेच पीक हवे आहे. त्यांच्यात देवत्वाचा अंशही नाही. फसवणूक हेच त्यांचे कुलदैवत आहे. त्यांची सदसद्विवेकबुद्धी या लबाडीच्या कारखान्यात बळी गेली आहे.

देवनूर महादेव यांच्या पुस्तकातील पहिले प्रकरण –राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: किती खोल, किती पसारा… समोरील लिंकवर क्लिक करा https://bit.ly/3PZlOco

आता आपण हे तपासून पाहू की इथले सर्व मुस्लिम आणि ख्रिश्चन्स हे बाहेरच्या देशांतून इथे आले आहेत का? त्यातील बहुसंख्य लोक चातुर्वर्ण्यातील अत्याचारांनी, अन्यायांनी पिडलेले लोक होते आणि जातीभेदाच्या चक्राखालून सुटण्यासाठी त्यांनी धर्मांतर केले होते हे खोटे? शिवाय इस्लामी आक्रमकांचे आगमन झाल्यानंतर सत्तेच्या अभिलाषेपोटी, सैन्यातील मानाच्या पदांसाठी, प्रशासकीय उच्चपदांसाठी, प्रतिष्ठेसाठी इस्लामचा स्वीकार करण्याचा आरंभ करणारे लोक उत्तर भारतातील आर्य ब्राह्मणच होते ना? रास्वसंघाच्या द्वेषाचे लक्ष्य असलेले पाकिस्तानातील अनेक मुसलमान हे असेच पूर्वाश्रमीचे आर्य ब्राह्मण होते ना? हे वास्तव स्वीकारण्याची कुणाचीच तयारी नाही. निदान या पूर्वाश्रमीच्या हिंदूंचे, आजच्या मुसलमानांचे मूळ तपासून पहाल? त्यांचे मूळ आर्यवंशी नाही? पुन्हा एकदा, त्यांची हे सारे जाणून घेण्याची इच्छाच नाही. त्यांची एकमात्र इच्छा आहे ती सर्वांनी चातुर्वर्ण्याची दंडाबेडी घालून आयुष्याची वाटचाल करावी. त्यामुळेच चातुर्वर्ण्य हेच खरे आणि एकमेव हिंदुत्व असल्याचा दावा रास्वसंघ उचलून धरतो. बहुसंख्य हिंदू धर्मीय हे उदारमतवादी असूनही त्यांना अशा प्रकारे हिंदुत्वाच्या व्याख्येतच फसवण्यात येते, त्यांना इतर धर्मांचा द्वेष करायची दीक्षा दिली जाते आणि या प्रक्रियेत त्यांना मुसलमान आणि ख्रिश्चनांवर हल्ले करण्यासाठी पायदळात  भरती केले जाते.

रास्वसंघाकडे आतवर पाहाताना आपले लक्ष आणखी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे वळले पाहिजे. भूतकाळातील कबरी खणून भुते जागवण्यात आणि त्यांना वर्तमानात नाचवण्यात रास्वसंघ हा काही एकटाच नाही. संघाच्या काळ्या सावलीत आता त्यांची पिलावळही प्रचंड उत्साहाने या कामात सामील झाली आहे. संघाच्या प्रमुख प्रकाशन संस्थेचे १९९७मध्ये प्रसिद्ध झालेले ‘परम वैभव के पथ पर’ हे पुस्तक सारे तपशील देते. या पिलावळीत भारतीय जनता पक्ष आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे, हिंदू जागरण मंच आहे, संस्कार भारती आहे, विश्व हिंदू परिषद आहे, बजरंग दल आहे. एकंदर अशा चाळीस संस्था संघटनांचा उल्लेख या पुस्तकात आहे. ही १९९६मधली माहिती आहे. यानंतरच्या काळात आणखी किती असली भूछ्त्रे उगवली असतील गणतीच नाही. ‘धर्मसंसद’ ही धार्मिक संघटनाही संघाच्याच पंखाखालची आहे. कर्नाटकच्या बजरंग दलाचेच भावंड असलेली श्री राम सेनै ही संघटना सुद्धा यातच आहे. ही सारी पिलावळ रास्वसंघाचीच असूनही, यांच्या काही हिंसक कृत्यांमुळे संघ अडचणीत येतो आहे असे वाटले की संघ अगदी ठरीवपणे या संघटनांशी आपला काहीही संबंध नाही असे सांगून मोकळा होतो. खरे तर या सर्व संघटनांचे संघाशी आतड्याचे नाते आहे.

ज्या प्रकारे रास्वसंघ स्वयंसेवकांना आपल्या विचारप्रणालीची दीक्षा देतो ते तर सर्वात भयावह आहे. गोळवलकरांच्या शब्दांत, “आपण ज्या क्षणी या संघटनेचा भाग बनतो आणि संघ-धारणा स्वीकारतो, त्यानंतर आपल्या आय़ुष्यासंबंधी दुसऱ्या काही पर्यायांचा विचार करणे संभवतच नाही. जे सांगितले आहे ते करा. कबड्डी खेळायला सांगितले तर कबड्डी खेळा. बैठक घ्यायला सांगितली तर बैठक घ्या. उदाहरणार्थ आपल्या काही मित्रांना सांगण्यात आले की राजकीय कार्यक्रमांत भाग घ्या. पण म्हणजे आता राजकारणाविना त्यांना जगता येणार नाही किंवा ते पाण्याविना मासा तडफडावा तसे तडफडतील असे होता कामा नये. त्यांना राजकारणातून बाजूला व्हायला सांगताच ते विनाविलंब बाजूला होतील. त्यांची काहीही हरकत असणार नाही. त्यांना निवडीचे कुठलेही स्वातंत्र्य असणे अनावश्यक आहे.”

(वर्ध्याच्या सिंदी गावात गोळवलकरांनी १६ मार्च १९५४ रोजी दिलेले भाषण)

इथे गोळवलकर निवडीचे स्वातंत्र्य अनावश्यक असल्याचे सांगतात. व्यक्तीगत निवड महत्त्वाची नसल्याचे घोषित करतात. इथे प्रश्न असा आहे की अनेक लहान मुले संघटनेत आणली जातात आणि जबरदस्तीनेच सामील केली जातात. लोकांना मनाची तयारी करण्याचाही अवधी दिला जात नाही.

संघ स्वयंसेवक होण्याच्या नावाखाली ते अमानुष यंत्रमानवांचीच फौज तयार करत असतात. रास्वसंघाने जाळ्यात ओढलेल्या मुलांना कसे वाचवायचे हा एक प्रश्नच आहे!

हिंदू समाजाने या विचित्र काळात या विषयावर बोलणे आवश्यक आहे. चातुर्वर्ण्याचे ढोल वाजवणाऱ्या हिंदूंची क्रूर कृत्ये पाहूनही गपचूप बाजूला उभे राहून गंमत बघण्याची ही वेळ नाही. खरे तर असले क्रूर हिंदू तसे अल्पसंख्यच आहेत, पण मेंढीचे कातडे पांघरून कळपात शिरलेल्या एखाददुसऱ्या लांडग्याइतकेच घातकी आहेत. सर्वसामान्य हिंदू समाजातील माणुसकी न हरवलेले लोक सर्व जातींत आहेत- यात ब्राह्मण आले तसेच आदिवासी आणि इतरही आले- या सर्वांनी एकत्र येऊन हा विचार केला पाहिजे.

Previous articleराष्ट्रीय स्वयंसेवक संघ: किती खोल, किती पसारा…
Next article‘नारायणी’ नमोस्तुते!
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here