‘नारायणी’ नमोस्तुते!

माणसं: साधी आणि फोडणीची.. भाग एक
*******

-मिथिला सुभाष

आई गेल्याची तार अमरावतीहून आली आणि त्यांनी ती आम्हाला दाखवलीच नाही. बाबुलनाथला जाऊन तिच्या नावाचं तर्पण केलं, पिंडदान केलं आणि घरी आले. महिन्याभराने आम्हाला कळलं की दादीजी गेली! तिच्या मागे, तिने जे काही गोळा केलं होतं, ते कुठे गेलं माहित नाही. खूप काय-काय होतं. जमिनी होत्या, दागिने होते, ‘बडी गिट्टी फोड के छोटी गिट्टी बनानेवाली’ मशीन होती.. आणि रोख रक्कम होतीच. विषय निघाला की वडील म्हणायचे, “ज्याने मंत्राग्नी दिला त्यानेच ते स्वाहा केलं असणार. जाऊ दे!” आम्ही जाऊच दिलं. युपीतल्या त्या मूळ गावी आणि अमरावतीत, आमच्या हक्काचं बरंच काही आहे, ते कुणाच्या घशात गेलं हेही ऐकून माहित आहे.. पण जिचं होतं तिच्या लेकालाच त्याची पर्वा नव्हती, मग आम्ही कोण! असो! 

……………………………………………..

तिचं मूळ नाव नारायणी. पण विसाव्या वर्षी आपल्या चार वर्षाच्या लेकराला घेऊन घरातून पळून आल्यावर तिनं तिचं नाव ‘केसर’ असं सांगायला सुरुवात केली. थांबा! अडाखे बांधू नका. मी एका अतिशय कुलीन स्त्रीची गोष्ट सांगतेय. वरवर दिसायला अतिशय साधी पण आतून खंबीर, फोडणीची स्त्री.

शंभर वर्षाच्याही आधी सुरु झालीये गोष्ट.. मग मला कशी माहित? अहो ती माझी आजी होती. वडलांची आई. श्रीमती केसर मिश्र, वयवर्षे २०-२१. राहणार अमरावती, महाराष्ट्र, नोकरी इर्विन हॉस्पिटलमधे स्वैपाकीण. या ओळखीवर ती मरेपर्यंत जगली. पण ही ओळख तिला कशी मिळाली आणि ती तिने कशी टिकवली, ही आजची कथा आहे. नारायणी उर्फ केसरबाईची कथा. माझ्या आजीची म्हणजे दादीजीची!

‘मिश्र’ म्हणजे उत्तर भारतीय. सातव्या-आठव्या वर्षी तिचं लग्न बलभद्र मिश्र या शिक्षित तरुणाशी लावून दिलं गेलं. वयात आल्यावर ती सासरच्या गावी म्हणजे ग्राम आमां-इकौनी, तालुका करछना, जिला अलाहाबाद, उत्तर प्रदेश, इथे आली. लगेचच तिची रवानगी नवऱ्याच्या नोकरीच्या गावी म्हणजे अमरावतीजवळच्या चांदूर बाजार इथे झाली. नवरा पोलीस अधिकारी होता. ती महाराष्ट्रात आली तेव्हा तिचं वय १४-१५ असावं. वर्षभरातच तिला मुलगा झाला. बाळाला घेऊन उत्तर प्रदेशात जाऊन आले. तिच्या माहेरची कुलदेवी, विंध्यवासिनी. आम्ही लहान असतांना दादीजी आम्हाला तिची गोष्ट सांगायची. कृष्णाला यशोदेच्या कुशीत ठेऊन, तिला झालेली मुलगी घेऊन वसुदेव मथुरेत परत आला. देवकीचं आठवं अपत्य समजून कंसाने तिला तुरुंगाच्या भिंतीवर आपटण्यासाठी हातात घेतलं. कंस तिचा कपाळमोक्ष करणार तेवढ्यात ती कंसाच्या हातून निसटली आणि अवकाशात उडून गेली. जातांना तिने सांगितलं, तुझा कर्दनकाळ जन्माला आलेला आहे! ही योगमाया तिथून निसटली आणि विंध्य पर्वतावर जाऊन पडली.

गोष्ट संपल्यावर हमखास सांगायची, मी पण सासरी सांगून टाकलं होतं. हा माझा मुलगा आहे, नारायणीचा. तुम्ही त्याला मारू शकत नाही. आणि एक दिवस मी माझ्या बाळाला घेऊन भर रात्री घरातून पळाले!

झालं होतं काय की, नारायणीचा नवरा इथे महाराष्ट्रात असतांना तरुणपणात मेला. सासरची माणसं येऊन नारायणीला आणि तिच्या लहानग्या बाळाला युपीत घेऊन गेले. त्यांना अर्थातच नारायणीबद्दल फार आस्था नव्हती, आपल्या नातवाबद्दल होती. दोन मोठ्या भावांना मुलीच होत्या. तिघांच्यात मिळून हा एकटाच मुलगा होता. जमीनजुमला, घर-वाडे, बगीचे खूप होते.. ते या बिन बापाच्या पोराला द्यायचं काका लोकांच्या जीवावर आलं होतं. पोरगं जेमतेम चार वर्षाचं. त्याला मारून टाकून शेतातच एखाद्या जमिनीत मातीआड करणं अतिशय सोपं होतं. तसे प्रयत्न देखील झाले. नारायणी खिनभर आपल्या पोराला नजरेआड होऊ द्यायची नाही. तिने मोठ्या दिरांना आणि सासऱ्यांना पदराआडून ठामपणे सांगितलं होतं, “तुम्ही आम्हाला काहीही नाही दिलं तरी चालेल, पण माझ्या लेकराच्या जीवावर उठू नका. माझा शेवटचा आधार आहे तो!” पण पोरसवदा विधवेच्या बोलण्याकडे कुणीही फारसं लक्ष देत नव्हतं. वैधव्य आलेलं म्हणून सतत घरातली कामं करायची.. जीव पोराकडे लागलेला.. त्याला कोणी विहिरीत ढकलून द्यायचं, कोणी झाडावरून धक्का द्यायचा आणि तो पठ्ठा सगळ्यातून वाचायचा. हे अति झालं आणि एक दिवस नारायणी कपड्याचं गाठोडं आणि आपल्या अंगावरच्या चार दागिन्यांसह पोराला घेऊन घरातून पळाली. आपलं मूल जगावं ही एकच इच्छा होती तिला. त्या मुलाने मोठा झाल्यावर तिला एकही सुखाचा दिवस दाखवला नाही. त्याला काही कारणं आहेत, ती त्या मुलाच्या आणि माझ्याही दृष्टीने valid आहेत. पण कुटुंब चालवतांना कधी-कधी ‘योग्य काय’ ते न पाहता, ‘प्रिय काय’ ते पाहायचं असतं, हे आम्हाला पिढ्यानपिढ्या माहित नाहीये. न माझ्या दादीजीला, न वडलांना, आणि न मला! असो. पण या प्रतिकूल परिस्थितीत भक्कमपणे उभी राहिली म्हणून तर माझी दादीजी या लेखाची नायिका आहे! अशिक्षित पण खंबीर, कर्तृत्ववान, करारी अशी नारायणी.. नव्हे, आता ती श्रीमती केसरबाई मिश्र होती. वयवर्षे वीस-एकवीस, राहणार अमरावती.

नाव, ओळख मागे टाकून घरातून पळाली. तिला तिचं सासरचं गाव आणि पाच कोसावर असलेलं माहेरचं गाव माहित होतं. पण माहेरच्या लोकांनी चार दिवस माहेरवास करून तिला परत पाठवलं असतं. ते तिला नको होतं. नवऱ्याच्या नोकरीचं गाव चांदूरबाजार तिला माहित होतं. तिथे कसं जायचं ते अंधुक आठवत होतं. पण तिच्या वाटची भाकरी चांदूरबाजारात नव्हती, अमरावतीत होती. बडनेराला उतरून ती चालत अमरावतीला पोचली. आपण कुठल्या गावाला आलोय याचा तिला पत्ता नव्हता. हे चांदूरबाजार नाही एवढं कळत होतं. सुशिक्षित नव्हती पण कुशाग्र बुद्धी होती. आपलं तरुण वय, लहान लेकरुं, वैधव्य आणि अनाथपण घेऊन कुठे गेलं तर आपल्याला आसरा मिळेल याची समज तिला होती. ती लोकांना विचारत, विचारत देवीच्या देवळात पोचली. तेच ते सुप्रसिद्ध देऊळ, जिथून कृष्णाने रुख्मिणीला पळवून नेलं होतं! आणि तिथेच तिचं आयुष्य पालटलं. हा काळ बरोबर आजपासून शंभर वर्षापूर्वीचा, १९२२ च्या आसपासचा असावा. माझ्या वडलांचा जन्म १९१८ चा आणि या घटनेच्या वेळी ते चार वर्षांचे होते. या देवळात पुजाऱ्याचं कुटुंब राहायचं, त्यांच्यात ही ‘मिसराईन’ आठवडाभर राहिली. आणि इथूनच तिला आधी कुठल्यातरी बायकांच्या इस्पितळात (बहुतेक डफरीन हॉस्पिटल) आणि नंतर इर्विन हॉस्पिटलमधे नोकरी मिळाली. नोकरीवर रुजू होतांना बाईने निक्षून सांगितलं, “ब्राह्मणी हूं, जचकी नहीं करवाउंगी, खाना कितने भी लोगों का बनवा लो!” म्हणजे.. ब्राह्मण आहे, बाळंतपण करणार नाही, आचाऱ्याचं काम द्या! आमच्या कुटुंबात ‘निक्षून सांगण्याचा हेकट माज’ पिढीजात आहे. दादीजींना ब्राह्मण्याचा माज होता, वडलांना ‘जात-धर्म विहीन’ असण्याचा होता आणि मला कसला आहे कोणजाणे, पण आहे!

विस्तारभयास्तव दहा-पंधरा वर्षांचा leap-झेप घेऊ. अमरावती मुक्कामी मिश्र आई-लेकराचं काही नीट चाललं नव्हतं. तिचं देव-देव करणं, तिचा ब्राह्मण्यवाद, लोकांच्या घरातल्या समारंभात स्वयंपाक करायला जाणं, नोकरीच्या ठिकाणाहून तूप, कणिक, तांदूळ वगैरे घेऊन येणं लेकाला पसंत नव्हतं आणि लेकाने गांधीजींच्या नादाला लागून शिक्षण सोडलं हे आईला पसंत नव्हतं. म्हातारीकडे बऱ्यापैकी पैसा खुळखुळायचा. पोरगा कधीतरी म्हणायचा, “सगळं तर इर्विनमधलं आणून खाऊ घालते, पैसा खर्च होणार कसा?” शिवाय लोकांना लोणची, पापड वगैरे करून देणे, लग्न समारंभात स्वयंपाक करायला जाणे, हे काहीच जयदेव बाबूंना आवडत नव्हतं. अशात लेकाला जादूटोणा, समाधी लावणं, डोळ्यात रेखण्याचे अदृश्य होण्याचे मलम मिळवणं वगैरे, थोडक्यात गूढ-अगम्य गोष्टींचा नाद लागला. जोडीला कविता, साहित्य, स्वातंत्र्याचा विचार अशा खूप गोष्टी होत्या. ही कथा दादीजींची आहे, त्यामुळे तिच्या लेकाला बाजूला ठेऊ. खरं म्हणजे तिचा लेक म्हणजे माझा बाप हे माझं परम दैवत.. अतिशय गुणी माणूस.. माझे गुरु.. मार्गदर्शक.. पण त्यांच्याबद्दल लिहेन तेव्हा ते येईल. आता दादीजींबद्दल!

आईशी अगदीच पटेनासं झालं आणि १९४० मधे वडलांनी मुंबईचा रस्ता धरला.. सिनेमात लेखक व्हायचं होतं, कवी होतेच.. तिथे थोडी मुशाफरी करून, महाराष्ट्रीयन मुलीशी लग्न करून मुंबईतच स्थिरावले!

झालं! मऱ्हाटी मुलीशी लग्न म्हणजे.. दादीजी एकदमच फिस्कटली. अमरावतीत तिच्या कर्तृत्वाला बहर आला होता. माल टेकडी भागात जमीन घेतली होती.. आणखी एक-दोन जागी घरं बांधली होती. तिथल्या उत्तर भारतीय लोकांच्यात प्रतिष्ठित स्त्री म्हणून तिचा दर्जा होता. भावाचा जन्म झाल्यावर ती दर वर्षी मुंबईला यायला लागली. रेशनचा जमाना होता. ही बाई पितळी ‘गुंड’ भरून तूप, लाडू, पापड, कोणाच्या तरी श्राद्धाला मिळालेली पितळेची भांडी, अमुकतमुक घेऊन यायची. बोरीबंदरला टीसीने पकडलं की वडील धावपळ करून सगळा माल सोडवायचे.. आणि एवढं करून आमच्या आईने त्यातलं काहीही खायचं नाही हा आग्रह असायचा. ती जेवढे दिवस असायची तेवढे दिवस आईचे मच्छी खायचे हाल व्हायचे. मग ती बिल्डींगमधल्या दळवींच्या घरी जेवायला जा, लाडांच्या घरी जा असं करायची आणि दादीजीला कळायचं की ही ‘मांस-मच्छर’ खायला गेलीये. ती आईच्या हातचं जेवायची नाही. तिच्या मते, आई म्हणजे ‘दख्खनी रांड’ होती. असं म्हंटल्यावर आई गप बसणार काय? ती तिला ‘चेटकीण भैयाणी’ म्हणायची. आमच्या इमारतीचा वॉचमन युपीवाला होता. आमच्या दुर्दैवाने ब्राह्मण होता. दादीजी त्याच्या घरी जेवायची, त्याच्या बायकोचे लाड करायची.. आणि सांगायला मिश्राजींची आई! तेवढा तो महिना, वीस दिवस आमच्या घरचा माहौल म्हणजे अभूतपूर्व सनसनीखेज असायचा. आमचे तिघांचे लाड करायची. चौपाटीवर न्यायची. कधीतरी सोबत अमरावतीला न्यायची. मला आजही तो एक जयस्तंभ असलेल्या चौकात ओळीने थाटलेली हॉटेल्स आणि तिथे मिळणाऱ्या शंकरपाळी, जिलबी वगैरे पदार्थ आठवतात. मग आम्हाला सोडायला पुन्हा यायची. कारण वडलांना आई येऊ द्यायची नाही! किती अप्रतिम फोडणी असलेलं नातं ना??

या सगळ्याला कंटाळून एक दिवस दादांनी तिला सांगितलं की माझ्या बायकोशी नीट वागायचं नसेल तर माझ्या घरी येत जाऊ नको. आई-लेकाचं भांडण.. “मी तुझ्यासाठी माझं घर सोडलं” इथपासून, “तू हातातोंडाशी आलास आणि मला सोडून गेलास” इथपर्यंत सगळे पाढे वाचले गेले. “लोकांच्या घरात ब्राह्मणी म्हणून जायचं आणि शिधा आणायचा, हॉस्पिटलमधून सगळा किराणा आणायचा आणि वर भयंकर देव-धर्म” हे सगळं वडलांनी बोलून दाखवलं. मरेपर्यंत एकमेकांचं तोंड पाहायचं नाही अशा भीष्मप्रतिज्ञा घेतल्या गेल्या. माझी एक कपर्दिकही तुला मिळणार नाही असं सांगून एक दिवस दादीजी अमरावतीला निघून गेली. आमच्या ‘भीष्मरावांनी’ प्रतिज्ञा पाळली. आई गेल्याची तार अमरावतीहून आली आणि त्यांनी ती आम्हाला दाखवलीच नाही. बाबुलनाथला जाऊन तिच्या नावाचं तर्पण केलं, पिंडदान केलं आणि घरी आले. महिन्याभराने आम्हाला कळलं की दादीजी गेली! तिच्या मागे, तिने जे काही गोळा केलं होतं, ते कुठे गेलं माहित नाही. खूप काय-काय होतं. जमिनी होत्या, दागिने होते, ‘बडी गिट्टी फोड के छोटी गिट्टी बनानेवाली’ मशीन होती.. आणि रोख रक्कम होतीच. विषय निघाला की वडील म्हणायचे, “ज्याने मंत्राग्नी दिला त्यानेच ते स्वाहा केलं असणार. जाऊ दे!” आम्ही जाऊच दिलं. युपीतल्या त्या मूळ गावी आणि अमरावतीत, आमच्या हक्काचं बरंच काही आहे, ते कुणाच्या घशात गेलं हेही ऐकून माहित आहे.. पण जिचं होतं तिच्या लेकालाच त्याची पर्वा नव्हती, मग आम्ही कोण! असो!

काय म्हणायचं या माणसांना? साधी माणसंच.. की फोडणीची?

(फोटो सौजन्य -गूगल)  

(मिथिला सुभाष या नामवंत पटकथाकार व संवाद लेखिका आहेत)

[email protected]

(मिथिला सुभाष यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात – मिथिला सुभाष– type करा आणि Search वर क्लिक करा.)

 

 

 

Previous articleरास्वसंघाचे दस्तावेज काय सांगतात?
Next articleदेवनूर महादेवांचे ‘RSS:अळ मट्टू अगला’- तिसरे प्रकरण
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.