-कामिल पारखे
पावसाचं आगमन झाल्यानंतर जून महिन्याच्या अखेरीस गोव्यातील झरे-ओढे, विहिरी, तलाव आणि तळी पाण्यानं तुडुंब भरतात. सर्व परिसर हिरवाईनं नटतो. या काळात २४ जून रोजी गोव्यात ‘सांन जॉव’ हा सण अगदी उत्साहाने साजरा केला जातो. अनेक गावांत तरुण या दिवशी घुमट, गिटार आणि इतर वाद्यांच्या संगीतात धुंद होत ‘सांन जॉव’ अशी आरोळी ठोकत पाण्यात सूर मारून हा सण साजरा करतात.
‘सांन जॉव’ (São João) म्हणजे पोर्तुगीज आणि कोकणी भाषेत ‘सेंट जॉन’. St. John the Baptist… (संत जॉन बाप्तिस्ता) हा ‘बायबल’च्या ‘नव्या करारा’तील एक महत्त्वाची व्यक्ती आहे. येशू ख्रिस्ताचा हा जवळचा नातेवाईक. येशूपेक्षा वयानं केवळ सहा महिन्यांनी मोठा. मात्र ‘देवाचा पुत्र असलेल्या येशू ख्रिस्तासाठी वाट तयार करण्यासाठी आपण आलो आहोत, अरण्यात ओरडणारी वाणी मी आहे’ असं सेंट जॉन द बॅप्टिस्टने स्वतःबाबत म्हटलं आहे. त्याने येशूचा जॉर्डन नदीत पाण्यानं बाप्तिस्मा केल्यानंतरच ‘सुताराचा मुलगा’ असलेला येशू आपलं खरंखुरं जीवितकार्य सुरू करतो.
त्याशिवाय सेंट जॉन द बॅप्टिस्ट हा ‘बायबल’च्या ‘नव्या करारा’तील अगदी सुरुवातीचा एक हुतात्मा. नव्या करारातील अगदी पहिले हुतात्मे म्हणजे येशू ख्रिस्ताच्या बेथलेहेम येथील जन्माच्यावेळीच त्या परीसरात जन्मलेली इतर अनेक बाळे. आकाशात अचानक अवतरलेल्या ताऱ्याचा माग काढत आलेल्या पूर्वेकडच्या त्या तीन ज्ञानी राजांनी हेरोद राजाला सांगितले कि नुकत्याच जन्मलेल्या एका राजाचे दर्शन घेण्यासाठी, त्याला वंदन करण्यासाठी ते आले आहेत.आपल्या सिंहासनाला आव्हान देणारा कुणीतरी जन्माला आहे असे वाटून हेरोद राजा मग त्या परीसरात जन्मलेल्या सर्व बाळांची हत्या करण्याचा आदेश देतो. सुदैवाने मारिया आणि जोसेफ यांनी आपल्या येशू बाळासह तेथून पलायन केल्याने ते बाळ वाचते. बायबलमधली हत्या झालेल्या निरपराध बाळांची ही कथा राजा कंसाच्या तुरुंगातील वसुदेव-देवकीच्या कृष्णाआधीच्या नऊ अपत्यांची आठवण करून देते.