Home Uncategorized कृत्रिम बुद्धिमत्ता आणि चॅटजीपीटीचे सामान्य माणसांच्या आयुष्यावर होणारे परिणाम..!
हान्सचा शिक्षक होता विल्हेल्म वॉन ऑस्टेन. ऑस्टेन गणित विषयाचा निवृत्त शिक्षक होता आणि प्राण्यांच्या बुद्धिमत्तेचं त्याला कायमच आकर्षण होतं. ऑस्टेननं मांजराच्या आणि अस्वलाच्या पिल्लांना संख्या आणि आकडेमोड शिकवायचा खूप प्रयत्न केला, पण ते काही शिकले नाहीत. शेवटी स्वत:च्या घोड्याला शिकवण्यात मात्र त्याला यश आलं. हान्सचा पाय धरून, त्याचं खूर योग्य क्रमांकावर अनेकवेळा आपटून त्यानं घोड्याला आकडेमोड शिकवली. लवकरच हान्स छोट्या बेरजा करायला शिकला. त्यानंतर ऑस्टेननं घोड्याला अक्षरं असलेल्या बोर्डाची ओळख करून दिली, ज्यायोगे तो प्रत्येक योग्य अक्षरावर खूर आपटेल.
कृत्रिम बुद्धिमत्ता आता जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये पोचली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित स्वयंचलित वाहनं, थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञान, युद्धांमध्ये वापरले जाणारे यंत्रमानव अशी अनेक उपकरणं मानवजातीला वरदान ठरत आहेत. कृषिक्षेत्रात इंटेलिजंट सेन्सर्सचा वापर, पर्यावरणातल्या हानीसाठी आणि नष्ट होत चाललेल्या प्राण्यांच्या प्रजातींचे जतन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा उपयोग होतो आहे.
आजकाल घरात वापरले जाणारे अॅपलची सिरी, अॅमेझॉनची अलेक्सा आणि मायक्रोसॉफ्टची कोर्टाना हे डिजिटल असिस्टंटस कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहेत. युजरचं दिवसाचं वेळापत्रक तपासणं इथपासूनच त्याच्यासाठी वेबवर सर्च घेणं ही सर्व कामं, हे डिजिटल असिस्टंटस करतात. युजरच्या दिवसभराच्या अॅक्टिव्हिटीजवरून हे असिस्टंट्स शिकतही असतात.युट्यूबवर तुमच्या आवडीचं संगीत कसं दिसतं? तुम्ही काय प्रकारची गाणी ऐकता, पाहता हे एआय नोंदवतं. त्याच प्रकारची इतर गाणी तुम्हाला ते सजेस्ट करतं. स्पॉटिफाय तुम्हाला नवीन गाणी किंवा जुनी गाणी असे पर्याय देतं. गुगल प्ले – बाहेरचं हवामान कसं आहे, कोणता वार आहे त्यानुसारही गाणं सुचवतं. पाऊस पडत असताना पावसाची गाणी लावणं, हे या असिस्टंट्समुळे शक्य आहे.
ग्राहकांना त्यांच्या वैयक्तिक आवडीनुसार अचूक उत्पादनं सुचवणं आणि जाहिराती दाखवणं, याबाबत एआयनं विलक्षण प्रगती केली आहे. यासाठी लिहिलेले अँटिसिपेटरी शॉपिंग अल्गॉरिदम्स ग्राहकांच्या ऑनलाईन वर्तणुकीनुसार हजारो उत्पादनांमधून ग्राहकाला कोणत्या उत्पादनाची गरज भासेल, याबद्दल हजारो प्रतिमा धुंडाळून निदान करतात. तुमच्या ऑनलाईन खरेदीची हिस्ट्रीदेखील त्यासाठी वापरली जाते. उदाहरणार्थ, तुम्ही अॅमेझॉनवर तवा घासण्याचा स्पंज शोधला, तर तुम्हाला त्यानंतर सर्फ करत असलेल्या सर्व पेजेसवर सफाईसाठीची उत्पादनं दिसायला लागतात. दुकानात प्रत्यक्ष जाऊन खरेदी करताना दुकानातून फिरताना, वस्तू शोधताना मानवी साहाय्यक आपल्याला मदत करतो. इ-कॉमर्सद्वारे आधी ग्राहकांसाठी फोनवर मानवी साहाय्यक उपलब्ध होते. मात्र, एआयचे चॅटबॉटस हे यंत्रमानव आणि व्हर्च्युअल असिस्टंट्स आता ग्राहकांना ऑनलाईन 24 बाय 7 सेवा पुरवतात. अनुभवांमधून शिकण्याच्या सेल्फ लर्निंग क्षमता त्यांच्यात असल्यामुळे, ग्राहकांच्या गरजा अचूक ओळखत जाण्याकडे त्यांची प्रगती होत असते. त्यामुळे ते जास्त प्रगत सेवा पुरवू शकतात.
चॅटजीपीटीमधला चॅट हा शब्द संभाषणासाठी आहे. जीपीटी म्हणजे जनरेटिव्ह प्री ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर. नावातच प्री ट्रेन्ड असलेल्या या चॅटबॉटला वैद्यकशास्त्रापासून कोडिंगपर्यंत आणि तत्त्वज्ञानापासून गणितापर्यंत बरंच काही आधीच शिकवलं आहे. तो माणसासारखा बोलतो. तो आपलं म्हणणं आणि सूचना ऐकतो आणि आपल्या शंकांची, प्रश्नांची समर्पक उत्तरं देतो.
चॅटजीपीटीचा वापर कंटेंट तयार करायला होतो. आज चॅटजीपीटी ब्लॉग्ज, इमेल्स, टेक्स्ट्स, पटकथा, कोडिंग, प्रतिमा तयार करू शकतं. त्यातून बेरोजगारी वाढेल, असा समज सर्वत्र आहे. या समजामागचा मूळ प्रश्न माणूस आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यात फरक काय? हा आहे. पहिला फरक म्हणजे कंटेंट कोणत्या टारगेट ऑडियन्ससाठी आहे याबद्दलची गृहीतकं. चांगला कंटेंट समोरच्या वाचकाला त्याच्याशी रिलेट होतो आणि त्याला समजतो. कृत्रिम बुद्धिमत्तेनं तयार केलेला कंटेंट काय सांगू पाहतो आहे? वाचकाला जे माहिती आहे, त्याच्याशी त्याला जुळवून घेता येतं आहे का? तज्ज्ञालाही ते आवडावं अशी सविस्तर आणि सखोल माहिती त्यात आहे का; की वाचक ते वाचून गोंधळात पडणार आहे? या आणि अशा प्रश्नांच्या उत्तरांवर विचार करून कंटेंट तयार करणं, हे कृत्रिम बुद्धिमत्ता करू शकणार आहे का? चॅटजीपीटी हा प्रकार हा स्वस्त आणि जलद आहे; पण उपलब्ध असलेल्या आणि भवतालच्या गोष्टींमधून जास्तीत जास्त प्रकारे कल्पनाशक्ती वापरून कंटेंट तयार करायची एकमेव क्षमता माणसात आहे. माणसाचं वेगळेपण त्याला कथा रचता येण्यात आहे. संशोधक त्याला सेन्स मेकिंग म्हणतात. गोष्टींचा विविध प्रकारे अन्वयार्थ लावता येणं आणि त्यानुसार सर्जनशीलता असणं, हा मानवी अविष्कार आहे. मानवाच्या कथांमध्ये भावना, रिलेट करता येणं आणि मूल्यं असतात. कृत्रिम बुद्धिमत्तेनं तयार केलेली कथा हे करू शकत नाही.