तुझं माझं नातं भाडोत्री असतं तर बरं झालं असतं…

राकेश शिर्के

कविता ही कवीमनाच्या अनेकानेक आंदोलनांवर जन्म घेत असते. हेलकावे खात असते नि त्याचवळेस ती शब्दरुपही धारण करत असते. खरंतर कविता ही कवीमनाचं जगणं, त्याचं जीवन भोगणं आणि त्याचं आयुष्य अनुभवणं या घटकांवर विसंबून असते. कवितेची निर्मिती हीच मुळात या तीन घटकांच्या अस्तित्वरुपाने होत असते, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आणि म्हणूनच कदाचित अनेकदा, किंबहुना सर्रासच कुठलीही कविता/रचना ही वाचकाला वास्तववादी वाटत असते… वाचक हरेक कवितेत/रचनेत वास्तव धुंडाळत असतो. वाचकाचं हे असं वास्तवाचा शोध घेणं आणि त्या शोधाचा तळ एखाद्या वास्तववादी घटनेशी जोडणं, हे पुन्हा स्वाभाविक आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे… ते मान्यच केलं पाहिजे…

कुठलीही कविता/रचना हीच मुळात घटना, कल्पना यावर बेतलेली असते… ती अशीच विनाकारण/बेलाशक/बेमतलब जन्मत नाहीच… आणि म्हणूनच एखादी आभासी रचनादेखील एखाद्या वाचकाला/मनोमेंदूला वास्तववादी वाटू लागते. ज्यावेळेस असं घडतं तेव्हा ती रचना त्या वाचकाला विचारांच्या पातळीवर भंडावून सोडते किंवा सुखावून जाते…

तुझं माझं नातं भाडोत्री असतं तर बरं झालं असतं…

भाडोत्री म्हणून तू भाडं दिलं असतं नि त्या भाड्याच्या बदल्यात मी तुला…

भाड्याचा पिरियड संपला असता

तर माझा पिरियड चुकला नसता

पिरियड चुकला नि सारंच चुकत गेलं…

भाडोत्री रिलेशनचं एक बरं असतं

देणंघेणं संपलं की मालक बदलतो…

माझा मालक बदलला असता तर बरं झालं असतं

तुझ्यासारख्यात मी माझा मालक पाहिला नसता…

दिवस जाऊ लागले नि तुला माझी जात खालची वाटू लागली

मला खाली घेताना नाही जाणवलं का रे तुला माझं खालचंपण…?

तू मला अंगाशी घेत राहिलास

तुझ्या अंगाशी येईपर्यंत…

तेव्हा कुठे होता तुझा,

तुला वाळीत टाकू पहाणारा समाज?

नंतर एकदा कानावर आलं…

चांगलं पाखरू पिंजर्यात अडकवलंस स्वबळावर म्हणून,

मित्रांत ऐट वाढली म्हणे तुझी…!

बलात्कारीची इतकी शाब्बासकी मला नव्यानेच कळली तेव्हा…

तुझा बाप म्हणाला, तिला सोड

नाही तर घर सोड…!

तुला पुरतं ठाऊक होतं

माझ्यापासून स्वतःला सोडवून घेण्याचं कसब…

आठवतंय मला,

आपल्या शेवटच्या भेटीत तू मला रांड म्हणालास…

रांड म्हणून जगेनही मी

पण,

खरं सांगू…..

तुला दलाली भोगूनही दलाल होता आलं नाही…!

तुझं माझं नातं भाडोत्री असतं तर बरं झालं असतं…!!!

– मोनालिसा.

मोनालिसा विश्वास या कवियत्रीच्या उपरोक्त रचनेत नेमकं असंच घडलंय. वरकरणी ही रचना वाचताना ती कवियत्रीचा स्वानुभव वाटावा इतकी हुबेहूब वाटते. यातूनच मग वाचक रचनाकाराच्या सार्वजनिक तर खरंच पण खाजगी आयुष्याचाही आलेख तपासू लागतो. मला वाटतं वाचकाच्या काव्यविषयक जाणीवा समृद्ध होण्याच्या वाटेवरील हे धोक्याचं वळण आहे. याचं कारण असं की, वाचक जेव्हा एखाद्या काव्यकाराच्या रचनेचा रसास्वाद घेत असतो नि रचनाकाराच्या स्वानुभवाशी ती रचना तपासून/पडताळून पाहू लागतो तेव्हा तो वाचक रचनेच्या रसास्वादाला हमखास मुकतो. अर्थात, सजग वाचक याला अपवाद आहेतच/असतातच…

तर…, मोनालिसा विश्वास या नव्या दमाच्या कवियत्रीची ही रचना स्वानुभवाचा भास निर्माण करत असली तरीही तिच्या रचनेतलं समाजवास्तव अजिबातच दडून रहात नाही. तसंच ही रचना स्वानुभवातून रचली गेलीय, असं एक क्षण गृहित धरलं, मग तर या रचनेमुळे समाजातील किळसवाणा, भोंगळ असा पुरुषी अहंमभावच अधिक थेटपणे प्रकट होतो, असंच म्हणावं लागेल. आणि म्हणूनच सजग वाचक अशा गोंधळात अडकून न पडता या रचनेच्या मतितार्थाकडे प्रयाण केल्याशिवाय राहणार नाही…

ही रचना मला अशा अर्थानेही महत्त्वाची वाटते की, या रचनेच्या निमित्ताने इथल्या समाजव्यवस्थेतील हरेक सामान्य पुरुषाला स्त्रीचा नकार पचवण्याची क्षमता/धैर्य स्वतःमध्ये बाणवण्याची संधी प्राप्त झाली आहे. याचं कारण असंकी, आजही स्त्रीचा/तरुणीचा एकूणच कुठल्याही बाबतीतला नकार पचवण्याची सहनशक्ती इथल्या पुरुषांमध्ये निर्माण झालेली नाही. महिलांवरील वाढत्या अत्याचारांमागील हेही एक प्रमुख कारण आहे. दुसरा मुद्दा म्हणजे, इथला पुरुष तर खरंच पण स्त्रीदेखील लैंगिकतेविषयी प्रचंड अज्ञान बाळगून आहे. आणि म्हणूनच एखाद्या स्त्री काव्यकाराने उपरोक्त रचनेप्रमाणे व्यक्त होण्याचा प्रयत्न जरी केला तरी सर्वप्रथम त्या स्त्री काव्यकाराच्या वैयक्तिक अगदी खाजगी आयुष्याचा आलेख काढण्याची चुरस लागते. अर्थातच या चुरशीतही इथला पुरुषवर्गच अग्रेसर असतो… स्त्रीवर्गही या कामी मागे नसतो, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल… खरंतर स्त्री/पुरुष काव्यकार असा भेद वाङमयीन कारभारात करताच येत नाही. तसा भेद करता कामा नये. आणि म्हणूनच उपरोक्त रचना लिंगभेदाच्या अनुषंगानेही जबरी भाष्य करते हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे.

अशा अनेक पदरांनी ही रचना उलगडता येऊ शकते. म्हणूनच ही रचना मला जशी भावली/आकळली ती तशीच इथे मांडण्याचा हा प्रयत्न आहे…

कवियत्री आपल्या पहिल्या दोन ओळी लिहिताना म्हणते की,

तुझं माझं नातं भाडोत्री असतं तर बरं झालं असतं,

भाडोत्री म्हणून तू भाडं दिलं असतंस नि त्या भाड्याच्या बदल्यात मी तुला…

या दोन ओळींत ‘भाडं’ नि ‘मी’ हे दोन शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत, असं मला वाटतं. हे दोन्ही शब्द कवियत्रिची स्त्री-पुरुष यांच्या नातेसंबंधातील व्यवहारिक भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात. अनेकांगाने विचार केला तरी या समाजातील स्त्री-पुरुषांच्या नात्याची मर्यादा लैंगिकतेच्या पलीकडे जात नाही, हेच या ओळींतून स्पष्ट होतंय. तसंच या दोन ओळींतील प्रारंभिक आक्रोशदेखील स्पष्ट होतो. हा आक्रोश पुन्हा इथल्या पुरुषप्रधान व्यवस्थेविरुद्धचा आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे…

कवियत्री रचनेच्या पुढील दोन ओळींत म्हणते की,

भाड्याचा पिरियड संपला असता

तर माझा पिरियड चुकला नसता…

या ओळी पुन्हा एकदा वाचकाला विचारप्रवृत्त करतात… त्या एकतर अशा अर्थाने की, या ओळींमधून कवियत्री थेट स्त्रीवरील पुरुषाच्या सनातन नि अलिखित मालकीहक्कावर प्रखर भाष्य करतेय. स्त्री नि पुरुष यांच्यातील व्यक्तिगत नातं जेव्हा तकलादू होऊन जातं तेव्हा सर्वसामान्य स्त्रीच्या मनात या ओळींप्रमाणेच परकेपणाची/भाडोत्रीपणाची भावना निर्माण होते. ही अशी भावना अशा परिस्थितीत निर्माण होणं पुन्हा स्वाभाविकच म्हणायला हवं. त्याचसोबत या ओळी इथल्या सामाजिक लिंगभेदावरही टीका करतात. पिरियड चुकणं हा शब्दप्रयोग केवळ स्त्रीच्या संदर्भातच वापरला जातो.नवनिर्मितीची पहिली पायरी म्हणजेच पिरियड चुकणं. ही घटना तशी उत्सवाची, सोहळा साजरी करण्याची. मात्र या रचनेत ही घटना ज्याअर्थाने आलीय किंवा येऊ पाहतेय ती तितकीशी सुखद नक्कीच नाही. हा भाड्याचा पिरियड संपणं म्हणजे काय हे म्हणूनच नीट समजून घेणं आवश्यक आहे. कवियत्री केवळ पती-पत्नी याच एका नात्याविषयी प्रकट होऊ पाहतेय, असं मला अजिबातच जाणवत नाही. याचं कारण असं की, या ओळींमधून स्त्री आणि पुरुष या दोहोंमधील नात्यांतील सूक्ष्मतेचं चित्रण केलं गेलंय. यामुळेच भाड्याचा पिरियड हा शब्द याठिकाणी करार, कालमर्यादा किंवा मग नात्यातील तीव्रता यांना संबोधित करतोय. हा पिरियड संपल्यामुळे नात्याच्या नवनिर्मितीची, त्यातील नवीन काही घडू पाहण्याची संधीच हुकली आहे. ही संधी हुकणं खरंतर प्रचंड जीवघेणं असतं. तीच जीवघेणी वेदना या दोन ओळींमधून प्रसवते आहे, असं मला वाटतं…

कवियत्रि रचनेच्या पुढील ओळींत म्हणते की,

पिरियड चुकला नि सारंच चुकत गेलं…

भाडोत्री रिलेशनचं एक बरं असतं

देणंघेणं संपलं की मालक बदलतो…

या ओळींमधून कवियत्रिची नातेसंबंधांबद्दलची ठाम भूमिका स्पष्ट होतेय. पिरियड चुकत जाणं नि पुढे मग सारंच चुकत जाणं, यामागची तिची भूमिका अगदीच सुस्पष्ट आहे. कवियत्रिला अपेक्षित असलेलं गणित हे अस्तित्वाशी निगडीत आहे, असं मला वाटतं. याचं कारण पुढील ओळींत पुन्हा मालक हा शब्द आलाय. इथे मालक हा शब्द कुण्या व्यक्तीबद्दल प्रयोगला गेलाय, असं मला अजिबातच वाटत नाही. तर हा शब्द पुन्हा एकदा इथल्या पुरुषी मानसिकतेवरच आसूड ओढणारा आहे. या समाजातील स्त्रीला जिवंत राहण्यासाठी एका पुरुषाची आवश्यकता आहेच, या सामाजिक अलिखित दंडकालाच या ओळी आव्हान देतात, असं मला वाटतं. स्त्री-पुरुष यांच्यातील शारिर नातेसंबंधांच्या अनुषंगाने विचार करतादेखील या ओळी इथल्या स्त्रियांच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या मागणीलाच हाकारतात, हे मला प्रखरतेने जाणवतंय. कवियत्रीचा हाच मुद्दा (आक्रोश/विद्रोह) मला महत्त्वाचा वाटतोय की, तिला हे प्रकर्षाने उलगडलंय की, इथली स्त्री आजही स्व-अस्तित्वाची लढाई लढू पहातेय/लढतेय… यामुळेही या ओळी रचनेच्यादृष्टिने परिणामकारक ठरतात…

कवियत्रिचं रचनेतील पुढील ओळींतील म्हणणंही पुन्हा तेच आहे. ती म्हणते की,

माझा मालक बदलला असता तर बरं झालं असतं,

तुझ्यासारख्यात मी माझा मालक पाहिला नसता…

या ओळीदेखील पुन्हा पुन्हा स्त्रीच्या स्व-अस्तित्वाचाच मुद्दा अधोरेखित करतात. यासोबतच स्त्रीच्या निवडीच्या आणि नाकरण्याच्या अधिकारालाही या ओळी तितक्याच ताकदीने पुढे रेटतात, ही या रचनेतील सर्वाधिक महत्त्वाची बाब आहे, असं मला वाटतं.

निर्णय चुकले की, स्त्री असो वा पुरुष तो हतबल होऊन पश्चातापाच्याच आगीत होरपळतो…

याचाही प्रत्यय रचनेतील या पुढील ओळींमधून येतोय…

दिवस जाऊ लागले नि तुला माझी जात खालची वाटू लागली,

मला खाली घेताना नाही जाणवलं का रे तुला माझं खालचंपण…?

असं म्हणण्यामागे कवियत्रिला शारीरिकतेच्या बाहेर येऊन काही बोलायचंय की नाही हे मला आकळत नसलं तरीही रचनेचा मूळ उद्देश गृहित धरून या ओळींबद्दल मी असंच मत व्यक्त करीन की, दिवस जाणं म्हणजे जरी स्त्रीचं गर्भारणं हेच अभिप्रेत असलं तरीही या रचनेत या ओळी त्याच एकमेव अर्थाने येत नाहीत. तर या ओळींतून कवियत्रि इथल्या पुरुषी जातीय मालकी हक्काच्या अघोरी मानसिकतेलाही सडेतोड जाब विचारतेय, असं मला वाटतं. कारण की, या समाजात कुठल्या जातीची स्त्री अंगाखाली घेतली गेलीय, याबाबत कधीच पुरेसा विद्रोह झालेला नाहीय. स्त्री अंगाखाली घेणं, ही नि एवढीच एकमेव पुरुषी मानसिकता या समाजव्यवस्थेत अंमलात आणली जाते. कायमच ती अंमलात आणली गेलीय… काही ठिकाणी जातीच्या अनुषंगाने स्त्री अंगाखाली घेतली जाणं, याबाबत संघर्ष झालेल्याचे संदर्भ सापडतात. पण हे संदर्भ केवळ स्त्री म्हणून झाल्याचं आढळत नाही. आणि म्हणूनच या ओळींतील स्त्रीला अंगाखाली घेण्याचा संदर्भ हा मला जातीवाचक वाटत नाही… तर तो लिंगवाचक वाटतो…!

तू मला अंगाशी घेत राहिलास, तुझ्या अंगाशी येईपर्यंत,

तेव्हा कुठे होता तुझा, तुला वाळीत टाकणारा ‘समाज’?

या ओळींची शब्दरचनाच मला खरंतर वेगळ्या अर्थाने आकर्षित करते… अंगाशी घेत राहिलास, अंगाशी येईपर्यंत… ही शब्दरचना यमक जुळवण्याच्यापलीकडची आहे, असं मला वाटतं. त्याचबरोबर, वाळीत म्हणजेच समाजव्यवस्थेतून बहिष्कृत करू पाहणारी जी व्यवस्था या समाजात कार्यरत आहे त्या व्यवस्थेला थेटपणे या ओळींमधून प्रश्न विचारला गेलाय. आत्ता तरी सांगावं मालक म्हणून मिरवू पाहणार्या पुलिंगी व्यक्तिने की, जेव्हा अंगाशी येऊ लागलं तेव्हा हा समाज नेमका कुठे? नि का? होता…?

मला वाटतं या ओळी कवियत्रीकडून समस्त स्त्री वर्गाकरवी विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं प्राथमिक रुप आहे. हे रुपही या रचनेच्या अनुषंगाने मला भावलंय…

नंतर एकदा कानावर आलं, चांगलं पाखरू पिंजर्यात अडकवलंस म्हणून,

मित्रांत ऐट वाढली म्हणे तुझी…!

बलात्कारीची इतकी शाब्बासकी मला नव्यानेच कळली तेव्हा…

या ओळी लिहिताना स्त्रीची मानसिक, शारीरिक आणि सामाजिक पातळीवर सतत होणारी फसगतच कवियत्रिला अभिप्रेत असावी, असं मला वाटतं. या ओळींचा शब्दशः अर्थ लावण्यात म्हणूनच काही मतलब नाहीये. मिळवलेल्या स्त्रीच्या संदर्भात सामाजिक पातळीवर जाहीररित्या शेखी मिरवण्याची जी सर्वसाधारण पुरुषी मानसिकता आहे, त्यावरच या ओळी बेतलेल्या आहेत, हे उघड आहे…

तुझा बाप म्हणाला, तिला सोड. नाही तर घर सोड,

तुला पुरतं ठाऊक होतं, माझ्यापासून स्वतःला सोडवून घेण्याचं कसब…

या ओळी पुन्हा एकदा त्याच भावना व्यक्त करू पाहताहेत, ज्या भावनांसाठी कवियत्री अंगाशी घेत राहिलास, अंगाशी येईपर्यंत… या शब्दांचा वापर करतेय. तसंच या ओळी इथल्या पारंपरिक समाजमनाचाही दाखला देतात. पालक म्हणून पाल्याने मालकीसाठी कुठल्या स्त्रीचा अवलंब करावा, हे ठरवण्याचा अधिकार पालकाने कायमच बजावला आहे. खरंतर ही एकप्रकारची व्यवस्थाच/सिस्टीमच आहे. आणि ही जबरी व्यवस्था या समाजव्यवस्थेत अनादीकालापासून कार्यरत आहे. याच सनातनी समाजव्यवस्थेवर जबरी टीका करत, या व्यवस्थेला आव्हान देण्याचं धाडस या ओळींमधून कवियत्रीने चोख केलंय, असं मला वाटतं…

आठवतंय मला,

आपल्या शेवटच्या भेटीत तू मला ‘रांड’ म्हणालास…

रांड म्हणून जगेनही मी

पण,

खरं सांगू…

तुला दलाली भोगूनही ‘दलाल’ होता आलं नाही…!

रचनेच्या या अंताच्या ओळी कवियत्रीच्या वैयक्तिक तर खरंच पण सामाजिक भूमिकेचीही पावती देऊन जातात. स्त्रीच्या अस्तित्वाचा जेव्हा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा इतिहास साक्षी आहे, इथल्या पुरुष व्यवस्थेने वर्चस्वाचीच कायम भूमिका घेतलेली आहे. स्त्रीलिंगी व्यक्तीवर पुलिंगी व्यक्तीचं सातत्याने असणारं वर्चस्वच या ओळींतून प्रतित करण्याचा प्रयत्न केला गेलाय. नि त्याचवेळेस दलाली भोगूनही दलाल होता आलं नाही, असं लिहून कवियत्री मोनालिसा विश्वास इथल्या समस्त पुरुषी मानसिकतेलाच एक सणसणीत चपराक लगावते, असं मला ठामपणे वाटतं…

मोनालिसा विश्वास या नव्या दमाच्या कवियत्रीची ही रचना मला या नि इतक्या विविध दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण वाटते…

मेंदूला विचारप्रवृत्त करणारी ही रचना रचल्याबद्दल कवियत्रीला त्रिवार सलाम…!

सांध्य.

Previous articleहिंदू कट्टर होतोय याला पुरोगामी जबाबदार!
Next articleकर्नाटकच्या राजकारणात मीडियाचं ओंगळवाणं वर्तन
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here