या लढ्याचे सगळेच मोठे नेते मोठ्या मनाने आपले पक्ष विसरून त्यात सामील झाले होते. समर्पणाशिवाय यश मिळत नाही, हे या लढ्यात दिसले. आचार्य अत्रे आणि त्यांचा ‘मराठा’, एक नेता म्हणून आणि एक वृत्तपत्र म्हणून, दोन हातांत दोन दांडपट्टे घ्यावे व त्या नेत्याने लढायला उभे रहावे, अशी ही लढाई अत्रेसाहेबांनी लढवली. जो-जो महाराष्ट्राचा विरोधक त्याच्या विरोधात ही लढाई होती. त्यात व्यक्तीद्वेष नव्हता. महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या प्रेमाने वेडी झालेली ही सगळी मंडळी त्या ध्येयाने झपाटलेली होती. त्यामुळे सहा-सहा महिन्यांचा तुरुंगवास झाला तरीही कशाचीही पर्वा न करता पाच वर्षांचे हे एक ‘ध्यासपर्व’ होते. त्यात अत्रे, डांगे, एस.एम. जोशी, सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील, उद्धवराव पाटील, दादासाहेब गायकवाड, प्रबोधनकार ठाकरे नेत्यांची यादी एवढी मोठी आहे… त्यापेक्षाही कार्यकर्त्यांची यादी तिप्पट आहे. नेता स्वत:ला नेता समजत नव्हता. ‘महाराष्ट्रासाठी लढायचे आहे’, या एकाच ध्येयासाठी पैसा जवळ नसताना झालेली ही या देशातील एकमेव निवडणूक आहे. अॅड. बी. सी. कांबळे मुंबईचे. निवडून येतात अहमदनगर जिल्ह्यातून… तेही लोकसभेसाठी.. केंद्रीय कायदामंत्री हरिभाऊ पाटसकर जळगावचे त्यांचा पराभव करतो ताडदेवच्या तुळशीवाडीतील एक पारशी नौशेर भरूचा… अशी लढाई पुन्हा होणे नाही. तो महाराष्ट्र आता पुन्हा दिसणार नाही. ते नेतृत्त्वही नाही.