मित्रांनो,तुम्हाला नरहर कुरुंदकर माहीत आहेत? जरा ‘हटके’ बोलणारा, वागणारा माणूस अशी त्यांची ख्याती होती. तर्कशुद्ध विचार करणारे आणि ते विचार ठोसपणे मांडणारे लेखक-समीक्षक-वक्ते गेल्या सत्तर वर्षातील महाराष्ट्रात फार थोडे झाले; त्यातलंच एक नाव- नरहर कुरुंदकर. वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी ते गेले. त्या माणसाचं जीवन आणि लेखन हा एक ‘इंटरेस्टिंग’ पण वेगळा विषय आहे… या कुरुंदकरांचं ‘यात्रा’ नावाचं एक पुस्तक आहे. खरं तर त्या पुस्तकाचं नाव त्यांना ‘विचारयात्रा’ असं ठेवायचं होतं; पण ते जरा जास्तच भारदस्त व आगाऊपणाचं वाटेल म्हणून त्यांनी त्यातलं ‘विचार’ काढलं आणि फक्त ‘यात्रा’ ठेवलं.
या पुस्तकातल्या एका लेखाचं शीर्षक आहे- ‘मी आस्तिक का नाही’… इथेही गंमत बघा… ‘मी नास्तिक का आहे’ असं शीर्षक दिलेलं नाही. या लेखातील एका वाक्याने मी गोंधळात पडलो होतो… ‘शेकडा ९८ धार्मिक व सश्रद्ध माणसे अप्रामाणिक आहेत, असे म्हणावे लागते.’ हे वाक्य वाचल्यावर मनात आलं, टक्केवारीच्या हिशोबात ढोबळ मानाने भाष्य करायचं असतं तेव्हा आपण ९० टक्के, ९५ टक्के, ९९ टक्के असं बोलत असतो. मग इथे कुरुंदकरांनी ‘शेकडा ९८’ असा शब्दप्रयोग का केला? हा प्रश्न मनात आला, म्हणून लेख पुन्हा वाचला, पण समजलं नाही. नंतरच्या काळात कुरुंदकरांचं लेखन वाचत गेलो आणि अगदी अचानक त्या विधानाचा नेमका अर्थबोध झाला. त्यांना म्हणायचं होतं- ‘नास्तिक माणसं संख्येने अत्यल्प, म्हणजे एक टक्का आहेत; तसेच आस्तिक माणसंही अत्यल्प, म्हणजे एक टक्काच आहेत. उरलेले ९८ टक्के लोक आस्तिक-नास्तिकच्या सीमारेषेवर आहेत.’
मित्रांनो, कुरुंदकरांचं हे विश्लेषण बरोबर नाही का? नास्तिक माणसं एक टक्का आहेत, हे आपण गृहीत धरून चालतो. पण आस्तिक माणसंही एक टक्काच? होय! बघा ना, आपल्या सभोवताली… परमेश्वरविषयक संकल्पना स्पष्ट असलेली, त्याच्या अस्तित्वाबद्दल मनात जराही शंका नसलेली माणसं फार म्हणजे फारच कमी आहेत. ठाम भूमिका घेऊन ईश्वराचे अस्तित्व नाकारणारे प्रामाणिक ‘नास्तिक’ जितके दुर्मिळ, तितकेच दुर्मिळ आहेत- आपला अभ्यास व अनुभव प्रामाणिकपणे मांडणारे ‘आस्तिक’! तुम्ही विचाराल, ‘उरलेल्या ९८ टक्क्यांचं काय?’ या ९८ टक्के लोकांचा ‘परमेश्वर’ संकल्पनेवर अभ्यास नसतो. चिंतन नसतं. त्यांना कसली ‘अनुभूती’ही नसते. केवळ संस्काराच्या बळावर ते ‘ईश्वर आहे’ असं म्हणत असतात. पूर्वजांकडून आलेल्या प्रथा-परंपरा ‘शुद्ध- अशुद्ध’ स्वरूपात, जशा असतील तशा पुढे नेण्याचे काम करीत असतात. तरीही त्यांना आपण ‘आस्तिक’ समजत असतो. कुरुंदकर तर म्हणतात, ‘‘परमेश्वराबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं, ह्या साध्या प्रश्नालाही प्रामाणिकपणाने उत्तर देण्यासाठी त्यांची ‘ईश्वरावरची श्रद्धा’ उपयोगी पडत नाही.’’ …तर हा वर्ग आहे तब्बल ९८ टक्के!
माझ्या मित्रांनो, हा (१+९८+१) टक्क्यांचा सिद्धांत थोडासा ताणून (‘थर्ड अँगल’मधून) बघितला तर लक्षात येतं… जगात ‘चांगली’ माणसं थोडी (एक टक्का) आहेत, तशीच ‘वाईट’ माणसंही थोडीच (एक टक्काच) आहेत… ‘त्यागी’ माणसं फार कमी (एक टक्का) आहेत, पण ‘भोगी’ माणसंही फारच कमी (एक टक्काच) आहेत… ‘पुरोगामी’ अत्यल्प आहेत, तसेच प्रतिगामी’ही अत्यल्प आहेत… सारांश, ‘सत्’ व ‘असत्’ अशा दोन प्रवृत्ती मानल्या तर या दोनही प्रवृत्तीचे लोक प्रत्येकी एक टक्का आहेत, उर्वरित ९८ टक्क्यांनी ‘सत्-असत्’च्या सीमारेषेवर गर्दी केलेली आहे.
या ९८ टक्क्यांचं अनेक गटांत वर्गीकरण करता येईल, पण तूर्त ते बाजूला ठेवू… यांचे काही ‘कॉमन’ गुणविशेष सांगता येतील… हा वर्ग फार सुसंगत विचार करीत नाही. प्रवाहाबरोबर चालत रहायचं, काही अडचणी आल्या तर मोकळी वाट असेल त्या दिशेने निघायचं, असं त्यांचं धोरण असतं. विचार, मूल्ये, तत्त्वं यांचं ओझं वाहायची यांची तयारी नसते. यांच्यातच ‘जिओ और जिने दो’ असं ‘ब्रीद’ असणारा सर्वांत मोठा आणि प्रतिष्ठित गट असतो… हा ९८ टक्के वर्ग अधूनमधून ‘सत्’ प्रवृत्तांचं गुणगान गातो, पण त्यांचं मोठेपण नेमकं कशात आहे, हे त्याला कळलेलं नसतं. हा वर्ग ‘असत्’ प्रवृत्तांना अधूनमधून शिव्या देतो; पण त्यांचा धोका त्याच्या ध्यानात आलेला नसतो… हा वर्ग ‘सत्’ व ‘असत्’ या दोन्ही अल्पसंख्यांकांपासून थोडा दूर राहतो, पण गरज पडली तर या दोन्हींचा उपयोग करून घेतो…. या दोन्हींचंही आकर्षण त्याला अधूनमधून वाटत असतं, पण त्यांच्यात सामील होऊन त्याचे परिणाम भोगण्याची, त्यासाठी किंमत मोजण्याची तयारी नसते. म्हणून ‘सत्-असत्’च्या सीमारेषेवर गर्दी करून अतिशय दाटीवाटीने हे ९८ टक्केवाले राहतात. सीमारेषेवर राहिल्याने यांचं कधी-कधी ‘सँडवीच’ होतं, तर कधीकधी ‘लंबक’ होतो.
‘सत्’ (एक टक्का) आणि ‘असत्’ (एक टक्का) हे परस्परांचे शत्रू असतात. ‘असत्’ वर्गात ‘तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणारे’ आणि ‘टाळूवरचे लोणी खायलाही तयार असणारे’ असे दोन मुख्य गट असतात. पण छोटं संकट आलं तरी ते त्वरीत एकत्र येतात. ‘सत्’ वर्गातही दोन मुख्य गट असतात. त्यांना प्रमाणभाषेत ‘सुधारक’ आणि ‘क्रांतिकारक’ असं म्हणता येईल. मोठ्यात-मोठं संकट आलं तरी ते एकत्र येऊन लढण्याचा विचार करीत नाहीत. त्यामुळे सत् व असत् यांच्यात सरळ लढत झाली तर ‘सत्’वाल्यांचा पराभव निश्चित असतो. गंमत म्हणजे सत् व असत् यांचा संघर्ष सतत चालू असतो, पण यांची हार-जीत ९८ टक्क्यांच्या क्रिया-प्रतिक्रियांवर अवलंबून असते. ९८ टक्क्यांना सक्रिय करण्यात ‘सत्’ प्रवृत्तांचं यश सामावलेलं असतं. तर ९८ टक्के निष्क्रिय राहिले तरी ‘असत्’ प्रवृत्तांची ताकद वाढते. म्हणून सत्-प्रवृत्त लोक विचारांना, भावनांना आवाहन करून किंवा त्यागी जीवनाची उदाहरणं पेश करून ९८ टक्क्यांना सक्रिय करण्याचा, आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतात. असत् प्रवृत्तीचे लोक दहशत पसरवून, फोडाफोडी करून, बुद्धिभेद करून किंवा लालूच दाखवून या ९८ टक्क्यांना निष्क्रिय ठेवण्यासाठी आटापिटा करतात. ‘सत्’ वर्गातला अतिशय छोटा गट (ज्याला क्रांतिकारक म्हटलं जातं) अधिक संवेदनशील असतो. ‘असत्’ वर्गाला शक्य तितक्या लवकर संपविण्यासाठी, सर्वस्व पणाला लावून लढायला ही संवेदनशील माणसं तयार असतात. म्हणून ती हाती असतील त्या तुटपुंज्या साधनांनिशी, शक्य असेल त्या मार्गाने ‘असत्’ वर्गाशी डायरेक्ट पंगा घेतात, त्यांना जेरीस आणतात; पण तुलनेने ताकद फारच कमी असल्याने लढतानाच संपून जातात. या ‘सत्’ वर्गातलाच मोठा गट (सुधारक) यांना मदत करीत नाही, करू शकत नाही. कारण निश्चित उद्दिष्ट ठेवून मार्गक्रमण करणं त्यांना श्रेयस्कर वाटतं. ‘साध्य’ एकच असलं तरी साधनं, दिशा आणि प्राधान्यक्रम या मुद्यांवर या दोन्ही गटांतच टोकाचे मतभेद असतात.
‘सत्’ वर्गातील हे दोन्ही गट आपापल्या पद्धतीने ९८ टक्क्यांना चेतविण्याचा प्रयत्न करतात. पण ह्या ९८ टक्के वर्गाची सहनशीलता फारच भयानक असते. ‘अती’ झाल्याशिवाय ते ‘सत्’वाल्यांच्या हाकेला ‘ओऽ’ देत नाहीत. सर्वांत विशेष हे आहे की, या ९८ टक्क्यांच्या हितासाठी ‘सत्’ वर्ग ‘असत्’शी लढत राहतो, पण ‘असत्’शी लढण्यापूर्वी त्यांना ९८ टक्क्यांशीच लढावं लागतं!
मित्रांनो, आपण ‘प्रॅक्टिकल क्लब’ स्थापन केला स्वत:साठी आणि समाजासाठी. म्हणजे आपण ‘सत्’ गटातील आहात असं गृहीत धरतो. त्यामुळे आपल्यासमोर तीन आव्हानं आहेत- परस्परांत ‘समन्वय’ साधण्याचं, ९८ टक्क्यांना ‘जागं’ करण्याचं आणि मग असत् वर्गाशी ‘टक्कर’ देण्याचं… पण आपण प्राधान्याने विचार केला पाहिजे- या ‘९८ टक्क्यांशी कसं लढायचं?’
विचार आपल्यालाच करायचा आहे. पण जाता-जाता राजेंद्र यादव काय म्हणतात ते सांगतो… तुम्हाला प्रेमचंद संस्थापक असलेलं ‘हिंदी’तलं ‘हंसं’ मासिक माहीत आहे?… या ‘हंस’चे सध्याचे ‘संपादक’ आहेत राजेंद्र यादव. तरुणाईच्या समस्या हाताळणारा त्यांच्याच कथेवर आधारित ‘सारा आकाश’ हा चित्रपट काही वर्षांपूर्वी विशेष गाजला होता… तर हे राजेंद्र यादव ‘हंस’मध्ये ‘तेरी मेरी उसकी बात्’ हा ‘संपादकीय कॉलम’ लिहितात. नोव्हेंबरच्या अंकातील ‘तेरी मेरी उसकी बात’चा मथळा होता- ‘दिवारों पे सजे हथियार’. त्याचा सारांश असा होता- ‘‘विचारप्रणाल्या, सिद्धांत, इझम्स् यांनी त्या-त्या काळात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली; पण ती हत्यारं आता जुनी झाली असल्याने आजच्या काळात वापरता येणार नाहीत. आपल्या पूर्वजांच्या पराक्रमांची ‘स्मृती’ म्हणून व नवीन लढाया लढण्यासाठी ‘स्फूर्ती’ मिळावी म्हणून घरातल्या भिंतीवर त्यांनी वापरलेली हत्यारं आपण अभिमानाने लावतो. तसंच विचारधारा व सिद्धांत यांचा अभिमान जरूर बाळगा; पण नव्या युगासाठी नवी हत्यारं बनवा!’’